बाबाच्या राज्यात

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

Pitrudin2013_0.jpg

आपण लहान असताना जेव्हा आई बाहेर जायची आणि थोडावेळ घरावर आपलं आणि बाबांचं राज्य असायचं तेव्हा काय धमाल यायची आठवतंय? कधी घरीच मनसोक्त खेळणं, कधी बाबांच्या हातचे मस्त पदार्थ खाणं, कधी बाहेर जाऊन भेळ पुरी नाही तर आइसक्रीमवर ताव मारणं! अगदी वाट पाहायचो आपण त्या बाबांबरोबरच्या मजेची!

आता आपल्यातले बरेच लोक स्वतः बाबाच्या भूमिकेत गेलेत. हे बाबा-बच्चे पण आई नसताना एकत्र राहत असतील. कधी एक-दोन दिवस, तर कधी चक्क एखादा आठवडा किंवा महिनाही! कसे असतात हे दिवस? ही जबाबदारी उचलताना मुलांची रोजची कामं, अभ्यास, जेवण वेळेवर होतं की क्वचित धांदल उडते? मुलांसोबत घरात आरामात वेळ घालवणं आवडतं की बाहेर जाऊन मस्ती, भटकंती आवडते? मुलांना काही खेळाच्या कॢप्त्या सांगायचं ठरतं की त्यांचंच एखादं 'सीक्रेट' बोलता बोलता काढून घेतलं जातं? एक मात्र नक्की की बाबा मुलांना काही नवीन शिकवत असो किंवा मुलांसोबत स्वतःच एखादी नवी गोष्ट शिकत असो, बाबा आणि मुलं मिळून त्यांचं एक वेगळं विश्व तयार करत असतात. एकमेकांना आयुष्यभर आनंद देतील, समृद्ध करतील अश्या आठवणी निर्माण करत असतात. या गोड-कडू आठवणी आज पितृदिनाच्या निमित्ताने इथे लिहून या पिता-पुत्र/पुत्री नात्याची वीण आणखी घट्ट करूया का?

कोणत्याही बाबासाठी एक पूर्ण दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आईच्या अनुपस्थितीत मुलांना सांभाळायचा अनुभव कसा असतो, काय शिकवतो, काय देऊन जातो याबद्दल लिहायला पितृदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त कुठला असणार, नाही का?

मायबोलीकर बाबांचे अनुभव ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणापासूनच बाबा म्हणजे एक आदरयुक्त भीती मनात होती. जसे जसे बाबा उमजत गेले तसा आदर वाढत गेला आणि भीती कमी झाली. बाबांविषयी किती लिहू आणि किती नको असे झाले आहे.

नू.म.वि. मध्ये पहिलीत असताना फी भरायला दिलेले ५ रुपये मी भांडारात जाऊन गोळ्यांवर खर्च केलेले आणि घरी खोटे बोललेलो. ५ रुपये खर्च केले म्हणून नाही पण खोटे बोललो म्हणून मार खाल्लेला आजही पैशाच्या बाबतीत खोटे बोलून देत नाही.
सातवीत असताना आईच्या अंगावर ओरडलो म्हणून हातातल्या पानिपतच्या पुस्तकाने पाठीत मिळालेला दणका आईवर न ओरडण्याची आणि वाचनाची सवय लावून गेला.
मराठी पुस्तकांची आवड ही बाबांकडून मिळालेली सगळ्यात मोठी देण. दुसरी देण म्हणजे घरकामातील मदत. माझी आईही नोकरी करत असल्यामुळे बाबा केर काढण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत घरात लागेल तशी मदत करायचे. तीच सवय आम्हा भावंडांना लहानपणापासून लागली आहे.

तसे माझे बाबा घरी जरा कमीच बोलतात अजूनही. त्यामुळे मी अमेरिकेला निघताना त्याच्या मनात खूप काही होते मला सांगायचे. शेवटी ते त्यांनी मी अमेरिकेला जायच्या आदल्या रात्री हातात पत्र देऊन व्यक्त केले. पत्र वाचून एकमेकांच्या गळ्यात पडून आम्ही मनसोक्त रडलो होतो त्यादिवशी. ते पत्र अजूनही मनाला उभारी देते. परदेशात काहीही केलेस तरी गम्मत म्हणूनसुद्धा एकदाही सिगारेट ओढू नकोस हा त्यांचा सल्लावजा आदेश मी अजूनही विसरलो नाहीये.

आता आजोबा झाल्यावर तर त्यांचे एकदम हळवे रूप पाहायला मिळाले. त्यांचे नातवाबरोबर खेळणे, हसणे हे जशी २ लहान मुले खेळतात तसे चालते.

फादर्स डे आणि नुकताच झालेला बाबांचा वाढदिवस यामुळे साध्याच पण कधीही न विसरणाऱ्या या आणि अनेक आठवणीना एकदम उजाळा मिळाला.

सुंदर लिहिलं आहे सर्वांनीच. मेधा, खूपच छान. कोणी बाबा स्वतःच्या राज्याबद्दल नाहीये का लिहिणारं इथे?

आशू, आमच्याकडे दादांनी शेवटचा राज्याचा राजीनामा दिल्यावर फक्त १० दिवसच हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळच्या काही प्रसंगातली हतबलता आठवली आता, आणि तुमच्या राज्याचीही नीट कल्पना आली. Happy

नंदिनी, स्वाती, शोनू.. असा बॉयफ्रेंड टेक्श्चरचा बाबा- असं स्वप्न सुद्धा पाहायची हिंमत नव्हती. शोनूच्या दोनचार स्ट्रोक्समुळे बाफाचा कॅनव्हासच भारी दिसायला लागला.. मस्त.

सिंडे, हा तुमच्या घरचा काळजी सिंड्रोम प्लस धाकदपटशा असं अजब काँबि आमच्या इथं होतं. कुणी सहज पत्ता विचारला तरी सत्राशे लँडमार्क्स सांगणं, मग पुन्हा नीट समजलं आहे का ते तपासत राहणं, दिशाज्ञानाचा आणि भूमितीचा भयंकर वापर करून समोरच्याला भंजाळवून टाकणे- असे प्रकार. आई म्हणायची, 'त्यापेक्षा सोडून का येत नाही त्यांना त्या जागी?!'

दादा उत्तम स्वयंपाकी होते. डिंक-खारीक-खोबर्‍याचे लाडू ते असेतोवर आईने कधीच केले नाहीत. दादाच करायचे. ती चव, आणि परफेक्ट गोलाकार घरात नंतर कधी दिसला नाही. संपूर्ण दिवाळीचं फराळही.

***

इथं हे बरं झालं. बाबा लोकांच्या आठवणींना अधिकृत जागा मिळाली. यानिमित्ताने बर्‍याच दिवसांनी त्या आठवणी जागवता आल्या हे समाधान..
होतं काय, की बापाच्या आठवणी, लहाणपणच्या आठवणी आपल्यापाशी लाखमोलाच्या असतात. आपण त्या सहसा कुणाला सांगत नाही, तसंच खास काही कारण घडल्याशिवाय. सांगितल्यावर कदाचित इतरांना कवडीमोल वाटतील याची, मेलोड्राम्याचे शिक्के बसण्याची.. इ. भिती असते. त्यामुळे मित्रमंडळींत आणि कधीकधी घरातही ते सारं सांगायचं टाळतो किंवा कमीत कमी आवरतं तरी घेतो. इथं सार्वजनिक, तरीही जिव्हाळ्याचं ठिकाण तयार झालं.

माझ्यासारख्या अनाथ झालेल्यांना तर पाठीवर हात फिरल्यागत वाटलं असेल.. असो.

(बरं झालं देवा, झालो मी अनाथ.. बापाचं बापपण कसं असतं उमगलं.. Happy )

स्वाती, आशू, सिंडरेला, मेधा आणि पुन्हा साजिरा, खूप सुंदर लिहिलं आहात तुम्ही. Happy

पेशवा, <<तुम्ही काय ऐकु शकता तुम्हाला काय वाचता येत ह्यावर ते अवलंबुन आहे.>> बरोबर आहे. तुम्हाला काय सांगायचं असतं आणि तुम्ही काय लिहिता यावरही 'संवाद' अवलंबून आहे. मला जे खटकलं ते मी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ते इतरांनाही खटकावं अशी माझी इच्छा/ अपेक्षा नाही. मला खटकलं त्याला कारण बाकी विषयांवरच्या चर्चेतील इब्लिसांच्या पोस्टी आहेत/ असू शकतात.
आणि इथून पुढे हा विषय मला वाढवायचा नाही.

मेधा, सुंदरच.

आम्ही आमच्या बाबाला तू लेकीला रोज सांभाळत असतोस ते लिही की, अशी विनंती केल्यावर त्याने "ह्या!! दोन तीन तास वगैरे मुलीला सांभाळायचं वगैरे त्यात काय असतं लिहिण्यासारखं!!" असं सांगितलं. एकाच वेळेला राग आला आणि अभिमान पण वाटला.

राग आला कारण, लिहिण्यासारखं काही नाही म्हटला म्हणून. अभिमान वाटला कारण "मुलीला सांभाळणे" हे त्याने इतक्या नॉर्मल आणि कॅज्युअल गोष्ट असल्यासारखं सांगितलं म्हणून. Happy

सगळे अनुभव खूप असोशीने लिहित आहात! स्वाती_आंबोळे, मेधा, आशूडी, नंदिनी, दुर्योधन, साजिरा... छान लिहिलं आहे सर्वांनी!

स्वतःच्या राज्याबद्दल खात्रीने, असोशीने, उमाळ्याने नाही जमतेय तर राहु देत. ते तुमच्या बाळांसाठी ठेवा Happy तुम्ही कसं मॅनेज केलं ? गडबड उडाली, भिती वाटली, आत्मविश्वासाने केलं, १०० वेळा बायकोला/आईला/बहिणीला फोन केला की बाळाचे आजोबा अनुभवी असल्याने ते तुमच्या मदतीला धावले असं सगळं 'प्रॅक्टिकली' लिहा.

माझे वडील दादा... त्यांना सगळे दादाच म्हणायचे.

दादांचे राज्य दादांनी अचानकच सोडले. काही कळायच्या आतच!
आणि त्यांच्यासाठी आम्ही काही करण्याच्याही आतच...

अजून काही लिहिणे शक्य होत नाहीये... पण यावर मला लिहायचे आहे...
सल जात नाही आणि काही करताही येत नाही. Sad

होतं काय, की बापाच्या आठवणी, लहाणपणच्या आठवणी आपल्यापाशी लाखमोलाच्या असतात. आपण त्या सहसा कुणाला सांगत नाही, तसंच खास काही कारण घडल्याशिवाय. सांगितल्यावर कदाचित इतरांना कवडीमोल वाटतील याची, मेलोड्राम्याचे शिक्के बसण्याची.. इ. भिती असते. त्यामुळे मित्रमंडळींत आणि कधीकधी घरातही ते सारं सांगायचं टाळतो किंवा कमीत कमी आवरतं तरी घेतो. >> खरय साजिर्‍या !

या वर्षीचा पितृदिन होऊन ८-१० दिवस झाले देखील! आपल्यापैकी काहींनी या दिवसाच्या निमित्ताने वडिलांना शुभेच्छा दिल्या असतील, खास संवाद साधला असेल किंवा एकत्र येऊन एखादी आवडीची गोष्ट केली असेल. बर्‍याच मायबोलीकर बाबांना त्यांच्या चिमुकल्यांकडून गोड पत्रे, शुभेच्छा, फुले असेही मिळाले असेल. यंदा मायबोलीवर आपण पितृदिनाच्या निमित्ताने 'बाबाच्या राज्यात''मुलगा वयात येताना' या विषयांवर चर्चा केली.

आपापल्या बाबांच्या राज्यातले अनुभव लिहिताना मायबोलीकरांनी अगदी मनापासून बाबांबद्दलच्या, त्या काळातल्या हृद्य आठवणी लिहिल्या. त्या निमित्ताने वडील-मुलांमधले गहिरे नाते अधोरेखीत झाले. हा उपक्रम सादर करताना सध्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या मायबोलीकरांकडून त्यांच्या स्वतःच्या राज्यातले अनुभव, मुलांबरोबर एक दिवस किंवा जास्त काळ घालवताना आलेल्या अडचणी, गमती याबद्दल लिहिणे अपेक्षित होते. तसे अनुभव मात्र वाचायला मिळाले नाहीत.

मुलगा वयात येताना या विषयावर चांगली चर्चा झाली, बरेच महत्त्वाचे मुद्दे समोर आले. मुलांकरता या अडनिड्या वयात लैंगिक शिक्षणाचे महत्त्व, आईवडीलांशी सुसंवाद असण्याचे महत्त्व व योग्य वेळी योग्य माहिती योग्य प्रकारे मुलापर्यंत पोचण्याचे महत्त्व हे सर्व मुद्दे चर्चेत आले. ज्यांची मुले आता या वयोगटात आहेत / जाणार आहेत त्यांना त्या दिशेने पाऊल उचलणे किती आवश्यक आहे याची जाणीव होणे किंवा जाणीव असेलच ती अधोरेखीत होणे हा या उपक्रमामागचा विचार होता.

या दोन्ही विषयांवर आपण अजूनही चर्चा करू शकतो, नवे व आवश्यक मुद्दे जितके येतील तितके हवेच आहेत व त्यावर सांगोपांग चर्चा होणेही आपल्या सर्वांच्या हिताचेच आहे. आतापर्यंत या उपक्रमामध्ये आपले विचार मांडणार्‍या, प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आभार!

बाप या व्यक्तीबद्दल कन्सेप्ट्स 'माय डॅड इज स्ट्राँगेस्ट' पासून सुरू होतात.

त्या 'मुलगा वयात येताना' बापाला गब्बरसिंग म्हणण्याइतपत बदलतात. तिथून जो भी कुछ हो जाये, मेरेकू मेरे बाप जैसा कब्बी नही बन्ना! अशी खूणगाठ बांधण्यापर्यंत लवकरच पोहोचतात. बापाशी अखंड संवाद फार कमी जणांचा असतो. ल्योक कर्ता होण्याच्या अन बाप रिटायर होण्याच्या वयात, बाप अन लेक दोघांनाही एकमेकांबद्दल 'त्याला काही समजतच नाही' असेच वाटत रहाते.

मग एक दिवस येतो, जेव्हा आरशात बघताना लेकाला लक्षात येते, की यार आपण तर आपल्या बापाची कार्बन कॉपी बनत चाल्लोय. चेहरा तर डिट्टो तसाच वाटतोय. मग त्यावेळी त्याला त्याच्या वागण्यात बापाच्या लकबी केसातल्या रुपेरी छटांसारख्या सापडू लागतात. आपल्या मित्रांसोबत पिच्चर टाकायला जाताना आपला पोरगा आपण मारल्या तशाच थापा आपल्याला मारतोय हेदेखिल लक्षात येते, तो देखिल आपल्याला गब्बरसिंगच म्हणतो की आजकाल कुणी नवा व्हिलन फेमस झालाय? असा प्रश्न मनात येऊन बाप झालेला लेक खुदकन हसतो, अन त्यावेळी त्याला त्याचा बाप हवासा वाटायला लागतो.

'तो' त्याक्षणी नसतो.

त्या हवासा वाटण्यातूनच कदाचित माणूस 'आकाशातल्या बापा'च्या कन्सेप्टपर्यंत पोहोचतो...

आजही माझा बाप गावी राहतो.... घरच्या शेतात काम करतो....आता वय उतरलं.... दोन वेळचं जेवण एक वेळेवर आलं..... तरी होईल तोपर्यंत काम करत राहण्याची इच्छा...... असचं त्याचं आयुष्य चाललं आहे..... गावी गेलो की गावातले लोक मला म्हणतात की "बघ.... तुझ्या बापाची तब्बेत किती खराब झाली.... त्याला काम कमी करायला लाव..... पण पोराचं ऐकेल तो बाप कसला?

सतत काम करुन शेतात जेवढं पिकेल त्यावर बापानं संसाराचा गाडा ओढला..... त्याला कर्जाची अर्लजी होती... पण आम्हाला काही कमी पडु देलं नाही, जे मागितलं ते देत गेले.......कधी शाळेच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत, आमच्यावर जबरदस्ती केली नाही.... पोराला स्वतःच्या पायावर उभं करणं म्हणजे त्याला आधी निर्णय स्वतंत्र देणं..... असचं काही त्याचं तत्व होतं.... मग ते शिक्षण असो की लग्नासारखी आयुष्यातली महत्वाची घटना असो.... मी नोकरीला लागल्यापासुन त्यांनी कधी मला पगार किती? हेही विचारलं नाही.... तो कुठे खर्च करतो हेही नाही.... त्यांनी आजपर्यत मला कधीच पैसे मागितले नाही...... पण गावी काही काम असलं की मी स्वतःहुन देत गेलो..... खरं तर मी तुमचा बाप आहे... अशा गर्वानं ते कधीही आमच्या सोबत वागतांना दिसले नाहीत..

...... आता मी एका पोराचा बाप आहे. शहरात राहतो.... इथं शिक्षणाचा खर्च मोठा आहे....पोराला आई बाप महागडं शिक्षण देतात... तेव्हा ते त्यांच्या कडुन काही अपेक्षाही करतात...अशीच काहीतरी परिस्थीती आहे.. तेव्हा मीही माझ्या पोराकडुन काही अपेक्षा करायला लागतो.... त्याला अभ्यास कर असं म्हणतो.... चांगले मार्क मिळवित जा! असे म्हणतो... कधीतरी मनात आपल्या पोरानं मोठं होयाला हवं.... असं विचार मनाला शिवतो..... तेव्हाच मला माझ्या बापाची आठवण येते.... की त्यांनी आपल्यासाठी कर्तव्य म्हणुन खुप काही केलं पण अपेक्षा काहीच केली नाही..... तेव्हा आपला पोरगा आहे... आपणच त्याला जग दाखवलं आहे.... म्हणजे त्याच्या आयुष्यातले सगळे निर्णय आपणच घ्यायचे.... हे जरा अती होईल... असा विचार मला माझा बापामुळेच सुचत राहतो.

मी एम.ए पर्यंत शिकलो... तरी बापानं मला अभ्यास कर... किंवा आज शाळेत काय शिकुन आला... हेही कधी विचारलं नाही..... आपलं काम आपणच नेटकं करायला पाहीजे अशीच त्यांची विचार श्रेणी आजही आहे.
कधीतरी पोराच्या बाबतीत निर्णय घ्यायची पाळी माझ्यावर येईल तेव्हा बापासारखं मोठं मन मलाही देवानं द्यावं ..... एवढचं.

वा, मस्त लिहिलंय श्यामराव. खूप शिकण्यासारखं आहे तुमच्या पोस्टमधून आणि तुमच्या वडिलांच्या विचारसरणीतून.

मला माझ्या मुलींनी बाप म्हणून कधीच दु:ख दिले नाही. माझ्या कॉर्पोरेट आयुष्यात मी त्यांना फारसा लाभलो नाही पण जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा मी त्यांचा सवंगडी होतो. कधी कधी अभ्यास घेतला पण जमलाच नाही. त्यांच्या भावविश्वात बाबा म्हणजे नेहेमी गाणी ऐकणारा, त्यांना सुंदर पुस्तके व परदेशातून येताना वेगळी गिफ्ट आणणारा व खूप खेळकर असा मी होतो. त्यांनी आणखी एक निरिक्षण केले होते की आईवर माझे जिवापाड प्रेम आणि तिच्याबद्दल आदर आहे. किंबहुना आमच्या नात्याचा आधारच आदर आहे. माझ्या मुलींना दुखवलेली एक घटना मात्र अजून मला सतावते अन मला वाईट वाटायला लावते . त्यांनी घरात एक रस्त्यावरचे कुत्र्याचे पिल्लू पाळले होते . त्यामुळे माझ्या मते त्या अभ्यासाकडे लक्ष देत नव्हत्या. मी एकदा ते रात्री त्यांना न सांगता रेल्वे लाईन पलिकडे सोडून दिले. सकाळी त्यांचे चेहेरे अत्यंत केविलवाणे झाले होते. ते आठ्वले की माझ्या काळजात अजूनही गलबलते व त्याबद्दल मी स्वतःस कधीच माफ करणार नाही.
मी या मुलींना त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याचे व स्वतंत्र विचारसरणीचे व स्त्री म्हणून एक दर्जाच्या अस्तित्वाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे दोघीही fiercely independent करण्यात मला अभिमान वाटतो.

Pages