बाबाच्या राज्यात

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

Pitrudin2013_0.jpg

आपण लहान असताना जेव्हा आई बाहेर जायची आणि थोडावेळ घरावर आपलं आणि बाबांचं राज्य असायचं तेव्हा काय धमाल यायची आठवतंय? कधी घरीच मनसोक्त खेळणं, कधी बाबांच्या हातचे मस्त पदार्थ खाणं, कधी बाहेर जाऊन भेळ पुरी नाही तर आइसक्रीमवर ताव मारणं! अगदी वाट पाहायचो आपण त्या बाबांबरोबरच्या मजेची!

आता आपल्यातले बरेच लोक स्वतः बाबाच्या भूमिकेत गेलेत. हे बाबा-बच्चे पण आई नसताना एकत्र राहत असतील. कधी एक-दोन दिवस, तर कधी चक्क एखादा आठवडा किंवा महिनाही! कसे असतात हे दिवस? ही जबाबदारी उचलताना मुलांची रोजची कामं, अभ्यास, जेवण वेळेवर होतं की क्वचित धांदल उडते? मुलांसोबत घरात आरामात वेळ घालवणं आवडतं की बाहेर जाऊन मस्ती, भटकंती आवडते? मुलांना काही खेळाच्या कॢप्त्या सांगायचं ठरतं की त्यांचंच एखादं 'सीक्रेट' बोलता बोलता काढून घेतलं जातं? एक मात्र नक्की की बाबा मुलांना काही नवीन शिकवत असो किंवा मुलांसोबत स्वतःच एखादी नवी गोष्ट शिकत असो, बाबा आणि मुलं मिळून त्यांचं एक वेगळं विश्व तयार करत असतात. एकमेकांना आयुष्यभर आनंद देतील, समृद्ध करतील अश्या आठवणी निर्माण करत असतात. या गोड-कडू आठवणी आज पितृदिनाच्या निमित्ताने इथे लिहून या पिता-पुत्र/पुत्री नात्याची वीण आणखी घट्ट करूया का?

कोणत्याही बाबासाठी एक पूर्ण दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आईच्या अनुपस्थितीत मुलांना सांभाळायचा अनुभव कसा असतो, काय शिकवतो, काय देऊन जातो याबद्दल लिहायला पितृदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त कुठला असणार, नाही का?

मायबोलीकर बाबांचे अनुभव ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैत्राली.. Proud आता नीट विचार केला तर 'आळशी होतो', असं म्हणता येणार नाही. पण सारखं धडपडणं, वस्तू पाडणं-फोडणं, धांदरटपणा करून काहीतरी चूका करून ठेवणं- याचं प्रमाण फार होतं. म्हणून मग ते काम नको, होणार्‍या चूका नकोत, आणि त्यावरूनची बोलणी आणि कधीतरी मारही नको- असा विचार त्या कामचोरपणामागे असावा.

माझ्या चुका, अजागळपणा, धांदरटपणा इ. संपूर्णपणे घरातल्या लष्करी राजवटीमुळेच होतं, असंही म्हणता येणार नाही. कारण धाकटे दोघे इतक्या चूका करायचे नाहीत. एकेकाचा स्वभाव, आणि काय. पण हे असे स्वभावही आयुष्यभर पुरत नसावेत. काहीतरी घटना घडतात, वातावरण बदलतं. कधी ग्रॅज्युअली, तर कधी काही थ्रेशहोल्ड्स येऊन; माणूस बदलत जातो. Happy

>>> अनेकदा रडलो. पडालो-धडपडलो तेव्हा आपलं आपणच सांभाळायचं- हे कळून स्वतःच फुंकर घालायला शिकलो. >>>>
एकदम खल्लास... बोले तो फिदा!!! Happy

उशीराने वाचतेय... मस्तच विषय. अरुंधती, साजिरा... अगदी सुरेख आठवणी... सुंदर शब्दांत.

माझ्या बिच्चार्‍या बाबांना राज्यं कधी म्हणजे कधीच मिळालं नाही. कुणीना कुणीतरी सरकार असायचच. आई गावाला-बिवाला गेले असेल तर आत्या असायचीच काळजीवाहू म्हणून.

सर्वांच्या आठवणी फारच ह्रद्य - यानिमित्ताने मागे वळून बघितले तर आपणच कसे घडत गेलो / घडवलो गेलो हे पाहून गंमत, हुरहुर, गुणावगुण अशा संमिश्र भावना दाटून येतात.

आमच्याकडे बाबांच्या राज्यात फार उशीरा म्हणजे मी नोकरी करत असताना सुरू झालं. आधी लहान असताना पप्पाच सहासहा महिने घरी नसायचे, त्यामुळे त्यांनी आम्हाला कधी सांभाळलं वगैरे नाहीच्.पण मी मुंबईत नोकरी करत असताना पप्पांना घोडबंदरला ट्रान्स्फर मिळाली शिवाय कंपनीने फ्लॅट पण दिला म्हणून मी हॉस्टेल सोडून तिथे रहायला गेले. तेव्हाचा आमचा दिनक्रम धमाल असायचा,

पप्पा सकाळी साडेसातला कंपनीत जायचे. जाण्याआधी माझ्यासाठी थर्मासभर चहा करून ठेवायचे, नंतर मी सकाळी नऊदहा वाजता उठून माझं सर्व आवरून चहा घेऊन मग बाहेर पडायचे. पप्पा संध्याकाळी सातनंतर घरी यायचे आणि येताना जेवणाचा डबा घेऊन यायचे. मला उशीर होणार असेल तर ते जेवून झोपायचे नाहीतर मी क्वचित मी लवकर आले तर आल्यावर आम्ही दोघे जेऊन घ्यायचो. कित्येकदा तर आठवडाभर माझी आणी त्यांची भेटच व्हायची नाही. बोलणं तर मोबाईलवरच व्हायचं बर्‍याचदा.

नंतर भावाची परीक्षा संपल्यावर आई मुंबईला आली आणि मग सकाळी गरम गरम ब्रेकफास्ट, रात्री गरम जेवण, हवा तेव्हा चहा वगैरे चंगळ सुरू झाली.

सगळ्यांच्या आठवणी हृद्य आहेत. साजिराभौ, छान लिहिलंत. Happy

आमच्याकडे राज्य असं नाही, पण मी पाचवीत गेल्यावर मला आणि बाबांना शनिवार रविवार सुट्टी असायची. आई आणि भाऊ तेव्हा ऑफिस आणि शाळेत असायचे. ते शनिवार आमचे स्पेशल असायचे. मी अगदी डॅडीज गर्ल होतेच. त्या काळाततर आमची मैत्रीच झाली. वाचन, इंग्रजी सिनेमे बघणं, नॉनव्हेज खाणं आणि मुख्य म्हणजे गप्पिष्टपणा अशा आम्हा दोघांच्या बर्‍याच आवडीनिवडी जुळायच्या. वय, जेन्डर,नातं यातलं काहीच कधीच आमच्या मधे आलं नाही. कोणताही विषय वर्ज्य नव्हता आणि माझं कुठलंच बोलणं त्यांनी कधीही बालिश म्हणून उडवून लावलं नाही. मुद्दे खोडले, प्रतिवाद केले तरी अतिशय रिस्पेक्टफुली! त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. एकंदरित माणसं जोडायची आवड होती. अनोळखी व्यक्तीशीही 'त्याच्या भाषेत' बोलून 'ब्रेकिंग द आइस' म्हणतात ते करणं त्यांना सहज जमायचं. डाव्या हाताला कायम एखादं पुस्तक फुटलेलं असायचं आणि त्यातला एखादा आवडलेला वेचा / कल्पना /विचार अगदी आग्रहाने समोर बसवून वाचून दाखवायचे. नाटकाबिटकांतले असल्यामुळे अभिवाचनच. घरकामात मदत वगैरे फारसा विषय नव्हता, पण शनिवारी दुपारी चहा करून पिलवायचे मात्र. तो इतका काही हौशीने करायचे की मला काहीतरी भलतंच स्पेशल प्यायला मिळतंय याची खात्री असायची. रोज सकाळी आईला आणि आम्हाला अग्रलेख, महत्त्वाच्या बातम्या वाचून दाखवायचे. 'शहाणे करून सोडण्या'पेक्षा शेअर केल्याशिवाय राहवतच नाही हे खरं कारण. माझ्यात जी काही काव्यशास्त्रविनोदाची आवड रुजली ती त्यांच्यामुळेच.

हा माझा पहिला बॉयफ्रेन्ड फार अकाली गेला. पण तितक्या काळातही मला खूप समृद्ध करून गेला.

आमच्याकडे बाबांचे राज्य आले तेव्हा मी खूप लहान होते. मी एक दिड वर्षाची असताना आईची बदली बंगलोरला झाली होती. दादा ६- ७ वर्षाचा! कसं मॅनेज केलं असेल त्यांनी कोणास ठाउक.आजीही होती.. पण त्याकाळात मी बाबांनाच आई म्हणायचे हे अगदी स्पष्ट आठवतेय! Happy
नंतर परत एकदा बाबांचे राज्य आले होते. माझ्या बारावीनंतर आई अमेरिकेला गेली होती दिड दोन महिने. जाम धमाल केली होती.. बाबा मला व माझ्या मैत्रिणींंना यादें पाहायला घेऊन गेले होते... आणि बाबा पुर्ण सिनेमाभर ही कोण, तो़ कोण असं विचारत बसले होते.. Happy आई फार शिस्तीची आहे माझी, त्यामुळे ती नसताना खूप मजा केली होती आम्ही! Proud

हा माझा पहिला बॉयफ्रेन्ड फार अकाली गेला. >>

वाईट वाटलं. खरंचच अशी वेळ कुणावरही येऊ नये. स्वातीही हळवी आठवण

हा बाफ सुरु झाल्यापासून मी स्वतःला आवर घालत होते. मात्र इथल्या सर्वांच्याच पोस्ट्स वाचून वाटलं की इथे आवर घालायचा नसून मोकळं व्हायचंय! Happy धन्यवाद संयोजक. फार हृद्य आठवणी आहेत प्रत्येकाच्या. साजिर्‍या, तू फार सुंदर लिहीतोस तुझ्या आठवणी.

आमच्या घरात आण्णांचं राज्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ. त्यांना बरं वाटत असेल तेव्हा आमचं राज्य - म्हणजे आम्ही म्हणू ते. आणि त्यांना बरं वाटत नसेल की फक्त ते म्हणतील तसंच! त्यांच्या राज्याबद्दल काहीही लिहायचं तरी मला आधी हे सांगावं लागेल की माझ्या आण्णांना पार्किन्सन्स होता. कारण या एका गोष्टीमुळे पुढच्या सगळ्या चित्रांमागचा रंगच बदलतो. आजच्याइतकं जेव्हा कुणाला पार्किन्सन्स हे नावही माहीत नव्हतं तेव्हाच्या या सगळ्या गोष्टी.

लहानपणीची बरीच वर्षं आईच्या शिफ्ट्स असल्यानं अनेकदा आण्णांचं राज्य असायचं. सुरुवातीला आजार गंभीर नव्हता तेव्हा त्यांना मनसोक्त फिरायला, सिनेमे बघायला आवडायचं. ते आम्हालाही दर शनिवारी पर्वती, रविवारी सारसबागेत घेऊन जायचे. मस्त खावे, वाचावे, मित्रांसोबत गप्पा माराव्यात इतक्या साध्या आवडी होत्या त्यांच्या. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन जायचे. आम्ही मेन्यूकार्डाच्या उजवीकडे पाहून ऑर्डर देतोय असा संशय आला तरी रागवायचे. त्यांच्यासोबत दिवाळीचे फ्रॉक, कपडे खरेदीला जायचं म्हणजे पर्वणीच असायची. आई जरा तरी बजेट बिजेट बघायची, पण ते मात्र बिनधास्त! तापट, संतापी म्हणून बाहेर प्रसिध्द असणारे आण्णा आम्हा तिघींवर कधी तितकं भयंकर कारण असल्याशिवाय चिडत नसत.

एकदा आठवतं, जेव्हा वाढदिवस केक कापून करतात हे फक्त टीव्हीवर पाहिलं होतं तेव्हा, त्यांनी आम्हाला सोबत घेऊन आईचा वाढदिवस घरबिर सजवून, केक आणून साजरा केला होता. त्यादिवशी आईचा वाढदिवस असतो हे आम्हाला तेव्हाच समजलं होतं.

आण्णांच्या राज्यात स्वयंपाकघरातही धमाल असायची. पोळ्या सोडून त्यांना सगळं काही मस्त बनवता येत असे. फक्त त्यांचा हुकूम झेलायला, मागचं आवरायला मदतनीस लागायचे! शिरा, खिचडी आणि पिठलं बनवायचं असेल तर ते त्यांनीच.

आण्णा बँकेत असल्यानं आम्हाला बँकेचे सगळे व्यवहार चटाचटा करता यायला हवेत अशी त्यांची माफक अपेक्षा. पण त्यांच्या ओरड्याच्या भीतीपायी बँकेच्या स्लिप्स, चेक लिहीताना हमखास चुका व्हायच्याच. ते नसतानाही बँकेत गेलं की जेव्हा लोक पी.डींची मुलगी म्हणून बोलायचे तेव्हा खूप भारी वाटायचं. लोकांच्या सह्या तपासून लाखांचे व्यवहार करण्याची जबाबदारी असणार्‍या व्यक्तीला नंतर आपली सहीही नीट करता येऊ नये हे केवढे दुर्दैव.

नंतर आजार गंभीर होत गेला तसं तसं त्यांच्या अनेक गोष्टींवर बंधनं येऊ लागली. शिवाय आपण बापाचं कर्तव्य, मुलींचं लाडकौतुक करायला कमी पडतोय की काय अशी सतत निराशा त्यांना ग्रासू लागली. ज्या वयात मुलं ' माझे बाबा हे पण करु शकतात' असं मोठ्या अभिमानानं सांगतात त्या वयात आम्हाला स्वतःलाच 'आपले आण्णा हे हे करु शकत नाहीत, ते आपणच केलं पाहिजे' असं समजवावं लागलं. त्यांचं राज्य नाईलाजानं आम्हाला काबीज करावं लागलं.

पुढे या आजारावर उपचार म्हणून खूप मोठी सर्जरी झाली आणि त्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली. आईचं ऑफिस सुरु होतंच. बहिणींची लग्न झाली होती. त्यामुळे मग घरावर सत्ता आम्हा दोघांचीच. त्यातही मला वाटतं गोळ्या, औषधांच्या धाकामुळे तेच माझ्या राज्यात राहिले असतील. पण तो फक्त आम्हा दोघांचा एकत्र घालवलेला काळ माझ्या आयुष्यभराची साठवण होऊन बसेल याची कुणा कल्पना? त्यांना बाहेर जाता येत नाही म्हणून घरी मिसळ पार्सल आण, आपण पाहिलेला सिनेमा त्यांनीही बघावा म्हणून पुन्हा त्याचीच डिव्हीडी घेऊन ये, लायब्ररीत त्यांच्या आवडीची पुस्तकं शोध, त्यात त्यांना क्लेशदायक काही नाही ना हे आधी स्वतः वाचून बघ... एक ना दोन. त्यांच्याशी मी कोणतीही गोष्ट शेअर करु शकत असे. आयुष्यातला कोणताही निर्णय त्यांच्याशिवाय घेणं अशक्य वाटायचं. कारण गंमत अशी, की ते कधीच माझ्या मनाविरुध्द निर्णय देत नसत!

माझ्या बाबाच्या राज्याचा राजा शेवटपर्यंत तेच आहेत हे त्यांना ठसवून देण्यासाठी मी कित्येकदा माझ्या शक्तीबाहेरच्या गोष्टींचा आटापिटाही केला आहे. आज त्याच सगळ्या गोष्टी लाखमोलाच्या झाल्या आहेत. बाबाच्या राज्यात आम्हाला लहानपणीच खूप मोठं व्हावं लागलं.. पण आता या राज्याचा भार पेलवत नाही.. पुन्हा एकदा लहान व्हायचंय.. बाबांचं राज्य माझ्यासाठी अजूनही चालूच आहे म्हणूनच घरचा नंबर अजूनही माझ्या मोबाईलमध्ये 'आण्णा' असाच सेव्ह्ड आहे. Happy

आशूडी Happy

आमच्या घरी एकट्या आईचं राज्य अनेकदा यायचं. कारण बाबा कायम सभा, दौरे, कागद खरेदी इ. साठी बाहेरगावी जायचे. बाबा खूप शिस्तीचे होते. त्यामुळे ते नसले की एकीकडे हायसं वाटायचं आणि एकीकडे त्यांची वाट बघणं पण व्हायचं कारण येताना ते जिथे गेले असतील त्या गावातला स्पेशल खाऊ आणायचे. एकदा त्यांनी दसर्‍याच्या संध्याकाळी मला आणि धाकट्या बहिणीला चालत प्रेसमध्ये नेलं. धाकटीसाठी दिवाळीचा ड्रेस पण घ्यायचा होता. त्यांना रस्त्यात अक्षरशः शंभर ठिकाणी माणसं भेटली. प्रत्येकाचे नमस्कार चमत्कार होइपर्यंत आम्ही ताटकळत उभं राहायचो. तिथून प्रेसमध्ये पोचल्यावर पुन्हा माणसं-नमस्कार-चमत्कार-चहा. शेवटी एकदाचं दुकानात गेलो. तिथे पोचल्यावर बाबांनी मलाच ड्रेस निवडायला सांगितला. मी एक अत्यंत कल्पना करता येणार नाही असा मांजर ओकल्यासारखा रंग निवडला. म्हणजे मला आवडला होता तो रंग आणि फ्रॉक पण ही विशेषणं नंतर मिळाली. एक तर बाबांनी शेवंतीच्या वेण्या-बिण्या काहीच घेऊन दिलं नाही. इतकी पायपीट, किती तरी वेळ उभं राहाणं आणि शेवटी मी निवडलेल्या फ्रॉकची बेसुमार चेष्टा ह्या सगळ्यामुळे बाबांचं ते दोन-तीन तासांचं राज्य अगदी नको झालेलं आठवतं.

एकदा आई घरी असतानाच बाबांनी मला हाताशी घेऊन आमटी बनवली होती. आई देवपुजेला बसलेली आणि बाबांचे प्रश्न. तिला मुद्दाम चिडवण्यासाठी मसाल्याचा डबा समोर ठेवून त्यातले जिन्नस हे कुठे ते कुठे असं विचारत होते.

असे छोटे मोठे प्रसंग सोडले तर लहानपणी त्यांच्या तावडीत आम्ही फारशा सापडलो नाही. नंतर मी बारावीत असताना आई आणि सगळी भावंडं चुलतभावाच्या मुंजीसाठी पुण्याला गेले होते, चांगले पंधरा दिवस. तेव्हा रोज वाडिलालचे आइस क्रीम कप्स त्यांनी माझ्यासाठी आणले होते. बाकी पण खाण्यापिण्याचे लाड खूप केले. पण आम्ही एकुणात सर्व्हायवल फेजमध्ये ते पंधरा दिवस कसेबसे पार पाडले होते.

मग थेट ईशान ३ महिन्यांचा होता तेव्हा पुन्हा एकदा त्यांचं आजोबा म्हणून राज्य आलं. आईला कुठे तरी जावं लागलं. ती तर पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत होती. त्यामुळे माझ्यावर सुद्धा आई म्हणून पहिल्यांदाच राज्य होतं. आईने त्यांना नव्याने सूचना (तिची घुटी-बिटी कामं असतील तेव्हा तुम्ही बाळाकडे बघा इ) दिल्या. बाकी सगळं मॅनेज होउन गेलं पण आंघोळीचा प्रश्न होता. मी इतक्या चळवळ्या बाळाला एकटीने आंघोळ कशी घालणार ह्याचं त्यांना प्रचंड टेन्शन आलेलं, मला सुद्धा Uhoh थोड्या थोड्या वेळाने त्यांचे प्रश्न सुरू होते.
"बाळाला आंघोळ घालतेस ना ?"
"बाळाला आंघोळ कधी घालतेस ?"
"आंघोळीचं काय ठरलं ?"
"कशी काय घालणर तू आंघोळ ?"
"सगळं सामान आधीच काढून ठेव"
"त्याला इकडे दे, तू तयारी कर"
"पाय घसरणार नाही ना ?"
"लहान बाळांना रोज आंघोळ घातलीच पाहिजे का ? त्यांना काही घाम येत नाही. धूळ-बिळ काही नाही. घरात तर असतात"
"प्रदीपला बोलावू का प्रेसमधून ? तो टॉवेल धरून उभा राहील" (प्रेसमध्ये बाइंडिंगसाठी नोकरीवर ठेवलेल्या प्रदीपला ते लहान बाळाच्या आंघोळीसाठी टॉवेल धरायला घरी बोलावणार होते. हा आमध्या घरात एकदम हहपुवा किस्सा आहे.)
"नाही तर असं कर आई आली संध्याकाळी की मग आंघोळ घाल"
"जाउ दे नाही तर. एक दिवस नाही घातली आंघोळ तर काही बिघडत नाही."
"हे बघ, तू एक काम कर, गरम पाण्यात मऊ फडकं बुडव आणि नुसतं पुसून काढ त्याला"
एक तर माझी तंतरली होती त्यात बाबांनी एकदमच खालसा केलं. शेवटी ईशानला नुसत्या ओल्या फडक्याने पुसून काढला तेव्हा कुठे त्यांना जरा हायसं वाटलं.

दोन अत्यंत सिरियस निरिक्षणे नोंदवू इच्छितो.
यासाठी माझी आयडी इब्लिस आहे या कडे कृपया दुर्लक्ष करा ही विनंती.

१. :नाकाला जीभ लावलेला बाहुला:
२. (संपादित)

मैं और मेरे बहन भाई
अक्सर ये बातें करते हैं
अण्णा होते तो ऐसा होता,
अण्णा होते तो वैसा होता.

हर हफ्ते होम डेपो जाते
नया नया फर्निचर बनता
कस्टम मेड बूकशेल्फ होते
यूं वाले शू रॅक होते
इतनी बढिया क्रिब बनती
आयकिया का मूंह नहीं देखना पडता
सारा हार्डवूड का सामान रहता
घरमें पालिश के छींटे रहते
टेक की खूशबू रहती
पचासों कब चाय बनती
सारी और सिगरेट का धुआं रहता

मैं और मेरे बहन भाई
अक्सर ये बातें करते हैं
अण्णा होते तो ऐसा होता,
अण्णा होते तो वैसा होता

बढिया कॅमेरा और लेंसेस खरीदते
फुर्सत मिलते ही फोटो ग्राफी के लिये भागना पडता
नाक वरती कर, कान खाली
सुनते सुनते धूप मे तपना पडता
सब मेहमानोंके पोर्ट्रेटस खींचे जाते
हर शहर के झू में जाते
अक्वेरियम मे जाते
फूल, तितलींया, भंवरे,
हिरन, खरगोश, पंछी
न जाने और क्या क्या
सब कॅमेरेंमें कैद किये जाते

मैं और मेरे बहन भाई
अक्सर ये बातें करते हैं
अण्णा होते तो ऐसा होता,
अण्णा होते तो वैसा होता

हर दूसरे दिन फिश स्टोअर जाना पडता
फ्लूक, सामन, व्हाइटिंग, पोर्गी
जिनमे नाम पढ भी नहीं सकते
सभी फिश लाने पडते
क्या सूशी उनको रास आती ?
क्या स्टीम्ड क्रॅब्स उन्हें भाते ?

मैं और मेरे बहन भाई
अक्सर ये बातें करते हैं
अण्णा होते तो ऐसा होता,
अण्णा होते तो वैसा होता

गॅस ग्रिल घरमें कभी न आती
सालभर कोयले की सिगडी जलती
आर्टिचोकसे लेकर झूकिनी तक
हर सब्जी ग्रिल होती

उसी सिगडी पर सीघ तपाके
बांसमे छेद करके
बांसुरीया बनती
घरभरमें बांस के ढेर रहते
यहां वहां कॉर्क की थैलिंया
पालिश के दाग लगते सफेत किचनमे
मां के चेहरे पर शिकन रहती

मैं और मेरे बहन भाई
अक्सर ये बातें करते हैं
अण्णा होते तो ऐसा होता,
अण्णा होते तो वैसा होता

गरमियों के उनके साथ बियर पीते
खास मौके पे स्कॉच
क्या ब्लू लेबल उनको पसंद आती ?
क्या टकिला वे शौकसे पीतें ?

मैं और मेरे बहन भाई
अक्सर ये बातें करते हैं
अण्णा होते तो ऐसा होता,
अण्णा होते तो वैसा होता

नाती पोतों को गाने सुनाते
कागज से, लकडीसे
अ‍ॅमझॉन के बक्सोंसे खिलोने बनते
पतंग बनते घरमें बनी गोंदसे
दीवारोंपे चित्र बनते
दिवालीपे रंगोली सजती

मैं और मेरे बहन भाई
अक्सर ये बातें करते हैं
अण्णा होते तो ऐसा होता,
अण्णा होते तो वैसा होता

इब्लिसकाका संवाद वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्ही काय ऐकु शकता तुम्हाला काय वाचता येत ह्यावर ते अवलंबुन आहे.

Pages