निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेम पूर्ण अनुमोदन....बरंचसं नुस्तं वाचते आणि लेटेस्टला रिप्लाय देते....:)

अनिल तुम्ही शेंगा फ्रोजन करून निर्यात करणं असा काही पर्याय आहे का ते पाहिलंत का?? मी नेहमी फ्रोजन शेंगा वापरते...आजकाल तर माझी मुलं पण या शेंगा उकडवून दिल्या तरी मस्त खातात...त्यामुळे मला तर फारच गरज आहे शेवग्याच्या शेंगा मिळण्याची...फक्त काही वेळा फ्रोजनच्या पाकिटात काही न शिजणार्^या पण निघतात....:(

मला ओल्या मातीच्या वासाचं एक अत्तर मिळालं बाजीराव रोड वरच्या दुकानात. मस्तच. आत्ता तेच लावून नि. ग. वाचत्येय.>>>>> पहिल्या पावसानंतर मातीचा जो सुवास सुटतो त्यावर डॉ. मिलिंद वाटवे यांनी संशोधन करुन अ‍ॅक्टिनोमायसिट्स या प्रकारातले काही बॅक्टेरियांमुळे हा सुवास येतो हे दाखवून दिले होते - त्यावेळेस (१९८०-८२) गरवारे कॉलेजच्या मायक्रोबायॉलॉजी विभागात पेट्रीप्लेट्स मधे वाढवलेल्या या जीवाणूंचा सुवास घ्यायला गर्दी जमायची.... - स्थानिक वर्तमानपत्रे व काही शास्त्रीय जर्नल्समधेही हे प्रसिद्ध झाले होते... जिओस्मिन का असे काहीतरी नावही दिल्याचे आठवते......

१९८० च्या काळात टिळकरोडला असलेल्या चिमणबागच्या शेजारी माझा वेल्हाळ नावाचा मित्र रहायचा (अजूनही हा वेल्हाळवाडा आहे व ते कुटुंबीय तिथे रहातात). त्यांच्या दारात असलेल्या एका उंच झाडावर घारीने घरटे बांधले होते. त्यातील एक पिल्लू काहीतरी होऊन खाली पडले व थोडेसे जखमी झाले. माझ्या मित्राने त्याची चांगली देखभाल केली व पुढे ते बरे होऊन उडूनही गेले.
ते पिल्लू जेव्हा काही दिवस त्याने सांभाळले तेव्हा आम्ही बाकी मित्र त्या पिल्लाला पहायला जायचो. ते पिल्लू अगदी लहान मुलासारखे त्याच्याकडे खाण्यासाठी हट्ट करायचे, सतत त्याच्या आसपास असायचे, जरा बरे झाल्यावर सायकलच्या हँडलवर मजेत बसून चक्कर मारायचे. सायकलवरुन फिरताना बॅलन्स सांभाळण्यासाठी ते पंख जरासे उघडून असे काही मस्त हलवायचे की जणू एखादा डोंबारी दोरीवर बांबूच्या सहाय्याने बॅलन्स करतोय.....
त्यावेळेस पुण्यात स्कूटरवर २-४ कुत्री, मोटारसायकलच्या मागील सीटवर १-२ कुत्री, कधी एखादे माकड असे घेऊन फिरणार्‍या वल्लीही होत्या ........
मधे काही वर्षापूर्वी मी सातारारोडवरुन एका गल्लीतून मोटारबाईकवरुन भर दुपारी जात होतो..... अचानक माझ्या लक्षात आले की रस्त्यावरील उजवीकडील सगळी मंडळी माझ्याकडे अगदी वळून वळून, हात करुन पहात आहेत. प्रथम माझ्या लक्षात येईना.... मग एकदम जाणवले की ते माझ्याकडे पहात नसून माझ्याशेजारील ऑम्नीकडे पहात आहेत - मग मीही बाईकवर बसल्या बसल्या डावीकडे पाहिले तर .... माझ्यापासून चक्क २-४ फुटावर ऑम्नीच्या खिडकीत एक बिबळ्या बसलेला - बाहेर बघतोय थोडेसे डोके काढून - काही कळायच्या आत माझ्या पाठीवर घामाच्या धारा वहात होत्या - मग जरा नीट पाहिल्यावर कळले की त्याच्या गळ्याला एक मजबूत लोखंडी साखळीही आहे व त्या गल्लीत रहाणारे सुप्रसिद्ध डॉ. निलिमकुमारजी खैरे यांच्या घराच्या आसपास ही गाडी चाललीये............ ओह, त्या बिबळ्याचे असे अचानक घडलेले (आणि एवढे जवळून) दर्शन जन्मात कधी विसरणार नाही .......

ओल्या मातीच्या वासाचं अत्तर...वॉव्..शशांक.. एक बाटली ची ऑर्डर माझ्याकडनं Happy
पूर्वी गॅप ब्रॅण्ड चं 'ग्रास' नावाचं परफ्यूम मिळायचं.. त्याला पाऊस पडून गेल्यावर ओल्या झालेल्या हिरव्या गार गवताचा अक्षरशः वेड लावणारा सुगंध होता..
त्याकाळी थोक च्या भावाने घेतले होते.. पुढे हा परफ्यूम मार्केट मधून आऊट केला कोण्जाणे का?? Uhoh

धन्स दिनेशदा. रावी विपु चेक करणार का? वर्षू वॉव मस्त. पण हे असे फ्लेवर का कोण जाणे बाजारातुन गायब करतात हे लोक :रागः

शशांक बिबट्या दर्शन? मी तर मोटरबाईक वरुन केव्हाच पडुन लोटांगण घातल असत. रस्त्याला हो. Happy

दर त्यावेळी इतके कोसळले कि नंतर हे पाहिलेल्यांनी कुणी लावण्याच नाव घेत नाही, लोकल (तालुका/जिल्हा) मार्केट मध्ये आवक खुप होते, त्यामुळे दर कमी मिळतो (होलसेल दर -१ रुपयाला २/३ शेंगा) त्यामुळे बाहेर विकण्याचा प्रयत्न करावा लागेल्,पण यामध्ये वाहतुक खर्च विचार करावा लागतो.
शेतीमालाची निर्यात करावी ही खुप जुनी इच्छा आहे,पण विकत कोण घेणार, तिथंपर्यत पोहोचायच कस हा प्रष्न आहे .पण प्रयत्न चालु आहे>>>
अनिल खर तर आपल्याकडे इतके व दर्जेदार पिक होते प्रत्येक गोष्टीचे. पण मनुष्यबळ वा इच्छाशक्ती अभावी कितीतरी पदार्थ खराब होतात. शिवाय स्टोरेज बद्दल का कोण जाणे अजुनही खुपच मागे आहोत आपण.
मध्यंतरी पिझा बद्दल एक प्रोग्रॅम पाहिला. ऑलीव्ह साधारण १ वर्ष कोणत्यातरी द्रवात ठेवतात मगच त्याचा तो स्वाद मिळतो व ते टिकते पण.
साधा महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणात कितीतरी उत्पादन होते जसे कोकम / आंबे / नारळ. त्यापासुन एकदम साठवणुकीचे पदार्थ करणे जरा कठीण आहे, मान्य. पण ते असे साठवुन हळुहळु रेग्युलर बेसिस वर त्यापासुन उत्पन्न फार कमी जण करतात. वा असले तरी मला नाही माहिती. उन्हाळ्यात कोकणात गेले कि दिसते, माकड, इतर पक्षी / प्राणी / माणसे असे सर्वजण फळे / फुले यांची वाट लावतात. अशा गोष्टी नीट गोळा करणे साठवणे हे केले जात नाही. झाडाखाली इ. बरेचसे पडुन पडुन असेच सडते.
अगदी मला वाटते शेतात पुर्ण भागात उत्पना घेण्यापेक्षा १/४ भाग जर स्टोरेज चा केला तर शेतकरी मागणी व पुरवठा हे गुणोत्तर हाताळु शकेल.

१९८० च्या आसपास डॉ मिलिंद वाटवे, कै. डॉ. विवेक परांजपे, अनेक मित्र अशा मंडळींमुळे अनेक प्रकारचे कीटक, पक्षी, पशू, साप पहायला - हाताळायला मिळाले........
वाटवे सरांच्या घरी एकदा एक अगदी छोटासा, मोठ्या मोठ्या डोळ्यांचा, हातांच्या ओंजळीत मावेल असा प्राणी पहायला मिळाला - फार म्हणजे फारच भित्रा होता तो - माकडासारखा हा प्राणी होता - लोरिस...... पुण्यात काय महाराष्ट्रातही न दिसणारा प्राणी आला कसा काय इथे - हे जास्त कुतुहल होते.... सरांच्या एका विद्यार्थ्याला सापडला तो - एका गोवा बाजूच्या जंगलातून येणार्‍या ट्रकवर चुकून बसून तो पुण्यात आला होता - ट्रक ड्रायव्हर - विद्यार्थी - सर असा प्रवास झाला त्या लोरिसचा. शेपटी नसलेला, लांब बोटे असलेला हा प्रायमेट - फळे आवडीने खायचा व सतत लपून बसायचा प्रयत्न करायचा. तो खूप गोजिरवाणा असल्याने सहाजिकच आम्ही त्याला पोटापाशी, छातीपाशी घ्यायचो - की हा लगेच शर्टाच्या आत गेलेलाच असायचा.... ज्याला माहित नसायचे त्याला काही कळायचेच नाही की एकदम छाती-पोटाला मऊ मऊ काय लागतंय, वर तो बोटांनी बनियन किंवा शर्ट धरुन बसायचा - काय काय गंमती - जमती त्याच्या ...... पुढे विवेकच्या मदतीने त्याची बहुतेक गोव्याच्या जंगलात रवानगी केली......

वर्षु , Gap Grass perfume मिळतो अजुनही इथे. Body Mist ,कँडल वगैरे पण मिळते. Happy
शशांक , मला माहित नव्हत मातीचा वास बॅक्टेरिअ‍ॅज मुळ येत असतो ते. तुम्ही लिहिलेल वाचुन , नेट्वर अधिक माहिती बघितली.

उन्हाळ्यात कोकणात गेले कि दिसते, माकड, इतर पक्षी / प्राणी / माणसे असे सर्वजण फळे / फुले यांची वाट लावतात. >> पक्षी, प्राणी यांच्याकदून नासाडी अगदीच नगण्य होते. पक्षी, प्राणी यांच्याकडून परागीभवन, बीजप्रसार अशी मह्त्वाची कार्ये घडतात. पण माणूस? नुसता ओरबाडतो निसर्गाला. खरी वाट तोच लावतो.

प्राणी यांच्याकडून परागीभवन, बीजप्रसार अशी मह्त्वाची कार्ये घडतात. >>> + १ हेही खरय म्हणा.

पण माणूस? नुसता ओरबाडतो निसर्गाला. खरी वाट तोच लावतो>>> ही गोष्ट तर अगदीच हाताबाहेर जातेय. २ वर्षापुर्वी धडगाव / मोलगी असा दौरा झाला. तेथील जेमतेम चालायला / बसला रस्ता देउन बाकी जागा व्यापणारा निसर्ग आता कुठ्ठे म्हणजे कुठ्ठे दिसत नाही. सगळे डोंगर बोडके / उघडे. फार वाईट वाटले. खरच माणुन तर अगदी मु़ळावरच उठलाय Sad

लोरिस.. इन्टरेस्टिंग गोष्ट सांगितलीस शशांक..
सीमा.. अगं मी ही मागच्या वर्षी घेतला ग्रास.. पण यावेळी ग्रास चा वास ना पूर्वीसारखा होता ना क्वालिटी.. लावला कि अर्ध्या तासात गायबतो..
पण मधे काही वर्षं खरच गायबला होता गॅप्स च्या दुकानांतून..

उन्हाळ्यात माठामधे पाणी सुगंधित करायला वाळा म्हणून जे टाकलं जातं हे काय आहे (गवत का मुळं का अजून काही, बोटॅनिकल नाव, इ. ) कोणी सांगू शकेल का ?????

अरे वा खूप छान माहिती मिळाली.
मोनलिप, खूप खूप अभिनंदन ! मी तुला मेल करतेय. तो जरा वाच.

शशांकजींचे एकेक किस्से भारीच आहेत !

अनिल - जपान मध्ये भारतीय शेवग्याच्या शेंगांना बरीच मागणी आहे - मध्यंतरी यावर सामना मध्ये लेख आला होता, यात महारष्ट्रातल्या एका शेतकर्‍याने शेवग्याच्या विविध वाणांची निर्मिती करुन निर्यातीतुन जवळ जवळ ७ ते ८ लाखाचे वार्षिक उत्पन्न मिळवले होते.

हेम Lol

शशांकजी - लोरिस आणि बिबट्याचा किस्सा मस्तच , सातार्‍यात बिबट्या पाळण्याची फॅशन होती वाटत, माझ्या माहीती प्रमाणे कराडमधील नागनाथ (?) नायकवडी यांच्याकडे सुध्दा एक बिबट्या होता.

अत्तर बनवणे हा माझा लहानपणीचा एक असफल उद्योग होता Sad
सोनचाफा, अनंताची फुले मिळाली की त्यांना काचेच्या बाट्लीत भरुन त्यात पाणी घालुन ठेवायचे,
दोनचार दिवसांनी त्यातल्या पाण्याचे आपोआप अत्तर बनेल ही कल्पना. पण त्या पाण्याला जो थोडा उग्र दर्प यायचा ते अत्तर नक्कीच नव्हते, आता हे आठवले की हसु येते Happy
वाळ्याची थोडी माहीती http://www.esakal.in/deepotsav/gandhotsav_wala.aspx येथे आहे.

कुठल्याशा पुस्तकात वाचलेय लता मंगेशकरांच्या घरी खिडक्यांना पुर्वी वाळ्याचे पडदे असत.

किती धन्यवाद द्यावे तुला नितीन - वाळ्याची थोडी माहीती या वरील लिंकवर केवढी छान व सविस्तर माहिती आहे, ग्रेट....

ते वरील २-४ प्राणी, पक्षी पाहिले म्हणून तुम्ही माझे कसले कौतुक करताय - डॉ. वाटवे, कै. डॉ. विवेक परांजपे व असेच इतर अनेक मित्र यांनी इतके प्राणी, पक्षी, साप पाहिलेत, हाताळलेत की ऐकून थक्क होतो आपण ...... डॉ. वाटवे यांचे "आरण्यक" म्हणून जे पुस्तक आहे ते जरुर वाचा तसेच त्यांच्याशी गप्पा मारायची संधी मिळाली की लक्षात येईल की काय काय अनुभव आहेत या व्यक्तिकडे - वन्य प्राणी, पक्षी, किडे, साप याविषयी....

शशांकजी, वाटवे सरांनी त्यांच्या पिएचडी च्या अभ्यासासाठी मदुमलाईच्या (बरोबर ना?) जंगलात वास्तव्य केले होते आणी त्या अनुभवावर एक पुस्तक पण लिहीले होते. नाव विसरलो. पण वसतिगृहातल्या एका सिनीयर मुलाकडे होते. खुप पारायणे केली होती त्या पुस्तकाची. त्यातला एक फोटो कधीच विसरणार नाही ज्यात एका मेलेल्या हत्तीचे शवविच्छेदन करताना एक माणुस पुर्णपणे हत्तीच्या पोटात मावला होता.

कुठल्याशा पुस्तकात वाचलेय लता मंगेशकरांच्या घरी खिडक्यांना पुर्वी वाळ्याचे पडदे असत.>>> अहो सगळ्यांकडे असत ते. खानदेशी म्हणजे जळगाव, नागपुरच्या उन्हाळ्यात मस्ट होते. मग कुलर मधे वाळ्याची सोय झाली व हे कमी झाले. आता तर कुलर मधुन पण वाळा गेला रबरसारखे फोम वा गवत असते आता.

रच्याकने - तो पडदा ४ महिने मस्त वाटायचा पण उरलेले ८ महिने सांभाळायला वैताग यायचा Happy

>>>>उन्हाळ्यात माठामधे पाणी सुगंधित करायला वाळा म्हणून जे टाकलं जातं हे काय आहे (गवत का मुळं का अजून काही, बोटॅनिकल नाव, इ. ) कोणी सांगू शकेल का ?????

Chrysopogon zizanioides

वाळ्याबद्दल माहिती इथे बघा.

आज आम्हाला सुट्टी. मडाराका डे, नावाची. म्हणून सकाळपासून यायलाच जमले नाही.
पूण्यात पुर्वी डॉ. पूर्णपात्रे यांनी सोनाली नावाची सिंहिण पाळली होती. तिच्याबद्दल अनेक लेख
येत असत. तिला मग पेशवे पार्कात ठेवली होती. तिला गुलाबजाम खुप आवडत असत.

मोनाली, नितीन, तुम्ही कॅनिंगचा विचार करा. ताजी उत्पादने भारताबाहेर पाठवण्यात बर्‍याच अडचणी
असतात, अगदीच काही नाही तर कार्गो प्लेन वाले लोडर्स पण अडवणूक करतात.
परदेशात मी थायलंड मधली अनेक उत्पादने बघतो. भारतात पण ती आहेत. अनेक फळांचे रस, गोड चिंचा, सुकवलेली फळे.. तिथल्या सरकारने नक्कीच यासाठी प्रयत्न केले आहेत. तिथे बँकॉक विमानतळावरदेखील पेरु, जाम, चिंचा असे ताजे पदार्थ विकायला असतात. मुंबईच्या विमानतळावर तर केळेदेखील मिळत नाही.

काही दिवसांपुर्वी इथे सगळ्यांनी गुलबक्षीचे फोटो टाकले होते. खरे तर इथे पण खुप नैरोबीतही खुप आहे. पण ती फुलते संध्याकाळी. आणि इथे संध्याकाळी अजिबात प्रकाश नसतो आणि सकाळी ती,
कोमेजतेच. पण हि नक्षी टिपल्याशिवाय राहवले नाही.

Pages