कॅम्पातल्या (अर्थात पुणे कॅन्टॉन्मेन्ट एरीआच्या) आठवणी !

Submitted by दीपांजली on 5 May, 2012 - 03:29

कॅम्प अर्थात पुणे कॅटोन्मेन्ट एरीआ:
पुण्यातला माझा अतिशय लाडका भाग आणि अनेक सुंदर आठवणींनी भरलेला !
पहिल्यांदा कॅम्प ला गेले ते आई बाबां बरोबर साधारण पाचवी किंवा सहावीत असताना.. अगदी वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखं वाटलं होतं.. वेगळीच लोकं, वेगळीच दुकानं , सगळं वेगळच वातावरण, ख्रिसमस म्हणून आई बाबांनी कॅम्प मधे नेलं.. नंतर 'सुप्रिया' मधे जेवायला आणि आईच्या आव्डत्या 'निड्ल वुमन' दुकानात , ते माझं पहिलं कॅम्प दर्शन !
त्या नंतर आई बाबां बरोबर जेंव्हा जेंव्हा गेले ते ख्रिसमस च्या वेळी किंवा वेस्टएन्ड ला सिनेमा पहायला !
पहिल्यांदा इन्डिपेन्डटली कॅम्प मधे जायचं निमित्त घडलं 'सॉफ्टी' आणि मार्झोरिन च्या त्या किर्ती मुळे !
नुकत्याच अकरावीत जाउ घातलेल्या कॉलनीतल्या मोठ्या मुली नेहेमी कॅम्प च्या गप्पा मारायच्या, मग आम्ही ज्युनिअर शाळकरी पोरींनी पण ठरवलचं 'आपलं आपलं' कॅम्प ला जायचं म्हणून !
कॉलनीतल्या मैत्रीणी बरोबर गेले ते नौवीत असताना, बस नी गेलो होतो कोथ्रुड हून कुठले तरी भलतेच रुट घेऊन आधी पुलगेट ला गेलो आणि भर दुपारी एम जी रोड पर्यंत चालत गेलो आणि फक्त वंडरलँड च्या फेर्‍या करून सॉफ्टी खाऊन परत आलो होतो घरी जायला उशीर होईल म्हणून !
नंतर जायचा रुट समजल्यावर ' जंगली महाराज रोड-कुंभार अड्डा-लाल देवल (Ohel David Synagogue) मार्गे माझ्या शाळेतल्या सायकल नी, कॉलेज मधल्या सनी नी, जॉब करत असताना स्कुटीनी सतत अडीच वर्षं अशा सगळ्या वहानांनी कॅम्प च्या भरपूर वार्‍या केल्या, टायर्स झिजवली , त्यात १९९० ते २००१ काळात कॅम्पचे अक्षर्शः गल्ली बोळ झिजवले !
कॅम्प च्या आठवणी फारच नॉस्टॅल्जिक करतात कारण बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा पाहिल्या त्या कॅम्प मधे !
'कॉस्मोपॉलिटिन कल्चर' चा पहिला अनुभव, अल्ट्रा मॉडर्न क्राउड, ' पहिलं सॉफ्टी' , पहिली पेस्ट्री, पहिलं बर्गर, 'सिंगाडे, लिची फ्रुट ,इराण्याच्या दुकानातला चहा, शेपुच्या स्वाद चे इराण्याच्या दुकानाचे सामोसे (अर्थात कॅफे नाझ), श्रुसबेरी बिस्किट्स या सगळ्याची चव पहिल्यांदा घेतली कॅम्प च्या भटकंती काताना .. मेनुकार्ड वर मधे 'बीफ' पहिल्यांदा पाहिलं 'द प्लेस सिझलर्स' मधे , मोड आलेली मटकी टाकून , लिंबु पिळलेली कोन मधली भेळ पहिल्यांदा खाल्ली कॅम्प मधेच, गाडी वरचं सँडविच पहिल्यांदा कॅम्प मधेच खाल्लं !'
पहिल्यांदा ट्रॅफिक चे नियम तोडले म्हणून पांढर्‍या पोलिसानी आडवलं कॅम्प मधेच.. . त्याचं काय झालं , कॅम्प मधे जरा शाइन फेकत जाऊन म्हणत ताईची लुना नेली अठरा पूर्ण नसताना, लायसन्स नसताना आणि आडवलच पोलिसानी लाल देवल पाशी !
या शिवाय इंग्लिश मधून भीक मागणारे 'व्हाइट कॉलर' भिकारी पण पहिल्यांदा पाहिले कॅम्प मधेच !
त्या मार्झोरिन च्या बाहेरचे भिकारी(लहान पोरं) मात्र फार गुंड असायची, भीक मागण्या साठी मागेच लागत, पस्र च ओढायचे एपोरं..काही पैसे नाहीयेत म्हंटलं तर खायला द्या म्हणायची, खायला नाहीये म्हंटलं तर "जो आप खा रहे हो, वो दे दो, आप बस करो' म्हंटल होता एक टारगट पोरगा Proud
मार्झोरिन ची एक आठाव्ण : तर त्यांच्या फेमस सॉफ्टी आइस क्रिम पिक अप स्टेशनची सिलिंग लेव्हल खूप शॉर्ट होती, एका ख्रिसमस ला त्या सॉफ्टीच्या दुकानात भयानक म्हणजे अगदी धक्काबुक्कीची गर्दी होती... इतकी गर्दी कि सॉफ्टी मिळाल्यावर बाजुच्या लोकांना लागु नये म्हणून आइस क्रिम मिळाल्यावर हात उंच करून न्यावं लागत होतं सगळ्यांना आणि नादात मार्झोरिन च्या छताला टेकत होतं प्रेत्यकाचं सॉफ्टी.. त्या दिवशी सॉफ्टीच्या रांगेतले हे सीन बघून अक्षरशः हसून मेलो होतो आम्ही.. जो येइल त्याचं आइस क्रिम छताला !

कॅम्प ची खरेदी हा पण एक स्वतंत्र विषय आहे !
'बुटिक' ही कन्स्पेट पहिल्यांदा कॅम्प मधेच पाहिली..'नुमाइश' नावाचं वंडरलँड मधलं बुटिक आणि एम.जी रोड चं स्वतंत्र बलानिज माझं लाडकं होतं..
पहिले ब्रँडेड शुज, वेस्टर्न ड्रेसेस ची इतकी मोठ्या प्रमाणात दुकानं पहिल्यांदा कॅम्प मधे पाहिली !
मी १९९१ मधे पहिला ४ आकडी किमतीचा ड्रेस आई बाबां कडून मिळवला तो कॅम्प मधूनच.. (अर्थात बलानिज मधून).. नंतर माझं मलाच अडीच ह्जाराचा स्कर्ट टॉप सांभाळायचं, नीट मेन्टेन करणे प्रकाराचं टेन्शनच आलं. पण त्या वेळाचा सर्वात महाग आणि लाडका ड्रेस होता तो !
वंडरलँड , क्लोव्हर सेंटर, स्टर्लिंग सेंटर तर आहेतच पण असंख्य छोटी छोटी बुटिक्स, फॅन्सी ज्वेलरी, बोहर्‍यांची लेसची दुकानं- ड्रेस वरच्या 'योक' ची, शो बटन्स ची एकदम हटके दुकानं, कस्टम मेड पर्सेस, शुजची बुटिक्स वगैरे त्या वेळी फार नव्या वाटायच्या कन्स्पेट्स !
कॉलेज मधे 'इंटिरिअर डिझायनिंग' शिकत असताना अधुन मधुन काही साइट व्हिजिट्स किंवा अर्किटेक्ट ऑफिस व्हिजिट्स असायच्या अरोरा टॉवर्स आणि परिसरातील पॉश ऑफिसेस मधे .. तेंव्हा पासून 'तीव्र इच्छाशक्ति' कि काय म्हणतात ती फार होती कि मी पण करीन कधीतरी इथे जॉब !
माझ्या कोणी 'वेल विशर' ने तथास्तु म्हंटलं आणि पहिला जॉब लागला कॅम्प मधेच 'अरोरा टॉवर्स' वेस्ट विंग मधे.. 'आनंद गगनात मावेनासा होणे' वगैरे काय असतं ते तेंव्हा समजलं !
जॉब करत असतानाची ती अडीच वर्षं फार सुंदर होती.. दररोज लंच ब्रेक आणि संध्याकाळी एक चक्कर एम.जी रोड, कधी इस्ट स्ट्रीट ला मारायची.. कधी क्लोव्हर सेंटर ची बेसमेन्ट मधली शॉप्स धुंडाळायची , कधी ऑफिस च्या पार्टीज मोना फुड्स मधे, घरी जाताना कॅम्प स्पेशल खाउ न्यायचा.. कधी आईच्या उपासाच्या दिवशी सरप्राइज खाउ अर्थात बुधानिचे जाळीदार वेफर्स, कधी बटाट्ट्याच्या सालीचा चिवडा , कधी भावासाठी बर्गर , कधी नाझ चे सामोसे .. कधी डबा विसरला तर ऑफिस बॉय ला सांगून नाझ ची भुर्जी किंवा जॉर्ज ची बिर्याणी मागवायची.. फार सुंदर दिवस होते !
आवडत्या एरीआत ऑफिस होतं म्हणून मी कह्रोखर इतर ठिकाणी जॉब ला सुध्द अप्लाय करत नव्हते.. नंतर दुसरं ऑफिस जवळच पण इस्ट स्ट्रीट ला काय गेलं, त्याने सुध्दा मला चुकल्या सारखं वाटायचं.. मग अडीच वर्षांनी काँढव्याला ऑफिस गेलं आणि कॅम्प एरीआ सुटलाच, फार वाइट वाटलं पण करिअर मधली मोठी संधी सोडायची नव्हती, आयुष्यात पुढे तर जायचं होतं.. . कॅम्प च् वार्‍या बन्द नाही झाल्या पण बर्‍याच कमी झाल्या !
अता गेले ११ वर्षं यु.एस ला असते , कॅम्प च्या आठवणीच काय त्या राहिल्या पण दर वेळी भारतात जाते तेंव्हा मात्रं कॅम्प ची चक्कर झाली नाही असं होत नाही.
अता सगळीकडे मॉल कल्चर झालय, सगळीकडे ब्रँडेड वेस्टर्न कपडे मिळतात तरीही आजही कॅम्प एरीआ आपलं वेगळेपण टिकवून आहे, फिग लिफ टेलर , छोटी बुटिक्स, बोहर्‍यांची दुकानं अजुनही आहेत !

असो, तर माझ्या आठवणी हे फक्त निमित्त.. परवा शर्मिला फडकेच्या ' पुन्हा सिनेमा' लेखात वेस्टएन्ड थिएटर चा विषय काय निघाला आणि सगळ्या आठवणी पुन्हा एकदा अगदी फ्रेश झाल्या !
तुम्ही पण लिहा कॅम्प च्या भटकंतीचे, खादाडी, खरेदीचे अनुभव !

हे माझे मस्ट इट लिस्ट्सः
द प्लेस(सिझलर्स)
कॅफे नाझ आणि महानाझ(सामोसे, भुर्जी पाव, चहा)
मोना फुड्स
मार्झोरिन
पास्चर बेकरी
बुधानि वेफर्स
जॉर्ज ची बिर्याणि
गाडीवरची सँडविचेस
मटकीवाली कोरडी भेळ
सुप्रिया

तुम्ही पण अ‍ॅडिशन्स करा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एमजी रोडवरील ही चाळवजा इमारत कोणी पाहिली आहे का? पुलगेट एन्डला आहे. इतर गुळगुळीत, चकाचक इमारतींच्या सहवासात ही इमारत अजूनही आपला रंग, पोत सांभाळून आहे. छप्पर फार छान आहे.

मार्झोरिन, पाश्चर वगैरे पाहून मला फारसे वेगळे वाटले नाही. मुंबईत फोर्टात/बांद्र्याला हिंडल्यासारखेच वाटले.

कसला भारी धागा आहे हा....

मी देखील वाडीया मधे डिप्लोमा शिकत असताना बरेचदा यायचो. नंतर मधल्या काही काळाकरता पुणे सुटले होते त्यामुळे कॅम्पात फिरकणे झालेच नव्ह्ते.

सध्या पुण्यातच वास्तव्य असून, इतक्यातच आमचे ऑफीस ईस्ट स्ट्रीट्वर शिफ्ट झाले आहे. त्यामुळे रोजच जेवणाच्या सुट्टीत व ऑफीस संपल्यावर इथे तिथे फेरफटका होत असतो. त्यातच एका डब्बामित्राने सांगीतले की पूलगेट कडे जाताना डावीकडे एक बोर्ड आहे घाशीराम कोतवालाची हवेलीची दिशा दाखवणारा. इतके वर्ष पुण्यात असून कधीच ऐकले पण नव्हते; ते मागच्या आठवड्यात पाहूनही आलो. अर्थात हवेलीचे नामोनिशाण नाहीये, पण गेटहाऊसचे अवशेष आहेत. सध्या ती जागा सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने रीतसर परवानगी काढून जावे लागले. उद्या परवाकडे प्रचि टाकतो.

अनिल अवचट यांच्या ' पुण्याची अपूर्वाई' मध्ये 'निडल वूमन' दुकानाबद्दल उल्लेख आहे कि ते दुकान शेजारील दुकानाला लागलेल्या आगीत खाक झालं होतं. आगीचा बंब खूप उशिरा आला आणि आला तेव्हा त्यात
पाणीच नव्हतं!! पण ते दुकान जोमानं पुन्हा सुरू झाल.

लोक्स रेसीडेंसी क्लबात चांगली पेस्ट्री मिळते. क्लोवर सेंटर मागे एका ठीकाणी चांगली मिसळ मिळते. मार्जोरीन च्या समोर एक गल्ली आहे तिथे एक मावशी पाच नंतर ढोकळा विकतात अप्रतिम असतो Happy ढोकळा चटणी आणि शेव Happy

हा घ्या घाशीराम कोतवालाच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराचा फोटो. ईस्ट स्ट्रीट्वरून पूलगेट्कडे जाताना डाव्या बाजूला एक गल्ली जाते त्या गल्लीच्या टोकाशी सीमाभिंतीलगत हे प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. पेशवेकालीन वास्तुंची बरीच गुणवैशिष्ट्ये यात दृगोचर होतात.

2012-12-21 14.12.43.jpg

धन्यवाद नीधप, ललिता-प्रीति, दीपांजली!

असेच फिरताना दिसलेला अजून एक फलक! कॅम्पात मराठी शाळा.... फलकाचा उजवा कोपरा नीट बघा...

ही शाळा अजूनही चालू स्थितीत आहे. Happy

kampatil marathi shala.jpg

Pages