मराठी भाषेचं भवितव्य काय?

Submitted by बोबो निलेश on 15 February, 2014 - 23:01

मराठी भाषेचं भवितव्य काय?

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.

कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार Happy

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.

धन्यवाद मंडळी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, तुमचे म्हणणे कळतेय हो. तुम्ही 'शिप ऑफ थेअसिस' पाहीला असेलच. त्या न्यायाने बदल हा सदैव चालू असतो वगैरे मान्यच. तुम्ही वर काही उदाहरणे दिलीत की मराठीत अमक्या-ढ्मक्याचं भाषांतर कसे करायचे तेव्हा हे जशेच्या तसे वापरू, तर तेही एकवेळ मान्य. तुम्ही म्हणताय तसे सध्याचे 'राजे' वेगळे आहेत त्यांच्या लेखी मराठी गौण किंवा काहीच नाही तर तेही मान्य.
सगळं कधीनकधी संपणारेय म्हणून पाश्चिमात्य(किंवा बरेचसे, अपवाद आपण) त्यांच्याकडच्या 'हेरिटेज'* गोष्टींकडे दुर्लक्ष करतात का? याऊलट आपल्याकडे परिस्थिती आहे असे नाही वाटत?
ठिक आहे हो कि मराठीची मार्केटवॅल्यु* कमी आहे, नाहीचए असे समजा. पण ८-१० कोटींचा लोकसमूह 'आपली' अशी भाषा नाही वापरु शकत? तुम्ही म्हणाल वापरा की कुणी अडवलेय? तर मेख तिथेच आहे.
आज नातु आज्याशी बोलताना गोंधळतो उद्या बाप-पोरात धड संवाद नाही होणार. परवाला होईल पण 'भाषा' वेगळी असेल. हे इतके सगळे कशासाठी? आपण आपल्याच मुळांवर घाव घालतोय असे नाही वाटत?
'१' हा आकडा 'एक' म्हणण्याधी 'वन' म्हणायचा आणी कधी जमलेच तर त्या 'वन'ला 'एक' असेही म्हणतात हे शिकायचे. हे कशासाठी? तुम्हाला वाटते की मराठी संपणारच नाही तर तो मुद्दा स्पष्ट कराच. की जेवणासोबत जसे लोणचे असते तसे तोंडी लावण्यापुरते मराठी शिल्लक राहीलच तर असोच.
तुम्ही म्हणाल की हे बेनं लय घाबरलंय तर हो. 'उपरे'पणाइतकी कशाची भिती नसते.

मन्ह्या घरमा मालेच उपरा करानी कोनी ताकत शे भो?
काम्हून घाबरायला तू?

इतक्या बोली भाषा आहेत. कोणती मराठी हेरिटेज म्हणून जतन करायची आहे?

भाषा हे संवादाचे माध्यम असते वगैरे ठिकेय हो पण ते 'कळण्याचे' सर्वात मोठे माध्यम.
माहीती किंवा जीके साठी तुम्ही परक्या भाषा वापरू शकता पण जेव्हा एखादी गोष्ट आतपर्यंत पोहोचवायची आहे, जाणीवेच्या पल्याड, नेणीवेत तेव्हा मातृभाषा हवीच.
अहो एखादा परक्या भाषेतला चित्रपट जरी पाहीलात आणी समजा तुम्हाला ती भाषा येत जरी असली तरी तेवढ्यापुरता तुम्ही त्याच भाषेत त्या चित्रपटाचा विचार करता. कालांतराने कधीतरी अंतरमन ढवळून जेव्हा विचार केला जातो तेव्हा मातृभाषाच उपयोगी पडते. आपल्याच नकळत आपल्याच भाषेने त्या गोष्टी झिरपून ठेवलेल्या असतात.

आपली ह्या प्रोसेसवरच कुर्‍हाड पडतेय!!

प्रत्येकाला वाटते की ठेवावे मागे पुढच्या पिढीस काहीतरी. पै-पैसा ठेवण्याकडे बर्‍याच जणांचा कल असतो आणी त्यानेच बोकाळतो भ्रष्टाचार.
पण का ठेऊ नयेत मागे ज्ञानोबा, तुकाराम, शिवाजी, मर्ढेकर? हीच तर भाषा. हीच मराठी. ते ठेऊनही उद्या परके होणार असतील तर आपण नालायकच.

>> पण का ठेऊ नयेत मागे ज्ञानोबा, तुकाराम, शिवाजी, मर्ढेकर?
ते जी बोलिले ती मराठी भाषा तुम्ही बोलता काय आता? अंतर्मन ढवळतानातरी?

जोपर्यंत मराठी भाषेच्या भवितव्यावर चर्चा चालू आहे, तोपर्यंत मराठीला मरण नाही Happy
जशी मराठी भाषा भुतकाळात बदलत जाऊन आजच्या मराठीपर्यंत येउन पोहचली आहे, तशीच ती अजुन काही बदल होत, नविन प्रकारात अस्तित्व टिकवुन ठेवेल हे नक्की.

आजुन ५० वर्ष तरी मरण नाही. Convent चे वेड ह्या १० वर्षात चालु झाले आहे ते देखिल शहरात (किवा जिल्हा पातळीवर). आजुनही तालुक्यात आणी खेड्यात मराठी मध्येच शिक्षण होत आहे. ही मुले मराठीला आजुन एक generation चालु ठेवतिल.

त्यानन्तर मराठी हळु हळु लुप्त होईल सस्क्रुत सरखी. पण तोपरन्त आपल्यापैकी खुप कमी जण असतिल. Happy

आपली मुलं कॉन्व्हेण्ट मधे घालून मराठी भाषेचं महत्व पटवून देणारे महाभाग मागच्या पिढीतही कमी नव्हते. अमेरीकेहून येऊन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणा-या एक भद्र महीला माहितीच्या आहेत. ज्यांच्या जिवावर मराठी टिकतेय ते कष्टकरी, छोटे व्हावसायिक इ. ना जोपर्यंत परवडत नाही तोपर्यंत मराठी माध्यमाच्या शाळा चालू आहेत हे चित्र आहे. पोटाला चिमटे घेऊनही इंग्लीश माध्यमात शिकवणारे पण दिसतात. हा खटाटोप कशासाठी ? त्यांना काही तरी जाणवतच असेल ना ?

मध्यंतरी राज्य सरकराने पहिलीपासून इंग्रजीचा निर्णय घेतला तेव्हां कोण गदारोळ झाला होता. जसं काही आपलीच मुलं सरकारी शाळेत शिकताहेत. ज्यांना नाईलाज म्हणून आपली मुलं सरकारी शाळेत घालावी लागतात त्यांनी कुठल्या माध्यमात शिकायचं याचे सल्ले देणारे आपण कोण ?

दुस-याच्या खांद्यावर बंदूक देऊन क्रांती होत नाही.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या बॉडीवर असताना ग. नी. जोगळेकरांनी सकाळ मधे एक लेख लिहीला होता. तो अवश्य वाचावा, एक तर गनी बरोबर असतील किंवा मराठी भाषेची चिंता करणारे. एकाच वेळी दोघे कसे बरोबर असू शकतील ?

>>>> PowerPoint presentation साठी मराठी शब्द हवा आहे. <<<<<
पॉवरपॉईण्ट हे नाम, सबब, त्याचा प्रतिशब्दाची गरज नाही व प्रेझेन्टेशनसाठी "प्रदर्शन" हा पुरेसा होईल, तेव्हा "पॉवरपॉईण्ट प्रदर्शन" असे तुम्ही म्हणलात तर मला नक्की कळेल.

लिंबुभाऊ presentation साठी आपण सूचीत केलेला 'प्रदर्शन' हा शब्द चूकीचा आहे.. त्यासाठी 'सादरीकरण' हा शब्द योग्य आहे.
exhibition=प्रदर्शन
यांचे धर्मांतर होणार बहुधा Proud

केलेल्या सादरीकरणाचे प्रदर्शन Biggrin
आम्हाला शिक्षण स्नानकच्या वेळी दॄकश्राव्य माध्यमांचा शिक्षणात उपयोग, यावर तब्बल ६ दिवस, कोणतेही दृकश्राव्य माध्यम न वापरता दिलेले व्याख्यान आठवले. Proud

अस्थानी होणार नाहीये म्हणून इथे चिकटवतोय.

http://www.maayboli.com/node/47653

ज्यांची मातृभाषा मराठी नाही पण त्यांना मराठी बोलता येते, ते बोलतात असे कोणीच आपल्या आसपास नाहीत? ते मराठी का बोलताहेत, कसे बोलताहेत हे ऐकणे रोचक ठरेल.

>>>>> ज्यांची मातृभाषा मराठी नाही पण त्यांना मराठी बोलता येते, ते बोलतात असे कोणीच आपल्या आसपास नाहीत? ते मराठी का बोलताहेत, कसे बोलताहेत हे ऐकणे रोचक ठरेल. <<<<<
प्रकार एकः
१) आमचा आयएस्डी म्यानेजरः गुजराथी आहे, इथेच जन्म, मराठी उत्कृष्ट बोलतो. घरी गुजराथी बोलतो
२) आमचा आयएस्डी सिनियर म्यानेजरः पन्जाबी आहे. तोडकेमोडके मराठी बोलतो, मराठी समजते. घरी हिन्दी बोलतो
३) आमचा मारवाडी: मारवाडातील आहे, मराठी तोडकेमोडके बोलतो, मराठी समजते, मुलान्ना मराठीची विशेष शिकवणी लावली होति. घरी मारवाडीत बोलतो.
४) क्यान्टिनमधिल विविध बिहारी पोरे: मराठी बोलता येत नाही, पण त्यान्चेशी मराठीतच बोलले की त्यान्ना हळूहळू समजु लागते असा अनुभव आहे, व ते देखिल थोडे तोडकेमोडके मराठी बोलतात. आपापसात त्यान्च्या बिहारी हिन्दीत बोलतात.
वरील चारही उदाहरणे, ही "पैका कमवायच्या मजबुरीतून जिथे काम आहे तेथिल भाषा येणे आवश्यक वाटले" म्हणूनची आहेत.

या उलट,
प्रकार दोन
१) माझी भाची: इन्ग्रजी फाडफाड (?) बोलते, मराठी बोबडे-तोडके मोडके बोलते, शिक्षण अजुन होतय, तेव्हा पैशे कमवायच्या मजबुरीचा संबंध नाही.
२) आजुबाजुचे अनेक विद्यार्थी/विद्यार्थिनी: फाडफाड इन्ग्रजी बोलतात, आपापसात बोलताना सहसा हिन्दी वापरतात, अन त्यान्ना आम्ही बोलत असलेले मराठी वेगात बोलले तर काडीचेही समजत नाही, सावकाश बोलले तरी कठीण शब्दान्चेबाअतित अगम्य चेहरा करतात.
यातिल कुणीही बाहेरील देश जाऊदेच, महाराष्ट्र/पुणे सोडून बाहेरील राज्यातही पैशे कमवायला जाण्याची सूतराम शक्यता नाही. अन तरीही केवळ इन्ग्रजी माध्यमामुळे यान्नी यांचीच मातृभाषा मराठी यान्चेच महाराश्ट्र नामक मरहठ्ठी राज्यात गमावलेली आहे, त्यान्चे पुढल्या पिढीत मराठी नामशेष होईल

याचबरोबर ही उदाहरणे देखिलः
प्रकार तिन
१) माझा पुतण्या: शालेय शिक्षण मराठीतुन घेऊन पुढे इन्जिनियरिन्गसाठी जर्मनीत गेला, सध्या बेंगलोरला आहे, घरादारात शुध मराठी बोलतो, त्याचा लहानगा मुलगाही मराठी बोलतो, घरात इन्ग्रजीला थारा नाही.
२) माझ्या शेजारिल मुलगा: : शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनीमधे मराठी माध्यमातुन, पुढे इन्जिनियरिन्गला जाऊन जास्तीच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, तेथिल पदवी घेतल्यावर गेली दोन वर्षे तिथेच नोकरी करीत आहे. त्यान्चे घरीदारी केवळ मराठीत बोलले जाते. त्याचेशी फेसबुक्/च्याट/फोन वर बोलताना कुठेही इन्ग्रजीचा स्पर्षही होत नाही.
३) माझा मामेभाऊ: कोकणातल्या खेड्यात झेड्पीसदृष शाळेत मराठीमाध्यमातुन शिक्षण, इन्जिनिअरिन्गचा डिप्लोमा - महाराष्ट्रात प्रथम क्रमांक, पुढे इन्जिनिअरिन्गची पदवी, आता मल्टिन्याशनल कम्पनीमधे वरिष्ठपदावर, गेल्या दहा वर्षात असंख्य परदेशवार्‍या झालेल्या , त्याचे घरात मराठीच बोलले जाते, त्याची मुलेबाळे मराठीत बोलतात, व त्यान्ना आम्ही बोललेले समजतेही. कुठेही इन्ग्रजीचा स्पर्षही नाही.

वरील तिन प्रकारात आपण कुठे मोडतो हे ज्याचेत्याने ठरवावे. प्रकार तिसरा नैसर्गिक आहे तर प्रकार दुसरा "न्युनगन्डात्मक हेकटपणाचे " अपत्य आहे. प्रकार एक हा व्यावसायिक तडजोडीचा भाग आहे.

येवढ्या विश्लेषणानन्तरही, जर कुणाला "हा बामणी कावा" वाटत असेल, आता "वन्चितान्ची" वगैरे पोरे इन्ग्रजी शिकुन पैका कमावू पहातात म्हणून पोटात दुखणे असे वाटत असेल तर असल्या आचरट व घरभेद्या युक्तिवादाला मजपाशी उत्तर तर नाहीच, पण समजावुन सान्गण्याचीही इच्छा नाही. अशान्नी कृपया वरील पोस्ट "इग्नोर" मारावी.

परकीय लोकांमुळे देववाणी मेली हे ऐकून फार करमणूक झाली.

३३ कोटी देवांची भाषा ५० हजार आक्रमकांनी मारुन टाकली ! फारच विनोदी आहे हे ! Proud

धोतरं जाऊन प्याण्टी घात्लया तरी तुमचे लिन्गबदल होत नाही गग्रेटथिन्करा . पण भाषा बदलल्याने मात्र जीभ, जीभेचे वळण, अन भाषेद्वारे मिळणारे मेन्दूवर होणारे संस्कार असे सगळेच बदलून जाते, म्हणून धर्मही बुडतो. पादूका जाऊन शूज आले तर धर्म बदलतो की नाही माहित नाही पण घरातल्या देवघरात पादुकांच्या ऐवजी इन्ग्रजान्चे शूज आले तर चाफेकर बन्धु घडतात हे तुम्ही एकतर विसरला आहात किन्वा शिकलाच नसाल, नै का?

लिंब्या, का इनाकारण चिडत आहेस? देवघरात शूज ठेवा असे कुणी म्हटलेले नाही. माणसांनी पादुका सोडून शूज वापरायला सुरुवात केली, त्याबद्दल ते बोलले आहेत.

व्यवसायवृद्धीसाठी किती तो आटापीटा Proud अरेरे Biggrin
आपण काही दिवसातच 'वंचीत' होणार आहोत याची 'विवंचना' स्वस्थ बसु देत नसावी Proud

प्रकार तीनः
माझा अमेरिकन जावई ३५ वर्षांपूर्वी अमेरिकेत जन्मला, इथेच वाढला. आता तो भूक लागली, उष्टे, हो, नाही, उकड, खिचडी, पोळी, भाजी, १ ते १० असे मराठी बोलतो!
इतकेच नव्हे तर आजकालचे मॉडर्न मराठी जसे चिकन, तेहि बोलतो.
माझा मुलगा इथे जन्मला, इथेच वाढला, तो भारतातल्या मावशीशी मराठीतून बोलतो. पण मावस भाऊ, मामा, मामे भाउ वगैरे त्याच्याशी अट्टाहासाने इंग्रजी बोलतात, त्याच्या मराठी प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरे देतात. त्याने मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा पूर्ण पाहिला, त्याला काहीहि अडचण आली नाही, तो म्हणाला की हा सिनेमा मराठी आहे की इंग्लिश? हे पुण्यात नि मुंबईत रहातात तर यांना मराठी कसे येत नाही? (हा: हा:, यडे अमेरिकन! काSही कळत नाही आजकालच्या भारताबद्दल!)

माझ्या मते आजकालची मराठी शब्दांमधून नाही तर बोलण्याच्या पद्धतीतून जिवंत राहीलच नि वाढेल - जसे पुट रे, कम हं! गिव्ह वन वन रुपी नोट.
Happy Light 1

झक्की Lol

झक्की, मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून बघायचे झाले तर तुम्ही चुकीच्या वेळी परदेशात गेलेले इसम आहात.

परदेशात आल्यावर आपली मातृभाषा बोलायचा आणि जपायचा उत्साह येतो हे अगदी खरं (स्वानुभवातून). आपल्या आजुबाजुला सतत वेगळी भाषा बोलली जात आहे हे जाणवल्यावर जमेल तेव्हा आणि जमेल तशी आपली भाषा बोलावीशी वाटते आणि घरात तर तिच बोलली जाते. माझ्या ओळखीतल्या सगळ्या मराठी घरात हेच बघितलं आहे. इथे जन्मलेली मुलं पण घरात मराठी बोलतात. पण ती भारतातल्या नातेवाईकांशी बोलताना ते इंग्रजीतून बोलतात हा झक्किंचा अनुभव मलाही सारखा येतो.
रच्यकने - बाहेर असताना कोणावर शेरे ताशेरे मारायला मातृभाषेचा फार उपयोग होतो. गाडी घ्यायला डीलर कडे गेलो असताना मी आणि बायको एकमेकांशी बिनधास्त मराठीत बोलत होतो Happy

कदाचित भारतात आजुबाजुला बहुसंख्य लोक आपलीच भाषा बोलत असल्यामुळे ते एवढे जाणवत नाही आणि आपली भाषा जपली पाहिजे हे ही जाणवत नाही. त्यामुळे भारताबाहेर मराठी जाणीवपुर्वक जपण्याचे प्रयत्न होतात असं वाटलं (हे मा वै म)
मराठीतून शिकल्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. मी स्वतः आठवी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलो व नंतर इंग्रजीतून. त्यामुळे मी विचार मराठीतून करतो. इंजिनिअरिंगला असताना असं जाणवलं कि इंग्रजीतून वाचलेलं मी मनात मराठी मधून समजावून घेतो. पहिल्यापासुन इंग्रजी शिकलेल्या मुलांचं ह्याच्या बरोबर उलटं होतं. पण ह्यामुळे माझा अभ्यासाचा वेग त्यांच्यापेक्षा कमी पडायचा असं वाटलं. अजुनही मला मराठी 'वाचायला' लागत नाही. देवनागरी वर डोळे पडले कि आपोआप डोक्यात शिरतं काय लिहिलय ते. इंग्रजी मात्र अजुनही लक्ष देऊन वाचायला लागतं.

"पॉवर पॉइंट म्हणजे शक्तीबिंदू" - Happy Happy मला आवडलं हे. शक्तीबिंदू सादरीकरण. तसंही मायबोली वर अनेक ईंग्रजी शब्दांचं फॅन्सी मराठीकरण पाहिलं आहे (रच्याकने, टंकणे, तू-नळी, विकांत, दिवे घ्या वगैरे), त्यात थोडी भर. Happy

Pages