कॅम्पातल्या (अर्थात पुणे कॅन्टॉन्मेन्ट एरीआच्या) आठवणी !

Submitted by दीपांजली on 5 May, 2012 - 03:29

कॅम्प अर्थात पुणे कॅटोन्मेन्ट एरीआ:
पुण्यातला माझा अतिशय लाडका भाग आणि अनेक सुंदर आठवणींनी भरलेला !
पहिल्यांदा कॅम्प ला गेले ते आई बाबां बरोबर साधारण पाचवी किंवा सहावीत असताना.. अगदी वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखं वाटलं होतं.. वेगळीच लोकं, वेगळीच दुकानं , सगळं वेगळच वातावरण, ख्रिसमस म्हणून आई बाबांनी कॅम्प मधे नेलं.. नंतर 'सुप्रिया' मधे जेवायला आणि आईच्या आव्डत्या 'निड्ल वुमन' दुकानात , ते माझं पहिलं कॅम्प दर्शन !
त्या नंतर आई बाबां बरोबर जेंव्हा जेंव्हा गेले ते ख्रिसमस च्या वेळी किंवा वेस्टएन्ड ला सिनेमा पहायला !
पहिल्यांदा इन्डिपेन्डटली कॅम्प मधे जायचं निमित्त घडलं 'सॉफ्टी' आणि मार्झोरिन च्या त्या किर्ती मुळे !
नुकत्याच अकरावीत जाउ घातलेल्या कॉलनीतल्या मोठ्या मुली नेहेमी कॅम्प च्या गप्पा मारायच्या, मग आम्ही ज्युनिअर शाळकरी पोरींनी पण ठरवलचं 'आपलं आपलं' कॅम्प ला जायचं म्हणून !
कॉलनीतल्या मैत्रीणी बरोबर गेले ते नौवीत असताना, बस नी गेलो होतो कोथ्रुड हून कुठले तरी भलतेच रुट घेऊन आधी पुलगेट ला गेलो आणि भर दुपारी एम जी रोड पर्यंत चालत गेलो आणि फक्त वंडरलँड च्या फेर्‍या करून सॉफ्टी खाऊन परत आलो होतो घरी जायला उशीर होईल म्हणून !
नंतर जायचा रुट समजल्यावर ' जंगली महाराज रोड-कुंभार अड्डा-लाल देवल (Ohel David Synagogue) मार्गे माझ्या शाळेतल्या सायकल नी, कॉलेज मधल्या सनी नी, जॉब करत असताना स्कुटीनी सतत अडीच वर्षं अशा सगळ्या वहानांनी कॅम्प च्या भरपूर वार्‍या केल्या, टायर्स झिजवली , त्यात १९९० ते २००१ काळात कॅम्पचे अक्षर्शः गल्ली बोळ झिजवले !
कॅम्प च्या आठवणी फारच नॉस्टॅल्जिक करतात कारण बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा पाहिल्या त्या कॅम्प मधे !
'कॉस्मोपॉलिटिन कल्चर' चा पहिला अनुभव, अल्ट्रा मॉडर्न क्राउड, ' पहिलं सॉफ्टी' , पहिली पेस्ट्री, पहिलं बर्गर, 'सिंगाडे, लिची फ्रुट ,इराण्याच्या दुकानातला चहा, शेपुच्या स्वाद चे इराण्याच्या दुकानाचे सामोसे (अर्थात कॅफे नाझ), श्रुसबेरी बिस्किट्स या सगळ्याची चव पहिल्यांदा घेतली कॅम्प च्या भटकंती काताना .. मेनुकार्ड वर मधे 'बीफ' पहिल्यांदा पाहिलं 'द प्लेस सिझलर्स' मधे , मोड आलेली मटकी टाकून , लिंबु पिळलेली कोन मधली भेळ पहिल्यांदा खाल्ली कॅम्प मधेच, गाडी वरचं सँडविच पहिल्यांदा कॅम्प मधेच खाल्लं !'
पहिल्यांदा ट्रॅफिक चे नियम तोडले म्हणून पांढर्‍या पोलिसानी आडवलं कॅम्प मधेच.. . त्याचं काय झालं , कॅम्प मधे जरा शाइन फेकत जाऊन म्हणत ताईची लुना नेली अठरा पूर्ण नसताना, लायसन्स नसताना आणि आडवलच पोलिसानी लाल देवल पाशी !
या शिवाय इंग्लिश मधून भीक मागणारे 'व्हाइट कॉलर' भिकारी पण पहिल्यांदा पाहिले कॅम्प मधेच !
त्या मार्झोरिन च्या बाहेरचे भिकारी(लहान पोरं) मात्र फार गुंड असायची, भीक मागण्या साठी मागेच लागत, पस्र च ओढायचे एपोरं..काही पैसे नाहीयेत म्हंटलं तर खायला द्या म्हणायची, खायला नाहीये म्हंटलं तर "जो आप खा रहे हो, वो दे दो, आप बस करो' म्हंटल होता एक टारगट पोरगा Proud
मार्झोरिन ची एक आठाव्ण : तर त्यांच्या फेमस सॉफ्टी आइस क्रिम पिक अप स्टेशनची सिलिंग लेव्हल खूप शॉर्ट होती, एका ख्रिसमस ला त्या सॉफ्टीच्या दुकानात भयानक म्हणजे अगदी धक्काबुक्कीची गर्दी होती... इतकी गर्दी कि सॉफ्टी मिळाल्यावर बाजुच्या लोकांना लागु नये म्हणून आइस क्रिम मिळाल्यावर हात उंच करून न्यावं लागत होतं सगळ्यांना आणि नादात मार्झोरिन च्या छताला टेकत होतं प्रेत्यकाचं सॉफ्टी.. त्या दिवशी सॉफ्टीच्या रांगेतले हे सीन बघून अक्षरशः हसून मेलो होतो आम्ही.. जो येइल त्याचं आइस क्रिम छताला !

कॅम्प ची खरेदी हा पण एक स्वतंत्र विषय आहे !
'बुटिक' ही कन्स्पेट पहिल्यांदा कॅम्प मधेच पाहिली..'नुमाइश' नावाचं वंडरलँड मधलं बुटिक आणि एम.जी रोड चं स्वतंत्र बलानिज माझं लाडकं होतं..
पहिले ब्रँडेड शुज, वेस्टर्न ड्रेसेस ची इतकी मोठ्या प्रमाणात दुकानं पहिल्यांदा कॅम्प मधे पाहिली !
मी १९९१ मधे पहिला ४ आकडी किमतीचा ड्रेस आई बाबां कडून मिळवला तो कॅम्प मधूनच.. (अर्थात बलानिज मधून).. नंतर माझं मलाच अडीच ह्जाराचा स्कर्ट टॉप सांभाळायचं, नीट मेन्टेन करणे प्रकाराचं टेन्शनच आलं. पण त्या वेळाचा सर्वात महाग आणि लाडका ड्रेस होता तो !
वंडरलँड , क्लोव्हर सेंटर, स्टर्लिंग सेंटर तर आहेतच पण असंख्य छोटी छोटी बुटिक्स, फॅन्सी ज्वेलरी, बोहर्‍यांची लेसची दुकानं- ड्रेस वरच्या 'योक' ची, शो बटन्स ची एकदम हटके दुकानं, कस्टम मेड पर्सेस, शुजची बुटिक्स वगैरे त्या वेळी फार नव्या वाटायच्या कन्स्पेट्स !
कॉलेज मधे 'इंटिरिअर डिझायनिंग' शिकत असताना अधुन मधुन काही साइट व्हिजिट्स किंवा अर्किटेक्ट ऑफिस व्हिजिट्स असायच्या अरोरा टॉवर्स आणि परिसरातील पॉश ऑफिसेस मधे .. तेंव्हा पासून 'तीव्र इच्छाशक्ति' कि काय म्हणतात ती फार होती कि मी पण करीन कधीतरी इथे जॉब !
माझ्या कोणी 'वेल विशर' ने तथास्तु म्हंटलं आणि पहिला जॉब लागला कॅम्प मधेच 'अरोरा टॉवर्स' वेस्ट विंग मधे.. 'आनंद गगनात मावेनासा होणे' वगैरे काय असतं ते तेंव्हा समजलं !
जॉब करत असतानाची ती अडीच वर्षं फार सुंदर होती.. दररोज लंच ब्रेक आणि संध्याकाळी एक चक्कर एम.जी रोड, कधी इस्ट स्ट्रीट ला मारायची.. कधी क्लोव्हर सेंटर ची बेसमेन्ट मधली शॉप्स धुंडाळायची , कधी ऑफिस च्या पार्टीज मोना फुड्स मधे, घरी जाताना कॅम्प स्पेशल खाउ न्यायचा.. कधी आईच्या उपासाच्या दिवशी सरप्राइज खाउ अर्थात बुधानिचे जाळीदार वेफर्स, कधी बटाट्ट्याच्या सालीचा चिवडा , कधी भावासाठी बर्गर , कधी नाझ चे सामोसे .. कधी डबा विसरला तर ऑफिस बॉय ला सांगून नाझ ची भुर्जी किंवा जॉर्ज ची बिर्याणी मागवायची.. फार सुंदर दिवस होते !
आवडत्या एरीआत ऑफिस होतं म्हणून मी कह्रोखर इतर ठिकाणी जॉब ला सुध्द अप्लाय करत नव्हते.. नंतर दुसरं ऑफिस जवळच पण इस्ट स्ट्रीट ला काय गेलं, त्याने सुध्दा मला चुकल्या सारखं वाटायचं.. मग अडीच वर्षांनी काँढव्याला ऑफिस गेलं आणि कॅम्प एरीआ सुटलाच, फार वाइट वाटलं पण करिअर मधली मोठी संधी सोडायची नव्हती, आयुष्यात पुढे तर जायचं होतं.. . कॅम्प च् वार्‍या बन्द नाही झाल्या पण बर्‍याच कमी झाल्या !
अता गेले ११ वर्षं यु.एस ला असते , कॅम्प च्या आठवणीच काय त्या राहिल्या पण दर वेळी भारतात जाते तेंव्हा मात्रं कॅम्प ची चक्कर झाली नाही असं होत नाही.
अता सगळीकडे मॉल कल्चर झालय, सगळीकडे ब्रँडेड वेस्टर्न कपडे मिळतात तरीही आजही कॅम्प एरीआ आपलं वेगळेपण टिकवून आहे, फिग लिफ टेलर , छोटी बुटिक्स, बोहर्‍यांची दुकानं अजुनही आहेत !

असो, तर माझ्या आठवणी हे फक्त निमित्त.. परवा शर्मिला फडकेच्या ' पुन्हा सिनेमा' लेखात वेस्टएन्ड थिएटर चा विषय काय निघाला आणि सगळ्या आठवणी पुन्हा एकदा अगदी फ्रेश झाल्या !
तुम्ही पण लिहा कॅम्प च्या भटकंतीचे, खादाडी, खरेदीचे अनुभव !

हे माझे मस्ट इट लिस्ट्सः
द प्लेस(सिझलर्स)
कॅफे नाझ आणि महानाझ(सामोसे, भुर्जी पाव, चहा)
मोना फुड्स
मार्झोरिन
पास्चर बेकरी
बुधानि वेफर्स
जॉर्ज ची बिर्याणि
गाडीवरची सँडविचेस
मटकीवाली कोरडी भेळ
सुप्रिया

तुम्ही पण अ‍ॅडिशन्स करा...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉफी हाउस मधला बुटका गळेपडू आहे हां , तेव्हा सावधान. मी आणि माझी वहिनी साधारण २० वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा जवळ जवळ पूर्ण वेळ आमच्या टेबलाशी उभं राहून गप्पा छाटत होता. तेव्हा मजा वाटली होती. त्याने आमचा फोन नंबर पण मागितला आणी आम्ही पण बावळटासारखा दिला होता. त्याने आम्हाला बिल पण भरू दिलं नाही. ऑन द हाउस ट्रीट म्हणे. घरी जावून काका काकूंना कौतुकाने सांगितलं आणि लई बोलणी खाल्ली. मागे वळून बघता तो प्रचंड लोचट आहे असं म्हणावसं वाटतं ( आणि आम्ही मठ्ठ). त्याने नंतर फोन पण केला होता पण त्याला योग्य ती समज देण्यात आली.

शूम्पी, केवढा टंपडपणा हा. Happy Light 1
असा कसा अनोळखी माणसाला नंबर दिलात? पण मला तसे वाटले नाहीत गं ते. कदाचित २० वर्षांपुर्वी आगाऊ आणि चिपकु असतील. Happy जरा फारच गप्पा मारतात हे बरोबर आहे, पण आम्ही आमच्या आमच्यातच इतके मश्गुल असायचो आणि अजुनही असतो कि ते फार वेळ उभे रहात नाहीत तिथे.

डीजे, बीबी काढल्याबद्दल आभार... तुम्ही सगळ्यांनीच जब-या लिहिलंय.
दरवर्षी ख्रिसमस ला इथे मित्रमंडंळींमधे 'आपल्या लहानपणचा ख्रिसमस' हा विषय हमखास निघतोच.
आणि मला कॅम्पची आठवण होते. कोथरूडात राहणारे आम्ही, आणि गरवारे सारखी शाळा .. त्यामुळे पंचक्रोशीत कोणी ख्रीस्तीबांधव असण्याचा स्कोपच नाही. त्यामुळे नाताळ म्हणजे कँप हे लहानपणचं समीकरण. ते मेन स्ट्रीट्वरचं लाईटींग, लाल रंगाचे टांगलेले मोजे आणि मध्यभागी उंचावर टांगलेली मोठी चांदणी, रस्त्यावर उभे असलेले लाल पोषाख आणि टोपी, पांढरी दाढी लावलेले सॅन्टा हे पाहायला आईबाबा घेऊन जायचे.. (कॉन्वेंट मधे शिकलेल्या दोस्तांच्या शाळेत म्हणे लहानपणी पाठीवर पोतं घेऊन 'हो.. हो... ' करत सॅन्टा यायचा आणि त्यासाठी शाळेत मोजे वगैरे टांगलेले असायचे ! आमच्या (गरवारे) शाळेत जर सॅन्टा आला असता तर त्याच पोत्यात घालुन लोकांनी त्याची वाट लावली असती...ह्या विचारानी मी आत्ता लिहितानाही हसतीये !!!) इथपासून कॅम्प आयुष्यात आला.
(मागच्या भारत भेटीत 'सदाशिव पेठेत सॅन्टा पाहिला' आणि आता खरंच पूर्वीचं पुणं राहिलं नाही म्हणून मी अश्रू गाळले !!!!)
माझ्या आईच्या शाळेतल्या एक बाई कॅम्पमधे राहायच्या. तिथे इस्ट स्ट्रीट्वर एक खूप जुनी बेकरी होती. दर थोड्या दिवसांनी त्या मला आवडतात म्हणुन त्या बेकरीतले 'कपच्या आकाराचे केक' माझ्यासाठी पाठवायच्या. करंदीकर बाई मला भेटल्या आणि त्यांनी कपकेक दिले नाहीत अशी एकही भेट आजवर झालेली नाही. गंमत म्हणजे दोन वर्षापूर्वी भारत भेटीत त्या मला भेटायला आल्या तेव्हा देखील कपकेक घेऊन... त्या केकचा आकार, चव आणि "मी आणि करंदीकर बाई यांच्यातला कपकेकचा अलिखीत करार, ते प्रेम' यात इतक्या वर्षात कणभरही बदल झालेला नाही Happy
कँपमधल्या वेस्टएंड पासून ते मार्जोरिन पर्यंत. वंडरलॅन्ड पासून ते कॉफी हाऊस पर्यंत, सॉफ्टीपासून ते गाडीवरच्या शेव घातलेल्या ढोकळ्यापर्यंत (अजुन मिळतो का तो?) सगळ्या सगळ्या आठवणी तुमच्या माझ्या 'अगदी अगदी' , त्यामुळे परत लिहित नाही Happy
नववी दहावीत असताना कॅपची अजुन एक ओळख झाली आणि ते म्हणजे एन्.टी.एस. परिक्षेसाठी लागणारी सी. बी. एस. सी. ची अभ्यासक्रमाची पुस्तकं त्यावेळी फक्त कॅपमधे छावणीभागात मिळायची. ती जागा शोधून काढून ती अतिशय निरस दिसणारी पुस्तकं (आपली महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं रंगीत आणि आकर्षक वाटतील इतकी सी.बी.एस्.सी ची पुस्तकं तेव्हा उदास वाटली होती!!!) आणण्याचा अनुभव कधीही विसरणं शक्य नाही.
माझे पहिले वूडलॅन्डचे शुज मी कॅम्प मधून घेतले. १५ वर्ष झाली असतील ते माझ्याजवळ आहेत. अमेरिकेत बाईकचं लायसन्स काढण्याच्या स्वप्नाचा ते देखील एक भाग आहेत. आजही इथे जेव्हा मी मोटारसायकल चालवते तेव्हा तेच शूज वापरते.
कॉलेजमधे असताना मी आमच्या कॉलेजतर्फे आयोजित करण्यात येणा-या 'क्रि़केट मॅचेससाठी' - प्रेस कमिटी हेड होते ३ वर्ष. खूप मोठ्या प्रमाणात ह्या मॅचेस होत, महाराष्ट्रातून २५-३० टीम्स येत.
खेळाडुंच्या मुलाखती आणि रोजच्या ४ ग्राउंडवरच्या मॅचेसचे रिझल्टस, अ‍ॅनालिसिस ह्याचा रिपोर्ट रोज संध्याकाळी पुण्यातल्या पेपरांना नेऊन द्यावा लागे. अरोरा टॉवर्समधे या काळात रोज संध्याकाळी फेरी असायची. कोथरुड ते कॅप रोज बाईक चालवायला मिळणं हे मोट्ठं आकर्षण होतं माझ्यासाठी तेव्हा. कॅम्पमधे तेव्हा रस्त्यावर जॅकेट्सपासून कानातल्यापर्यंत आणि रस्त्यावरती पुस्तकं खरेदीपर्यंत काय वाट्टेल ते खरेदी करत प्रचंड भटकलीये मी. कॅम्पमधे आम्ही पडीक असायचो ह्या काळात.

आजही घरातली बहुतेक सगळी इंग्रजी पुस्तकं आणि क्रिकेटियर्सच्या ऑटोबायोग्राफीज ह्या कँपमधलीच खरेदी. एकतर इतकी विविधता, हवी असलेली पुस्तकं आणि इथे आणताना सामानाचं वजन हा मोट्ठा प्रश्न असल्याने 'पेपरबॅक इडिशन" हे सगळं साधून इंग्रजीपुस्तक खरेदी म्हणजे कँपला पर्याय नाही.

प्रत्यक्ष कॅम्पएरिया मी जितका एंजॉय केला तितकाच प्रकार कॅम्पमधे जाण्याचा आणि येण्याचा मार्ग.
कोथरुडहून निघून जाताना बालगंधर्व, कुंभारवाडा, लाल देऊळ मार्गे कॅम्पात जायचं... पण येताना मात्र 'महंमद रफी चौकातुन' सुरुवात करुन सरळ सरळ सगळ्या पेठा ओलांडत डेक्कन पर्यंत यायचा तो रस्ता मला आजही आवडतो. शुक्रवार पेठ. भवानी पेठ, नाना पेठ, बोहरी आळी, वाटेत लागणारे दर्गे, कॉर्पोरेशनच्या शाळा....मग माहोल बदलत बदलत बुधवार पेठ, गणपती चौक, कुंटे चौक... लक्ष्मी रोड, नारायण पेठ... डेक्कन्.... कर्वे रोड... !
एकापाठोपाठ सगळ्या पेठा आणि पुण्याच्या संस्कृतीचं दर्शन... त्यातली विविधता, एका सरळ रस्त्यानी आलं की सगळं पाहायला मिळायचं. पुण्याचा इतिहास, भूगोल, संस्कृती सगळ्याचा 'लाइव्ह स्ट्डी रूट' होता तो माझ्यासाठी.
ह्या गल्याबोळात.. एकूणच पुण्यात मी इतकी इतकी भटकलीये ना !!!
फार फार 'दिल के करीब' विषय आहे हा... म्हणजे एकूणच पुणे हाच Happy
इतकी वर्ष देशाबाहेर राहूनही जीव तिथेच घुटमळतो अजून अश्या काही जागा आहेत, त्यातली कँप ही एक !
काऊंटलेस आठवणी आहेत... किती आणि काय काय लिहिणार यार... खूप लिहिलं आता थांबायलाच हवं Happy

मस्तं पोस्ट आहे, रार :).
येण्या जाण्याचे २ मार्ग आणि पुण्याचं संस्कृति दर्शन पण अगदी !!!
कधी कधी कोथ्रुड ते कॅम्प रस्त्यावर अशा ठिकाणी पेट्रोल संपायचं कि जिथून पेट्रोल साठी स्कुटी भरपूर ढकलण्या शिवाय पर्याय नाही.. बरोबर त्या कुंभार अड्डा एरीयात.. मग कधी गाडी ढकला, कधी कुठल्या तरी दुकानदाराच्या दुकाना जवळ त्याला सांगून गाडी लावा, वर त्याच्याच कडून रिकामी बाटली घ्यायची जरा डिसेंट पेट्रोल मावेल इतकी, मग रिक्षा करून पेट्रोल पंपावर आणि बाटली घेऊन पुन्हा दुकाना पाशी .. :).

(मागच्या भारत भेटीत 'सदाशिव पेठेत सॅन्टा पाहिला' आणि आता खरंच पूर्वीचं पुणं राहिलं नाही म्हणून मी अश्रू गाळले !!!!)

<< Rofl
मी पण पाहिला त्या पेशवाई जवळच्या शुज शॉप मधे Proud

नीरजा,
अरेरे मी जुना बाजार गोष्ट इतके वर्ष राहून मिस केली.. बाजार बघूनच भीती वाटायची मला.. आस पास सगळे गुंड असणार म्हणून Proud
काय जबरदस्तं कडं आहे गं ते......... फारच एथनिक पण स्टायलिश !!!

मनीमाउ,
कधी करताय जीटीजी, फोटो टाका प्लिज या वेळी कॅम्प च्या सगळ्या आयकॉनिक शॉप्स्/रेस्टॉरन्ट्स आणि बिल्डिंग्ज्स चा !
ती इस्ट स्ट्रीट ला सिटी बॅ़क जवळ असलेली "कुमार बिल्डर्स " ची इन्क्लाइन्ड शेप ची बिल्डिंग आठवते का कोणाला ?
मी पाहिलेली पहिलीच अशी फॅन्सी बिल्डिंग ती :).
शूंपी,
फोन नंबर दिलास वात्रटाला Biggrin ?

जुना बाजारात मी पण हिंडलीये. लहानपणी बागकामासाठी लागणारी खुरपी, घमेली, फावडं वगैरे साहित्य तिथे खुप प्रमाणात आणि स्वस्त मिळायचं. ते घ्यायला जायचे आईबाबांबरोबर. पुढे हायकिंगला लागणा-या बॅग्स घ्यायला जायचो. कारण मिलिटरीच्या खाकी आणि दणकट अश्या पाठीवरच्या सॅक्स तिथे अतिशय स्वस्त मिळायच्या.
लहानपणी जुना बाजार म्हणजे चोरीच्या गोष्टी हे समीकरण इतकं पक्क होतं की आमच्या घरातून माझे आवडते लंडनहून आणलेले स्वेटर्स चोरीला गेले खिडकीतून तेव्हा पुढचे २-३ बुधवार, रविवार मी आईबाबांना घेऊन ते शोधायला जुन्याबाजारात घेऊन गेले होते. Proud

कधी कधी कोथ्रुड ते कॅम्प रस्त्यावर अशा ठिकाणी पेट्रोल संपायचं कि जिथून पेट्रोल साठी स्कुटी भरपूर ढकलण्या शिवाय पर्याय नाही.. बरोबर त्या कुंभार अड्डा एरीयात..
>>> अगदी अगदी. एकदा जंगली महाराज सोडला की त्या मधल्या पट्य्यामधे कोणताही पेट्रोलपंप नव्हता गाडी ढकलण्याच्या अंतरावर !

ती इस्ट स्ट्रीट ला सिटी बॅ़क जवळ असलेली "कुमार बिल्डर्स " ची इन्क्लाइन्ड शेप ची बिल्डिंग आठवते का कोणाला ?
मी पाहिलेली पहिलीच अशी फॅन्सी बिल्डिंग ती>> हो. मी दोन दिवस हा बीबी पाहिल्यापासून मनातल्या मनात फक्त उजळणी करतेय.ती बिल्डिंगच आठवत होती सकाळी.
लहानपण आणि कँप यांचा घनिष्ठ संबध आहे.

कँपमध्ये जाताना लागणारा शंकरशेठ रोड, तेव्हा तयार होत असलेला ओव्हर ब्रीज, ट्रॅफिक जॅम, पुण्यातली माझ्या माहितीमधली पहिली तयार होत असलेली, पुर्ण काचेची बिल्डींग, आत्ताची एक्झिम बँक. सेवल ल्व्ह्ज चौक. हे टप्पे पार पाडत पाडत दर आठ्वड्यातून एकदा कँपमध्ये पोहचायचो. पुढचे, उद्या पर्वा लिहीते.

थँक्स डिजे, या बाफबद्दल. Happy

ती इस्ट स्ट्रीट ला सिटी बॅ़क जवळ असलेली "कुमार बिल्डर्स " ची इन्क्लाइन्ड शेप ची बिल्डिंग आठवते का कोणाला ? >>> डी, आहे गं. ती बिल्डिंग अजुन तशीच आहे. मला नेहमी बघुन तिचं कौतुक वाटत नाही. पण तुमची सगळ्यांची कमाल आहे. काय छोट्छोट्या गोष्टी आठवताहेत.

गाडीवरच्या शेव घातलेल्या ढोकळ्यापर्यंत (अजुन मिळतो का तो?) >> हो गं रार. वेरी मच्च मिळतो. खमण ढोकळा म्हणतात ना त्याला? वंडरलँडच्या समोरच्या - एम जी रोड आणि ताबुत स्ट्रीटला जोडणार्‍या गल्लीत.

महाराष्ट्र चीप स्टोअर्सची आठवण नाही का कोणाला? Happy आणि कोयाजी रोडवरचं 'प्रीतमंदिर'? त्याची आता पुर्ण वाट लागली. बंद करावं लागलं त्यांना. Sad

कॅम्पमधे थोडं पलिकडे गेलं कि सेंट मेरीजचं पांढरं शुभ्र चर्च आणि गर्ल्स स्कुल. त्याच्या बाजुलाच बिशप बॉइज स्कुल. तशीच दगडी, ब्रिटीश काळाच्या खुणा बाळगत उभी आहे. बाजुला टर्फ क्लब. तिथे येणार्‍या ऐटदार कार्स आणि त्याहुनही ऐटदार घोडे. माहित आहे का हे तुम्हाला? Happy

कॅम्पमधे थोडं पलिकडे गेलं कि सेंट मेरीजचं पांढरं शुभ्र चर्च आणि गर्ल्स स्कुल. त्याच्या बाजुलाच बिशप बॉइज स्कुल. तशीच दगडी, ब्रिटीश काळाच्या खुणा बाळगत उभी आहे. बाजुला टर्फ क्लब. तिथे येणार्‍या ऐटदार कार्स आणि त्याहुनही ऐटदार घोडे. माहित आहे का हे तुम्हाला?>>> Happy
मनिमाऊ, मी आले की करू गटग तिथे Happy

महाराष्ट्र चीप स्टोअर
>> आहे आहे तर आठवण.

अजून एक म्हणजे मेन स्ट्रीट्वर एका मित्रासाठी चश्मा सिलेक्ट करायला गेलो होतो. (वेस्टएंड च्या समोर) आमच्याकडे पाहून त्यानी 'ह्या फ्रेम्स तुम्हाला परवडणार नाहीत' असं सांगीतलं चक्क. मित्रानी त्या काळी क्रेडिक कार्ड समोर ठेवलं होतं, आणि त्या दुकानदाराचा चेहरा पाहून आम्ही कसे हसलो होतो हे आम्ही आजही आठवून हसतो !!

ए.फ. एम.सी शी माझं विशेष कनेक्शन होतं. मला जायचं होतं पण मेडिकल फेल झाले. रेसकोर्स आणि तो भाग इतक्या वेळा भटकलीये ना तेव्हा !

ब्रिटीश काळाच्या खुणा बाळगत उभी आहे. बाजुला टर्फ क्लब. तिथे येणार्‍या ऐटदार कार्स आणि त्याहुनही ऐटदार घोडे. माहित आहे का हे तुम्हाला? >> Happy

अंजली, हो हो नक्कीच. तुम्ही प्रत्येक जण आल्यावर एकेक गटग करु. तोपर्यंत मी आणि नी एक गटग करुन छान छान जागांची टेहळणी करुन ठेवतो. Happy

इथे कोणी 'बेब' क्रेझी नाही का? कुणीच उल्लेख केला नाही.

रार, ते चष्म्याचं दुकान दिनशॉज. गोड पारसी फॅमिली आहे ती. आश्चर्य आहे त्यांच्या दुकानात असं काही ऐकवलं. फार मस्त लोक आहेत ते.

स्वाती, का हसलीस?

नी,
जुना बाजार पासून सुरवात करु बुधवारी सकाळी Proud मग कॅम्प जीटीजी कंटिन्यु !
कॅम्प चे अजुन धन्यवाद म्हणजे तिथे जॉब केला अडीच वर्षं त्यामुळे इंग्लिश जास्तं कॉन्फिडन्ट्ली बोलायला लागले, व्होकॅबिलीटी वाढली, इंग्लिश बोली भाषा ऑबझर्व करत नकळत इतर कॉन्व्हेन्ट च्या मुलीं इतकी कधी कॉन्फिडन्ट झाले कळलं नाही (अकरावी बारावीत गृप मधे कॉन्व्हेंट च्या मुली होत्या गृप मधे त्यामुळे बेस तयार झाला आणि तो बेस ५ वर्षांनी कॅम्प मधे येऊन पक्का झाला Happy )
सगळे कस्टमर्स नॉन मराठी, बरेचसे एन आर आय , सिंधी, पंजाबी, मुस्लिम, ख्रिचन शिवाय ऑफिस मधल्या क्राउड मधे पण सर्व धर्म समभाव.. हिन्दु मुस्लिम सीख इसाई क्राउड.. मी एकटीच मराठी.. एकदम ग्लोबल ऑफिस होतं.. माझ्या जॉब मधे डिझाइन करून गप्प बसणे प्रकार नव्हता.. डिझाइन करणे तर प्रायमरी स्टेज.. खर काम कसटमर्स ना कन्व्हिन्स करणे, भरपूर बडबड करावी लागायची, पण मजा ययाची !
त्या वेळी कॅम्प च्या ऐवजी डेक्कन च्या मराठमोळ्या ऑफिस मधेपण एक ऑफर होती, जर तो जॉब अ‍ॅक्स्पेट केला असता तर कदाचित माझ्यात इतका बदल झाला नसता :).
अशा अनेक गोष्टीं साठी किती थँक्स करावं कॅम्प कल्चर ला थोडं आहे :).

इथे कोणी 'बेब' क्रेझी नाही का?>> 'बेब' मधून नवर्‍याकडून ड्रेस उकळायचा असे स्वप्न कॉलेज पासून पाहिले. आता बारीक होउन 'बेब' मधे जायचे. असे पहाते. दररोज मी मुद्दामून 'बेब' वरून जायचे डिस्प्ले पहायला. आता फिनीक्स मॉल मधे पण आहे 'बेब'.

जूना, बाजारावरुन आता दर बुधवारी जाते. अजून आता डोकावलं नाहीये पण पहायचे आहे.

रार, मला तर कोणीतरी सांगितले होते लहानपणी, आपल्या सगळ्या हरवलेल्या वस्तू जुना बाजारात सापडतात म्हणून.

बाजुला टर्फ क्लब. तिथे येणार्‍या ऐटदार कार्स आणि त्याहुनही ऐटदार घोडे. माहित आहे का हे तुम्हाला? स्मित
<< हो हो.
देशात असताना मी पहिला रॉयल वेडिंग इव्हेंट मी टर्फ क्लब लाच केला.. पुण्यातल्या सुप्रसिध्द बिल्डर च्या मुलीला +फॅमिलीला लग्नाची मेन्दी काढली होती, ते लोक इतके इम्प्रेस झाले, मला लग्नाच्या सगळ्या इव्हेंट्स ना स्पेशल पास देऊन आग्रहाचं निमंत्रण दिलं.. धमाल आली, देशात असताना सर्वात जास्तं चार्ज केलेला तो इव्हेंट माझा :).

कॅम्प ची अजुन एक खासियत म्हणजे तिथे ऑथेंटिक चर्च, मराठी चर्च, आंबेडकर म्हणाजे म्हणजे बौध्द लोकांचं धर्मस्थान, लाल देवल (ज्युविश), मस्जिद आहेत शिवाय त्या बुधानि जवळ एक हिन्दु मंदिर पण आहे ना ?

मनीमाउ , मस्त आहेत तुझ्या पोस्ट्स. त्या डॉटर्स दुकानाला नक्की व्हिजिट देणार.
रार Happy कुंभारवाड्यावरुन दिवाळीच्या आसपास गेल कि पणत्यांचा ढिग बघून काय घेवू अन नको अस व्हायचं.
आर्च , नीडल वुमन सोडून आतल्या साईडला काही अगदी छोटी दुकान आहेत मुस्लिम लोकांची . तिथे ते क्राफ्ट,केक साहित्य मिळायच.

माझा एक अतिहुशारीचा (स्वतःच्याच) अनुभव आहे.
एस वाय ला असताना सहयोग चं फिजिकल थिएटरचं वर्कशॉप केलं. लंडनचा डेव्हिड ग्रीव्हज होता शिकवायला. ८ दिवसांच्या वर्कशॉपमधून १०-१२ जणांची निवड झाली महिन्याभराच्या वर्कशॉपसाठी. त्यात मी एक. महिनाभर संध्याकाळचे ३-४ तास वर्कशॉप. फिजिकल थिएटर म्हणजे जमिनीवर लोळण्यापासून सगळे त्यामुळे टिशर्टस + टाइटस ला पर्याय नाही. माझ्याकडे यातलं काही फारसं नव्हतं. परवा वर्कशॉप सुरू होणार म्हणून मी ठरवलं उद्या दुपारी क्याम्पात फॅ स्ट्री ला टिशर्टस घ्यायला जायचे. तेव्हा फॅ स्ट्री एमजी रोडवरच भरे. संध्याकाळी बाबरी मशिद पडल्याच्या बातम्या आल्या. दुसर्‍या दिवशी माझं कॉलेज बंद होतं. कर्फ्यू वगैरे नव्हता. पुण्यात तसं शांत असायचं. दुपारी आईनं सांगितलेलं असूनही मी तडमडत क्याम्पात टिशर्टस घ्यायला. १ घेतला आणि दुसर्‍याचं बार्गेन करत अस्ताना हळूहळू आजूबाजूचं वातावरण बदलायला लागलं. टिशर्टवाल्याने मी सांगत होते त्याच्या निम्म्या किमतीला घेऊन जा म्हणून सांगितलं. मी चकीत तर तो पुढे म्हणाला. 'फुकट घे पण आता तडक घरी जा. बाहेर पडू नको. इथे कर्फ्यू लागतोय.'
मी त्याला टिशर्टचे पैसे दिले. आणि माझ्या म-८० ला लाथ घातली अन ढुर्रकन इस्ट स्ट्रीट, शंकरशेठ रोड, स्वारगेट असं करत घरी पोचले. रस्ता रिक्कामा त्यामुळे कॅम्प ते स प कुठेही फारसं थांबायला न लागता मस्त स्पीडने येऊ शकले.

बाजुला टर्फ क्लब. तिथे येणार्‍या ऐटदार कार्स आणि त्याहुनही ऐटदार घोडे. माहित आहे का हे तुम्हाला? >> हो, हो. मस्त आहे तो एरिया. एका मित्राचा रेसहॉर्स आहे पुण्यात व तो त्या क्लबचा मेम्बर आहे... त्या निमित्ताने तो पुण्यात आल्यावर त्या भागात टीपी करून झालाय. Happy सर्किट हाऊसमध्ये वडिलांबरोबर गेले आहे. तिथल्या परिसरातील गुलमोहोर काय सुंदर दिसायचे!! वाटेत आगरकर नगर नामक भागातही सुंदर झाडे होती. क्वीन्स गार्डनचा हिरवागार सुरेख परिसर व प्रशस्त सरकारी बंगले - क्वार्टर्स. मस्त वाटायचे तिथून फिरताना.

प्रीतमंदिर.... हो, ते आता बंदच झालं असेल. भारतीय समाज सेवा केंद्र, कोरेगाव पार्काची अंधशाळा, बुधरानी हॉस्पिटल, अतुर पार्क संकुल, ओशो गार्डन परिसर, एम्प्रेस गार्डन, ताडीवाला रोड, ढोले पाटील रोड, वाडिया चा परिसर... हे सर्व पण कँपाची आठवण काढली की आठवतेच आणि तिथेही खूप भटकणे झालेय.

नी :).
आमच्याही ऑफिस ला अशा सुट्ट्या मिळाल्यायेत, (ऑफिस चे ओनर मुस्लिम त्यामुळे सांभाळून असायचे).
ठाकर्‍यांना अटक झाली, दंगलीची संभावना, करा बन्द ऑफिस , .. अशा अनेक वेळा !
मी त्यांना सांगायचे कि मी सामोरी आले तर नाही कोणी हिन्दु तोडणार तुमचं ऑफिस Proud
तसे आमचे बॉस असले मुस्लिम तरी काय अस्खलित पुणॅरी ब्रामह्णी अ‍ॅक्सेन्ट मधे मराठी बोलायचे, संस्कृत पंडित च होते.. इंजिनिअर पण हौस म्हणून संस्कृत मधे एम.ए केलं होतं.. एखाद्याला आवडच असते भाषा शिकायची !

भारतीय समाज सेवा केंद्र, कोरेगाव पार्काची अंधशाळा, बुधरानी हॉस्पिटल, अतुर पार्क संकुल, ओशो गार्डन परिसर, एम्प्रेस गार्डन, ताडीवाला रोड, ढोले पाटील रोड, वाडिया चा परिसर... हे सर्व पण कँपाची आठवण काढली की आठवतेच आणि तिथेही खूप भटकणे झालेय.>> अगदी!!
माझ्या बाबांच्या खूपदा कामानिमित्त ब्ल्यू डायमंडला कॉन्फरन्सेस असत. बर्‍याचदा मी जायचे त्यांच्याबरोबर. कसलं भारी वाटायचं तेव्हा Happy

बिल्वा,
येस्स, मला पण आठवले हे सगळे रोड :).
शिवाय जॉब च्या संदर्भात फिरताना सोलापुर रोड, वानवडी, फातिमा नगर, सोपानबाग, सॅलिस्बरी पार्क, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर , कोंढवा इ. एरीयात पण कॅम्प मधे जॉब केल्यामुळेच भटकले नाही तर राहिले असते कोथ्रुड ते जंगली महाराज रोड-एफ.सी . रोड रेडियस मधे :).

ब्लू डी चे कॉफी शॉप हे मी कॉलेजात असताना ''हॅपनिंग'' व २४ तास खुले म्हणून रात्री बेरात्री तिथे टपकायचो आम्ही. ढोले पाटील रोडला पारसी फूड स्पेशल झामूज, खिशाला परवडणारे मधुबन, महागडे कपिला, रस्त्यावर उभ्या असणार्‍या गाड्यांवर मिळणारे पदार्थ, नन्दूज पराठा.... अर्रे हो, लक्ष्मी रोडवरून कॅम्पात जाणार्‍या रस्त्यावर खास पंजाबी पद्धतीचे पदार्थ मिळणारे पराठा हाऊस का कायसे हॉटेल होते तिथले पराठे - छोले - लस्सी, चाचा हलवाईकडे समोर तयार होणारी मिठाई ताजी गरमागरम खायला मिळत असे... नाना पेठेतली सरदारजींची अगणित दुकाने, रास्ता पेठेतील ते फेमस लस्सी मिळणारे भुवन.... अय्यप्पा मंदिराशेजारची सौदिंडियन लोकांची दुकाने, त्यात मिळणारी लोणची, मसाले, खास सौदिंडियन पदार्थ, आयुर्वेदिक औषधे इ. तिथले हार, वेण्या... कपडे, उपरणी, वेष्टी, साड्या. मेन स्ट्रीटच्या अगोदर वेस्ट एण्ड गार्डन बसस्टॉपच्या अलिकडे असलेले कॅथलिक लोकांचे ओल्ड एज होम... शांताई हॉटेल... मोहर्रमला साचापीर स्ट्रीट, मेन स्ट्रीटच्या परिसरात नाचवले जाणारे ताबूत, त्या अगोदर रस्त्यात म्हशी - रेडे मोकळे सोडून त्यांची मिरवणूक काढायचा कोणता तरी सण आहे... ती मिरवणूक. तुम्ही जर त्यात अडकलात (स्वानुभव :फिदी:) तर तुमचे काय होईल सांगता येत नाही!
बुधानींचे आत बोळात स्वतःचे खास मंदिर आहे. अगदी छोटे आहे ते. तिथे एकदा गेले आहे त्यांच्या एका घरगुती कार्यक्रमाला. माळीबाबा मठ व त्याच्या आजूबाजूचा परिसर.... एम एस ई बी चे कार्यालय Proud जिथे त्यांच्या कृपेने अनेकदा आई/ बाबांबरोबर वीजबिलाच्या तक्रारीसाठी जायला लागायचे!

एम जी रोड वर मिळणारे टीशर्ट्स! अहाहा!! कित्तीतरी होते माझ्याकडे. पूनम, आपली शॉपिंग्स आठवतायत का? Happy

काय आठवणी आहेत एकेकाच्या, मजा आली!
कँपातली चौपाटीत (ती आता नाहीए) 'मक्केदीरोटीसरसोंदासाग' भारी मिळायचे. माझे एक आवडते हॉटेल म्हणजे ब्ल्यू नाईल- तिथली इराणी बिर्याणी लाजवाब. बाकी खादाडीच्या तर असंख्य जागा आहेतच.
कँपात खरेदी म्हणजे एक वेगळाच प्रकार आहे. एकदम दोन टोकाच्या प्राईसटॅग्ज इथे बघायला मिळतात.

कॅम्प ची अजुन एक खासियत म्हणजे तिथे ऑथेंटिक चर्च, मराठी चर्च, आंबेडकर म्हणाजे म्हणजे बौध्द लोकांचं धर्मस्थान, लाल देवल (ज्युविश), मस्जिद आहेत शिवाय त्या बुधानि जवळ एक हिन्दु मंदिर पण आहे ना ?>>>>>>>>>>>>>>>आनि बाटा च्या दुकानाजवळ वर एक अजुन मंदिर आहे मला वाटत ती कदाचित अग्यारी आहे...तिथे साधारण ६-६.३० च्या दरम्यान लोक प्रार्थना करत असतात...आनि तो चक्क ऊर बड्वुन रड्ल्याचा आवाज अस्तो..कोणीतरी यावर प्रकाश टाका रे .....
आनि नामदेव शिंपी समाजाच रामाच पण मंदिर आहे...
आधीच फॅशन स्ट्रीट खुप बर होत आता खुपच अडगळ आनि गजबज झाली आहे तिथे...तरी फिरायला आनि बारगेन करायला मजा येते..
भोपळेचौकात जनता कोल्ड्रीक वाला थांबतो..त्याच्याजवळ कोको नावाच पेय मिळ्त...जे इतर कुठल्याही कोल्ड्रींक वाल्याच्या गाडीवर मिळ्त नाही ,,माझ्या माहीतीनुसार...तर कोको विथ गुलकंद हे माझ आवडत कोम्बॉ आहे तुम्हीही ट्राय करा... Happy
हॉटेल प्रिया चा उल्लेख नाही केला का कोणी ??????

खूप सुंदर सुंदर आठवणी जाग्या झाल्यात. खरे मी कॅम्पला कधी विसरलोच नाही. पण आता ह्यावेळी जानेवारी मधे जेंव्हा मी तिथे तब्बल १५ वर्षांनी गेलो तेंव्हा मला पुर्वीचा फील आलाच नाही. अगदी ओकेबोके वाटले मला कॅम्प. तो रोमॅन्टिक फील मुळीच आला नाही. १९९५ मधे मी पुण्यात नोकरीला होतो. कोंढवा बुद्रुकला माझा ऑफीस होती. हिवाळी दिवस होते. मग, कॅम्प मधे माझा मित्र श्रीकांत बिलुरकर आणि मी तिथल्या बॉम्बे कॅफेमधे एक चहा आणि एक मस्क पाव खायचो. त्यावेळी दोघांचे पगार फक्त १७५० रुपये होते. मी साळुंके विहारला रहायचो. मी कॅम्पमधे खूप खूप अगदी प्रचंड प्रमाणात फिरलो आहे. पण पैसे खर्च करु शकलो नाही कारण १७५० रुपयात आमचे भागायचेच नाही. आमच्या ऑफीसेसच्या पार्ट्या कॅम्पातच व्हायच्या. शिवाय आमच्या कंपनीचे एक Accounting Software होते. त्याचे clients मुख्य करुन कॅम्पातच होते. मला कॅम्प मधील यंग क्राऊड प्रचंड आवडायचा. त्यांचे चालणे, फिरणे, बोलणे अगदी फारच वेस्टर्न असायचे.

पहिल्यांदा Frencha Fries मी तिथेच खाल्ल्यात. तिथे एक Karachi Mart कि काय असे दुकान आहे. तिथे हेद्राबादचे छान नानखटाई सारखे मऊसर बिस्किटे मिळतात.

डीजे - धन्स खूपच छान काम केलेस हे सार सार लिहून.

Pages