मराठी भाषेचं भवितव्य काय?

Submitted by बोबो निलेश on 15 February, 2014 - 23:01

मराठी भाषेचं भवितव्य काय?

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.

कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार Happy

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.

धन्यवाद मंडळी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंब्या, थोडे कष्ट केलेस तर पुण्यात येऊन उत्तम संस्कृत शिकता येईल. टिमवि चा आख्खा एक कँपस संस्कृत विभागाचा आहे. अमेरिकन आणि युरोपीअन साईट्स कशाला हव्यात? (का तिकडून शिक्का आल्याशिवाय इथलं ज्ञान 'व्हॅलिड' ठरत नाही?)
आणि पिंचिं भागात सुद्धा घरी संस्कृतच्या शिकवण्या घेणारे रग्गड लोक मिळतील.

इथे संस्कृतच्या साठी टिपं गाळणार्‍या किती लोकांनी गंभीरपणे ती भाषा शिकायचा प्रयत्न केला आहे? त्यांना संस्कृत अभ्यासक किती आहेत? ते काय करतात? संस्कृतशी संबंधित देशात काय काय अ‍ॅक्टिव्हिटीज चालतात? या मुद्यांवर माहिती आहे/ गोळा करायचा प्रयत्न केला आहे?

आणि मराठीला काही होत नाहीये - ठणठणीत प्रवाही भाषा आहे. पुण्यामुंबईच्या पल्याड महाराष्ट्र आहे. इंग्लिश वैश्विक ज्ञानभाषा आहे. त्याला मराठी कधीच त्या स्थानावरून हलवू शकणार नाही हे मान्य करून पुढे चला. पण प्रत्येक माणसाला एकावेळी दोनतीन भाषा शिकायला कुणी आडकाठी केलेली नाही.

जपानी, अमेरिकन, युरोपीअन लोक इथे येतात. मराठी शिकतात (अमेरिकन सरकारने खास त्यांना मराठी/ भारतीय भाषा शिकवायची सोय केली आहे) आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या/ मराठी इतिहासावर, संस्कृतीवर, राजकारणावर संशोधन करतात.

आपण फक्त मराठी असे आमुची मायबोली असे नारे देतो, तिच्या मरणाची की-बोर्डीय चिंता करतो (त्यातही शुद्धलेखनाचे नियम काटेकोर पाळत नाही)...

रच्याकने, मायबोली हा शब्दच माधव ज्युलियनांच्या आधी मिळत नाही बहुदा. त्या थोर कवीने मदरटंग या आंग्ल शब्दाचं भाषांतर करून कवितेत वापरलं आहे. Wink

>>>>> आपण फक्त मराठी असे आमुची मायबोली असे नारे देतो, तिच्या मरणाची की-बोर्डीय चिंता करतो (त्यातही शुद्धलेखनाचे नियम काटेकोर पाळत नाही)...<<<<<
अहो वरला धागा काढला कुणीतरी म्हणून इथे चिन्ता मांडली हो, नैतर आमचे आपले चालूच आहे की रोजचे जगणे!
अन रोजच्या जगण्यात अपत्यान्नी विनाकारण इन्ग्रजी दामटवली मराठी ऐवजी तर चिन्ता नै करत, झापडतो.
इथे मात्र फक्त कीबोर्डीय चिन्ताच करणे शक्य आहे, नै का? (अन थोडी पहिल्या पानापासूनच्या माझ्या पोस्टी सुसन्गत पणे वाचल्यात तर बरे होईल) Happy
चिनुक्स, बरं. तोन्ड की तोण्ड? हा मुख या शब्दाचा समानार्थी आहे ना? चेहरा म्हणजे मुंडक्याचा समोरील पूर्ण भाग हे बरोबर ना? तर चेहर्‍यावर बोलणे/गिळणे/खाणे/ओरडणे अशा कृति करायला उपयोगी उघडमीट होणारा गुहेसारखा अवयव, ते तोण्ड, असेच की काही वेगळे? माझा नेहेमी गोंधळ होतो यात. कारण किती ती पावडर तोण्डाला फासलीये..... अशा उल्लेखात आख्खा चेहरा येतो, तर किती तो अधाशी नुस्ता तोण्डात कोम्बत चाललाय यात केवळ वर वर्णन केलेला भाग येतो. नेमके काय योग्य?

इथे आता मराठीच्या भवितव्याची चिंता बाजूला पडून लिंटीच्या मराठीच्या भवितव्याची चर्चा सुरु झाली वाट्ट Lol Proud

लिंटी ह घ्या

>>>>> इथे आता मराठीच्या भवितव्याची चिंता बाजूला पडून लिंटीच्या मराठीच्या भवितव्याची चर्चा सुरु झाली वाट्ट हाहा <<<<<<
हो ना, नै त काय मेल? इतकच नै तर लिंटी माबोवर अजुन राहिला तर माबोचे काय होणार अशी चिंताही इथल्या बर्‍याच नक्राश्रू वीरांना वाटते..... अन त्याकरता बर्‍याचदा केवळ कीबोर्डिय चिंता करत न बसता ते धडक कृतीही करू पहातात असे अनुभवास आहे! असो.

तोन्डी की तोण्डी? की दोन्ही नाही?

>>>
लो.टिळकांचा (यांनाही लोकमान्य ही पदवी सरकारने दिल्याची नोंद कागदोपत्री आढळत नाही (म्हणून ती व्ह्यालीड नाही ) ही माहिती बहुधा माहितीच्या अधिकारात केन्द्रसरकारचे एखादे खाते लवकरच देईल असे दिसते. तर ते असो. ) तो प्रसिद्ध किस्सा तुम्हांस माहीत नाहीं आहे का? संत हा शब्द एका निबंधात बाल टिळकांन्नी सन्त, संत आणि सनत (न चे तंगडे मोडलेले आहे असे समजावे Happy ) असे तीन ठिकाणी लिहिले असतां मास्तरानी फक्त संत हाच शब्द बरोबर दिला तेव्हा (बाल) टिळकांनी मास्तरांशी वाद घालून तीनही शब्द बरोबर असल्याचा निकाल मिळविला होता. (बाल टिळक असा पुन्हा पुन्हा उल्लेख करण्याचे कारण या प्रसंगाचे माझ्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे पगडी व मिशावाले टिळक बोट वर करून मासतरांशी वाद घालताहेत असे उभे राहते :फिदी:) कारण बिन मिशीच्या टिळकांचे चित्र कोणी पाहिले असल्यास टिळक पुलावर भर रस्त्यावर मी त्याचा मुका घ्यायला तयार आहे. महिला असल्यास ओटी भरण्यास !

यातच तोन्ड आणि तोण्ड याचा फरक लकषात यावा.
(शेंगा, टरफले, आणि खाणावळीतील गरम पोळ्या , सुपारीचे किस्से नंतर कधीतरी )

<लिंटी माबोवर अजुन राहिला तर माबोचे काय होणार अशी चिंताही इथल्या बर्‍याच नक्राश्रू वीरांना वाटते...>

तीन अनुस्वार. चांगली प्रगती आहे.
लिंबूनानांचे मराठी सुधारले की एकंदरित मराठी भाषेचीही प्रकृती आपसूक सुधारेल.
लिंबूनानांनी आपणास देववाणी संस्कृत भाषा अवगत असल्याची लेखी नोंद केल्याचे इथे मायबोलीवरच नमूद केले होते. त्यांची संस्कृतच्या अभ्यासातील प्रगतीही पाहावयास मिळाली तर मोद पावेल.

माझ्या माहितीनुसार लिन्टीन्ना कोणीतरी ज्योतीष्याने लिहिताना अनुस्वार देऊ नये असे कुठल्या तरी भविष्य पद्धतीने सांगितले आहे. लिन्टी हे अखिल भारतीय अंधश्रद्धा प्रसारक समितीचे विश्वाध्यक्ष असल्याने ते ते कसोशीने पाळतात.... बुप्रा वाल्यांचे नाक कापावे म्हणून....

>>>> तो प्रसिद्ध किस्सा तुम्हांस माहीत नाहीं आहे का? <<<<<
हूडा, कस्ला भारी अभ्यास आहे तुझा, तुला बरं वेळेवर आठवतात अशी उदाहरणे! Happy मस्त

>>>>>> लिन्टीन्ना कोणीतरी ज्योतीष्याने लिहिताना अनुस्वार देऊ नये <<<<<< ह्हा ह्हा ह्हा..... भारी उदाहरण.

भरत, यंदा बहुतेक बारावीचे पेपरतपासणीचे वांधे होणारेत, तुला बघ काही मदत करता आली त्यांना तर, तसही तू इथेही छान तपासतोस. Wink

मराठीचे भवितव्य धोक्यात आहे ही बोंब गेली दहा-पंधरा वर्षे चालू आहे, पण मराठी प्रकाशनविश्व, नाट्क, सिनेमा,ब्लॉग्ज याच्यापैकी काहीही बंद पडलेले नाही उलट अनेक क्षेत्रात जास्त जोरात आहे. मराठीचे नुकसान झालेच असेल तर इथल्या भयानक प्रादेशिक कंपूबाजीने झाले आहे.

>>मराठीचे भवितव्य धोक्यात आहे ही बोंब गेली दहा-पंधरा वर्षे चालू आहे
कारण तेव्हापासुनच संगणकीकरण, इंग्रजी माध्यमाचे वाढते प्रस्थ, अन्य भाषा आणि संस्कुतींचा वाढता प्रभाव हे जास्त प्रमाणात चालू झाले आहे. तुम्ही बसा डोळ्यावर पट्टी बांधून.

कारण तेव्हापासुनच संगणकीकरण, इंग्रजी माध्यमाचे वाढते प्रस्थ, अन्य भाषा आणि संस्कुतींचा वाढता प्रभाव हे जास्त प्रमाणात चालू झाले आहे. तुम्ही बसा डोळ्यावर पट्टी बांधून.<<< आगाऊच्या पोस्टमधले पुढले वाक्य वाचलेच नाही का?
पण मराठी प्रकाशनविश्व, नाट्क, सिनेमा,ब्लॉग्ज याच्यापैकी काहीही बंद पडलेले नाही उलट अनेक क्षेत्रात जास्त जोरात आहे.

श्वासनंतर मराठी सिनेमाने टाकलेली कात आणि सध्या तिची असलेली घोडदौड आपल्याला दिसत नसेलच. ब्लॉग, फेसबूक स्टेटस यांची निघालेली पुस्तके आपण ऐकलीच नसतील. मराठी पुस्तकांचे इंगेजी वा इतर भाषांंमध्ये होणारे अनुवाद वगैरे आपण वाचलेच नसतील. मराठी संकेतस्थळांबद्दल आपल्याला माहित नसेलच.

बरोबरे, आम्हीच डोळ्यांवर पट्टी बांधून बसलोय.

बरोबरे, आम्हीच डोळ्यांवर पट्टी बांधून बसलोय<<<

हे अचानक 'आम्हीच' शब्द वापरणे हीच का ती 'भयानक प्रादेशिक कंपूबाजी'? Proud Light 1

श्वास चित्रपट हा मराठी चित्रपटाच्या वाढीसाठी पोषक ठरला ,
संदीप खरेच्या कविता ,अजय अतुलचे संगीत यानेही तरुणाईला मराठीची ओढ वाटतेय.
लिंब्या तू इंग्रजीत मंत्र उच्चारलेस तरीही तुझा व्यवसाय बंद पडणार नाही ,लोकांना मंत्रतंत्र ,संस्कृतशी देणेघेणे नसते, 'काका' आले बास झाले एवढेच तिथे असते.

बेफी, अहो नंदिनीला जर वाटत असेल की ती "तुम्ही" या गटात आहे तर तो तिचा निर्णय आहे.
असो, नंदिनी तर याला उत्तर असे आहे की जरी ब्लॉग्ज, पुस्तके, अनुवाद, इ. सगळे घडत असले तरी त्याचे प्रमाण आणि फार मोठ्या प्रमाणावर नविन पिढीला इंग्रजी माध्यमात घालण्याचे प्रमाण याची तुलना करून पहाल की नाही.
माझ्याकडे अगदी लगेच आकडेवारी तयार नसली तरी देखील सद्ध्याचे शिक्षणाचे व्यस्त प्रमाण पहाता संस्कृत प्रमाणे सर्व स्थानिक भाषांच्या उपयोगाचे महत्व लयाला जाण्याचा काळ फार दूर नाही. त्या कदाचित भाषा म्हणुन अस्तित्वात राहतीलही, पण त्या असण्याला फार काही महत्व नसेल.
मध्यंतरी भाषा तज्ज्ञांचे मत वाचनात आले, मिळाले तर शोधून देईन लेख. त्यांच्या म्हणण्यानुसार भाषेतले जे उपप्रकार आहेत त्यांचे मरण्याचे प्रमाण फार जास्त आहे. आणि सरकार खरी आकडेवारी कधीच देत नाही.

मराठीचे भवितव्य धोक्यात आहे ही बोंब गेली दहा-पंधरा वर्षे चालू आहे>> नाही असे अजिबात नाही.
वि का राजवाडे यांनी मराठी भाषा मुमूर्षू आहे काय ? असा सवाल खडा केला त्याला गेलाबाजार पन्नास-एक वर्षे नक्कीच झाली असतील.

एक 'वाचून पहा' प्रकारातला लेख Happy

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2999931.cms?prtpage=1

त्या कदाचित भाषा म्हणुन अस्तित्वात राहतीलही, पण त्या असण्याला फार काही महत्व नसेल.ं<<< हे विधान जरा स्पष्ट करून सांगाल का?

भाषेचे अस्तित्त्व, अस्मिता वगैरे गोष्टी मला कधीच पटल्या नाहीत. भाषा ही प्रवाही असते. आज जशी बोलली जाते तशी उद्या बोलली गेली तर तिला भाषा म्हणू नये. एक उपप्र्कार मरत असेल तर दुसरा उपप्रकार तयार होतच असतो.

निव्वळ मराठी बद्दल बोलायचे झाले तर सातशे, पाचशे अगदी शंभर वर्षापूर्वीची भाषा आणि आजची भाषा यात फरक आहे. तो फरक आहे, म्हणून भाषा टिकून आहे. अन्यथा मृत भाषा म्हटले असते. नाही का?

राहता राहिला, नवीन पिढीने इंग्रजी माध्यामात शिक्षण घेण्याचा मुद्दा. आता राज्य, देश यांमधले स्थलांतर प्रचंड वाढल्याने असे होणे साहजिक नाही का? नवीन ठिकाणी गेल्यावर दर वेळेला मुलांनी माध्यम बदलणे अपेक्षित आहे का?

नंदिनी, मराठी लयाला गेलीये असे आम्ही कोणीच म्हणत नाहीयोत, पण जे चालले आहे ते तसेच चालले तर नक्कीच लयाला जायच्या कड्याच्या तोन्डावर येऊन पोहोचलेली असेल असे म्हणणे आहे.

>>>>> पण मराठी प्रकाशनविश्व, नाट्क, सिनेमा,ब्लॉग्ज याच्यापैकी काहीही बंद पडलेले नाही उलट अनेक क्षेत्रात जास्त जोरात आहे.<<<<< ज्या प्रकाशनसंस्थेने, केवळ पन्नास रुपयात विशिष्ट ग्रंथ उपलब्ध करुन दिले तेव्हा लोकांच्या उड्या पडल्या. त्यादृष्टीने त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे, मात्र बाकी प्रकाशनसंस्थांच्या नफातोट्याचे ताळेबंदावरुन जर कुणी "मराठीच्या" अस्तित्वाचे मोजमाप करीत असेल, तर जरा अवघडच मानावे लागेल. आम्ही आपले आमच्या आजुबाजुचे मराठी लोक काय वागतात/बोलतात या प्रत्यक्ष प्रमाणावरुनच परीक्षा करतोय.

>>>>> 'काका' आले बास झाले एवढेच तिथे असते.<<<<< एलोएल. असे नस्ते ग्रेट्या. नुस्ते धोतर लावुन अन गळ्यात पान्ढरी दोरी तिरकी लटकवुन आलेला काका अन शुद्ध, खणखणीत, भावपूर्ण मंत्रोच्चाराद्वारे दैवि वातावरण निर्माण करुन यजमानास भक्तिरसात घेऊन जाणारा खरोखरीचा काका यातिल फरक गावाकडच्या लोकांना नक्की समजतो. असो.
बाकी तू म्हणतोस तसे श्वास/संदिप /अजयअतुल व अशा अनेकांमुळेच मराठीबद्दल आशा उत्पन्ना होते, प्रश्न असा आहे की अशा मोजक्या लोकांच्या अस्तित्वावर/कार्यावर भिस्त सोडून द्यायची व स्वतःमात्र मराठी भाषेच्या अंताकरता झटायचे या वृत्ती अन घटना यावर आमचे भाष्य आले तर इतके अवघडायला का होतय बर्‍याच जणान्ना?

(भरत, अनुस्वार अवघड जाताहेत टायपिन्गला - लोकमान्यांची कथाच घेऊ का? )

इंग्रजी माध्यमात आपल्या पाल्याला घालण्याचे प्रमाण प्रामुख्याने शहरांमध्ये आहे. ग्रामीण विभागात प्रचंड प्रमाणावर विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकत आहेत. ते व्यावसायिकतेच्या किंवा स्पर्धात्मकतेच्या निकषावर मागे पडत आहेत हा भाग ह्या धाग्याशी संबंधित नाही. पण शिक्षण क्षेत्रातूनच मराठी हद्दपार होत आहे असे समजणे गैर ठरावे.

मी ज्या संस्थेत तूर्त कामाला आहे तेथे गेल्या वर्षभरात मी अनेक विद्यार्थी, अनेक इतर संस्था, शिक्षक, प्राध्यापक, टीपीओज, एम्प्लॉयर्स अश्या अनेकांना भेटू शकलो. हे लिहिण्याचे कारण इतकेच की कान, डोळे व मन उघडे ठेवून पाहिले तर 'मराठीचे भवितव्य काय' हा प्रश्न महत्वाचा नसून '(निव्वळ) मराठी भाषिकांचे भवितव्य काय' हा प्रश्न महत्वाचा असल्याचे जाणवावे.

पहिल्या दोन पाच प्रतिसादांमध्ये माझा जो एक प्रतिसाद आहे त्यातीलच मुद्दा पुन्हा लिहू देण्याची रिक्वेस्ट करतो, की मराठी आहे म्हणून जोवर व्यवसायात संधी उपलब्ध होत नाहीत तोवर 'निव्वळ मराठी' भाषिकांचे भवितव्य खरंच धोक्यात आहे. मराठी भाषेला, तिच्या अस्तित्वाला, वाढीला, बदलण्याला तशी काही अडचण (निदान) दिसत (तरी) नाही.

बेफी, माझ्या पहील्या पानावरच्या पोष्टी मी हाच मुद्दा उपस्थीत केला आहे फक्त वेगळ्या अंगाने.

हर्पेन यांनी दिलेली लिंक वाचली, त्यात 'मराठी ही सद्यस्थितीत प्रगत किंवा विकसित भाषा आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल.' असे वाक्य आहे ते सिद्ध करण्यासाठी दिलेल्या निकषात; भाषिक प्राविण्य आणि वापराची गुणवत्ता असे दोन निकष आहेत. आता याचा अर्थ आनी-पानी करणार्‍यांनी मराठीची सद्यस्थिती खालावली आणि ती तथाकथित प्रगत-विकसित भाषा राहिली नाही असा घ्यायचा का?
कोणतीही भाषा ही ज्ञानभाषा होऊ शकते हे सैद्धांतिकदृष्ट्या कितीही बरोबर असले तरी एखादी भाषा आणि तिचा विकास ती वापरणार्‍यांच्या इतिहास-समाज-अर्थकारणाशी इतका घट्ट जोडलेला असतो की असे ज्ञानभाषा होणे प्रत्यक्षात शक्य नसते. मराठीकडूनच काय पण कोणत्याच भारतीय भाषेकडून ती अपेक्षा अवाजवी ठरेल.
काळजी करायचीच झाली तर मराठी समाजाच्या इतर भारतीय भाषातील साहित्य व इतर कलांबद्दलच्या संपूर्ण अनास्थेची व्हावी. हिंदी-इंग्रजी निरपेक्ष विचार होऊ शकतो हेच आपण विसरलो आहोत.
राजवाड्यांच्या विधानाला इतकी वर्षे झाली तरी तीच चर्चा अजून चालू आहे आणि मराठीही. मराठीचे नाव पुढे करुन अमुकतमुक 'सांस्कृतिक' आक्रमणाच्या आरोळ्या ऐकायचा लई कंटाळा आला हो!

बेफी/ग्रेट्या बरोबर, अन त्याचबरोबर, आईच्या गर्भात असल्यापासून अपत्याच्या कानावर इन्ग्रजी पाडायचा अट्टाहासही थांबेल.

>>>> लिंबूनानांचे मराठी सुधारले की एकंदरित मराठी भाषेचीही प्रकृती आपसूक सुधारेल. <<<<<< अरे अरे भरत, इतक्या मोठ्ठ्या ऐतिहासिक पातळीवर नको रे नेऊस, भिती वाटते....... काये ना की युरोपमधल्या कोणत्याश्या देशाच्या महाराणीचे नाक वाकडे होते म्हणून म्हणे इतिहासाला कलाटणी मिळाली असे वाचल्याचे आठवते, त्या धर्तीवर लिम्ब्याचे मराठी सुधारले की मराठी जगेल हे म्हणणे वाटले मला........ !
ते काहीही असो, पण माझ्यामुळे माझ्यापुरती (हो हो, अगदी स्वगतांपुरती म्हणालात तरी चालेल) तरी मराठी नक्किच जगेल याची जिवन्त अस्सेस्तोवर खात्री देतो. Wink

आगाऊ तुझ्या वरील टीप्पणीमधिल तुझा नि:ष्कर्ष जाऊदे बाजुला, पण तुझे अभिनंदन कारण इतक्या मोठ्या गहन मजकुरा मधे तू "लिंक" हा शब्द वगळता एकही इन्ग्रजी शब्द वापरला नाहीयेस. शाब्बास. तुला ९९.५ टक्के. अर्धा टक्का लिंक या शब्दाकरता वजा करतो व विनंती करतो की लिंक या शब्दाला सुयोग्य मराठी शब्दही तुम्हीच सूचवा गुरूजी.

त्याचबरोबर बेफिकीर, तुमचेही अभिनंदन, फक्त ९९%. १% वजा कारण >>>> मुद्दा पुन्हा लिहू देण्याची रिक्वेस्ट करतो, <<<< या तुमच्या वाक्यात रिक्वेस्ट ऐवजी विनंती हा पूर्वापार चालत आलेला मराठी शब्द वापरणे संयुक्तिक होते.

दोघांचेही अभिनंदन Happy

माझे अभिनंदन करू नका लिंबूभाऊ, कारण माझी एक चूक झाली आहे. माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात मी 'तरच मराठीचा र्‍हास टळेल' वगैरे भाषण ठोकले आहे व त्या मुद्याल ह्या वरच्या प्रतिसादात छेद मारलेला आहे. Proud

ती चूक सुधारायला हवी आहे मला आधी.

>>>> त्या मुद्याल ह्या वरच्या प्रतिसादात छेद मारलेला आहे. <<<<<<
बेफी, काळजी करू नका, इतके "जुने पाने" संदर्भ खोदुन काढून्/लक्षात ठेवुन इथल्या चर्चा होत नाहीत.
इथे फक्त लिम्ब्या (अन इतर काही मोजक्या व्यक्ति) काय लिहीतो ते कसे खोडून काढायचे, विरोधाला विरोध कसा करायचा या पद्धतीने वावरणारेच जास्त.
तुम्ही सांगितले नसतेत तर ते कुणाच्याही लक्षात आले नसते हे विशेष.
स्वतःहून सांगितल्याबद्दल तुमचा कापलेला १ टक्का तुम्हाला बहास केला असे. पुढच्या वेळेस चुकीची दुरुस्ती करा अन मुद्यांबाबतच्या आपल्याच धोरणाची सरमिसळ होऊ देऊ नका.

Pages