'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

<आणि जर स्त्री ची समती असेल तर ती सुटते पण पुरुषाविरुद्द 'अडलट्री'चा गुन्हा दाखल होईल. तिथे पतीची समती होती नव्हती हा मुद्दा गौण आहे.>

चूक. त्या स्त्रीच्या पतीची तक्रार नसल्यानं असा गुन्हा दाखल होणार नाही. त्यामुळे चौघांच्या संमतीनं केलेलं वाईफ स्वॉपिंग हा गुन्हा ठरत नाही Happy

हे फारच अवांतर होतं आहे. वाईफ स्वॉपिंग आणि अ‍ॅडल्टरी यांचा या विषयाशी काडीचा संबंध नाही. त्यामुळे ही चर्चा इतरत्र केल्यास हरकत नाही.

जर वाईफ स्वॉपिंग करणार्‍या कोणाचीच हरकत नसेल, तर तो गुन्हा ठरत नाही. >> नाही हे बरोबर विधान नाहीये. तो गुन्हा आहे, कोणी ते रिपोर्ट करणार नाही म्हणून त्याची चर्चा होणार नाही. पण ते बेकायदेशीर आहे.

वाईफ स्वॉपिंग आणि अ‍ॅडल्टरी यांचा या विषयाशी काडीचा संबंध नाही.>> अवांतर नाही. जर रिपोर्ट होणार नाही, शिक्षा होणार नाही म्हणून समलिंगी लोकांना सहमतीने सम्बन्ध ठेवू द्या कि पण कायदेशीर का करता हे विचारणारा मोठा वर्ग आहे. त्यांना हे कायदेशीर का करायचं त्याचे व्यवस्थित उत्तर अपेक्षित आहे.

वाईफ स्वॉपिंग, पत्नीस क्रूरता आणि अ‍ॅडल्टरी इ इ अनेक भिन्नलिंगी जोड्यांना भेडसावणारे विषय समलिंगी लोकांना भेडसावणार नाहीयेत अस नाहीये. सध्या कायद्याने तिथे लिंगभेदानुसार मार्ग काढलेला आहे. समलिंगी लोकाना नुसते "तुमचे सबंध कायदेशीर, लग्न कायदेशीर" म्हणून सोडून देवून चालणार नाही. सर्व बाजूने विचार हवा.

बापरे , पतीची संमति ..पतीची तक्रार वगैरे शब्द - हिन्दु कायद्यात ऑफिशिअली आहेत ??
डीस्गस्टींग .. सो कॉल्ड महान भारतीय संस्कृति !!

वाईफ स्वॅपिंग ह्या टर्ममध्येच स्त्रीला भोगवस्तू म्हणून नोंदवले गेलेले आहे.

त्यामुळे केवळ 'मला असं वाटतं..' याला काही अर्थ नसतो.<<< हे विधान पटले नाही. एक तर मानवाने आजवर इतिहासात केलेले प्रत्येक कृत्य त्याला स्वतःला वाटले म्हणून केले किंवा ज्याला वाटले त्याच्या जबरदस्तीने केले. थोडक्यात 'कोणाला तरी वाटलेले असणे' हाच प्रत्येक कृत्य, कृती, निर्णय, अपराध, कायदा, अंमलबजावणी ह्या सर्वांचा पाया आहे. आता जर ह्या भौगोलीक प्रदेशातील बहुतांशींना समलैंगीकत्व अनैसर्गीक / धिक्कारास्पद / तिरस्करणीय / अनाकलनीय वाटत असेल तर न्यायालय त्या 'वाटण्याचा' सन्मान करेलच. (उद्या कायदा बदलला व समलिंगींना कायद्याचे पाठबळ मिळाले तरीही इतरांचे हे 'वाटणे' तसेच राहील). 'वाटण्याला' खूप काही, किंबहुना 'बहुतांशी' अर्थ असतो.

समलैंगीकत्व नैसर्गीक आहे ह्या बाजूने मुद्दे नोंदवणारे, लिंक्स देणारे, इतरांच्या बुद्धीबाबत शंका व्यक्त करणारे, ह्या सर्वांचे म्हणणे समजलेले आहे. पण ते ज्यांना पटत नाही त्यांच्या मनावर ते येथे सातत्याने ठसवण्यात काय पॉईंट आहे? ह्यात 'आम्हाला बदलायचेच नाही' असे म्हणणे नसून 'आमचे म्हणणे आमच्यामते नैसर्गीक आहे' इतकेच सांगणे आहे. 'आमच्यामते' आमचे नैसर्गीक असणे हे काहींच्या मते मागास असणे असले तर त्यांना त्यांची प्रगल्भता लखलाभ! एखादी व्यक्ती समलिंगी आहे (हे समजले) म्हणून मी व्यक्तीशः त्या व्यक्तीचा अजिबातच तिटकारा करणार नाही, तिचा अनादर करणार नाही, तिला समानच समजेन, इतके नक्की! पण माझ्या मनात असे येऊच नये की 'ह्या व्यक्तीचे समलिंगी असणे मला एक इन्डिव्हिज्युअल म्हणून आवडत नाही' ही अपेक्षा अत्यंत गैर आहे. म्हणूनच सौ. पालेकरांच्या घरात हे उदाहरण झाल्यानंतर त्यांनी केलेला अभ्यास, त्यांनी त्याबाबत घेतलेली भूमिका हे सर्व प्रकार मला एक स्वतंत्र माणूस म्हणून 'आलीया भोगासी' सारखे रिअ‍ॅक्टिव्ह वाटतात. त्या सर्व प्रयत्नांना, अभ्यासाला दांभिक मुळीच म्हणता येणार नाही कारण त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःचे व इतरांचे मतपरिवर्तन केलेले आहे हे दिसतेच आहे. मात्र ते सगळे ही एक रिअ‍ॅक्शन आहे असे म्हणायला नक्कीच वाव आहे.

समलैंगीकत्व अनैसर्गीक आहे असे मनात येणार्‍यांनी (जे बहुसंख्य आहेत हे अलाहिदा) मनातले विचार नोंदवल्यानंतर अत्यंत इर्रिटेटिंग शैलीने त्यांच्या बुद्धीबाबत शंका घेणे हेच मुळात अनैसर्गीक आहे असे वाटू लागले आहे. अश्यामुळे खरोखरच हे पटले व मतपरिवर्तन झाले की समलैंगीकत्व नैसर्गीकच आहे तरीही येथे वाट्यास आलेली कटूता मनात तशीच राहील व फालतू चर्चा होत राहील.

सहजसोप्या भाषेत शात्रीय मुद्दे नोंदवले जावेत अशी एक विनंती केली होती पण ते बहुधा अवघड असावे किंवा वेळखाऊ असावे. ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यातील काही टर्म्स सामान्यांना समजणार नाहीत व अभ्यासाचा संयम राहणार नाही.

नशीब, ज्या पद्धतीने हे सगळे अनैसर्गीक समजणार्‍यांना हिणवले जात आहे त्याच पद्धतीने त्या बाजूने बोलणार्‍यांना अजून कोणी समलिंगी किंवा उभयलिंगी म्हणालेले नाही.

बापरे , पतीची संमति ..पतीची तक्रार वगैरे शब्द - हिन्दु कायद्यात ऑफिशिअली आहेत ??>> हो कारण भारतीय कायद्यास (आणि जगातील अनेक कायद्यांना) मुक्त विवाह मान्य नाहीत. त्यामुळे स्त्रीने विवाहेतर सम्बन्ध ठेवले तर पतीचे काय म्हणणे होते हे ऐकावे लागते.

वाईफ स्वॉपिंग आणि समलैंगिकता यांचा संबंध कसा नाही, हे स्पष्ट करतो.

मुळातच कलम ३७७ 'अनैसर्गिक लैंगिक संबंध' बेकायदेशीर आहेत, हे सांगतं. त्यामुळे कोणी तक्रार करो वा न करो, गुन्हा दाखल होऊ शकतो.

कलम ४९७ नीट वाचलं, तर तुमच्या लक्षात येईल की, पतीची संमती असेल, तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही.
हा मूळ कायदा - 497. Adultery.-- Whoever has sexual intercourse with a person who is and whom he knows or has reason to believe to be the wife of another man, without the consent or connivance of that man, such sexual intercourse not amounting to the offence of rape, is guilty of the offence of adultery, and shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to five years, or with fine, or with both. In such case the wife shall not be punishable as an abettor.

आंतरजालावर ही माहिती सहज मिळेल.
उदा - http://www.lawyersclubindia.com/articles/Section-497-Adultery-of-the-Ind...

वरच्या लिंकेत स्पष्ट केलेलं आहे की परस्पर संमतीनं केलेलं वाईफ स्वॉपिंग हा गुन्हा ठरत नाही.

वरच्या लिंकेत स्पष्ट केलेलं आहे की परस्पर संमतीनं केलेलं वाईफ स्वॉपिंग हा गुन्हा ठरत नाही. >> चचच, हा त्या जोडप्यासाठी गुन्हा नाहीये पण "वो" (तिसरा माणूस) साठी गुन्हा आहे!!! कुणी तक्रार करेल न करेल हा वेगळा मुद्दा आहे. आणि त्यावरून अनेक लोक म्हणतात कि जस कुणी तक्रार करीत नाही म्हणून "वो" सुटतो, तसेच कुणी तक्रार करीत नाही म्हणून समलिंगी लोकांना परस्पर समतीने सम्बन्ध ठेवू द्या पण ते कायदेशीर करू नका.

सिमन्तिनी,

जर त्या स्त्रीच्या पतीची संमती असेल, तर तिसरी व्यक्ती तक्रार करू शकत नाही.
तुम्हांला विनंती की तुम्ही कृपया कायदा नीट वाचून मगच प्रतिक्रिया द्या. मी वर एक लिंक दिली आहे. आंतरजालावर वकिलांसाठी, कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती उपलब्ध आहे. तुम्ही शहानिशा करू शकता. तुम्ही जो कलम ४९७चा अर्थ सांगत आहात, त्याच्या समर्थनार्थ संदर्भ देऊ शकाल का? Happy

तक्रार करणे वेगळा मुद्दा आहे पण हे कायद्याला मान्य आहे का हा मुद्दा आहे. असो, इथे अनेक वकील आहेत ते आपल्याला सांगतीलच. समलिंगी लोकांचे हक्क आणि त्याबद्दल कायदे हे अशाच भिन्नलिंगी कायद्यांवरून बेतले जातील.

<तक्रार करणे वेगळा मुद्दा आहे पण हे कायद्याला मान्य आहे का हा मुद्दा आहे>

वर कायदा लिहिला आहे. संमती असेल तर गुन्हा नाही, हे त्यात स्पष्ट लिहिलं आहे. संमती असली तरी तो गुन्हा ठरतो, हे कायद्यात लिहिलं असल्यास कृपया संदर्भ द्या. Happy

मी जे सांगतो आहे, ते http://www.mightylaws.in/853/adultery-laws-india इथे अजून सोप्या भाषेत सांगितलं आहे.

तक्रार करणे वेगळा मुद्दा आहे पण हे कायद्याला मान्य आहे का हा मुद्दा आहे<<< कायद्याने मान्य म्हणजे नक्की काय?

१२:१३ पोस्ट करता +१ चिनूक्स.
समजा ह्या २ जोडप्यांमधला एक माणूस "वो" आहे. म्हणजे हा माणूस मुद्दाम वारंवार असे संबंध जोडायला बघ्तो असं असेल आणि बाकी तिन्ही व्यक्तींची संमती असेल तर कायद्याला मान्य नसायचा प्रश्न येत नाही.
फक्त संमती देण्यामागे ह्या "वो" नी कुठल्याशा मार्गाने आणलेला दबाव असेल तर गोष्ट वेगळी आहे. ते सिद्ध करता आली तर गुन्हा दाखल होऊ शकतो.

पती, पत्नी, वो क्रमांक १, वो क्रमांक २ यांची संमती असल्यास गुन्हाच घडत नाही. आणि फक्त पती, पत्नी, वो असले आणि तिघांचीही संमती असली तरीही गुन्हा नाही.
हाही १८६० सालचाच कायदा आहे. हा कायदा स्त्रीवर अन्याय करणारा व पुरुषाच्या बाजूनं अधिक असल्यानं त्यात सुधारणा करावी, अशी मागणी आहे.

१८६०?
फारच जुना कि वो. अवं तवाच जवळपास पैला उठाव झालेला इंग्रज सत्तेविरुध, अन अशा जुन्या ऐतिहासिक काय्द्यात बदल म्हणे कसं शक्य हाय?

कायदेशीर आहे, नैर्सगीक आहे म्हणून एखादी बाब नैतिक ठरवता येत नाही..
इथे सिमान्तीनीने म्हण्टले की त्या स्वतः स्वॅप वगैरे करणार नाही पण इतरांना 'हॅव फन' म्हणणार.
त्या का करणार नाहीत.. याचे कारण त्यांना या गोष्टी 'अनैतिक' वाटतात.. आता स्वॅपिंगसारखी नैर्सगीक व कायदेशीर गोष्ट अनैतिक का वाटावी याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे...

अहो लोटे भाऊ, समाज म्हणून काही नियम असतात कि हो. सगळेच नैसर्गीक म्हणून नाही पाळता येत. उदा. जवळच्या नातेसंबधात शारीरिक संबध वगैरे. आता पहा हे नैसर्गीक आहे पण याच्यामुळे जे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतील त्याला सगळ्या समाजाला भोगावे लागेल.
तुमच्या पैलवानांचे पण हेच म्हणणे आहे पण समलैंगिकतेबाबत. आता ते किती भितीयुक्त वा तकलादू आहे याबाबत बर्‍याच पोष्टी पडल्यात त्यामुळे त्यावर जरा विचार करा की.

आता स्वॅपिंगसारखी नैर्सगीक व कायदेशीर गोष्ट अनैतिक का वाटावी याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे...>>> इथे कसले डोंबल्याचे स्पष्टीकरण मागताय? हे नैसर्गीक आहे तर हो मान्य. पण कायदेशीर असण्याला बरेच जर-तर आहेत. कायदा काय आज आहे उद्या बदलेल. आणी समजा एखादवेळी समाजात जरी हे सर्वसंमत झालेच तरी ते फार वैयक्तीक पातळीवर आहे असे नाही वाटत? दुसर्‍याच्या निवडीच्या अधिकाराबद्दल तुम्ही जाब विचारल्यासारखे कसे काय विचारु शकता?

रच्याकने, कुणाला काय विचारावे हा संस्काराचा भाग असतो. म्हण्जे मॅनर्स बर्र का.

एखादी व्यक्ती समलिंगी आहे (हे समजले) म्हणून मी व्यक्तीशः त्या व्यक्तीचा अजिबातच तिटकारा करणार नाही, तिचा अनादर करणार नाही, तिला समानच समजेन, इतके नक्की! पण माझ्या मनात असे येऊच नये की 'ह्या व्यक्तीचे समलिंगी असणे मला एक इन्डिव्हिज्युअल म्हणून आवडत नाही' ही अपेक्षा अत्यंत गैर आहे.

नेमकं आणि चपखल शब्दात केलेलं विधान, धन्यवाद बेफीकीरजी Happy

एखादी व्यक्ती समलिंगी आहे (हे समजले) म्हणून मी व्यक्तीशः त्या व्यक्तीचा अजिबातच तिटकारा करणार नाही, तिचा अनादर करणार नाही, तिला समानच समजेन, इतके नक्की! पण माझ्या मनात असे येऊच नये की 'ह्या व्यक्तीचे समलिंगी असणे मला एक इन्डिव्हिज्युअल म्हणून आवडत नाही' ही अपेक्षा अत्यंत गैर आहे.

आवडून घ्या असा आग्रह कुणी केला आहे ? एखाद्या व्यक्तीचे वर्तन आवडणे वा ना आवडणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. मग ते नावडणे कितिही अतार्किक असो. आम्हाला आवडून घ्या अशी त्यांची मागणी नसून आम्हाला माणसासरखे वागवा इतकीच आहे.

एखाद्या व्यक्तीचे गे असणे हा त्याच्या आयडेंटीटीचा अविभाज्य भाग असतो. एखाद्या व्यक्तीचे गे असणे न आवडणे म्हणजे एखाद्याचे बुटके असणे न आवडणे, कुरळे केस असणे न आवडणे, डावखुरेपण न आवडणे अशाच प्रकारचे अतार्किक आहे पण तरीही, एखाद्या व्यक्तीचे गे असणे एक इंडिव्हिजुअल म्हणून आवडत नसेल तर त्यात मला वावगे वाटत नाही.

एखाद्या व्यक्तीचे गे असणे एक इंडिव्हिजुअल म्हणून आवडत नसेल तर त्यात मला वावगे वाटत नाही.

आपल्या या मताबद्दल आभार.


आवडून घ्या असा आग्रह कुणी केला आहे ?

या बाबत मला आलेला अनुभव मी माझ्या प्रतिसादात मांडला आहेच. पुनरुक्ती करीत नाही. मात्र असा आग्रह जर होणार नसेल तर माझ्यासाठी तरी हा विषय संपलेला आहे.

आवडुन घ्या असा कुणी आग्रह केलाय का?>>>> आवडले आवडले अशी बोंब मारायचा तरी कुणी आग्रह केलाय का?आपल्यापुरते ठेवा की ... अनेकांना हिडीस वाटणार्या गोष्टींचे प्रदर्शन कशाला?

ज्यांना कोणाला समलैंगिकता चुकिची आहे असे वाटते त्यांच्यासाठी.. पटलं तर घ्या नाहीतर सोडुन द्या..

पुर्वी 'दारु पिणे' चुकिचे मानले जायचे म्हणुन लग्नाआधी 'मुलगा दारु पितो' हे लपवण्याकडे सर्वांचा कल असायचा व लग्नांनंतर मुलीच्या लक्षात येईपर्यंत तिची फसवणुक झालेली असायची. आता दारु पिण्याला 'सोशल ड्रिंकिंग' ह्या नावाने प्रतिष्ठा मिळाल्यावर मुले व मुली स्पष्टपणे आपण 'सोशल ड्रिंकिंग करतो' असे लग्नाआधीच सांगतात व समोरच्या(ची)ला लग्नाआधीच ठरवता येते कि आपण ह्या मुला(ली)शी लग्न करायचे आहे कि नाही. शिवाय 'दारु पिण्या'ला प्रतिष्ठा मिळाली याचा अर्थ सगळे प्यायला लागले असे नाही. असा कितीतरी मोठा तरुणवर्ग आहे जो दारुपासुन जाणिवपूर्वक लांब आहे.

त्याचप्रमाणे समलैंगिकांना समाजाच्या दबावाखाली भिन्नलिंगियांशी लग्न करावे लागले नाही तर कितीतरी भिन्नलिंगी मुलामुलींची फसवणुक होण्याचे टळेल. एखाद्या मुलाने लग्नाआधीच उघड केले कि तो समलैंगिक आहे तर तुमच्या मुलीचा हात त्याच्या हातात द्यायचा कि नाही हे तुम्हाला आधीच ठरवता येईल. त्यासाठी (त्याने/तिने हे लग्नाआधी स्पष्ट करावे यासाठी) त्या समलैंगिकाला आपले सेक्शुअल ओरीएंटेशन उघड झाल्यावर आपल्यावर टिका होणार नाही/ समाजात आपली किंवा आपल्या कुटुंबियांची छिथु होणार नाही इतक्या शाश्वतीची गरज नक्की लागेल.

ठळक टिपा:

१. मी 'दारु पिणे' हे फक्त उदाहरण म्हणुन घेतले आहे. 'दारु पिणे' आणि 'समलैंगिक असणे' ह्या दोन्ही संपूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत याची मला पूर्ण जाणिव आहे.

२. 'दारु पिणे चांगले कि वाईट' हा या बाफचा विषय नाही. तस्मात.. माझ्या पोस्टमधले केवळ दारु पिणे हे उदाहरण घेउन कुणी भुई धोपटत बसु नये.

३. 'हनिमुन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' या चित्रपटात त्या समलैंगिकाच्या बायकोची फरफट अगदी बघवत नाही. त्यामुळे वरचे लॉजिक सुचले.

४. मी समलैंगिकतेला विरोध अथवा पाठिंबा काहीही करत नाही. आयुष्यात एकाही समलैंगिकाला ओळखत नसल्याने व या विषयावरील ज्ञान अतीशय तोकडे असल्याने माझी याबाबतची भुमिका माझी मलाच स्पष्ट व्हायची आहे. यासाठी इथल्या चर्चेतल्या दोन्ही बाजु काळजीपुर्वक वाचते आहे.

५. असे असले तरी मला कोणत्याही सर्वसामान्य माणसाला (मग तो समलिंगी/ भिन्नलिंगी/ तृतीयपंथी कोणीही असेना) पोलिसांनी कायद्याचा वापर करुन उपद्रव देणे अतीशय क्लेशदायक वाटते.

६. प्रत्यक्षात कोणत्याही समलैंगिक माणसाशी ओळख झाल्यास त्याच्या सेक्शुअल ओरिंएंटेशनचा माझ्या त्याच्याशी वागण्यावर कोणताही परिणाम मी होऊ देणार नाही आणि कोणालाही त्याच्या सेक्शुअल ओरिंएंटेशनवरुन त्याची खिल्ली उडवु देणार नाही.

७. जवळच्या नात्यात (मुले, बहिण/भाऊ इ.) कोणी समलैंगिक असले/ आहे असे लक्षात आले तर मी त्यांच्या समलैंगिकतेला कसे स्वीकारेन हे माहित नाही पण त्यांना मानसिक्/भावनिक दृष्ट्या एकटे पडु देणार नाही हे अगदी नक्की.

पियू, ठळक टिपा वाचल्या. तरीही हे सांगावेसे वाटते की 'सोशल ड्रिंकिंग' आणि समलैंगिकतेची तुलना ही दिशाभूल करणारी आहे. आपल्या समाजात समलैंगिकता स्वीकारण्यास लोकांना किती कठीण जात आहे त्याची झलक ह्या धाग्यावरही दिसत आहे अशावेळी अशी चुकीची उदाहरणे देणे आपण टाळायला हवे.

१. समलैंगिकतेची तुलना करायचीच असेल तर वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे डावरेपणा वगैरेशी करता येईल.

२. दुसरे म्हणजे दारुचे व्यसन लागलेल्या माणसांचे मानसिक संतुलन ढळते आणि त्यांच्या हातून घातक वर्तन होऊ शकते.
निव्वळ समलैंगिक असण्याने कुणाचे मानसिक संतुलन ढळत नाही किंवा समाजविघातक कृत्य घडत नाहीत.

निव्वळ समलैंगिक असण्याने कुणाचे मानसिक संतुलन ढळत नाही किंवा समाजविघातक कृत्य घडत नाहीत.
<<
अहो,
आय मीन अगो,
मुळात मानसिक संतुलन ढळल्यामुळेच लोक समलैंगिक बनतात, व समलैंगिक असणे हेच मुळात समाजविघातक कृत्य आहे, असे इथल्या दुसर्‍या पार्टीचे मत आहे Wink :दिवे:दिवे:दिवे:दिवे:

बाकी मूळचा पियू यांचा प्रतिसाद आवडला. सेन्सिबल युक्तिवाद आहे.

बापरे मी परत येईपर्यंत ९० च्या वर पोष्टी Uhoh
असो, मी विचारलेल्या एका साध्या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोणीही दिलेले नाही.
दिले असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावे ही विनंती.

जर कोणी समलैंगिक असेल तर ते जन्मजात असलेल्या शारिरिक (हार्मोन्स, इ.) कारणांमुळे आहे की उगाच काहीतरी वेगळेपण हवे असण्याच्या मानसिक विकृतीमुळे आहे हे कळू शकते का ?
जर जन्मजात असलेल्या शारिरिक (हार्मोन्स, इ.) कारणांमुळे असेल तर "समर्थन" करणार्‍या पक्षाच्या अनेक मुद्द्यांना अर्थ आहे, आणि त्यावर विचार केला जावा. कारण या केसेसमधे असे लोक खरोखर हतबल असतात असे मानून चालू.

खरेतर शारिरिक असो की मानसिक हे जे काही "वेगळेपण" आहे त्याला सुधारून "सामान्य" बनविले जाण्यासाठी प्रयत्न करण्याची चर्चा कोणीच का करत नाही देव जाणे.

माझ्या एका कलिगने एक चांगले उदाहरण दिले आज,
तो म्हणाला ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो अशा लोकांना खुप वेळा गोड खाण्याची प्रचंड अनावर इच्छा होत असते. पण म्हणुन त्यांना गोड खाण्याची सूट दिली जात नाही, तर त्यावर उपाय केला जातो.
हा प्रकार देखील तसाच आहे.

गा.पै., लिंबू आणि अन्य काही मोजके आयडी, तुमच्या पेशन्सला शतशः धन्यवाद !

>>जर कोणी समलैंगिक असेल तर ते जन्मजात असलेल्या शारिरिक (हार्मोन्स, इ.) कारणांमुळे आहे की उगाच काहीतरी वेगळेपण हवे असण्याच्या मानसिक विकृतीमुळे आहे हे कळू शकते का ?

समलैंगिक असणे जन्मजातच असते. एखाद्या माणसाचे कुरळे केस किंवा घारे डोळे जन्मजातच असतात, कोणत्याही मानसिक विकृतीमुळे नसते, तसेच हे. कळले ?

>खरेतर शारिरिक असो की मानसिक हे जे काही "वेगळेपण" आहे त्याला सुधारून "सामान्य" बनविले जाण्यासाठी प्रयत्न करण्याची चर्चा कोणीच का करत नाही देव जाणे.

त्या देवानेच त्यांना समलैंगिकता दिलेली आहे असे मानून आपले समाधान करून घेतले तर बरे होईल. मुळात "सामान्य" आणी "वेगळेपण" यांचे तुम्ही ठरवलेले निकषच खरे हा दुराग्रह कशाला? जोपर्यंत ते तुम्हाला त्रास देत नाहीत तोपर्यंत जगू द्या की त्यांना. अगदी स्पष्ट लिहायचे तर अगदी विवाहित विषमलैंगीक जोडपी सुद्ध कधी कधी "वेगळेपण" करतच असतात. ते "सामान्य" नसते. म्हणून प्रत्येक विवाहित जोडप्याच्या बेडरूम मध्ये कॅमेरे बसवणे, ते सारे दिल्लीतून पहाणे आणी जे "वेगळेपण" करतात त्यांना सुधारून "सामान्य" बनवण्याचा प्रयत्न "भारत सरकार" का करत नाही देव जाणे.

>>माझ्या एका कलिगने एक चांगले उदाहरण दिले आज,
तो म्हणाला ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो अशा लोकांना खुप वेळा गोड खाण्याची प्रचंड अनावर इच्छा होत असते. पण म्हणुन त्यांना गोड खाण्याची सूट दिली जात नाही, तर त्यावर उपाय केला जातो.
हा प्रकार देखील तसाच आहे.

तुमचा कलीग बावळट आहे असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. मधुमेह झालेल्या व्यक्तीने प्रमाणाबाहेर साखर खाल्ली तर त्याचे आरोग्य ढासळते आणी इतरही बरीच गुंतगुंत होते. दोन गे गे लोक आपल्या बेडरूमच्या प्रायव्हसीत काय करतात याच्या भोचकपणे चौकशा करणे अणी त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करणे चुकिचे आहे.

चिनुक्स च्या संयमाला सलाम. प्राचीन वाड्मयातील उदाहरणे देऊन आपली संस्कृती किती इन्क्लुजिव्ह होती हे स्पष्ट केल्याबद्दल. ते सोडून व्हिक्टोरियन मोरल्स नाच भारतीय संस्कृती समजणारे लोक पाहिले की मेकॉले जिंकला असे खेदाने म्हणावेसे वाटते.

Pages