कॅम्पातल्या (अर्थात पुणे कॅन्टॉन्मेन्ट एरीआच्या) आठवणी !

Submitted by दीपांजली on 5 May, 2012 - 03:29

कॅम्प अर्थात पुणे कॅटोन्मेन्ट एरीआ:
पुण्यातला माझा अतिशय लाडका भाग आणि अनेक सुंदर आठवणींनी भरलेला !
पहिल्यांदा कॅम्प ला गेले ते आई बाबां बरोबर साधारण पाचवी किंवा सहावीत असताना.. अगदी वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखं वाटलं होतं.. वेगळीच लोकं, वेगळीच दुकानं , सगळं वेगळच वातावरण, ख्रिसमस म्हणून आई बाबांनी कॅम्प मधे नेलं.. नंतर 'सुप्रिया' मधे जेवायला आणि आईच्या आव्डत्या 'निड्ल वुमन' दुकानात , ते माझं पहिलं कॅम्प दर्शन !
त्या नंतर आई बाबां बरोबर जेंव्हा जेंव्हा गेले ते ख्रिसमस च्या वेळी किंवा वेस्टएन्ड ला सिनेमा पहायला !
पहिल्यांदा इन्डिपेन्डटली कॅम्प मधे जायचं निमित्त घडलं 'सॉफ्टी' आणि मार्झोरिन च्या त्या किर्ती मुळे !
नुकत्याच अकरावीत जाउ घातलेल्या कॉलनीतल्या मोठ्या मुली नेहेमी कॅम्प च्या गप्पा मारायच्या, मग आम्ही ज्युनिअर शाळकरी पोरींनी पण ठरवलचं 'आपलं आपलं' कॅम्प ला जायचं म्हणून !
कॉलनीतल्या मैत्रीणी बरोबर गेले ते नौवीत असताना, बस नी गेलो होतो कोथ्रुड हून कुठले तरी भलतेच रुट घेऊन आधी पुलगेट ला गेलो आणि भर दुपारी एम जी रोड पर्यंत चालत गेलो आणि फक्त वंडरलँड च्या फेर्‍या करून सॉफ्टी खाऊन परत आलो होतो घरी जायला उशीर होईल म्हणून !
नंतर जायचा रुट समजल्यावर ' जंगली महाराज रोड-कुंभार अड्डा-लाल देवल (Ohel David Synagogue) मार्गे माझ्या शाळेतल्या सायकल नी, कॉलेज मधल्या सनी नी, जॉब करत असताना स्कुटीनी सतत अडीच वर्षं अशा सगळ्या वहानांनी कॅम्प च्या भरपूर वार्‍या केल्या, टायर्स झिजवली , त्यात १९९० ते २००१ काळात कॅम्पचे अक्षर्शः गल्ली बोळ झिजवले !
कॅम्प च्या आठवणी फारच नॉस्टॅल्जिक करतात कारण बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा पाहिल्या त्या कॅम्प मधे !
'कॉस्मोपॉलिटिन कल्चर' चा पहिला अनुभव, अल्ट्रा मॉडर्न क्राउड, ' पहिलं सॉफ्टी' , पहिली पेस्ट्री, पहिलं बर्गर, 'सिंगाडे, लिची फ्रुट ,इराण्याच्या दुकानातला चहा, शेपुच्या स्वाद चे इराण्याच्या दुकानाचे सामोसे (अर्थात कॅफे नाझ), श्रुसबेरी बिस्किट्स या सगळ्याची चव पहिल्यांदा घेतली कॅम्प च्या भटकंती काताना .. मेनुकार्ड वर मधे 'बीफ' पहिल्यांदा पाहिलं 'द प्लेस सिझलर्स' मधे , मोड आलेली मटकी टाकून , लिंबु पिळलेली कोन मधली भेळ पहिल्यांदा खाल्ली कॅम्प मधेच, गाडी वरचं सँडविच पहिल्यांदा कॅम्प मधेच खाल्लं !'
पहिल्यांदा ट्रॅफिक चे नियम तोडले म्हणून पांढर्‍या पोलिसानी आडवलं कॅम्प मधेच.. . त्याचं काय झालं , कॅम्प मधे जरा शाइन फेकत जाऊन म्हणत ताईची लुना नेली अठरा पूर्ण नसताना, लायसन्स नसताना आणि आडवलच पोलिसानी लाल देवल पाशी !
या शिवाय इंग्लिश मधून भीक मागणारे 'व्हाइट कॉलर' भिकारी पण पहिल्यांदा पाहिले कॅम्प मधेच !
त्या मार्झोरिन च्या बाहेरचे भिकारी(लहान पोरं) मात्र फार गुंड असायची, भीक मागण्या साठी मागेच लागत, पस्र च ओढायचे एपोरं..काही पैसे नाहीयेत म्हंटलं तर खायला द्या म्हणायची, खायला नाहीये म्हंटलं तर "जो आप खा रहे हो, वो दे दो, आप बस करो' म्हंटल होता एक टारगट पोरगा Proud
मार्झोरिन ची एक आठाव्ण : तर त्यांच्या फेमस सॉफ्टी आइस क्रिम पिक अप स्टेशनची सिलिंग लेव्हल खूप शॉर्ट होती, एका ख्रिसमस ला त्या सॉफ्टीच्या दुकानात भयानक म्हणजे अगदी धक्काबुक्कीची गर्दी होती... इतकी गर्दी कि सॉफ्टी मिळाल्यावर बाजुच्या लोकांना लागु नये म्हणून आइस क्रिम मिळाल्यावर हात उंच करून न्यावं लागत होतं सगळ्यांना आणि नादात मार्झोरिन च्या छताला टेकत होतं प्रेत्यकाचं सॉफ्टी.. त्या दिवशी सॉफ्टीच्या रांगेतले हे सीन बघून अक्षरशः हसून मेलो होतो आम्ही.. जो येइल त्याचं आइस क्रिम छताला !

कॅम्प ची खरेदी हा पण एक स्वतंत्र विषय आहे !
'बुटिक' ही कन्स्पेट पहिल्यांदा कॅम्प मधेच पाहिली..'नुमाइश' नावाचं वंडरलँड मधलं बुटिक आणि एम.जी रोड चं स्वतंत्र बलानिज माझं लाडकं होतं..
पहिले ब्रँडेड शुज, वेस्टर्न ड्रेसेस ची इतकी मोठ्या प्रमाणात दुकानं पहिल्यांदा कॅम्प मधे पाहिली !
मी १९९१ मधे पहिला ४ आकडी किमतीचा ड्रेस आई बाबां कडून मिळवला तो कॅम्प मधूनच.. (अर्थात बलानिज मधून).. नंतर माझं मलाच अडीच ह्जाराचा स्कर्ट टॉप सांभाळायचं, नीट मेन्टेन करणे प्रकाराचं टेन्शनच आलं. पण त्या वेळाचा सर्वात महाग आणि लाडका ड्रेस होता तो !
वंडरलँड , क्लोव्हर सेंटर, स्टर्लिंग सेंटर तर आहेतच पण असंख्य छोटी छोटी बुटिक्स, फॅन्सी ज्वेलरी, बोहर्‍यांची लेसची दुकानं- ड्रेस वरच्या 'योक' ची, शो बटन्स ची एकदम हटके दुकानं, कस्टम मेड पर्सेस, शुजची बुटिक्स वगैरे त्या वेळी फार नव्या वाटायच्या कन्स्पेट्स !
कॉलेज मधे 'इंटिरिअर डिझायनिंग' शिकत असताना अधुन मधुन काही साइट व्हिजिट्स किंवा अर्किटेक्ट ऑफिस व्हिजिट्स असायच्या अरोरा टॉवर्स आणि परिसरातील पॉश ऑफिसेस मधे .. तेंव्हा पासून 'तीव्र इच्छाशक्ति' कि काय म्हणतात ती फार होती कि मी पण करीन कधीतरी इथे जॉब !
माझ्या कोणी 'वेल विशर' ने तथास्तु म्हंटलं आणि पहिला जॉब लागला कॅम्प मधेच 'अरोरा टॉवर्स' वेस्ट विंग मधे.. 'आनंद गगनात मावेनासा होणे' वगैरे काय असतं ते तेंव्हा समजलं !
जॉब करत असतानाची ती अडीच वर्षं फार सुंदर होती.. दररोज लंच ब्रेक आणि संध्याकाळी एक चक्कर एम.जी रोड, कधी इस्ट स्ट्रीट ला मारायची.. कधी क्लोव्हर सेंटर ची बेसमेन्ट मधली शॉप्स धुंडाळायची , कधी ऑफिस च्या पार्टीज मोना फुड्स मधे, घरी जाताना कॅम्प स्पेशल खाउ न्यायचा.. कधी आईच्या उपासाच्या दिवशी सरप्राइज खाउ अर्थात बुधानिचे जाळीदार वेफर्स, कधी बटाट्ट्याच्या सालीचा चिवडा , कधी भावासाठी बर्गर , कधी नाझ चे सामोसे .. कधी डबा विसरला तर ऑफिस बॉय ला सांगून नाझ ची भुर्जी किंवा जॉर्ज ची बिर्याणी मागवायची.. फार सुंदर दिवस होते !
आवडत्या एरीआत ऑफिस होतं म्हणून मी कह्रोखर इतर ठिकाणी जॉब ला सुध्द अप्लाय करत नव्हते.. नंतर दुसरं ऑफिस जवळच पण इस्ट स्ट्रीट ला काय गेलं, त्याने सुध्दा मला चुकल्या सारखं वाटायचं.. मग अडीच वर्षांनी काँढव्याला ऑफिस गेलं आणि कॅम्प एरीआ सुटलाच, फार वाइट वाटलं पण करिअर मधली मोठी संधी सोडायची नव्हती, आयुष्यात पुढे तर जायचं होतं.. . कॅम्प च् वार्‍या बन्द नाही झाल्या पण बर्‍याच कमी झाल्या !
अता गेले ११ वर्षं यु.एस ला असते , कॅम्प च्या आठवणीच काय त्या राहिल्या पण दर वेळी भारतात जाते तेंव्हा मात्रं कॅम्प ची चक्कर झाली नाही असं होत नाही.
अता सगळीकडे मॉल कल्चर झालय, सगळीकडे ब्रँडेड वेस्टर्न कपडे मिळतात तरीही आजही कॅम्प एरीआ आपलं वेगळेपण टिकवून आहे, फिग लिफ टेलर , छोटी बुटिक्स, बोहर्‍यांची दुकानं अजुनही आहेत !

असो, तर माझ्या आठवणी हे फक्त निमित्त.. परवा शर्मिला फडकेच्या ' पुन्हा सिनेमा' लेखात वेस्टएन्ड थिएटर चा विषय काय निघाला आणि सगळ्या आठवणी पुन्हा एकदा अगदी फ्रेश झाल्या !
तुम्ही पण लिहा कॅम्प च्या भटकंतीचे, खादाडी, खरेदीचे अनुभव !

हे माझे मस्ट इट लिस्ट्सः
द प्लेस(सिझलर्स)
कॅफे नाझ आणि महानाझ(सामोसे, भुर्जी पाव, चहा)
मोना फुड्स
मार्झोरिन
पास्चर बेकरी
बुधानि वेफर्स
जॉर्ज ची बिर्याणि
गाडीवरची सँडविचेस
मटकीवाली कोरडी भेळ
सुप्रिया

तुम्ही पण अ‍ॅडिशन्स करा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलयस डिजे.
कँपात मोनामध्ये जसे छोले भटुरे मिळतात तसे कुठे खाल्ले नाहीत. आता ते छानच होते कि तिथल्या वातावरणाचा परिणाम माहित नाही.
तसच बाँबे स्टोअर्स विसरलीस का? खुप महाग पण फार आकर्षण वाटायच.
पिरॅमिड समोरची ती गल्ली भर दुपारी केवढी शांत असायची.
केक साठी लागणार बरच फॉरिन साहित्य कँपातल्या आडवळणाच्या गल्लीतल्या बारक्या दुकानात मिळायच. एकदा गोल्डन सिरप साठी दुपारभर हिंडलेल आठवत. केक पॅन्स, आयसिंग टिप्स फक्त तिथेच मिळायचे तेव्हा. तिथेच पुढे लेस, सुया आणि इतर embroidery च साहित्य पण मस्त मिळायच.
ज्युस वल्ड मध्ये एकदम भारी स्ट्रॉबेरी ज्युस मिळायचा. अहाहा. इथे कित्येकदा तसा घरी करायचा प्रयत्न केला. MG road च्या कॉर्नरला एक फुलांच्या बुकेच दुकान होत. फार सुरेख रचना असायच्या तिथे.
आणि कॅपात दरवेळी येणार "हकोबा" च प्रदर्शन. हमखास खरेदीच ,चपलांच एक हाय फाय दुकान. बहुदा रिगल का?
वेस्ट साईडच्या थोड अगोदर वारली पेंटिग्ज ने वगैरे रंगवलेल एक ऑफिस/घर काहीतरी होत . कॅपमध्ये जाताना लागणार्‍या जुन्या बाजारात जायच मात्र कशी धाडस झाल नाही.

बेंगलोरच्या MG road किंवा Commercial Rd चे फील पण असाच. पण बेंगलोरचे दिवस जास्त जवळचे वाटतात कँपपेक्षा मला. Happy

पिरॅमिड समोरची ती गल्ली भर दुपारी केवढी शांत असायची.>>> तू उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचीस का तिकडे? Proud

एरव्ही तिथे कितीदा दुपारी व्हिन्सेंटची पोरं आणि सेंट अ‍ॅन्सच्या( ?) पोरी दिसायच्या.

जेजे गार्डनच्या इथला वडापाव न मनिमाऊ? आम्ही खूपदा मागवायचो हापिसात. पूना कोल्ड्रींक हाऊसची लस्सी, कराची स्वीट मार्ट, हनुमान मंदिराजवळची पाणीपुरी ही माझ्यातर्फे अ‍ॅडिशन Happy

वेस्ट साईडच्या थोड अगोदर वारली पेंटिग्ज ने वगैरे रंगवलेल एक ऑफिस/घर काहीतरी होत . कॅपमध्ये जाताना लागणार्‍या जुन्या बाजारात जायच मात्र कशी धाडस झाल नाही.
<<<<
हो , दर बुधवरी ते जुन्या बाजाराचं ट्रॅफिक .. तिथे जावं अस कधीच वाटल नाही , चोर येऊन चोरीचा माल विकतात असा समज होता माझा Proud
त्या जुना बाजार जवळच्या झोपडपट्टीची खासियत म्हणजे हिन्दु मुस्लिम एकता ( निदान वाटायच तरी तसं ) , कायम मुस्लिम सणांना हिन्दुं तर्फे आणि हिंदुंच्या सणांना मुस्लिमबांधवाच्या शुभेच्छंचा बॅनर लागायचा :).

माझ्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही खर तर ९५ साली मियामी - सेंट व्हिंसेंट जवळ रहायचो. तिथे क्वार्टर्स मिळाल्या होत्या वडलांना. कॉस्मोपॉलिटीन कल्चर मधे रहायची सवय होती. पण इथे जरा 'वेगळच होत' . समहाऊ मला आणि आईला तिथे रहायला नाही आवडलं. त्यामुळे कधीच रुळलो नाही. गुढ गम्य वाटायची ती बिल्डींग, मोठाले प्यासेज , मोठाल्या फॅट्स ची बंद दार,
१ वर्षातच तिथुन दुसर्‍याठिकाणी रहायला गेलो. मात्र फिरायला/ खरेदीला कँपात जायला आवडत.
निडल वुमन माझ अजुनही फेवरेट. तिकडे गेलो की बुधानी , मार्झोरियन , चायानीस रूम ला भेट दिल्याशिवाय बाहेर पडायच नाही कँपातून असा नियम आहे.
वेस्ट एंड ला पहिलेला पहिला चित्रपट 'गोल्डन आय' अजूनही आठवतोय.

डिजे,
मस्त लिहीलंय :). जसबीर Proud
फॅशन स्ट्रीट, दोराबजी, बुधानी, वेस्ट एंड, फेअरडील, मोनाफूड्स, मार्झोरीन, बाँबे स्टोअर्स, काश्मिर एम्पोरीअम, वंडरलँड आणि तिथले बुटीक्स, इस्ट स्ट्रीट, तिथलं चायनीज रूम, अरोरा टॉवर्स, बाजूच्या गल्ल्यांमधे असलेली बोहरी लोकांची दुकानं.... एकदम नॉस्टॅल्जिक.....

हो हो कॅम्प गटग होवुन जावु दे. नावनोंदणी चालु झाली आहे. मी, डी आणि नी>>>>>>>>>>>>> +१ मी पण ग...:)
मला लेख खुप आवडला...बालपण कॅम्पात गेल्यामुळे खुप आठवणी जाग्या झाल्या...मार्झोरीन चा चीज बर्गर आनि चॉकलेट शेक मी लहानपणापासुन खाते आहे अजुन ही कंटाळा नाही आला त्याचा...दोराबजी ची चॉको पिरॅमिड... सरकारी बगीच्या जवळ मिळणारे काठी क्बाब....ई स्ट्रीट वरचे तंदुर.....इराणी पध्तीचा खिमा सामोसा..मस्का पाव ...तोपांसु..
एकदम फट्याक कपडे मिळण्याची जागा म्हणजे कॅम्प...तुमच बजेट काहीही असो...,.,.पायांना थोडा व्यायाम दिला तर हवे तसे कपडे मिळु शकतात...आता तर नविन खुप आउटलेट सुरु झाले आहेत...
X-mas eve ला खुप मजा येते.. Happy

हो हो कॅम्प गटग होवुन जावु दे. नावनोंदणी चालु झाली आहे. मी, डी आणि नी>>>>>>>>>>>>> +चि Wink

माझं कॉलेज कॅम्पात (लाल देवळाजवळ) असुनही कॅम्पात जास्त फिरणं झालं नाही.. त्यामुळे मला आता कोणी फुरसतमधे कॅम्प फिरवणार असेल तर मी एनीटाईम रेडी Happy

डिजे, जुन्या बाजारात एकेकाळी दर रविवारी आणि बुधवारी सकाळी ७:३० ला पोचायचे मी. Happy
सेट प्रॉप, हॅण्ड प्रॉप, मॉबसाठी/ प्रॉप म्हणून कपडे.. काय काय आणि किती किती खरेदी केलंय त्याची मोजदादच नाही.
एक जर्मन सिल्व्हरची कड्यांची जोडी घेतली होती तिथून. त्यातलं एक मूर्खासारखं देऊन टाकलं कुणाला तरी. दुसरं आहे अजून. आणि तितकंच भारी दिसतं अजूनही.

मला आता कोणी फुरसतमधे कॅम्प फिरवणार असेल तर मी एनीटाईम रेडी >>> चिमु, ये गं कोणत्याही शनिवारी. मी घेवुन जाते. जी भरके शॉपिंग कर. Happy

वेस्ट साईडच्या थोड अगोदर वारली पेंटिग्ज ने वगैरे रंगवलेल एक ऑफिस/घर काहीतरी होत >>> ते कोणत्यातरी शेतकरी समितीचं भाजी आणि शेतकी वस्तु विकण्याचं ठिकाण होतं. ते गेलं नविन कन्सट्र्क्शन मधे. Sad

बिल्वा, हो तेच गार्डन वडापाव.

नी, अजुनही तुला तशी व्हाइट मेटलची ज्वेलरी मिळेल. वंडरलँडमधे २-३ दुकानं आहेत. नवरात्रीच्या वेळेस तर कहर कलेक्शन असतं. फार सुंदर दागिने मिळतात.

शिवाय खरे चांदी-सोन्याचे कस्टमाइज्ड ( वाट्टेल ते पॅटर्न दिले तरी) दागिने मिळण्याचं ठिकाण म्हणजे वंडरलँडमधलं सुधन (इकडच्या भाषेत ' सुदान' Wink ). फार सही दागिने बनवुन देतो हा. महाग पण आहे खुप. मी (स्लीवलेस ड्रेसेसवर घालण्यासाठी) चांदीचं आर्मलेट, हेच चुरीदारवर पायतही वापरते, बनवुन घेतलं. १२००रुपये Sad

ज्यांना मुली आहेत अशा हौशी ( आणि लकी Happy ) आयांसाठी 'डॉटर्स' मस्ट विजीट शॉप आहे. फक्त आणि फक्त मुलींचे फ्रॉक्स आणि इतकी ट्रिमेंडस वरायटी आहे. ब्रॅन्ड्स पेक्षा बर्‍यापैकी स्वस्तपण आहे.

व्वा छान आठवणी! सुंदर लिहलय Happy
आचार्य अत्रेंच्या 'मी कसा झालो' या पुस्तकात उल्लेख केलेला 'कँम्प किंव्हा लष्कर, म्हणजेच हाच भाग का?

मनिमाऊ, खच आहे माझ्याकडे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा Happy
हे कडं मात्र खास ऑथेन्टिक अ‍ॅन्टिक पॅटर्नचं आहे. जुन्या बाजारातच मिळू शकेल असं. हा घे फोटु...
kada.jpg

थोड्यावेळाने काढून टाकेन.

डिजे येईल तेव्हा मी पुण्यात असायला हवे. पण आत्ता पुण्यात आहेत तेवढ्यांनी एक मुहूर्ताचं म्हणून क्यांप गटग करायचं का?
मी आहे सध्या पुण्यात. माझा हात वर Happy

जातात की,पण कॉफी हाऊसचा उल्लेख 'मस्ट ईट' मध्ये नाहीये

त्यामुळे हा तोच कॅम्प का असे मनात आले

बाकी लेख 'मराठी अमेरिकनांची बखर' या सदरात जाऊ शकेल

फोटो नसल्याने लेख नीटस आवडतोय की नाही हे समजले नाही

नी, काय सुंदर पीस आहे हा. असा परत मिळणं अवघडच. सुदान/सुधनकडे चांदीत बनवुन मिळेल पण बेकार महाग असेल.

हिम्सकुल, संयुक्ताला आवडेल असंच सगळं मिळतं कॅम्पमधे. शॉपिंग म्हणजे 'बाकीचे' घाबरणारच. Happy

मोलेदिना स्ट्रीटवरचं कॉफी हाऊस.... तिथे मी आयुष्यात पहिल्यांदा फळांचे तुकडे + फेटलेली साय + जेली + श्रेडेड कॉटेज चीज वगैरे मिश्रण असलेला - वर पुदिन्याच्या पानाची व चेरीची सजावट असलेला 'कॉफी हाऊस डिलाईट' नावाचा मस्त पदार्थ काचेच्या उंच दांड्याच्या कपात चाखलेला...

आईवडिलांना कँपात भटकण्याचं लैच वेड असल्यामुळे खूप लहान असल्यापासून तिथे हिंडले, भटकले आहे. खादाडी तर खूप केली आहे. कॅपिटॉल, वेस्ट एन्ड ला सकाळ- दुपार - संध्याकाळ - लेट नाईट अगणित पिक्चर्स टाकलेत. मॅनीज व मॉडर्न बुक स्टॉलमध्ये पुस्तकांच्या गराड्यात तासन् तास घालवलेत. कँपातल्या रस्त्यांवरून य फेर्‍या घातल्या आहेत. गल्ली बोळ पालथे घातले आहेत. खरेदी जास्त करून कपडे, पुस्तके व कॅसेट्सची. (मॅनीज व मॉडर्न बुक स्टॉल). मॉडर्न बुक स्टॉलमध्ये विवाल्डी, बीथोव्हन, चॉपिन यांसारख्या महान लोकांच्या संगीताच्या एच एम व्हीने काढलेल्या कॅसेट्स, ग्रामोफोनवर वाजवायच्या तबकड्या, सिनात्रा यांपासून मायकेल जॅक्सन, जॉर्ज मायकेल, मॅडोना, स्टीवी वंडर यांच्या कॅसेटी उलथ्या पालथ्या करत, कधी विकत घेत बराच वेळ घालवलाय. नेहरू मेमोरियल हॉल व गुलाटी हॉल ला पूना म्यूझिक सोसायटीने आयोजित केलेले अनेक पाश्चात्य वाद्यसंगीताचे किंवा वेगवेगळ्या देशांच्या लोकसंगीत/नृत्याचे कार्यक्रम पाहिले - ऐकले आहेत. सुप्रिया, रामकृष्ण, मोनाज फूडस, मार्जोरिन, बर्गर किंग, jaws, कॅफे नाझ, बुधानी, वंडरलँड मधील एक रेस्टॉरंट (नाव आठवत नाही), दोराबजी, भावनगरी, कराची स्वीट्स, लाल देवळाकडे जाताना लागणारे अशोका, ईस्ट स्ट्रीटवरचे ओअ‍ॅसिस, बानू कोयाजी स्ट्रीटवरून एम जी रोडकडे येताना लागणार्‍या सँडविच गाड्या, ब्लू नाईलजवळच्या हातगाड्या / स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ, बुधानी शेजारच्या खाऊगल्ल्या.... ऊफ्फ! आणि हो, साचापीर स्ट्रीटजवळची खाऊगल्ली, तेथील वेगवेगळ्या बेकर्‍यांमध्ये मिळणारा ताजा पाव व खारी, टोस्ट (काय मस्त तो वास!), ताजे क्रीमरोल्स, कयानीचे केक्स - श्रूजबेरी, इराण्याच्या हाटेलातील गुलाबी चहा.... रविवारी कँपातील रिकाम्या रस्त्यांवरून व विक्रेते नसलेल्या फूटपाथवरून चालण्यातील मजा.... पुलगेटापासून ते अरोरा टॉवर्स पर्यंत व तिथून लाल देऊळ, नाना पेठ, लक्ष्मी रोड असा फेरफटका.... किंवा अरोरा टॉवर्सकडून मिलिटरी एरियात भटकायला जायचे....

लाल देवळापासच्या डी. ई. च्या हापिसात वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने अनेक चकरा, कँपात एका कॅथलिक मैत्रिणीचे नातेवाईक राहत असल्यामुळे त्यांच्याकडे ये-जा, तेथील काही गुजराती - मारवाडी - सिंधी - पंजाबी कुटुंबांशी परिचय असल्यामुळे त्यांच्या घरी ये-जा, आईचे एक मुस्लिम सहकारी त्याच भागात राहत असल्यामुळे ईदला त्यांच्याकडे जाणे, माझे एकेकाळचे डॉक्टर व के ई एमचे तेव्हाचे डीन डॉ भरुचा यांच्या कॅपिटॉलशेजारील टिपिकल पारशी वातावरण असलेल्या खासगी क्लिनिकमध्ये जाणे, के ई एम / रूबी / जहांगिर मध्ये कोणा नातेवाईकांना अ‍ॅडमिट केले असले की त्या निमित्ताने भागात जाणे, शिवाजी मार्केटाशेजारच्या भागात ये-जा, साधू वासवानी चौकातील शांती क्लिनिक मध्ये एक्स-रे तपासण्यांच्या निमित्ताने खेपा, क्वीन्स गार्डन परिसरात परिचितांकडे ये-जा, अल्पबचत भवन मध्ये अनेक कार्यक्रमांना जाणे, जवळच्याच पी डब्लू डी क्वार्टर्स मध्ये, सायकल सोसायटीत, बानू कोयाजी स्ट्रीटवर डॉ अब्दुल सलामांच्या घरी व इतर परिचितांकडे जाणे, हॉलीवुड गुरुद्वार, नाना पेठेतील गुरुद्वार, साधना सदन, कँपातील जैन मंदिर, इस्कॉन, बोट क्लब - पूना क्लब - पंजाब असोसिएशन हॉल इ. ठिकाणी कार्यक्रम अशा अनेको निमित्तांमुळे कँपात ये - जा होतच असायची. सध्या अंतर व वेळ यांचे अभावी तिथे तेवढे जाणे होत नाही. तिथेच्च मिळू शकतील अशा अनेक वस्तू आता बाकी ठिकाणीही शोधल्यास मिळू शकतात. आता कँपचा चेहरा खूप अद्ययावत, कॉस्मो, झगझगाटी झालाय. पूर्वीच्या ओळखीच्या व खास अशा अनेक खाणाखुणा मिटल्या आहेत. अर्थात तरीही आणि तरीही कँपला पर्याय नाही!!! Happy

मस्त लेख! कँपमधे पहिल्यांदा लहानपणी एका सुट्टीत माझ्या मामाच्या मित्राने नेले होते. तेव्हा खरेदी वगैरे काही कळत नव्हते. नेहमी न मिळणारा छान छान खाऊ हेच अप्रुप होते. त्यानंतर होस्टेलला रहायला लागल्यावर दोन तीन महिन्यातून एकदा मैत्रीणींबरोबर कँप फेरी व्हायची. माझी एक मैत्रीण कँप मधली होती. तिच्याकडे ख्रिसमसला जाणे व्हायचे.

मॅनीज. खूप मोठं नाही पण अगदीच छोटंही असं दुकान. पुस्तकप्रेमींसाठी अलिबाबाची गुहा. वाटेल तेवढं वेळ बसा - खरं तर गच्चम गचडीतल्या पुस्तकां आणि वाचनप्रेमींच्या गर्दीमध्ये उभं रहा, पुस्तकं चाळा, वाचा. हवी तर विकत घ्या... मूळ गर्दीपासून थोडंस बाजूलाच असं हे दुकान. लाल देवळापासून वेस्टएंडकडे चालत जात असलात, तर कॉफी हाऊस झालं की मग. बाहेरच्या साध्याश्याच पुस्तक डिस्प्लेंवर जाऊन चालायचं नाही. आतमध्ये खजिनाच खजिना. आता बंद झालं. शेवटची तारीख काय होती? आठवत नाही. पक्ष्यांवरची २-३ दुर्मिळ पुस्तकं ही तिथली शेवटची खरेदी.. Sad

बाकी बुधानी, फेअरडील, मार्जोरीन, नीडल वुमन (आईचं एकदम लाडकं) आणि रस्त्याच्या अगदी शेवटी, दुसर्‍या टोकाला एक दुकान होतं, त्याचं नाव आठवत नाही, पण तिथे कॉटनचे जीन्सवरचे टॉप्स, शर्ट वगैरे भारी मिळायचे एकदम! अगदीच टपरीवजा दुकान होतं, पण भारी एकदम Happy

MG रस्त्यावरुन फेरफटका मारायला एकदम सह्ही वाटायचं! डीजे, एकदम मस्त बाफ काढलास. Happy

आणि कयानी!! आणि त्यांची ती श्रूजब्री बिस्किटं! यम्मी!

निडल वुमन हे एकमेव दुकान आहे, जिथे साइझ किंवा इतर काही प्रॉब्लेम झाला तर कॅश बॅक पॉलिसी आहे. अगदी एक वाक्यानेही हुज्जत न घालता. बारशाला गिफ्ट द्यायला इतक्या सही गिफ्ट्स आहेत इथे. तो बाळाचा संपुर्ण सेट मिळतो. फारच क्युट असतो. एक्सपेक्टेड मॉमसाठी त्यांच्याकडे एक लिस्ट तयार असते. ती बघुन जर शॉपिंग केलं तर एकही वस्तु विसरत नाही.

कॉफी हाउसमधले ते बुटके अंकल कोणाला माहित आहेत? फारच छान आहेत ते. वर्षानु वर्ष जावुन त्यांच्याशी ओळख झाली आहे. पण नविन कस्टमर्सशी पण ते तेवढ्याच मैत्रीने गप्पा मारतात. ते इतके शॉर्ट आहेत कि जेमतेम आपल्या टेबलपर्यंत पोचतात. छोट्या मुलांशी त्यांची लगेच दोस्ती होते.

संदीप, माझ्या यादीत आहे ना बर्गर किंग. Happy पण आता ती मजा नाही राहिली. जुनं झालं आणि रस्ता वन वे झाल्यापासुन तिथे जाणं मुश्किल झालं आहे. आता ती शान नाही राहिली.

डी, परत एकदा थँक्स. जसे लोक आपापल्या गावांच्या धाग्यावर गप्पा मारतात तशी मी या धाग्यावर पडिकच आहे. माबो मला फारच जवळचं वाटायला लागलं कालपासुन. Happy

मी अगदी हेच लिहायला आले की कोणी ' कॉफी हाऊस ' चा॑ उल्लेख कसा केला नाही. बेफींनी केला, धन्स.
पनीर पकोडे हे प्रकरण ८०' ज मधे प्रथम कॉफी हाउस मधे खाल्लं. बॅन्केतून मेन स्ट्रीट कडे चालत येताना लागणारे पारशांचे अवाढव्य बंगले, त्या रंगीत काचांच्या खिडक्या, भरपूर झाडी वगैरे जाम गूढ वाटायचे. एका मैत्रीणि बरोबर लाल देवळात पण जात असु. शनिवारचा हाफ डे झाला की कँपाची चक्कर ही असायचीच. बुधानीचे वेफर्स, मार्झ -ओ- रिन ची सँडवीच, कयानीचा केक हे किंवा यापैकी काही घरी नेले नाही तर भाऊ जाब विचारायचा. ईस्ट स्ट्रीट वरच ' चायनीज रूम ' पण जाम आवडतं होतं. तसंच ' मोना फूड ' सारखा लाजवाब चना भटुरा अजूनही कुठे भेटला नाही. माझ्या कमाईची पहीली साडी घेतली ती ' इंडो फॉरेन ' मधे. तेव्हा ' मॉल ' हा शब्द आला नव्हता म्हणून. नाहीतर ' वंडरलँड ही आद्य मॉल आहे. कपडे शिवायला ' लिबर्टी ' मधे जात असू. तिथला अशोक मास्टर अजून आठवतो.
तसंच बँकेच्या कृपेने सदर्न कमांडच्या रिस्ट्रीक्टेड एरियात पण जायला मिळायचं. तिथले मिलीटरी ऑफीसर्सचे ते विस्तीर्ण आवार असलेले बंगले, भरपूर झाडी, स्वच्छ आणि खड्डे विरहीत रस्ते सगळं भूरळ पाडणारं होतं.
असो. तर दिपांजली हा धागा काढल्याबद्द्ल धन्स. तसंच कँपातला नॉस्टॅल्जिया अनूभवणार्‍या सगळ्यांना अनुमोदन.

Pages