आले लसूण कैरी लोणचे (हमखास आवडणारे)

Submitted by सारीका on 25 June, 2012 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन किलो घट्ट आंबट कैरी
२५० ग्रॅम (सोललेला) लसूण
२५० ग्रॅम (साले काढलेले) आले
आले शक्यतो विना धाग्याचे घ्यावे.
२५० ग्रॅम लोणच्याचे (बेडगी मिरचीचे) तिखट
३०० ग्रॅम मीठ (साधे मीठ नामंकीत कंपनीचे नको)
७५० ग्रॅम शेंगदाणा तेल (रिफाईंड तेल हवे, मी फॉर्चून कंपनीचे वापरते)

फोडणीचे साहीत्यः

७५० ग्रॅम तेलातीलच एक वाटी तेल

३ चमचे मोहरी

२ चमचे जिरे

३ चमचे तिळ

२ चमचे मिरचीचे बी

खमंगपणासाठी: एका मध्यम आकाराच्या हळकुंडाचे बारीक तुकडे करुन घ्यावेत सोबत २ चमचे मेथीदाणे घेऊन थोड्या तेलात हे दोन्ही जिन्नस तळावेत, थंड झाल्यावर बारीक पूड करावी. ( हळकुंडाच्या आकारानुसार मेथीदाणे किती घ्यायचे ते ठरते.)
हे मिश्रण कोणत्याही लोणच्यात वापरता येते त्याने खमंगपणा वाढतो.

क्रमवार पाककृती: 

१) कैरी धुवून पुसून चांगल्या कोरड्या करुन घेणे, नंतर त्याचे तुकडे करणे, ते तुकडे साफ करुन घेणे (कैरीचे बाठ घेऊ नयेत.)

२) आल्याचे बारीक तुकडे करून घेणे, जर आल्यात धागे असतील तर आल्याचे अतिशय पातळ काप करावेत.
आले, लसूण आणि वरील ३०० ग्रॅम मीठातील थोडे थोडे मीठ वापरुन मिक्सरमधुन आल्या-लसणाची पातळ पेस्ट करुन घ्यावी, यात पाणी मुळीच वापरायचे नाही
एकदम फाईन पेस्ट होण्यासाठी थोडे थोडे मीठ वापरुन मिक्सरमधे बारीक वाटावे.

३) गॅसवर कढई तापत ठेऊन त्यात वरील ७५० ग्रॅम तेलातील एक वाटी (अंदाजे १५० ते २०० ग्रॅम) तेल टाकावे, तेल चांगले तापल्यावर आच कमी करुन मोहरी टाकावी, मोहरी तडतडल्यावर जिरे, मिरची बी आणि तिळ टाकून गॅस बंद करावा.
फोडणी पुर्ण थंड करुन घ्यावी.

४)एका पातेल्यात आलं लसूण फाईन पेस्ट, तिखट, उरलेले मीठ, कैरीच्या फोडी टाकून चांगले कालवून घेणे.
एक चमचा मेथीदाणे हळकुंडाची पावडर टाकावी. (जास्त वापरू नये)
उरलेले कच्चे तेल या मिश्रणात टाकून पुन्हा चांगले कालवावे. ( ७५० ग्रॅम तेलातील एक वाटी तेल फोडणीसाठी वापरायचे आहे.)

५) थंड झालेली तयार फोडणी पातेल्यातील लोणच्याच्या मिश्रणात टाकून पुन्हा चांगले कालवून घ्यावे.

६) दोन दिवस लोणचे पातेल्यातच ठेवावे, नंतर हवे तेवढे छोट्या बरणीत काढून उरलेले लोणचे काचेच्या अथवा चिनीमातीच्या बरणीत भरुन ठेवावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार कितीही
अधिक टिपा: 

१) आलं शक्यतो विनाधाग्याचे घ्यावे, नाही मिळाले तर आल्याचे खुप पातळ बारीक काप करावे लागतात.
कैरी आतून पांढरी असावी, पिवळसर व गोड कैरीमुळे लोणचे बिघडण्याची शक्यता असते.
म्हणून कैरी घट्ट आंबट असावी.

२) फोडणीचे सोडून उरलेले तेल कच्चेच वापरायचे आहे. तेल गरम करुन थंड करुन वापरल्यास ४ ते ५ महिण्यांनी लोणच्यास वास येऊ शकतो म्हणून तेल कच्चेच वापरायचे आहे. दोन दिवसांनी लोणच्याला तेल सुटते त्यामुळे वरुन तेल घालण्याची गरज भासत नाही.
लोणच्यात तेल कमी वाटल्यास आवश्यकतेनुसार अजून टाकू शकता.
दोन दिवसांनी लोणच्यातील तेलाचे प्रमाण पाहूनच तेल वापरावे.

३) हे लोणचे २ ते ३ वर्ष टिकते. चवही छान लागते.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश, फोटो टाकेन जमेल तसा..
सुलेखाताई>> लसूण आले वापरल्याने खुप छान चव येते लोणच्याला..
बेफीजी Happy

सारीका धन्स धन्स धन्स.

आता कैरी शोधून लोणच कराव लागेल कारण कैरीचे आता आंब्यात रुपांतर होऊन तेही संपत आले आहेत.