अभिनंदन (शतशब्दकथा)

Submitted by मुग्धमानसी on 6 September, 2013 - 07:15

"अभिनंदन... मुलगी झाली!"
अन् ती आली माझ्या हातांत.

हवेत हात हलवत ती बोलावत होती जणू मला... नव्हे... माझ्यातल्या कुणालातरी.

चेहरा हळूवार नेला तिच्या जवळ आणि तिचा पहिला स्पर्श झाला! सर्वांग भारून गेलं! कुरळ्या ओलेत्या जावळात... चुळबुळणार्‍या गुलाबी तळव्यांत... मी शोधू लागलो मलाच.

अचानक पाहिलं तिनं थेट माझ्या डोळ्यांत. आणि खुदकन हसली. त्याक्षणी आमची पहिली ओळख पटली. माझ्यातला बाप अखेर तिनं शोधलाच!

"माझ्याकडे बघू बाळ...." कुणीतरी माझ्या हातून तिला घेऊ लागलं. मी चिडलो. ही माझी... माझ्यापासून दूर नेऊ देणार नाही हिला....

पण समोर सासरे उभे होते. बाळ निमुटपणे त्यांच्या सुरकुतल्या हातांत दिलं.

कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’.... आज आभाळापेक्षा मोठा वाटू लागला होता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कथा!

(अवांतर - शतशब्दकथा हा प्रकारही फार आवडत आहे. याचे कारण म्हणजे पटकन वाचून होत असल्यामुळे आपोआपच त्यात शेवटी एक ट्विस्ट वगैरे अनुभवायला मिळतो) Happy

मस्त Happy

छान!

मुग्धमानसी, ह्जाही क्थाप्रकार समर्थपणे पेलला आहेस... अप्रतिमच!!! नवजात बालकाच्या नवजात बाबाच्या सगळ्या भावना अलवारपणे पोहोचल्या.
कालपर्यंतचा ’बायकोचा बाप’.... आज आभाळापेक्षा मोठा वाटू लागला होता!>> खुप्पच गोड Happy

Pages