पाण्यातले लोणचे (डाएट लोणचे) फोटोसह

Submitted by सारीका on 25 June, 2012 - 06:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिड किलो कैरी
एक वाटी मोहरीची कूट
एक वाटी तिळाचा कूट (भाजलेल्या तिळाचा कूट घेणे)
सव्वा वाटी साधं मीठ (साधं मीठ म्हणजे नामंकीत कंपनीचे नको साधं कोणतंही ब्रँड चालेल)
एक वाटी लोणच्याचं तिखट ( मिरची पावडर)
लोणच्याचं तिखट दिसायला लाल भडक पण तिखटपणा जरा कमी असतो.
बेडगी मिरचीचे तिखट वापरले तरी चालेल.
बोअरवेलचे पाणी आवश्यकतेनुसार
या लोणच्यामधे बोअरवेलचेच पाणी वापरायचे आहे, पाणी पुरवठा केंद्रातून येणारे पाणी अथवा विहीरीचे पाणी नको
त्याने लोणचे खराब होण्याची शक्यता असते.

फोडणीचे साहीत्यः
अर्धी वाटी तेल
३ चमचे मोहरी
२ चमचे जिरे
२ चमचे मिरचीचे बी
३ चमचे तीळ
हिंग आवडीनुसार (शक्यतो खडा हिंग वेळेवर बारीक करुन वापरावा)

खमंगपणासाठी:
एका मध्यम आकाराच्या हळकुंडाचे बारीक तुकडे करुन घ्यावेत सोबत २ चमचे मेथीदाणे घेऊन थोड्या तेलात हे दोन्ही जिन्नस तळावेत, थंड झाल्यावर बारीक पूड करावी. ( हळकुंडाच्या आकारानुसार मेथीदाणे किती घ्यायचे ते ठरते.)
हे मिश्रण कोणत्याही लोणच्यात वापरता येते त्याने खमंगपणा वाढतो.

क्रमवार पाककृती: 

१) कैरी धुवून, पुसुन त्याच्या फोडी करुन साफ करुन घेणे.

२) एका पातेल्यात तिळाचा कुट, मोहरीचा कुट, मीठ, तिखट घेऊन पळीने किंवा हाताने चांगले एकत्र करुन घ्यावे.

३) गॅसवर कढई ठेऊन त्यात अर्धी वाटी तेल टाकावे, तेल तापल्यावर आच बारीक करावी, त्यात मोहरी, जिरे, टाकावेत
मोहरी तडतडल्यावर तिळ, मिरची बी, हिंग टाकून १० सेकंदाने गॅस बंद करावा.
फोडणी पुर्ण थंड होऊ द्यावी.
४) थंड झालेली तयार फोडणी पातेल्यातील मसाल्याच्या मिश्रणात ओतावी, सर्व जिन्नस चांगले एकजीव करावेत.
त्यानंतर दिल्याप्रमाणे एक चमचा हळकुंड आणि मेथीची पुड टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करावे.
(हळकुंड मेथीची पूड जास्त वापरू नये लोणचे कडू होते)

५) या मिश्रणात कैरीच्या फोडी टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करुन घ्या.

६) आता लोणच्यात बोअरवेलचे पाणी आवश्यकतेनुसार घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या. (अंदाजे १ ते दिड ग्लास पाणी पुरेल)
लोणचे खुप पातळ अथवा खुप घट्टही ठेवायचे नाही.

७) लोणचे किमान दोन दिवस पातेल्यातच ठेऊन नंतर काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत भरुन ठेवावे.

_MG_6605.JPG_MG_6606.JPG

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार कितीही
अधिक टिपा: 

१) हे लोणचे किमान आठ दिवसानंतर खाण्यालायक होते.

२) पाणी बोअरवेलचेच वापरावे.

३) हे लोणचे वर्षभर टिकते.

४) मऊ भातासोबत छान लागते.

५) हे लोणचे टिकण्यासाठी थोडे खारटच ठेवावे लागते.

६) लोणचे खुप पातळसर नको.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदाच पाण्यातल्या लोणच्याबाबत ऐकले. बोअरवेलचेच पाणी का बरं?
पाण्यात अशा कैर्‍या टाकल्या तर खराब होत नाही?

सारिका हे अप्रिल फूल वगैरे नाही ना नक्की?

एप्रिल फुल नाही गं रैना, मी केले आहे..
हे लोणचे फोटो काढायच्या आतच साबांनी चिनी मातीच्या बरणीत भरले. Sad
पाण्यात कुठलेही केमिकल नको, विहीरीतही काहीतरी पावडर वैगरे टाकतात असं ऐकलंय, साबा बोअरवेलचेच पाणी वापरतात.. Happy

कदाचित जागू म्हणते तसेच असेल.. Happy

नळाचे पाणी उकळवुन ,थंड करुन असे लोणचे मी करते व ते वर्षभर टिकते.फक्त बदल एकच कि या पाण्यात लोणच्याचा मसाला -मी तीळ नाही घालत-[मोहोरीची डाळ फक्त एकदाच मिक्सरमधे फिरवुन घेते] खुप वेळ चमच्याने इतका फेटुन घ्यायचा कि तो हलका झाला पाहिजे नंतर त्यात कैरीच्या फोडी घालुन मसाल्यात घोळवायच्या.इथे तेल फक्त मेथीदाणा व हिंग परतुन घेण्याइतपतच .एक मस्त प्रकार.

पाण्यातले लोणचे? अजबच प्रकार म्हणायचा! Uhoh

आमचे कडे बोअर वेल च्या पाण्याला भयानक चव असते. चुकून थोडात आले तरी थू थू करायची वेळ येते. फक्त धुणी-भांडी-आंघोळ-सफाई याकरताच वापरतो. आहारात समावेश करणे शक्यच नाही. मध्यंतरी प्लंबिंगच्याच्या काही घोळांमुळे पिण्याचे पाणी बोअरवेल च्या पाण्यासोबत मिक्स होऊ लागले तर तब्येती बिघडल्या लगेच! :-०

सारु, रेसिपी यम्मी आहे. एकदा एका जैन फ्रेंडने असं पाण्यातलं लोणचं आणलं होतं टिफिनमधे, त्यामुळे चव आठवुन आठवुन आता तोंडाला पाणी सुटलं आहे.
मग आता लोणचं करायला सांगायचं तर एकदम बोल्डमधे तो एक क्लॉज टाकला आहेस - बोअरवेलचेच पाणी. हा इन्ग्रेडियंट पुण्यात कुठे मिळतो? Wink मिनरल वॉटर नाही का चालत? Happy

अरे वाह, वेगळच आहे हे.
पाण्यातल लोणच म्हटल्यावर तेही डाएट आहे तर करुन बघावेच.
प्रश्न फक्त बोअरवेल शोधण्याचा आहे Happy

हो जाते आता हातपंप शोधायला. >> मने Lol

अगं बायांनो, शेजारी, मित्रांकडे, ओळ्खीच्यांकडे तरी असेलंच की बोअरवेल तिथून घ्या पाणी, २ ग्लासच लागेल.. Happy

वेगळाच प्रकार दिसतोय! फोटो नक्की टाक.
कशाला शोधतेस बयो, मी घेऊन येईन पु ण्यात आले की.. > मी पण पुण्यालाच रहाते गं ! Wink

मने मी लोणचे देईन म्हणाले,
पाणी काय, आता तर पाऊस पडतोय, गच्चीवर बादली ठेऊन दे मिळेल पाणी.. Proud
रावी संपर्कातून नंबर दे आल्यावर नक्की देईन.. Happy

नव्यानेच ऐकलं की लोणच्यात पाणी घालायचं. एरवी तर लोणच्याच्या बरणीला पाणी लागू नहे, चमचा कोरडा असावा ह्याची काळजी घ्यावी लागते.
दुसरा फोटो भारी आहे.