चिक्कड छोले ,भटुरे आणि शिरा(फोटोसहित)

Submitted by देवीका on 28 March, 2014 - 00:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

test.jpg

चिक्कड छोले हा एकदम लज्जत्दार प्रकार आहे. थंडीच्या दिवसात हा नाश्ता अगदी मस्त आहे.
चिक्कड म्हणजे चिखलासारखा(अगदी हाच अर्थ आहे). बर्‍याच वेळ मंद आचेवर ठेवून जे मिळून येतात ते चिक्कड दिसतात. चवीला अफलातून लागतात.

शिरा तर आपल्या घरोघरी बनतो म्हणून त्याची कृती इथे देण्यात वेळ वाया घालवत नाही.
चिक्कड छोले जिन्नसः
१)
१ वाटी काबुली चणे भिजवून,
पाव वाटी लाल मसूर डाळ भिजवून
२ पेला उकळलेला चहा(बिनसाखरेचा)
२)
१ वाटी दही,
चिक्कड मसाला: धणे, जीरं, बडीशेप, डाळींब पूड(प्रत्येकी २ चमचे); २-३ चहा वेलची, काळं मीठ(चवीनुसार), १ मसाला वेलची, ३-४ लवंग दाणे, पाव इंच दालचिनी तुकडा,तेजपत्ता,पाव चमचा कलौंजी,चिमूटभर केशर,जायपत्री. हे सर्व वेगवेगळे भाजून वस्त्रगाळ पूड. ह्यात गरम मसाला व लाल मसाला एकत्र दह्यात घोटून ठेवा.
३)
१ बारीक चिरलेला कांदा
१ मोठा टोमॅटो उकडून वाटलेला
आल लसूण पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
चिरलेली कोथींबीर

भटुरे:
१ वाटी मैदा
पाव वाटी कणीक,
२ चमचे रवा,
२ चमचे साखर,
मीठ
२ चमचे दही
२ चमचे ड्राय यीस्ट
तेल लागेल तसे.

क्रमवार पाककृती: 

सर्वात आधी भटुरेची पीठं व इतर जिन्नस एकत्र करून लागेल तसे पाणी घालून जरा घट्टच भिजवावे व तेलाचा हात लावून झाकून ठेवावे.

छोले करायला घ्या
१)जिन्नस १ एकत्र करून , त्यात चहा टाकून कूकरला उकडून घ्यावे तीन ते चार शिट्या काढून.
२)त्यातले पाणी काढून दही मसाला मध्ये घालून ठेवा.
३)जिन्नस ३ पदार्थ वापरून खालील प्रमाणे फोडणी करावी.
मुख्य कृती:
तेल टाकून (सढळ हाताने टाकले तरी चालेल) त्यात आधी कांदा परतून घेवून मग हिरवी मिरची,टोमॅटो रस व आलं लसूण पेस्ट टाकून तेल सुटेतोस्वर परतावे.
आता छोले टाकून थोडया वेळ परतून झाले की पाण्यासकट भिजलेला मसाला टाकून मंद आचेवर शिजवत ठेवावे. मधून मधून जरासे घोटावे. आच एकदम मंद करून वीस मिनीटे ठेवून द्यायचे.
मग चिरलेली कोथींबीर टाकून आच बंद करावी.

त्या वीस मिनीटात शिरा करून घ्यावाआणि मग भटुरे करावे. भटुरे हे जरा जाडसर लाटून तळून घ्यावे. सर्व पदार्थ एकत्र खायला घ्यावे. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

मंद आचेवर ठेवले असताना जर पाणी कमी वाटत असेल तर एकदाच थोडं गरम कढत पाणी टाकून मंद आचेवर ठेवावं.
चहा बनवताना फक्त त्यात खिसलेले आलं,एखाद लवंग व वेलची दाणा घालून उकळून गाळून घ्यायचा.
लाल मसाला म्हणजे कोणताही घरी असते ते लाल तिखट. साजुक तुपात परतले छोले तर आणखी छान लागते, मसाला मस्त फुलतो.
काळं मीठच वापरावे. त्याला एक वेगळी चव असते.
मी फक्त कणीक,रवा घेवून सुद्धा केलेत भटुरे, चांगले लागतात.

माहितीचा स्रोत: 
पडोस की अस्मा
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! या पद्धतीने छोले करून बघेन आता...
मला भयंकर आवडतात छोले भटुरे.. छोले होतात वरचेवर पण भटुरे करण्याची हिंमत होत नाही Sad
अगदीच रहावलं नाही तर दर्शनमध्ये जाऊन खाऊन येते..

फोटो प्लीज Happy

मी सुध्दा छोले भटूरे फॅन आहे. देवकी लवकर फोटो द्या तेवढच खाल्ल्याच समाधान. Happy

सई, वरच्या पद्धतीने भटूरे मलासुद्धा जमणार नाहीत. आमच्या शेजारच्या पं.आंटीची सोपी पद्धत जी त्यांनी मलापण शिकवली. मैद्यामध्ये सोडा वॉटर घालून पीठ मळायच आणि लगेच लाटून तळायचे. जाडसर नाही लाटायचे. विथाउट कटकट इंन्स्टंट भटूरे रेडी. खूपच हलके होतात भटूरे आणि तोंडात घातल्यावर विरघळतात. सोडा वॉटरची बाटली तेव्हाच ओपन करायची. अगोदरचा उरलेला सोडा वापरला तरी चांगले होत नाहीत.
मी कणिकेचे पण केले होते पण मैद्याएवढे हलके नव्हते झाले. दोन्ही वापरून अजून केले नाहीत. एकदा ट्राय करायला हव.

मस्त वाटतेय काँबिनेशन!!
२ पेला उकळलेला चहा(बिनसाखरेचा) > चहापावडर + पाणी एवढंच उकळायचय ना? यानी नक्की काय होतं?

आरती, आधीच मैदा, वर तळणे म्हणुन करायला नकोसं वाटतं! शिवाय घरात कृती करताना त्याची तीव्रता जास्त जाणवणार.. नक्कोच ते! त्यापेक्षा बाहेर जायचं, मागवायचं, गिल्ट न घेता खायचं आणि कुठे काय खाल्लं म्हणत विसरून जायचं..
घरात केल्यावर एका भटु-यावर थांबायला सिद्धी प्राप्त व्हायला हवी.. बाहेर एकातच भागतं शक्यतो..
गोपिका, फोटो..

योकु चहा घालुन उकळ्ल्यास मस्त फ्लेवर येतो आणि रंगही छान येतो.
मी सुती कापडात चहा पावडर बांधुन कुकर मधे टाकत होते छोले शिजव्ताना.
आता असही करुन पाहीन एकदा. चिक्कड मसाला मस्त स्पायसी वाटतोय.
छान रेसिपि Happy
फोटो टाक प्लिज

घरात केल्यावर एका भटु-यावर थांबायला सिद्धी प्राप्त व्हायला हवी.. <<< Saee, Lol घरी केल्यावर मनोसोक्त ताव मारता येतो, ती ऑर्डरची एक प्लेट नसते. खूप हसली सिध्दी प्राप्तसाठी.

सर्वांना धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल.
चहा रंगासाठी व हलकीशी छान चव येते त्यासाठी टाकतात.मला ह्याखेरीज काही माहीती नाही त्यामुळे आणखी काही सांगू शकत नाही.

मस्त. चिक्कड मसाला इंटरेस्टिंग वाटतोय Happy

शीर्षकात आणि इतरत्र 'शिरा' असा बदल कराल का प्लीज ?

वेगळीच कृती आहे छोल्यांची.

माझ्या सासरी गेल्या गेल्या असे खूप शिजलेले छोले किंवा हिरवे वाटाणे आणि पुरी जेवायला वाढतात. मसालेदार, गरम गरम छोले आयते खाण्याच्या नादात रेसिपी कधी विचारलीच नाही Happy

मस्त रेसिपी. स्लो कुकरमध्ये केल्यास असे चिक्कड होतील का छोले? ( माझ्याकडे स्लो कुकर नाही पण उगाच चां चौ)
भटुर्‍यांकरता मैद्याला पर्याय नाहीच का?

अल्पनाने लिहीलेले अमृतसरी छोले पण असेच बराच वेळ गॅसवर ठेवायचे असतात, ते भारी लागतात. ही कृती साधारण तशीच वाटत आहे, अर्थात मसाला वेगळा आहे.
नॉर्थ मधे छोले, काळे चणे यांच्याबरोबर शिरा खायची बरीच पद्धत आहे, त्यामागे काही कारण असेल का ? म्हणजे शिरा पण तुपकट हेवी, हे छोले वगैरे पण मसालेदार, तेलकट, हे एकत्र का खात असतील ? त्याकाळी पडणारे शारिरिक श्रम व त्या हवामानाला सुटेबल असेल कदाचित.

छोल्यांची पाककृती खूपच सही आहे. करून बघणार. भटूरे पाकृपण आवडली.

अमेरिकेत भटूर्‍यांना सबस्टिट्यूट म्हणून दुकानात आयत्या मिळणार्‍या बिस्किटांच्या लाट्यांना लाटून कढत तेलात अक्षरशः काही सेकंद तळायचं. चांगलं लागतं. वाटतं तितकं तेलकट होत नाही.

कणीक वापरून भटूरे करताना उकडलेल्या बटाट्याचा लगदा घालून मळायचं. खुसखुशीत आणि छान फुगणारे भटूरे होतात. असे भटूरे खाल्लेत. पण कणीक - बटाटा प्रमाण माहिती नाही.

मस्त कृती.. आपले चणे इथे मिळत नाहीत पण काबुली चणे मात्र सगळीकडे मिळतात.. घरात मसालेही आहेत सगळे.. करुन बघतोच.

मवा, नॉर्थमध्ये नवरात्रीच्या कुमारिकांना ते चणे आणि शिरा प्रसाद देताना पाहिलं आहे.
>>>>> आपल्या नवरात्रातला एक दिवस.... (बहुतेक) "कंजक" असं काहीतरी नावाचा सण(व्रत).

भटुरे करण्यासाठी कणीक व बारीक रवा २ : १ प्रमाणात घेवुन दही व तेलाचे मोहन ,चवीपुरते मीठ घालुन लगेच मोठ्या ओव्हल शेप च्या पुर्‍या कराव्या.खुसखुशीत व कोरड्या होतात---अजिबात तेलकट होत नाहीत--थंड झाल्यावर वातड ही होत नाहीत.यात सोडा /सोडावॉटर/यिस्ट/मैदा असे काहीही वापरायचे नाही.
आपापल्या घरातील कुलाचाराप्रमाणे नवरात्रातील सप्तमी,अष्टमी व नवमीला देवीचा थाळ [नैवेद्य] भरतात.तेव्हा देशी चणे/काबुली चणे वापरुन केलेले छोले,पुरी , शीरा व मुलींना उपयोगी वस्तु[वाण] कुमारीकांना देतात.

माझी आई नवरात्रीत कुठलं तरी व्रत करायची तेव्हा शेवटच्या दिवशी बायकांना चणे-पुरी, शिरा दयायची. नवरात्री तशीही थंडीतच येते त्यामुळे चणे पचत असावेत. Proud