होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या वडिलाना कानात सणक येउन चक्कर आल्यासारखे होत होते, त्याना "होमिओपॅथिक" औषधाने आराम वाटला. त्यानी अ‍ॅलोपॅथिक औषधे ट्राय केली होती पण त्याने फरक पडला नाही.

अमित,
काही सर्वसामान्य आजार आणि त्याना उपयोगी पडणारी औषधे यांची यादी करता येइल का? (तसेच ती औषधे कुठे उपलब्ध असतात OTC/Prescription त्याचीही माहिती उपयोगी पडेल.)

धन्यवाद.

>होमिओपथी औषधांनी अनेकांना बरे वाटते, असे पाहिले आहे.

याला Placebo Effect असे नाव आहे. बरेचदा आपण एक औषध घेतले आहे या भावनेनेच बरे वाटते.

>ही औषधे नक्की काम कशा पद्धतीने करतात?

ती काम करत नाहीत. Avogadro Number प्रमाणे एक किलो मिठात ( किंवा अन्य कोणत्याही पदार्थात) बरेच रेणू असतात पण ते अनंत नसतात.

समजा एक लिटर पाण्यात आपण एक ग्रॅम मीठ घालून ढवळले आणी त्या पाण्यातले चमचभर पाणी दुसर्‍या एक लिटर पाण्यात घातले तर दुसर्‍या पाण्यात पहिल्यापेक्षा बरेच कमी मीठ असेल. आता दुसर्‍या भांड्यातले चमचाभर पाणी पुन्हा तिसर्‍या भांड्यातल्या एक लिटर पाण्यात घालून ढवळले तर मीठ अतिशय कमी असेल. असे करता करता एक वेळ अशी येइल की पाण्यात मीठाचा एकही रेणू नसेल. ते शुद्ध पाणी असेल. त्या पाण्याला मीठाचे पाणी म्हणता येणारच नाही. होमिओपॅथीची सर्व औषधे अशाच हास्यास्पद प्रमाणात डायल्यूट केलेली असल्याने त्या फक्त साखरेच्या गोळ्या असतात. मेडिकल सायंस जसजसे प्रगत होऊ लागले तसतशी होमिओपॅथी मागे पडली. सध्या जगात फक्त भारतात मोठ्या संख्येने होमियोपथी कॉलेजेस आहेत कारण संस्थाचालकांचा स्वार्थ, आपल्या मुलाला /मुलीला काहीही करून डॉक्टर करायाचा अट्टाहास बाळगणारे पालक आणी आयुश सारख्या केंद्र सरकारच्या संस्थांची खाबुगिरी.

होमिओपॅथीची साईड इफेक्ट्स नसतात हे मात्र खरे आहे. साखरेच्या गोळ्यांची कसली साईड ईफेक्ट्स ?

माझ्या मुलीच्या हाताच्या बोटाच्या वरच्या पेराच्या डावीकडे एक उंचवटा तयार होऊ लागला होता. बघता बघता तो बराच मोठा झाला. फॅ. डॉ ने सर्जन कडे जायला सांगितले. पण शेजारीच हो. पॅ डॉ चे क्लीनीक असल्याने खरं तर गाजराची पुंगी वाजली तर वाजली असा विचार करून दाखवले व औषधे घेतली तर त्या उंचवट्याने रिव्हर्स घेतला..आणी ४ दिवसांत बोट पूर्वपदावर....हा प्लॅसिबो इफेक्ट असेल का?

डायल्युशन इन्क्रीजेस पोटेन्सी.... अशा पद्धतीची ही उपचारपद्धती आहे.

रुग्ण बरे झाल्याची अनंत उदाहरणे पाहिली/ऐकली आहेत......पण अमुक एक प्रकारचे सगळेच रुग्ण होपॅने बरे होतात असेही नाही.

होपॅ बद्दल जाणकारांनी अधिक प्रकाश टाकला तर बरे.

आणि साईड एफेक्ट नसतो... अमुक एक नॅचरल असल्याने झिरो साइड इफेक्ट हा गैरसमज आहे. अ‍ॅलोपथिची औषधे सुद्धा या भूतलावर सापडणार्‍या नैसर्गीक गोष्टींनीच तयार होतात. वनस्पतींपासून तर अनेक औषधे ( अ‍ॅलोपथीची) तयार होतात...... तरीही त्यांना सुद्धा साइड इफेक्ट असतातच.

असो...

अ‍ॅलोपथी विरुद्ध होमीओपथी असे झालेले निखिल वागळेंचे एक चर्चासत्र आठवले.

> रुग्ण बरे झाल्याची अनंत उदाहरणे पाहिली/ऐकली आहेत

गोची तिथेच आहे. अनंत? अख्ख्या ब्रह्मांडात अनंत अणु नाहीत. केवळ ~१०^८० आहेत (काही ऑर्डर्स इकडे-तिकडे).
तुम्ही म्हणायची एक पद्धत म्हणून अनंत म्हणालात. बरोब्बर तेच 'अनुभव' आणि 'पॅथी' यामधील फरकात जाणवते.

होमिओपॅथीने कुणालाच बरे वाटत नाही (म्हणजे एकालाही बरे वाटणार नाही)
हे वाक्य
होमिओपॅथी शास्त्र नाही
यापेक्षा स्ट्राँग आहे. त्यांचे बेसीस (प्रायर्स) वेगवेगळे आहेत.

होमिओपॅथी शास्त्र(शुद्ध) नसूनही वर विजय यांनी म्हंटल्याप्रमाणे अनेकांना बरे वाटु शकते (वाटते). पण ते किती जणांना त्यामुळे फायदा झालेला नाही याच्याशी ताडून पाहिले तर तो आकडा नगण्य आहे हे लक्षात यावे. तसे नसते तर सगळ्यांनिच सर्वच व्याधींकरता तिकडे धाव घेतली असती, कॅपिटलीस्टसनी त्यात पैसे ओतून औशधे महाग करविली असती.

होमीओपथी म्हंटल्यावर बरेच जण नाक मुरडतात, का तर लग्गेच ईलाज होऊन लग्गेच बरे वाटणार असेल तरच ही औषधे द्या असे म्हणतात. पण इतर पथींप्रमाणे होमिओपथी वर वर इलाज करत नाही , तर रोगाच्या मूळाशी जाऊन इलाज करते. यावर लिहीण्यासारखे बरेच आहे.

आणी जर अलोपथी, आयुर्वेदाला साईड इफेक्ट असल्याचे मान्य आहे, मग होमिओपथीलाही ते आहेतच हे का मान्य होत नाही? आहेत की होप ला पण साईड इफेक्टस.

सिलीका ही गोळी दातांवर परीणामकारक आहे. रात्री बेरात्री जर दाढ/ दात दुखु लागले तर ही गोळी ( शक्तीनुसार ३ x , ६ x अशी मिळते ) चघळावी . दर चार तासाने घेतात. दुखणे त्वरीत कमी होते. ( तरीही सकाळी उठल्यावर दातांच्या डॉकंना दाखवले होतेच हे पण इथेच सांगतेय ह्याची नोंद घ्यावी. )

हा माझ्या घरच्यांचाच अनूभव आहे, कारण माझ्या माहेरी माझ्या मामाला बाराक्षारांची उत्तम माहिती होती. त्याचा आम्हाला बराच फायदा झालाय.

हे माझे स्वतःचे वैयक्तीक अनूभव असल्याने कृपया बाराक्षार हे थोतांड आहे, त्या साखरेच्या गोळ्यांनी काय होणार? असा वाद इथे घालु नये. मान्य नसेल तर सोडुन द्या.

हे माझे स्वतःचे वैयक्तीक अनूभव असल्याने कृपया बाराक्षार हे थोतांड आहे, त्या साखरेच्या गोळ्यांनी काय होणार? असा वाद इथे घालु नये. मान्य नसेल तर सोडुन द्या.

अस्चिग यांनी वर म्हटल्याप्रमाणे असे बरे होणारे खूप आहेत्,पण बरे न होणारे त्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत हे लक्षात घ्या.

आणि तुम्ही दातदुखीवर सिलिका ने बरे होण्याचा जो अनुभव सांगीतला आहे,तसे अनुभव माझे कित्येक पेशंट फ्रॅक्चरचे दुखणे सुद्धा व्होवेरान इंजेक्शन घेतल्यानंतर सुसह्य झाल्याचे सांगतील. व्हॉवेरानने दुखणे का कमी झाले??? हे मी पेन पाथवे.... पेन फिजिऑलॉजी आणि प्रॉस्टॅग्लॅन्डीन तयार होणे, मीडिएटर्स ऑफ इन्फ्लेमेशन आदि सर्व बाबींद्वारे सांगू शकतो..... होपॅबाबत असे आहे का?

डॉक्टर मी वरती नमुद केल्याप्रमाणेच सांगतेय की तो माझा वै. अनूभव होता. हो, व्हॉवेरॉन माझ्या बाबांच्या पाठदुखीकरता पण बर्‍याच वेळा दिले आहे, त्यामुळे ते मला माहीत आहेच. पण ते इंजेक्शन देणार्‍या तुमच्या अलोपथीच्या डॉकनीच स्पष्ट सांगीतलेय की हे जास्त वेळा घेऊ नये त्याने विपरीत परीणाम होतात्.:स्मित:

होपथीने असे कितीसे विपरीत परीणाम झाल्याचे दिसलेत? बाकी आशिष महाबळ यांच्या कुठल्याच विधानावर मला वाद घालायचा नाहीये. आणी त्याचे कारणही मला सांगण्यात इंटरेस्ट नाहीये.:स्मित:

होमीओपथी कधी कधी उपयोगी पडते. परंतू ह्याचे साईड ईफेकट्स नाहीत म्हणून अनेक लॉक ह्याच्या मागे लागतात आणि बाकीच्यांनापण नादाला लावतात. थातूरमातूर आणि काही वेळेला थोड्या गंभीर गोष्टींवर नक्कीच उपयोग झालेला आईकला पण ह्याचा मला स्वतः कधीही फायदा झाला नाही. फक्त डॉक्टरचा उत्तम फायदा झाला. हे मुळापासून बरे करते वगैरे विधाने मार्केटिंगची आहेत ह्यात अजीबात तथ्य वाटत नाही. वर म्हटल्या प्रमाणे लोकांना आपला पाल्य डॉक्टरच झाला पाहिजेल म्हणून लॉक ह्याला प्राधान्य देतात. ह्याशिवाय बक्कळ पैसे संस्था चालकांना मिळतात आणि त्यात त्यांचा फायदा आहे.

माझ्यामते कन्सर वर ह्याचा काहीही फायदा होत नाही. निदान माझ्या वडिलांना आणि काकांना काहीही फायदा झाला नाही. दणकून फी मात्र गेली. एखाद्या पेशंटला कुठेतरी फायदा झाला असे वाटते मात्र त्याच्या जोडीला १०० लोकांवर काहीही फायदा झाला नाही हे स्वतःहून कोणी सांगणार नाही. त्यामुळे ज्याने त्याने विचार करून ह्या उपचार पद्धतीकडे वळावे हे उत्तम. फक्त भारतातच होमीओपथीचा जास्त उदो उदो आहे जिथे ही पद्धत निघाली म्हणजे जर्मनीमध्ये तिकडे ह्याला मान्यता नाही असे मला एका स्वतः होमीओपथी असलेल्या डॉक्टरने सांगितले. खरे खोटे त्यालाच माहिती.

अमित माझ्या घरी सर्व अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर आहेत. मला स्वतःला टॉन्सिल्सकरता होमिओपॅथीचा खूप उपयोग झाला! माझी मुले लहान होती तेव्हा मी माझ्या मावशीच्या सल्ल्याने मुलाना होमिओपॅथी,बाराक्षार व पुष्पौषधीही दिल्या त्याचे results amazing होते व आहेत,आमचा अनुभव उत्तम आहे.अचूक निदान व योग्य औषध नक्कीच छान results देते. तुमचे सर्व लेख आवडले.पुणेकर असल्याने तुम्हाल भेटायला तुमची लेक्चर्स ऐकायला नक्की आवडेल!

मुळात कुठलीही उपचार पद्धती वाईट नाही. प्रत्येकाची स्वत:ची अशी वैशिष्टये आहेत. पण होमिओपॅथीच्या संदर्भात इतकंच म्हणेन की व्याधी आणि व्यक्ती यांचा सखोल अभ्यास करून जेव्हा औषध दिलं जातं तेव्हा रिझल्ट येणं स्वाभाविक आहे.

याला जर आपण प्लासिबो इफेक्ट म्हणत असाल तर सर्वात आधी सर्जरी हा एकमेव उपाय आहे असं धमकावून सांगितलेल्या आणि काहीच पर्याय नाही म्हणून होमिओपॅथी try करणाऱ्या cured पेशंटशी तुम्ही बोलून घ्या. त्यांचे रिपोर्टच सगळी उत्तरं देतील.

इतकच कशाला कित्येक बालरोगतज्ञ क्रोसिन पुढे हतबल होऊन आता होमिओपॅथीचा आधार घेत आहेत. कारण मुलांमधील आजारामध्ये त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषधे जितक्या प्रभावी पणे काम करतात त्या उलट प्रतिजैविके (antibioticanti किंवा antiallergic) किती तकलादू ठरतात हे अनुभवातून सिद्ध झालेलं आहे.

steroid वापरून रोगाची लक्षणं तात्पुरती नाहीशी करण्यात कुठला आलाय पुरुषार्थ?? एक पे अनेक side effects FREE देऊन आपल्या शरीराची प्रयोगशाळा करणं कधीही मुर्खपणाच नाही का??

दहा ठिकाणी फिरून, अ‍ॅलोपॅथीची खुराक वापरूनही "जैसे थे" किंवा बहुतांशी spoiled cases मध्ये राखेतून महाल बांधावा अशी अपेक्षा जर होमिओपॅथी डॉक्टर कडून करत असाल तर कृपया जागे व्हा.

“like cures like” म्हणजेच काट्याने काटा काढावा या तत्वावर होमिओपॅथी आधारभूत आहे. काटा लागला तर आपण तलवार न वापरण्याइतके सुजाण आहोत आणि तरीही साध्या पोट्दुखीसाठी डॉक्टर कडे गेल्यावर एक painkiller गोळी दुखीसाठी , एक antacid painkiller संबंधीत side effect टाळण्यासाठी आणि जमलंच तर मलटीविटामिन ताकदिसाठी आणि न जाणो काय काय दिलं जातं. distilled water चं इंजेक्शन दिलं तरी बरं वाटत. आणि त्यात जर डॉक्टरने भली मोठी lab investigation ची लिस्ट दिली तर सोने पे सुहागा!!! खूप काळजीवाहू आहे आपला डॉक्टर हे आत्मिक समाधान लाभतं.

१ ) होमिओपॅथीची सर्व औषधे अशाच हास्यास्पद प्रमाणात डायल्यूट केलेली असल्याने त्या फक्त साखरेच्या गोळ्या असतात. मेडिकल सायंस जसजसे प्रगत होऊ लागले तसतशी होमिओपॅथी मागे पडली. >>>>>>>>

जगातली दुसऱ्या क्रमांकाची, सर्वात लोकप्रिय उपचार पध्धती म्हणजे होमिओपॅथी !!!

http://hpathy.com/abc-homeopathy/what-is-homeopathy-definition-and-details/

२ ) होमिओपॅथीची साईड इफेक्ट्स नसतात हे मात्र खरे आहे. साखरेच्या गोळ्यांची कसली साईड ईफेक्ट्स ?>>>>>>>

तुमच्या शरीराला अतिशय कमी औषधाचा stimulus लागतो. जेंव्हा ही मात्रा कमी तेव्हा त्यातील साईड ईफेक्ट्सही नील !!

मुळात आपल्या शरीराची रचना विधात्याने इतकी विचार पूर्वक केली आहे की बहुतांश आजारांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती बखूबी आपलं काम निभावते. पण ज्याप्रमाणे आग लागली तर वेळीच पाण्याचा मारा केला तर नुकसान कमी होतं तसंच वेळीच योग्यं आणि विचारपूर्वक उपाय केले आणि आवश्यकते नुसार औषध घेतलं तर आपण आपल्या आरोग्याला निट सांभाळू शकतो.

प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टर याच विचारसारणी ने कार्यरत असतो. कारण preservation of health is the sole mission of any physician हे त्याला ठाऊक असतं . या प्रक्रिये मध्ये रोग्याचेही तितकेच योगदान असते कारण ताप आला तर क्रोसिन आणि जुलाब झाले तर लोमोटील हे गणित इतक साध नसतं.

व्यक्ती बदलली की औषध बदलतं. आणि जिथे आपल्या हाताची पाचही बोटं सारखी नाहीत तिथे सर्व आजारांचा एकच इलाज कसा बरं असू शकतो.?? एकाच आईने जन्म दिलेली जुळी मुलं सुद्धा सारखी नसतात . मग प्रत्येकाच्या वेदनेला diclofenac आणि acidity ला rantac 150 हे उत्तर असेल का??? तात्पुरत असेलही पण याचे long term side effects फार जीवघेणे असू शकतात. कृपया हे वाचा.

http://pharma.financialexpress.com/20051115/market01.shtml

तुम्हाला हार्ट अ‍ॅटॅक येत असेल तर अ‍ॅलोपाथिची अ‍ॅस्प्रीन सुध्दा बहुमोलाची. काही रोगांवर जिथे अ‍ॅलोपॅथीत औषधे नाहीत उदा. तुम्हाला मस आला असेल अश्यावेळी हॉमिओपॅथी चांगले काम करते. काही रोगांवर आयुर्वेद अत्यंत परिणाम कारक आहे.

पर्यायी औषधोपचार कधी कधी आश्चर्य कारक काम करताना पाहीलेत. योग विद्या धाम चे सर्वोसर्वा योगाचार्यं मंडलीक सरांनी सोरायसीस चा पेशंट मातीच्या उपचारांनी बरा केला.

सबब रोग/ रोगाचा काळ्/रोग्याची मुळ प्रकृती नुसार वेगवेगळी उपचार पध्दतीचा लाभ घ्यावा.

हं.
३ -४ धागे आले जाहिरातींचे पण देत नव्हतो प्रतिसाद. आज बिल झालं.

हा अत्यंत हलकट प्रतिसाद लिहितोय. कारण एकच. अ‍ॅनॉन नसला, तर कोणताही मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर पब्लिकमधे इतक्या ऑनेस्टली बोलूच शकणार नाही. वर कैलासजींनी प्रयत्न केला आहेच ऑनेस्टीचा. तस्मात, पेशन्स असेल तर वाचा.

>>सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी<<

लेखक महोदय,

"पेन किलर" हा शब्द एका तरी "अ‍ॅलोपथीच्या" पुस्तकात दाखवता का मला?

अ‍ॅलोपथी हा शब्दच मुळातच तुम्ही होमिओपथीवाल्या स्युडो वैदूंनी बनविलेला डिरोगेटरी शब्द आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

गूगलवर "अ‍ॅलोपथी" हे सर्च केलं, तर पहिली लिंक ही मिळते , अन तिथे हे लिहिलं आहे :

Allopathic medicine is an expression commonly used by homeopaths and proponents of other forms of alternative medicine to refer to mainstream medical use of pharmacologically active agents or physical interventions to treat or suppress symptoms or pathophysiologic processes of diseases or conditions.[1] The expression was coined in 1810 by the creator of homeopathy, Samuel Hahnemann (1755–1843). Never accepted as a mainstream scientific term, it was adopted by alternative medicine advocates to refer pejoratively to mainstream medicine.[2] In such circles, the expression "allopathic medicine" is still used to refer to "the broad category of medical practice that is sometimes called Western medicine, biomedicine, evidence-based medicine, or modern medicine".[3]

पेजोरेटिव्ह म्हणजे हिणवणे. हिणवणारे कोण? हनीमान Rofl

***

वेदना थांबवणे हे लक्षणे बंद करणे. सिम्प्टम रिलिफ आहे. अशी सिम्प्टम बेस्ड ट्रीटमेंट कशात करतात, अन का, ते समजतं का? उदा. क्लोरोक्विनच्या गोळीने मलेरिया व्यतिरिक्त काय काय बरे होऊ शकते याचे ज्ञान आहे का? ब्रॅकियल प्लेक्ससची अ‍ॅनाटॉमी समजते का? प्लांटर फेशिआ काय असतो ते नीट कळते का? पाहिला आहे का? फार्मॅकोकायनेटिक्स, ~डायनॅमिक्स, बायो अ‍ॅव्हेलेबिलिटी, पॅरा-एंटेरल रूट्स ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय ते समजते का? मॉडर्न मेडिसिनचे ग्रॅज्युएट्स अन पोस्ट ग्रॅज्युएट्स काय झक मारत असतात का १०-१२ वर्षे? तुमच्या त्या मा. हनिमान यांनी इंजेक्शन नामक प्रकर्ण अवलंबिले होते का? कैच्याकै.

प्युअर साबुदाणे विका, अन मग डिंग्या मारून दाखवा. ज्या होमिओपथीवाल्याने आयुष्यात एकदाही एकही मॉडर्न मेडिसिन ची औषधी प्रिस्क्राईब केली नाही, अथवा स्वतः वापरली नाही, त्याने तोंड उघडूनन इथे बोलावे असे माझे चॅलेंज आहे.

तुमची अक्खी "पॅथी" सिम्प्टम बेस्ड आहे. तुम्हाला अ‍ॅनाटॉमी, फिजिऑलॉजी, बायोकेमेस्ट्रीचे ज्ञान शून्य आहे. जुलाबासाठी दगड, दगडासाठी धोंडे, धोंड्यावर पाणी, मग तमुक पोटन्सीची माती. अशी तुमची उपचारपद्धती असते. डायग्नोसिसच्या नावाने बोंब असते.

दुकान टाकलंय ना? तुमच्या नशीबाने सरकारी परवानगी आहे ना? गुमान दुकान चालवा. मला फरक पडत नाही. माझे दुकान चालवायला मी समर्थ आहे, अन त्यात खुष आहे.

इथे मायबोलीवर तुमच्या दुकानाची जाहिरात करायची असेल, तर गप पैकी जाहिरात विभागात पैसे भरून लिवा तसं. लेख लिहिण्याचा आव आणून नक्क्ष व्होमिका अमक्यावर चालते इतकं लिव्लं की मग बुद्दू पब्लिक व्यनि करू करू इच्चारतंय काय डोस घेऊ अन किती खाऊ. नर्व पॉयझन अस्तं ते, हे तुमास्नी ठावं हाय का नाय ते मला ठावं न्हाय.

तुम्ही अन तुमचे पुष्पौषधी, अन असले होम्योपदी जाहिरात धागे, ताबडतोब उडवून तुमच्याकडून योग्य ते पैसे वसूल करण्यात यावेत, अशी माझी माबो प्रशासनास कळकळीची इनंती.

धन्यवाद!

इब्लिस Lol खरंय तुमचं.
पण मला सांगा त्या पुष्पौषधी काम कशा करतात? करतात हे मी पाहिलंय. आय अ‍ॅम रिअली कन्फ्युज्ड.

Pages