खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट

Submitted by आशूडी on 8 July, 2014 - 14:50

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.
खरंतर पूर्वी या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना हा प्रॉब्लेम आला होता का हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पण ३-४ वर्षांपूर्वी सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये अगदी हाच मुद्दा धरुन एका उपवर मुलीनेच लिहीलेला लेख प्रसिध्द झाला आणि हा प्रश्न ठळकपणे पृष्ठभागावर आला. आता त्यावर प्रतिक्रिया अशाही होत्या, की या लेखामुळे लोक अजूनच सावध झाले आणि या व्यवसायात आणखीच 'विवाहमंदी' आली.

मैत्रिणीचा मुद्दा क्र. २ असाही आहे की तिचे वडील पोलिस ऑफिसर आहेत. खरंतर ही किती अभिमानाची बाब! पण लोक भयचकित होऊन आ च वासतात! मुलगी वकील आणि वडील पोलीसात? नको रे बाबा! पण काय हरकत आहे? सीमेवर लढायला जावे तर शेजार्‍याच्या मुलाने, हे ठाऊक होते पण कायद्याचे रक्षणही करणारे परकेच कुणी असावेत? कुछ समझ मे नही आ रहा बॉस! आता दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.

मुलांच्या अपेक्षा अटी बघाव्यात तर हल्ली पहिली अट ही असते की 'आयटी वाली नको!', फुल टाईम ऑक्युपाईड नको! (हो, नंतर मुलाकडे कोण बघणार ना!) शिकलेली हवी, पगाराची खास अपेक्षा नाही. मग 'वकील' असण्यात प्रॉब्लेम काय आहे? फ्लेक्सी टायमिंग आहे, सर्व सरकारी सुट्ट्या आहेत. मुख्य म्हणजे मुलीची रिलोकेट करण्याची तयारी आहे. भरपूर माणसांची सवय आहे. आणखी काय हवं? आता ही मैत्रिण जराशी बोलघेवडी आहे. पण ते तर तिच्या व्यवसायाला पूरक आहे ना? मग त्या गोष्टीकडे 'व्यावसायिक गुण' म्हणूनही सुरुवातीला नाही पाहता येत? पुढे मागे मुलाचा शांत स्वभाव असेल तर ती ही निवळेलच की. पण हल्ली होकार नकार कळवण्याची काय गणितं असतात समजतच नाही. आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? खरोखर या प्रश्नाने आम्हाला हैराण केले आहे.

'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधल्या ओम आणि ईशा मुळे गेल्या काही दिवसात वकीलांना किंचित ग्लॅमर मिळालंय खरं पण त्याचा या गोष्टीसाठी कितपत फायदा होईल कुणास ठाऊक. निदान ईशासारख्या खानदानी वकील मुलीसुद्धा इतर सद्गुणी मुलींसारख्याच घरं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात अशी जाणीव जरी झाली तरी दिलासा मिळेल.

तुम्हाला याविषयी काय वाटते, कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
सगळं वाचल्यावर मुलांच्या, त्यांच्या घरातल्यांच्या विचारांत सुधारणा घडायला वाव आहे असं वाटतं.

>>आता ही मैत्रिण जराशी बोलघेवडी आहे.
>>पुढे मागे मुलाचा शांत स्वभाव असेल तर ती ही निवळेलच की.

का निवळावं? बोलकी आहे, तापट नाही.

तिला तिच्या करियरकरता, आयुष्यात जे हवंय ते मिळावं आणि हवंय तसं घडावं, यासाठी शुभेच्छा!

>> मुलांच्या अपेक्षा अटी बघाव्यात तर हल्ली पहिली अट ही असते की 'आयटी वाली नको!'
खरंच की काय?!

आयटी नको, वकील नको. नातेवाईक पोलिसांत नकोत. अजब लिस्ट आहे.

>> तुम्हाला याविषयी काय वाटते, कुठे सुधारणेला वाव आहे
आम्हाला नवल वाटतं.
असल्या लिस्ट असणार्‍या घरात ती चुकून पडत नाहीये ही एक इष्टापत्तीच - असंही वाटतं.
तिने अजिबात लग्न जमावं म्हणून करिअर सोडूबिडू नये - कुणी सांगावं, उद्या तसा दबाव आणला जाईलही तिच्यावर.

आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? >> वकील मुलगी फोटो, पत्रिका "देते" हेच पटत नाही बघ. हल्ली व्यवस्थित इंटरनेटवर प्रोफाईल टाकता येते. कुणी 'मिडलमन' (ओळखीचे, काकु/काका इ.) असेल तर प्रोफाईल नंबर द्यावा आणि मुलाला संपर्क करायला सांगावा. सिम्पल. त्यांनी नाही केला तर "कारण काय" ह्या भानगडीत तर अजिबात पडू नये. एकदा नाही समजल तर पुढे विषय कशाला वाढवायचा?

सिमन्तिनी+१

बोलघेवड्या वकील मुलीनं इतक्या पारंपारीक पद्धतीनं लग्न 'जमवाय'च्या भानगडीत कशाला पडायचं असं मला लेख वाचताना वाटलं.

सुधारणेला वाव आहे ना, मुलीलाच सुधारणा करावी लागेल की कसं हाताळावे से प्रसंग.
१) मुळात म्हणजे, "ठरवून करायच्या लग्नाच्या बाबतीत" समोरच्याने एकदा नाही म्हटले तर 'गेलात उडत' म्हणून प्रॉबलेम त्याचा आहे समजून सोडून द्यावे. आणि विचार करु नये की का नाही म्हटले. he doesnt deserve you.
लग्नाआधी विचार कळले ते बरं ना, मागाहून दादागिरी करून नोकरीपेशावरून त्रास झाला त्यापेक्षा हे बरं. ह्या बाबतीत दुसर्‍या पार्टीला सुधारत बसण्यात अर्थ नाही. त्यांना(त्या पार्टीला) जिथून जसे धोंडे बसायचे असतील त्यांच्या विचाराने बसतीलच कधी ना कधी. लग्न झाले असते व प्रश्ण असता तर सुधारणा करावी. Proud
आणि कोणाला नसेल 'वकील मुलगी' पसंत तर ठिक आहे ना... असते एकेकाची आवड. कित्येक मुलींना सुद्धा वकील नवरा नको असतो. बिजनेसवाला नको असतो. पालिकेत नोकरी, एकुलता एक हवा, उत्तम पगार असलेला,स्वतःचे घर असलेला वगैरे वगैरे हवे असते. ठरवून केलेल्या लग्नात तर बर्‍याच गोष्टी/आवड सर्वच जण पाहतातच. आणि का नाही पहाणार? लग्नाचा प्रश्ण आहे शेवटी.
मुलीला सुद्धा सारख्याच पेशेचा मुलगा नकोय ना मग प्रत्येकाची आवड असते समजून सोडून द्या ना.
2) भारतात अजूनही, लग्न म्हणजे कुटूंबाचे लग्न असते, त्यामुळे स्वालंबी असूनही जर तिला (आई वडीलांच्या वा इतर तत्सम कारणाने) पारंपारीक पद्धतीनेच लग्न (पत्रिका, वगैरे) करायचेच असेल तर आधी तिने नक्की करावे ना, की काय माहिती द्यावी आणि देवू नये. ती पत्रिका, फोटो, बघण्याचा कार्यक्रम करण्या आधी ती किंवा मोठी माणसं फोनवरूनच शिक्षण व इतर माहिती देत नाहीत का?. व स्पष्ट विचारत, बघा नोकरी अशी अशी आहे, चालत असेल तर भेटुया. नाहितर उगाच चहाचा व वेळेचा खर्च करा कशाला(दुसर्‍या पार्टीचा) Proud

३)शेवटचे, मुलगी आई वडिलांना विचारात घेवून हि पद्धत जरा बदलून मुलगा शोधू शकते का बघा. (कारण इथे म्हटलेय ती पत्रिका, वगैरे पद्धतीने करते). पद्धत चुकीची का बरोबर हा प्रश्ण नाही पण तिला चर्चा करायला, विचार जाणून घ्यायला (मुलाचे) बरं पडेल ऑनलाईन पद्धतीने, आधीच अक्ख घर गोंधळ घालण्यापुर्वी.( म्हणजे, ते पत्रिका, पोहे वगैरे वगैरे).
मुलगी शिकलेली आहे, पुण्याची आहे म्हणजे , आधी बाहेरच(मुला मुलीने) भेटून बघता येते का?
गावात असती, शिकलेली व नोकरीला नसती तर अश्या संधी कठिण होतात असा माझा समज आहे.

पत्रिका आधीच मागणे वगैरे व ते हि मुलीची पत्रिका आधीच मागणे मुलाच्याकडने म्हणजे फालतुगिरी आहे.
नाहि सांगायचे असेल तर मुलाकडचे लोकं मग पत्रिका जमत नाही सांगायला वापरतात असे पाहिलेय.

कुठे ही सुधारणा होत नाही.. काहीही फरक पडत नाही .. कुठेतरी अ‍ॅड्जस्ट करावं अशी विचारसरणी आहे आज पण

मुलिचं वकिल असणं लग्नाआड येत असेल आजकाल असं काही खरच वाटत नाही आहे. >>
इतकचं काय आयटी मधे असलेली, १ वर्ष उसगावात राहिलेली मुलगी पण नको का तरं खुप मॉडर्न असेल.. टिपटॉप राहत असेल.. हे विचार इंजिनिअर असलेल्या लोकांचे!

झंपी .. पहिला मुद्दा +१ पण इग्नोर तर किती करणार ..डोक्यात जातात असे लोकं

माझी एक मैत्रीण आहे. इंगलंडची बॅरिस्टर आहे. पहिले लग्न मुसलमानाशी. घरून भांडून मग तिथे वाद विवाद मारामारी होउन डिवोर्स. दुस रे लग्न बिजवराशी दोन मुले मग प्रचंड भांडणे होउन अजून तो डिवोर्स फायनल झालेला नाही. स्वभावाने एका परी फार छान, धाडशी आहे, खेळाडू आहे. मुलांना मस्त वाढवते. पण लग्नात अपयशी. जुळवून घेता येत नाही. कायम इशूज शोधून खटला भरायच्या मागे असते. सर्वच वकील असे असतील असे नाही. जुळवून घ्यावेच का हा ही एक मुद्दा आहे. उत्कट प्रेम नाहीतर प्रचंड खुन्नस असा स्वभाव आहे

तुमच्या लेखातील मुलीला चांगला पती आर्मी, वकिली पेशातला, सरकारी सर्विस, कलेक्टर मॅजिस्ट्रेट वगैरे, रेल्वेतील अधिकारी, खुद्द पोलिसातीलच भेटू शकेल. तसा प्रयत्न करावा. ह्या मुलांना ती लाइफ स्टाइल माहिती असते. मध्यमवरगीय नोकरी करणारे लोक्स पोलिसास घाबरून असतात. तिला कसा जो डीदार हवा आहे ते विचारून तशी जाहिरात अनुरूप किंवा प्रिविलेज्ड मॅट्रिमोनी मध्ये द्यावी. कोणी मित्र आहे का ते विचारून घ्यावे. आता बदलत्या सामाजिक रचनेत पूर्णपणे अ‍ॅरेंज्ड म्यारेज मुलींनी अ‍ॅक्सेप्ट करू नये. शी शुड टेक ओनरशिप ऑफ हर मॅरेज फिक्सिन्ग. आईबाबांवर नातेवाइकांवर विसंबून राहू नये.

वेग्ळ्या जातीचा, वेग ळ्या प्रदेशातला मुलगा चाल्णार आहे का? जसे आसामी, बिहारी, उत्तर प्रदेशी, पंजाबी मध्यभारतातले आयसी एस व्गैरे पास झालेली मुले ( पण हुंडा प्रकरण असू शकते. ) हे उमदे फिट तडफदार अधिकारी आर्मीत, पोलिसात सरकारी नोकरीत खूप भेटतील.

अय्या ते फोटो पत्रिका म्हटले म्हणजे लगेच काही ते लोक तिसऱ्या जगातले होत नाहीत!! ऑनलाईनच होतात या गोष्टी. अनेक फेमस मॆट्रिमोनी साईट्सवर रजिस्टर्ड आहेच. आणि लव्ह मॆरेज नाहीये तर इतर गोष्टी पाहूनच लग्न करताता अजून तरी भारतात. पत्रिका निदान रास गोत्र पाहणे फार बेसिक आणि जनरल आहे.
तृप्ती आवटी, प्रतिक्रिया मजेशीर आहे. नाही 'जमलं' तिचं कुठे बै!
झंपी, मुद्दा क्र.2 व 3 अंमलात आणले जातात.
हे सारे 4 वर्षं तरी चालू आहे. काळजी आहेच पण कदाचित चर्चेतून दुसरी बाजू कळेल म्हणून हा प्रपंच. बाकी, नकार देणाऱ्यांना गेलास उडत म्हटले म्हणून तर त्यांच्या बाजूची उत्सुकता आहे ना!
मृण्मयी, स्वाती _आंबोळे , शूम्पी व इतर धन्यवाद.

माझ्या माहितीतल्या विवाहमंडळ चालवणार्‍या बाईंनी देखील सांगितले की वकील मुलगी नको असते आजकाल सासरच्यांना. एक तर सगळे कायदे बायकांच्या बाजूने असतात. त्यात मुलगी वकील म्हणजे मग ओघाने आलेच बाकी सगळे म्हणून टरकून असतात.

अनेक फेमस मॆट्रिमोनी साईट्सवर रजिस्टर्ड आहेच. >> छानच कि मग. तिथे तुमचा जोडीदार कुठल्या क्षेत्रातला हवा ते दिसत. जर एखाद्या व्यक्तीने तिथे/किंवा इतर कुठल्या बाबतीत काही लिहले नसेल किंवा कुठलाही चालेल अस लिहल असेल तर त्याला सुरुवातीलाच विचारता येत कि ह्या बाबतीत काय प्रेफरन्स आहे का?

सगळी प्रोफाईल पटली तरी नंतर खुसपटे काढणारे असतातच. पण तो दोष त्यांचा. तुझ्या मैत्रिणीला खूप शुभेच्छा.

तुमच्या लेखातील मुलीला चांगला पती आर्मी, वकिली पेशातला, सरकारी सर्विस, कलेक्टर मॅजिस्ट्रेट वगैरे, रेल्वेतील अधिकारी, खुद्द पोलिसातीलच भेटू शकेल. तसा प्रयत्न करावा. >> +१ मला पण हाच विचार मनात आला.. खूप डॉक्टर/ पोलिस कॅपल्स बघितले आहे..

अवांतर - अमा, मी तुमचे इतर धाग्यावरचे सल्ले वाचले आहे. तुमचे सर्व सल्ले परिपूर्ण, Practical आणि Logical असतात.

सिमंतिनी Happy सुमेधाव्ही, बरोबर बोललात.
अमा. मित्र आहे का, कुणावर प्रेम आहे का हे
विचारल्याशिवाय सुरूवातच झाली नाहीय. (नकार
तिचा नाहीय, तिला आहे. ) भावाचे लव्ह मॆरेज
होऊन दहा वर्षं झालीत. म्हणजे कुटूंब समंजस
आणि जुनाट विचारांचे नाही. शी शुड टेक
ओनरशिप... म्हणजे नेमके काय करावे तिने?
तिच्या ऑफिसमधले ऑल्मोस्ट सगळे सिनीयर व
मॆरीड आहेत. यंग क्राऊड कमी. दिवसातले दहा बारा तास तिथेच जातात. येता जाता स्कूटी. कुठे दिसणार ओम तिला?! Wink
सरकारी नोकरीतल्या मुलाचा मुद्दा पटला.
एक शक्यता आहे की ही वकील आहे हे आधीच
डोक्यात फिटट असल्याने भेटल्यावर जे बोलणे
होते त्या हिचा सूर अनॉयिंग वाटत असेल का?
म्हणजे ही वकीलछाप बोलते? कारण गोष्टी तिथेच
फसतात, फिसकटतात. ती हर्ट होणार नाही असे बघून
याविषयी तिला कसे व काय सांगावे?

शी शुड टेक ओनरशिप... म्हणजे नेमके काय करावे तिने? >> तृप्ती अ. आणि मी जे सांगायचा प्रयत्न करत होतो ते अगदी योग्य शब्दात अमाने सांगितले. ह्या बद्दल बरेच काही करता येते. ८-१० तासात विपु/ मेल करते.

आशू, तुझ्या मैत्रिणीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
मैत्रिणीला म्हणावं होप्स सोडू नकोस. बी पॉझिटिव्ह!
इतक्यातच माझ्या भावाचं लग्न ठरलं आहे, त्याची होणारी बायको एल एल एम आहे, तिच्या आईबरोबरच वकिली करते, दोघींची स्वतःची प्रॅक्टिस आहे.
येणार्‍या नकारांचं फारसं विश्लेषण न करता 'त्यांच्या नशीबात मी नाही' असा विचार करून सोडून द्यावं.

इकडे पुण्या-मुंबईत तरी अजून लग्नासाठी अ‍ॅप्रोच होण्यासाठी 'पत्रिका' ही पहिली पायरी आहे. त्यालाच इंग्रजीमधली 'प्रोफाईल' समजायला हरकत नाही. ज्यात प्रामुख्याने मुला-मुलींची माहिती, कुटुंबाची माहिती लिहिलेली असते. 'पत्रिका' म्हणजे तो चौकोन छापतातच असं नाही, जन्मतारीख आणि जन्मवेळ असते. रास, गोत्र, नाडी बिडी लिहिलेली असते. हवंतर ही माहिती घ्या, नाहीतर सोडून द्या.
पत्रिका जमत नाहीये, पण मुलगा/मुलगी अत्तिशय आवडल्यामुळे लग्न तर करायच्चंच आहे, अश्या केसमधे पत्रिका 'जमवून' घेतल्याचीही अनेक उदाहरणं सगळ्यांनीच बघितलेली असतील.

माझ्या संपर्कातली सगळीच लग्नाळू मुलं-मुली आपणच स्वतः पुढाकार घेऊन (ओनरशिप) विवाह मंडळात (मॅट्रीमोनी साईटही यात आल्या) जाऊन 'स्थळं' निवडतात, त्यांना अ‍ॅप्रोच होतात, भेटतात, गप्पा मारतात, चर्चा करतात, योग्य वाटलं तर लग्नाचा निर्णय घेतात. या सगळ्या प्रोसेसमधे आईवडिलही सामील असतात कारण लग्न हे एक मुलगा आणि एक मुलगी करणार असले तरी दोघांचंही पूर्ण कुटुंब त्यात सामावलं जाणार असतं.
लग्न ठरवण्याच्या पारंपरिक पद्धतीमधे चिक्कार सकारात्मक बदल झालेले आहेत. पण आशूचा मुद्दा हा नाहीये. त्यामुळे लगेच लेबल लावून मोकळे होऊ नका.

थँक्यू सो मच मंजूडे! खूप हुश्श वाटलं मला. नाहीतर नेहमीच्या वळणावर गाडी घसरणार की काय अशी भीती होती.

मी स्वतः गेली ८ वर्षे लॉ फर्म मधे काम करत आहे. ढोबळ मानाने लिटीगेशन, रिअल ईस्टेट आणि कॉर्पोरेट अशा ३ प्रकारची प्रॅक्टीसची विभागणी होऊ शकते. पैकी लिटीगेशन आणि कॉर्पोरेट लॉयर्स वाद घालणारे वाटू शकतात. आपण ऑफिसमधे १०-१२ तास असतो (जर एखादे ट्रँझॅक्शन वर्क चालू असेल तर कामाचे तास वाढून १८-२० सुद्धा होऊ शकतात ) त्यामुळे कदाचित वागण्याची /बोलण्याची तशीच ढब बाहेर सुद्धा वापरली जाउ शकते आणि व्यक्ती फार हुज्जत घालतो/ते अशी धारणा अगदी पहिल्या १-२ भेटीत होऊ शकते. माझ्या ऑफिस मधे २ कलीग आहेत पैकी एक यु के मधून बॅरिस्टर झाली आहे आणि एक स्वीडन मधून एल एल एम. दोघींना आशूडी म्हणतात ती समस्या जाणवत आहेच. त्यातून नामांकीत लॉ फर्म मधे आर्थिक मोबदला हा खूपच जास्त आहे. त्यामुळे सुद्धा कदाचित अडसर येऊ शकतो (पुरुषी अहंकार दुखावणे ई ई ).

गम्म्त म्हणजे सी एस झालेल्या आणि ज्यांनी लॉ केलेले आहे अशा मुलींना हा प्रॉब्लेम भेडसावताना दिसत नाही. तसेच ज्या मुली एखाद्या कं मधे इन हाऊस कौंसेल्स आहेत त्यांना पण ही समस्या तितकीशी जाणवत नाही.

आशुडी, काय लिहु?
एक वकील मुलगी, एक लग्नाळु मुलगी, वकील म्हणुन, वडील नाही, म्हणुन नकार पचविलेली मुलगी, आणि आता लग्न झालेली, हॅप्पीली मॅरिड असे म्हणता येइल, अशी मुलगी/स्त्री, म्हणुन खुप काही लिहु शकते मी.
सर्वप्रथम हा विषय मांडल्याबद्दल तुझे अभिनंदन.
हो. हे खरे आहे की वकील मुलिंचे लग्न जमण्यात, जमलेले होण्यात, आणी झालेले टिकण्यात खुप खुप अडचणी येतात.
यात दोन प्रकार आहेत. Litigation आणि Non-Litigation. म्हणजे प्रत्यक्ष कोर्ट्-कचेरीच्या कामात असणारे वकील आणी कंपनीच्या लिगल विभागात काम करणारे, आणी कं. वकिलांबरोबर काम करणारे (माझ्यासारखे) एल. एल. बी. झालेले. आम्हाला कोर्टासमोर कोणतीही केस चालविण्याची परवानगी नाही. आम्ही आमच्या लेटरहेड वरुन नोटीस नाही पाठवु शकत नाही.
पण आम्च्या फिल्ड मधे राहु शकतो, कौशल्ये आत्मसात करु शकतो, ज्ञान वाढवु शकतो, ऑन्लाईन कोर्सेस करु शकतो.
पगार फिक्स, रजा फिक्स, सगळ्यात महत्वाचे म्हणजे कामाचे तास फिक्स.
या मुलींचे लग्न जमण्यात विशेष अडचण येवु नये खरे तर.
याच्या उलट कोर्ट प्रॅक्टिस करणार्‍या, जज्ज असलेल्या मुलींचे लग्न जमण्यात जास्त अडचणी येवु शकतात. (माझ्या कितीतरी हुशार, सद्गुणी वकील मैत्रीणी अद्याप अविवाहित आहेत.)
याची कारणे माझ्या मते-:
१. पैसा अनियमित
२. client centric- अशिल मिळविणे, टिकविणे, कॉर्पोरेट अशिल मिळविणे, बँका, कंपन्या, इ. महत्वाचे.
३. कामाचे अनियमित तास- मुंबईच्या लिगल फर्म मधे काम करणे म्हणजे, पैसा भरपुर, पण वेळ. रात्री घरी यायला २-३ पण होवु शकतात. रा. १० ला घरी आलात तर खुप लवकर. कधी कधी घरी पोहोचल्यावर फर्म गाडी पाठविते, महत्वाचे काम आहे म्हणुन.
४. छंद -बिंद जोपासणे खुप लांब. किमान उमेदवारीच्या काळात तरी नाही.
५. उमेदवारीचा काळ कितीही कमी, किंवा कितीही जास्त असु शकतो.
६. NO FAMILY LIFE
अजुन बरेचसे लिहिता येण्याजोगे आहे.
माझ्या सारख्या अनेक जणांना, non litigation मधे यावे लागते. का तर घेतलेले शिक्षण वाया जावु नये, आणि फॅमिली लाईफ पण मिळावे, पैसा मिळावा , यासाठी.
असो.
खुप मोठी झाली का पोस्ट?

माझ्या ओळखीत आर्मी मधे काम केलेल्या ( शॉर्ट सर्विस कमिशन - ५ वर्षे ) ३ ते ४ अविवाहित मुली आहेत. आधी आर्मीत काम करत होत्या त्यामुळे नकार यायचे. अता आर्मीतून बाहेर पडून लोकल कंपन्यामधे उत्तम पगाराची सर्विस करतात. तरीही पुर्वी आर्मीत होती हे सांगितल्यावर नकार कळवतात.

लंपन, मुग्धानंद धन्यवाद. अशाच चर्चेची इथे अपेक्शा आहे. फायदे तोटे, समस्या व निराकरण, वस्तुस्थिती आणि कल्पना. अशा अनुभवांतून दिशा दिसू शकेल. प्लीज लिहा.

त्यामुळे कदाचित वागण्याची /बोलण्याची तशीच ढब बाहेर सुद्धा वापरली जाउ शकते आणि व्यक्ती फार हुज्जत घालतो/ते अशी धारणा अगदी पहिल्या १-२ भेटीत होऊ शकते.>> लंपन, हे मार्केटिंगमधल्यांसाठीही म्हटलं जातं... 'फारच गळेपडू' असं मत मार्केटिंगमधल्यांबद्दल होतं Wink

याची कारणे माझ्या मते-:>>> पण ही कारणे जवळपास सर्वच क्षेत्रातल्यांना आणि स्वतःचा व्यवसाय करणार्‍या सर्वांनाच - मुलांनाही, लागू होतातच.

गम्म्त म्हणजे सी एस झालेल्या आणि ज्यांनी लॉ केलेले आहे अशा मुलींना हा प्रॉब्लेम भेडसावताना दिसत नाही. तसेच ज्या मुली एखाद्या कं मधे इन हाऊस कौंसेल्स आहेत त्यांना पण ही समस्या तितकीशी जाणवत नाही.

>> मुळात जे मुलीला वकिल आहे म्हणुन नकार देत आहेत त्यांना स्वतःच्या कायदेशीर हक्कांविषयी जागरुक असलेली मुलगी नको आहे (असावी). त्यात वडील पोलिस म्हणजे स्वतःच्या हक्कांबाबत जागरुकता + त्वरीत अंमलबजावणी होण्याची शक्यता.

सीएस झालेल्या मुलींना निदान प्रॅक्टिसमध्ये नसल्याने डोमेस्टिक लॉ (कौटुंबिक बाबी इ.) याविषयी माहिती नसेल या विचारातून त्यांना फारसा प्रॉब्लेम येत नसावा. (हेमावैम). तीच गोष्ट कंपनी मध्ये कॉर्पोरेट रिलेटेड कायदे हाताळणार्‍या मुलींची.

अश्या माणसांना कायद्याची पदवी नसतांनाही कायद्याची व्यवस्थित माहिती आणि वेळप्रसंगी कायद्याची मदत घ्यायचा खमकेपणा असणारी मुलगी मिळावी अशी फार इच्छा आहे.

याची कारणे माझ्या मते-:>>> पण ही कारणे जवळपास सर्वच क्षेत्रातल्यांना आणि स्वतःचा व्यवसाय करणार्‍या सर्वांनाच - मुलांनाही, लागू होतातच.>> सहमत.

अजून एक मुद्दा म्हणजे रोजची वादावादी. मुद्दे पटवून देण्यासाठी मेल्/फिमेल कलीग्सची आवाजाची पट्टी बरीच जास्त असते. सीनिअर्सचे टँट्रम्स तर खूप भयावह वाटावे असे असतात. वाईट श्ब्दात सर्वांसमोर अपमान करणे, फाईल्सची फेकाफेकी, कागदांची फेकाफेकी ह्या गोष्टी फार वरचेवर अनुभवायला मिळतात. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होतेच पण घरी गेल्यावर अजून कुणाचे 'मागे सर' ऐकून घ्यायला मन तयार होत नाही. पेशंस लेवल फार कमी होते Happy

गम्म्त म्हणजे सी एस
झालेल्या आणि ज्यांनी लॉ केलेले आहे
अशा मुलींना हा प्रॉब्लेम
भेडसावताना दिसत नाही.>>>>>>> सीएस आणि लॉ सिमिलर क्षेत्र दिसत असली तरीही त्यातल्या वर्किंग कंडीशन मध्ये फरक आहे
खरेतर मला मन्जूड़ीचा पण
ही कारणे जवळपास सर्वच
क्षेत्रातल्यांना आणि स्वतःचा व्यवसाय
करणार्या सर्वांनाच - मुलांनाही, लागू
होतातच >> हा मुद्दा पटला

Pages