कॅम्पातल्या (अर्थात पुणे कॅन्टॉन्मेन्ट एरीआच्या) आठवणी !

Submitted by दीपांजली on 5 May, 2012 - 03:29

कॅम्प अर्थात पुणे कॅटोन्मेन्ट एरीआ:
पुण्यातला माझा अतिशय लाडका भाग आणि अनेक सुंदर आठवणींनी भरलेला !
पहिल्यांदा कॅम्प ला गेले ते आई बाबां बरोबर साधारण पाचवी किंवा सहावीत असताना.. अगदी वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखं वाटलं होतं.. वेगळीच लोकं, वेगळीच दुकानं , सगळं वेगळच वातावरण, ख्रिसमस म्हणून आई बाबांनी कॅम्प मधे नेलं.. नंतर 'सुप्रिया' मधे जेवायला आणि आईच्या आव्डत्या 'निड्ल वुमन' दुकानात , ते माझं पहिलं कॅम्प दर्शन !
त्या नंतर आई बाबां बरोबर जेंव्हा जेंव्हा गेले ते ख्रिसमस च्या वेळी किंवा वेस्टएन्ड ला सिनेमा पहायला !
पहिल्यांदा इन्डिपेन्डटली कॅम्प मधे जायचं निमित्त घडलं 'सॉफ्टी' आणि मार्झोरिन च्या त्या किर्ती मुळे !
नुकत्याच अकरावीत जाउ घातलेल्या कॉलनीतल्या मोठ्या मुली नेहेमी कॅम्प च्या गप्पा मारायच्या, मग आम्ही ज्युनिअर शाळकरी पोरींनी पण ठरवलचं 'आपलं आपलं' कॅम्प ला जायचं म्हणून !
कॉलनीतल्या मैत्रीणी बरोबर गेले ते नौवीत असताना, बस नी गेलो होतो कोथ्रुड हून कुठले तरी भलतेच रुट घेऊन आधी पुलगेट ला गेलो आणि भर दुपारी एम जी रोड पर्यंत चालत गेलो आणि फक्त वंडरलँड च्या फेर्‍या करून सॉफ्टी खाऊन परत आलो होतो घरी जायला उशीर होईल म्हणून !
नंतर जायचा रुट समजल्यावर ' जंगली महाराज रोड-कुंभार अड्डा-लाल देवल (Ohel David Synagogue) मार्गे माझ्या शाळेतल्या सायकल नी, कॉलेज मधल्या सनी नी, जॉब करत असताना स्कुटीनी सतत अडीच वर्षं अशा सगळ्या वहानांनी कॅम्प च्या भरपूर वार्‍या केल्या, टायर्स झिजवली , त्यात १९९० ते २००१ काळात कॅम्पचे अक्षर्शः गल्ली बोळ झिजवले !
कॅम्प च्या आठवणी फारच नॉस्टॅल्जिक करतात कारण बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा पाहिल्या त्या कॅम्प मधे !
'कॉस्मोपॉलिटिन कल्चर' चा पहिला अनुभव, अल्ट्रा मॉडर्न क्राउड, ' पहिलं सॉफ्टी' , पहिली पेस्ट्री, पहिलं बर्गर, 'सिंगाडे, लिची फ्रुट ,इराण्याच्या दुकानातला चहा, शेपुच्या स्वाद चे इराण्याच्या दुकानाचे सामोसे (अर्थात कॅफे नाझ), श्रुसबेरी बिस्किट्स या सगळ्याची चव पहिल्यांदा घेतली कॅम्प च्या भटकंती काताना .. मेनुकार्ड वर मधे 'बीफ' पहिल्यांदा पाहिलं 'द प्लेस सिझलर्स' मधे , मोड आलेली मटकी टाकून , लिंबु पिळलेली कोन मधली भेळ पहिल्यांदा खाल्ली कॅम्प मधेच, गाडी वरचं सँडविच पहिल्यांदा कॅम्प मधेच खाल्लं !'
पहिल्यांदा ट्रॅफिक चे नियम तोडले म्हणून पांढर्‍या पोलिसानी आडवलं कॅम्प मधेच.. . त्याचं काय झालं , कॅम्प मधे जरा शाइन फेकत जाऊन म्हणत ताईची लुना नेली अठरा पूर्ण नसताना, लायसन्स नसताना आणि आडवलच पोलिसानी लाल देवल पाशी !
या शिवाय इंग्लिश मधून भीक मागणारे 'व्हाइट कॉलर' भिकारी पण पहिल्यांदा पाहिले कॅम्प मधेच !
त्या मार्झोरिन च्या बाहेरचे भिकारी(लहान पोरं) मात्र फार गुंड असायची, भीक मागण्या साठी मागेच लागत, पस्र च ओढायचे एपोरं..काही पैसे नाहीयेत म्हंटलं तर खायला द्या म्हणायची, खायला नाहीये म्हंटलं तर "जो आप खा रहे हो, वो दे दो, आप बस करो' म्हंटल होता एक टारगट पोरगा Proud
मार्झोरिन ची एक आठाव्ण : तर त्यांच्या फेमस सॉफ्टी आइस क्रिम पिक अप स्टेशनची सिलिंग लेव्हल खूप शॉर्ट होती, एका ख्रिसमस ला त्या सॉफ्टीच्या दुकानात भयानक म्हणजे अगदी धक्काबुक्कीची गर्दी होती... इतकी गर्दी कि सॉफ्टी मिळाल्यावर बाजुच्या लोकांना लागु नये म्हणून आइस क्रिम मिळाल्यावर हात उंच करून न्यावं लागत होतं सगळ्यांना आणि नादात मार्झोरिन च्या छताला टेकत होतं प्रेत्यकाचं सॉफ्टी.. त्या दिवशी सॉफ्टीच्या रांगेतले हे सीन बघून अक्षरशः हसून मेलो होतो आम्ही.. जो येइल त्याचं आइस क्रिम छताला !

कॅम्प ची खरेदी हा पण एक स्वतंत्र विषय आहे !
'बुटिक' ही कन्स्पेट पहिल्यांदा कॅम्प मधेच पाहिली..'नुमाइश' नावाचं वंडरलँड मधलं बुटिक आणि एम.जी रोड चं स्वतंत्र बलानिज माझं लाडकं होतं..
पहिले ब्रँडेड शुज, वेस्टर्न ड्रेसेस ची इतकी मोठ्या प्रमाणात दुकानं पहिल्यांदा कॅम्प मधे पाहिली !
मी १९९१ मधे पहिला ४ आकडी किमतीचा ड्रेस आई बाबां कडून मिळवला तो कॅम्प मधूनच.. (अर्थात बलानिज मधून).. नंतर माझं मलाच अडीच ह्जाराचा स्कर्ट टॉप सांभाळायचं, नीट मेन्टेन करणे प्रकाराचं टेन्शनच आलं. पण त्या वेळाचा सर्वात महाग आणि लाडका ड्रेस होता तो !
वंडरलँड , क्लोव्हर सेंटर, स्टर्लिंग सेंटर तर आहेतच पण असंख्य छोटी छोटी बुटिक्स, फॅन्सी ज्वेलरी, बोहर्‍यांची लेसची दुकानं- ड्रेस वरच्या 'योक' ची, शो बटन्स ची एकदम हटके दुकानं, कस्टम मेड पर्सेस, शुजची बुटिक्स वगैरे त्या वेळी फार नव्या वाटायच्या कन्स्पेट्स !
कॉलेज मधे 'इंटिरिअर डिझायनिंग' शिकत असताना अधुन मधुन काही साइट व्हिजिट्स किंवा अर्किटेक्ट ऑफिस व्हिजिट्स असायच्या अरोरा टॉवर्स आणि परिसरातील पॉश ऑफिसेस मधे .. तेंव्हा पासून 'तीव्र इच्छाशक्ति' कि काय म्हणतात ती फार होती कि मी पण करीन कधीतरी इथे जॉब !
माझ्या कोणी 'वेल विशर' ने तथास्तु म्हंटलं आणि पहिला जॉब लागला कॅम्प मधेच 'अरोरा टॉवर्स' वेस्ट विंग मधे.. 'आनंद गगनात मावेनासा होणे' वगैरे काय असतं ते तेंव्हा समजलं !
जॉब करत असतानाची ती अडीच वर्षं फार सुंदर होती.. दररोज लंच ब्रेक आणि संध्याकाळी एक चक्कर एम.जी रोड, कधी इस्ट स्ट्रीट ला मारायची.. कधी क्लोव्हर सेंटर ची बेसमेन्ट मधली शॉप्स धुंडाळायची , कधी ऑफिस च्या पार्टीज मोना फुड्स मधे, घरी जाताना कॅम्प स्पेशल खाउ न्यायचा.. कधी आईच्या उपासाच्या दिवशी सरप्राइज खाउ अर्थात बुधानिचे जाळीदार वेफर्स, कधी बटाट्ट्याच्या सालीचा चिवडा , कधी भावासाठी बर्गर , कधी नाझ चे सामोसे .. कधी डबा विसरला तर ऑफिस बॉय ला सांगून नाझ ची भुर्जी किंवा जॉर्ज ची बिर्याणी मागवायची.. फार सुंदर दिवस होते !
आवडत्या एरीआत ऑफिस होतं म्हणून मी कह्रोखर इतर ठिकाणी जॉब ला सुध्द अप्लाय करत नव्हते.. नंतर दुसरं ऑफिस जवळच पण इस्ट स्ट्रीट ला काय गेलं, त्याने सुध्दा मला चुकल्या सारखं वाटायचं.. मग अडीच वर्षांनी काँढव्याला ऑफिस गेलं आणि कॅम्प एरीआ सुटलाच, फार वाइट वाटलं पण करिअर मधली मोठी संधी सोडायची नव्हती, आयुष्यात पुढे तर जायचं होतं.. . कॅम्प च् वार्‍या बन्द नाही झाल्या पण बर्‍याच कमी झाल्या !
अता गेले ११ वर्षं यु.एस ला असते , कॅम्प च्या आठवणीच काय त्या राहिल्या पण दर वेळी भारतात जाते तेंव्हा मात्रं कॅम्प ची चक्कर झाली नाही असं होत नाही.
अता सगळीकडे मॉल कल्चर झालय, सगळीकडे ब्रँडेड वेस्टर्न कपडे मिळतात तरीही आजही कॅम्प एरीआ आपलं वेगळेपण टिकवून आहे, फिग लिफ टेलर , छोटी बुटिक्स, बोहर्‍यांची दुकानं अजुनही आहेत !

असो, तर माझ्या आठवणी हे फक्त निमित्त.. परवा शर्मिला फडकेच्या ' पुन्हा सिनेमा' लेखात वेस्टएन्ड थिएटर चा विषय काय निघाला आणि सगळ्या आठवणी पुन्हा एकदा अगदी फ्रेश झाल्या !
तुम्ही पण लिहा कॅम्प च्या भटकंतीचे, खादाडी, खरेदीचे अनुभव !

हे माझे मस्ट इट लिस्ट्सः
द प्लेस(सिझलर्स)
कॅफे नाझ आणि महानाझ(सामोसे, भुर्जी पाव, चहा)
मोना फुड्स
मार्झोरिन
पास्चर बेकरी
बुधानि वेफर्स
जॉर्ज ची बिर्याणि
गाडीवरची सँडविचेस
मटकीवाली कोरडी भेळ
सुप्रिया

तुम्ही पण अ‍ॅडिशन्स करा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!! माझ्या कँपच्या आठवणी जरा वेगळ्या आहेत. आइचे ऑफिस तिकडे. मग ती कधीकधी येताना मार्झोरिनची सँड्विचेस आणणार! मी स्वतंत्र , मैत्रिणींबरोबर फारशी गेलेच नाही, पण आइबरोबर, अमेरिकेतला मामा आला की त्याच्याबरोबर असं फॅमिली आउटींग व शॉपिंगच खूप झाले.
अ‍एमजी रोडची कडेची दुकानं गेल्यापासून जरा ऑड्च वाटते. आता वाईट नाहीये, पण ती मजा वेगळी होती!!

एमजी रोडवर ए बी सी फार्मची लेमन लस्सी त्याला लेमसी पण म्हणतात, पिऊन बघाच एकदा..
इस्ट स्ट्रीटवर बादशाह हॉटेलचा ऑरेंज ज्युस, व्हेज सँडविच
कयानीजचे केक्स, ब्रेड, कुकीज Happy

अर्रे काय आठवणी आहेत! कालच घरी मार्जोरिनमधले सअ‍ॅन्डविचेस आणि कयानीमधला मदिरा केक आला आहे. (दीर पुण्याला गेला होता)
माझी आठवण म्हणजे कॅम्पात "नीडलवूमन" नावाचं दुकान होतं तिथून मुलांसाठी गोड गोड कपडे आणलेले. तिथे नर्सरी प्रिंटची कापडं ही मिळायची. तीही आणत असू. आणि मग घरीच मुलांचे कपडे शिवत असू.
फार आवडीने आम्ही जात असू त्या दुकानात.

लईच भूतकाळातल्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत... त्या आठवणीतल्या सगळ्या मित्रांना ह्या लेखाची लिंक पाठविण्यात येणार आहे....

११वी नंतर दरवर्षी ख्रिसमसला न चुकता सगळे मित्र कॅम्पमधे जायचो... मस्त खादाडी करायची आणि चकाट्या पिटून परत घरी... इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षापर्यंत जात होतो.. आता असेच कधीतरी गेलो तरच कॅम्पमध्ये जाणे होते...

मधली २ वर्ष विमाननगरला ऑफिसला जायचो तेव्हा मात्र बर्‍याच वेळा घरी येताना वाटेत थांबून मार्झोरिनची सँडविचेस घरी न्यायचो..

मार्झोरिनच्या समोरच्या गल्लीतला ढोकळा..
इस्ट स्ट्रीट वरच्या क्वालिटीमधले जेवण,
हॉटेल रामकृष्ण
नेहरु मेमोरियलच्या कॅन्टीनमधला डाळवडा...

लेख छान जमलाय.

पूण्यात मी नेहमीच कुणाला तरी सोबत घेऊन भटकलोय, त्यामुळे कँप एरिया म्हणजे नेमका कुठला एरिया,
तेच लक्षात येत नाही Happy

दिनेशजी हा एरिया नेमका दोन विभागात गेलाय, नविन माणसाला कळणार नाही हे. पण साधारणपणे इथे पुण्यापेक्षा आपण वेगळेच कुठेतरी घुसलोय अशी जाणिव होते. अगदी इराणी छाप घरांची ठेवण ( बहुतेक मुस्लिम आणी बोहरी वस्ती ) मध्येच जुनाट गल्ल्या ( जिथे कॉम्पुटरची विवीध पुस्तके मिळतात) आणी दुसरीकडे अरोराचा पॉश अनूभव. दोराबजी वगैरे इस्ट स्ट्रीट ने जाताना लागतात.

खूप छान वाटते तिथे, परत पुण्यात आलात तर तिकडे आवर्जुन जा. पुणे स्टेशनपासुन जवळच आहे ते.

मस्त आठवणी. Happy

कॉलेजमधल्या मित्रमंडळींसोबत केलेलं विण्डो शॉपिंग, खरीखुरी खरेदी, पौर्णिमानं लिहिलंय तसं, - सायकल हाणत !!
कयानीचा केक, बुधानीचे वेफर्स, फुटपाथवरच्या विक्रेत्यांकडून घेतलेले स्टायलिश(!) शूज आणि चप्पल... अहाहा! काय ते दिवस.

९२-९३मधे आम्ही सेण्ट हेलेनाचं ऑफिस ऑटोमेशन करून देत होतो, तेव्हा अनेकदा तिथे फेरी व्हायची. मार्झोरिन सारखं खुणावत असायचं. ६०-७० टक्के वेळेस आमचा बुरूज ढासळायचाच. Lol

मी आणि होणार्‍या नवर्‍यानं प्रथम एकत्र शॉपिंग कँपमधेच केलं होतं. (सिरोक्को नावाच्या दुकानात. अजून आहे का ते तिथे?) तेव्हा नवर्‍यानं माझ्यासाठी घेतलेला (टोटल वेस्टर्न) ड्रेस (आता मला बसत नाही तरी :फिदी:) अजून मी जपून ठेवला आहे.

वेस्ट एण्डला सिनेमा पाहणे म्हणजे पर्वणी वाटायची. सगळं हाय-फाय पब्लिक असायचं तिथे. आम्ही हू फ्रेम्ड रॉजर रॅबिट आणि दिल है के मानता नहीं - हे दोन सिनेमे तिथे पाहिले. (सिनेमांपेक्षा निराळ्या दुनियेतली वाटणारी प्रेक्षकांमधली, आसपासच्या खुर्च्यांवरची प्रेक्षणीय स्थळंच अधिक लक्षात आहेत Wink )

९३ सालानंतर मात्र, कसं कोण जाणे, पण पुन्हा कँपमधे जाणंच झालेलं नाही Sad

मस्त लिहिलयेस डीजे. मी पण लिहिन लवकरच.
दोराबजी २००५ पर्यंत तरी होतं आर्च. पुण्यातला पहिला मॉल (बहुतेक तरी) पिरॅमिड कँपातच होता. तेव्हा कोण आकर्षण वाटलं होतं त्याचं. Happy
पहिल्यांदा बाँबे स्टोअर मध्ये पाऊल ठेवताना अगदी दडपण आलं होतं Happy

आणि ते केक, बेकींगचं सामान मिळायचं ते कोणत दुकान? चंदन ना. ते, दोरबजी अशी दुकानं आम्हा पेठीतल्या लोकांना तेव्हा अगदी भारावून टाकणारी होती. Happy

हो हो, दोराबजी आणि पिरॅमिड्स राहिलच :).
दोराबजी (मी पाहिलेलं तरी) पहिलं डिपार्टमेन्टल स्टोअर आणि पिरॅमिड पहिला मॉल..
कॅम्प ची गंमत म्हणजे 'रविवारी बन्द' :), ख्रिस्ती बांधवांचा चर्च मधे जायचा दिवस म्हणून , बन्द होण्याची वेळ चक्क रात्री ८ लाच !
फॅशन स्ट्रीट पण आधी बहुदा कॅम्प मधे लागायचा नंतर इस्ट स्ट्रीट ला शिफ्ट झाला.

बाँबे स्टोअर आणि काश्मिरर पॅलेस च्या प्राइसेस बघून अजुनही टेन्शन येतं Proud

अरे काय, हे हे अ‍ॅड करायलाच हवं खरं तर माझ्या आठवणींचा लेख एडिट करून !
त्या वेळी म्हणाजे १९९० च्या आस पास कोणी "स्टार हेअर स्टायलिस्ट" वगैरे प्रकार फार ऐकायला नाही मिळायचे, तेंव्हा एक नाव फार झोतात आलं नन अदर दॅन 'जस्बिर अरोरा', तय वेळाचा सर्वात फेमस आणि प्रचंड महागडा स्टायल्सिट !!
त्यावेळी शाळेत होते मी पण पहिल्यांदा जस्बिर चं नाव समजलं जोग क्लास कि कॉलनीतल्या सेन्ट जोसेफच्या मैत्रीणी कडून !
ओळखीतली पोरगी (शाळेतलीच) जस्बिर कडून मस्तं लेअर कट करून स्टायलिश सेट वगैरे गेली स्कुल ला आणि टिचर नी ते पाहून केस हेअर बॅन्ड लावून कि पोनी तेल बांधून चप्प बसवले Proud
तेंव्हा मुलं स्टायलिस्ट कमीच होते, त्यात जस्बिर लंडन हून आलेला, अगदीच यंग, हॅन्डसम वगैरे( मला थोडा बायकी वाटला गोष्ट वेगळी Proud !)
जस्बिर चं सलोन हॉटेल अरोरा टॉवर्स च्या टॉप फ्लोअर ला होतं, मला तेंव्हा वाटायचं कि जस्बिर त्यां हॉटेलिअर्स चाच कोणी असेल पण नंतर कळलं कि त्याचं फक्त सलोन होतं !
तर मी जस्बिर कडे गेले स्वतः पैसे मिळवायला लागल्यावर, फार सॉलिड हेअर कट करतो तो, नथिंग टु स्पेशल पण "हात कि जादु" किंवा जे काय म्हणतात दॅट वॉज जस्बिर !!
जस्बिर कडे जाणं मी थांबवलं कारण त्याच्या सलोन मधे इतका सिगारेट वास यायचा.. मला फर अनप्रोफेशनल वाटलं ते !
एकदा तर हतात सिगारेट घेऊनच आला बोलायला.. बास.. दॅट वॉज लास्ट टाइम आय सॉ जस्बिर !
अता अय गेस तो नाशिक ला मुव्ह झाला..

आधी कॅम्प च्या आठवणी वाचून वाटलं की NCC च्या कॅम्प च्या की काय Happy
मस्तच! मला पण कॅम्प मध्ये गेलं की फार भारी वाटायचं ते आठवलं.

ज्यांना कॅम्प पाहिलाच नाही आणि बघायचा आहे किंवा ज्यांना जुन्या आठवणी जागवायच्या आहेत, त्या सगळ्यांना माझ्या घरी येण्याचं ओपन इन्विटेशन ! येणार असाल तर विपुत लिहा, सेल नंबर देण्यात येइल आणि अनेक एक्स्लुसिव ठिकाणं दाखवण्यात येतील. शॉपिंग, खादाडी, टीपी, मेकओवर यापैकी कशाही साठी. माझं घर एमजी पासुन २ किमी जेमतेम, पण डिफेन्स एरियात आहे. त्यामुळे छोट्याछोट्या गोष्टींसाठी किंवा विकली शॉपिंगसाठीही कॅम्पमधेच जावं लागतं.

दीपांजली, माबोवर पुण्याबद्दल इतकं असतं, पण मला नेहमीच आउट ऑफ द प्लेस वाटायचं कारण कॅम्प बद्दल कोणाला विशेष माहिती आणि आत्मियता नाही. तुझा लेख वाचुन काय मस्त वाटलं मला. थॅंक्स !

कॅम्प म्हणजे - मोलेदिना स्ट्रीटवर वेस्टएंड, SGS मॉल, 'टुशे द प्लेस', दोराबजी, कॉफी हाउस, रामकृष्ण, नॅचरल आइसक्रीम, सुप्रिया, नेहरु मेमोरियल, लाल देऊळ, महेश लंच होम ( सी फुडसाठी अतिशय प्रसिद्ध ).

इस्ट स्ट्रीटवर - ज्युस वर्ल्ड ( भन्नाट मिल्कशेक्स मिळतात इथे), चायनीज रुम, 'बेब', वंडरलँडची मागची बाजु, विठ्ठल शमशेट, करीम्सचे काटी कबाब, स्लीप इन्स, द फेमस 'सो वॉट' ;), एकेकाळी प्रसिद्ध बागबान्स, होटेल क्वालिटी, कयानी बेकरी ( यम्मी श्रुजबेरी, चीज पापडी, मावा केक), फिग लिफ, थाउजंड ओक्स, ११ इस्ट स्ट्रीट ( बसमधलं होट्ल) आणि बर्गर किंग, तळवलकर्स.

एकीकडे शिवाजी मार्केट, जुनं पिरॅमिडस ( आता ब्रॅन्ड फॅक्टरी), हेलेनाज, खरी पेढी, सत्य पेढी, पीएनजी इ इ

एमजीबद्दल तर लिहायलाच नको. कपडे, शुजचे सगळे ब्रॅन्डस, फुड जॉइंट्स, फॅशन, उत्साह, सौंदर्य, तारुण्य, पैसा, बिझिनेस आणि जीवन. पुर्वीचं बॉम्बे स्वदेशी ( आता बॉम्बे स्टोअर्स), कश्मीर एम्पोरियम, फंकीसारखी टीनएजर्सची फेवरिट्ट शॉप्स, फजल्स, मोना फुडस सगळं इथेच.

आर्च, दोराबजी अजुन आहे. माझं विकली शॉपिंग अपुर्ण आहे त्याशिवाय. आता तर विमान नगरलाही चालु झालं आहे.

ललिता-प्रीती, सेम पिंच. मी आणि माझ्या नवर्‍यानेपण सिरोक्को मधे पहिलं शॉपिंग केलं होतं. आताचं मयुर थाली जे पुर्वी कॅमलिंग नावाचं चायनीज रेस्तराँ होतं, तिथे डिनर केलं होतं. मी तर सिरोक्कोला पुर्ण विसरले होते. आज तु 'तो' दिवस आठवण करुन दिलास. Happy

जस्बिर लंडन हून आलेला, अगदीच यंग, हॅन्डसम वगैरे >>>> उफ, मी आणि माझ्या अर्ध्या मैत्रिणी आमचं टीनएज क्रश! फार उशीरा कळलं कि तो आमच्यासाठी ( मुलींसाठी) नव्हताच. Wink काय स्कील्स होते त्याच्याकडे. त्याचे असिस्टंटस सगळी तयारी करणार, केस ओले करणं, विंचरणं, सिझर्स काढुन ठेवणं. मग तो बाहेर स्मोक करत असायचा तो येवुन १०-१५ मिनिटात कटस द्यायचा. कधीही क्लिप्स लावणार नाही, सेक्शन्स करणार नाही. नुसता हातात पकडुन सटसट कट करायचा. ब्लो ड्राय करायला परत असिस्टंट आणि मग एमजीरोडवरुन केस उडवत चालताना खरंच प्रीटी वुमन असल्यासारखं वाटायचं. इतका अ‍ॅमेझिंग हेअर ड्रेसर दुसरा भेटलाच नाही.

मला वाटतं मीच एक लेख लिहायला घेतला आहे. बासच आता.

सही , मनीमाउ Happy
नेक्स्ट टाइम देशात आले कि कॅम्प जीटीजी करु !
सिरोक्को ची आठवण करून दिलीस , थँक्स , ड्रेसेस आणि क्राउड पण जबरी होती तिथे Happy
जस्बीर च मलाही कळल नंतर Happy Happy
सॉलिड स्किल्स होते त्याच्याक्डे , पुण्यात का नाही येत तो परत Sad ?
आला तर फक्त् वर्कशॉप्स घेतो म्हणे !

अगं मनीमाऊ? काय आउटऑफ़दप्लेस? काहीही?
बघ माझाही लेख!
अगं तू लिहिलेल्या यच्चयावत सर्व ठिकाणी मी भेट दिलेली आहे.(बघ नगरी असूनही!)
मुलं पुण्यात होती तेव्हा मुलीबरोबर (अर्थातच तिच्या मित्र मैत्रिणीतून तिला वेळ मिळेल तेव्हा!)कॅम्प पालथा घातलाय.
आणि जसबीर ची क्रेझ होतीच तेव्हा. बहुतेक माझी लेकही जात होती तिकडे!
तशी आमच्या घरात सर्वांनाच क्रेझ आहे कॅम्पाची. नगरहून निघाल्यावर किंवा पुण्याहून नगरला जाताना कॅंपावरूनच जातो.
गंमत म्हणून नवरोबा आणि मी खूप भटकतो अजूनही कॅम्पात.

जस्बीरची क्रेझ होती पण कॅम्पात म्हणजे कैच्याकै महाग असणार म्हणून गेलेच नाही कधी. Sad
शाळेत असताना वर्षातून एखाददोन वेळेला कॅम्पमधे ते राज का काहीतरी दुकान होतं. एम जी रोडवर नव्हे. आतल्या गल्लीला. तिथे घाऊकमधे चपलाबूट खरेदी करायला आईबाबांबरोबर जाणे एवढंच माहित होतं कॅम्पबद्दल.
११ वी मधे पहिल्यांदा आपली आपली (मैत्रिणींबरोबर) क्याम्पात गेले. तेव्हा पहिल्यांदा मार्झोरिनचं सॅण्डविच खाल्लं.. काय सांगू.. जगातली सगळ्यात उत्तम डेलिकसी हीच असावी इतपत भारी वाटलं होतं तेव्हा. तेव्हा एम जी रोडवरच फॅशन स्ट्रीट होता. ११-१२ वी च्या काळात स्वस्तात मिळणारे टकाटक दिसणारे कपडे खरेदी करायची प्रचंड हौस होती. ४ धुण्यात त्यांचा बोळा होत असे. आई ओरडायची स्वस्त स्वस्त करत ते कपडे आणले की. तरीही Happy

कॅम्प गटग मधे माझं नाव आत्ताच्या आत्ता नोंदवून ठेवा.

हो हो कॅम्प गटग होवुन जावु दे. नावनोंदणी चालु झाली आहे. मी, डी आणि नी. Happy

मानुषी कोणता गं लेख तुझा? दे बरं लिंक.

जस्बीर, १५ वर्षांपुर्वी ६००-८०० रुपये घ्यायचा. Happy पण त्याची क्रेझच इतकी जबरदस्त होती. आणि हो अजुन एक म्हणजे उठसुट दर महिन्या दोन महिन्याला जावं लागायचं नाही. केस वाढतानाही शेपमधेच वाढायचे. उगाच झिपर्‍या होवुन उठसुट ट्रीमींगला जावं लागायचं नाही. त्याचे स्कील्सच तसे होते. Happy ( जुनं प्रेम उफाळुन येतं आहे माझं. Wink )

अरेच्चा, त्या 'गार्डन वडापाव'ची आठवण नाही काढली कोणी ? Happy

दोराबजीला लेटेस्ट भेट दिली आहे का? परदेशी गेल्याचा फिल येइल अशा तोडीचा झाला आहे आता. ३ फ्लोरेड आणि अगदी आधुनिक. 'मीट'च्या तर एवढ्या व्हरायटी मिळतात तिथे कि पुण्यातले सगळे परदेशी नागरिक रविवारी गर्दी करुन असतात.

दीपांजली सही!!.... कॅम्प म्हनजे एकदम आवडता एरिया.....बुधानिचे वेफर्स आईसाठी आणि आमच्यासाठि मार्झोरिनचं सॅण्डविच...अगदी ठरलेलच ... अजुनसुध्धा भारत वारि मार्झोरिनला गेल्या शिवाय पुर्ण होतच नाही. अजुन खुपच आठवणी आहेत कॅम्पच्या. Happy

Pages