खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट

Submitted by आशूडी on 8 July, 2014 - 14:50

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.
खरंतर पूर्वी या व्यवसायात असलेल्या स्त्रियांना हा प्रॉब्लेम आला होता का हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पण ३-४ वर्षांपूर्वी सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये अगदी हाच मुद्दा धरुन एका उपवर मुलीनेच लिहीलेला लेख प्रसिध्द झाला आणि हा प्रश्न ठळकपणे पृष्ठभागावर आला. आता त्यावर प्रतिक्रिया अशाही होत्या, की या लेखामुळे लोक अजूनच सावध झाले आणि या व्यवसायात आणखीच 'विवाहमंदी' आली.

मैत्रिणीचा मुद्दा क्र. २ असाही आहे की तिचे वडील पोलिस ऑफिसर आहेत. खरंतर ही किती अभिमानाची बाब! पण लोक भयचकित होऊन आ च वासतात! मुलगी वकील आणि वडील पोलीसात? नको रे बाबा! पण काय हरकत आहे? सीमेवर लढायला जावे तर शेजार्‍याच्या मुलाने, हे ठाऊक होते पण कायद्याचे रक्षणही करणारे परकेच कुणी असावेत? कुछ समझ मे नही आ रहा बॉस! आता दुसरी बाजू म्हणजे वकीलच मुलगा शक्यतो नको आहे कारण एकाच व्यवसायात दोघेही असले तर एकसुरीपणाची शक्यता असते. शिवाय 'फिक्स मंथली इन्कम' हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच.

मुलांच्या अपेक्षा अटी बघाव्यात तर हल्ली पहिली अट ही असते की 'आयटी वाली नको!', फुल टाईम ऑक्युपाईड नको! (हो, नंतर मुलाकडे कोण बघणार ना!) शिकलेली हवी, पगाराची खास अपेक्षा नाही. मग 'वकील' असण्यात प्रॉब्लेम काय आहे? फ्लेक्सी टायमिंग आहे, सर्व सरकारी सुट्ट्या आहेत. मुख्य म्हणजे मुलीची रिलोकेट करण्याची तयारी आहे. भरपूर माणसांची सवय आहे. आणखी काय हवं? आता ही मैत्रिण जराशी बोलघेवडी आहे. पण ते तर तिच्या व्यवसायाला पूरक आहे ना? मग त्या गोष्टीकडे 'व्यावसायिक गुण' म्हणूनही सुरुवातीला नाही पाहता येत? पुढे मागे मुलाचा शांत स्वभाव असेल तर ती ही निवळेलच की. पण हल्ली होकार नकार कळवण्याची काय गणितं असतात समजतच नाही. आणि ही स्टेज येते ती फोटो, पत्रिका इ सोपस्कार झाल्यानंतरच. मग नकाराचे नेमके कारण काय असावे? खरोखर या प्रश्नाने आम्हाला हैराण केले आहे.

'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधल्या ओम आणि ईशा मुळे गेल्या काही दिवसात वकीलांना किंचित ग्लॅमर मिळालंय खरं पण त्याचा या गोष्टीसाठी कितपत फायदा होईल कुणास ठाऊक. निदान ईशासारख्या खानदानी वकील मुलीसुद्धा इतर सद्गुणी मुलींसारख्याच घरं तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी प्रयत्नशील असतात अशी जाणीव जरी झाली तरी दिलासा मिळेल.

तुम्हाला याविषयी काय वाटते, कुठे सुधारणेला वाव आहे याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन, ते न लिहीण्यामागे आणखी एक विचारसरणी आहे. एखादा आपणहून सांगत असेल की माझे लग्न जमत नाहीय तर त्या व्यक्तीबद्दल (नुसत्या ओळखीचे हां) लोकांच्या मतात फरक पडतो. लग्न ठरवतानाही, सगळं ठीक असूनही का जमलं नाही आजवर लग्न? म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असे वाटणारे लोक पाहिलेत. त्यामुळे सहसा कुणी हे धोंडापाडू धाडस करत नाहीत. झाकली मूठ सव्वा लाखाची. Happy

उदयन - आता लग्न झालेले लोक कधी तरी लग्न न झालेले आणी त्यातले काही बराच काळ लग्न न ठरलेले असतात

मला असं वाटतं की एका मुलीला एका मुलाशीच लग्न करायचं असतं आणि viceversa. त्यामुळे तो एक मुलगा किंवा मुलगी मिळेस्तोवर इतर अनेकांनी नकार दिले तरी काय फरक पडतो? त्यामुळे ती मुलगी वाईट किंवा कमी प्रतीची ठरत नाही

मुलींनी स्वतःला लग्न झालय किंवा नाही ह्यावरून स्वतःला judge करणं बंद करायला हवं. इतर कोणी काही बोलत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करायला हवं. मी अंधश्रद्धाळू नाहीये पण लग्न कधी कोणाशी होणं हा नशीबाचा भाग नाहीये का?

लग्न ठरत नसल्याने जर फ्रस्ट्रेशन येत असेल ना तर चुकीच्या नात्यात गुंतल्याने घटस्फोट झालेल्या केसेस कडे पाहावं साहजिकच आपण अधिक सुखी आहोत हे जाणवेल.

कोणी तरी आपल्याशी लग्न करावं किंवा कोणी तरी आपल्याला स्वीकारावं म्हणून स्वत:चं वागणं बोलणं स्वतःचं डिसेण्ट प्रोफेशन बदलायची काहीही गरज नाही. कारण ज्यांच्यासाठी आपण बदलतोय ते आपल्या साठी बदलायला तयार आहेत का नाही हे आपल्याला माहित नाहीच आहे. आणि आपण जे काही स्वतःत बदलू ते सुद्धा समोरच्याला नाही आवडलं तर?

समाजाची मानसिकता हळू हळू बदलते आहे. आणि ती बदलेल. पण त्याकरता आधी स्वतःची मानसिकता बदलायला हवी. .

पत्रिका, प्रोफेशन, दिसणं इत्यादी गोष्टीमुळे एखादीच लग्न ठरत नसेल तर तिनेसुद्धा मला माझ्यात काही बदलायची गरज आहे का हा विचार करणं हाच मुळात मागासलेला विचार आहे

पत्रिका, प्रोफेशन व दिसणं ही जर कारणं असतील तर त्यात स्वत:त काय बदल करणार वेल? आत्मनिरीक्शण खूप महत्वाचं आहे. काही लोकांना सतत स्वत:बद्दल बोलायची, इतरांवर टिप्पणी करायची किंवा अशा अनेक चुकीच्या वाटणाऱ्या सवयी असतात. अगदी कष्टाने स्वत:च्या पायावर उभे असल्याचा अभिमानही कधी धी अहंकारात बदलतो.. अशी माणसे कुणीही नाईलाजाविना स्वीकारत नाही. मग या बाबतीत स्वत:त सकारात्मक बदल घडवणे मागासलले नसावे.

आशूडी - आत्मनिरिक्षण स्वतःसाठी करावं आणि सतत करावं.
<<कष्टाने स्वत:च्या पायावर उभे असल्याचा अभिमानही कधी धी अहंकारात बदलतो>> मान्य. पण ते माझं मला कळलं पाहिजे, दुसर्‍याने सांगून उपयोग नसतो. उगाच रिलेशनमध्ये कडवटपणा येतो. आणि असा अहंकार नसावा पण अभिमान नक्की असावा. तो सोडू नये.

वरील बरेच प्रतिसाद वाचले.
माझा अनुभव थोडा वेगळा आहे. डायरेक्ट विषयाशी संबंधित नसला तरी लिहिते.
माझ्या वाहिनीचे वडील, भाऊ वकील आहेत. चुलत भाऊ व भावजयी पोलिसात आहेत. जेव्हा हे स्थळ म्हणुन आले तेव्हा माझ्या माहेरच्या काही नातेवाईकांनी हाच विचार बोलुन दाखवला की वकिलाच्या घरातील मुलगी आहे? पण आपण चांगले असु तर का म्हणुन कोणाला घाबरावे. मुलगी आवडली आणि भावाचे लग्न झाले.
चार वर्ष झाली त्याच्या लग्नाला आणि आजपर्यन्त तिच्या माहेरच्यांनी कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करावासा वाटला नाही, केलेला नाही.

काही लोकांना सतत स्वत:बद्दल बोलायची, इतरांवर टिप्पणी करायची किंवा अशा अनेक चुकीच्या वाटणाऱ्या सवयी असतात. अगदी कष्टाने स्वत:च्या पायावर उभे असल्याचा अभिमानही कधी धी अहंकारात बदलतो

>> आशुडी तुम्ही या मुलीला जवळून ओळखता का? तसे असेल तर एक त्रयस्थ म्हणून तुम्हाला असे वाटते का कि या मुलीचा स्वभाव असा आहे? इतर वेळी बोलतांना तिचा अहंकार, स्वतःविषयी बोलणे इ. उफाळून आल्याचे पाहिले आहे का? अहंकारी वै. असेल तर इतर वेळी बोलतांना पण माज करत असेलच कि. फक्त मुलाला भेटायला गेल्यावर कश्याला?

त्यामुळे:

१. जर तुम्हाला (हवे तर अजुन ३-४ त्रयस्थ जवळच्या नातेवाईकांनी ऑब्झर्व करा) वाटत असेल कि मुलीत अश्या प्रकारचा अहंकार किंवा मी म्हणेन तेच खरे करायची वृत्ती नसेल तर त्या मुलीने स्वतःला बदलावे का?

२. जर तुम्हालाही असे वाटत असेल कि मुलीत थोड्याफार प्रमाणात स्वत:बद्दल बोलायची, इतरांवर टिप्पणी करायची किंवा अशा अनेक चुकीच्या वाटणाऱ्या सवयी आहेत तर तिला ते कसे सांगता येईल हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे जो या बाफचा विषय नाही.

कर्मा! अगं,ती मुलगी अशी नाही. स्वत:त बदल करावे लागण्याच्या कंडिशन्स कोणत्या? अशी पोस्ट होती ती. मी अशी कुणावरही टिप्पणी करत नाही.
प्रोफेशनचा साईड इफेक्ट = ऑथॉरिटी टोन, हे आधीच बोलून झालंय पहा.
पिन्कि80, बरं वाटलं वाचून.

मी अशी कुणावरही टिप्पणी करत नाही.

>> अगं टिप्पणी म्हणुन नाही. पण जवळच्या लोकांना स्वभाव नीट माहित असतो ना.

वकील मुलींचे लग्न जुळन्यात अडचन येते असे मी ही बघीतले आहे
माझ्या गावात अशी दोन उदाहणे पहान्यातील आहेत,दोघींचे बाकी सगळे व्यवस्थीत आहे.
त्यापैकी एक अजुन अविवाहित आहे.आणी दुसरीचे बरीच वर्षे खट्पट केल्यानंतर आत्ता आत्ता लग्न झाले एका इंजीनीअर मुलाशी

मला तरी वाटते की लग्न होणे न होणे या योगाच्या गोष्टी असतात. याच बाफवर वकील असुनही लग्न जमलेल्या आणि न जमलेल्या मुलींची उदाहरणे आहेत त्यावरुन ट्रेंड कसा आहे हे कसे ठरवता येइल? आणि ज्या माणसाच्या मनात किंतु आहे अशा माणसाशी लग्न करुन सुख लाभेल का?
ती मुलगी चांगली आहे त्यामुळे सगळे चांगले असुनही लग्न का ठरत नाही याची काळजी वाटणे यात काहीच चुकीचे नाही पण त्यावरुन तिला किंवा तिला सांगुन येणार्‍या स्थळानी "सुधारणा" म्हणजे काय करणे अपेक्षित आहे? (वर आणि वधू संशोघनात कोणी काय क्रायटेरीया ठेवावा हे Subjective आहे..त्यात चुक किंवा बरोबर हे कोण ठरवणार?)
तिच्या लग्नासाठी जे प्रयत्न सुरु आहेत ते सुरु ठेवावे..तिच्या लग्नाचा योग आला की आपोआप जमेल. काळजी करु नये. (लग्न जमल्यावर इथे लिहायला विसरु नये Happy )

नक्कीच मनस्मी१८. Happy
लोकहो, बर्‍यापैकी मुद्देसूद व चांगली चर्चा झालेली आहे. आता काही नवीन मुद्दे निघतील असे वाटत नाही, असल्यास जरुर लिहा. ही सर्व चर्चा विचारात घेऊन काही गोष्टी ठरवल्या आहेत. बघू, उपयोग होतोय का? तूर्तास तरी या चर्चेला इथे पूर्णविराम देऊ. लग्न ठरले की त्याबद्दलही इथे नक्की लिहेन आणि ती वेळ लवकरच येवो, याकरता तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच. Happy

Pages