गव्हाची खीर

Submitted by तृप्ती आवटी on 1 November, 2013 - 14:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी दलिया (ब्रोकन व्हीट), एक ते दीड वाटी कोल्हापुरी (कुठलाही काळा गूळ, पिवळा नको) गूळ चिरुन, एक वाटी नारळाचा चव, एक-दोन चमचे तूप, एक कॅन (१४ औंस) नारळाचे दूध, अर्धे जायफळ, एक मेझरिंग कप दूध, पाव वाटी बदामाचे काप किंवा काजूचे तुकडे.

क्रमवार पाककृती: 

आवडत असल्यास २ चमचे दुधात किंवा नारळाच्या दुधात २-३ केशराच्या काड्या घालून ठेवाव्यात. दलिया स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावा. मी कुकरामध्ये शिजवते. एका कढईत तूप जरासे गरम करून त्यात बदामाचे काप/काजूचे तुकडे आणि नारळाचा चव मंद आचेवर परतून घ्यावा. नारळाचा खमंग वास दरवळला की त्यात शिजवलेला दलिया घालावा. हे सगळे एकत्र परतून घ्यावे. शिजलेला दलिया मोकळा झाला पाहिजे. त्यात चिरलेला गूळ आणि पाव पेक्षा जास्त आणि अर्ध्याला जरा कमी इतके जायफळ किसून घालावे. अधून-मधून हालवत राहावे. गूळ वितळून दलियाचा रंग बदलला (रटरट आवाज येतो) की नारळाचे दूध, केशर घालावे आणि नीट मिसळून एक उकळी काढावी. आच बंद करून झाकून ठेवावे. खीर वाढायच्या जरा आधी १ कप दूध चांगले गरम करून खिरीत घालावे आणि पुन्हा एक उकळी आणावी. खीर कितपत घट्ट झालीये/हवीये बघून दुधाचे प्रमाण कमी-जास्त करावे.

वाढणी/प्रमाण: 
४-५ मोठी माणसं
अधिक टिपा: 

१. या प्रमाणात मॉडरेट गोड खीर होते. जास्त गोड हवी असल्यास अर्थातच गुळाचं प्रमाण वाढवा.
२. नारळ आणि दलिया परतून घेतल्याने आणि गुळाला चांगला चटका बसल्याने एकदम खमंग चव येते.
३. याच पद्धतीने तांदळाची खीर सुद्धा छान होते आणि राईस पुडिंग म्हणून खपवता येते. राईस पुडिंग मी कधी केलं नाही. पण टिपांमध्ये असं काही तरी लिहिलं की पाककृतीला वजन येतं.
४. मला जेवायला बोलावल्यास शक्यतो याच रेसिपीने खीर करावी. खीर झाल्यावर सुद्धा अधून-मधून ढवळत राहावी म्हणजे साय येणार नाही. खीर चांगली झाल्यास खिरीसोबत खाण्यास फक्त सुरळीच्या वड्या द्याव्यात. बाकी का-ही नको.

माहितीचा स्रोत: 
आईची मूळ कृती आणि मायबोलीवर मिळालेले सल्ले
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कृतीने मस्त होते खीर. मागे तु विपुत लिहीली होतीस तीच ना रेस्पी?
फक्त कोल्हापूरी गुळाला इथे उपलब्ध असा पर्याय सांग.

मस्त रेसिपी.

ज्ञाती, डार्क ब्राउन शुगर. चवही खमंग येते आणि विरघळतेही सहज. शिवाय खीर फाटाबिटायची भीती नाही.

तुला जेवायला बोलवलं तर दही वडे आणि श्रीखंड हा मेन्यु माझ्या डोक्यात केव्हापासून पक्का आहे तेव्हा तोच करणार.
आमच्याकडे गव्हाची, तांदळाची खीर अजिबात आवडत नाही तेव्हा करून बघेन असं म्हणवत नाही पण रेसिपी चांगली वाटतेय.

डार्क ब्राउन शुगर>>> घालून बघ ज्ञाती. गूळ कोल्हापुरीच हवा असं नाही पण काळा/डार्क ब्राउन गूळ हवा. चिकीचा असतो तसा पिवळा नको.

डिज्जे, केली की फोटो टाकेन नक्की.

सायो, मी तुझ्याकडे येताना एक चांगली बोचकारी ढमा मांजर घेऊन येणार आहे (ती खाईल वडे आणि श्रीखंड) Proud

छान आहे रेसिपी.

मी इतर कुठलीही खीर खात नाही, त्यातल्या त्यात फक्त ही थोडीशी खाऊ शकते. Happy

मस्तच, सिंडरेला, काळा किंवा dark brown म्हणजे सेंद्रिय गुळना? केमिकल विरहित असतो. केमिकल घातलेला गुळ पिवळा असतो.