४-१० वर्षाच्या मुलांचे कॉमन आजार, दुखणी आणि त्यावर उपाय

Submitted by लाजो on 3 June, 2012 - 18:43

४-१० वर्षाच्या लहान मुलांची कॉमन बारिकसारीक आजारपण, दुखणी, जखमा इ इ बाबत अनुभव आणि त्यावर सहज उपलब्ध असलेले घरगुती उपचार -

लहान मुलांना काही झाले अगदी खरचटले, पाय मुरगळला किंवा सर्दी पडसे झाले तरी आम्हा पालकांचा जीव अर्धा होतो. मुलांना डॉक्टरकडे नेणे महत्वाचे आहेच पण कधी कधी बारिकसारीक गोष्टींसाठी डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता नसते किंवा अवेळी जेव्हा डॉक्टर / केमिस्ट उपलब्ध नसतिल अश्या वेळेस काही घरगुती उपायांनी तात्पुरता थोडा आराम मिळु शकतो. काही उपाय जे मोठ्यांना लागु होतात ते लहान मुलांना चालतिलचं असे नाही किंवा लहान मुलं ते करु शकतिल असे नाही जसे वाफारा घेणे, गुळण्या करणे इ इ . मग अश्या वेळेस काय करावे? घरच्या घरी पटकन काय द्यावे???

उदाहरणार्थ, रात्रीची वेळ, पोट अचानक बिघडले.. २-३ वेळेस शी/ओकारी झाली ... डॉक्टर सकाळपर्यंत भेटणार नाहित....मग काय करावे? बोट भाजले.... बर्नॉल ची युज बाय डेट एक्पायर झालिये... काय करावे?

अश्या परिस्थितीत आपणच कधी कधी जरा गोंधळलेलो असतो आणि मग घरगुती उपाय पटकन सुचत पण नाहीत. मग इकडे धाव घ्यावी लागते कारण मायबोलीवर लग्गेच मदत मिळेल याची खात्री असते आणि ती मिळतेच. अर्धा जीव तिथेच भांड्यात पडतो. इथल्या सर्वांचा आधार वाटतो Happy

म्हणून या धाग्यावर असे घरगुती उपचार नोट करुन ठेऊ जे, वेळ न येवो, पण कधी लागलेच तर उपयोगात आणता येतिल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा काढण्यामागचे कारण.....

----------------------------------------------------

लाजो | 3 June, 2012 - 18:14
कुणी आहे का?

लेकीला उलट्या होतायत. दुपारपासुन ३ वेळा झाल्या. पोटात पाणी पण रहात नाहिये. अत्ता आमच्याकडे डॉक्टर / केमिस्ट सगळं बंद. घरगुतीकाही पटकन देता येन्यासारखं आहे का? मला पटकन काही सुचत नाहिये

संपादन प्रतिसाद uju | 3 June, 2012 - 18:25
लाजो, ओरसच पाउच नाहीये का घरात? ग्लासभर पाण्यात चिमटिभर मीठ , चमचाभर साखर घालून चांगल ढवळून ते पाणी घोट घोट देत रहा सारख म्हणजे डीहायड्रेशन होणार नाही लेकीला. उलट्यांसाठी डोमस्टाल, ऑनडेम तत्सम गोळी असेल तर दे, आणि लवलवकरात लवकर डॉ. गाठ. लवकरच बर वाटेल पिल्लूला.

प्रतिसाद लाजो | 3 June, 2012 - 18:37
धन्स उजु लगेच उत्तर दिल्याबद्दल.
तिला मी हायड्रालाईट म्हणजे इलेक्ट्राल पावडर सारखंच लिक्विड मिळतम ते देत्येय डिहायड्रेशन होऊ नये म्हणून. आनि तु म्हनत्येय्स त्या गोल्या देशातले ब्रँड्स आहेत ना? माझ्याकडे होमिओपॅथीच्या वोमिटींग वरती गोळ्या आहेत त्या देत्येय. बाकी काही आणायला उद्या सकाळपर्यंत वाट पहावी लागेल.

संपादन प्रतिसाद अरुंधती कुलकर्णी | 3 June, 2012 - 18:45
लाजो, कशी आहे लेक आता? पिल्लूला डॉककडे नेलंस का? तिला बरंय का आता? काळजी घे गं!

प्रतिसाद चिमुरी | 3 June, 2012 - 18:47
Lajo ulatya hotayet mhanaje kahi tari nako te potat gel asel tar te baher padat asel. Dehydration honar nahi ikade laksh de. Shakya asalyas doc phone karun medications vicharata yetil ka? Karan samajal tar vomiting suppress karayacha ki nahi te tharavata yeil.

प्रतिसाद uju | 3 June, 2012 - 18:52
अग धन्स काय म्हणतेस, मी नेमकी ओन्लाईन होते म्हणून सांगता आल. होमियोपॅथीच्या गोळ्यांनी थांबतील बघ तीच्या उलट्या. हायड्रालाईट सारखा पाजत रहा पण. लिंबू सरबत पण चालेल अधून मधून. भूक लागली तर भाताची पेज पाज, किंवा डाळीच पाणी.
आणि तू पॅनीक होऊ नकोस, धीरान घे. मूलांना कळत आपण पॅनीक वगैरे झालो की, आधीच उलट्यांनी जीव घाबराघूबरा झाला असेल लेकीचा. गोष्टी, गाणी ह्यात जीव रमव तीचा.

प्रतिसाद लाजो | 3 June, 2012 - 20:04
धन्स मैत्रिणींनो.

चिमुरी, हो गं काहीतरी पोटात गेलं असेल किंवा शाळेतुन आलं असेल इन्फेक्शन.

होमिओपाथीच्या गोळ्यांनी थांबल तर बरं होइल. अत्ता थोडा मऊ भात दिलाय. एव्हढंस्स तोंड झालय बिचारीचं

हायड्रलाईट देतेच आहे. पाणी पण देत्येय.

इथे संध्याकाळी ५ नंतर केमिस्ट बंद होतात. डॉक्टरांच पण तेच एकच केमिस्ट ९ वाजेपर्यंत उघडा असतो पण तो शहराच्या दुसर्‍या टोकाला आहे... अगदीचं वेळ आली तर मग हॉस्पिटल मधे इमर्जन्सीत घेऊन जायचं...असंच आहे इथे होपफुली गरज पडणार नाही.

इथे आलं की खुप आधार वाटतो

संपादन प्रतिसाद मानुषी | 3 June, 2012 - 21:26

मी खूपच उशिरा लिहित्येय. पण लाजो सफरचंद खिसून साखर घालून त्याचा मुरांबा करायचा. तो चाटवायचा जसा जमेल तसा. याने निदान शी आळून येते.... मग औषधे, लिंबू साखर पाणी किंवा इलेक्ट्रॉल ते चालूच ठेवायचं. व्हे.......दह्याचं पाणीही खूप उपयोगी पडतं.

मलाही एकदा अशीच इमर्जन्सी आली होती...मध्यरात्री लेकीला उलट्या/जुलाब सुरू झाले. मग एका डॉ. मित्राला मध्यरात्री उठवलं. पण त्यानेच हा वरचा उपाय सांगितला आणि मिरॅक्युलस उपयोग झाला.
लाजो आता कशी आहे लेक?

प्रतिसाद मेधा | 3 June, 2012 - 23:22
Flat coke works the best for upset stomach. Even if you open a fresh can, and pour it back and forth into two cups 6-7times and let the child sip it, it will calm down the upset stomach. Make sure all the bubbles are gone.

----------------------------------

उलट्या : मीठ-साखर-पाणी.

जुलाब : जायफळ दुधात उगाळून थोडं थोडं चाटवायचं.

कफ्/खोकला :
- पूर्ण दुधाचा आलं घालून चहा. (नुसत्या दुधानं कफ वाढतो)
- अर्धी लवंग गॅसवर जरा गरम करून, तिची पूड करून मधातून द्यायची.
- मूल रात्री झोपल्यावर रुमालाच्या घडीवर निलगिरी तेलाचे २-३ थेंब टाकून ती घडी त्यानं घातलेल्या कपड्यांच्या आत छातीशी ठेवायची. चोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी उत्तम उपाय.
- गूळ-हळद मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्या चोखायला द्यायच्या. (घशातली खवखव कमी होते.)
(आदित्यला लहानपणी खोकल्याचा त्रास अधिक व्हायचा, त्यामुळे त्यावरचे उपाय माझ्या जास्त लक्षात आहेत. Lol )

बोट भाजलं - लोणी-हळद मिक्स करून ते मलमाप्रमाणे भाजलेल्या जागी लावायचं.

मुलं ४-६ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी उन्हाळ्यात एकदा हे कराच - एक मोठं पातेलंभर पाणी दिवसभर झाकून उन्हात ठेवा. संध्याकाळपर्यंत ते उबदार होतं. त्या पाण्यानं संध्याकाळी मुलाला आंघोळ घाला. त्यामुळे मुलांना उन्हाळा बाधत नाही. (याला झाळीच्या / झळीच्या पाण्याची आंघोळ म्हणतात.)

बोट भाजले.... बर्नॉल ची युज बाय डेट एक्पायर झालिये... काय करावे?>>>>> प्लेन कोलगेट (बाकीच्या टुथपेस्ट चा अनुभव नाही) चोपडायचं. लगेच थंडावा मिळतो. खुप जास्त भाजलं नसेल तर काळपट डागही पडत नाही.

डॉक्टरला पर्याय नाहीच. पण ताबडतोब आराम पडावा म्हणून काही उपाय

१) पोट दुखण्यावर

पिता येईल इतके गरम पाणी करून त्यात हिंग किंवा ओव्याचा अर्क घालून द्यावा.

जूलाब होत असतील तर साखर+मीठ्+पाणी यासोबत नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, ग्लुकोज देत रहावे.

उलटी होत असेल तर तोंडात बर्फाचा खडा द्यावा. तांदळाची पेज किंवा अरारुटची लापशी द्यावी.

उलट्या आणि जुलाबाने, शरीर स्वतःची साफसफाई करत असते, त्यामूळे ते होऊ द्यावेत.

२) सर्दीसाठी

फ्लॅक्स सीड्स (अळशी) तडतडून घ्याव्यात आणि वर पाणी टाकावे. ते उकळले कि त्यात तुळशीची पाने
आणि एक कांदा टाकावा, मग त्यात खडीसाखर किंवा साधी साखर टाकून ते पाणी पाजावे.

छाती भरून आली असेल तर छातीवर गरम नॅपकीनने शेक द्यावा.

३) भाजल्यावर

तो भाग थंड पाण्याखाली धरावा. फोड आले तरी हरकत नाही. वाफेचा चटका बसला असेल तर, कणीक पाण्यात भिजवून त्याला लेप द्यावा. ती आपोआप सुकली कि काढावी.

४) ताप आल्यास

ताप आला म्हणजे शरीर अपायकारक जिवाणूंना मारण्यासाठी प्रयत्न करतेय असे समजावे. दर तासाला ताप बघावा. डोक्यावर बर्फाच्या पट्ट्या ठेवाव्या. पॅरासेटामॉल द्यावे, पण तेही मर्यादेतच.

५) डोळ्यात काही गेल्यास

वस्तु खुपणारी नसेल तर पाण्याने धुण्याचा प्रयत्न करावा. पण शक्यतो लगेच डॉक्टरकडे न्यावे.

आणखी काही सूचले तर लिहितोच. पण लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढायला मदत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी चौरस आहार हवा. अतिगोड पदार्थ खाण्यापेक्षा, भाज्या, दही, लिंबू असे पदार्थ खाण्यात हवेत.
बाहेरून आल्यावर हातपाय धूणे, काही खाल्ल्यावर दात घासणे या सवयी कटाक्षाने लावाव्यातच.

जुलाब - मुठभर पोहे कपभर उकळत्या पाण्यात घालून शिजवून घ्यावेत. मग मीठ घालून खायला द्यावेत. जुलाब थांबतात.
आलं किसून त्यावर पादेलोण (नसेल तर हिंगही चालेल) आणि लिंबाचा रस घालून खायला द्यावे. हे मिश्रण मोठ्या प्रमाणावर करून फ्रिजमध्ये ठेवावे. गरजेप्रमाणे एकेक चमचा द्यावे. हे औषध मोठ्या लोकांसाठीही उपयोगी ठरते.

सगळेच सल्ले खुप उपयुक्त आहेत!

प्राची, तू सांगितलं आहेस त्या आल्यात साखर घातली तर चालेल का? किसलेलं आलं तिखट लागेल असं वाटलं म्हणुन विचारलं.

नाही वत्सला. साखर नाही घालायची. पादेलोण आणि लिंबूरस असल्याने आलं तिखट लागत नाही. Happy

खोकल्याचा त्रास होत असेल तर डाळिंबाची साल चघळायला द्यावी. डाळिंबाचे दाणेही खोकल्यावर फार उपयोगी असतात.
आलं+मधही फार उपयुक्त ठरते खोकल्यावर.

तुप गुळ जायफळाच्या गोळ्या- जुलाबावर
पोटदुखी साठी- पोटावरुन एरंडेल तेल लाऊन, गरम पिशवीने शेकल तर लवकर फरक पडतो. थोड्या कणकेत एरंडेल घालून पोळी केल्याने फायदा होतो नक्की. जरुन आठवड्यातून २/३ तरी घालायला हरकत नाही. शिवाय विशेष वासही येत नाही

पोटात दुखण्यावर बाळशेपा (दिल सीड्स) पाण्यात उकळून ते पाणी दिले तरी आराम पडतो. परदेशात ओवा नाही
मिळाला तर मेडीटरेनियन दुकानात दिल सीडस मिळतील नक्की.

भाजल्यावर :
भाजल्यावर लगेच बटाटा किसून लावावा . आग कमी होते आणि जखम लवकर बरी होते डाग हि राहत नाही.
माझ्या आई ने सांगितलेला उपाय. सासू बाईंच्या हातावर शेकायच्या पिशवीत भरताना उकळलेले पाणी पडले. लगेच बटाटा किसून लावला आणि वर रुमाल बांधला. खूप फरक पडला. डाग हि पडला नाही. लग्नानंतर सासरी सगळ्यांकडे आता हाच उपाय करतात .

मोठी जखम खोक वैगरे पडल्यास : आल स्वच्छ धूउन किसून लावावे . रक्त लगेच थांबते .
ताई जमिनीवरून घसरली आणि ओट्याचा कोपरा लागला . खूप रक्त वाहून गेले.घरात पार्टी होती सगळेच घाबरले होते. ताई खूप कळवळत होती, आईने लगेच आले ठेचून जखमेवर दाबून धरले. miracle झाल्याप्रमाणे रक्त थांबले. खोक पडूनही खुण काही दिवसात गेली.

डोक्यात सर्दी होऊन डोके जड होणे:
खोबरेल तेलात ५/६ लसून पाकळ्या टाकून तेल उकळावे. लसून brown होते. ते तेल रात्री डोक्यावर लावले कि सकाळ पर्यंत डोके हलके होते.
आमच्या घरी लहान मुलांना सर्दी झाली कि हा हमखास उपाय आहे.

जुलाबावर लहान मुलांसाठी हे उपाय -

  1. इलेक्ट्रॉलचे पाणी (डीहायड्रेशन होऊ नये म्हणून!)
  2. आरारूटची पाणी व साखर घालून केलेली पेज
  3. साबुदाणा भिजवून त्याची नुसती पाण्यात केलेली पेज (मी ही पेज बनवताना थोडे आरारूटही घालते. त्याने चांगला दाटपणा व कन्सिस्टन्सी येते)
  4. सफरचंद (याने पोटात थम्मण बसते.)
  5. चिकू, पालेभाज्या, गाजर देणे टाळणे (इति राजसचे डॉक्टर)
  6. थोडे अन्न पचत असल्यास तांदूळ व मूगडाळीचा मऊ पातळसर असा गुरगुट्या भात
  7. तांदळाचे घावन (तांदळाची पीठी + चवीसाठी जिरं + मीठ + हवी असल्यास कोथिंबीर [मिरची अजिबात नाही] घालून डोशांसाठी लागतं तसं पीठ भिजवून कमी तेलावर घावन घालायचे.)

तांदळाचे घावन (तांदळाची पीठी + चवीसाठी जिरं + मीठ + हवी असल्यास कोथिंबीर [मिरची अजिबात नाही] घालून डोशांसाठी लागतं तसं पीठ भिजवून कमी तेलावर घावन घालायचे.)>> कधी कधी नविन तांदुळाचे पीठ असेल तर ते चिकट असते म्हणुन यात जरासे गव्हाचे पीठ घातल्यास उरपतायला सोपे जाते व थोडासा हेवी होतो हा प्रकार. इतरवेळीही नाश्ता म्हणुन मुलांसाठी चांगला.

पॅरासेटामॉल बहुतेक लहान मुलांना देत नाहीत ना? लहान मुलांसाठी म्हणुन जे औषध असेल तेच द्यावे.

लहान मुलांना उलट्या होत असतील तर आपण सारखे पाणी आणि द्रव पदार्थ पाजतो. पण उलटीचे औषध दिल्यावर किमान १५ ते २० मिनिटे काहीच पाजु नये असे ज्ञान ( प्रात्यक्षिकासह ) दोन चार महिन्यापूर्वीच मिळाले. औषध दिल्यावर लगेच पाणी किंवा काहितरी पाजले तर पोट औषधासकट ते उलटवते. विस एक मिनीटांनी नक्की थोडेथोडे द्रवरुप पदार्थ द्या मात्र.

पॅरासेटामॉल बहुतेक लहान मुलांना देत नाहीत ना? लहान मुलांसाठी म्हणुन जे औषध असेल तेच द्यावे.
>>>
पॅरासेटामॉल चे लहान मुलांसाठी वेगळे औषध मिळते. डॉ. च्या सल्ल्याने देता येते

पण उलटीचे औषध दिल्यावर किमान १५ ते २० मिनिटे काहीच पाजु नये >>> आमचे डॉ. उलटीसाठी औषध देतात तेव्हाही हेच सांगतात. मुलाला जेवायला देण्यापूर्वी अर्धा तास औषध द्यायचे.

उलटीचे औषध दिल्यावर किमान १५ ते २० मिनिटे काहीच पाजु नये असे ज्ञान ( प्रात्यक्षिकासह ) दोन चार महिन्यापूर्वीच मिळाले. औषध दिल्यावर लगेच पाणी किंवा काहितरी पाजले तर पोट औषधासकट ते उलटवते. विस एक मिनीटांनी नक्की थोडेथोडे द्रवरुप पदार्थ द्या मात्र.>>>> +१

कधी कधी मुलं खूप कळवळून रडतात, कारण सापडत नाही. अशा वेळेला कान तपासावे. कानात पाणी राहून इन्फेक्शन झालेले असू शकते. पेडीएट्रीक डॉ.ही अशावेळेला शेवटी कान पहातात.

मुलं ४-६ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी उन्हाळ्यात एकदा हे कराच - एक मोठं पातेलंभर पाणी दिवसभर झाकून उन्हात ठेवा. संध्याकाळपर्यंत ते उबदार होतं. त्या पाण्यानं संध्याकाळी मुलाला आंघोळ घाला. त्यामुळे मुलांना उन्हाळा बाधत नाही. (याला झाळीच्या / झळीच्या पाण्याची आंघोळ म्हणतात.)
>>>> या पाण्यात कडुलिंबाची पाने घालुन ठेवावित म्हणजे घामोळ येत नाही.

तसेच घामोळे आल्यास एक कैरी उकडुन त्यातला गर आणि हळद मिक्स करावे आणि ती पेस्ट घामोळ्यावर १५-२० मिनिटे लावुन ठेवावी जरा वाळली की साबण न लावता अंघोळ घालावी ..उन्हाचा कुठलाही त्रास परत होत नाही..

Pages