"मस्साला च्या मारी"....

Submitted by लाजो on 28 March, 2012 - 18:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"मस्साला च्या मारी... "

पावणं... असं दचकु नगा... म्या काय वंगाळ नाय बोलत हाय. माज्या रेशिपीचं नावच हाय बघा ह्यो.... "मस्साला-च्या-मारी..." Happy

त्याचं काय हाय बगा, की आमच्या मालकांना.. म्हणजे आमच्या यान्ला Blush 'च्या' लईच आवडतो बगा. आन तो बी मस्साला वाला. आनी नुसताच च्या नव्ह... संगट 'मारी' बिस्कुटच लागतया (डायटवर हायती... खारी नको म्हंत्यात Proud ). तर मी काय म्हंनत व्हते? हां, तर आमचे मालक हरघडी हाका घालतात.... "एSS च्या-मारीSSSS..." रविवारच्याला तर दिवसातुन ६-७ वेळा ह्योच............ "च्या-मारी"..."च्या-मारी"... कंटाळ्ले की म्या. सारखा तो च्या करा.. मसाला कुटा...टोप घासा अन कप धुवा... म्हनल कायतरी आयड्या कराया हवी, जेनेकरुन हे च्या प्रकरन सोप्प करता येइल्ल. मग काय माज्या सुपिक डोस्क्यात वळवळला की हो किडा आन केल्ली की ह्यो नवी रेशिपी...

तर, या रेशिपीसाठी काय काय लागतया?? -

मस्साल्यासाठी:
३-४ वेलच्या, ३-४ लवंगा, दालचिनी तुकडा कुटुन केलेली ताजी भुक्टी - १ छोटा चमचा (टीस्पून)
१ छोटा चमचा सुंठ पावडर

आन ह्यो बी लागतया -

२ मोठ्ठे चमचे (टेस्पून) चहाची पत्ती,
३/४ कप साखर,
२ कप मैदा (गव्हाच पीठ नगाच वापरू .. मज्जा नाय यायाची),
१७५ ग्रॅम मऊ बटर (मीठाबिगर किंवा अमुल पन चालेल),

क्रमवार पाककृती: 

आता आपन बनवुया "मस्साला च्या मारी"

१. सगळे जिन्नस गोळा करा.

Bisc1a.JPG

२. तुमच्या मिस्कर म्हंजी फुप्रो मंदी चाळलेला मैदा, सुंठ, च्या ची पत्ती घाला आन जरा फिरवुन घ्या. मग साखर घाला आन परत फिरवा.. मिस्कर..

३. यात आता कुटलेला मस्साला, बटर घाला अन परत फिरवा... सम्द एकत्र येऊन गोळा व्हाया लागलं की फिर्वायच थांबा.

४. गोळा मिस्करातुन बाहेर काढुन कट्यावर एकत्र नीट करा आन त्याला दांडुक्या सारखा आकार द्या. दांडका साधारण मनगटा येव्हढा जाड हवा (दीड इंच व्यास). हा दांडका प्लास्टिकमधे (क्लिंग रॅप) गुंडाळा आन पांढर्‍या थंड कपाटात ठेऊन द्या घटकाभर.

Bisc2.jpg

५. भट्टी (ओव्हन) १५० डिग्रीला तापत ठ्येवा. घटकाभराने दांडका बाहेर काढा. त्यावरचं प्लास्टिक काढा आन कंगोरेवाल्या चाकून त्याच्या गोल गोल चक्त्या कापा.

६. या चकत्या भाजकागद (बेकिंग पेपर) ठेवलेल्या ताटलीमंदी थोड्या मोकळ्या मोकळ्या मांडा.

७. आता द्या ढकलुन ताटली भट्टीमधी - १२-१५ मिंट. चकत्यांची आता बिस्कुट व्ह्याया लागतिल Happy कडा जरा तपकिरी दिसाया लागल्या की काढा बाह्येर.

Bisc3.jpg

८. बिस्कुट अजुन नरमच लागतिल हातान्ला पण ५ मिंटांनी ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) जाळीवर ठ्येवा.

Bisc4.JPG

९. "च्या-मारी" झाली की .. काढा प्लेटीत Happy

Bisc6.JPG

१०. च्या-मारी आन सोबत टीवी चा रिमोट दिला यान्ला... म्हंन्ल "च्यामारी घ्या....मस्साला च्या मारी" Lol

Bisc5.JPG

वाढणी/प्रमाण: 
एक खाऊन थांबता येत नाही त्यामुळे खाल तेव्हढे..
अधिक टिपा: 

१. यात शक्यतो चहाची पत्तीच वापरा. पावडर नको. पावडर वापरणार असाल तर २ टबलस्पून ऐवजी १ टेबलस्पूनच घ्या.

२. चहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात. मस्त चव येते.

३. सुंठ आणि ताज्या मसाल्याचा स्वाद खुप छान लागतो. विकतचा मसाला शक्यतो नका वापरू यात अजुन बरेच काही घटक असतात.

४. अनसॉल्टेड बटर वापरणार असाल तर अगदी चिमुटभर मीठ घाला. बिस्किटाची गोडी जास्त खुलते.

५. रॅप केलेला तयार दांडुका (रोल) फ्रिज मधे आठवडाभर आणि फ्रिझरमधे महिनाभर ठेऊ शकता. आयत्यावेळेस बाहेर काढुन थोडा थॉ करुन मग बेक करा.

६. बेक करताना साधारण १० मिनीटांनंतर लक्ष असू द्या. कडा लालसर्/थोड्या तपकिरीसर दिसायला लागल्या की बिस्किट लगेच बाहेर काढा. असं वाटतं बिस्किट कच्च आहे पण बाहेर काढल्यावर सुद्धा त्यातल्या हीट मुळे बिस्किट शिजतच असतं. ५ मिनीटांनी बिस्किट जाळीवर काढा. थंड झाल्यावर बिस्किट छान खुसखुशीत होतात.

त टि : आमचे मालक वर्षातुन एकदा चहा पिणार्‍यातले पण ही च्या-मारी रोज आवडीने खातात Happy

माहितीचा स्रोत: 
बेसिक बिस्किट रेसिपी त्यात चहा मसाल्याची अ‍ॅडिशन
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे आभार्स Happy

अगो, प्लेन बिस्किट श्रूजबेरीसारखे नाही लागणार. पण त्यात बटर ऐवजी तूप घातले तर थोडी जवळपास चव येइल. पण कयानी सारखी नाही लागणार... मोअर लाईक शॉर्ट्ब्रेड बिस्किटं Happy

या बेसिक बिस्किटाच्या पाकृमधे लव्हेंडर ची वाळकी फुलं / पाकवलेले आले (स्टेम जिंजर) घालुन पण छान बिस्किट होतात.

मी आज करुन पाहिली. किंचित कडक झाली. खुसखुशीत नाही झाली. बटर कमी पडलं असेल का? चव मस्त आहे. अज्जिबात कडू नाही. धन्यवाद लाजो.

लाजोबाई, आपण महान आहात. हे वेगवेगळे प्रकार स्क्रॅचपासून करायचा उत्साह आहे हे कौतुकास्पद आहे. लगे रहो :).

आक्का, लई भाSSSरी लिवलंय आन बिस्कुटबी खाव वाटतंया. आजच्यालाच करुनशान टाकतो Happy

सीरियसली लाजो, तु ग्रेट आहेस!!!

ओ लाज्वाक्का
च्या मारी..............
>>>>>>>>>>>>>>>>>>ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) जाळीवर ठ्येवा.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ह्ये लई झ्याक लिवलंसा तुमी.........अगदी सपष्ट!
नायतर आपल्या या पोरीसोरी "यान्ला" जाळीवर ठेवा म्हनल्यावर कुनालाबी ठूतील जाळीवर काय नेम सांगावा यांचा?
बर .....तेवडं बक्षिस घावल्यावर आमाला बी च्यापार्टीचं ध्यानात राहू द्या!

>>पण ५ मिंटांनी ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) >> Proud
मस्त रेसिपी, लिहायची स्टाईल, फोटो सगळंच

मला स्वयंपाक करायला मुळीच आवडत नाही
पण आता ही बिस्कीट खाविशी वाटतायेत
आईला कर म्हणलं तर करुन देईना
आता तुच दे मला करुन Sad
मस्त नाव आहे रेसिपिच
पण रेचिपिच वाचली नाही
नाव वाचल
फोटो पाहिले, प्रतिक्रिया वाचल्या त्यातच तोपासु
Sad
कोणी केली तर प्लिज मला बोलवा खायला Sad

लाजो, तू महान आहेस Happy मी कधी ऑस्ट्रेलियाला आलेच तर (तू नाहि म्हणालीस Wink )तरी जेवायला नक्किच तुझ्याकडे येणार्(च) . Happy
बाकि स्पर्धेचे नियम पाहता माझ्याकडुन तुलाच पहिले बक्षीस Happy मस्त पाकक्रुती आणि लिहिलयस पण च्यामारी लै बेस Happy

या रेसिपीचे 'टेस्टिंग' झाले आहे कालच!

प्रत्यक्ष लाजोतैंच्या हातचे च्यामारी खाण्याच्या योग काल आला!!! जबरदस्त लागतात! एकदम खुसखुशीत झाली आहेत.

लाजो लै भारी कि वो!
मस्त दिसताहेत बिस्किट.
वत्सला सही आहे. लाजोच्या हातची बिस्किटं खायला मिळाली म्हणजे भारीच हां!
Happy

लाजो... एकदम कडक पाकृ..... पाकृच्या पेटंट वगैरेचा जर काही फंडा असेल तर तो तातडीत घेण्याचे करावे.

अबाबाबाबाबाबा.................. येवड्या पोष्टी Happy

समद्यांचे लई म्हंजे लईच आभार बगा Happy

इतक्या सार्‍या प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी Happy

@मेघा२५, बिस्किट कडक व्हायची २ कारणे - ओव्हनचे टेम्प जास्त झाले असेल किंवा बिस्किट जास्त वेळ ओव्हन मधे राहिली असतिल.

@ वत्सला, धन्स गं Happy

.

अगं काय डोकं आहे की काय आहे तुझं? अक्षरशः कुणाला सुचणारही नाही असे प्रयोग करुन बघतेस आणि यशस्वीही होतात. तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे Happy

Pages