मोदगम

Submitted by नंदिनी on 12 August, 2013 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मागच्या वर्षी तमिळनाडूमधे आलो तेव्हा साहजिकच सर्व काही नवीन नवीन वाटायचं. बाजारात फिरताना वस्तूंची नावं समजायची नाहीत, कुणी काही बोललेलं समजायचं नाही. एक तर आम्ही राह्त असलेला भाग खेड्याकडचा, त्यामुळे हिंदी- इंग्लिश वापरणारे कमीच. तेव्हाच मला लागलेला शोध की इथे मी कानडी-तूळू बोलले तर इथल्या लोकांना थोडं तरी समजतं. मग एक छंदच लागली, कानडी आणी तमिळ्मधले समान शब्द शोधायचा आणी लक्षात ठेवायचे. हळूहळू तमिळ बर्‍यापैकी बोलता यायला लागलं आणि हा भाग अगदीच अनोळखी राहिला नाही.

आम्ही इथे आल्यावर पहिलाच मोठा सण आला तो गणपतीचा. आता गणपती म्ह्टल्यावर कोकणी माणसाला काय इमोशनल भरतं येतं ते सांगायला नकोच. सतिशला पण घरची प्रचंड आठवण येत होती. गणपतीच्या दिवशी सकाळी जवळच असलेल्या एका देवळात आम्ही गेलो. शेजारणीने या देवळाचं नाव काय भलतंच सांगितलं होतं. देवळात गेलो तर ते आपल्या बाप्पाचंच देऊळ. इकडे गणपतीला "पिळ्ळ्यार" म्हणतात आणि तो कार्तिकेयचा मोठा भाऊ आहे हे मला खूप नंतर समजलं. पण त्या दिवशी समोर गणपती बाप्पा दिसल्यावर जो काय आनंद झाला तो अवर्णनीय.

गणेश चतुर्थी निमित्त देवळामधे मोठी पूजा केलेली होती आणि तिथे आम्हाला प्रसाद म्हणून मोदक दिले. उकडीचे मोदकच, पण कळ्या वगैरे नाहीत. सरळ त्रिकोणी आकार दिलेले. आतमधे गूळखोबर्‍याच्या सारणाऐवजी हरभर्‍या डाळीचं पुरण. मी लगोलग प्रसाद देणार्‍याला "हुरणा हाक्कीद अदा?" असं कानडीत विचारलं. तर म्हणाला "इल्लै, पुरणा" त्या पदार्थाचे नाव पुरणा कोळकट्टै.

मी चाटच. कानडीमधे पुरणाला हुरणा म्हणतात (आणि पुरनपोळीला हुरणाहोळगी) तर तमिळमधे त्याच हुरणाला पुरणा म्हणतात. जम्माडी जंमत. नंतर मग अशाच मराठी-तमिळ शब्दांचा शोध घ्यायची पण सुरूवात झालीच माझी. (अद्याप चालूच आहे म्हणा)

तर अशाच एका गमतीमधे मिळालेले हे मोदगम. म्हणजेच मोदक. शेजारणीने एकदा कसल्यातरी पूजेनिमित्त आणून दिले होते. चवीला आवडले म्हणून नेटवर थोडाफार सर्च करून, शेजारणीला रेसिपी विचारून मी काल नागपंचमीला करून पाहिले.

आपल्यासारखे सारण भरून करायचे अन्सल्याने करायला सोपे सुटसुटीत आणि लवकर होणारे आहेत.
लागणारे जिन्नस पण कमी आहेत.
१.तांदळाचा रवा १ वाटी. (मी विकतचा रवा वापरला, शक्य असल्यास घरीच तांदूळ धुवून सुकवून रवा काढा).
२. गूळ - रव्याच्या दुप्पट. (बारीक चिरून किंवा मायक्रोवेव्हमधे पातळ करून घ्या.)
३. मूग डाळ पाव वाटी.
४. ओले खोबरे पाव वाटी.
५. दालचिनी पावडर (अथवा इतर सुका मेवा आवडीनुसार).
६. तूप.

क्रमवार पाककृती: 

१. तांदळाचा रवा तुपावर चांगला भाजून घ्या.
२. काढईमधे सहा ते सात वाट्या पाणी घ्या आणि त्यात गूळ घाला. गूळ चांगला उकळल्यावर गाळणीने ते पाणी गाळून घ्या. (ही स्टेप मी खाली लिंक दिली आहे त्या ब्लॉगवरची.) यामुळे गुळामधील घाण निघून जाते.
३. परत हे पाणी गॅसवर ठेवून त्यामधे मूग डाळ आणि तांदळाचा रवा घाला. वाटलंच तर थोडं तूप घाला.
४. गॅस मंद आचेवर ठेवून १० मिनिटे घट्ट झाकण ठेवून हे मिश्रण शिजू द्या. खाली लागू नये म्हणून आधीच जाड बुडाचे भांडे घ्या. (बरोबर!! इथवर आल्यावरच ही टिप माझ्यापण लक्षात आली. Happy )
५. १० मिनिटांनी झाकण काढून सर्व मिश्रण हाटवून घ्या. त्यामधे ओले खोबरे, वेलदोडा पावडर आणि इतर सुकामेवा बारीक कापून घाला.
६. मिश्रण गॅसवरून उतरवून व्यवस्थित मिक्स करा. थोडे थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यामधून त्याचे मोदक तयार करा. (वेळ नसेल तर सरळ गोल गोळे करा)
७. इडलीपात्रात १० मिनिटे वाफवून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
बनवाल तसे.
माहितीचा स्रोत: 
http://solaiachiskitchen.blogspot.in/2010/01/modagam.html + वनिता + इंटरनेट+ सेल्व्ही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची..मेराभी यहीच सवाल है.. मेरेको लगा स्टेप ६ के बाद सीधा उचलनेका ओर खानेका Proud
नंदुतै.. मोदकांपेक्षा सोपी आहे हं रेसिपी

मूगडाळ आणि रवा दोन्ही पण कच्चट लागतात, मी काल खाऊन पाहिले होते. Happy शिवाय ते मिश्रण बर्यापैकी भुसभुशीत असतं. वाफवल्यावर त्याला आकार वगैरे येतो.

मोदकापेक्षा सोपी रेसिपी आहे म्हणूनच आवडली मलापण. ही रेसिपी थोडीशी खांडवीसारखीच आहे, हे मात्र खरे.

>> कार्तिकेयचा मोठा भाऊ आहे हे मला खूप नंतर समजलं.<<
खरं की काय?

इतक्या गोष्टी आहेत की पुराणात... गणपती व कार्तिकेयाच्या प्रदिक्षणा रेस वगैरे...

Some Sanskrit epics and puranas indicate that he was the elder son of Shiva. ... Also, Kartikeya is seen helping Shiva fight the newborn Ganesha, Shiva's other ... विकि

हे असे दक्षिणेत नेहमी होते. विनायगन पन म्ह्णतात. एकदा पाँडेचेरीत गाव साइडला भटकताना शिवमंदिर दिसले तर रिक्षाचालकाने यू नो सिवन सिवन हिंदू गॉड असे हेल्प्फुली सांगितले. मी त्याला फटकारणार होते कि
मेल्या, पांचाळेश्व रापाशी बालपण गेले माझे, बालराजे श्व रापाशी काम करते. तू काय मला नवे सांगतोस. ! पण चूप बसले. हा मला काय फ्रेंच टूरिस्ट सम जला असावा असा विचार केल्हा. पाँडे ला मोठे गणे श मंदिर आहे.

रेशीपी मस्त आहे.

कार्तिकेयचा मोठा भाऊ आहे हे मला खूप नंतर समजलं.<<
खरं की काय?
<<< नीट वाचा पूर्ण वाक्य.

इकडे गणपतीला "पिळ्ळ्यार" म्हणतात आणि तो कार्तिकेयचा मोठा भाऊ आहे हे मला खूप नंतर समजलं. आपल्याकडे गणपती हा कार्तिकेयचा लहान भाऊ मानला जातो. आपल्याकडे स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शनसुद्धा घेत नाहीत, कारण तो ब्रह्मचारी आहे (त्याचे दर्शन घेतल्यास वैधव्य येते अशी समजूत प्रचलित आहे!). इकडे मुद्दामहून अविवाहित स्त्रिया त्याची पूजा करतात.

अमा, हो. इकडे सिवन, अम्मन (देवी), विनायगन, मुरूगन हे देव कायम दिसतात. Happy

मोठा भाउ आहे नंतर समजले हेच तर म्हणतेय... नीट वाचूनच लिहिलेय तरी तुम्ही परत तेच काय सांगताय. तुम्हाला नीत समजले नाही माझे वाक्य वाटतं.

रच्याकने, आम्ही(आमच्याकडे तरी) कार्तिकेयचे दर्शन घेतो कार्तिक पौर्णिमेला... अगदी आवर्जून.

मूगडाळ आणि रवा दोन्ही पण कच्चट लागतात >> बरोबर.. गुळामध्ये / गुळ घातल्यानंतर कोणताही पदार्थ पूर्णपणे शिजत नाही कच्चटच राहतो. म्हणून वाफवूनही घेत असतील मोदगम. आणि गु़ळाच्या पाण्यात घातल्यामुळे प्रत्येक कणाला सारखा गोडवा येत असावा. ही आयडीया भारीये.

रेसिपी आवडली नंदिनी Happy