होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य इना, मीही तुम्ही म्हणताय तेच म्हणतेय की जर एखाद्याने शरीराची माहिती देणारा लेख मायबोलीवर लिहिला आणि खाली डॉ. अबक किंवा सिए अबक अशी सही केली, आपल्या प्रोफाईलमध्ये एक फोटो लावला, नाव लिहिले, गाव लिहिले तर याच्यात एथिक्सचा प्रश्न आलाच कुठे?

आणि मी साती किंवा करकरे या दोघांनाही व्यक्तिशः ओळखत नाही किंवा मी स्वतःही डॉक्टर नाहीय त्यामुळे तुम्ही जे "पण हे जर का समजत नसेल तर वेड पांघरणे झाले" लिहिलेय ते कशासंदर्भात हे लक्षात आले नाही.

पण हे जर का समजत नसेल तर वेड पांघरणे झाले>> ते व्यक्तिशः तुम्हाला उद्देशून नाहीये पण अडून अडून जो पुरस्कार चालू आहे त्यासाठी आहे. पण मुळातच जे काही ३-४ लेख आले त्यांचा हेतू फक्त माहिती देण्यासाठीच आहे असे मला अजिबात वाटत नाही. सकृतदर्शनी तुम्ही बोट दाखवू शकत नाही पण मुळातच पेनकिलर्सचा उद्देश करणे आणि मग तुलना करून होमियोपथी चांगली वगैरे. हे मार्केटिंग झाले हो.

मला करक-यांच्या हेतुबद्दल काही म्हणायचे नाहीय. मायबोलीवर कोणी काय लिहावे याबद्दल मी काय सांगणार? आणि करकरे जर मार्केटींग करत असले तर होमियोपथीविरोधातल्या इथल्या पोस्ट आणि लिंक्स वाचुन (माझ्यासारखा) एखादा ज्याने होमिओपथी कधी वापरलीच नाही तो यापुढे कधी होमिओपथीशी संबंध आला तर इथल्या पोस्टस आठवेल हे नक्की. त्यामुळे खरेच मार्केटींग असेल तर निगेटिव मार्केटींग झालेय करकरेंचे.

मी आधीच माझ्या पोस्टीने विषयांतर होतेय हे सांगुन मग माझी पोस्ट लिहिली. तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र केल्यामुळॅ मला कळेना मी कसले वेड पांघरतेय ते. असो. माझा मुळ मुद्दा आहे तिथेच राहिला.

तुमच्या प्रश्नाला एकच उत्तर मिळेल असे मला वाटत नाही. इतके सरळ असते तर इथे ऐवढे रामायण घडलेच नसते. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर लोकांना स्वतःची जाहिरात करण्यास परवानगी नाही. अर्थात हे चूक असेल तर वर माझ्या विधानांना अर्थ नाही. ते मागे घेणेच उत्तम होईल. पण मुळात आपल्याकडे आणि तसेही भारतीय लोक नियम पाळतात असे वाटत नाही. इथे एखादा रोग का होतो त्यावर लिहिले असते तर ठीक आहे. पण तो मी बरा केला असे आले तर ते अडून का होईना मार्केटींगच झाले असे माझे मत आहे.

कालच हॉलिवुडची प्रसिद्द तारका अँजेलिना जोली हिने आपल्या दोन्ही स्तन काढून टाकण्याचा निर्णय जाहीर
केला आहे, ह्याचे कारण तीने आपले जेनेटीक्स टेस्ट करून घेतले ह्या टेस्टमध्ये तीला फॉल्टी जिन्स असल्याची माहीती मिळाली आणि आज च्या संशोधना प्रमाणे तीला कँसर होण्या ची शक्यता जास्त आहे असे वर्तवले गेले.

अश्या टेस्ट खरोखरच खरा निर्णय देतात का ?

ह्या वर आलेल्या लेखात एका लेखिकेने कँसर झाल्यावर एका स्तनाची शस्त्रक्रिया करून घेतली
व नंतर दु सर्या स्तनाला वाचवण्यासाठी जेनेटिक टेस्ट केली जी नेगेटीव्ह आली, याचा अर्थ जर ती ने ही टेस्ट अगोदर ( पहील्या स्तनाला कँसरग्रस्त होण्या आधी) तर बिकट परीस्थीती आली असती.
http://www.guardian.co.uk/commentisfree/2013/may/14/angelina-jolie-truth...

साधना, इब्लिस किंवा सातींनी जर त्यांच्या खर्‍या नावाने माहितीपर लेख लिहिला, आणि त्यामुळे 'हे चांगले डॉक्टर दिसतात - बरीच माहिती आहे की यांना' असं वाटून लोक त्यांच्याकडे उपचारासाठी गेले तर ती जाहिरातच झाली ना? फारतर कमर्शिअलऐवजी इन्फोमर्शिअल होईल इतकंच. म्हणून त्यांना तसं करणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसावं.
तुमचा प्रश्न हाच होता का?

विकु, मस्त पोस्ट्स.
आशीष, तू दिलेल्या लिंक्स वाचायच्या आहेत मला अजून.

तसं बघितलं तर ज्या नावने ह्या व्यक्ति इथे वावरतात त्या नावाने तर जाहिरात झालीच आहे. असो. हे त्यांच्या तत्वात बसत असेल अथवा नसेल तर तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. ज्या हेतुने त्यांना ओळख उघड करु नये असे वाटते आहे त्याचा आदरच आहे.

गुगलुन बघा फक्त ' doctor's in pune' म्हणून. जस्ट डायल सारख्या निव्वळ जाहिरातींच्या साईट्स वर सुद्धा जंत्री मिळते आहे डोक्टर्सची. व्यक्तिशः मला त्यात आक्षेप नाही. वरील चर्चेच्या अनुषंगाने इथे सांगितलं इतकच.

नतदृष्ट,
"मी अमुक एक डॉ आहे, माझा पत्ता अन फोन नं अमुक आहे" याला जाहिरात म्हणत नाही.
डॉ बत्रा, व्हीएलसीसी वगैरे जाहिराती झाल्या. दावे करणे हा महत्वाचा फरक आहे.
साती किंवा इब्लिसने माझ्या दवाखान्यात या अन १००% बरे व्हा असं काही लिहिलं तर त्याला जाहिरात म्हणता येईल. अन्यथा फक्त माहिती.

<<आम्हीही इथे माबोवर जेव्हा लेख लिहितो तेव्हा स्वतःचे खरे नाव क्लिनिकचा पत्ता यापैकी काही उघड होऊ देत नाही. अ‍ॅज पार्ट ऑफ एथिक्स(काही लोकाना तो भ्याडपणा वाटतो ) >>

आयला, या न्यायाने डॉ. कैलास गायकवाड फार फार शुर अथवा अनएथिकल आहेत, कारण ते माबोवर स्वतःच्याच नांवाने वावरतात. त्यांना बुरखा घालायची गरज का भासत नाहि, सो कॉल्ड एथिक्सच्या नांवाखाली??? Happy

इट्स अ नो ब्रेनर.

डॉ. कैलास गायकवाड मर्यादा सोडुन, ओपन फोरम वर बरळत किंवा गरळ ओकत फिरत नाहित कि ज्यायोगे ते अडचणीत येउ शकतात. Happy

त्यांना बुरखा घालायची गरज का भासत नाहि, सो कॉल्ड एथिक्सच्या नांवाखाली??? >> म्हणून तर म्हटले ना एक उतर मिळणे अवघड आहे. आता होमियोपथीनुसार काही इलाज झाला तर उत्तम Happy

एखाद्या डॉक्टरला माबोवर ववरताना आपला नाव पत्ता जाहीर होऊ नये असे वाटले तर त्यात गैर नाही. एकतर माझ्या समजुतीप्रमाणे डॉक्टरांना आपली जहिरात करता येत नाही. शिवाय मा बो वरील लेखन आणी professional consultation यात गल्लत होऊ नये हाही हेतु असावा. अमक्या रोगवर तमके औषध चांगले असे लिहिले, कुणीतरी ते वाचून घेतले आणी मग गुण आला नाही म्हणून खटला केला तर? साती आणी इब्लीस यांनी केलेले लेखन फक्त माहितीप्रद आहे. डॉ कैलास गायकवाडांचे उदाहरण इथे अप्रस्तुत आहे कारण ते येतात ते गझलकार म्हणून. पुणे मुंबई बस मध्ये आपल्या शेजारी एक डॉक्टर आला तर तो इतर गप्पा मारायला तयार असेल पण एखाद्या रोगावर औषध सुचवणार नाही. अगदी एखादा वकिलही माबोवर कायदेविषयक जनरल लिहू शकेल पण स्पेसिफिक समस्येवर या व्यासपीठावरून सल्ला देणार नाही. देऊही नये. डॉक्टर पेशंट या नात्यात अभिप्रेत असलेली गुप्तता इथे नसते. आयडेंटीटी थेफ्ट च्या जमान्यात आपले खरे नाव पत्ता गुप्त राखण्याचा अधिकार प्रत्येकाला असावा.

पूजाजी ,

तुम्ही लिंक दिलेले पुस्तक मी वाचले नाही. वाचणारही नाही. पुस्तकाच्या नावतच अ‍ॅलोपॅथी हा अस्तित्वात नसलेला शब्द असलेले हे पुस्तक मी वाचलेल्या अनेक भारतीय आणी विदेशी होमिओपेथी पुस्तकापेक्षा वेगळे नसेल. खरे तर मीही पुस्तक लिहू शकेन. उदा.

प्रकरण एक.

शनिवारची सकाळ. देशपांडे सरांच्या घरून फोन आला. सर फारच आजारी होते आणी काकूंनी फोन केला होता. देशपांडे सर म्हणजे आमचे गणिताचे सर. स्कूटर सरांच्या घराबाहेर पार्क करतानाच मनात अशुभाची पाल चुकचुकली. लोक गंभीर चेहेर्‍याने येजा करत होते. बांबू, पांढरे कापड, कडबा, मडके वगैरे सामान बाहेर होते. आत गेलो. सर पलंगावर झोपले होते. उशाशी काकू. समोर त्यांचा मुलगा आणी एक दोन डॉक्टर्स होते. काकुंनी हुंदका देत सांगितले की डॉक्टरानी आता आशा सोडली आहे. काही तासांचाच अवधी दिला आहे. आता तूच वाचव माझे कुंकू. मी मनात म्हणले "हे लोक आधी अ‍ॅलोपथी कडे चकरा मारतात आणी शेवटी होमिओ ला शरण येतात". सरांची तशी जुनी ओळख असल्याने ड्रग पिक्चर मनात तयार होतेच. एकदोन क्षण डोळे मिटून हानेमान स्मरण केले आणी ट्यूब पेटली. नॅट्रम मूर ! डिकीत किट होतेच, त्यात नॅट्रम मूरही होते. तोंडात गंगाजल आणी तुळशीपत्र घालण्या ऐवजी हे औषध कशाला असे कुणीतरी पुटपुटले. मी दुर्लक्ष करून गोळ्या आणी चमचा भर पाणी सरंच्या तोंडात घातले. आणी काय आश्चर्य , सर उठून बसले. माझी मॉर्निंग वॉक ची वेळ झाली असे म्हणून वॉकला निघूनही गेले.

विकु, सरांना फक्त हायपोग्लायसेमिया झाला असेल.
थोड्याश्या साखरेच्या गोळ्या पोटात गेल्या म्हणून शुगर नॉर्मल होऊन उठून बसले असतील.
Wink

विकुंनी माणूस मरण्याच्या आधीच त्यांना "पुढची" तयारी करायला लावली Happy कोणत्याही पॅथीवर अजिबात विश्वास नसलेली, महा-आस्तिक किंवा महा-नास्तिक माणसेही तसे कधी करत नाहीत Happy

एकदोन क्षण डोळे मिटून हानेमान स्मरण केले आणी ट्यूब पेटली. नॅट्रम मूर !!!!!>>>>>>>>>

विकु ..इट्स डॉ. सॅम्युअल हॅनीमन..!! इथेच क्लिअर करते. नाही तर उद्या तुम्ही हनुमान कराल.. आणि मग हनुमानाच्या संजीवनी वर पण आक्षेप घ्याल Lol

काय भरवसा... तसंही मी सांगितलेलं पुस्तक वाचण्याचा कमीपणा करण्यापेक्षा स्वतः पुस्तक लिहिण्याचा मोठेपणा करण्यातच आपणास स्वारस्यं असल्याचे दिसते !!

असो... चालु द्या Happy

विजय कु

आपण फारच मस्त लिहित आहात हो !!!!!

जरा आम्हा पामरान कळू देत ना natrum mur drug picture!!! that to at end stage of life!!!
आपले होमिओपथी चे द्यान प्रकट करा येथे...

आम्हाला तर काय फक्त sugar pills n bills येता फक्ता.....

कल्पनाशक्ति, लेखन फारच भन्नाट.....
चालू द्या....

( प्रत्येक प्रतिसाद देणारा विशयान्तर करतोय... म्हनल आपण थोदा करू... नाहितरी मूळ मुद्दा
बाजूलाच पडला आहे !!!!!!!!!!!!!)

प्रमोद सहस्त्रबुद्धे यांचा २००५ साली लोकसत्तेत आलेला,आणि एका मित्राने काल फेबुवर शेअर केलेला लेख.

होमिओपॆथी एक थोतांड
प्रमोद सहस्रबुद्धे
July 18, 2010 - 9:37 am
होमिओपाथी एक थोतांड*

लान्सेट या नियतकालिकातील एका लेखाने होमिओपाथीचे थोतांड परत उघडे केले आहे. होमिओपाथीवर स्वतंत्रपणे झालेले हे एकटेच संशोधन नाही. आता पर्यंत कमीत कमी बारा वेळा असे संशोधन झाले आहे. या सर्व संशोधनातून एकच निष्पन्न झाले आहे की होमिओपाथीची औषधे ही प्लासेबोपेक्षा आÆधक गुणकारी नाहीत. प्लासेबो म्हणजे औषध नसलेली पण औषधासारखी भासणारी वस्तु. ही वस्तु रोग्यास दिली तर केवळ मनाने उभारी येऊन तो बरा होऊ शकतो. पण या बरे होण्यात प्लासेबोचा सहभाग नसतो. चाचण्यां मधून प्लासेबो वा औषधे रोग्यास (न सांगता) दिली जातात. जे औषध प्लासेबोपेक्षा जास्त गुणकारी दिसते ते औषध चाचणीत पास करतात.

होमिओपाथीची तत्वे, इतिहास व औषध बनवण्याची पद्धत या सर्वातून होमिओपाथी हे एक थोतांड कसे आहे हे कळायला अडचण येत नाही. वैज्ञानिक विश्वात होमिओपाथी ही एक अंधश्रद्धाच मानली जाते. भारत वा अन्य काही देश सोडल्यास बहुतेक देशांमधे होमिओपाथीचे सरकारमान्य वा विश्वविद्यालयीन शिक्षण दिले जात नाही. केवळ होमिओपाथी शिकलेल्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास बऱ्याच देशात बंदी आहे. भारतातही अशा पद्धतीवर निर्बंध असायला हवेत.

इतिहास:

होमिओपाथीची सुरुवात ख्रिश्चन हानमन या वैद्यकाने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस केली. या सुमारासचे वैद्यकशाðा हे विज्ञानाभिमुख नव्हते. रोगी माणसाला जखम करुन त्याचे रक्त वाहु देण्यासारख्या उपचार पद्धती त्यावेळेला प्रचलीत होत्या. अशा वेळी एका निराळ्या मार्गाने उपचार करण्याची पद्धत त्यांनी तयार केली. होमिओ म्हणजे सम किंवा सारखे पाथी म्हणजे यातना वा संवेदना (संवेदना) हा शब्द त्यांनी प्रचारात आणला. त्यावेळच्या गैर व तापदायक उपचार पद्धतीला त्यांनी विरोध केला व नाव ठेवले अॅलो म्हणजे विरुद्ध पाथी. औषधे कशी निवडावीत, कशी तयार करावीत व कुठल्या आजारास कुठली औषधे द्यावीत याबद्दलचे निकष त्यांनी तयार केले.

ज्या पदार्थाने रोगाची लक्षणे निरोगी माणसात येतात तोच पदार्थ त्या रोगाचे औषध असतो हा त्यातील पहिला निकष. या निकषामुळेच त्यांनी आपल्या उपचार पद्धतीचे नाव होमिओ असे ठेवले. औषध जेवढे कमजोर (dilute) तेवढे प्रभावी हा त्यातला दुसरा निकष. हे दोनही निकष होमिओपाथीचे आजचे आधारस्तंभ आहेत. सुरुवातीच्या काळात हानमन हा जितक्या कमजोर प्रमाणात देत होता त्यापेक्षाही अधिक कमजोर प्रमाणात औषधे देण्यास होमिओपाथांनी सुरुवात केली. सध्या हे प्रमाण अशा पातळीवर पोचले आहे की होमिओपाथीच्या औषधांमध्ये औषधच उरले नाही.

औषध तयार करायची पद्धत.

होमिओपाथी म्हणजे साखरेच्या गोळ्या हे बहुतेकांच्या मनात समीकरण दडलेले आहे. या साखरेच्या गोळ्यात नेमके किती औषध असते हा फार महत्वाचा प्रश्न आहे. विचार करा की तुमच्या कडे हिंदी महासागराएवढे पाणी वा द्राव आहे. यात तुम्ही एक चमचाभर औषध टाकले व ते द्रावण व्यवस्थित ढवळले व त्यातील थोडा भाग घेऊन साखरेच्या गोळ्यांमधे टाकले तर ते होमिओपाथीचे औषध होईल. या वर्णनात अतिशयोक्ति असेल तर ती पाणी कमी सांगितल्याची असु शकते. प्रत्यक्षात अर्थातच या पेक्षा वेगळी पद्धत वापरली जाते. दहाच्या पटीत वा शंभराच्या पटीत औषधे कमजोर केली जातात. दहाच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांच्या नंतर एक्स तर शंभराच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांनंतर सी हे अक्षर लावले जाते. ३०, ६० वा २०० या एक्स ची औषधे आपल्या कडे सर्रास वापरली जातात. ३० एक्स याचा अर्थ औषध एक घेतले तर पाणी वा अल्कोहोल एकावर तीस शून्ये असतील एवढे घ्यावे असा आहे.

विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना ऎवगार्डो संख्या माहित असते. अठरा ग्राम पाणी घेतले तर त्यात सहा वर तेवीस शून्य एवढे रेणु असतात. जर का आपण तीस टन तीस एक्स औषध घेतले तर कदाचित तुम्हाला होमिओपाथीतील औषधाचा एक रेणू मिळू शकेल. ६० व २०० एक्स मधे हे औषधाचा रेणु मिळण्यास बहुदा सूर्यमालेतील सर्व द्राव औषध म्हणून घ्यावा लागेल. हे प्रमाण बघितल्यावर होमिओपाथीच्या साखरेच्या गोळ्यांमधे मूळ औषध नसतेच. त्यामुळे प्लासेबो आणि होमिओपाथीच्या औषधांच्या गुणांमध्ये काहीच फरक का येत नाही हे कळते.

होमिओपाथीच्या औषधावरचे लेबल काढल्यास ते कुठचे औषध होते हे कळण्यास काहीच उपाय नसतो. कारण त्यात मूळ औषध थेबालाही उरले नसते. याच कारणाने होमिओपाथीचे लेबल काढलेले औषध ओळखा व दशलक्ष डॉलर मिळवा असे आव्हान ही दिले गेले आहे. हे आव्हान अजुन तरी स्वीकारले गेले नाही.

निकृष्ट निदान व उपचार पद्धती:

सम लक्षणे तयार करणारे पदार्थ औषधे असतात व औषधांचे कमजोरीकरण हेच सबलीकरण ही दोनही तत्वे वैज्ञानिक पद्धतीवर सिद्ध झालेली नाहीत. कदाचित यामुळेच होमिओपाथी या पंथात अंतर्गत मतभेद व पंथ उपपंथ झाले आहेत. बाराक्षार, इलेक्ट्रोपाथी, आयसोपाथी, मिश्र होमिओपाथी अशी त्यातील काही नावे. औषध सिद्ध करताना लक्षणांचा मोठा अभ्यास केला जातो. पण बहुतांशानी ही लक्षणे प्सोरा वा खाज या प्रकारात मोडतात. ताप, आवाज, रक्तचाचणी, एक्सरे या सारख्यांमुळे मिळालेल्या माहितीचा यात समावेश कमीच असतो. या मुळे ही निदान पद्धती मोठया प्रमाणात ढिसाळ आहे. रोग्यांबरोबर जास्त बोलायचे बरेचदा खूप जाणून घ्यायचे पण निदानात आधुनिक उपकरणांचा वा चाचण्यांचा वापर करायचा नाही. अशी निदान पद्धत निकृष्टच ठरते.

उपचारासाठी जे औषध द्यायचे ते किती द्यायचे याचे होमिओपाथीत फारसे निकष नाही. त्यामुळे रुग्ण एकावेळी वेगवेगळ्या संख्येने गोळ्या घेतात. औषधाचा कमजोर पणा हा निकष आहे. त्यामुळे वेळ पडली तर एका गोळीचे तुकडे करुन घेतले तरी ती चालेल असे असते. होमिओपाथीची औषधे लक्षणांवर आधारित असल्याने ती केवळ लक्षणांवर उपाय करणारी पद्धत आहे असेही म्हणता येईल.

विचित्र औषधे

आपण खातो ते मीठ होमिओपाथीतील एक औषध आहे. लॅक्रिमा फिलिआ नावाचे औषध लहान मुलींच्या अश्रुंपासून बनविले जाते. सीमेक्स लेक्टुरालीस तर कुट केलेल्या ढेकणापासून बनवितात. काही प्राण्यांचे मल मूत्र (मेफिटीस) माणसाचे मूत्र (ऑसिडम युरीकम), कोळीष्टके अशी ही औषधे होमिओपाथीत आहेत. अर्थात या सर्वांचे भरपूर कमजोरीकरण केल्याने ती प्रत्यक्षात पोटात जात नाहीत हा भाग वेगळा.

बरे होणे

होमिओपाथीने लोकांना (निदान काही संख्येने) बरे वाटते असे त्या लोकांचे व होमिओपाथांचे मत आहे. औषध कितीही कमजोर केले असेल तरी हरकत नाही, कार्यकारणभाव माहित नसला तरी चालेल, वाटेल ते औषध दिले तरी चालेल पण बरे वाटते ना? तेवढे पुरेसे आहे असे काहींचे यावरचे मत असू शकेल. लँसेट किंवा तत्पूर्वी केलेल्या संशोधनांमधे हेच तपासले गेले आहे. की होमिओपाथीने बरे वाटते का? वैज्ञानिक चाचण्यांमधून तरी हे सिद्ध होत नाही की होमिओपाथीने बरे वाटते.

मग लोकांना जे बरे वाटते ते का म्हणून. यावरचे उत्तर ते प्लासेबो परिणामाने वाटते असे आहे. कित्येक रोग असे आहेत की ज्यांचे अस्तित्व मानसिकतेवर अवलंबून असते. मानसिक ताण हे काही रोगांचे कारण असते. प्लासेबो घेतल्यावर मानसिक समाधानाने रोग्यांना बरे वाटू शकते. होमिओपाथी हा त्यातलाच एक भाग आहे.

बरे होणे हे एकच निष्पन्न, आणि तेही वैज्ञानिक चाचण्यांमवर टिकत नाही. त्यामुळे होमिओपाथ या चाचण्यांवरच टीका करतात. खरे तर एखादे वचन वैज्ञानिक आहे की नाही हे सिद्ध करायची जबाबदारी त्याच्या उद्गात्याने घेतली पाहिजे. एखादे विधान प्रयोगाद्वारे खोटे ठरविण्याचा प्रयत्न करुनही जर खोटे ठरले जाऊ शकत नसेल तर ते वैज्ञानिक विधान असते असे वैज्ञानिक पद्धती मानते. अशा तऱ्हेने होमिओपाथीतील विधाने सिद्ध करण्याचा प्रयत्न होमिओपाथ करताना दिसत नाही.

औषध जेवढे कमजोर कराल तेवढे ते शक्तिशाली होते हा होमिओपाथीचा सिद्धांत अशातऱ्हेने सिद्ध करणे यासाठी जरुरी आहे. जेंव्हा कमजोर करण्याची क्रिया औषधाचा एक ही रेणू शिल्लक ठेवत नाही तेंव्हा त्यात काय उरते? होमिओपाथांचे यावरचे उत्तर आहे की त्याचे भूत (इंग्रजीत स्पिरिट) राहते हे आहे. हे उत्तर मजेखातर नसून ते पूर्ण पणे विचारपूर्वक दिले गेले आहे. एखादा मांत्रिक व होमिओपाथ यात यामुळे फारसे अंतर राहत नाही. फरक असलाच तर एक इथला मूळचा व रोखठोक अंधश्रद्धा जोपासणारा तर दुसरा परेदेशातून आलेला, वैज्ञानिक भासणारा पण वास्तविक अंधश्रद्धांची जोपासणी करणारा.

होमिओपाथीचे दुष्परिणाम.

होमिओपाथी ही कमजोर केलेल्या औषधांमुळे कुठलाही परिणाम न करणारी आहे. त्यामुळे त्यात दुष्परिणाम ते काय असा प्रश्न पडु शकतो. रोग्यांना सुयोग्य औषधांपासून वंचित ठेवण्याचा दुष्परिणाम मात्र त्यात होत असतो. याशिवाय काही सामाजिक स्तरावरचे दुष्परिणाम भारतात दिसतात.

होमिओपाथीचे शिक्षण हे आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर करावयाचे स्पेशलायझेशन असावे असा प्रघात इंग्लंड मधे आहे. यामुळे असे होमिओपाथ हे आपले पूर्व प्रशिक्षण न विसरता व होमिओपाथीच्या मर्यादा लक्षात घेऊन उपचार करतात व आÆत गंभीर क्षणी रोग्यांना दुसरे उपचार घ्यायला सांगतात.

भारतात होमिओपाथीचे शिक्षण हे या पद्धतीने दिले जात नाही. समज नसलेल्या तरुण वयात, फारसे काही माहित नसताना लोक या पद्धतीच्या शिक्षणाकडे वळतात. जेंव्हा असे तरुण व्यवसायाकडे वळतात तेंव्हा त्यांच्या लक्षात येते की हा धंदा फारसा चालत नाही. मग हेच तरुण डॉक्टर या नावाखाली सर्रास आधुनिक वैद्यकाची औषधे देऊ लागतात. ही औषधे देण्याचा ना त्यांना आÆधकार असतो ना शिक्षण असते. यामुळे मोठया प्रमाणात गैरप्रकार होतात. वैद्यकाने आपली जाहिरात करायची नसते अशी प्रथा आहे. काही होमिओपाथ वर्तमानपत्रातून मोठया जाहिराती देत असतात हा ही एक गैरप्रकारच आहे.

होमिओपाथीत तथ्ये असण्याचा संभव फार कमी आहे. याचा अर्थ कोणी त्यात संशोधन करु नये असा नाही. ही मुभा विज्ञान सर्वांनाच देत असतो. मात्र असे संशोधन वैज्ञानिक निकषांवर सिद्ध होईपर्यंत या प्रणालीचा सार्वत्रिक उपयोग सरकारी खर्चाने केला जाऊ नये ही अपेक्षा करणे मुळीच गैर नाही.

प्रमोद

* काही वर्षांपूर्वी (2005) हा माझा लेख लोकसत्तेत आला होता.

You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time.

त्यामुळे २०० वर्ष कोणी जगाला फसवू शकत नाही...
नौटंकी असती तर होमेओपथि केव्हाच हद्दपार झाली असती।

I feel every pathy has its own scopes and limitations.
All should respect each other's domain and find complementary roles...!

काय गप्पा कर्ता राव....!

>> नौटंकी असती तर होमेओपथि केव्हाच हद्दपार झाली असती।
असं काही नाही. नौटंकी नौटंकी असूनही सुरू आहेच की. Proud
जोक्स अपार्ट, वर्षानुवर्ष प्रचलित आहे हा कसलाच पुरावा होऊ शकत नाही.

स्वाती ,गंमत म्हणजे मागचे काही दिवस हे होमिओपथीवाले बिचारे आमची औषधे त्यांना वापरता यावी म्हणून आमरण उपोषण करतायत.
एवढा विश्वास ना स्वतःच्या पथीवर मग आमच्या औषधांवर का डोळा?

Pages