नांदतो देव हा! (उपक्रम)

Submitted by संयोजक on 19 August, 2014 - 09:18

nandato 3.jpg

गणपती बाप्पा मोरया!
आजच्या गतिमानतेत स्वतःसाठी पुरता वेळ मिळत नसताना "दुसर्‍याला मदत कोण करतो?" असे काहीसे निराशेचे सूर क्वचित मनात उमटत असतात. अशा वेळी 'एखाद्या माणसाने दुसर्‍या एखाद्या माणसासाठी' केलेल्या मदतीबद्दल काही वाचायला मिळालं तर ती निराशा निघून जाते, माणुसकीवरचा, देवावरचा विश्वास पुनरुज्जीवित होतो.
"अगदी देवासारखा धावून आला तो माणूस म्हणून आज मी जिवंत आहे" किंवा "तुझ्या रूपाने देवच आला बघ माझ्या मदतीला" अशी वाक्यं आपण ऐकली असतील. ते ऐकताना क्वचित 'एखाद्या माणसाला लगेच देव करून टाकतात लोक' असा शेराही कदाचित (मनातल्या मनात) दिला असेल. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीची भावना मात्र अजोड असते.

प्राणावरचं संकट निवारणारे डॉक्टर असोत किंवा अगदी भर वाहतुकीच्या रस्त्यावर जोराने येणार्‍या गाडीपासून आपला हात धरून आपल्याला बाजूला ओढणारा कुणी अपरिचित असो, प्रसंगानुरूप कमी-जास्त वेळासाठी त्या त्या व्यक्तीला आपण 'देवासमान' करतो, हे मात्र नक्की. देवानेच त्या व्यक्तीला 'तशी' बुद्धी दिली असेही आपण म्हणतो.
असे अनुभव थोड्या-थोडक्यांना नाही बर्‍याच जणांना येतात. पण त्याबद्दल बोललं जातंच असं मात्र नाही. एखाद्याला देवत्व देण्यानं आपण 'देवभोळेपणा' तर करत नाही ना? अशी शंकाही क्वचित आपल्या मनाला स्पर्शून जात असावी.
पण खरा देव हा राउळी वा मंदिरी नसून अशा परहितरत माणसांच्या अंतरीच असतो ही खात्री बाळगून अशा देवांबद्दल सगळ्यांना सांगायला हवं.
'तुम्हाला जर असा 'हाडामांसाचा' देव भेटला असेल' तर त्या अनुभवाबद्दल यंदाच्या गणेशोत्सवात नक्की लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नांदतो देव हा याचा मला माझ्या घरातच आलेला अनुभवः-

२५ सप्टेंबर २००३ या दिवशी मी आई होणार असल्याची सुखद बातमी आम्हाला समजली. घरात अर्थातच आनंदी वातावरण, मात्र त्याला एक दु:खाची किनार होती. ती म्हणजे माझ्या सासर्‍यांना शेवटच्या पायरीला असलेल्या कॅन्सरचे निदानही याच सुमारास झाले होते. डॉक्टरांनी जास्तीत जास्त ६ महिने ते काढू शकतील असे सांगितले होते. या दिवसांत माझ्या सासूबाईंनी फार खंबीरपणे हे सारे हाताळले. सासर्‍यांची सर्व सेवा शुषृशा करत असतानाही त्या माझ्याकडेही आवर्जून लक्ष देत होत्या. माझी पहिलीच वेळ आहे व माहेरचे करणारे कुणी नाही म्हणून मला काय हवे, नको, माझ्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणे हे सारं त्यांनी अगदी मनापासून शेवटपर्यंत केले.
कदाचित वाचताना यात विशेष असे काही जाणवणार नाही. पण आपल्या जोडीदाराच्या साथीला आपण काही दिवसातच अंतरणार आहोत हे भीषण वास्तव स्वीकारूनही सुनेचे कोडकौतुक जातीने पुरवणे ही माझ्यासाठीतरी फार मोठी गोष्ट आहे.
Hats off to her

इथले एकेक अनुभव खरंच लक्षात राहण्यासारखे आहेत. माझ्या बाबतीतही एक अशीच घटना आहे जी आयुष्यभर माझ्या स्मरणात राहणार आहे. दोन वर्षांपूर्वी मी म्युनिक, जर्मनीला गेले होते तेव्हाची गोष्ट. अचानक लॉंग वीकेंड मिळाला म्हणून जवळपास कुठेतरी फिरुन यावे असे तीव्रतेने वाटत होते. पण एकटीनेच जाणे जरासे कंटाळवाणेही वाटत होते. मग, एकटीच घरापासून इतक्या लांब आलीस ना, मग आता इथून पुढेही करशील मॅनेज असं घरच्यांनी वगैरे समजावल्यावर मनाची तयारी झाली. जर्मनीस्थित मायबोलीकर संपदा हिच्याशी संपर्क करुन माहिती मिळवली. तिने हमी दिल्यावर (खरंतर मी अजून तिला प्रत्यक्ष भेटलेही नाहीये! फक्त तिच्या मायबोलीवरच्या आणि फोनवरच्या 'शब्दांवर' भरवसा ठेवून) मी पॅरीस ट्रिपला तिनेच सुचवलेल्या एका ट्रॅव्हल कं बरोबर जायचे पक्के केले. ठरल्याप्रमाणे गाडी मिळाली, प्रवास सुंदर झाला, हॉटेल-रुम सर्व काही अगदी छान होते. मी निश्चिंत झाले. काही ठिकाणे आपली आपणच पाहायची असल्याने संध्याकाळी जाऊन आयफेल टॉवर वगैरे पाहूनही आले.रात्रीचा प्रवास बर्‍यापैकी झोपेतच झाल्याने बसमध्ये ओळख झाली नाही ती मंडळी फिरताना भेटली. पैकी चार मुले म्युनिकलाच माझ्यासारखी ऑनसाईट आली होती दक्षिण भारतातून. त्यांचा एक मित्र स्टुटगार्टलाच स्थायिक झाला होता तो ही सोबत होता. थोडीशी बातचीत झाली, आम्ही सगळे पांगलो आणि दमून भागून थेट संध्याकाळी बसस्टॉपवर भेटलो. आता फक्त बसून मस्त बाहेर बघायचे, डुलकी घ्यायची एवढेच काम उरले होते. बस आम्हाला स्टुटगार्टला सोडणार होती. मी रात्री तिथेच मुक्काम करायचा म्हणून जवळच हॉटेल रुम बुक केली होती. सकाळी म्युनिकला जाणार होते. सगळे काही ठरवल्याप्रमाणे पार पडल्याने मी खुशीत होते.

पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. Proud बस अर्धा पाऊण तास प्रवास करते न करते तोच कानठळ्या बसतील असा मोठ्ठा आवाज झाला व एकदम जोराचा हिसका बसून बस रस्त्याच्या मध्यातून अचानक तिरकी तिरकी जात किंचाळत थांबली. सगळे दमलेले प्रवासी घाबरून जागे झाले. काय झाले काय झाले म्हणताना कळले की बसचे मागचे टायर टार्र्कन फाटले की फुटले! ड्रायव्हरचे कौशल्य म्हणून नशीब की कुणाला काही झाले नाही. पण आता पुढे काय? दुसर्‍या बसची सोय होते का पाहिल्यावर कळाले की आता लगेच काही होऊ शकत नाही. टायर बदलून मार्गक्रमणा करावी लागेल पण त्यातही काहीतरी मोठी तांत्रिक अडचण होती. गाडीसोबत आम्ही सगळे जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत एका गॅरेजमध्ये थांबलो. टायर बदलायला कितीसा वेळ लागेल? म्हणून आम्ही रिलॅक्स होतो. पण दीड तास होऊन गेल्यावर मला टेन्शन यायला लागले. काल भेटलेली मुले एकमेकांशी तमीळ भाषेत बोलत होती. पण माझा फोन बंद पडल्याने घरचे काळजी करत असतील या विचाराने घाबरायला झाले. इतक्यात एक मुलगा माझ्याशी हिंदीतून बोलू लागला. कुठून काय विचारताना महाराष्ट्र, पुणे, नाशिक कळाल्यावर हिंदीला रामराम करुन मराठीत बोलणे सुरु झाले.
मी विचारले - "नाशिकला कुठे असतोस?"
तो - "सटाणा."
!! खरंतर काही संबंध नव्हता पण मी उगाचच विचारले, "सटाण्याला ठाकरे कुटुंबाला ओळखता का तुम्ही?"
तो - "हो, दोन भाऊ डॉक्टर आहेत, एक पुण्याला असतो तेच ना. आमचे लांबचे नातेवाईकच की ते!"
मी -"हो!!? तो पुण्याचा असतो ना तो माझा मित्र - दीपक ठाकरे (साजिरा)"
मग धडाधड गप्पांना सुरुवात झाली. त्याची शेतीवाडी अमूक तमूक.. मला मनातून इतकं हायसं का वाटलं ते मला अजूनही सांगता येत नाही. पण कुणीतरी ओळखीचं सोबतीला आहे म्हणून जीवात जीव आला खरा. साजिर्‍याला मनातूनच मी थँक्स म्ह्टलं. त्याचा तरी इथे काय संबंध होता खरंतर? पण त्याच्यामुळे मला कुणीतरी सोबत मिळालं हे तर खरं ना.आता कितीही उशीर झाला तरी मला टेन्शन नव्हतं.

पण वैताग तिथेही आडवा आला. हा मुलगा माझ्या आधीच एक तास उतरणार होता. बस स्टुटगार्टला ९ ला पोचायची ती सुटलीच साडेआठला. आम्हाला पोचायला जवळजवळ बारा वाजणार होते कळल्यावर माझ्या तोंडचं पाणी पळालं. आता मी बसस्टॉपपासून पंधरा मिनीटे दुसर्‍या बसने हॉटेलवर कशी जाऊ? कारण तिथल्या लोकल बसेस साडेअकरालाच बंद होतात. एवढ्या रात्री ओझे घेऊन चालत जाणे शक्य नव्हते. टॅक्सी ड्रायव्हरने रस्ता चुकवला तर मला काय कळणार होतं? मला मार्गच सापडेना. काय करणारे मी? मला पटकन डोळे मिटून पुण्याच्या घरी पोचावेसे वाटू लागले. टेन्शनने डोळे भरुन येतायत का काय असे वाटले. सुरक्षेच्या दृष्टीने मी घाबरलीये असेही कुणाला कळू द्यायचे नव्हते. मग साजिर्‍याच्या या मित्राने त्या चार अधिक स्टुटगार्ट स्थायिक मित्राला माझी अडचण सांगितली. खरंतर आम्ही कुणीच कुणाला कालपर्यंत ओळखत नव्हतो. आम्ही सगळे 'भारतीय' यापलीकडे कोणताच दुवा आम्हाला सांधत नव्हता. मलाही परक्याच कुणाची तरी मदत घेण्यापेक्षा यांच्यावर विश्वास टाकणे सोयीचे वाटले. जे व्हायचे ते होणारच, अशी शप्पत सांगते मनाची तयारीही केली! चूक किंवा बरोबर असे आता काहीच नाही, जे आहे त्याला फक्त सामोरे जायचे आहे. त्या चार मुलांनी तर रात्रीच म्युनिकचे परतीचे तिकीट काढले होते ते रद्द करावे लागले. त्यांची रहायची सोयही त्यांना बघायची होती. साडेबाराला आम्ही स्टॉपवर उतरलो. व ते ५ मी १ अशा सहा जणांनी मिळून (त्या टॅक्सी ड्रायव्हरला पटवून ) टॅक्सी केली. गंमत अशी की नेमकं माझ्या आधीच त्या पाचींना उतरावे लागणार होते. तो टॅ ड्रा म्हणालाही, की मी यांना नीट सोडतो काळजी करु नका. पण स्टु. स्था मित्राने लांबचा रस्ता घ्यायचे ठरवले. इतर चौघे उतरल्यावर तो माझ्यासोबत टॅक्सीने माझ्या हॉटेलपर्यंत आला. मला दारात सोडून इमर्जंन्सी कॉलचा नंबरही दिला, आता शांत झोप! असे म्हणून निघून गेला. टॅक्सीचे पैसे घेणं दूरच पण मी रुमचा लाईट लावून हात हलवेपर्यंत तिथेच थांबून राहिला. तो गेल्यावर मी झाल्या गोष्टीचे देवाला धन्यवाद मानू की काय करु तेच सुचेना. इतक्या वेळ दाबून ठेवलंलं रडू आता मात्र कोसळलं. कशाच्या भरवशावर मी होते संपूर्ण संध्याकाळ आणि रात्र? परक्या देशात, परक्या लोकात माझं काही झालं असतं तर इथे कुणाला काय वाट्णार होतं? वेडं धाडस केलं होतं का मी? पण सगळं प्लॅनिंगप्रमाणे झालं होतं शेवटी जे घडलं तो दोष माझा नव्हता. तरीही कदाचित शिक्षा मला झाली असती.

त्या सहा 'भारतीय' मुलांची काही तासांची मैत्री मला आयुष्यभर आठवेल. या सगळ्या धांदलीत त्यांचे इमेल अ‍ॅड्रेस घेणं राहिलं ही चूकच पण कदाचित म्हणून मला त्यांच्या ऋणाईत तरी राहता येईल.

आशू, खतरी अनुभव (बाकी, मायबोलीकर कुठे मदतीला येतील काही सांगता येत नाही!!!)

Pages