गणपती बाप्पा मोरया!
आजच्या गतिमानतेत स्वतःसाठी पुरता वेळ मिळत नसताना "दुसर्याला मदत कोण करतो?" असे काहीसे निराशेचे सूर क्वचित मनात उमटत असतात. अशा वेळी 'एखाद्या माणसाने दुसर्या एखाद्या माणसासाठी' केलेल्या मदतीबद्दल काही वाचायला मिळालं तर ती निराशा निघून जाते, माणुसकीवरचा, देवावरचा विश्वास पुनरुज्जीवित होतो.
"अगदी देवासारखा धावून आला तो माणूस म्हणून आज मी जिवंत आहे" किंवा "तुझ्या रूपाने देवच आला बघ माझ्या मदतीला" अशी वाक्यं आपण ऐकली असतील. ते ऐकताना क्वचित 'एखाद्या माणसाला लगेच देव करून टाकतात लोक' असा शेराही कदाचित (मनातल्या मनात) दिला असेल. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीची भावना मात्र अजोड असते.
प्राणावरचं संकट निवारणारे डॉक्टर असोत किंवा अगदी भर वाहतुकीच्या रस्त्यावर जोराने येणार्या गाडीपासून आपला हात धरून आपल्याला बाजूला ओढणारा कुणी अपरिचित असो, प्रसंगानुरूप कमी-जास्त वेळासाठी त्या त्या व्यक्तीला आपण 'देवासमान' करतो, हे मात्र नक्की. देवानेच त्या व्यक्तीला 'तशी' बुद्धी दिली असेही आपण म्हणतो.
असे अनुभव थोड्या-थोडक्यांना नाही बर्याच जणांना येतात. पण त्याबद्दल बोललं जातंच असं मात्र नाही. एखाद्याला देवत्व देण्यानं आपण 'देवभोळेपणा' तर करत नाही ना? अशी शंकाही क्वचित आपल्या मनाला स्पर्शून जात असावी.
पण खरा देव हा राउळी वा मंदिरी नसून अशा परहितरत माणसांच्या अंतरीच असतो ही खात्री बाळगून अशा देवांबद्दल सगळ्यांना सांगायला हवं.
'तुम्हाला जर असा 'हाडामांसाचा' देव भेटला असेल' तर त्या अनुभवाबद्दल यंदाच्या गणेशोत्सवात नक्की लिहा.
देव म्हणायचं का माणसातली
देव म्हणायचं का माणसातली माणुसकी वगैरे?
असे काही अनुभव गाठीला आहेतच, पण त्यात सगळ्यात लक्षात राहिलेल्यापैकी -
दिल्लीला विद्यार्थी म्हणून रहात होते. एमफिलची गाईड सिमल्यात होती कामानिमित्त म्हणून प्रबंधावर सही आणायला सिमल्याला गेले होते. तिथे अचानक अस्थमाचा त्रास सुरू झाल्याने दोन दिवसात गाशा गुंडाळून नंतरचं ट्रेनचं आरक्षण रद्द करून मिळेल ती बस घेतली, कारण तिथल्याही डॉकचं मत सिमला सोडून जा असंच होतं. सगळ्या बसेस फुल होत्या (विशेषतः रात्रीच्या) तेव्हा संध्याकाळची बस घेतली. ती आपली नेहेमीची निमआराम बस होती. मी बसले आणि अर्ध्या तासात बस लागायला सुरुवात झाली, प्रत्येक वळणावर. प्रचंड ताप चढला. बस इतकी भरगच्च झाली होती की बसून रहाण्याशिवाय पर्याय नाही. तापाच्या ग्लानीत काय चाललंय कळतही नव्हतं. आणि आजारी पॅसेन्जर असला तरी कंडक्टर किंवा इतर कुणालाच काहीही ढिम्म पडलेलं नव्हतं. कुठेतरी जेवायला बस थांबली तिथे दोन मसाला पानं खाल्लेली आठवताहेत. बाकी काही शक्ती नव्हतीच. पण त्याने निदान उलट्या थाम्बल्या. उशीर करत करत रात्री अडीचला बस आयएसबीटी ला (दिल्लीतलं सुरक्षिततेच्या व इतर दृष्टीने अत्यंत कुप्रसिद्ध बसस्थानक) पोचली. मला असं वाटलं होतं की तिथे सकाळपर्यंत थांबावं आणि मग हॉस्टेलला जावं कारण ते वीसेक किमी दूर होतं. पण बसायचीही शक्ती नव्हती. खाली उतरले आणि माझी अवस्था बघून रिक्षावाल्यांचा गराडा पडला. साडेतीनशे चारशे रुपये मागायला लागले (त्याकाळी ती खूपच मोठी रक्कम होती) . बरं त्यांच्याकडे बघून सेफ वाटत नव्हतं एकुणातच. बाकीचे प्रवासी कधीच निघून गेले होते. माझं सामान निम्मं ओढाताण करून रिक्षावाल्यांनी बळकावलेलं. तेवढ्यात आणखी एक रिक्षावाला आला आणि त्यांच्याशी भांडायला लागला. माझं सामान बळजबरीने ताब्यात घेतलं आणि मला म्हणला 'तुम्ही माझ्याबरोबर चला. मी दोनशे रुपयात सोडतो. काळजी करू नका'. तोही दिसायला त्यांच्यापेक्षा वेगळा नव्हताच. पण तोपर्यंत माझी शक्ती संपलेली होती. मी त्याला हो म्हणून त्याच्यामागे गेले. स्टॅन्डवरून रिक्षा काढली. मी इतकी आजारी होते की रस्ता बरोबर आहे की नाही एवढंच बघू शकत होते, स्वतःचा प्रतिकार करायला एक बोट सुद्धा उचलायची ताकद नव्हती.
त्याची टकळी सुरू झाली, कुणीतरी मियांभाई होता. तो एकीकडे सांगायला लागला की - तुमच्या आसपास असलेले सगळे रिक्षावाले अतिशय वाईट नियतीचे होते/आहेत. ते असंच एकट्या बायकामुलींना टारगेट करतात. म्हणूनच मी रात्रीच्यावेळची ड्यूटी करतो कायमचा. तुम्ही काळजी करू नका, मी पोचवतो तुम्हाला नीट. वगैरे. मला हो ला हो म्हणण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.
पण खरंच त्याने म्हटल्याप्रमाणे मला हॉस्टेलवर नेलं. एवढंच नव्हे तर भय्याजींनी गेट उघडेपर्यंत थांबला. त्यांना सांगितलं की ही खूप आजारी आहे, तिचं सामान घेऊन खोलीत पोचवून द्या. मी त्याला तीनशे द्यायला लागले तर घ्यायला तयार नव्हता. मी तुझ्या पोरांना खाऊ घे म्हणून जबरदस्तीने अडीचशे हातात कोंबले.
परतल्यावर सीनियर रूममेटने सकाळी सगळा किस्सा ऐकून कपाळाला हात लावला. पण ती म्हणली बरं झालं तू तिथे रात्रीची नाही थांबलीस ते, नक्की काहीतरी बरंवाईट झालं असतं. कारण तिथे पोलिसही या सगळ्यांशी हातमिळवणी केलेले असतात, इ.
आता इन रिट्रोस्पेक्ट विचार करताना मी स्वतःच्या सुरक्षिततेचे स्वतःच घालून घेतलेले नियम बाजूला ठेवून काही मूर्खासारखे निर्णय घेतलेले जाणवतात (उदा: संध्याकाळची बस घेणे, त्यापेक्षा सिमल्यात हॉस्पिटलमधे दोन दिवस राहिले असते तरी चाललं असतं, माझ्या गाईडने तो ऑप्शन सुचवला होता पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून मी नको म्हणलं). आयएसबीटीवर रात्रीबेरात्री एकटीने उतरण्याची रिस्क घेणे हा तद्दन मूर्खपणा होता. काहीही होऊ शकलं असतं. तेव्हा तर मोबाईलही नव्हते.
केवळ आणि केवळ तो रिक्षावाला होता म्हणून सहीसलामत बचावले.
यानंतर परत कधीही असे घाईघाईचे नेहेमीच्या स्वनियमांविरुद्ध जाणारे निर्णय घेतले नाहीत.
वरदा .... काटा आला वाचुन
वरदा .... काटा आला वाचुन ....काळजी घे ग्....
सगळेच अनुभव मस्त आहेत
वरदा!! काटाच. पोटात गोळा
वरदा!! काटाच. पोटात गोळा आला.
बाप रे वरदा! धस्स झालं अगदी!
बाप रे वरदा! धस्स झालं अगदी!
वरदा, बाप रे!!!
वरदा, बाप रे!!!
वरदा, काय ग हा अनुभव !!
वरदा, काय ग हा अनुभव !!
रीया, आशिका, वरदा.... असे
रीया, आशिका, वरदा.... असे अनुभव विसरता येणे शक्यच नाही.
अशी माणसे असतात, भेटतात हे आपण परत परत एकमेकांना सांगत राहिले पाहिजे. जगायची प्रेरणा मिळते यातून.
काय अनुभव आहेत !
काय अनुभव आहेत !
दिनेश, रिया वरदा तुमचे अनुभव
दिनेश, रिया वरदा तुमचे अनुभव वाचून खरंच प्रचिती आली की देव आहे नक्कीच.
साल २०१०. मी घर बूक केलं होतं
साल २०१०.
मी घर बूक केलं होतं आणि जवळचं सेव्हिंग वगैरे ऑलरेडी बिल्डरला देऊन झालं होतं. बँकेकडून आपलं कर्ज आधी मंजूर करून घ्यावं वगैरे ही बुद्धी कुणी शिकवली नव्हती. घर घेण्याचा अनुभव ही पहिलाच. त्यामुळे पुढच्या स्लॅबचे पैसे साधारण मार्च २०१० मध्ये द्यावे लागतील असं कळलं. जानेवारी पासून विविध बँकांच्या एजंटसना भेटणे सुरूच होते. पण सर्वांनी तुम्हाला फारतर साडेनऊ लाख रूपये कर्ज मिळेल, फार जोर लागला तर १० लाख. असंच सांगितलं होतं. एल आय सी आणि स्टेट बँकेत तर काम झालेच नाही. शेवटचा पर्याय म्हणून १० लाख मिळाले तरी वर अजून अडिच लाख लागणार होते जवळपास इतकी मोठी रक्कम देऊ शकेल असं कोणिही नव्हतं.
तेव्हाच काही फायनान्सच्या कामासाठी मी माझ्या ऑफिसमध्ये एक जण आहेत त्यांना भेटले. बोलता बोलता कर्ज काढायचं आहे इ. बोलणं झालं. लगेच त्यांनी त्यांच्या एका मित्राला एच डी एफ सी मध्ये फोन लावला आणि तुझा नंबर तिला देतो. ती वेळ ठरवून भेटेल असं सांगूनही टाकलं.
वेळ ठरली, एजंटसशी बोलून बोलून मी फाईल अगोदरच तयार ठेवली होती.
त्यांच्यासमोर बसले त्यांनी सुद्धा १० लाख मंजूर करून देतो असंच सांगितलं. मग एकूण सर्व गोष्टींची आस्थेने चौकशी केली असता त्यांना मी २.५ लाख कमी पडत असल्याचं सांगितलं. त्यांनी तात्काळ कर्जाची एकूण रक्कम १० लाख होती ती करेक्ट करून १२.५ लाख केली. आणि लागणारे सर्व पैसे मंजूर झाले. कुणाकडेही पैसे मागावे लागले नाहीत. अर्थात ते मंजूर करण्या अगोदर त्यांनी माझ्याशी व्यवस्थित बोलून घेतलंच.
काहीही असो, त्यावेळेला मला अडिच लाख जास्तीचे मंजूर करून देणारा तो देवच माझ्यासाठी.
सगळेच अनुभव ग्रेट! दक्षुतै,
सगळेच अनुभव ग्रेट!
दक्षुतै, त्याक्षणी मिळणारा सुकुन कित्ती मोठा असतो ना?
आता हा मला धडा शिकवणारा
आता हा मला धडा शिकवणारा किस्सा...
माझा मित्र नेमिष मेहता, याचे लग्न जामनगरला झाले. आम्ही सगळे जण चार दिवस रहायला गेलो होतो.
नवर्याचे मित्र म्हणून आमचे लाड होतच होते. त्यातच एका दुपारी जामनगरमधली प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी
आम्हाला खास गाडी देऊन पाठवले.
ते प्रेक्षणीय स्थळ म्हणजे स्मशाण आहे पण तिथे काही मूर्ती वगैरे केलेल्या आहेत. ( तेच एकमेव प्रेक्षणीय स्थळ )
तसे ते वाईट नाही पण आम्हाला सोडून गाडी गेली होती आणि ती २ तासाने परत येणार होती. आमचे अर्ध्या तासात सगळे बघून झाले आणि आम्ही त्या जागेच्या बाहेर आलो.
तिथे हातगाडीवर एक माणूस बांगड्या, टिकल्या, बाहुल्या वगैरे विकत होता. आम्ही त्याला प्रत्येक वस्तूची किंमत विचारून भरपूर त्रास दिला. जवळजवळ अर्धा तास आम्ही त्याला पिडलं. त्याच्याकडची एकही वस्तू
बाकी ठेवली नाही. प्रत्येकवेळी मुंबईला हे स्वस्त मिळते. चांगल्या क्वालिटीचे असते. आपण शहरातले म्हणून
आपल्याला असे भाव सांगतोय, असे एकमेकात बडबडतही होतो.
चार आण्याची देखील खरेदी केली नाही. त्याने अजिबात न कंटाळता आम्हाला उत्तरे दिली. आम्हीच कंटाळलो
आणि जरा आजूबाजूला भटकू लागलो. तेवढ्यात मला सागरगोट्याचे मोठे झुडूप दिसले. भरपूर सागरगोटे
होते.
पण ते उंचावर होते, शिवाय झाडाला भरपूर काटे. झोडपायला म्हणून काठी शोधली तर ती पण लहान होती.
तिनेच झोडपायला लागलो. फारसे सागरगोटे हाती लागले नाहीत.
तेवढ्यात त्या विक्रेत्याने आम्हाला बोलावले व विचारले, तूम्हाला हवे आहेत का सागरगोटे, आहेत माझ्याकडे.
त्याच्याकडची पेटी उघडून त्याने दाखवलेही.
आम्ही आमच्या सवयीप्रमाणे त्याला भाव विचारला.
त्यावर तो म्हणाला, " पैसे कसले ? मी हे झाड लावलेले नाही. दिवसभर मी इथेच असतो. खाली पडतात ते गोळा
करतो. कुणाला हवे असतील तर देतो. तूम्हाला हवे तेवढे घ्या.. "
आयूष्यात पुढेही अशी माणसे भेटली... मी त्यांच्यासारखा व्हायचा प्रयत्न करतोय अजून.
झाडाला सागरगोटे?
झाडाला सागरगोटे?
खरय दिनेश.
खरय दिनेश.
हो रिया, बिट्ट्या पण झाडालाच
हो रिया, बिट्ट्या पण झाडालाच लागतात.
हो रीया, सागरगोट्याचे झुडूप
हो रीया, सागरगोट्याचे झुडूप असते. पानाना, खोडाला आणि शेंगेवर पण खुप काटे असतात.
बिट्ट्या माहीत आहेत गं पण
बिट्ट्या माहीत आहेत गं पण सागरगोटे नाही माहीत काय प्रकार आहे तो
खुप मस्त अनुभव.. रिया, आशिका
खुप मस्त अनुभव.. रिया, आशिका पाणी आलं डो ळ्यातुन.. माझे अनुभव..
१. लग्नाआधीची गोष्ट..
माझे अफेअर आहे हे कळल्यावर घरातल्यांकडुन कडाडुन विरोध झाला. दोघेही खुप टेन्शन मधे. मी पळुन जाण्याच्या पुर्ण विरोधात होते. लग्न करायचे तर दोन्ही घरांच्या संमतीनेच करायचे ठरवले होते.. घरी सांगितल्यानंंतर दोन महिन्यानंतर सुध्धा घरचे बोलणी करायला तयार नव्हते. मी मोटोरोला कंपनीत कस्टमर केअर एक्झुकिटिव्ह म्हणुन जॉब करत होते. त्या वेळी नेहमी प्रमाणे काम करत असताना एक वयस्कर बाई आल्या. नेहमीप्रमाणे त्यांना सर्व फंक्शन्स समजावुन सांगितले. (त्यावेळी गणपती वर खुप श्रद्धा होती.. आता ही आहेच..) तर त्या बाई मधेच उठल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवुन मला म्हणाल्या, तुझी गणपती वर श्रद्धा आहे ना. तुझं सर्व चांगल होणार आहे . गणपतीने माझ्या स्वप्नात येऊन सांगितले. मला दोन मिनिटे कळलंच नाही काय झालं ते. इतके बोलुन त्या निघुन देखील गेल्या. ना मला त्यांचा चेहरा आठवतो ना त्यांचा फोन. पण तो प्रसंग आणि ते बोल चांगलेच लक्षात रहिले. आणि त्यांच्या म्हणण्यांनुसार माझे सर्व काही यथावकाश पार पडले :)..
२. ३१ डिसेंबर २००९ ची संध्याकाळ.
आम्ही (मी, माझे यजमान, त्यांचे मोठे बंधु, वहिनी आणि त्यांचा ४ वर्षांचा मुलगा) अलिबागला (माझ्या सासरी, न्यु ईयर साठी) जायचे कि नाही हे ठरवत होतो. अगदी रात्री ८ वाजेपर्यंत हो नाहीच चालु होते. शेवटी दोन बाईक्स वर आम्ही निघालो. घरी काय सांगायचे ते नंतर ठरवु. लग्नाचे पहिलेच वर्ष असल्याने आम्हाला फिरायची हौस होती. घाटात पोहोचेपर्यंत चांगले ११.३० झाले.. आम्ही व्यवस्थित एका मोठ्या बसच्या मागच्या प्रकाशात नॉर्मल स्पीड ने जात होतो. त्या मोठ्या बसने एका मोठ्या जनावराला ओलांडले. माझ्या नवर्याने चटकन बाईक वळवुन रस्ता धरला पण मोठ्या दिरांना काय झाले ते समजले नाही. त्यांची बाईक स्कीट झाली. मी लगेच नवर्याला सांगितले. त्याचे अवसान च गळले. त्याने माझ्यासकट बाईक सोडुन दिली. आम्ही पण पडलो.. नशीब गाड्या भरधाव नव्हत्या. मी आणि यतीन (माझा नवरा) लगेच मागे धावत गेलो त्यांना उचलले. आम्हाला मदत करण्यासाठी एकही गाडी थांबेना.. (घाटात लुटमार होत असल्याने कुणी ही गाडी थांबवत नाही) आम्ही खुप घाबरलो होतो.. एवढ्या रात्री, एक लहान मुलगा बरोबर.. देवाच्या कृपेने कुणालाच जास्त लागल नाही. तेवढ्यात एक बाईक स्वार थांबला. एवढ्या रात्री विदाऊट हेल्मेट हा मुलगा आम्हाला मदत करायला पुढे आला.. त्याने आम्हाला उठवले बाजुला नेऊन पाणी वैगरे दिलं. लहानग्याची चौकशी केली. आम्ही सर्वजण चळाचळा कापत होतो भितीने. पण त्याने विचारपुस केली म्हणाला तुम्ही अलिबागला चाललायेत ना मी आहे तुमच्याबरोबर काही होणार नाही. तुम्ही व्हा पुढे. आम्ही ते जनावर बाजुला काढायच्या विचारात होतो पण तो मुलगा म्हणाला कि तुम्ही त्याला हात लावु नका. तुम्ही निघा मी आहे बरोबर. आवरुन आम्ही निघालो पण तो मुलगा आम्हाला परत दिसलाच नाही. १.३० वाजता घरी सुखरुप पोहोचलो. खरच तो मुलगा देवच होता आमच्यासाठी.
राखी, दुसरा अनुभव _/\_ काटाच
राखी, दुसरा अनुभव _/\_
काटाच आलाय वाचताना
रिये, खरच अजुन ही आठवल तरी
रिये, खरच अजुन ही आठवल तरी काटा येतो. :(.. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी तस झाल आमचं.
हा देव भेटल्याचा वगैरे अनुभव
हा देव भेटल्याचा वगैरे अनुभव आहे की नाही माहित नाही. पण जो काही योगायोग होता तो भन्नाट होता.
नुकतंच माझं सासरी डोहाळजेवण झालेलं होतं, माहेरामध्ये डोहाळजेवण करायची पद्धत नसल्यानं आणि सासरी करायचं म्हणून सो सो केल्यानं आई थोडी नाराज होतीच. मे महिन्यातल्या एका दुपारी मी आणि आई दुपारच्या अशाच पडलो होतो. लोड शेडिंग असल्यानं टीव्ही वगैरे बंद. त्यामुळं मी हातामध्ये उगाच रूचिरा घेऊन वाचत होते. मध्येच काहीतरी आईला विचारून स्वतःचं किचन ज्ञान वाढवत होते. आईचा थोडासा डोळा लागला होता, तरी तिला उठवून जाब विचारला. "किती दिवस झाले तू गव्हाची खीर केलीच नाहीस"
"ते खपली गहू इथं मिळत नाहीत. " आई म्हणाली.
"काहीपण! दलियाची पण करत येते खीर" मी "मायबोलीज्ञानाचे" प्रकाशकिरण पाजळले.
"पण ती काही एवढी चांगली लाग्त नाही. तुला गव्हाची खीर खावीशी वाटतीये ना, तर चांगल्या आपल्याकडच्या खपली गव्हाचीच बनवून देईन" असं म्हणून आईनं विषय संपवला. "पुढच्या महिन्यांत आत्या येईल तेव्हा तिला आणायचा निरोप देऊ. थोड्ञावेळानं लगेच फोन करते"
मग थोडावेळ मी आणि आई आपल्याकडे कशी खपली गव्हाची खीर असते आणि ती कितीच चांगली लागते यावर चर्चासत्र सुरू केलं. आमचं बोलणं सुरू होऊन पाच मिनिटे झाली असतील नसतील गेटचा आवाज आला. एवढ्या दुपारी कोण आलं असेल म्हणून दार उघडलं तर आम्ही पूर्वी जिथं राहत होतो त्याच्या समोर राहणार्या काकू आल्या होत्या. या काकू मला जरा विशेष पसंद नव्हत्या. त्या दोन तीन वर्षापूर्वी बदली होऊन कोल्हापूरला गेल्या होत्या, पण त्यांची एक मुलगी शिकायला रतनागिरीच्या कॉलेजमध्ये असल्यानं त्या इकडे अधून मधून येऊन जात असत.
आमचं घर थोडंसं मुख्य शहरापासून लांब असल्यानं घरी येणं कधी जमायचं नाही. पण आज एवढ्या दुपारच्या उन्हातून अगदी दोन वाजता बसस्टॉपपासून आमच्या घरापर्यंत चालत आल्या होत्या. घामेघून आणि हाफ्फहुफ्फ अशी अवस्था असल्यानं आईनं पाणी वगैरे दिलं. "काय कसं आहे बरं आहे ना" वगिअरे बोलणं झालं. सरबत वगैरे झाली. आणि अचानक त्या मला हाक मारून म्हणाल्या. "घ्या! कशाकरता आले तेच राहून जायचं. आज रत्नागिरीच्या जोतिबाला आमचा नैवेद्य होता. त्याचा प्रसाद खास नंदिनीसाठी आणलाय." म्हनून त्यांनी चांगला दोन किलोचा पेढेघाटी डबा काढला.
..... डबाभर खपली गव्हाची खीर!!!!!!
मी आणि आई एकमेकींकडे अवाक होऊन बघतच राहिलो. आई म्हणाली हे खरं माझ्या लेकीचं डोहाळजेवण!!
बापरे, वरदा! अगं देव नाही तर
बापरे, वरदा! अगं देव नाही तर दुसरं कोण ते? आणि तुझी बुद्धी कुठे गेली होती? कायच्याकाय रिस्क घेतलंस. वाचूनही थरकाप झाला.
वॉव नंदिनी. काय पॉवरफुल
वॉव नंदिनी. काय पॉवरफुल इच्छाशक्ती तुझी!
मामी, ते क्रेडीट आईनं फक्त
मामी, ते क्रेडीट आईनं फक्त आणि फक्त माझ्याच लेकीला दिलंय. आमच्याकडे गव्हाची खीर ही लक्ष्मी मानतात. त्यामुळे "तुला मुलगीच होणार" हे आईनं ठामप्णे जाहीर करून टाकलं.
नंदिनी सॉलिड अनुभव.
नंदिनी सॉलिड अनुभव.
जवळपास वीस वर्षांपूर्वीची
जवळपास वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारच्या आजी आणि त्यांचे काही नातेवाईक व मित्रमंडळी दरवर्षी गिरनार, सोमनथ, द्वारका यात्रेस जात असत. त्यातल्या गिरनारला चढून जाण्यात मला रस असल्याने फारशी सश्रद्ध नसूनही मी त्यांच्यात सामील झाले. इतर ग्रुप नामस्मरण, जप ईत्यादीत रस असणारा होता. माझ्याच वयाच्या चार पाच मुली सुद्धा होत्या.पुण्यातून तीन गाड्या करून आमचा प्रवास सुरू झाला.
प्रथम गिरनार ला जाऊन आलो. त्यानंतर दुसर्या दिवशी संध्याकाळी सोमनाथला पोहोचलो. तेथील जुनं आणि नवीन अशा दोन्ही मंदिरात धुलिदर्शन झालं. दुसर्या दिवशीच्या सकाळच्या जुन्या मंदिरातल्या पुजेची वेळ ठरवून घेतली. दर वर्षी कोणत्यातरी ठराविक वस्तूचा पिंडीला अभिषेक करण्याचा ह्या सगळ्यांचा प्रघात होता. आम्ही गेलो त्या वर्षी उसाच्या रसाचा अभिषेक ठरला होता. सोमनाथच्या जुन्या मंदिरात तळघरात मुख्य पिंड आहे आणि बरोबर त्याच गाभार्याच्या वरती, वरच्या मजल्यावर फिरंगांना फसवण्यासाठी ठेवलेली दुसरी पिंड आहे. मूळ पिंडीचे पावित्र्य राखण्यासाठी हा सगळा खटाटोप. आमची पूजा झाली. सगळ्यांनी अभिषेक केला. फुलं वाहिली. शंकराची अवघी पिंड सुंदर फुलांनी सजली होती. सुंदर टपोरे लाल गुलाब त्यावर विसावले होते. पांढरी फुलं काळ्याभोर पिंडीची शोभा आणखीनच वाढवत होती. शेवटची आरती झाली.
आम्ही आमच्या सामानाची आवराआवर करत होतो तेव्हाच पुढच्या पुजेची मंडळी जमायला लागली. आणि बघता बघता गुरुजींनी ती सजावट उतरवली आणि पिंड पुन्हा स्वच्छ करायला घेतली. इतर लोक ह्या गोष्टीला सरावलेले असल्याने त्यांना ह्याचं काही आश्चर्य वाटलं नाही. माझ्याच मनाला चुटपूट लागून राहिली.
दुसर्या दिवशी सकाळी पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आम्ही सर्व़जण परत एकदा मंदिरात गेलो. आजही तेथे सजवलेली पिंड होती. दर्शन घेऊन डोळे उघडते तोवर कोणीतरी एक व्यक्ती; आजही डोळ्यापुढे आणली तरी साधीशी, सावळीशी, अगदी साध्या शर्ट-पँटमधली, माझ्या मागून पुढे पिंडीजवळ गेली. पिंडीशी वाकून नमस्कार केला. पिंडीवरचं एक टपोरं लाल गुलाबाचं फूल उचलून ते पटकन माझ्या हातात ठेवलं.. फूल घ्यावं की नाही ह्याचा विचार करायलासुद्धा मला वेळ मिळाला नसेल आणि फूल हातात घेते तेवढ्यात ती व्यक्ती तिथून निघूनही गेली. भानावर येत असतानाच लक्षात आलं की तिथल्या गुरुजींनी तिथली आरास उतरवायला सुरुवात केली होती. माझ्या हातात ते फूल तसच होतं. तिथे ते फूल माझ्या हातात अचानक कुठून आलं हे कोणीतरी विचारेल ह्या क्षणिक भीतीनं मी ते फूल पटकन पर्समध्ये टाकलं. तसंही हातात लाल गुलाब पडल्यावर घाबरण्याचच वय होतं ते..
पण सुंदर आरास लगेचच आमच्या समोरच आवरली जाणं जणू मला इतकं आवडलं नव्हतं की कदाचित त्यातलं एक फूल सांत्वन म्हणून मला देण्यासाठी कोणीतरी तिथे अवतरलं होतं. कोडं आजही तसच आहे आणि एका खोक्यात ते वीस वर्ष जुनं फूलही!
सोनचाफा नशीबवान आहात.
सोनचाफा नशीबवान आहात. परमेश्वराचा कृपाप्रसादच मिळाला तुम्हाला.
आणखी एक अनुभव.. जरी ह्यातही
आणखी एक अनुभव.. जरी ह्यातही जीवावर बेतणं वगैरे नसलं तरी अगम्य नक्कीच आहे
सात वर्षांपूर्वी लग्नानंतर मी बेळगावात आले. नवर्याचा, वैभवचा टुरिझमचा व्यवसाय असल्यामुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीशी नव्यानेच परिचय होत होता आणि बेळगावशीही !
लग्नानंतर अवच्या दीड दोन महिन्यातच बंगलोरच्या अॅक्सेंचर कंपनीचा ४० जणांचा ग्रुप वैभव मार्फत आला होता. वैभव अर्थातच दोन दिवस त्यांच्यासोबत चोरल्यात असणार होता. त्यांचं परतीचं खानापूर-बंगलोर सेकंड a/c चं रिझर्वेशन झालेलं होतं. दोन दिवसात वैभवकडून बेळगावच्या प्रसिद्ध बिर्याणीचं वर्णन ऐकून त्या सगळ्यांची बिर्याणी खायची ईच्छा खूपच बळावली. झालं. वैभवने फोनवर एका बिर्याणी जॉईंटला फोन करून ४५ प्लेट बिर्याणी आणि तेवढेच कॅरेमल कस्टर्ड्स ची ऑर्डर दिली. डिलिव्हरी खानापूरच्या आधीचं स्टेशन म्हणजे बेळगाव च्या गाडी येण्याच्या वेळेस प्लॅटफॉर्म वर माझ्याकडे द्यायची आणि बिलाप्रमाणे तिथेच मी पैसे चुकते करायचे असे ठरले.
बेळगावला ठरलेल्या वेळी मी पोहोचले आणि बेळगाव - खानापूर साधं तिकिट घेवून प्लॅटफॉर्म वर जाऊन थांबले. सेकंड a/c जवळ ठरल्या वेळेस तीन जण पार्सल घेऊन आले. नेहेमीच जॉईंट असल्याने ऑर्डर प्रमाणे वस्तू आहेत की नाही हे पाहाण्याची गरज नव्हती. फक्त किती पिशव्या आहेत आणि कशात काय आहे हे जाणून घेतलं. पैसे चुकते केले. आलेले तिघे जण निघून गेले. गाडी यायला अजून दहा मिनिटं तरी होती.. प्लॅटफॉर्म वर बसण्यासाठी खांबाभोवती जे चौकोनी कट्टे बांधलेले असतात त्यावर सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या होत्या. वैभवला फोन करून ती सगळी खानापूर ला पोहोचली आहेत की नाही हे बघितलं आणि ऑर्डर घेतल्याचंही सांगितलं. गाडी बेळगावात फार तर दीड-दोन मिनिटं थांबते आणि बेळगाव ते खानापूर अवघ्या दहा-बारा मिनिटात पोहोचते त्यामुळे ही सगळी खबरदारी गरजेची होती. प्लॅटफॉर्म वर इतरही प्रवासी सामानाबरोबर पोहोचत होते. बिर्याणीचा घमघमाट सुटला होता आणि सगळ्यांच्या नजरा आपोआप माझ्याकडे जात होत्या.
गाडी आली. सेकंड a/c ची चाळीस तिकिटं आमचीच असल्याने त्या डब्यासाठी खूप माणसं नव्हती पण जी होती ती मोठ्या बॅगांसकट होती. गाडी आल्यावर फार वेळ काढून चालणार नव्हतं. त्यामुळे मी हात सरसावून दोन्ही हातात निम्या निम्या पिशव्या घ्यायची शिकस्त केली पण ... केवळ अशक्य ! असलेल्या पिशव्यांपैकी फक्त निम्या पिशव्या माझ्या दोन हातात सामावल्या आणि तेवढ्याही घेऊन अरूंद दारातून गाडीच्या दांड्याला न पकडता गाडीत चढणं हे मुष्किल काम आहे हे मला कळून चुकलं. डिलिव्हरी देणार्या माणसांना जरा थांबवून घेतलं असतं तर सगळं नक्कीच सोपं झालं असतं.. पण हे सुचलं नव्हतं. वेळ निघून गेली होती आणि जात होती. अर्ध्या पिशव्या आत नेऊन एक नंबरच्या सीटवर ठेवून परत खाली उतरून उरलेल्या पिशव्या चढवण्याएवढा वेळही होता की नाही माहित नव्हतं. आणि समजा अर्ध्या पिशव्या चढवेस्तोवर कट्ट्यावरच्या पिशव्या कोणी लांबवल्या असत्या तर...? दरदरून घाम फुटला आणि तेवढ्यात कोणीतरी एक माणूस जवळ आला. कट्ट्यावर शिल्लक असलेल्या पिशव्या त्याने आपल्या हातात घेतल्या, मीही भारावल्यासारखी हातातल्या पिशव्या घेऊन त्याच्या मागे गेले. त्याने काहीच न विचारता, बोलता त्या पिशव्या पहिल्या सीटवर ठेवल्या. मी कशीबशी आत चढून गेले आणि तिथेच सीटवर पिशव्या चक्क टाकल्या. हातातलं वजन गेल्यावर आजूबाजूला बघितलं तर तो माणूस गायब झाला होता. त्याला थँक्स म्हणण्याचीही संधी मिळाली नव्हती..
मलाही खानापूर पर्यंत गाडीतून जायचं होतं. हात पाय खरं तर गळून गेले होते पण सगळ्या पिशव्या सीटवर नीट मांडल्या.. आणि गाडी सुरु झाल्यावर मी एवढ्या सीट्स रिकाम्या असूनही दारात जाऊन उभी राहिले. कारण माझं तिकिटं ऑर्डिनरी डब्याचं होतं.. पाच मिनिटांत टी.सी. आला.. तोही रिक्काम्या सीटवरच्या एवढ्या पिशव्या आणि बिर्याणीचा घमघमाट बघून चक्रावलेला होता. मला त्याच डब्यातून जाणं कसं अपरिहार्य आहे आणि ऑर्डिनरी तिकिट असल्यामुळे कुपेत आत न थांबता मी दारात थांबले आहे हे मी त्याला सांगितलं आणि तिकिट दाखवलं. आमची चाळीस तिकिटं असूनही त्यातली ३८ जणच प्रवास करणार आहेत तेव्हा दोन तिकिटं विकून त्याला फायदा होणार आहे हे कळल्यावर काहीच विरोध न करता त्याने मला आतही बस असं सांगितलं. तोंडदेखलं मी थँक यू म्हटलं.
मी दारातच वारा खात खानापूर स्टेशनात उतरण्यासाठी उभी राहिले. गाडी स्टेशनात शिरताना सामानासकट उभा ग्रुप दिसला. वैभव दिसला. गाडी पूर्ण थांबायच्या आधीच दारातून ग्रुपमधल्या पहिल्या व्यक्तीला सीट नंबर एक वर पार्सलपाशी कोणीतरी आधी जाऊन थांबा एवढं सांगून मी जवळजवळ प्लॅटफॉर्मवर उडीच मारली. पुढच्या मिनिटभरात सगळी जण दोन दरवाजांतून गाडीत घुसलीही होती. बंगलोरच्या दिशेने निघालेल्या सगळ्यांना हात हलवून निरोप दिला. मी आणि वैभव परतीची सोय बघायला गेलो.. आधी कधीही पार न पाडलेली अशा पद्धतीची जबाबदारी निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल वैभवकडून शाबासकीही मिळाली पण माझे मन मात्र ही शाबासकी त्या अनोळखी व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवू ह्याचाच विचार करत राहिले.
(No subject)
सगळे अनुभव आनंददायी..
सगळे अनुभव आनंददायी.. माणसांवरचा विश्वास वाढवणारे !
Pages