बाबाच्या राज्यात

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

Pitrudin2013_0.jpg

आपण लहान असताना जेव्हा आई बाहेर जायची आणि थोडावेळ घरावर आपलं आणि बाबांचं राज्य असायचं तेव्हा काय धमाल यायची आठवतंय? कधी घरीच मनसोक्त खेळणं, कधी बाबांच्या हातचे मस्त पदार्थ खाणं, कधी बाहेर जाऊन भेळ पुरी नाही तर आइसक्रीमवर ताव मारणं! अगदी वाट पाहायचो आपण त्या बाबांबरोबरच्या मजेची!

आता आपल्यातले बरेच लोक स्वतः बाबाच्या भूमिकेत गेलेत. हे बाबा-बच्चे पण आई नसताना एकत्र राहत असतील. कधी एक-दोन दिवस, तर कधी चक्क एखादा आठवडा किंवा महिनाही! कसे असतात हे दिवस? ही जबाबदारी उचलताना मुलांची रोजची कामं, अभ्यास, जेवण वेळेवर होतं की क्वचित धांदल उडते? मुलांसोबत घरात आरामात वेळ घालवणं आवडतं की बाहेर जाऊन मस्ती, भटकंती आवडते? मुलांना काही खेळाच्या कॢप्त्या सांगायचं ठरतं की त्यांचंच एखादं 'सीक्रेट' बोलता बोलता काढून घेतलं जातं? एक मात्र नक्की की बाबा मुलांना काही नवीन शिकवत असो किंवा मुलांसोबत स्वतःच एखादी नवी गोष्ट शिकत असो, बाबा आणि मुलं मिळून त्यांचं एक वेगळं विश्व तयार करत असतात. एकमेकांना आयुष्यभर आनंद देतील, समृद्ध करतील अश्या आठवणी निर्माण करत असतात. या गोड-कडू आठवणी आज पितृदिनाच्या निमित्ताने इथे लिहून या पिता-पुत्र/पुत्री नात्याची वीण आणखी घट्ट करूया का?

कोणत्याही बाबासाठी एक पूर्ण दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आईच्या अनुपस्थितीत मुलांना सांभाळायचा अनुभव कसा असतो, काय शिकवतो, काय देऊन जातो याबद्दल लिहायला पितृदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त कुठला असणार, नाही का?

मायबोलीकर बाबांचे अनुभव ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

बाबाच्या राज्यात... Happy
खरं तर आई गेली तेव्हा मी नुकतंच ७वं वर्ष पुर्ण केलं होतं आणि सईने १०वं. मग ऑगस्ट १९८६ ते मे १९८७ बाबांचं आणि आमचंच राज्य होतं घरावर. आईच्या अनुपस्थितीत त्यांनीच ते ९-१० महिने आमचं संगोपन केलं. वेणी घालण्यापासून, स्वयंपाक करेपर्यंत सर्व काही बाबाच करत. तेव्हाचा तो काळ आम्हा सर्वांसाठीच कठिण होता. बाबांकडं बघून बघून सई लहानपणीच मोठी झाली/जबाबदार झाली. कधी गोड तर कधी कटू क्षण काढले, आईच्या आठवणीत. बाबांच्या एकटेपणात. पण त्यांच्या परिने त्यांनी आम्ही खूप लहान होतो तरी आईची कमतरता भासू दिली नाही. आमच्या दोघींचेही केस मोठे होते (कमरेच्या आसपास) एखाद्या वडलांनी ते कापून टाकले असते. पण आई गेल्यावरही त्यांनी तिची मोठ्या केसाची आवड जपली. वाकडे तिकडे भांग्/पेड घालून का असेना... जमवलं सगळं. पण केस कापले नाहीत.
आई जितक्या प्रेमाने मला तुपाची बेरी-साखर आणि साय साखर द्यायची त्याच प्रेमाने त्यांनी ते कंटिन्यू केलं.
बरंच काही आठवत नाही.. Sad

आमच्याकडे बाबांचे राज्य असे कधी घडल्याचे आठवत नाही कारण आई नोकरी करत नसे. आई आणि शेजारच्या काकू यांच्यामध्ये खूप सख्य होते. आता काकू पुलगांवजवळ रहातात पण दोघींचे फोन/भेट सुरुच असते. तर एकमेकींच्या अनुपस्थितीत मुलांची जबाबदारी आपोआपच आई/काकू घ्यायच्या.

पण इथे एकदा 'बाबांचे राज्य' अनुभवयाला मिळाले! ९-१० वर्षांपूर्वी आई-बाबा आणि आई-दादा असे चौघे मेलबर्नला २-३ महिने रहायला आले होते. ते एकमेकांचे व्याही-विहीण असले तरी त्यांच्यातले नाते मैत्रीपूर्ण आहे!
तर एकदा मी जॉबला आणि दोन्ही आया निनादबरोबर एका मोठ्या मार्केटात गेल्या होत्या. आम्ही सगळे घरी येइपर्यंत बाबा आणि दादांनी मस्तपैकी स्वयंपाक करुन ठेवला आणि आम्हां सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला!!!

दक्षिणा, हृद्य आठवण!

आमच्याकडे बाबाच्या राज्यातला काळ हा कडू-गोड क्षणांचा असायचा. माझे बाबा कोणत्याही कामाच्या बाबतीत दोन टोके गाठणारे. एकतर आळशीपणा करून ते काम टाळायचा प्रयत्न करणार किंवा मग ते काम करायला गेले तर अतिशय शिस्तीत, पद्धतशीरपणे, त्यांच्या मनासारखे होईल असेच्च करणार! मध्यम-मार्ग हा प्रकार त्यांना ज्ञात नसावा. अशा वेळी आईच्या अनुपस्थितीत बाबांच्या तालावर, त्यांच्या शिस्तीच्या धबडग्यात त्या कामाच्या 'राई'चा 'पर्वत' कसा होतोय ते अनुभवण्याची वेळ आमच्यावर यायची. त्यांचा दृष्टिकोन, त्या शिस्तीमागची भावना चांगलीच असायची. परंतु त्याची अभिव्यक्ती खास जुन्या खाक्याची असल्यामुळे मला ती कधीच पचनी पडली नाही.

बाबांची एक सवय म्हणजे प्रत्येक कामात त्यांना 'मदतनीस' लागायचे. म्हणजे ते कोणतेही काम करत असतील तर त्यांनी मला व बहिणीला त्यांच्या खास ठेवणीच्या स्वरात हाका मारायच्या आणि आम्ही हातातील असतील, नसतील ते उद्योग सोडून त्यांना ओ देत त्यांच्या मदतनीसाची (हे आण, ते तिथे ठेव, हे उचल, हे दे - ते दे इ.इ.) कामं करायची...!! आई घरात नसायची तेव्हा बाबांना हे असेच शिस्तीचे झटके यायचेच! एखाद्या ड्रिल सार्जंटच्या थाटात ते ऑर्डरी सोडायचे आणि त्यांच्या ऑर्डरीबरहुकूम काम झाले नाही की त्यांचा पारा बघता बघता चढायचा! कधी त्यांना माळा आवरायचा झटका यायचा तर कधी एखादे उपकरण दुरुस्त करायचा! मग घरभर पसारा, केर, आणि त्यातच बसलेले आम्ही असे दृश्य घरात दिसायचे.

आई नसताना आम्ही कोणतीही कामे कोणत्याही वेळेला करायचो. दोन-दोन दिवस कपडे धुवायचे पडून असायचे. मग अचानक कपडे धुण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम ठरायचा. बाबांनी वॉशिंग मशीनला कपडे धुवायला लावले असतील तर ते वाळत घालायचे काम आमच्याकडे असायचे. त्या वेळी बाबांच्या अंगात आजी-आजोबा संचारायचे! प्रत्येक धुतलेला कपडा शिस्तीत झटकून, आपटून-धोपटून, त्याच्या अनेक घड्या घालून पुन्हा उलगडायचा व तो कपडा उंच तारेवर धुण्याच्या काठीने काठाला काठ जुळवून, एकही चुणी न पाडता वाळत घालायचा.... ह्या खटपटीत आमच्या माना ताणताणून मोडायच्या बेताला यायच्या!! बाबा सुरुवातीचे २-३ कपडे या पद्धतीने वाळत घालून दाखवायचे व उरलेले बादली-दोन बादली धुणे आमच्या ताब्यात सोपवून त्यांच्या उद्योगाला लागायचे. हीच गोष्ट इतरही कामांची!

बाबांनी मंडईतून दोन मोठ्या पिशव्या भरून ताजी भाजी आणायची आणि आम्ही ती लगेच्च, ताबडतोब निवडून, साफ करून, जाळीच्या पिशव्यांमध्ये किंवा पॉलिथीन बॅगेत घालून फ्रीजमध्ये नीट रचून ठेवायची... बाकीचा कचरा आवरायचा, पिशव्या उलट्या करून - स्वच्छ करून पुन्हा जागच्या जागी ठेवायच्या... ह्यातले एखादे काम धड झाले नाही की बोलणी खाणे हे असायचेच!

एक मात्र होते, आई नसताना बाबांनी आम्हाला स्वैपाकघरात अजिबात राबू दिले नाही किंवा आमच्याकडून तशी अपेक्षाही केली नाही. अर्थात, ते स्वतःही फार काही राबायचे नाहीत. परंतु आजूबाजूच्या घरांमध्ये, ओळखीच्यांमध्ये मुली जेव्हा चौथी-पाचवीत असताना पोळी-भाजी, वरण-भाताचा स्वैपाक करायच्या - ओटा-किचन साफ करायच्या, पुढचं-मागचं आवरायच्या तेव्हा आम्ही बेकरीतून ब्रेड, लोणी, अंडी, सॉस, जॅम, केक इत्यादी पदार्थ आणून त्यांवर मनसोक्त ताव मारायचो ते आठवतं. बाबांनीच मला अंड्याचे वेगवेगळे पदार्थ करायला शिकवले तेव्हा. पण त्यापलीकडे त्यांची स्वैपाकात फारशी झेप नव्हती. आणि तशी त्यांना इच्छा व आवडही नव्हती. गरज?? ती काय असते भौ? मग उडुपी हॉटेल झिंदाबाद! किंवा सरळ तयार पोळी-भाजी आणायची व सोबत शिकरण, दही-साखर, लोणचे वगैरे घेऊन दडपायची असे प्रकार चालत. पण हे सारं औट घटकेचं राज्य असायचं हे त्यांना व आम्हालाही ठाऊक होतं. म्हणूनच आम्ही दोन्ही पक्ष ते सहन करू शकलो! Wink अन्यथा घरातच जागतिक युद्ध क्रमांक तीन उभे ठाकले असते हे आम्हाला पक्के ठाऊक आहे.

आई नसायची तेव्हा बाबांना कधी अचानक आमचा अभ्यास घ्यायची सुरसुरी यायची. माझ्या बहिणीच्या बाबतीत कधी जास्त प्रश्न आला नाही, कारण तिचा अभ्यास कायम झालेला असायचा. तिची स्मरणशक्ती अफाट... तिला धडेच्या धडे, कविता, पाढे, श्लोक सर्व काही पाठ असायचे. तिचे गणित तयार असायचे. भूमिती, प्रमेये, सिद्धांत असोत की शास्त्रातील समीकरणे असोत... तिचे कधी अडले नाही. तिचे मार्क्सही उत्तम असायचे. त्यामुळे तिच्या वाट्याला जायला बाबा थोडे घाबरतच असावेत! पण मग उरायचे मीच! आणि त्यांना माझा अभ्यास घ्यायची लहर आली की माझी तर वाट लागायची! मला कधीही वेळेत पाढे, सूत्रे, श्लोक, व्याख्या आठवायचे नाहीत. उलट ते अभ्यास घेऊ लागले की मला जे काही आठवत असेल तेही विसरायला व्हायचे. मग बाबांचे तांडव व माझा मौनराग असा रंगीबेरंगी कार्यक्रम ठरलेला असायचा. खरमरीत शिक्षा जाहीर व्हायच्या. घरातले वातावरण एकदम तंग! आई परत आली की तिला लगेच या वातावरणाचा अंदाज यायचा. मग ती स्वैपाकघरात जाऊन गरमागरम चहा आणि काहीतरी खायला करायची. कित्येकदा ती बरोबरच काही खाऊ विकत घेऊन आलेली असायची. पोटात गरमागरम पदार्थ गेले की बाबांचा रागाचा पारा जरा खाली यायचा. त्या वेळेत मी व बहीण घराजवळच्या मैदानात धूम ठोकायचो. आणि बाबाचं घरावरचं औट घटकेचं राज्य संपलं एकदाचं, म्हणून आनंद साजरा करायचो!

आजही आमच्यात भरपूर मतभेद आहेत. पण आम्ही लहानपणी अनुभवलेली बाबांची शिस्त व त्यांचा राग हे सारे त्यांच्या आमच्यावर असलेल्या प्रेमापोटी असायचे ह्याची जाणीव झाल्यामुळे का होईना, आता आमच्या मतभेदांचेही मला हसू येते. तरीही आपापल्या भूमिका आम्ही प्रामाणिकपणे निभावत आहोत हे नक्की! Happy

अरुंधती, दक्षिणा, वत्सला..स्मस्त आठवणी लिहिल्यात. यानिमित्ताने बर्‍याच दिवसांत बाबाच्या राज्याबद्दल काहीतरी मलाही बोलावंसं वाटतंय- त्याबद्दल या उपक्रमाचे आणि संयोजकांचे आभार. Happy

दादा पक्के 'पारंपारिक शिक्षक' होते. त्यात आणखी गणित आणि शास्त्राचे. त्यामुळे काव्य-शास्त्र-विनोद चार हात दूरच असायचा घरात. नाही म्हणायला (बुद्धीप्रामाण्यवादी कर्तव्यभावनेपोटी असेल, पण) मी जे काही बालजगत, बालकुंज, छोटा दोस्त सारख्या पुरवण्यांत हौसेपोटी किडुकमिडूक लिहायचो ते नेमाने पोस्ट करणे-पोचवणे, कागद-पाकिटे-पत्ते मिळवून देणे इत्यादी कामं ते हिरिरीने करायचे- पण ते तेवढंच.

या पारंपारिक शिक्षकाचा 'छडी लागे..' वर जास्त विश्वास असल्याने 'बाबाच्या राज्यात' ही फारच अप्रिय कल्पना होती. वयाची ११-१२ वर्षे उलटेस्तोवर एखाद्या दिवसाच्या वर अशी पाळी आलीच नाही. आली तेव्हा कधी एकदाची आई येतेय- असं होऊन जाई. एकदा मात्र बाबावर राज्य आलं ते एक दिवस नाही, एक आठवडा नाही, एक महिना नाही, तर तब्बल १ वर्ष!

बी.एड. करण्याच्या निमित्ताने आईला संपूर्ण एक वर्षभर नाशिकला राहावं लागेल- हे ठरल्यावर अंगाला दरदरून घाम फुटला. घरात सर्वांसमोर रडायचीही चोरी. धाकट्या दोघांच्या तुलनेत मी फारच अजागळ, कामचोर, फुसका नि भित्रा होतो. त्यामुळे कुठेतरी कोपर्‍यात जाऊन किंवा गुपचुप आईकडे भरपूर रडबोंबल करून झाली. पण त्यामुळे निर्णय बदलण्याची शक्यता नव्हतीच. आता वर्षभरात दिवसातून कितीवेळा ओरड नि आठवड्यातून किती वेळा धपाटे खावे लागतील, आणि आई अधुनमधुन म्हणजे नक्की किती वेळा किती दिवसांत भेटेल- याचेच अंदाज नि हिशेब सुरू झाले..

आई गेली आणि आमची आणीबाणी-राजवट सुरू झाली. आई घरात नक्की किती काम करत होती याचा अंदाज यायला सुरू झाला. तसं खरं तर आई असतानाही कामं करायचोच, पण आता त्या त्या कामासाठी संपूर्णपणे अकाऊंटेबल असणं हा जरा निराळाच प्रकार आहे, हे लक्षात येऊ लागलं. कामांचं रीतसर खातेवाटप झालं. त्यातल्या त्यात धुण्या-भांड्यांपेक्षा जरा तरी उच्चवर्गीय म्हणून घरदार झाडणं आणि देवपुजा-आरत्या (हा तर केवढा व्हाईट कॉलर जॉब :फिदी:) ही काम माझ्या वाट्याला आली.

हळुहळू लक्षात आलं, की वाट्याला आलेल्या कामांच्या व्यतिरिक्त अनेक नवीन कामं करावी लागणारच आहेत. दादांना स्वयंपाकाला मदत करणं, धाकट्या दोघांचा अभ्यास घेणं, घरात आल्यागेल्याचं जमेल तसं बघणं- हीही कामं घरातला मोठा मुलगा या नात्याने गळ्यात पडली. आतापर्यंत फारशी करावी न लागलेली भाज्या निवडणं, कांदेबटाटे चिरणं, चहा करणं, बाजारात जाणं ही कामंही करावीच लागतील- असं दादांनी निक्षुन सांगितलं. ही कामं कडक शिस्तीखाली शिकायला सुरूवात झाली तेव्हा आपण नक्की कशाला घाबरत होतो- हे कळू लागलं.

दादांना हळुहळू लक्षात आलं, की ओरडणं/धपाटे देणं- यामुळे कामात मी हमखास चुका करतो. मनावर, आवाजावर आणि हातांवर ताबा ठेऊन दादांनी मला शिकवायला सुरूवात केली. चांगलं झालं की चांगलं म्हणायलाही. मग हलकेच दादांमधल्या हृद्य पित्याचं दर्शन होऊ लागलं. हा प्रवास संपूर्ण वर्षभराचा. तो एकाच पोस्टमध्ये नक्कीच लिहिण्यासारखा नाही. या वर्षाने मला खूप शिकवलं. धाकट्या भावांबद्दलचा हेकटपणा, खवटपणा दूर होऊन बोलण्यात जबाबदारी येऊ लागली. शिस्तीच्या अंमलाखालून तेही बिचारे जातच होते, आणि शिवाय माझ्याहीपेक्षा लहानही होते. त्यांचाही हूडपणा, मला सारखं टोचत-बोचकारत राहणं कमी झालं.

या एक वर्षाने खूप शिकवलं. जबाबदार केलं. दादांनाही शिकवलं असावं. आई महिन्याकाठी १-२ दिवसांसाठी येई, तेव्हा त्यांच्या आपसातल्या बोलण्यातून ते मला कळे. कधीही फिरायला न नेणारे दादा आम्हाला फिरायला नेऊ लागले. सहज आणि हसतखेळत बोलू लागले, काहीतरी चांगलं केल्याबद्दल शाबासकीही देऊ लागले.

या एका वर्षात मी जरा धीट अणि जबाबदार झालो. काय हवं नको, चांगलंवाईट ते दादांसमोर बोलू तरी लागलो. अनेक गंमतीचे प्रसंग या एका वर्षात घडले. बाहेरच्यांकडून कौतुक वाट्याला आलं ते याच एका वर्षात.

एकदाच मार वाट्याला आला, तेव्हाही अनेक गोष्टींबाबत कानाला खडा लावला. एकदा दादांनी भाजी शिजत ठेऊन गॅस दहा मिनिटात बंद करायला सांगितला, आणि काही कामासाठी बाहेर गेले. मी रेडिओला कान देऊन 'शालेय कार्यक्रम' ऐकत बसलो. घरात आल्यावर 'कसला वास येतोय?' या दादांच्या प्रश्नाला 'शेजारी काहीतरी करत असावेत!' असं झोकात उत्तर दिलं. मग दादांनी आत जाऊन भाजी संपूर्ण आटूनजळून लाल-काळी झालेली कढई दाखवली, आणि मग खरपूस मार. संध्याकाळी मात्र दादांनी जवळ घेतलं आणि हे आयुष्यातलं पहिलं नि शेवटचंच जवळ घेणं असल्याच्या थाटात मी ते साजरं केलं. मग जरा डेअरिंग करून 'गोष्ट सांगा' असा हट्ट धरला. दादांनी उत्सुकता ताणात नेऊन शेवटी चक्क १०५ मुलद्र्व्यांची गोष्ट सांगितली. (तेव्हा १०५च होती. आता वाढली आहेत). ही मात्र दादांची पहिली अणि शेवटची गोष्ट. गोष्टीचा धसका घेऊन मी नंतर आयुष्यात दादांना गोष्ट सांगा म्हटलं नाही. Proud

(नंतर खूप वर्षांनी दादांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्या बिछान्यावर बसून मी या गोष्टीची गोष्ट त्यांना ऐकवली, तेव्हा दादा हलकेसे हसल्याचं आठवतं. त्यात विषाद नसावा बहुतेक. Happy )

आई आणि तिची आठवण काय असते, तेही याच बाबाच्या राज्यात कळालं. अनेकदा रडलो. पडालो-धडपडलो तेव्हा आपलं आपणच सांभाळायचं- हे कळून स्वतःच फुंकर घालायला शिकलो.

झालं ते गेलं. भुतकाळ झाला खरा त्याचा. पण बाबाच्या त्या राज्यात बाबानेही भरपूर ठेचा खाल्ल्या असाव्यात, तोही भरपूर शिकला असावा- हे माझ्यावर कदाचित भविष्यात कधीतरी राज्य आलंच, तर तंतोतंत लक्षात येईल- ही त्या राज्याची कमाई काय थोडी आहे? बाकी त्या राज्याइतकीच कारकीर्द मीही यशस्वी करून दाखवली तर तो कमाईपलीकडचा बोनस समजायचा, नाही का?! Happy

साजिरा उत्तम पोस्ट.
(धाकट्या दोघांच्या तुलनेत मी फारच अजागळ, कामचोर, फुसका नि भित्रा होतो.)
पण generally धाकटी मुलं शेंडेफळ म्हणून लाडावलेली असतात. मोठ्या मुलांना, तू दादा आहेस ना, तू ताई आहेस ना, म्हणून धाकट्याची कामं पण सांगितली जातात. तू मोठा असून कसा काय आळशी आणि अजागळ झालास… !

Pages