मराठी भाषेचं भवितव्य काय?

Submitted by बोबो निलेश on 15 February, 2014 - 23:01

मराठी भाषेचं भवितव्य काय?

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.

कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार Happy

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.

धन्यवाद मंडळी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(भरत, अनुस्वार अवघड जाताहेत टायपिन्गला - लोकमान्यांची कथाच घेऊ का? )

आंबा लिहिताना आम्बा, आम्+बा, आंबा हे तीन पर्याय असतील.
तिथे आन्बा लिहून चालणाअर नाही. कळ्ळ?

>>>> तिथे आन्बा लिहून चालणाअर नाही. कळ्ळ? <<<<< हो कळ्ळ
पुढच्या वेळेस विषयात आंबा येईल त्यावेळेस म चे लक्षात ठेविन हो.

>>हर्पेन यांनी दिलेली लिंक वाचली

आणि तरीही विचारात काही फरक पडला नाही ना ?
त्यामधे जे दिले आहे ते खरेच दिसत आहे येथे माबोवरदेखील.
-------------------------------------------------------------------------
मराठीच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यातील सर्वांत मोठा अडसर कोणता असेल तर तो ' मराठी भाषेला काही झालेलेच नाही ', असे म्हणणाऱ्या वर्गाचा. या वर्गाची भूमिका एकजिनसी नाही. तरीही प्रश्नाचे अस्तित्वच नाकारण्याकडे या वर्गाचा कल आहे. यातील काही लोक मराठीची स्थिती उत्तम आहे , हे पटविण्यासाठी मराठी साहित्याचा हवाला देतात , तर कोणी आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून लाखो लोक मराठीतून व्यवहार करतात या वास्तवाचा आधार घेतात.
-------------------------------------------------------------------------

इथले बरेच जाणते लोक म्हणताहेत की मराठी बदलतेय पण काळाच्या ओघात टिकणारच. मला खरंच अप्रुप वाटतं या शहाण्या लोकांचे. बरे का टिकणारेय तर काही धड पटण्याजोगे मुद्देच नाहीत. या इथे माबोवर याआधी देखील अशीच चर्चा झालेली. तो अजय यांचा एक लेख होता यावर. हे आगाऊचे म्हणणे जवळपास त्याच लेखाशी मिळते-जुळते आहे पण पटेल असे कोणी सांगूच शकत नाही.
उघड्या डोळ्यांनी दिसतेय हो आजुबाजूला काय चाललेय ते. भारतातल्या दक्षिणेतल्या लोकांसारखे किंवा जापनीज, जर्मन वगैरे लोक ज्या प्रकारचे प्रयत्न करतात तसे अजिबात आपल्याकडे होत नाही.
मला तुमचे मुद्दे उगाच खोडण्यात काही गंमत वाटत नाही पण मला वाटते की भाषा नष्ट व्हायच्या मार्गावर आहे आणी तुम्हास वाटते की ती बदलतेय व टिकणारच. तुमचे म्हणणे पटेल असे मुद्दे मांडाल तर बरे होईल. अन्यथा असोच!

नैतर अगदी स्पष्टच सांगा ओ की मातृभाषा वगैरे काही नस्ते. सगळे काळाच्या ओघात बदलत जाते. आपल्या हातात काही नसते. टिकेल ते टिकेल. आपण कशाला त्रास करून घ्यायचा? उघड्या डोळ्यांनीच पाहूया आपण हडप्पा मोहोंदजडो सारखे मराठीचे अवशेष.

अगदी स्पष्टच सांगा ओ की मातृभाषा वगैरे काही नस्ते. सगळे काळाच्या ओघात बदलत जाते. आपल्या हातात काही नसते. टिकेल ते टिकेल.

तुमचे म्हणणे बर्‍यापैकी खरे आहे,

अगदी अरेबिक, मुगल, फारशी नि नंतर इंग्रजी भाषेतील अनेक शब्द शेकडो वर्षांपासून मराठी भाषेत समाविष्ट झाले आहेत. ते होत असता कुणि काळजी घेतली नाही की अरे असे करू नका, आपली भाषा टिकवा. कारणे काहीहि असोत, पण तसे झाले.

आता जरा इंग्रजी शब्द जास्तच मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत, ते माझ्या सारख्या जुन्या खोंडांना पटत नाही. कारण आम्हाला मराठी शब्द आठवतात, पट्कन आठवतात, बोलताना लग्गेच तोंडी येतात. नवीन पिढीचे तसे होत नाही.

आपण कशाला त्रास करून घ्यायचा? करून घेण्यापेक्षा तो होतोच, निदान मनातल्या मनात तरी, मग केंव्हा तरी एकदा तो बाहेर उफाळून येतो.

उघड्या डोळ्यांनीच पाहूया आपण हडप्पा मोहोंदजडो सारखे मराठीचे अवशेष.

बरेचजण खानदेश, विदर्भ इकडून पुण्यात येऊन असेच कष्टी होतात की आपल्यासारखी मराठी इथे ऐकू येत नाही. पण आजकाल कदाचित तिकडचे लोकहि हळहळत असतील की आजकाल पुणेरी, शहरी मराठी पुढे आपली भाषा टिकेल का?

मला वाटते अवशेष बघून जास्त वाईट वाटते, आठवण येते. संस्कृत किंवा अर्धमागधी, पाली, या भाषांसारखी अजिबात डोळ्याला पडली नसती तर एव्हढे वाईट वाटले नसते.

मग ज्यांना मुळात भाषा विषयाचेच प्रेम आहे, ते मराठी, संस्कृत , अगदी जर्मन नि फ्रेंच सुद्धा एक भाषा म्हणून शिकतात,

नि माझ्यापुरते बोलायचे तर मी अगदी कटाक्षाने इंग्रजी शब्द टाळून मराठी शब्द वापरतो, पण आता म्हणाल, टेबल नि कॉम्प्युटर असे शब्द का वापरता तर नाईलाज आहे. तसेहि अगदी पेशवाईतली मराठी म्हंटले तरी त्यात कितीतरीशी, उर्दू शब्द आहेतच! कित्येक तर माहितहि नाही मूळचे मराठी की फार्शीतून आलेले?

उघड्या डोळ्यांनीच पाहूया आपण हडप्पा मोहोंदजडो सारखे मराठीचे अवशेष.
<<
fakir साहेब,
जोपर्यंत मराठी बोलणारे तुम्ही किंवा कुणीही एक शिल्लक आहात, तोपर्यंत मराठी तर नक्कीच टिकणारे. ती नामशेष झाली असे म्हणूच शकत नाही. मग तुम्ही उघड्या डोळ्यांनी मराठीचे अवशेष कसे काय पहाणार? त्यामुळे तो एक भाग गैरलागू.

दुसरे, बोलणारी व्यक्ती, काळ, व स्थळानुसार मराठीच काय कोणतीही भाषा बदलते व बदलणारच.

अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे, जपानी जर्मनचे दाखले उत्तम आहेत, पण तसे प्रयत्न करायचे तर कुणी करायचे? सगळे सरकार नामक कुण्या अज्ञात अमूर्त वस्तूनेच केले पाहिजे असे आहे का?

अशा चर्चांत मराठी संवर्धनासाठी 'मी' काय काय केले, वा करायला हवे, याबद्दल कुणीच बोलताना दिसत नाही. नुसतेच सगळे 'माय मराठी लक्तरे नेसून मंत्रालयाच्या दारात भीक मागते आहे' स्टाईल अरण्यरूदन.

अरे बाबांनो, आपल्या कामधंद्यात, रोजच्या व्यवहारात मराठी किती वापरतो आपण? पूर्वी देखिल मारवाड्याची दुकाने होती. तो मारवाडी व्यवस्थीत मराठी बोलत असे. आज आपण दुकानात गेल्यावर सुरुवातच जर हिंदीत करत असू तर चूक कुणाची? कशाला शिकेल तो मराठी? माझ्या ओळखीच्या ४ अमराठी लोकांना मराठी बोलावेसे वाटावे म्हणून मी काय केले? किंवा करू शकतो? हे देखिल कुणी बोलत नाही.

अमुक व्हायला हवे अन तमुक करायला हवे. नुसताच आरडाओरडा. त्याचा उपयोग काय? कुणी व काय करायला हवे, याबद्दल काही विचार कुणीच करणार नाही. केलाच तर 'सरकारने' अमुक तमुक करावे स्टाईल. वर कुणीतरी म्हट्लंय, मला वाटतं किरणने. 'दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून क्रांती होत नाही'

मुद्दा तोच आहे.

झक्की, इब्लिस तुमचे म्हणणे पटले.

पण मग सरळ मान्य का करत नाही आपण? उगा फुकाची भाषा कशाला की मराठी टिकणारेय वगैरे?

>>त्यात कितीतरीशी, उर्दू शब्द आहेतच! कित्येक तर माहितहि नाही मूळचे मराठी की फार्शीतून आलेले?
आधी शिवाजी महाराजांनी भाषा शुद्धीचे प्रयत्न सुरू केले होते, नंतर सावरकरांनी केले.
आज आपण जे अनेक मराठी शब्द सहज वापरतो (यातले बरेचसे हिंदीत देखील घेतले गेले आहेत) त्याचे बरेचसे श्रेय या भाषाशुद्धीच्या प्रयत्नांना आहे.
अशा प्रयत्नांच्या त्याच काळात फार थट्टा केली गेली, नंतर तर काय आनंदच आहे. Sad
दुर्दैव असे की असे काही प्रयत्न झाले होते हेच आजकाल अनेकांना माहिती नाही. Sad

अहो ज्या आजच्या मराठी भाषा म्हणता ती पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा फार वेगळी होती ( खात्रीलायक रीत्या सांगतो)
मग शंभर वर्षांनी जे शिल्लक राहिले त्याला मराठी म्हणायचे,
महाराष्ट्रातल्या लहान गावात राहिलेल्या मराठी माणसाचे मराठी पुण्यातल्या आजकालच्या कित्येकांना कळणार नाही!! मग तो बिचारा हळू हळू श्याना होतो! नि खेड्यातली मराठी भाषा तीच होते. मग त्याला मराठी म्हणायचे नि ती टिकली असे म्हणायचे.

१. तो अजय यांचा एक लेख होता यावर.
२. पण मग सरळ मान्य का करत नाही आपण? उगा फुकाची भाषा कशाला की मराठी टिकणारेय वगैरे?
<<
फकीर साहेब,
ते जे 'अजय' आहेत त्यांचे नाव अजय गल्लेवाले असे आहे.
मराठी टिकवण्यासाठी अमेरिकेत बसून त्यांनी मायबोली सुरू केली, व चालवली. आज १३-१४ वर्षे झाली.
आता पुढचे तुम्ही लिहा Happy

अहो ,मायबोली हे संकेतस्थळ पैशांअभावी बंद पडायला आले होते .परंतू अजय व इतर मराठीजनांच्या तत्परतेने पुन्हा सुरु झाले व आज Incorporation आहे.मराठी लुप्त होण्याची शक्यता आहे ती कुणी नाकारत नाही ,परंतु इतके घाबरायचे कारण नाही.

जी.टि बापू,
मुद्दा 'मराठीसाठी "मी" काय केले' असा आहे. माबो हे उदाहरण आहे.
"परंतू अजय व इतर मराठीजनांच्या तत्परतेने" या वाक्यात मला गांधीशिवाय इतरांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान मोठे, असा वास येतो. पहा पचतंय का मी काय म्हटलो ते?
धन्यवाद!

मराठी टिकवण्यासाठी अमेरिकेत बसून त्यांनी मायबोली सुरू केली, व चालवली. आज १३-१४ वर्षे झाली.
शिवाय सुरुवातीला, विशेषतः अमेरिकेतल्या कित्येक लोकांनी, बरीच मदत केली. म्हणून ही एव्हढी सोपी नि लोकप्रिय झाली! त्यांच्यामुळेच माझी मराठीची गोडी शिल्लक राहिली.

आजकाल नवीन मराठी पुस्तके परदेशीयांना सहज मिळावीत अशी हि सोय केली आहे. मराठी पुस्तके वाचली तर मराठी शब्द आठवतील, आवडतील, नाहीतर आहेच माय मदरटंग इज माराथि ओन्ली!

शिवाय फुक्कट हो!

नाहीतर एव्हढे मराठी लोक कशाला आले असते इथे? एकमेकांच्या कुचाळक्या करायला पैसे देऊन येईल का कुणि? नि मराठी लिहिणे एव्हढे सोपे असून कित्येक लोक इथे अट्टाहासाने इंग्रजीतून लिहायचे. बर्‍याच यडपट लोकांनी आरडा ओरडा केला म्हणून आताशा जरा प्रमाण कमी झाले आहे.
पण आजकाल दुर्दैवाने डावखुरी मुले या ऐवजी लेफ्ट हँडेड चिल्ड्रेन हेच शब्द आठवतात, कविता, लेख यांना इंग्रजी, हिंदी शीर्षके द्यावीशी वाटतात, कदाचित तेव्हढे मराठी येतच नसेल.

इब्लिस,आपल्या उदाहरणाला मी फक्त पुस्ती जोडली . मराठी टिकवण्यासाठि इच्छाशक्ती असावी लागते हे कळावे म्हणून ते उदा.
कृगैन, धन्यवाद. गोड स्वप्ने पहा.

धन्नेवाद @ जीटीबापू Wink
~च्याय्ला! गांधीवाद घुस्वायचा माझा प्रेत्न हाणून पाडलात की!~
(फुक्कट) इब्लिस

पण आजकाल दुर्दैवाने डावखुरी मुले या ऐवजी लेफ्ट हँडेड चिल्ड्रेन हेच शब्द आठवतात, कविता, लेख यांना इंग्रजी, हिंदी शीर्षके द्यावीशी वाटतात, कदाचित तेव्हढे मराठी येतच नसेल.
<<
लकडी पुलावर भेटा. पप्पी घेतो Wink
(संदर्भ : मायबोली.कॉम)

>>मराठी पुस्तके वाचली तर मराठी शब्द आठवतील, आवडतील

झक्की, गदिमांना त्यांच्या भाषाप्रभुत्वाबद्दल आणि शब्दसंपत्तीबद्दल विचारले गेले, आणि गीतरामायणाबद्दल देखील.
तेव्हा त्यांनी सांगितले की वाचन, आधीच्या लोकांनी लिहिलेल्या साहित्याचे खुप वाचन फार महत्वाचे होते.
मोरोपंतांनी १८ प्रकारे रामायण लिहिले. त्यामधे एक रामायण असे आहे की ज्यात एकतर "र" हे अक्षर किंवा "राम" हा शब्दच नाहीये. एका प्रकाराला निरोष्ठ रामायण म्हणतात, ज्यामधे ओठाला ओठ (वाचकाने स्वतःच्या) न लावता (पफबभम नाही) वाचायचे.
किन्हईला असताना मोरोपंतांचे बरेच साहित्य अगदी लहान वयातच वाचून झाले होते.
एवढी १८ रामायणे वाचली तेव्हा कुठे १ गीतरामायण तयार होऊ शकले.

ह्या धाग्यावर लिहायचं होतं पण वेळ मिळत नव्हता. ह्या विषयावर विचार करताना माझ्या डोक्यात जे मुद्दे आले ते मांडते आहे.
१. प्रश्न अस्तित्वात आहे का?
दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर हळूहळू कमी होत चालला आहे ह्याबद्दल कोणाचं दुमत नसावं. मराठी भाषा टिकेल का ह्याचं उत्तर हो असं आहे पण आज जशी आहे तशी टिकणार नाही. जर काही ठोस प्रयत्न केले नाहीत तर हिंग्लीश+मिंग्लिश अशी धेडगुजरी भाषा मराठी म्हणून पुढच्या ५० वर्षांत ऐकायला पाहायला मिळेल असं माझं मत आहे. बदल हीच एक कायम टिकणारी गोष्ट आहे आणि भाषा प्रवाही असावी ह्यात वाद नाही पण तरीही कोणतीही भाषा शुद्ध बोलता (अस्सल बोली, हेल उच्चार ह्यांसकट), लिहिता वाचता येणे हे एक कौशल्य आहे आणि ते कौशल्य मराठीच्या बाबतीत मराठी ज्यांची मातृभाषा आहे त्याच लोकसमूहामध्ये झपाट्याने नाहीसे होत चालले आहे ही वस्तुस्थिती आहे.
एक सोपी चाचणी करून पहा. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी आपल्या ओळखीच्या वय वर्षे ६ ते १६ वयोगटातील २५ मुले निवडा. ह्यांपैकी किती मुलांना शुद्ध (कमीत कमी इंग्रजी/हिंदी शब्दांचा वापर) मराठी भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येते? (म्हणजे पाठ्यपुस्तक सोडून एखाद्या पुस्तकातील उतारा वा कवितेचे वाचन, आणि स्वतःचे विचार प्रयत्नपूर्वक मराठीतून बोलून अथवा लिहून मांडणे). जर १५ हून अधिक मुलांना (>६०%) ही तीन भाषिक कौशल्ये अवगत नसतील तर मराठी भाषेसाठी हा धोक्याचा इशारा आहे. कारण ही मराठी मातृभाषा असणारी पुढची पिढी आहे. जर ह्या पिढीत मराठी भाषेचे ज्ञान ४०% हून कमी झिरपत असेल तर पुढील किती पिढ्यात किती झिरपेल याचा अंदाज बांधणे अवघड नाही. ही मला पटकन सुचलेली चाचणी आहे. कोणत्याही प्रश्नाकडे बघताना काहीतरी वस्तुनिष्ठ पुरावे हवेत म्हणून संख्याशास्त्राचा आधार घायचा प्रयत्न केला आहे.
२. मराठी भाषा टिकली नाही तर काय फरक पडतो?
हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याचे उत्तर प्रत्येकाने आपापले शोधायचे आहे. आपली भाषा हे संवादाचे जसे माध्यम आहे तसेच ती एक प्रकारची ओळख देखील आहे. माणसांना जोडणारी गोष्ट आहे. माणसाला एकाहून अधिक भाषा बोलता येतात ही किती सुंदर गोष्ट आहे! त्यामुळे एखादी भाषा अवगत असणे हे दुसरी भाषा न येण्याचे कारण असू शकत नाही.
भाषेबरोबर त्या व्यक्तीसमुहाची संस्कृती, भूगोल, इतिहास, भविष्य आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे विचार जोडलेले असतात. आपण शब्दांत विचार करतो त्यामुळे विचारांना भाषेची गरज ही असतेच. National Geographic ने एकदोन वर्षांपूर्वी नष्ट पावणाऱ्या भाषा यांवर एक अंक काढला होता (दुवा: http://ngm.nationalgeographic.com/2012/07/vanishing-languages/rymer-text). त्यातली एक ठळकपणे लक्षात राहिलेली गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाहीये. विचार आणि भाषा ह्यांचा किती अतूट संबंध असतो हे त्यावरून कळेल. रशियाच्या एका प्रांताची बोलीभाषा बोलणाऱ्या फार कमी व्यक्ती ह्या जगात उरल्या आहेत. त्यांच्या मदतीने ह्या भाषेतील शब्द जाणून घेताना एक मजेशीर गोष्ट समजली. ह्या भाषेत पाठीमागे आणि भविष्यकाळ ह्याला एकच शब्द आहे. ह्याउलट भूतकाळ आणि समोर ह्या दोन्हीलाही एकच शब्द वापरतात. ह्यामागचा तर्क/विचार काय तर जी गोष्ट घडून गेलेली असते ती आपल्याला माहिती असते म्हणजे आपल्या समोर असते ह्याउलट भविष्य हे आपल्या पाठीमागे असणाऱ्या गोष्टीप्रमाणे दिसत नाही! आहे की नाही अफलातून विचार! उद्या ही भाषा नष्ट झाली तर हा विचारही नष्ट होणार! असा भाषेचा आणि विचारांचा घनिष्ठ संबंध असतो.
आता जग खूप जवळ आलं आहे आणि एका नवीन वसाहतवादाचा जन्म झाला आहे. ह्यात अप्रत्यक्ष गुलामगिरी असते जी केवळ वैचारिक पातळीवर काम करते! आणि ह्या गुलामगिरीचे एक महत्वाचे आयुध म्हणजे भाषा! नीट पाहिलं तर लक्षात येईल की हळूहळू ह्या वैचारिक गुलामगिरीकडे आपला प्रवास सुरु आहे. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटली तरी इंग्रजी भाषेची मक्तेदारी आपण मोडून काढू शकलो नाहीयोत. ती रशियातील बोली भाषा बोलणाऱ्या दोनच व्यक्ति उरल्या आहेत आणि त्यामुळे ती भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र दुर्दैवाने मराठी बोलणाऱ्या काही कोटी व्यक्ती ह्या जगात असूनही ह्या भाषेची सद्यस्थिती चिंताजनक आहे. सहिष्णू होण्याच्या नादात आपण आपलं स्वत्व तर गमावून बसत नाही ना हा विचार करणं गरजेचं आहे.
३. ह्याला उपाय काय?
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर प्रश्नाच्या अस्तित्वावर झगडा करत बसलो तर हा मुद्दा सुटून जाईल!
भाषा प्रवाही असते, ती बदलत असते, दुसऱ्या भाषेतील शब्दांनी समृद्ध होते ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण ह्या गोष्टी जेवणात तोंडी लावणे असते तश्या असाव्यात. जर मूळ भाषेत बोलताना निम्म्याहून अधिक दुसऱ्या भाषेतील शब्द वापरले जात असतील तर त्याने मूळ भाषा समृद्ध होत नाही तर हळू हळू नष्ट होते! एखादा अवयव जसा वापरला गेला नाही तर नष्ट होतो तसेच भाषेचे आणि शब्दांचे आहे.
मराठी भाषा टिकावी असे जर वाटत असेल तर त्यासाठी केवळ मराठी भाषिकांनींच प्रयत्न केले पाहिजेत. ह्या भाषेचे जे काही बरेवाईट होईल त्याला केवळ मराठी लोक जबाबदार असतील हे कायम लक्षात ठेवले पाहीजे. दुसऱ्या कोणावरही (इंग्लिश/हिंदी/दाक्षिणात्य लोक) दोषारोप करण्यात काहीच हशील नाही. आणि जगात कोणतीच गोष्ट आपोआप घडत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. मराठी भाषा टिकवण्यासाठी देखिल आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. आपल्यातील प्रत्येकाला ह्या कामात हातभार लावावा लागेल. जगात ह्या अशा प्रकारचे (भाषा समृद्धीसाठी) कष्ट इतर अनेक भाषिक लोक करत असतात. आपण डोळे उघडे ठेऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल.
इथे अमेरिकेत माझी अनेक चीनी, कोरियन लोकांशी मैत्री झाली आहे. ती सर्व एकमेकांशी आवर्जून आपल्या भाषेत बोलतात. संगणकावरील बरेचसे काम देखील चीनी अथवा कोरियन भाषेत करता येते. माझ्या कोरियन मित्राला मी विचारले की चीनी किंवा जपानी लिपीशी कोरियन लिपी किती मिळतीजुळती आहे? तेव्हा त्याने मला सांगितले की पूर्वी कोरियन भाषा लिहिण्याची काही सर्वमान्य पद्धत नव्हती. मात्र १५ व्या शतकात कोरियाच्या एका राजाने खूप मेहनत घेऊन कोरियन लिपीचे प्रमाणीकरण केले व तीच भाषा आता प्रमाण भाषा म्हणून वापरली जाते. त्या राजाविषयी बोलताना माझ्या मित्राचा चेहरा अभिमानाने उजळून गेला होता आणि त्या राजाच्या ह्या कार्याचे महत्त्व त्याला कळले आहे असे जाणवत होते. मला शिवाजी महाराज आठवले! आणि सावरकरसुद्धा! प्रशासनामध्ये मूळ भाषेच्या वापरासाठी दूरदृष्टीने प्रयत्न करणारे हे नेते/राज्यकर्ते. असे नेते आणि राज्यकर्ते सतत मराठी भाषेला लाभले पाहिजेत.
मी जमेल तेव्हा TED translator म्हणून काम करते. जेव्हा कोणती भाषणे कुठकुठल्या भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत हे पाहात होते तेव्हा लक्षात आलं की जवळपास सर्व भाषणे ही अरबी आणि चीनी भाषेत अनुवादित आहेत! TED वर भाषण प्रसिद्ध झाल्याझाल्या एका महिन्यात त्याचा ह्या दोन भाषांमध्ये अनुवाद झालेला असतो. हे अनुवादकाच काम स्वेच्छेने करण्याचे विनामोबदला काम आहे. ह्याचाच अर्थ किमान १००-२०० लोकं हे काम आपल्या भाषेत हे ज्ञान उपलब्ध व्हावं ह्यासाठी आपणहून सतत हे अनुवादाचे काम (आपला वेळ, पैसा आणि उर्जा खर्च करून) करत आहेत! मग का नाही ह्या भाषा पुढच्या ५० वर्षांत जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा असणार? आणि मराठी साठी TED कडे मी नोंदणी केली तेव्हा फक्त ७ स्वयंसेवक नोंदलेले होते आत्ता पुन्हा पाहिले तर ३६ दिसत आहेत!
मला वाटतं की मराठी भाषा टिकावी आणि समृद्ध होण्यासाठी ३ गोष्टी हव्या आहेत: मराठी भाषेवर प्रेम, तिच्या संवर्धनाची इच्छाशक्ती आणि त्या प्रयत्नांमध्ये सातत्य. ह्यातली पाहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. जर आपल्या मातृभाषेवर आपले मनापासून प्रेम असेल तर बाकीच्या दोन्ही गोष्टी आपोआप होतील!
४. मला काय करता येईल? ह्या यादीत आपल्यातल्या प्रत्येकाने भर घालावी!
 पुढच्या पिढीला/माझ्या मुलांना उत्तम मराठी बोलता, लिहिता, वाचता यावे यासाठी प्रयत्न करणे. मुलाच्या शाळेत जावून मराठीच्या तासाला शिक्षकांना मदत करणे. अवांतर वाचन, कविता शिकणे वै. उपक्रम राबवणे.
 शक्यतोवर मराठीतून संवाद साधताना शुद्ध मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करणे. ह्यात अतिरेक टाळला पाहीजे! नाहीतर मूळ उद्देश बाजूलाच राहतो. मी बिझी आहे, मला लेट होईल, डिनरला काय करू! स्कूलचा होमवर्क कर वै. सोपी सोपी वाक्य पूर्ण मराठीतून बोलायचा प्रयत्न करायचा. घराबाहेर अमराठी व्यक्तिंना मराठीतून बोलायची सक्ती करू नये पण आपल्या मराठी येणाऱ्या माणसाशी आवर्जून मराठीतून बोलावं. आपल्याला असं लक्षात येईल कि बऱ्याचश्या शब्दांना मराठीत उत्तम पर्यायी शब्द आहेत. पण ते वापरात नसल्याने विस्मृतीत गेले आहेत. जर आपल्या मुलांच्या कानांवर शुद्ध मराठी भाषा पडली तर तीदेखील पटकन आत्मसात करतील!
 मराठीतून लेखन :आपण बहुतांशी सर्वजण कामाच्या ठिकाणी इंग्रजीचा वापर करतो आणि संगणकावर काम करतो. त्यामुळे हाताने मराठी लिहिण्याची सवय मोडली आहे. मग आठवड्यातून एकदा आपल्याला मराठीतून काहीतरी लिहिता येईल का? दैनंदिनी म्हणा किंवा देवाचे काही. आणि त्यात आपल्या मुलांना सहभागी करून घेता येईल. त्यांच्याबरोबर नाव गाव फळ, फुल सारखा खेळ खेळता येईल का? ज्याने देवनागरीमधून लिहिण्याची सवय लागेल.
 गरज ही शोधाची जननी आहे. आता संगणकावर मराठीतून लिहिता येते पण ते खरे लिहिणे नव्हे केवळ transliteration आहे. मराठी बाराखडी असलेला सोपा कळफलक कोणी तयार करू शकेल का? मला सध्या मोबाईल आणि tablet वरून मराठी लिहिण्यासाठी उत्तम app हवे आहे. माझ्याकडे काही कल्पना आहेत पण मी स्वतः programmer नाही. जर मायबोलीवरच्या कोणाला ह्या कामात रस असेल तर मला संपर्क करा. आपण मराठी भाषेसाठी एक छान app तयार करू 
 मला तर वाटते की शाळेत इतर भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय का नसतो? मला खूप आवडलं असतं बंगाली किंवा तमिळ शिकायला! हिंदी तर चित्रपटांमुळे न शिकवताच येते! इंग्रजी शिकतोच आपण. मग किमान महाराष्ट्रात शाळेत मराठी आणि इंग्रजी सक्तीच्या भाषा आणि तिसरी भाषा म्हणून इतर भारतीय भाषांचा पर्याय असायला काय हरकत आहे!
खूप कल्पना आहेत! आणि अशक्य काहीच नाही. मराठी इतकी सुंदर भाषा आपल्याला येते, तिच्यावर आपले प्रेम आहे म्हणून आपण सगळे मायबोलीवर एकत्र वावरतो. माझ्यामते चित्र काही भयाण काळेकुट्ट नाही! उलट छान आशादायी आहे. फक्त त्या उद्याच्या पिढीच्या तोंडून मराठी भाषा ऐकायला मिळावी म्हणून आपली आजची भाषा जपून वापरण्याची गरज आहे!
(हा प्रतिसाद लिहिताना शक्यतोवर इंग्रजी शब्द वापरायचे नाहीत असं ठरवलं आणि बऱ्यापैकी जमलं याचा आनंद आहे!)

फारच छान जिज्ञासा. उपाय आवडले.
इतर माबोकरही असेच आणखी उपाय सुचवतील अशी आशा.
मोबाईलवर टायपिंगसाठी "गूगल हिंदी इनपुट" हा एक पर्याय मला माहित आहे. गुगल प्ले स्टोर मधून डाउनलोड करता येईल.त्यात देवनागरी कळफलक(किबोर्ड) आहे. तो मराठी साठी वापरता येतो.
फक्त त्यात मला पूर्ण विराम सापडला नाही. हिंदीत वाक्याच्या शेवटी पूर्ण विरामाऐवजी उभा दांडा(मला नाही माहित, हिंदीत त्याला काय म्हणतात ते.) वापरतात म्हणून असेल कदाचित.

बोबडे बोल, माझ्याकडे देवनागरीतून लिहिता यावं यासाठी ४ applications आहेत: Google hindi input, hindi transliterate, Panini marathi keyboard (very innovative idea!) आणि swiftkey. ह्यातील पाणिनी सोडलं तर बाकीची देवनागरी आणि मुख्यत्वे हिंदी लिहिण्यासाठी तयार झालेली आहेत. आणि ह्या प्रत्येकामध्ये सुधारणेला बराच वाव आहे!

जिज्ञासा.. मस्त पोस्ट!
मी स्वःत तरी कोणीही महाराष्ट्रीय लोक दिसली तर मराठीत बोलते.. अगदी पुण्यात मराठी रिक्षावाले मला नॉर्थ इंडियन समजुन हिंदीत बोलतात तरीही मी मराठीतच उत्तर देते... मग त्यांनाही मराठीतच बोलायला भाग पडते ( आजकाल पुण्यात हिंदी बोललं की लुटालुट सुरु होते Sad )
आम्ही मित्रमैत्रिणी सगळेच अस वागतो..

चिंता करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वःत पासुन सुरुवात केली तर आहेच मराठीच उज्ज्वल भविष्य!

जिज्ञासा ! वाह, अप्रतिम, सुंदर, काय बोलू ? शब्द नाहीत माझ्याकडे, अगदी नेमक्या शब्दात मांडलीत समस्या.

जरा जरी आग्रह धरला तर लगेच तुटून पडतात लोक, आणि म्हणतात की सगळेच शब्द मराठीत कसे बोलणार ? शुद्धलेखनाच्या बारीक सारीक चुका काढत बसतात. थट्टा करणार्‍यांचा रेल्वे हा तर फार लाडका शब्द आहे.

जर कोणाला उत्साह आणि वेळ असेल तर पु.लं.चे "रविंद्रनाथांवरील ३ व्याख्याने" हे पुस्तक वाचून पहावे. त्यात मातृभाषेतुन शिक्षणाबद्दलचे विचार फार व्यवस्थित दिलेले आहेत.
शांतीनिकेतनच्या धर्तीवर महाराष्ट्रात एखादी संस्था सुरू करण्याचा पु.लं.चा विचार होता. जो काही कारणांनी पुर्ण होऊ शकला नाही.

जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेस अनेकांनी खंत व्यक्त केली होती की देशाचे अजुन तुकडे पडू शकतील. पण तसे होऊ नये म्हणुन साने गुरूजी यांनी आंतरभारती चळवळ सुरू केली. त्या अंतर्गत एका राज्यातल्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना दुसर्‍या राज्यातल्या भाषेची, संस्कृतीची माहिती देणे, ती भाषा शिकण्यास प्रवृत्त करणे, आणि जमल्यास तिथे सहलीस घेऊन जाणे असे उपक्रम होते. दुर्दैवाने साने गुरूजी लवकर गेले, त्यानंतर या उपक्रमाचे काय झाले कळाले नाही.

खरे तर केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी मिळून भाषा संवर्धनासाठी प्रत्येक ठिकाणी बहुभाषिक केंद्रे उपलब्ध करून द्यायला हवी होती. त्यामधे भाषांशी सबंधित सर्व प्रकारच्या सेवा मिळू शकतील असे करायला हवे होते. असे केले असते तर भाषांचे अस्तित्व तर टि़कून राहिले असतेच पण त्यामधे नवनविन प्रयोग झाले असते आणि भाषेचे शिक्षण घेणार्‍यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झाल्या असत्या.

आता तर मुळात शाळांचीच परिस्थिती बिकट आहे तर या असल्या संस्थांचा विचार कोण करणार.

Pages