"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

एकेकीचे अनुभव कथन तर फारच विलक्षण होते. "आमगेलो हो", "घो म्हणपाचो ना", "मावशेक ना म्हणचे पड्टा म्हणोन आवयन हय म्हटलें आनी हांव त्रासान पड्ले." इथपासून ते "सामको बोणेर", "भाणशिरें", "मात्तूय अक्कल म्हंटा ती ना" इथपर्यंत स्वत:च्या यजमानाची संभावना या बौध्दीक चर्चे दरम्यान झाली. आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. पण घर संभाळणारी स्त्री ही उच्चपदस्थ स्त्री किंवा कर्तृत्ववान स्त्रीपेक्षा दुय्यम असते, हे म्हणणं पटत नाही. भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. अनुरूपतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना शब्दांच्या कोंदणात नाही मांडता येत. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थेट येतात.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. बहुतांशी ते खरच आहे. जसे समाजाला सांसारिक स्त्रीच्या लहानसहान अडचणी समजत नाहीत तसेच लहानसहान त्यागही समजत नाही. गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं. त्यामानाने नोकरी, उद्योग करणारी स्त्री ही थोडी तरी दुय्यमतेच्या मर्यादा ओलांडते. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. सगळं नीट नेटकं, व्यवस्थित ठेवणाऱ्या स्त्रीचा जोडीदार कमालीचा अव्यस्थित. त्याला सकाळी बाहेर जाताना चपलांची आठवण होते तेंव्हा काल घरी परतल्यावर भिरकवटलेल्या होत्या हे नाही आठवत. अशा नवरोबाला, बायकोला किमान दिवसातून पंचवीस वेळा हाका माराव्या लागतात. नमुनेदार उदाहरण म्हणजे अंघोळीला जाताना टॉवेल घेउन न जाणं, अंग पुसायची वेळ झाली की मग त्याची आठवण होणं. दिवसभरात अशा गोष्टींची यादीच असते. कंजुष स्त्रीला उधळ्या नवरा मिळतो तर उधळ्या स्त्रीला कंजुष नवरा. सडपातळ स्त्रीला ढेरपोट्या जाड्या नवरा व सिक्स पॅक अ‍ॅब असलेल्या नवऱ्याला, वन पॅक थ्री टायर स्त्री. कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत?

नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. बऱ्याचदा अशा बायकोने केलेली साधी संसारोपयोगी सुचनासुध्दा नवऱ्याला "डॉमिनेटिंग" वाटते.

प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे. विवाहानंतर जोडीदाराविषयी निर्माण झालेलं प्रेम हे बऱ्याच अंशी संसार टिकवून ठेवतं. लग्नाआधी एकमेकांना समजून घेतलं, आवड निवड, स्वभाव अनुरूप आहेत की नाही ह्याची चाचपणी केली तर पुढे संसार सुखी होतो असा समज आहे. प्रेम असण्यात तशीच अपेक्षा असते. पण गंमत म्हणजे लग्नाआधी प्रेम असतं तिथे नेहमी चांगलीच बाजू बघितली जाते. लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. अवास्तव अपेक्षा व तडजोड ही प्राधान्यक्रमाने प्रेमात घडते. लग्न झाल्यावर संसारात प्राथमिकता बदलत जातात. लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरतो. "विवाहप्रेमात" म्हणजे विवाह झाल्यानंतर जिथे प्रेम निर्माण होतं ते अनेक सांसारीक अनुभवानी समृध्द होत जातं. जोडीदाराची ती सवय नाही, तसा स्वभाव नाही तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं.

चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत?" ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता.

"लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. <<<<
अमान्य. सहन करण्याचं उदात्तीकरण कंटाळवाणं आहे. जो/ जी खरंच कर्तुत्ववान असतो/ ते त्याने/ तिने घराबाहेर भरपूर झेललेले असते त्यामुळे किचन पॉलिटिक्सच्या बराच पलिकडे जाऊ शकतो/ते. रॅशनली, प्रॅक्टिकली विचार करता येतो त्याला/ तिला. त्यामुळे संसारासाठी सहन करणे या गोष्टी करायची खरोखरीची किती गरज आहे याचा त्याला/तिला संपूर्ण अंदाज असतो. सहन करण्याच्या उदात्तीकरणापेक्षा काय सहन करायचं याची निवड करू शकणे महत्वाचे. आणि ते करायला बुद्धी लागते फक्त पुरूष वा स्त्री असणं नाही. ती बहुतेक सगळ्यांकडे असते पण अनेकदा त्यावर पडदा पडलेला असतो.
'खरंच कर्तुत्ववान' यामधे '८ ते ५ मानेवर खडा ठेवून खर्डेघाशी पलिकडे काही नाही' असे प्रकरण येत नाही हे लक्षात असूद्या.

मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. <<<<
या आम्ही कोण आहेत? एकूणात सर्वच स्त्रियांबद्दल म्हणताय का? तर सपशेल अमान्य. हाऊसवाइफ्सबद्दल म्हणताय का? तर करत नाही हे मान्य करण्याबरोबर बरंच काही करता येऊ शकतं. घरातल्यांचे विचार घडवणे, वाचनातून जगाची ओळख करून घेणे आणि असे बरेच काही. अश्या हाऊसवाइव्ज जगात भरपूर आहेत आणि आपल्या मायबोलीवरही आहेत. त्यांना फारसं काही करत नाही म्हणून एकाच फटक्यात बिनमहत्वाचं करू नये कृपया.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. <<<
हे मिथ आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा कुठे पुढे जायची सुरूवात होईल.

कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत? <<
तुम्ही ज्याला विजोड म्हणताय ते वरवरचे तपशील आहेत. त्याने गाभ्यामधे काहीही ढवळाढवळ होत नाही.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. <<<
बापरे महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे सगळे चुकलेच म्हणायचे मग!!! गेट अ ग्रिप! गेट वेल सून!

अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते.<<<
खरंतर संसारातल्या बहुतेक गोष्टी बेसिक अ‍ॅव्हरेज क्षमता असलेल्यांसाठी 'त्यात काय विशेष!' अश्याच असतात. थोडा सराव, थोडा अ‍ॅलर्टनेस, थोडा इंटरेस्ट एवढ्यावर जमतात बहुतेकदा. स्त्री असो वा पुरूष.

म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. <<<<
काहीही काय? याचा कुठून संबंध आला?

ताई तुम्हाला तुमच्या छोट्याश्या जगातून बाहेर पडून, चष्मा काढून बाकीचं जग बघण्याची नितांत आवश्यकता आहे. ऑल द बेस्ट.

गृहिणीपदाचे गोडवे गाणं खरंच बंद करा आता.

भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. काय झगडा असतो? आणि हा जो काहे नित्यनवा झगडा असतो तो तथाकथित कर्तुत्ववात स्त्रियांसाठी अथवा पुरूषांसाठी नसतो?

मी गेली तीन वर्षे स्वखुशीने गृहिणी आहे. त्याआधी नोकरी, घर-संसार इत्यादि सर्व सांभाळत होते. त्यामुळे अगदी स्वानुभवावरून सांगते. घर चालवायला काहीही अक्कल लागत नाही. त्यात करण्यासारखे काहीही शहाणपण नाही. अगदी दहावी-बारावी पर्यंत शिकलेली कुठलीही मुलगी घर चालवू शकते. त्यात विशेष काही नाही.

विजोड म्हणजे compatibility का? आणि विजोड कोणाच्या मते? बाहेरच्या माणसाच्या मते? बरोबर ना?

लग्नात नक्की काय कमी/ज्यास्त आहे वा नाही हे फक्त आणी फक्त त्या लग्नात असललेल्या दोनच व्यक्तींना माहित असते.
एखाद वेळेला चिडून वा रागावून एकीन्(स्त्रीने) नवर्‍याविरुद्धा राग व्यक्त जरी केला तरी आपण असे म्हणून शकत नाही जोडपी विजोड आहेत.
हां, जर वारंवार लग्नात असलेल्या स्त्रीनेच/पुरुषानेच स्वतः जर कबूलच केले तर ठिक.

सर्व बरोबर असून्ही(पुन्हा बाहेरच्या लोकांना वाटलेले म्हणून... तसे) लग्न टीकलेली नाहीत अशी उदाहरण आहेत.
तर सर्व विसंगत असूनही (पुन्हा बाहेरच्यांच्या मते) संसार मस्त चाललेलेत अशी कबूली 'स्वःत देणारेही भरपूर आहेत. तेव्हा संसार हा विषयच जरा अवघड आहे. त्यात दुसर्‍याच्या संसाराविषयी बोलणे त्याहून अवघड. Happy

राहता राहिला प्रश्ण, घरी राहणार्‍या स्त्रीचा... हे तिच्या हातात आहे की नक्की कुठे वळायचे. आधीच्या काळातल्या स्त्रीयांनी (ज्या घरी असत) त्यांनी मोलाची कामं केलीत की. घर सांभाळणे हे कठीण काम आहे की.

>>लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरत>><<

राग मानू नका पण तुम्ही हे कुठल्या काळातले व ठिकाणचे लिहिताय्?(खरोखर प्रश्ण आहे).

बाकी, तुम्ही असे लेख लिहून आपली मतं लिहितात बरे करताय.. त्यामुळे मदत होवु शकते ... की काळ बदलालाय हो.. आणि आपणच बदलायचा असतो. तुम्हाला शुभेच्छा!

२०-२५ वर्षांपूर्वी केवळ स्त्रीयांसाठी असलेल्या मासिकांत किंवा वर्तमानपत्रांच्या महिला विशेष पुरवणीत हा लेख शोभला असता.
तरिही ही परिस्थिती लहान गावांत आणि शहरात आहेच आणि तुम्ही इतकं प्रामाणिकपणे लिहिलंय म्हणजे तुमच्या आजूबाजुला नक्किच असेल. तुमचे अनुभवविश्व मायबोलीवर नक्कीच वाढेल.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

हे आवडलं.

सहन करण्याच्या उदात्तीकरणापेक्षा काय सहन करायचं याची निवड करू शकणे महत्वाचे. आणि ते करायला बुद्धी लागते फक्त पुरूष वा स्त्री असणं नाही. ती बहुतेक सगळ्यांकडे असते पण अनेकदा त्यावर पडदा पडलेला असतो.

या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

लेख पटला नाही, कारणे अनेक आहेत. क्षमस्व!

गृहिणींना नित्यनूतन नवा लढा द्यावा लागतो हे विधान काही प्रमाणात पटले, पण ज्या संदर्भातून ते येथे आलेले आहे त्यामुळे तेही पटवून घ्यावेसे वाटत नाही आहे.

(अधिक 'सर्वांगीण' चिंतन हवे होते असे एक आपले वाटून गेले).

घर चालवायला काहीही अक्कल लागत नाही. त्यात करण्यासारखे काहीही शहाणपण नाही. अगदी दहावी-बारावी पर्यंत शिकलेली कुठलीही मुलगी घर चालवू शकते. त्यात विशेष काही नाही.

तीव्र असहमत! Wink

शिकल्याचा आणि अकलेचा काय संबंध असतो का?
दहावी -बारावी झालेल्या मुलीला डॉक्टरणीपेक्षा जास्त अक्कल असू शकते.

मला घर व्यवस्थित चालवता येत नाही हे मी स्वानुभवावरून आणि कानांच्या ठाम मतानुसार सांगू शकते.
Wink

घर चालवायला काहीही अक्कल लागत नाही. त्यात करण्यासारखे काहीही शहाणपण नाही. अगदी दहावी-बारावी पर्यंत शिकलेली कुठलीही मुलगी घर चालवू शकते. त्यात विशेष काही नाही.

तीव्र असहमत!
साती +१०००

घर चालवायला काहीही अक्कल लागत नाही. त्यात करण्यासारखे काहीही शहाणपण नाही. अगदी दहावी-बारावी पर्यंत शिकलेली कुठलीही मुलगी घर चालवू शकते. त्यात विशेष काही नाही.>>>>

अरारा बेसिक्मध्येच लोचा आहे.

एक महत्वाची गोष्ट सांगतो,
या सगळ्या गोष्टी गावाप्रमाणे बदलतात.....
पुण्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलीला कोल्हापुर जिल्ह्यातल्या एखाद्या खेडेवागातील विवाहित स्त्रीची वैचारीकता समजेलच असे नाही.

शेवटुन दुसरा पॅरेग्राफ वर मी सुध्हा थोड लिहुन ठेवलयं . लोक काय म्हणतील या साठी लोक स्वतः काय थराला जातात याचा विचार देखिल आपण (माझ्यासकट) करु शकत नाही.

वंदनाजी, फक्त फरक एवढाच आहे तुम्ही लिहलेलं मी बघितले आहे त्यामुळे असं असुच शकत नाही हे आता मी म्हणु शकत नाही (पण जर बघितले नसते तर पटले नसते) .
संध्याकाळी डीटेल मध्ये लिहेन.

तरिही ही परिस्थिती लहान गावांत आणि शहरात आहेच आणि तुम्ही इतकं प्रामाणिकपणे लिहिलंय म्हणजे तुमच्या आजूबाजुला नक्किच असेल. तुमचे अनुभवविश्व मायबोलीवर नक्कीच वाढेल.
अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.
हे आवडलं.>>>> सहमत.

सहन करण्याच्या उदात्तीकरणापेक्षा काय सहन करायचं याची निवड करू शकणे महत्वाचे. आणि ते करायला बुद्धी लागते फक्त पुरूष वा स्त्री असणं नाही. ती बहुतेक सगळ्यांकडे असते पण अनेकदा त्यावर पडदा पडलेला असतो. >>>>> प्रचंड सहमत.

घर चालवायला काहीही अक्कल लागत नाही. त्यात करण्यासारखे काहीही शहाणपण नाही. अगदी दहावी-बारावी पर्यंत शिकलेली कुठलीही मुलगी घर चालवू शकते. त्यात विशेष काही नाही. >>>>> प्रचंड असहमत.

घर चालवणं म्हणजे फक्त घरकाम करणं असं वाटत असेल तर मग बरोबरे.

या आम्ही कोण आहेत? एकूणात सर्वच स्त्रियांबद्दल म्हणताय का? तर सपशेल अमान्य. हाऊसवाइफ्सबद्दल म्हणताय का? तर करत नाही हे मान्य करण्याबरोबर बरंच काही करता येऊ शकतं. घरातल्यांचे विचार घडवणे, वाचनातून जगाची ओळख करून घेणे आणि असे बरेच काही. अश्या हाऊसवाइव्ज जगात भरपूर आहेत आणि आपल्या मायबोलीवरही आहेत. त्यांना फारसं काही करत नाही म्हणून एकाच फटक्यात बिनमहत्वाचं करू नये कृपया.
>>>>>>>>>>>> नी ..........मस्त वाटलं हे वाचून! धन्यवाद!

मला घर व्यवस्थित चालवता येत नाही हे मी स्वानुभवावरून आणि कानांच्या ठाम मतानुसार सांगू शकते.

>>मग माझे काना काय माझा गौरव वगैरे करतात असं वाटलं की काय तुला? Wink पण घर चालवणे यामधे असे कुठले काम आहे ज्यामधे नित्यनूतन लढा वगैरे प्रकार असतात?? आणि जर अ‍ॅनालॉजी वापरत गेलं तर त्यातलं कुठलं काम एखादी स्त्री अथवा पुरूष नोकरीच्या/कामाच्या ठिकाणी करत नाही??

शिकल्याचा आणि अकलेचा काय संबंध असतो का?
दहावी -बारावी झालेल्या मुलीला डॉक्टरणीपेक्षा जास्त अक्कल असू शकते.>> हेपण बरोबर आहे!!!! Happy निरक्षर बायकादेखील चांगलं घर चालवतातच की. सॉरी, लिहिताना लक्षात आलं नाही.

पुण्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलीला कोल्हापुर जिल्ह्यातल्या एखाद्या खेडेवागातील विवाहित स्त्रीची वैचारीकता समजेलच असे नाही.>>> +१. त्याचबरोबर कोल्हापुरातील ती खेडेगावातील स्त्री आपण घर चालवत आहोत वगैरेचा विचार देखील न करता उत्कृष्ट रीत्या संसार करत असेल, जिथे पुण्यामुंबईची मुलगी "लढा" वगैरे लढत असेल. (जे फारच जनरलाईज्ड विधान आहे!!) Happy

माझ्या सांगण्याचा उद्देश इतकाच की घर चालवणे हे फार कौशल्याचे काम असत नाही. स्त्रीसाठी पण नव्हे आणि पुरूषासाठी पण नव्हे!!! व्यवस्थित प्लानिंग, थोडंसं टाईम मॅनेजमेंट, थोडासा कॉमनसेन्स आणि घरच्या इतर सदस्यांनी त्यान्ची जबाबदारी ओळखून काम करणे एवढं केलं तरी घर "चालवावं" लागत नाही, आपोआप चालतं.

लेखातील कांहीं विधानं मलाही पटत नसली तरीही शीर्षकात उपस्थित केलेल्या मुख्य मुद्द्यावरचीं माझीं कांही निरीक्षणं द्यावीशीं वाटतात; अर्थात, माझ्या जवळपासच्याच [त्यांत मींही येतोच] 'टिकलेल्या संसांरां'वर हे आधारित आहे -
१] दोन व्यक्ती या एकसारख्याच असूं शकत नाहीत हें हट्टी सत्य हळू हळूं कां होईना पण दोन्ही साथीदारांच्या लक्षात येतं व स्विकारलं जातं;
२] मुलांचं प्रेम व काळजी हा दोघांतला समान गुणधर्म एवढा प्रभावी असतो कीं इतर असमानता अगदींच गौण होत जाते;
३] संवयीने अंगवळणीं पडणं व मग आवडणं हा मनाचा गुणधर्म बर्‍याच संसारातही मुख्य वंगण ठरतो;

४] अगदीं टोंकाचे अपवाद वगळतां, 'विजोड' हा शिक्का बहुतेकदां इतरांच्या भ्रामक कल्पनांमुळे बसलेला असतो व तो पति-पत्नीच्या सहचर्याने निर्माण होणार्‍या सुसंवादावर फारसा परिणाम करत नाही.

बघा यांत कांही तथ्य आहे असं वाटतं का, नाही तर द्या सोडून ! Wink

कदाचित मी म्हणतोय ते पटणारही नाही त्यामुळे आधीच सांगतो की जसं तुम्ही अगदी मनापासून लिखाण केलय तसच अगदी मनापासून प्रतिसाद देतोय.

सगळ्यात पहिले म्हणजे शीर्षकाबाबत.

विजोड ? म्हणजे ? कोण ठरवणार ? ठरवणार्‍याची लायकी काय ? अगदी मी स्वत: जरी म्हणालो की आमची जोडी विजोड आहे, तरी मी हे ठरवायला पात्र आहे ?

म्हणूनच << बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी. >> ह्या वाक्याला आक्षेपही आणि अनुमोदनही. Happy आक्षेप वर सांगितलेल्या कारणासाठी आणि अनुमोदन अशासाठी की तलवारीच्या जोडीला ढालच लागते. नाहितर युद्ध नाही होत, हाराकिरी होते. Happy म्हणूनच आपण ज्याला विजोड म्हणतो ती कदाचित अचूक जोड असू शकते.

<< आम्ही लहान आहोत. >> हे तर मान्यच नाही. दोन्ही बरोबरचेच असतात आणि असावेत. लहान आहात तर कृपया बालविवाह कायद्याखाली स्वत:ला अटक करवून घ्या Wink

<<शिक्षण अहंकार निर्माण करतं. >> अगदीच पुस्तकी वाक्य. योग्य आणि पूर्ण शिक्षण अहंकार नष्ट करतं. मुळात शिक्षण म्हणजे स्वतःच्या मर्यादांची जाणीव. जेव्हा एखाद्या गोष्टीच शिक्षण आपण घेतो तेव्हांच त्या गोष्टीबद्दल काय शक्य आहे णि काय नाही याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं.

<<सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. >> अजून एक अजिबात न पटलेलं वाक्य. मला स्वत:ला हे मान्य नाही. पण दोन्ही बाजूंची उदाहरणे पाहिलेली आहेत.

<<प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे.>>
प्रेमविवाह हा वेगळाच विषय आहे. प्रेमात पडल्यावर माणून बदलतो हे आपण सर्वांनीच वाचलं असेल. प्रॉब्लेम असा होतो की दोघेही स्वतःच्या "आयडॉल / आदर्शा"प्रमाणे स्वतःत बदल घडवून आणायला पहातात आणि दोघांचे हे आदर्श मॅच होत नाहीत. अयशस्वी प्रेमविवाहांमागे हे महत्वाचे कारण मानले गेलेले आहे. वैयक्तिक अनुभव शून्य. (मुळात मला प्रेम ह्या संज्ञेचा प्रचलित अर्थच मान्य नाही)

संसार आणि संसारच कशाला, सगळं जगणं म्हणजे अ‍ॅडस्टमेन्ट. जो चांगल्या रीतीने स्वतःला ईतरांसाठी अ‍ॅडजस्ट करु शकतो / ते त्यांना हे जमतं. बाकिचे जमवून घेतात.

मला असं वाटतं की नंदिनीला

खरंतर संसारातल्या बहुतेक गोष्टी बेसिक अ‍ॅव्हरेज क्षमता असलेल्यांसाठी 'त्यात काय विशेष!' अश्याच असतात. थोडा सराव, थोडा अ‍ॅलर्टनेस, थोडा इंटरेस्ट एवढ्यावर जमतात बहुतेकदा. स्त्री असो वा पुरूष.

हेच म्हणायचं असावं पण शब्द थोडे गडबडले.

नी, हो. दुसर्‍या प्रतिसादामधे तेच तर लिहिले आहे मी.

घर चालवणं म्हणजे फक्त घरकाम करणं असं वाटत असेल तर मग बरोबरे.
<<< मला तरी तसे वाटत नाही. घर चालवण्यामधे आर्थिक नियोजन, बालसंगोपन, घर्काम, घरातल्या सर्व सदस्यांचे नियोजन, मोलकरीण वगिअरे बर्‍याच गोष्टी येतात. पण यातली कुठलीच गोष्ट माझ्या मते "फक्त गृहिणीची" जबाबदारी नाही आणि असलीच तरी त्यामधे फारसे कठीण काही नाही.

>> "सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"
दुसर्‍याच्या संसारात काय विजोड आहे (का नाही) हे आपण कसे ठरवणार? जसं एखादं सॉफ्ट्वेर मॅक संगणकांसाठी विजोड आहे हे त्याचं specification वाचुन कळतं. तसं 'संसारा' बाबत अशी काही specification आहेत का तुमच्याकडे?
>> तरिही ही परिस्थिती लहान गावांत आणि शहरात आहेच
असू शकते. पण लेखिकेनी फक्त परिस्थिती कथन एवढाच हेतू ठेवला असता तर लेख (आणि प्रतिक्रिया) वेगळ्या असत्या.
>> अधिक 'सर्वांगीण' चिंतन हवे होते असे एक आपले वाटून गेले.
+१, याआधिच्या लेखावरचे (घटस्पोटसंबंधी) प्रतिसाद आणि ते मोठ्या मनाने स्विकारण्याची लेखिकेली तयारी, याचा या लेखावर काहिच परिणाम दिसत नाही.

चिटक्या (हे काय असतं?) मोडता मोडता केलेले गॉसिप सोडुन या लेखाला अजुन काय अर्थ आहे?

नीधप +१०००

याखेरीज...

१. एक विनंती: आपल्या लेखात आपण मालवणी वा तत्सम भाषेतील जे शब्द वापरता त्याचे अर्थ कंसात दिलेत तर बरे होईल.

२. "सगळ विजोड असूनही संसार का टिकतात?" या नावाचा लेख पूर्णवेळ गृहिणी असलेल्या स्त्रीचे कार्यक्षेत्र, तिला सहन करावा लागणारा "नित्यनूतन आणि नित्यनवा" (नूतन आणि नवा मध्ये काय फरक आहे? मला तरी हे दोन शब्द समानार्थी आहेत असच वाटत होत आत्तापर्यंत :अओ:) झगडा, तिची दुय्यमता, तिला करावे लागणारे त्याग, शिक्षणामुळे निर्माण होणारा अहंकार, त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी असणे, प्रेमविवाह आणि शेवटी घटस्फोट ह्या स्टेशनांवर का फिरायला गेला हे कळले नाही.

(घटस्फोटाचे एकवेळ ठीक आहे.. विजोडता असूनही आणि तिचा त्रास होत असतांना देखील घटस्फोट घेणे काही वेळा सामान्यपणे बाईला का शक्य नसते आणि त्यामुळे विजोड संसार टिकला असे वरवर दिसते हे थोडेफार मांडले आहे त्या परिच्छेदात.)

३. "शिक्षण अहंकार निर्माण करतं." हे (तुमच्याच लेखातले) वाक्य "काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता." ह्या (तुमच्याच लेखातल्या) वाक्याच्या शेजारी ठेऊन वाचा.

भांडत नाही ते नवरा बायको कसले,
बायकांची सर्वात मोठी करमणूक म्हणजे भांडणे आहेत
(सर्वमान्य समजूत)

वंदना बर्वे ताईं ना शुभेच्छा !!!! खुपच एकांगी लेख. काहीही पटलं नाही.

निवांत पाटिल म्हणतात ते पटले. खरच आहे की आम्हा शहरातल्या बायकांना एका खेडेगावच्या स्त्री ची मानसिकता कळणे अंमळ जडच जाइल....

मुळात लेख जरी चांगला (?) असला तरी तो ज्या फोरम वर लिहिला गेला आहे, त्या फोरम ला तो पटणारा नाही. आपले विचार जरुर मांडावेत पण वाचणारे/ऐकणारे कोण आहेत त्या प्रमाणे तो स्वीकारला जातो. बर्वे ताईं नी ते लक्षात घेवुन लिहायला हवं.

हाच लेख/ विचार वेगळ्या रित्या मांडता येवु शकला असता. मग खुप चांगली चर्चा झाली असती. बाबु ने म्हंटलं आहे त्या प्रमाणे विजोड म्हणजे काय? कदाचीत हाच जोड योग्य असु शकेल. प्रत्येक वेळेला बायकोच त्याग बीग करते असे नाही.

खरं तर त्यांना काही वेगळं म्हणायचं असु शकत. बर्वे ताईंनी असं म्हंटलं असतं की खुप वेगळे पणा, आवड, सवयी इ.इ.इ. असुनही संसार कसे टिकतात? तर त्या वर साधक बाधक चर्चा होवु शकली असती.

असो.....

अतिशय एकांगी लेख. बर्‍याच मुद्द्यांशी असहमत! Sad

तुमच्याकडे लिहिण्याची हातोटी आहे, पण मांडलेला विषय पूरक मुद्दे घेऊन चर्चेला येत नाही.

मुद्दे खोडायला आत्ता कंटाळ आलाय. जरा कल्हईकाम करतेय. Happy

बौध्दीक >>> बौद्धिक
गृहीणेचे प्रोब्लेम्स >>> गृहिणीचे प्रॉब्लेम्स
गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं >>> गृहिणीला
कमालीचा अव्यस्थित. >>> अव्यवस्थित
कुठे शारिरीक ठेवण विजोड असते >>> शारीरिक
हे मी सुध्दा करेन >>> सुद्धा
सुचनासुध्दा >>> सूचनासुद्धा
लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. >> वाईट
अनुभवानी समृध्द होत जातं. >>> समृद्ध
तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी >>> देखील
दुषित>>> दूषित

असे हवे आहे. पेपर मध्ये तुमचे हे लेख छापून येतात असे तुम्हीच मागे म्हटले होतेत ना? तिथे पण शुले च्या अश्या चुकांसह छापून येतात का हो तुमचे हे लेख? कुणी तपासत नाहीत का? Angry

भिरकवटलेल्या >>> 'भिरकावलेल्या' असे म्हणायचे आहे का? 'भिरकटवणे' हे क्रियापद कधी ऐकिवात नाही, म्हणून विचारतेय. गोव्याकडे वापरत असतील तर माहीत नाही.

अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. >>>
कमाल आहे. आधीच्या वाक्यात म्हणताय की 'कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत' आणि नंतरच्या लगेचच्या २ वाक्यांत स्वतःच स्वतःचा मुद्दा खोडून काढताय की!

शिक्षण अहंकार निर्माण करत??????????????????????? बापरे मला माहित नव्हतं..... अशी अनेक लोक मी पाहिली आहेत जी शिक्षण नाही तरी अहंकारी आहेत.

( माझी आधीची कामवाली. एकदा मुलगी लहान असताना धप्प्कन पडली. डोक्याला लागलं. घरात छोटी मुलगी ,साबा आणि ही भांडेवाली. लेकीने जोरात भोकाड परसलं. साबा कामवालीला जोरात हाका मारत बाळाला सावरत होत्या. बया भांडी सोडुन अज्जिबात आली नाही. शेजारचे आले. डॉक्टर कडे नेलं... नंतर ह्या महाराणी ला विचारलं का आली नाहीस तर म्हणाली" ते माझं काम नाही. तुम्ही काय रोज पडाल!!!" .... आम्ही खेटर मारल्या सारखे.... आता सांगा अहंकाराला शिक्षण लागत?)

"नित्यनूतन आणि नित्यनवा" (नूतन आणि नवा मध्ये काय फरक आहे? मला तरी हे दोन शब्द समानार्थी आहेत असच वाटत होत आत्तापर्यंत >>> + १
पियु, नूतन म्हणजेच नवा. सेम अर्थ. मलाही त्याच अर्थाची पुनरावृती करणारे शब्द का योजलेत ते कळले नाही. Happy

खरं तर त्यांना काही वेगळं म्हणायचं असु शकत. बर्वे ताईंनी असं म्हंटलं असतं की खुप वेगळे पणा, आवड, सवयी इ.इ.इ. असुनही संसार कसे टिकतात? तर त्या वर साधक बाधक चर्चा होवु शकली असती.

>> मोकिमी ताई..

त्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याच लेखात ठिकठिकाणी आले आहेच कि. आणि ते सर्वांना पटले देखील. हे पहा-

१. "नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे."

२. "दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं."

३. "अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात."

निधपजी,

आपणाला स्त्रियांच्या "सहन करण्याच्या वृत्तीचे उदात्तीकरण" वगैरे जे काही वाटले आहे ते मुळात तसे नाही. त्या स्त्रियांच्या नवऱ्याविषयीच्या प्रतिक्रिया तशा का येतात याचं ते विवेचन आहे. त्या जे कष्ट भोगतात त्या प्रमाणात त्यांना त्यांच्याच घरातल्यांना व यजमानांना जाणीवही नसते. यात उदात्तीकरण नसून टीका आहे. आपण पूर्वग्रहाने प्रतिक्रिया देत आहात.

महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच देईल. आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो.

आपल्या प्रतिक्रिया वाचल्या की पूर्वग्रहाचे चष्मे उतरवायची आवश्यकता कुणाला आहे ते समजतेच.

नंदिनीजी,

गृहिणीपदाचे गोडवे नाही गायले. त्यांच्या नवऱ्याविषयीच्या प्रतिक्रियांचे कारण विषद केले आहे. काम करणारी स्त्री व गृहीणी या पैकी कुठलीच स्त्री ही दुय्यम नसते. फक्त कार्यक्षेत्र भिन्न असते. "घर चालवायला अक्कल लागत नाही" यावर आणखी काय लिहिणार? "घर चालवायला शिक्षण लागत नाही" हे काही अंशी सत्य म्हणता येईल.

त्या जे कष्ट भोगतात त्या प्रमाणात त्यांना त्यांच्याच घरातल्यांना व यजमानांना जाणीवही नसते. <<<
कष्ट भोगण्याचं कौतुक कशाला?
कष्ट भोगायला नकार देता येण्याची कुवत नाही म्हणून गोंजारणे आहे. घरातल्यांना जाणीव नसेल तर करून द्या जाणीव.

आज मिळणाऱ्या शिक्षणातून अहंकारच येतो, ज्ञान नाही. तुम्हाला पटो वा न पटो. <<<
स्वतःवरून बोलताय का?

महात्मा फुले, सावित्रीबाई आणि धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रीशिक्षणासाठी कष्ट घेतले यातच तुम्हाला चूक दिसत असेल तर खरंच गेट वेल सून.

आपल्या प्रतिक्रिया वाचल्या की पूर्वग्रहाचे चष्मे उतरवायची आवश्यकता कुणाला आहे ते समजतेच. <<
अरेच्या तुम्ही म्हणलंय ते सोदाहरण अमान्य आहे म्हणलं की पूर्वग्रहाचे चष्मे? डबक्यातून बाहेर या.

मोकिमी शी फोरम बद्दल सहमत. बाबु, सँअ, पियुपरीशी पण जवळजवळ प्रत्येक मुद्यावर सहमत.

साती, अवनी, श्रुती - घर चालवणे यात व्यवस्थित मॅनेजमेन्ट, सराव अशा घटकांचाच भाग मोठा असतो. साती किंवा अवनीला घर चालवता येत नाही असं कानांचं मत असेल तर ते त्यांच्यापाशी. तुमच्याकडे त्याच्यासाठी अ‍ॅप्टीट्यूड किंवा आवड नसेल पण म्हणून ते न जमणार्‍यातलं कौशल्य अजिबात नाही. ही आवड/ अ‍ॅप्टीट्यूड माझ्याकडेही नाही पण मला व्यवस्थित घर चालवता येतं. बिग डील!! ज्या मुली/मुलं त्यांच्या व्यवसायक्षेत्रात कामांची व्यवस्थित आखणी, नियोजन आणि अंमलबजावणी करतात त्यांना घर चालवणं हा प्रोजेक्ट जड जाण्याचं काही कारण नाही. पण मुळात हे लक्षात ठेवा की हे पण ऑफिससारखंच 'टीमवर्क प्रोजेक्ट' आहे. लीडर कुणीही असो, सगळ्यांना कामात भाग घ्यावा लागतो. घर चालवण्याच्या जबाबदार्‍या कसोशीने पार पाडताना पण इतरांनाही त्यात सहभागी व्हायची सवय असलीच पाहिजे. नवरा आंघोळीला जाताना नित्यनेमाने टॉवेल विसरत असला तर नेऊन देणं बंद करा, बसूदेत आत. होऊदेत की उशीर एकदोनदा - उद्यापासून झक्कत आठवण ठेवून नेईल की नाही बघा!
सहसा अर्थार्जन एकाकडे आणि घर चालवणे एकाकडे अशी पारंपरिक विभागणी होती/आहे. यात अर्थार्जन जे जास्त उच्च दर्जाचं आणि घर चालवणं दुय्यम असं पक्कं होऊन मानसिकतेत बसलं. अजूनही अनेक ठिकाणी ते दिसून येतं. पहिल्यांदा ही असमान श्रमप्रतिष्ठा डोक्यातून काढली पाहिजे. आमच्या पिढीत अनेकांनी ती काढली आहे असं मला माझ्या आसपास दिसून येतंच.

कुठल्याही नात्यात परस्परांशी शंभर टक्के पटत्/रुचत नाहीच. अगदी मायलेकी, सख्ख्या मैत्रिणींमधेही नाही तर नवरा बायकोंमधे कसं सगळं गोडगोड असणार? मुळात एकमेकांना समानतेच्या पातळीवरून, माणूस म्हणून गुणदोषांसकट स्वीकारायचा प्रयत्न होणं महत्वाचं.
बाकी प्रेमविवाह, शिक्षण वगैरेवरचे 'विचार' अगदी कैच्याकी इम्मॅच्युअर विभागात मोडतात.

मी तुमच्या घटस्फोट बीबीवर लिहिलेल्या प्रतिसादातला काही भाग परत इथे लिहितेय कारण मला तो इथेही रिलेव्हन्ट वाटतोय
<<हा लेख अतिशय प्रामाणिकपणे लिहिला गेला आहे हे खरंच आहे. वंदना, पण काय होतंय ना की तुम्ही तुमच्या आसपासच्या समाजाच्या एका छोट्या हिश्शाकडे बघून ही निरिक्षणं नोंदवताय. ते स्वाभाविकच आहे. पण ती निरिक्षणं अगदी मराठी समाजासाठी सुद्धा लागू होत नाहीत इतकी भिन्नता समाजात असते. त्या मुळे पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय इथे चालवता येत नाही. इतरांचं अनुभवविश्व, आकलनविश्व, सामाजिकतेचा परीघ, वैचारिक जडणघडणीचा प्रवास हा वेगळा, कधीकधी आपल्यापेक्षाही जास्त आवाक्याचा असतो, किंवा इथल्या बर्‍याच जणांचा आहे. साहजिकच तुमच्या लेखावर अशा सगळ्या प्रतिक्रिया आल्यात. तुम्हीसुद्धा आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हळूहळू सुरुवात केलीत तर तुम्हालाही इतर दृष्टीकोन उलगडत जातील.>>

निंबुडाजी,

कल्हईकामाबद्दल धन्यवाद. मी ऱ्हस्वदीर्घाची काळजी घेईन. "भिरकवटलेल्या" हा शब्दच चुकीचा होता कदाचित. कोकणीतही "भिरकायल्यो" असाच त्याचा प्रयोग होतो. धन्यवाद.

सौ. वंदना बर्वे.

Pages