(विवेक)सूर्य पाहिलेला माणूस - श्री. सुनील सुकथनकर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

फार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विवेकवादाचा जागर करणार्‍या आगरकरांनी लिहून ठेवलं होतं - 'मानसिक धैर्य म्हणजे काय? तर स्वतंत्रतेने विचार करून जे आपणास तथ्य वाटेल ते बिनदिक्कत बोलून दाखविणे आणि त्या बोलण्याप्रमाणे आचरण करणे. खरा शूर आहे तो जसा शत्रूंच्या संख्येची पर्वा न करता त्यांच्यावर बेलाशक तुटून पडतो व धारातीर्थी पतन पावण्याचा उत्साह बाळगतो, त्याप्रमाणेच मानसिक धैर्य त्याच्या ठायी पुरे वास करीत आहे तो पुरुष प्रतिपक्षांच्या आक्षेपास किंवा निंदकाच्या निर्भर्त्सनेस खुशाल एकीकडे गुंडाळून ठेवतो आणि आपल्या मताचे नि:शंकपणे प्रतिपादन करून त्याप्रमाणे आचरणही करण्यास चुकत नाही. सार्‍या जगाचा असा समज आहे, किंवा मोठमोठे शहाणे म्हणून नाणावलेले लोक अमुक अमुक तर्‍हेचा अभिप्राय देतात किंवा आपले वाडवडील आज अनादिसिद्ध असे असे म्हणत आले, वगैरे गोष्टींचा विचार करण्याची त्यास जरूर पडत नाही.'

आज डॉ. नरेन्द्र दाभोलकरांचा प्रथम स्मृतिदिन. डॉक्टरांची भरदिवसा हत्या झाली, त्याला आता एक वर्ष उलटलं. आगरकरांनी, दाभोलकरांनी जे कंठशोष करून सांगितलं, त्यातलं थोडंतरी अंगी बाणवण्याचा आपण प्रयत्न करू शकू का?

डॉक्टरांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ चित्रपटदिग्दर्शक व लेखक श्री. सुनील सुकथनकर यांनी 'माहेर'च्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात लिहिलेला लेख इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

dabholkar.jpg

थोड्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. साधना कार्यालयाच्या वरच्या छोट्याशा सभागृहामध्ये विद्याताई बाळ यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम होता. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीराम लागू उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर निमंत्रक होते. बहुधा आगरकर पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दिला जाण्याचाच कार्यक्रम होता तो. या कार्यक्रमात पुनःपुन्हा तो शब्द भेटत होता - 'विवेक' किंवा 'विवेकवाद'.

डॉ. लागूंनी आधीच्या वक्त्यांच्या बोलण्यातल्या 'समन्वयवादी' भूमिकेचा समाचार घेण्याचा सूर लावला. 'न घाबरता बाजू घेण्याची वेळ आली, देव या संकल्पनेला जोडून येणार्‍या सर्व गोष्टी सोलून काढून वेशीवर टांगायला हव्यात', असं त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं.

त्यानंतर डॉ. दाभोलकर उभे राहिले. त्यांनी खूप शांत स्वरात डॉ. लागूंच्या विचारांशी अंशतः असहमती दर्शवली आणि निरीश्‍वरवादाच्या भांडखोर भूमिकेपेक्षा 'विवेकवादा'चीच आपल्याला अधिक गरज आहे, असं प्रतिपादन केलं.

प्रेक्षकांत बसून नम्रपणे विचार करताना डॉ. लागूंच्या रागामधली 'निर्ढावलेल्या, सोकावलेल्या किंवा गोंधळलेल्या, बिथरलेल्या समाजाला नाट्यमय धक्क्यानं जागं करण्या'मागची तिडीकही समजत होती. आणि त्याचबरोबर ‘याच समाजाचा एक घटक या नात्यानं, प्रामाणिक नम्रता मनी धरून समाजाला एकत्र शोधाचं आवाहन’ करणारी डॉ. दाभोलकरांची विवेककेंद्री भूमिका जास्त जवळची वाटत होती.

या प्रसंगानंतर अगदी गेल्याच वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डॉ. दाभोलकर, त्यांचे एक सहकारी आणि आमची मैत्रीण ज्योती सुभाष आम्हांला - मी आणि सुमित्रा भावे - यांना भेटायला आले. शाळेतल्या मुलांना वैज्ञानिक दृष्टी कशी देता येईल, या विषयावर एक लघुचित्रपट बनवण्याची संकल्पना घेऊन. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीपर्यंत आम्ही भेटत राहिलो. त्यांची पुस्तकं वाचत राहिलो. दुतर्फा आपापल्या कामांमध्ये अडकत गेल्यावर हा प्रकल्प मागे पडला, पण मनात या विचारांचा खूप ऊहापोह झाला. आमच्या 'बाधा' या चित्रपटाच्या वेळी स्त्रीची होणारी वंचना, त्यातून उत्पन्न होणारे मानसिक आजार, त्यावर होणारे अघोरी उपाय यांचा अभ्यास करत होतो. शहरी शिक्षणातून आलेला वस्तुनिष्ठपणा बाजूला ठेवून या बळींची, त्यांच्या भोवतालच्या सर्वांची, अगदी त्यांचं शोषण करणार्‍या वैदू-बाबांचीसुद्धा मनोवृत्ती समजून घेऊया; खरंच सह-अनुभूती घेता येते का पाहूया, असा प्रयत्न करत होतो. सातार्‍याच्या डॉ. अनिमिष चव्हण यांच्यासारख्यांची मदत घेत होतो. त्यांच्याकडे येणार्‍या मानसिक आजारी ग्रामीण स्त्रियांना वैदूंचा किती आधार वाटतो, हे ऐकून अचंबित होत होतो.

असंही लक्षात येत होतं, की शहरी-ग्रामीण, सुशिक्षित-अशिक्षित असाही भेदभाव करण्यात काही अर्थ नाही. कारण प्रचलित शिक्षणाच्या कुठल्याही मांडणीमध्ये श्रद्धेचा-अंधश्रद्धेचा कीस पाडणं गृहीतच धरलेलं नाही आहे. पूजा करून, कपाळावर दुबोटी गंध लावून आण्विक संशोधन करणारे शास्त्रज्ञ वैज्ञानिक दृष्टी नसणारे मानायचे की नाही? कळत नव्हतं. मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या मंदिरासमोर लावलेल्या क्लोज सर्किट टीव्हीच्या स्क्रीनला गंध-फुलं वाहणारे तरुण-तरुणी दिसताना त्यांची चेष्टा करावी की न करावी, हे उमगत नव्हतं.

चित्रपटाचं कथानक ग्रामीण भागात घडत असल्यामुळे त्या वेळी लक्ष त्यावर केंद्रित केलं होतं. तेव्हा श्रद्धा-अंधश्रद्धा या वैयक्तिक बाबींची सामाजिकता उलगडू लागली. आणि त्याचवेळी माणसाच्या आत आत असणारा हळवा काळा डोह, कधी वादळ, कधी निर्वात पोकळी - या गूढ सकारात्मक-नकारात्मक अगम्यतेला तोंड देण्याची चाललेली त्याची बिचारी तगमग ही अधिकच प्रकर्षानं जाणवू लागली. आमच्या 'वास्तुपुरुष' या चित्रपटासाठी मी एक गाणं लिहिलं होतं - कंसाच्या बोलावण्यावरून कृष्ण अक्रूराबरोबर निघण्याच्या वेळी सर्व गोकुळ लोटलं आहे, अशा पद्धतीचा तो अभंग होता. त्यात गाणारे वारकरी म्हणतात, कसा झुंजशील कान्ह्या, अदृष्टाशी?

या अदृष्टापुढे माणूस सैरभैर होऊन जातो. दारच्या निरागस, कोवळ्या, अश्राप बाळाची दृष्ट काढली जात असेल, तर कशामुळे का होईना त्याचं भलंच होणार आहे ना, असं मनात येतं आणि त्याचवेळी दृष्ट लावणारं कुणीतरी आहे या विचाराची - अन्यायकारी विचाराची पाठराखण केल्याची शरमही वाटते.

'बाधा'च्या संदर्भात विचार करताना लक्षात येत होतं, की नवरा जवळ न फिरकल्यामुळे पोटुशी न राहणारी एक धनगराची बाई आणि तिच्या निपुत्रिकतेसाठी जिच्यावर टेपरण ठेवलं जातं अशी एक दलित सैनिकाची पत्नी यांची झुंज गावच्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू होते. दोघीही बळीच आहेत. लढत कुणीच नाहीये. तरीही ही झुंज चालू राहते. कारण दलित सैनिकाची शेतजमीन गावच्या सरपंचाला हवी आहे. नवरा-बायकोच्या राजकारणातनं जन्माला येणार्‍या एका दुःखाला जोड मिळते जातीय तेढीची आणि फोडणी मिळते गावच्या राजकारणाची! त्यामुळे सर्वांनाच उमगणार्‍या घटनांचे हुशारीनं विकृत अर्थ लावले जातात आणि व्यक्तिगत दुःखाचं रूपांतर एका मोठ्या अंधश्रद्धेच्या अजगरात होतं. हा अजगर फुगवलेला आहे. चांगुलपणाच्या टाचणीचा स्पर्श झाला, तरी हा फुस्स् होऊन त्याचं अळीएवढं वेष्टण निर्जीव होऊन पडेल. पण चांगुलपणा बाहेर येत नाही, कारण अहंकाराची भिंत आडवी येते. आत्मविश्‍वास जागा होत नाही, कारण अदृष्टाच्या भीतीपायी मन अशक्तच होऊन जातं. आणि अशक्त मनाला एकतर श्रद्धा वाचवू शकते, नाहीतर अंधश्रद्धा. अंधश्रद्धा सर्वत्र बोकाळलेली असल्यामुळे चटकन आधाराला येते. श्रद्धा जागी करण्याचा सात्त्विक प्रयत्न करण्याचा अवसर आहे कुणाकडे? त्यामुळे अंधश्रद्धा हा नियम बनतो, श्रद्धा हा अपवाद आणि विवेक हा गुन्हा! म्हणून तर करूनसवरून कुणीतरी डॉ. दाभोलकरांना गोळी घालतं.

'बाधा' चित्रपटासाठी आम्ही एक गाणं लिहिलं होतं. ते शेवटी चित्रपटात आम्ही घेतलं नाही, पण त्यातल्या काही ओळी अशा होत्या -

मन कोरडं कोरडं, धुराळा धुराळा
रडं कोरडं कोरडं, लावी बोल दुस्काळा
कवळा ह्यो मानूस, लकलक जिवाचा
जिवाशिवा गाट न्हाई, एकटा ह्यो जल्माचा

हा कोरडेपणा, हा जल्माचा एकटेपणा आज माणसाला आणखीनच हळवा बनवतोय. हळव्या मनःस्थितीत कुठलंही व्यसन चटकन लागतं. मग ते अंधश्रद्धेचं का असेना. या बिचारेपणातून दुसर्‍याचा दुःस्वास निर्माण होतो. भविष्याची भीती तयार होते. कर्तृत्वापेक्षा कल्पितावर जास्त विश्‍वास बसतो. 'सत्यासाठी मी विषही प्यायला तयार आहे', असं म्हणणार्‍या सॉक्रेटिसला, एकटं मरायला सोडून 'उगाच विषाची परीक्षा नको' असं म्हणून असत्याचे घोट पिणार्‍यांचा समाज तयार होतो. अगम्य अशा आशंकेशी लढायला माणसाला ताकद हवी हे खरं. त्याच्या मनातला भीतीचा हा वणवा शमवायला विवेक तोकडा पडताना दिसतो. पण मग अशावेळी वाटतं, देवावरची, मांगल्यावरची श्रद्धा का नाही मुसळधार बरसात करत त्या वणव्यावर आणि नाहीसा करून टाकत त्या शंकेतून उत्पन्न झालेल्या भीतीला- अविचारी, निरर्थक भीतीला? तितकीच निःशंक, प्रामाणिक, ताकदवान श्रद्धा तोंड नाही का देऊ शकणार? देव-दानवांच्या युद्धात देवच तर कायम जिंकतात! मग इथेच का असं होतं?

देव या संकल्पनेनं माणसाला निसर्ग, इतिहास, मानवी समूहांच्या संस्कृतींची होत आलेली वाटचाल यांचा प्रतीकात्मक, कथात्मक वापर करत व्यक्तिरेखा निर्माण करण्याची, त्यातून चांगलं माणूस होण्याची प्रेरणा घेण्याची, नम्र होण्याची शक्यता निर्माण केली. माणूस त्या संकल्पनेच्या मनापासून प्रेमात पडला असता, तर नक्कीच समाधानी झाला असता.

निरीश्‍वरवादाची भीती वाटत असेल, राग येत असेल, तर उलट देवादिकांच्या अस्तित्वातून प्रसन्नतेचा, मांगल्याचा, आध्यात्मिक उन्नयनाचा अनुभव यायला हवा. हव्यासापेक्षा समर्पणाचा, उपभोगापेक्षा पूजेचा, संशयापेक्षा विश्‍वासाचा, भीतीपेक्षा आंतरिक शांततेचा, तोडफोडीपेक्षा समन्वयाचा ध्यास मनात तयार व्हायला हवा.

देवावर आंतरिक श्रद्धा ठेवणार्‍यांनी हे तपासून पाहायला हवं, की मी देवाला पापात वाटेकरी तर करत नाहीये ना? खरंच देव सर्वव्यापी असेल, तर खरंच त्याच्या नजरेत वाईट ठरेल अशी कृत्यं मी करत नाहीये ना? आणि याचा विचार न करता जर मी बेगुमानपणे वागत असेन, कुठल्यातरी देवाच्या देऊळ नामक दुकानात मी सोन्याचा कळस चढवला म्हणून खूष होणार देव असं मानत असेन, तर उलट मी अधिकच निरीश्‍वरवादी नाही का? या आत्मपरीक्षणातून आत डोकावत डोकावत गेलं, की एक शहाणपणाचा प्रकाश आत येऊ देणारी एक खिडकी सापडते. तोच विवेक! डॉ. दाभोलकर हेच सांगू पाहत होते.

विवेक हा नुसत्या ईश्‍वराच्या अस्तित्वाचा वाद रंगवणारा मध्यस्थ नाही! विवेक जागा असेल, तर लोकशाही उमजते. आपण काही 'अधिक विशेष' - 'बाकी सामान्य' अशी तर्कशास्त्रं हास्यास्पद वाटतात. इतिहास संकुचित राहत नाही. तरतम भाव जागा होतो. संधिसाधूपणाची लाज वाटते. खोटा आवेश पोरकट वाटू लागतो. सेन्स ऑफ प्रपोर्शन - काय, कुठे, किती, कुठल्या मर्यादेत याची रूपरेखा समजायला लागते. मग व्यापारात भलावण उपरी ठरते, कलेत हिणकस तडजोड करावी लागत नाही, धर्मातल्या सांस्कृतिक सौंदर्याच्या गोष्टी कोणत्या, प्रतीकात्मक शिक्षणाच्या कोणत्या, आध्यात्मिक साधनेच्या कोणत्या आणि खोटा आव आणून घुसडलेल्या कोणत्या, ते उमजायला लागतं. ते उमजलंय हे मान्य करायची भीती वाटत नाही.

म्हणूनच डॉ. दाभोलकर त्या दिवशी आगरकरांचं स्मरण करत ज्या विवेकवादाची प्रतिष्ठापना करू पाहत होते, त्याचं अधिष्ठान आहे करुणा. करुणा ही न्यायान्यायाच्या शुष्क भांडणाच्याही पलीकडे असते. ईश्‍वराची उपासना करणार्‍या संतांनाही ती उमजते आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्यालाही ती समजते.

करुणेतून निर्माण झालेल्या विवेकाचा आधार घेऊन जर कशाला 'रिटायर' करायचं असेल तर ते अनुनयवादाला. मग तो अनुनय सत्तेचा असो, व्यावसायिकांचा असो, ग्राहकांचा असो, रसिकांचा असो, की कौटुंबिक वर्तुळातल्या प्रियजनांचा असो. या अनुनयातूनच खोटे समर्थक निर्माण होतात, सत्ताकेंद्रं तयार होतात, संपत्तीचं आकर्षण तयार होतं आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतं. यातूनच झुंडशाहीचा जन्म होतो.

आपल्याला न पटणार्‍या गोष्टींचा, विचारांचा, व्यक्तींचा आदर राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा समाज हे काही स्वप्न असण्याचं कारण नाही. माणूस हा मुळात हिंस्रच आहे ही एक लोकप्रिय अंधश्रद्धा आहे, किंवा विचारसरणी आहे. त्यावर तोडगा म्हणून माणूस मूलतः चांगलाच असतो ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, रूढ करायला काय हरकत आहे?

नुकतंच मी अनेक वर्षांनी एका नाटकात काम केलं. म्हणजे अभिनय केला. नाटक आहे 'शिवचरित्र आणि एक'. सदानंद मोरे यांनी या शिवचरित्र नाटकात, शिवचरित्र लिहिणार्‍या ब्राह्मण जातीत जन्मलेल्या इतिहाससंशोधकाची भूमिका रंगवली आहे. ती मला करायची होती. यात काही समूहांचे प्रतिनिधी या इतिहास संंशोधकाच्या तोंडाला काळं फासतात, असा प्रसंग आहे. रंगमंचावर का होईना तोंडाला काळं फासून घेणं हा एक 'अनुभव' होता. पण त्यावर मी फार जिवाला लावून घेतलं नव्हतं- एक व्यक्तिरेखा समजून घेण्याची प्रक्रिया यापलीकडे त्यानं माझ्या मनावर आघात केला नव्हता.

पण दाभोलकरांचा आपल्या पुण्यामध्ये राजरोस खून झाला आणि या नाटकात आपण- आपल्या व्यक्तिरेखेनं जो निषेध अनुभवला त्याची ही टोकाची भयानक परिणती आहे, हे आतून जाणवलं. मन खूपच अस्वस्थ झालं. विवेकाची खरी खूण सहिष्णुता हीच असायला हवी. आपण आणि ते असे कप्पे पाडण्याकडे आजची सामाजिक परिस्थिती आपल्याला विनाकारण ढकलू पाहत आहे. व्यक्तींवर, समूहांवर, विचारसरणीवर छापे मारण्याची सक्ती होते आहे. आपल्याला जे योग्य वाटेल ते म्हणण्याची, त्याची नैतिक जबाबदारी घेण्याची आवश्कता तर आहेच, पण म्हणून दुसर्‍याविषयी घृणा, तिरस्कार, कुचेष्टा मनात बाळगण्याची गरज नाही.

स्वतःला श्रद्धाळू, भाविक म्हणवणारे भावनेच्या भरात, बुद्धिनिष्ठा सांगू पाहणार्‍यांना स्वार्थी, बहकलेले, आक्रमक समजतात; तसं अनेकदा बुद्धिनिष्ठ म्हणवणार्‍यांनी श्रद्धेचा आसरा घेणार्‍यांच्या डोक्यावरचं छप्पर, नाहीतर पायाखालची जमीनच काढून घेण्याचा आवेश अंगीकारण्याचं कारण नाही. उभयपक्षी सहिष्णुताच आपल्याला विवेकाकडे घेऊन जाईल.

डॉ. दाभोलकरांची भूमिका ही बोटचेप्या तडजोडीची नव्हती, तर प्रामाणिक संवादाची होती. संवादामध्ये आपली कवाडं उघडी ठेवण्याचा मोकळेपणा असतो. दुसर्‍याच्या विचारांचा आदर ठेवण्याची नम्रता असते. त्यांची दुराग्रही, हट्टाग्रही प्रतिमा तेव्हाही निर्माण केली जात होती, आजही केली जात आहे. कारण राजकारणाच्या सोयीच्या गणितात सगळंच बटबटीत होऊन जातं. त्यांचा आग्रह होता, तो श्रद्धेच्या भावनेचा अनादर करून पिळवणूक करणार्‍यांचं दुकान बंद व्हावं. श्रद्धाळू माणसाच्या मनातल्या हळव्या, नाजूक कोपर्‍याला धक्का मारण्याची त्यांची कधीच इच्छा नव्हती आणि आपल्या मांडणीमध्ये ते याचा न कंटाळता हसतमुखानं, प्रांजळपणानं पुनरुच्चार करत.
जादूटोणाविरोधी विधेयक निघणं हा दाभोलकरांचा प्रतीकात्मक विजय असण्यापेक्षा विवेकाची प्रतिष्ठापना होणं, हा त्यांचा फार मोठा विजय असेल. बुद्धिनिष्ठांच्या मनात श्रद्धाळू माणसाविषयी अनुकंपा असणं आणि श्रद्धाळू माणसाला बुद्धिनिष्ठाच्या साथीचा विश्‍वास वाटणं आणि या दोघांनाही शोषणाचं राजकारण करणार्‍या दुरितांच्या मनातला तिमिर नाहीसा करण्यासाठी झटणं यातच विश्‍वाला आपला विवेक नावाचा स्वधर्मसूर्य सापडणार आहे. समाजानं धिक्कारलेल्या आणि तरीही अपार करुणेनं भारावलेलं मन असणार्‍या ज्ञानेश्‍वर नावाच्या कोवळ्या वयाच्या तरुण कवीनं आपल्याला हे फार फार पूर्वीच सांगून ठेवलं आहे!

***

डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांचं छायाचित्र साधना प्रकाशनाच्या सौजन्याने

***

पूर्वप्रकाशन - माहेर (दिवाळी - २०१३)

हा लेख मायबोलीवर पुनर्प्रकाशित करण्यासाठी खास परवानगी दिल्याबद्दल मेनका प्रकाशन, पुणे व श्री. सुनील सुकथनकर यांचे मनःपूर्वक आभार.

प्रकार: 

डॉक्टरांना जाऊन एक वर्षे पूर्ण झालं....काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाहीय.
लेखातला शब्द न शब्द पटला.

हा लेख वाचला होता. आजही डॉक्टरांच्या मारेकर्‍यांचा शोध लागू शकलेला नाही, हे वाचून चीड येतेय.

लेखाचा शेवट खुपच छान.आज आकशवाणीवर नरेन्द्र दाभोळकर यांचे चितन ऐकले.आवाज ऐकताना ते आता आपल्यात नाहित या आठ्वणीने गलबलले.

लेख तर छानच आहे. परत परत वाचण्यासाठी संग्रही ठेवावा असा आहे. पण पहिला परिच्छेदही तितक्याच मोलाचा लिहीला आहे. खूप शिकण्यासारखे आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

जादूटोणाविरोधी विधेयक निघणं हा दाभोलकरांचा प्रतीकात्मक विजय असण्यापेक्षा विवेकाची प्रतिष्ठापना होणं, हा त्यांचा फार मोठा विजय असेल. बुद्धिनिष्ठांच्या मनात श्रद्धाळू माणसाविषयी अनुकंपा असणं आणि श्रद्धाळू माणसाला बुद्धिनिष्ठाच्या साथीचा विश्‍वास वाटणं आणि या दोघांनाही शोषणाचं राजकारण करणार्‍या दुरितांच्या मनातला तिमिर नाहीसा करण्यासाठी झटणं यातच विश्‍वाला आपला विवेक नावाचा स्वधर्मसूर्य सापडणार आहे. समाजानं धिक्कारलेल्या आणि तरीही अपार करुणेनं भारावलेलं मन असणार्‍या ज्ञानेश्‍वर नावाच्या कोवळ्या वयाच्या तरुण कवीनं आपल्याला हे फार फार पूर्वीच सांगून ठेवलं आहे!>>>>. खूप आवडले हे. छान लेख. धन्यवाद चिनुक्स हा लेख इथे प्रकाशीत केल्याबद्दल. आणी सुनिल सुकथनकरान्चे पण धन्यवाद.

मारेकरी कदाचीत सापडतील, पण खरा कर्ता-करविता कोण आहे? तो सापडणे महत्वाचे. नुसतेच समाजाला दोष देऊन उपयोग नाही, तर प्रत्येकाने आपली भूमिका परत एकदा तपासली पाहीजे.

शेवटचा परिच्छेद ग्रेट ...

एवढा चांगला वैचारिक लेख शेअर केल्याबद्दल चिनूक्स यांचे मनापासून आभार ...

उत्तम लेख. डॉ दाभोळकरांचा विवेक हा उपजत नसावा. अनेक वेळा पुर्वायुष्यात त्यांनी आक्रस्ताळी भुमिका मांडुन विवेकाला मुठमाती दिली आहे. ( हे माझे मत आहे. अनेकांच्या मते चुकिचे असु शकेल. )

उदा.,दाखल गोडाबाबा प्रकरणातले सत्य अनिसच्या कार्यक्रर्त्यांनी सुध्दा समजुन घेतले तर अनिसच्या पुढच्या वाटचालीसाठी चांगले राहील. जगात जे काही दिसत ते सर्वच सायन्सच्या परिभाषेत बसवण्याइतक सायन्स प्रगल्भ नाही. अस असताना विवेक हा अत्यंत आवश्यक आहे.

डॉ. दाभोळकर यांचा पिंड हा कार्यकत्यात रहाण्याचा फक्त भाषणे न ठोकता सामाजिक कार्य करण्याचा असल्याने त्यांना हे उशिरा जाणवले असेल की विवेका शिवाय सामान्य जन आपल्याबरोबर रहाणार नाहीत.

प्लॅचेट प्रकरणात जरी असे सिध्द झाले की त्यांच्या मारेकर्‍यांचा शोध प्लँचेट मुळेच लागला तरी बुवाबाजी, काळी विद्या, या सारख्या लोकांना त्रासणार्‍या विषयांना केवळ डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या आणि अनिस यांच्या प्रयत्नामुळे आळा बसला हे सत्य कोणी नाकारु शकत नाही.

आता डॉ. दाभोळकर नसतानाची परिस्थीती पाहु.

प्रकाश घाटपांडे | 3 August, 2014 - 02:04
अंनिसचे विजय भटकरांना आव्हान!
वाचा
http://www.ibnlokmat.tv/archives/131921

http://abpmajha.abplive.in/pune/2014/08/02/article373667.ece/ANSs-challe...
आमचे भाकित- विजय भटकर आव्हान स्वीकारणार नाहीत. २१ लाखांसाठी कुणी एवढा आटापिटा करायला सांगितलाय?

हा काय विवेकाचा मार्ग आहे का ? डॉ विजय भटकर प्लॅचेट विषयावर प्रयोग करणारे आहेत ? "भाकित" हा शब्द तरी अनिस च्या कार्यकत्यांना पटतो का ?

परदेशात अतिंद्रीय शक्तीवर विद्यापिठात शोध निबंध लिहले जात असताना हा विषयच त्याज्य आणि अंधश्र्ध्दा ठरवायचा किंवा अमेरिकेत धी अमेरिकन फ़ेडरेशन ऑफ़ अ‍ॅस्ट्रोलोजर्स च्या रिसर्च जर्नल असताना मात्र सावित्रीबाई फुले -पुणे विद्यापिठाच्या सभेत ज्योतिष विषयाच्या अध्यासनाला विरोध करत या विषयाच्या संशोधनाचे दरवाजे बंद करुन कोणता विज्ञान निष्ठ समाज आपण निर्माण करणार आहोत ?

जर डॉ. दाभोलकरांनी उत्तर आयुष्यात विवेकाची कास धरली असेल तर आता अनिसचे कार्यकर्ते त्या मार्गावर चालतील अशी आशा करण्यास हरकत नसावी.

लेख शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
बुद्धिनिष्ठांच्या मनात श्रद्धाळू माणसाविषयी अनुकंपा असणं आणि श्रद्धाळू माणसाला बुद्धिनिष्ठाच्या साथीचा विश्‍वास वाटणं >> ही गोष्ट भारतीय मार्क्सवाद्यांना वेळीच कळली असती तर.....

सुंदर समयोचित लेख चिनूक्स.
>>बुद्धिनिष्ठांच्या मनात श्रद्धाळू माणसाविषयी अनुकंपा असणं आणि श्रद्धाळू माणसाला बुद्धिनिष्ठाच्या साथीचा विश्‍वास वाटणं आणि या दोघांनाही शोषणाचं राजकारण करणार्‍या दुरितांच्या मनातला तिमिर नाहीसा करण्यासाठी झटणं यातच विश्‍वाला आपला विवेक नावाचा स्वधर्मसूर्य सापडणार आहे.>>
अगदी अगदी.
सारासारविवेक .. करुणामयी दृष्टीत निपजलेला . तो ज्ञानेश्वरांना कळला.
अंधश्रद्धानिर्मूलनाची या देशाला अत्यंत गरज आहे ,
पण सार-असार या शब्दाला असलेलं अध्यात्माचं अधिष्ठान छाटून टाकलं तर आपण समजून घेतलेला विवेकविचार अधुरा अपुरा ठरेल..

प्रकाश घाटपांडे अंनिसचे कार्यकर्ते आहेत का ?
त्यांना कांही सदस्यांनी खोदून खोदून विचारलेल्या प्रश्नांना बगल दिलेली आहे.

प्रस्तावना आणि लेखाचा शेवटचा भाग एकदम जमलाय.

>> डॉ. दाभोलकरांची भूमिका ही बोटचेप्या तडजोडीची नव्हती, तर प्रामाणिक संवादाची होती. संवादामध्ये आपली कवाडं उघडी ठेवण्याचा मोकळेपणा असतो. दुसर्‍याच्या विचारांचा आदर ठेवण्याची नम्रता असते. त्यांची दुराग्रही, हट्टाग्रही प्रतिमा तेव्हाही निर्माण केली जात होती, आजही केली जात आहे. कारण राजकारणाच्या सोयीच्या गणितात सगळंच बटबटीत होऊन जातं. त्यांचा आग्रह होता, तो श्रद्धेच्या भावनेचा अनादर करून पिळवणूक करणार्‍यांचं दुकान बंद व्हावं. श्रद्धाळू माणसाच्या मनातल्या हळव्या, नाजूक कोपर्‍याला धक्का मारण्याची त्यांची कधीच इच्छा नव्हती आणि आपल्या मांडणीमध्ये ते याचा न कंटाळता हसतमुखानं, प्रांजळपणानं पुनरुच्चार करत. >> हे त्यांच्या अनेक मुलाखतीत/ भाषणांत ऐकलेलं आठवतंय. लागूंचा युक्तीवाद गोळीबंद असला तरी भडक वाटेल पण दाभोलकर संयत भाषेत मिस्कीलपणे सांगत.

>>स्वतःला श्रद्धाळू, भाविक म्हणवणारे भावनेच्या भरात, बुद्धिनिष्ठा सांगू पाहणार्‍यांना स्वार्थी, बहकलेले, आक्रमक समजतात; तसं अनेकदा बुद्धिनिष्ठ म्हणवणार्‍यांनी श्रद्धेचा आसरा घेणार्‍यांच्या डोक्यावरचं छप्पर, नाहीतर पायाखालची जमीनच काढून घेण्याचा आवेश अंगीकारण्याचं कारण नाही. उभयपक्षी सहिष्णुताच आपल्याला विवेकाकडे घेऊन जाईल.<<
अगदी सहमत आहे.डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य? या धाग्यावर मी चर्चेच्या ओघात ते वेळोवेळी मांडले देखील आहे. सुनिल सुकथनकर व सुमित्रा भावे हे अंनिस चे हितचिंतक आहेत. ओ माय गॉड च्या परिसंवाद झाला त्यावेळी ते आले होते व सहभागी झाले होते.
इतरांच्या श्रद्धांची टिंगल टवाळी करु नये हे मला मान्यच आहे. चिकित्सा करताना मानवीस्वभावानुसार थोडी फिरकी घेतली गेली तरी माणसे दुखावतात. काही माणसे संवेदनशील असतात त्यांना चिकित्सा हा आपल्या श्रद्धेवर घाला वाटतो.मेंदुच्या मनात पुस्तकात सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा. पण जस जशी मानवाची वैज्ञानिक प्रगती होत गेली तसतशी अंधश्रद्धेचा पगडा कमी होउ लागला हे नाकारता येत नाही. विवेकी समाज निर्माण होणे हे निरंतर प्रक्रिया आहे. प्रबोधन व संघर्ष या दोन्ही पातळीवर अंनिस काम करत असते.

विवेकाची खरी खूण सहिष्णुता हीच असायला हवी. पटलेच

(निदान) स्वतःला 'विवेक'वादी म्हणवणार्‍या प्रत्येकाने ही बाब मनात ठेवून त्यानुसार आपले आचरण ठेवले तरी खूप गोष्टी सुरळीत होतील.