"मस्साला च्या मारी"....

Submitted by लाजो on 28 March, 2012 - 18:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"मस्साला च्या मारी... "

पावणं... असं दचकु नगा... म्या काय वंगाळ नाय बोलत हाय. माज्या रेशिपीचं नावच हाय बघा ह्यो.... "मस्साला-च्या-मारी..." Happy

त्याचं काय हाय बगा, की आमच्या मालकांना.. म्हणजे आमच्या यान्ला Blush 'च्या' लईच आवडतो बगा. आन तो बी मस्साला वाला. आनी नुसताच च्या नव्ह... संगट 'मारी' बिस्कुटच लागतया (डायटवर हायती... खारी नको म्हंत्यात Proud ). तर मी काय म्हंनत व्हते? हां, तर आमचे मालक हरघडी हाका घालतात.... "एSS च्या-मारीSSSS..." रविवारच्याला तर दिवसातुन ६-७ वेळा ह्योच............ "च्या-मारी"..."च्या-मारी"... कंटाळ्ले की म्या. सारखा तो च्या करा.. मसाला कुटा...टोप घासा अन कप धुवा... म्हनल कायतरी आयड्या कराया हवी, जेनेकरुन हे च्या प्रकरन सोप्प करता येइल्ल. मग काय माज्या सुपिक डोस्क्यात वळवळला की हो किडा आन केल्ली की ह्यो नवी रेशिपी...

तर, या रेशिपीसाठी काय काय लागतया?? -

मस्साल्यासाठी:
३-४ वेलच्या, ३-४ लवंगा, दालचिनी तुकडा कुटुन केलेली ताजी भुक्टी - १ छोटा चमचा (टीस्पून)
१ छोटा चमचा सुंठ पावडर

आन ह्यो बी लागतया -

२ मोठ्ठे चमचे (टेस्पून) चहाची पत्ती,
३/४ कप साखर,
२ कप मैदा (गव्हाच पीठ नगाच वापरू .. मज्जा नाय यायाची),
१७५ ग्रॅम मऊ बटर (मीठाबिगर किंवा अमुल पन चालेल),

क्रमवार पाककृती: 

आता आपन बनवुया "मस्साला च्या मारी"

१. सगळे जिन्नस गोळा करा.

Bisc1a.JPG

२. तुमच्या मिस्कर म्हंजी फुप्रो मंदी चाळलेला मैदा, सुंठ, च्या ची पत्ती घाला आन जरा फिरवुन घ्या. मग साखर घाला आन परत फिरवा.. मिस्कर..

३. यात आता कुटलेला मस्साला, बटर घाला अन परत फिरवा... सम्द एकत्र येऊन गोळा व्हाया लागलं की फिर्वायच थांबा.

४. गोळा मिस्करातुन बाहेर काढुन कट्यावर एकत्र नीट करा आन त्याला दांडुक्या सारखा आकार द्या. दांडका साधारण मनगटा येव्हढा जाड हवा (दीड इंच व्यास). हा दांडका प्लास्टिकमधे (क्लिंग रॅप) गुंडाळा आन पांढर्‍या थंड कपाटात ठेऊन द्या घटकाभर.

Bisc2.jpg

५. भट्टी (ओव्हन) १५० डिग्रीला तापत ठ्येवा. घटकाभराने दांडका बाहेर काढा. त्यावरचं प्लास्टिक काढा आन कंगोरेवाल्या चाकून त्याच्या गोल गोल चक्त्या कापा.

६. या चकत्या भाजकागद (बेकिंग पेपर) ठेवलेल्या ताटलीमंदी थोड्या मोकळ्या मोकळ्या मांडा.

७. आता द्या ढकलुन ताटली भट्टीमधी - १२-१५ मिंट. चकत्यांची आता बिस्कुट व्ह्याया लागतिल Happy कडा जरा तपकिरी दिसाया लागल्या की काढा बाह्येर.

Bisc3.jpg

८. बिस्कुट अजुन नरमच लागतिल हातान्ला पण ५ मिंटांनी ताटलीतुन काढुन यान्ला (बिस्कुटांन्ला वो..) जाळीवर ठ्येवा.

Bisc4.JPG

९. "च्या-मारी" झाली की .. काढा प्लेटीत Happy

Bisc6.JPG

१०. च्या-मारी आन सोबत टीवी चा रिमोट दिला यान्ला... म्हंन्ल "च्यामारी घ्या....मस्साला च्या मारी" Lol

Bisc5.JPG

वाढणी/प्रमाण: 
एक खाऊन थांबता येत नाही त्यामुळे खाल तेव्हढे..
अधिक टिपा: 

१. यात शक्यतो चहाची पत्तीच वापरा. पावडर नको. पावडर वापरणार असाल तर २ टबलस्पून ऐवजी १ टेबलस्पूनच घ्या.

२. चहाचे बारीक कण छान कुरकुरीत होतात. मस्त चव येते.

३. सुंठ आणि ताज्या मसाल्याचा स्वाद खुप छान लागतो. विकतचा मसाला शक्यतो नका वापरू यात अजुन बरेच काही घटक असतात.

४. अनसॉल्टेड बटर वापरणार असाल तर अगदी चिमुटभर मीठ घाला. बिस्किटाची गोडी जास्त खुलते.

५. रॅप केलेला तयार दांडुका (रोल) फ्रिज मधे आठवडाभर आणि फ्रिझरमधे महिनाभर ठेऊ शकता. आयत्यावेळेस बाहेर काढुन थोडा थॉ करुन मग बेक करा.

६. बेक करताना साधारण १० मिनीटांनंतर लक्ष असू द्या. कडा लालसर्/थोड्या तपकिरीसर दिसायला लागल्या की बिस्किट लगेच बाहेर काढा. असं वाटतं बिस्किट कच्च आहे पण बाहेर काढल्यावर सुद्धा त्यातल्या हीट मुळे बिस्किट शिजतच असतं. ५ मिनीटांनी बिस्किट जाळीवर काढा. थंड झाल्यावर बिस्किट छान खुसखुशीत होतात.

त टि : आमचे मालक वर्षातुन एकदा चहा पिणार्‍यातले पण ही च्या-मारी रोज आवडीने खातात Happy

माहितीचा स्रोत: 
बेसिक बिस्किट रेसिपी त्यात चहा मसाल्याची अ‍ॅडिशन
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्या बी या खेपला पन केला व्हता.. बिस्कुट केल्याबगर इथ लिवायचच नाय...दिसभर पाट्या टाकुन सानच्याला लै दमायला व्हत.. आज्-उद्याला म्हणत काल वेळ गावला बगा... आणं केलं की व च्या-मारी
Biscuit1_small.JPG

भट्टीतुन खमंग वास आला की आवाज आला की... "हा(आ)न ती च्या मारी"

च्या-मारी वर्षा... छान झालियेत बिस्किटं Happy
बिस्किटं बनवुन इथे सांगितल्याबद्दल धन्स गं... Happy

लाजो: मी पण आज "च्या मारी " करायला घेतल्या. सगळे जिन्नस फु प्रो मध्य टाकून्ही गोळा बनला नाही. बटर यु एस मधे १-१ पौंड च्या ४ अशा ४ पौंड( ४५३ ग्रॅम) च्या पॅक मध्ये येते. मी त्यातून अंदाजाने १५०ग्रॅम घेतले. माझे काय चुकले? गोळा बनेस्तोवर बटर टाकू का? के त्यात थोडे पाणी वा दुध घालता येइल?

बेकिंगची मला जाम धास्ती वाटते. ही तोंपासु रेसिपी वाचून प्रयत्न केल्यावाचून राहवले नाही.

लाजोतै, फुडल्या वक्ताला पुन्याला येशीला, तवा ह्ये समदं आणि असलंच काय बाय समदं खान्याचं घीउनशानच या हां काय, आन् माझ्या ताब्यात द्या म्हंजी झालं Lol

Shailaja, Kavita thanks Happy
Ek. Mulagi, thod butter ghal. Maida maidyat farak asato. Recipe madhe 175gm butter a ahe. Tu 150 ghaatalas. Pan ajun thoDe butter ghalun bagh. hotil biscuits.

, iPad varun Marathi type karanyapexa chya mari banavane nakkich soppe aahe Sad

लाजो: बटर घालून जमल्या Happy
मळता येईल असा गोळा नव्हता झाला पण छोट्या छोट्या कूकीज करता येतील एव्ह्ढा नक्कीच जमला.
झकास रेसिपी.

शतक मी पुर्ण करतो.......
प्रथम पारितोषिका बद्दल अभिनंदन!!!

रेसिपी इंटरेस्टींग वाटतेय ..

चहा पावडर/भुकटी आणि लवंग दालचिनी ह्याची चव फार स्ट्राँग लागते का? ह्याऐवजी काही वेगळं घालता येईल का? (ब्रिटानिया मारीची चव आवडते मला .. त्याचं मसालेदार व्हर्जन अवडेल की नाही ह्याबद्दल शंका वाटते ..)

चहा पावडर/भुकटी आणि लवंग दालचिनी ह्याची चव फार स्ट्राँग लागते का?<<< नाही. आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करता येइल.

ही बिस्किट मारी बिस्किटांसारखी नाही लागत. शॉर्टब्रेड बिस्किटांसारखी लागतात.

आज ही बिस्किटस केली मी. खूप छान झाली आहेत. मसाल्याच्या चविची शॉर्ट्ब्रेड बिस्किट्स. मस्त!!
पण चहा पत्ती नसती तरी चालली असती. चहाची, त्या कुरकुरीत पत्तीची कुठलीही चव लागत नाही. मी अगदी भारतातून चहा पत्ती वगैरे मागवली होती Happy
बिस्किट्स मात्र छानच आहेत. मुलींनाही आवडली. धन्यवाद.

आमच्याकडे हीट आहेत ही बिस्कीटं. ह्यावेळी केली तेंव्हा आठवणीनी फोटो काढला. मी कणीक वापरून केली त्यामुळे रंग तुझ्या बिस्कीटांसारखा नाही आला. पण चव मस्तच.

IMG_469308252013 - Copy.JPG

च्या मारी लै भारी !!!

>>>क्रमवार पाककृती:

आता आपन बनवुया "मस्साला च्या मारी"

१. सगळे जिन्नस गोळा करा.<<<<

याला म्हणतात समर्पित भाव !! खूप आवडले हे

बाकी तोंपासू !! जियो !!

Pages