मराठी भाषेचं भवितव्य काय?

Submitted by बोबो निलेश on 15 February, 2014 - 23:01

मराठी भाषेचं भवितव्य काय?

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.

कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार Happy

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.

धन्यवाद मंडळी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई +१
मला स्वतला तरी आपल्याला अनेकानेक भाषा यायला हव्यात अस वाटत>>>> वाटतं खरी, पण जमतेच असही नाही. किमान माझं तरी 'एक ना धड...' असच आहे सध्या. Happy

किमान माझं तरी 'एक ना धड...' असच आहे सध्या

चांगलंच आहे की. निदान त्या भाराभार चिंध्यांमधले काही अ ब क डोळ्यांसमोर आले तर ते वाचायची धडपड कराल ना त्यामुळे. Happy

लिंबूदा, सत्यवचन श्रीमान !

देवभाषा मरण्याचे कारण म्हणजे आजवर झालेली अनेकानेक आक्रमणे आणि प्रयत्नपुर्वक बदलविण्यात आलेली मानसिकता. असो तो एक वेगळा वादाचा मोठा विषय आहे.

मराठी माध्यामात शिकलेल्या सर्वांनाच वाचन लेखनाची खुप मोठी आवड निर्माण होते असे म्हणणे नाही,
पण निदान इंग्रजी माध्यमात शिकणार्‍यांपेक्षा तशी आवड निर्माण होण्याचे प्रमाण बरेच जास्त असू शकते.

मातृभाषेतुन शिक्षण प्रभावी का असते हे मी वेगळे सांगायची गरज नाही. अनेक अभ्यासू लोक ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील.

राहिला विषय इंग्रजी शिकण्याचा, ती जर काळाची गरज असेल तर त्यावर विशेष प्रयत्न घेतले गेले पाहिजेत.
भाषा शिकणे याला विरोध नाहीये, तर ती माध्यम बनविणे याला विरोध आहे. दुर्दैवाने काही विषय गणित, विज्ञान, इ. हे इंग्रजीतच शिकवले गेले पाहिजेत, पटत नसले तरी दुसरा पर्याय नाही, पण इतिहास, भुगोल, ना. इ. सारखे इतर विषय कशाला पाहिजेत इंग्रजीत ?
उद्या खुद्द मराठी भाषा विषय इंग्रजीत शिकवायला लागले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. Sad

मी याआधी देखील लिहिले आहे की इंग्रजी माध्यम कसे आवश्यक आहे हे राजकारण्यांनी लोकांवर जास्त बिंबवले आहे त्यांची तथाकथित दुकाने चालण्यासाठी.

कुणी काही म्हणो, पण माझं intuition* असंय की मराठी नामषेश व्हायच्या मार्गावर आहे हे खरे. आता त्याला किती कालावधी वगैरे लागेल याचं काही गणित नाही मांडता येणार कारण हे माझे संशोधन नाही.
भाषा वाचेल वाचेल म्हणजे काय हो? आजही आम्ही ६०-७० च्या कादंबर्‍या आणी कथा वा इतर साहीत्यप्रकाराला श्रेष्ठ समजतो कारण त्यानंतर भरीव असे काही झालेच नाही.
बरे साहीत्याचे जौदे, पण सध्या आपणच मराठीची जी काही गळचेपी चालवलिये जी साधारणपणे दिड-दोन दशकांपासून शहरी भागात व्हायची ती गाव-तालुक्यापर्यंत पोहचलीये. हे मराठी विरोधी पिक फोफावतच चाललंय.
शालेय शिक्षण, रोजमर्राचे व्यव्हार, खरेदी-विक्री पासून अगदी बसच्या टिकीटापर्यंत झालेले 'इंग्रेजी'करण याकडे आपण चक्क कानाडोळा करीत आहोत.
मधे लोकसत्तात वाचलेले आठवते की गेल्या ८-१० वर्षांत एकाही नवीन मराठी माध्यमाच्या शाळेला सरकारने परवानगी नाही दिलेली. त्याउलट उर्दू, गुजराती, हिंदी यांना तर बरेच दिवस आलेत. जमल्यास शोधून त्या बातमीची लिंक पोस्टतो इथे.
बरे ज्याभाषेला निव्वळ नावापुरता 'राजाश्रय' आहे आणी जिचे पाईक चार-दोन टवाळक्यांच्या तोडफोडीला घाबरून भाषेला भरजरी वस्त्रे घालायच्या बतावण्या करताहेत त्या भाषेचे 'शाही इतमामात अंत्यसंस्कार' नाही झाले तर नवलच.
आपण एक समाज म्हणूनच इतके मागास आहोत कि आपल्या बुडाखालचा प्रकाश बघायचे सोडून दुसर्‍यांच्या अंधारात मश्गुल असतो. या मुर्दाडांत अमृताही पैजा जिंकणारी जन्मली तिचे नशीबच करंटे.

बोलण्यासारखे खूप आहे हो पण जौद्या, माझ्याच पोटच्या पोरांना मराठी माध्यमात घालू शकेन की नाही आणी चार इंग्रजी वाक्ये नाय आली तर त्यांचेच पोट भरू शकेन की नाही या कात्रीत सापडलेला 'फकिर' पोटासाठी भाषेचाही सौदा करेलसे वाटते. असो.

* मराठीसाठी इंग्रजीचा आधार! Proud

देवभाषा मरण्याचे कारण म्हणजे आजवर झालेली अनेकानेक आक्रमणे आणि प्रयत्नपुर्वक बदलविण्यात आलेली मानसिकता. असो तो एक वेगळा वादाचा मोठा विषय आहे.

आँ !!!!!! अनेकानेक म्हणजे कुणाची ? मोघल आणि इंग्रज की काय? पण देवभाषा तर त्याच्या कितीतरी आधीच अल्ला को प्यारी हो गयी.

बरं, आक्रमकांमुळे जेंव्हा भाषा मरते तेंव्हा आक्रमकाची भाषा स्वीकारली जाते. देशभरातील संस्कृत बंद पडून मराठी, कन्नड, गुजराती अशा भाषा आल्या त्याला आक्रमक कसे काय जबाबदार बुवा?

नै, काय आहे, काहीही झालं की विदेशी शक्तीचा हात, अशा किंकाळ्या काही जणांना दाटून येतात.. Proud

>>माझ्याच पोटच्या पोरांना मराठी माध्यमात घालू शकेन की नाही आणी चार इंग्रजी वाक्ये नाय आली तर त्यांचेच पोट भरू शकेन की नाही

==> मी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आहे. Happy

'चकलीचे पीठ भिजवताना त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालावे '... या वाक्याचे माझ्यासाठी शब्दशः इंग्रजी किंवा हिंदीत भाषांतर करणार्याचा उचित गौरव करण्यात येईल.

==> मी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आहे>>

अभिमानास्पद बाब. अभिनंदन.
कुजक्या शेर्‍यांकडे दुर्लक्ष करा. Happy

>>>>> धोतरं जाऊन प्यॅण्टी आल्यानं धर्मांतरं झाली नाहीत, <<<<<<
धोतरं जाऊन प्याण्टी घात्लया तरी तुमचे लिन्गबदल होत नाही गग्रेटथिन्करा
पण भाषा बदलल्याने मात्र जीभ, जीभेचे वळण, अन भाषेद्वारे मिळणारे मेन्दूवर होणारे संस्कार असे सगळेच बदलून जाते, म्हणून धर्मही बुडतो.
पादूका जाऊन शूज आले तर धर्म बदलतो की नाही माहित नाही पण घरातल्या देवघरात पादुकांच्या ऐवजी इन्ग्रजान्चे शूज आले तर चाफेकर बन्धु घडतात हे तुम्ही एकतर विसरला आहात किन्वा शिकलाच नसाल, नै का? Wink

>>>> उद्या खुद्द मराठी भाषा विषय इंग्रजीत शिकवायला लागले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. <<<<
अहो उद्या कशाला? कधीपासूनच ही तर्‍हा सुरू आहे जिथे हगारीबिगारी पासून पोट्टे इन्ग्रजीत शिकु लागतात, इन्फ्याक्ट पोराला विन्ग्रजी चान्गले यावे म्हणुन आईबापच पोरग गर्भावस्थेत असतानापासूनच इन्ग्रजी बोलू लागतात.
सरकार कृपेने गेल्याकाही वर्शात यान्ना मराठी शिकणे अनिवार्य झाले आहे, अन अर्थातच त्यान्ना ते इन्ग्रजीतून शिकवले जाते.

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची >>>>>>>> हे म्हणजे स्वताची च स्वता टिमकी वाजवण्यासारखे आहे. ह्याला काही आधार आहे का? प्रत्येकाला च आपली भाषा उत्तम वाटत असते.

जे काळाच्या ओघात टिकते तेच खरे.

>>>> जे काळाच्या ओघात टिकते तेच खरे.<<<<< इतक गुळगुळीत विधान दुसरे नसेल, असो.
विज्ञानाप्रमाणे काळाच्या ओघात केवळ अमिबा हाच एक जन्तु टिकलेला आहे! Wink

चकलीचे पीठ भिजवताना त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालावे >>>

अरे वो चकली का पिठ होता हय ना उसमे ना थोडासा तेल कडक गरम करके डालनेका.
उसको मोहन बोलते हे रे.

गौरव नकोच.
कुमारांचा असो वा झी चा..

हल्ली कोणताही धागा उघडा, पहिल्या पानानंतर कोणाचे कोणाशी कश्यावर वाद चालू असतील हे न बघताही सांगता येते.

+१११ प्रसाद १९७१
जे काळाच्या ओघात टिकते तेच खरे. मुद्दाम कुबड्या लावून, सब्सिडी देऊन, 'अभिजात' म्हणवून घेऊन भाषा टिकेल असे नाही. शिवाय भाषेमध्ये दम असण्यापेक्षा ती बोलणार्‍यांमध्ये दम असायला हवा. इथे दम म्हणजे खळ्ळ खट्याक नव्हे. आज विमानात, एअर पोर्टवर गुजरातीतून उद्घोषणा होतात. विसा साठी गुजरातीतून मुलाखत देण्याची खास सोय आहे. याचे कारण गुजरात्यांकडे असलेली अर्थशक्ती. 'अर्थस्य पुरुषो दासः'. गुजराती लोकांचे काम न भांडता, मोर्चे, आंदोलने, तोडफोड न करता होते. कारण ग्राहक म्हणून सर्वांना ते हवे असतात. आम्ही मराठी लोक मात्र आजच्या व्यापारयुगाची दखल घ्यायलाच तयार नाही. आम्ही अजूनही शिवकाळातच वावरतो आहोत.
इथे मला एक सिद्धांत मांडावासा वाटतो. आपल्या चार वर्णांपैकी ब्रह्मवर्णाचे वर्चस्वयुग कालचक्रानुसार संपले. क्षत्रियवर्चस्वयुगही संपले. (कारण हातघाईची आणि प्रामुख्याने मानवी सहभागाची युद्धे आता लढली जाणार नाहीत.) सध्या वैश्यवर्चस्वयुग आहे, जे आम्ही ओळखलेले नाही. इथे वर्ण म्हणजे जाति अभिप्रेत नाहीत, वृत्ती अभिप्रेत आहे. कमर्शिअलाय्झेशन, ग्लोबलाय्झेशन हे शब्द आम्ही नुसतेच उगाळत असतो. त्यांचा खरा अर्थ आम्ही जाणून घेतलेला नाही. ट्रेड आणि कॉमर्स हे आजचे कळीचे शब्द आहेत. ते आमच्या शब्दकोशात नाहीतच. असो . पुढचे युग कदाचित हाताने काम करणार्‍यांचे असू शकेल. कारण मानवी श्रम आता दुर्मीळ आणि महाग होत आहेत. उत्तम शिंपी, उत्तम प्लंबर, सुतार, गवंडी यांची सध्याच वानवा आहे.
या वरून आठवले. अर्थविषयक उद्योगांमधल्या व्यवहारांसाठी लागणारे खूपसे प्रतिशब्द गुजरातीत प्रचलित आहेत. तसेच सुतारकाम, शिल्पकाम (देवळे उभारणे, मूर्ती घडवणे वगैरे) यामधले शब्दही प्रचलित आहेत. प्रचलित म्हणजे शब्दकोशात नव्हे. ते प्रत्यक्ष वापरात आहेत. कारण या कसबांना तिथे मान आणि मागणी आहे त्यामुळे या कसबी आणि हुन्नरी लोकांच्या भाषेलाही स्वीकृती आहे. पु.ल.देशपांड्यांना 'ओल्ड मॅन अँड द सी' चे 'एका कोळियाने' करताना पारिभाषिक शब्दांविषयी अशीच अडचण निर्माण झाली होती कारण मासे पकडणे ही उपजीविका असलेल्यांचे शब्द प्रमाण मराठीत नव्हतेच. कारण मच्छीमार हा नायक, किंबहुना साहित्यविषय होऊ शकतो हेच मराठीला नवीन होते. नंतर पुढे ग्रामीण आणि दलित वा़ङ्मयाची लाट आली आणि मराठीचे अंगण जरासे विस्तारले.
तेव्हा भाषकांचा जीवनव्यवहार जेवढा व्यापक आणि समावेशक होत जाईल तेवढे भाषेचे अभिव्यक्तिसामर्थ्यही वाढेल.

इब्लिस PowerPoint presentation साठी मराठी शब्द वेगळा कशाला हवा. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असे म्हणायला वापरायला कोणी थांबवलेय का?

आज आपल्याला ज्ञानेश्वरीला तळटीपांमधून समजावून घ्यावे लागते कारण मराठीचे आजचे बदललेले स्वरूप.

मधल्या काळात फारसी भाषेतले अनेकानेक शब्द देखिल आपण उचललेच ना!

मराठी आणि फारसी भाषेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. ह्या वाक्यातील जमीन अस्मान आणि फरक ह्या तीनही शब्दांचे मूळ फारसी भाषेत आहे आणि आजमितीस हे शब्द मराठीत सर्वमान्य व अंगीकारलेले आहेत. तसे आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सारखे इंग्रजीतील शब्द येतील.

काळाच्या ओघात टिकण्यासाठी, प्रवाही, लवचिक व सर्वसमावेशक असावे लागते आणि आपली भाषा / संस्कृती आहेच तशी.... लवचिक, प्रवाही आणि सर्वसमावेशक.

नथीतून तीर मारणे सारख्या म्हणी / वाक्प्रचार आजच्या प्रमाण मराठीत आहेत; आपल्याकडे अजूनही बहुतांश महिला लग्ना-समारंभात नथी घालून मिरवतात. मुळात नथ हा अलंकार आपला नव्हेच. पण परक्याला आपलेसे करून आपल्यामधे सामावून घेण्याची जी अतिविशिष्ट शक्ती आपल्यात जोवर आहे तोवर आपल्या भाषेला संस्कृतीला मरण नाही. मग कोणाला कितीही धास्ती वाटो.

हर्पेन तुमचा मुद्दा छान आहे. पण एखाद्या परक्या भाषेतील शब्दाला आपल्या मरठीत तितकाच सोपा,लवचिक आणि प्रवाही शब्द असेल तर तो ही सहज प्रचलित होतो.
जसं दूरदर्शन,आकशवाणी,विद्युत दाहिनी.
चुभूदेघे.

हर्पेन तुम्ही म्हणताय त्या न्यायाने किमान येत्या शतकात मग सगळ्याच भाषा एक होतील व एकच 'ग्लोबल' भाषा होईल जगभरात. फरक राहीलाच तर सध्या इंग्रजीचे जे भेद आहेत जसे अमेरिकन, ब्रिटन वगैरे पण भाषा एकच.

मग ज्ञानेश्वर विसराच जी.एं च्या कथादेखील परक्या वाटतील. नै का?
देवा, फारच खळबळ माजली डोक्यात.
म्हण्जे मातृभाषा ही बदलत जाणारी असते?
माझी मातृभाषा आणी माझ्या मुलांची मातृभाषा यात थोडातरी फरक असेलच?
ग्लोबलायजेशन्/जागतीककरण इत्यादी रेट्यात ही फरकाची दरी वेगाने रुंदावणार?

पण माझा एक बेसिक प्रश्न आहेच.
ज्या भाषेत मी शिक्षण घेऊ शकत नाही, व्यव्हार करू शकत नाही, निव्वळ चार-दोन गप्पांसाठी व्यक्त होता येतंय किंवा संवाद करता येतोय आणी त्यालाही मर्यादा येऊ लागणारेत ती आउटडेटेड्/कालबाह्य भाषा खरेच टिकेल? की त्या भाषेला खर्‍या अर्थाने 'राजाश्रय' लाभला तर बहरेल?
काय वाटते?

इब्लिस PowerPoint presentation साठी मराठी शब्द वेगळा कशाला हवा. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असे म्हणायला वापरायला कोणी थांबवलेय का?
<<
हर्पेन,
जरा नथीतून तीर मारत होतो. तुम्हाला उमगले नाहीसे दिसते Wink

की त्या भाषेला खर्‍या अर्थाने 'राजाश्रय' लाभला तर बहरेल?
<<
फकीर,
वर हीरा काय म्हणताहेत ते वाचा.
सध्या 'राजे' कोण? तर व्यापारी. ग्लोबल मल्टीनॅशनल्स, कॉर्पोरेशन्स इत्यादी. हे खरे आजकालचे राजे.
यांनी जगण्यातला कोणताच पैलू स्पर्शिल्यावाचून सोडला नाहीये.
सबब, भाषा कोणती टिकणार? वा वाढणार? तर तुमच्याकडील कॉर्पोरेट कल्चरला जी हवी, तीच.
पण, तरीही, मला नाही वाटत की मराठी संपेल वा मरेल.
बदलेल कदाचित. कदाचित काय, बदलते आहेच.
पण संपणार नाहीच, हे नक्की!
म्हाइंभटास आजची मराठी ऐकवली तर येडा होईल की तो. Wink किती बदलली आहे मराठी!

जिथे भाषेच्या अस्तित्वाचाच प्रश्न चालू आहे तिथे शुद्धी अशुद्धीचे काय बोलणार ?
पुर्वी लोकांनी उगाचच भाषा शुद्धीसारख्या गोष्टींसाठी बुद्धी खर्ची घातली. Sad

मराठीला इंग्रजीकडून धोका आहे असं वाटत नाही. इंग्रजी व मराठी coexist होऊ शकतात. पण हिंदीकडून मराठी replace होण्याची शक्यता जास्त वाटते. ते आता झालंच आहे. मुंबईत तुम्ही घराबाहेर पडता. रिक्षावाला, रेल्वेचा तिकिट क्लार्क, दुकानदार, बॅंकेतला क्लार्क मराठी नसतोच बऱ्याच वेळा- म्हणून तुम्ही हिंदीतच सुरुवात करता. ऑफिसात किंवा कॉलेजमध्ये तुमचा जो काही ग्रुप असतो त्यात अगदी सहा मराठी आणि दोन अमराठी मेम्बर्स असं असलं तरी त्या दोन अमराठी मेम्बर्सच्या सोयीसाठी सगळे मराठीजनही हिंदीतच बोलत असतात. चुकून मराठीत कोणी बोललं तर ’हिंदीमे बोलो यार’ ’नो मराठी प्लीज’ वगैरे ऐकवलं जातं. एफएमवर हिंदी गाणी चालू असतात. म्हणजे तुमचा मराठीशी संबंध कुठे येतो तर घरी आल्यावर घरच्यांशी बोलताना आणि स्टार प्रवाह, एबीपी माझा वगैरे बघताना. त्यातही घरी जर अमराठी सदस्य असतील तर घरातही हिंदीच बोललं जातं. म्हणजे घरात अमराठी सून आली तर सासू ’हमारेमे ना फोडणीमेही मेथीके दाणे टाकते है फिर अच्छा चव आता है’ वगैरे सुरु! सूनही विचार करते की हे लोक बोलतात ना हिंदी मग आपण कशाला शिका मराठी! म्हणजे मग तुम्ही आपणहोऊन आंतरजालावर मराठी साईट्सवर जाणार आणि मराठी पुस्तकं-बिस्तकं वाचणार तितकाच संबंध. म्हणजे मराठी तुमची हॉबी झाली- रोजची व्यवहाराची भाषा, गरज नाही.
आणि याचाच पुढे जाऊन विचार म्हणजे आजचे मराठी आईबाप विचार करतात की पोराला जगात वावरण्यासाठी हिंदी-इंग्रजीच लागणार. बिझनेस करणार असेल तर गुजराथी. आयटीत जाणार असेल तर एखादी दक्षिणी भाषा कामी येईल. मराठीचा काय उपयोग? हॉबी म्हणून पुढे त्याला वाटलं तर शिकेल तो. आपण सध्या त्याला हिंदी-इंग्रजीच शिकवू.

अर्थात हे ’असंच’ होतं असं नाही. मराठी भाषेवर प्रेम करणारे अमराठी लोक असतात. रिक्षावाला भैय्या असला तरी हट्टाने त्याच्याशी मराठी बोलणारेही लोक आढळतात. अमेरिकेत पोराने इंग्रजीत प्रश्न विचारला तरी मराठीतच उत्तर देणारे पालक असतात. जपानमधला तरुण संशोधक मराठी संतसाहित्यावर रिसर्च करायला पुण्यात येऊन राहतो आणि तुकारामावर japanese accent वाल्या मराठीत आपले विचार मांडतो. त्यामुळे अपवाद हे आहेतच. पण एकंदरित मराठीची ’utility value' कमी होऊन आता ती एक ऑप्शनल हॉबी होते आहे असं वाटतंय.

वेदिका +१<हवी तेवढी शुन्ये>
नंतर बहुतेक मराठीच्या वाट्याला ही शुन्येच येणार आणि +१ जाणार की काय ? Sad

Pages