कलिंगडाचं झाड... पोटात

Submitted by दाद on 9 December, 2013 - 22:29

"...बी गिळ्ळिस ना?"... ह्या कानापासून त्या कानापर्यंत तोंडावर कलिंगडाची मोठ्ठी फोड लावून माझ्यासारखीच बाहीला तोंड पुसत एखादा वर्षानेच मोठा भाऊ किंवा बहीण डोळे मोठ्ठे करून विचारते.
दुपारच्या ह्यावेळी माझी जबाबदारी त्या मोठ्या भावंडावर आहे.
"... " मी नुस्तीच हो हो अशी हलवलेली मान.

"... वाट... वाट लागली आता. पोटात झाड उगवणार"
कशाचं ते विचारायलाच नको, अजिबातच.

कधीतरी सिताफळ किंवा अनवधानानं सफरचंदाचं बी गिळलेली मी ह्यावेळी जाम म्हणजे जाम टरकते. पोटातून सिताफळ, सफरचंद वगैरे माफक आकाराच्या फळांची झाडं ... ठीकय.
पण कलिंगड?

हे असं कितीतरी बाबतींत झालय. तुमचंही झालं असणार. कधी मुद्दाम भीती घातलीये किंवा आमिषही दाखवलय... ह्या मोठ्या म्हणवणार्‍यांनी.

काय तर म्हणे... गाजर खाल्लं की रात्रीचं दिसतं.

तुम्हाला आठवतय असलं काय काय?.. मोठ्यांनीच नाही... पण मित्रं-मैत्रिणींमधले प्रवाद... समजुती ज्या मोठं होता होता गैर ठरतात.

आता... सॅन्टाक्लॉजबद्दल नाही हं बोलायचं वेड्यासारखं. ख्रिसमसला प्रेझेंट हवय का नाही? वेडेपणा केलेल्यांना नाही मिळत सॅन्टाकडून कायपणच.

हं तर... सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

चहा प्यायले तर काळी होईन... >> +१
मावशी भिती घालायची मला लहान असताना..
अजुनही कोणी थोडं कमी दुध घातला की लगेच म्हणते मी..

आजी सिताफळ खायची तेव्हा बिया मुद्दाम तोंडातुन टाकायची.. लहान भाउ बघायचा नि सगळ्यांना सांगायचा ए बघा, तिला काय झालय.. किती बिय्या टाकतेय!

घार वरुन गेली की पत्र मिळतं.. म्हणजे नखावर छोटुसा पांढरा ठिपका येतो

कधी सणासुदीला आम्हा मोठ्यांबरोबर चिरंजिवांना सुद्धा पान खायचे असते, तेव्हा त्याला सांगावे लागते की लहान मुलांनी पान खाल्ले की बोबडे होते. Wink

<<पपईच्या बिया ओलांडल्या की रातांधळेपणा येतो<< +१
पपईच्या बिया, अंड्याची टरफलं ओलांडली की रातांधळेपणा येतो असं आमच्याही लहानपणी सांगितलं जायचं.

मेथीची बी (मेथा) विषारी असतो...
च्युईंग गम खुप खाल्ल तर कँसर होतो....
टि.व्ही ची काच फुटेल नीट खेळा.. ती काच १ लाख रु. ला मिळते...

अजून एक... ज्यांचा मामा आहे त्यांनी चप्पल उलटी टाकायची नसते...
माझी आत्येबहीण आली की मी धावून धावून तिची चप्पल सरळ करायचे... कायतरी अचरट समजूत... श्शी.
ते शनिवारी केस, नखं कापायची नाहीत तर भल्ताच वैताग होता.
पाय घसटत चाललं की दारिद्र्य येतं...
देवा... कठीणय.

खुर्चीवर बसतो तेव्हा पाय हालवत बसायचं नाही (मुलींनी तरी).
जेवतांना घास तोंडात टाकतो तेव्हा तर्जनी उंच करुन टाकायचा नाही. माझ्या (आईच्या आईने) आज्जीने तिच्या नातवाला खाडकन उलथनं मारुन फेकलं होतं एकदा. Sad
मुलींनी कढई खरडुन त्यातच खाऊ नये, नाहीतर सासरकडुन 'पोवाडे' ऐकायला येतात.
कुत्र्या-मांजरांवर उष्ट पाणी टाकु नये नाहीतर अंगावर मस होतो.
जेवण वाढतांना कुणी पोळी देत असेल तर घेणार्याने ती दोन बोटात कात्रीत पकडल्यासारखी धरायची नाही.
काय काय समजुती... Sad

वटवाघुळ बघितले की चांगले नसते.. काहितरी अशुभ घटना घडणार Uhoh
बिचारे वटवाघुळ Happy
टिटवी ओरडली की कोणीतरी मरणार हा तर फार मोठा गैरसमज होता... टिटवी ओरडली की मग भिती वाटायची कोणीतरी मरणार आता
खरेच काय काय समजुती.. Sad

मीठ हातात द्यायच नाही.
उंब-यात बसायच, पाया पडायच नाही.
झाडू उभा ठेवायचा नाही.
रात्री झाडायच नाही, कोणी बाहेरगावी गेल्यावर लगेच झाडायच नाही.
जिला भाऊ आहे तिने सोमवारी डोक्यावरून नहायच नाही.
पोळ्या झाल्यावर तवा आपणच उतरून ठेवायचा - नाहीतर म्हणे मुलीला सासरी त्रास होतो. (काहीही)

अजूनही काय काय.. मी तर काहीच मानत नाही - पाळत नाही..

अंधश्र ध्देच्या एका धाग्यावर अस खूप काही येऊन गेलय ना?

हा धागा मला वाटत दादने लहानपणीच्या मजेदार समजुतींसाठी काढला असावा.

हा धागा मला वाटत दादने लहानपणीच्या मजेदार समजुतींसाठी काढला असावा >>>> + १
ते चहा बद्दल अगदी अगदी! मी अजून पण मोकळेपणी चहा पिऊ शकत नाही.... म्हणजे मला आवडतच नाही! Wink
आणि अजून एक, भिजवलेल्या मेंदीमधे चिमणीची 'शी' घातली, की ती खूप रंगते हातावर! Lol (हे अर्थात 'खरर्रं प्रेम असेल तर मेंदी रंगते' च्या आधीचं वय!! Wink )

मीठ हातात द्यायच नाही.
उंब-यात बसायच, पाया पडायच नाही.
झाडू उभा ठेवायचा नाही.
रात्री झाडायच नाही, कोणी बाहेरगावी गेल्यावर लगेच झाडायच नाही.
जिला भाऊ आहे तिने सोमवारी डोक्यावरून नहायच नाही.>>>+++११११ हेच एकत आलो आहोत लहानपणा पासुन..

मेंदी बाबतीत +१ >> हो हो.. अगदी.. Rofl

आणि ते कुणी बुरखा घातलेले दिसले की दुसर्‍याच्या डोक्यात टपली मारुन "झ्ब्बु" म्हणायचे..

कबुतर दिसले की प्लाईंग कीस ... हे राम.. काय पागल होतो आपण Uhoh

१. सप्तमीच्या दिवशी, पांढरे कपडे घालून मायबोलीवर वाहत्या पानावर कुणाशी वाद घातला, तर अ‍ॅडमीन तुमचा आयडी बॅन करतात म्हणे !

२. गुरुवारी रात्री ७ नंतर मायबोलीच्या गझल ग्रूपमधे तुम्ही हजल लिहिलीत तर गुगल तुम्हाला अनुल्लेखाने मारते. सर्च इंजिनमधे कितीही शोधले तर जाम सापडत नाही.

माझ्यावर विश्वास नाही? गुगल.कॉम वर जाऊन हे खाली लिहिलेले शब्द टाईप करून पहा. टाईप करा कॉपी+पेस्ट नाही,
do a barrel roll

१. लिंबू उभा कापला की वाईट

२. नारळ उभा फुटला तर देवाला मान्य होत नाही

३. भूतबाधेवर केलेला नैवेद्य शेतात सोडून येताना परतेपर्यंत बोलायचे नाही तसेमागे वळून पहायचे नाही.

४. गणेशचतुर्थीला चुकून चंद्र बघितलाच तर शेजार्‍याच्या घरावर दगड मारायचे म्हणजे त्यांनी शिव्या दिल्या की आपण केलेले पाप त्यांच्याकडे ट्रान्स्फर Rofl

आठवेल तसे अजून लिहितो.

१) गाढव ओरडतांनाचा आवाज ऐकु आला की आपल्याच डोक्यावर टपल्या मारायच्या.
२) अग्निशमन दलाच्या लाल गाडीचा आवाज आला की डोक्यावर हात ठेवायचा. गोड खाऊ मिळतो म्हणे. Uhoh
३) दात पडला की शेजार्‍यांच्या घरावर टाकायचा.

हे यात बसेल की नाही माहित नाही. बालपणीच्या गोष्टींसारखं होतय.
३) आकाशात बगळ्यांची माळ दिसली की हाताची नखं एकमेकांवर घासुन 'बगळ्या बगळ्या कवडी दे' म्हणायचं. काही वेळेस नखांवर पांढर्या आडव्या रेषा दिसतात/ असतात. मग त्या एकमेकींना दाखवुन म्हणायचं, " बघ, मला बगळ्याने कवडी दिली"! Proud
४) एक लहानसं जमिनीलगत वाढणारं झुडुप असतं. त्याचं छोटसच फुल अंगठा व तर्जनीच्या नखांमधे पकडुन म्हणायचं, " रावणा, तु सितेला का पळुन नेलस, तुझं मुंडकच तोडीन"! असं म्हणुन नखाने ते फुल त्वेषाने खुडायचं. Rofl

आर्या, ३ आणि ४ >>> हो ! हो!! Happy
कोणी शपथ घातली, आणि चुकून-माकून मोडलीच तर नस्ती आफत! म्हणून मग लगेच "सुटली म्हण, सुटली म्हण" करत काकुळतीला यायचं!

आमच्याकडे लहानपणी बाबा सांगायचे दुध-भात आणि सोबत कांदा खाल्ला की मिश्या येतात Proud
आणि वर सांगायचे बघ मला कित्ती मोठ्या मिशा आहेत की नाही Proud

१) रात्री लोणचं कोणाला द्यायचं नाही.

२) उंबर्‍यावर शिंकलं की देवी अंगात येते.

३) नवरा गावाला जाणार असेल त्या दिवशी केस धुवायचे नाहीत. Uhoh

४) सोमवार शनिवार नखे केस कापायचे नाहीत.

५) पानात उष्टे टाकले की रात्री देव कान कापून नेतो.

६) घरात शिट्टी वाजवायची नाही.

हो ना ओवे! Lol
आणि ते 'तुझ्या गळ्याशप्पथ म्हणणं', दुसर्याच्या गळ्याला चिमटी घेउन. Proud

खेळतांना कुणी रुसलं की तिच्यासमोर सगळ्या जणी हाताची मुठ करुन उभ्या रहायच्या. (ही खरं म्हणजे पुढे होणार्‍या भांडणाची 'नांदी' असायची) आणि 'माझी मुठ उघड, माझी मूठ उघड' म्हणणार. मग जिची त्या रुसणारीणीने मुठ उघडली, तिच्यावर तिचा काही राग नाहीये असं समजायचं. जिची नाही उघडली, ती बिचारी विचार करत रहायची की मी हिला काय बोलले? माकाचु? ... मग रुसणारीचा बांध फुटणार आणि पुढची धुमशान!! Rofl
हॉय्लॉ... हे अगदीच लहानपणीच्या किश्श्यांसारखं झालं. Uhoh
या धाग्याशी रिलीव्हंट नसेल तर उडवुन टाकते.

आर्या, ३ व ४ >>> आम्हीही... बगळ्या बगळ्या कवडी दे, पाची बोटे रंगू दे अस गाण म्हणायच.. कुठेतरी कवडी दिसायचीच.. Happy
१) रात्री लोणचं कोणाला द्यायचं नाही. >> दही पण म्हणे..
६) घरात शिट्टी वाजवायची नाही. >> विशेषतः संध्याकाळी ..

अंधश्रद्धेबद्दल इथे लिहू नका रे
जे खोटं असतं पण फक्त लहान मुलांनाच सांगितलं जातं ते लिहा Happy

आमच्याकडे लहान मुलांना सांगतात की सारखी कात्री वापरली की आपल्या बोटात मोठ्ठी फट निर्माण होते Proud

Pages