भेट सावली संस्थेच्या मुलांशी!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 6 February, 2012 - 14:07

गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!

मृणालिनीताईंशी या अगोदर उपक्रमांतर्गत सावलीतील मुलांसाठी शैक्षणिक निधी उभा करण्याच्या निमित्ताने फोनवर बरीच संभाषणे, इमेला-मेली झालेलीच होती. आता त्यातील काही मुलांशीही भेट होणार होती! मनात एक हुरहूर होती. नक्की काय बोलायचं या मुलांशी? त्यांना खाऊ न्यावा का? त्यांना कशाने छान वाटेल? फोटो काढावेत का? कशी असतील ही मुलं? एक ना दोन प्रश्न. उपक्रमांतर्गत काही मुलांच्या परिस्थितीची कल्पना आली होती. खाऊच्या प्रश्नाचे उत्तर 'इक्लेयर्स' असे देऊन मृणालिनीताईंनी तो प्रश्न निकाली लावला. पण बाकी विचार व प्रश्न पाठ सोडत नव्हते.

२ फेब्रुवारीला ठरलेल्या वेळी आवरून मी व माझी आई (ती मृणालिनीताई व त्यांच्या कार्याला जवळून ओळखते) लक्ष्मी रोडवरील सिटीपोस्टापाशी पोचलो. थोड्याच वेळात एका दरवाज्यातून मृणालिनीताई व दुसर्‍या दरवाज्यातून रुनी पॉटर सिटीपोस्टाच्या आवारात शिरल्या.

''इथून कुठे जायचंय आपल्याला?'' माझा हातातील बॅग सावरत प्रश्न.
आम्ही ज्या शाळेला भेट देणार आहोत ती याच वस्तीत जवळपास आहे इतपतच माहिती होती माझ्याकडे.
''हे काय, इथेच आहे पाच मिनिटांवर शाळा...'' सिटीपोस्टाशेजारील अरुंद बोळाच्या रस्त्यावरून जाताना मृणालिनीताई उत्तरल्या. एकीकडे त्या मला व रुनीला शाळेची, तेथील मुलांची माहिती देत चालत होत्या तर दुसरीकडे माझी नजर त्या बोळांमधील वातावरण, माणसे यांवरून भिरभिरत होती.

जुन्या अवकळा आलेल्या इमारती, दुर्दशेतील वाडे, रस्त्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य, ओसंडणार्‍या कचरापेट्या, यांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी विविध होलसेल-हार्डवेअरची दुकाने, काही नव्याने बांधलेल्या इमारती, गाळे... एका बोळातून दुसर्‍या बोळात.... तिथून पुन्हा तिसर्‍या बोळात.... बकाल वस्ती व चित्रविचित्र गंध - दुर्गंधांची साथ... पायदळी तुडवले जाणारे अन्न, गुरे, शेण.....रस्त्यात तर्र होऊन बेशुद्ध स्थितीत पडलेली काही माणसे... या सर्वांशी जणू काही संबंध नाही अशी वाहतुकीची वर्दळ.... अशी आमची मार्गक्रमणा चालू होती.

''ए देखा क्या वहां?'' कोणीतरी चिरक्या आवाजात फिसफिसले. बघितले तर एका जुन्या इमारतीच्या दारात, बाहेर, खिडक्यांशी, वळचणीखाली चेहर्‍यावर भडक मेक-अपचे थर दिलेल्या वारांगनांचा जथा ग्राहकांची वाट बघत आपापसात खिसफिसत होता. लक्षात येणारे हावभाव, भडक वेष, मुद्दाम केलेले आवाज... रस्त्याच्या दुसर्‍या बाजूलाही तेच दृश्य होते. आणि ही सकाळची साडेअकराची वेळ होती!

एरवी अशा रस्त्यांनी मी आजतागायत शेकडो वेळा जा-ये केली आहे, असे चेहरे, त्यांचे गिर्‍हाईकाशी संवाद, वादावादी, हमरीतुमरी, हशा, शिव्याशाप ऐकले आहेत. कोणाचे शेंबडे पोर जवळच घुटमळताना पाहिले आहे. आज त्या सर्व दृश्याला एक वेगळा अर्थ होता. कारण त्यांच्या या जीवनाची प्रतिबिंबे मला त्यांच्या मुलांच्या रूपात भेटणार होती. ज्या शाळेत आम्ही जाणार होतो तेथील ६० ते ७० टक्के मुलेमुली या घरांमधून येतात.

''आता कुठंशी?'' करत करत, बोळ-गल्ल्या-कचराकुंड्या पार करत आम्ही एका अरुंद रस्त्यापाशी आलो. एका वेळी एकच वाहन जाऊ शकेल, अगदी दाटीवाटीने दोन वाहने दामटता येतील इतपत मोठा रस्ता.
''ही बघा आली आपली शाळा!'' मृणालिनीताई म्हणाल्या.
कुठाय शाळा? मी भिरभिरत्या नजरेने आजूबाजूच्या हार्डवेअर सप्लाय करणार्‍या दुकानांकडे बघत होते.
''ते काय बघ, वर पाटी आहे शाळेची!''
ओह! त्या दुकानांच्या डोक्यावर जुन्या पद्धतीच्या वाड्यांमध्ये जश्या लाकडी खिडक्या असायच्या तशा अर्ध्या उघड्या खिडक्या व त्यांच्या खाली लटकणारी शाळेची पाटी दिसल्यावर माझा जीव भांड्यात पडला.

शाळेचे नाव आहे : नूतन समर्थ विद्यालय. सरकारमान्य पण विना-अनुदानित इयत्ता ७ वी पर्यंतची ही शाळा. ८६ वर्षांपूर्वी संस्थापकांनी ज्या वाड्यात या वस्तीतील मुलांसाठी ही शाळा सुरू केली तिथेच आजही शाळा भरते. अगदी बालवाडीपासून ते सातवीपर्यंत. तिथवर शिक्षण घेतल्यावर जर या मुलांना पुढे शिकण्याची संधी मिळाली नाही तर ती पुन्हा त्याच वातावरणात जातात. त्यामुळे सावली संस्था येथील मुलामुलींच्या पुढील शिक्षणाची सोय करण्यासाठी पुढाकार घेते. त्यांना आठवीपासून पुढच्या शिक्षणासाठी जवळपासच्या शाळेत प्रवेश मिळवून देणे, त्यांची आवश्यकतेनुसार राहायची-खायची सोय व शिक्षणाचा - कपड्यांचा खर्च, क्लासची फी, औषधपाणी इत्यादी खर्चाची सोय करते. सध्या या शाळेत १५० च्या जवळपास मुले आहेत. शाळेत मुले नियमितपणे येणे व गळती न होता टिकून राहणे हीच एक मोठी कसरत असते. यातील काही मुलांच्या शिक्षण व्यतिरिक्त अन्य खर्चांची जबाबदारी सावली ट्रस्टने घेतली आहे. उदा. काही मुलांचे पालक नाहीत, ती कोणाच्या तरी आश्रयाने राहतात. त्यांचा खर्च सावली संस्था उचलते. किंवा काही मुलांच्या पालकांची परिस्थिती अतिशय गरीबी व हलाखीची आहे, त्यांचाही अन्य खर्च बघते.

मला दोन दुकानांमधील चिंचोळ्या भिंतीत शाळेकडे वर जाणारा उभा जिना दिसत होता. करकरणार्‍या, कुरकुरणार्‍या उंच लाकडी पायर्‍यांचा. या अशा जिन्यावरून ही शाळेतली धिटुकली ये-जा करतात? तेवढ्यात मृणालिनीताईला पाहून कोणीतरी पिटक्याने ''ताऽऽई'' करत जोरात हाक मारली. दोन चिनाट्या, गुडघाभर उंचीच्या चिमण्या मुली शाळेच्या गणवेशात नाचत आमच्या दिशेने येत होत्या. त्यांच्या 'ताईं'शी बोलल्यावर खारूताईसारख्या उड्या मारत त्या आमच्यासमोरच वर गेल्या आणि अंधारात गुडुप झाल्या. आम्ही काहीतरी बोलत होतो आणि जिना चढायला सुरुवात करणार तितक्यात दोघी-तिघी कन्या जिन्यातून खाली येताना दिसल्या. ''अगं, शाळा भरायची आहे ना अजून? आत्ता कुठे निघालात तुम्ही?'' मृणालिनीताईने त्या पोरींना विचारले. ''ताई, ती अमकी तमकी आली नाहीए अजून शाळेत. तिला घेऊन येतोय!'' त्या किलबिलल्या.
शाळा भरायला अद्याप तशी दहा-पंधरा मिनिटे होती. त्यामुळे मुलंमुली मजेत शाळेच्या जिन्यावरून ये-जा करत होती.

जिना चढून गेल्या गेल्या लागला तो इयत्ता दुसरीचा वर्ग. आम्हाला पाहताच वर्गातील मुलंमुली उठून उभी राहिली. तेथील शिक्षिकांनी आम्हाला टीचर्स रूमचं दार उघडून दिले व तिथे बसायची विनंती केली. जुन्या पद्धतीच्या बांधकामामुळे इथे प्रत्येक वर्गाला किंवा खोलीला दोन दारे होती, आणि बाहेरच्या बाजूला उघडणार्‍या लाकडी खिडक्या. ऑफिसचे एक दार खुलेच होते. आता बाहेरच्या बाजूचे दारही खुले झाले म्हटल्यावर ''कोण पाहुण्या आल्या आहेत?'' याचा पत्ता काढण्यासाठी शाळेतली मुलं मुली हळूच ऑफिसात डोकावून जात होती. तीन-चार चिमण्या मुली ऑफिसाच्या एका दारातून आत येऊन दुसर्‍या दाराने सुळकांडी मारण्याचा खेळ खेळत होत्या. त्यांना अडवले की खुदखुदत पळून जात होत्या.

त्यांच्या त्या बाळलीला बघत बघत आम्ही शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंशी व मृणालिनीताईंशी बोलत होतो. बर्‍याच गोष्टी संभाषणातून उलगडत होत्या. उरलेल्या आमच्या निरीक्षणातून.

''ही शाळा सरकारमान्य असली तरी सरकारतर्फे फक्त तीन शिक्षिकांचा पगार होतो. उरलेल्या पाच शिक्षिकांचा पगार खासगी रित्या अ‍ॅरेंज करायला लागतो. शाळेत अगोदर पाचशे मुलंमुली होते. पण मधल्या काळात या वस्तीतील बायकाही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू लागल्या. भले त्यांना स्वतःला लिहिता वाचता न का येईना! त्यामुळे शाळेतील मुलांची संख्या रोडावली. सध्या इथे दीडशेच्या जवळपास मुलंमुली आहेत.'' मृणालिनीताई सांगत होत्या.

आम्हाला पाहून एक मध्यमवयीन बाई ऑफिसात डोकावल्या. मृणालिनीताईंना पाहून घुटमळल्या. ''थँक्यू म्हणायला आलेय,'' काहीशा संकोचाने उद्गारल्या. मृणालिनीताईंनी त्यांच्या मुलांची व भाच्याची चौकशी केली.
त्या तिथून गेल्यावर त्यांच्याविषयी मृणालिनी ताईंनी सांगितले, ''या ताई शाळेत मुलांना जेवण वाढतात. त्यांच्या भाच्याची दहावीची परीक्षा फी भरली म्हणून मला थँक्स देत होत्या त्या. तो भाचा अनाथ झाला तेव्हापासून आपल्या सासरच्या लोकांचा विरोध पत्करून त्याला मुलासारखं वाढवलंय या बाईंनी. पण त्यांची आर्थिक परिस्थिती नाही चांगली. त्यांना खूप इच्छा आहे त्यांच्या भाच्याला पुढे शिकवायची! तोही चांगला आहे अभ्यासात. खूप मेहनत घेतो.''

तेवढ्यात एक सहावी-सातवीतला मुलगा हळूच ऑफिसात डोकावला. ''अरे ये ना आत!'' असे बाईंनी म्हटल्यावर काहीसा लाजत आत आला. ''काय रे, काल शाळेतून मध्येच गेलास ना घरी परत?'' मुख्याध्यापिकांनी विचारले. ''नाही काही, होतो ना मी शाळेत!'' त्याचे उत्तर. ''हो का? मग शाळा सुटल्यावर काल मी घरी चालले होते तेव्हा तू पलीकडच्या गल्लीत कसा काय सायकल चालवत होतास?'' बाईंचा प्रश्न. तो मुलगा न बोलता फक्त गालात हसला व म्हणाला, ''बाई हे फूल आणलंय तुमच्यासाठी!'' असे म्हणून त्याने हातातील गुलाबाचे फूल पुढे केले. शेवटी बाईंनीही काही न बोलता त्याला 'अरे, ते फूल आपल्या पाहुण्यांना दे' असे सांगत मला द्यायला लावले. त्याला त्यांच्या एस्सेल वर्ल्डला गेलेल्या सहलीविषयी बोलते केल्यावर स्वारी भलतीच खूश झाली. मी व रुनीने त्याला जेव्हा सांगितले की आम्हीपण एस्सेलवर्ल्डला अजून गेलेलो नाही, तेव्हा तर त्याची छाती आनंदाने जास्तच फुलली!

''या वेळेला आम्ही शाळेच्या गॅदरिंगसाठी भरत नाट्य मंदिर भाड्याने घेण्याऐवजी जवळच्या अग्रसेन भवनमध्ये गॅदरिंग केले. तो हॉल आम्हाला फ्री मिळाला. आमचे बरेच पैसे वाचले. मग त्या पैशातून आम्ही मुलांना घाटगे फार्मची सफर घडवली. एस्सेल वर्ल्डची ट्रीपदेखील एकांनी प्रायोजित केली. मुलांना या वातावरणातून बाहेर काढायचे आमचे प्रयत्न चालू असतात. तेवढाच त्यांना पालट होतो.''

''इथली मुले चटकन मोकळी होत नाहीत. बोलत नाहीत. त्यांना खूप प्रयत्न करून बोलते करावे लागते. कधी खोटेपण बोलतात, वागतात. तरी त्यांना सांभाळून घ्यावे लागते. तुम्ही आम्हाला हवे आहात, तुम्ही कसेही असलात तरी आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, हा विश्वास या मुलांच्या मनात जेव्हा उत्पन्न होतो, त्यांची आमच्याविषयी खात्री पटते, तेव्हा ती हळूहळू खुली होऊ लागतात. आमच्याशी बोलू लागतात,'' मृणालिनीताई सांगत होत्या.

अचानक त्या मला म्हणाल्या, ''तुझ्या आईलाच विचार ना.... त्यांची विद्यार्थिनी ही आमची पहिली केस होती!'' त्या माझ्या आईच्या त्या एका विद्यार्थिनीबद्दल सांगू लागल्या. त्या विद्यार्थिनीची आजी कुंटणखान्याची मालकीण होती व आपल्या नातीला त्याच व्यवसायात ओढू पाहत होती. आजी, आई व नात एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे तसे करणे त्या आजीला सहज शक्य होते. शेवटी मृणालिनीताईंच्या मदतीने त्या मुलीला पोलिसांचे सहकार्य घेऊन तिथून हलवले व दुसर्‍या ठिकाणी संस्थेमार्फत तिच्या राहण्या-खाण्याची सोय केली, शिवाय सावली संस्थेने तिचा शिक्षणाचा खर्चही उचलला. आज ती मुलगी पदवीशिक्षण पूर्ण करत असून आपल्या पायांवर उभी राहण्यास सज्ज आहे. पण सुरुवातीला तिच्यावर, तिच्या वागण्यावर खूप कष्ट घ्यायला लागल्याचे मृणालिनीताई नमूद करतात.

''इथली एक मुलगी तर पाच -सहा वर्षांची होईस्तोवर रात्री रस्त्यावरच झोपायची. तिची कोणालाही पर्वा नव्हती. अगदी तिच्या सख्ख्या आईलाही! त्या काळात तिने काय काय भोगले कुणास माहीत! इथे शाळेत अनेक मुले अशी येतात. समाजाने नाकारलेली.''

''सगळेजणच त्यांना फसवतात. त्यांना नॉर्मल आयुष्य म्हणजे काय हेच माहीत नसते. अगदी लहान लहान वयातच काय काय अत्याचार सहन करायला लागतात त्यांना! इथे वस्तीत छोट्या छोट्या मुलींना रात्री-बेरात्री त्यांच्या आया, किंवा गिर्‍हाईक दारू आणायला पाठवते! रात्री तीन-चार वाजेपर्यंत या मुलांना झोप नसते. त्यांनी झोपायचे कुठे, तर तेही खोलीतल्या एखाद्या छोट्याश्या माळ्यावर किंवा कॉटच्या खाली!! रात्रभर आई गिर्‍हाईकांसोबत असते. सकाळी ही मुलं तशीच उठतात. मिळाली तर नाश्त्याला चहा-खारी मिळते. दुपारी तशीच अंघोळ न करता शिळ्या कपड्यांत किंवा आपली आपण तयार होऊन शाळेत येतात. घरात साधे प्यायचे पाणीही भरलेले नसते. यांच्या आयांचा दिवसच दुपारी दोन-तीन वाजता सुरु होतो! तर मग बाकीच्या गोष्टींची काय कथा!'' एका फोनवरच्या संभाषणात मृणालिनीताईंनी सांगितलेले मला आठवले.

मगाशी आमच्यासाठी कॉफी मागवण्यात आली होती. आम्ही नको म्हटल्यावर ''अहो, चांगली कॉफी असते इथली... नाही म्हणू नका!'' असा आग्रह झाला होता. कॉफी देणार्‍या तरुणाचे 'हा आमच्याच शाळेचा विद्यार्थी आहे बरं का! खूप छान कॉफी बनवतो!' म्हणत मुख्याध्यापिकांनी कौतुक केले. ऐंशी वर्षांची जुनी शाळा असल्यामुळे या भागातील लोकांचा शाळेकडे, शिक्षकांकडे बघायचा दृष्टिकोन एकंदर आदराचा आहे. आजूबाजूचे, परिसरातील दुकानदार अधूनमधून जमेल तशी मदत करतात. शाळेत मिळणार्‍या आपुलकीच्या वातावरणामुळे इथून बाहेर पडलेले विद्यार्थीही शाळेबद्दल आस्था बाळगून असतात.

येथे शाळेत मुलांना सकाळचे जेवण (पोळी भाजी) + दुपारी सरकारी खिचडी असे शाळेतच दिले जाते. कारण त्यांच्या घरून त्यांना काहीच अन्न सकाळच्या वेळी मिळत नाही. हातावर पैसे टिकवले जातात फक्त आणि मग ही मुले बटाटेवडा, भजी, मिसळ असे काहीबाही खातात. त्यासाठी शाळेतच जेवण दिले जाते. मुले शाळेत आपली आपण तयार होऊन येतात कित्येकदा. कारण त्यांच्या आयांचा दिवस दुपारी दोन - तीन वाजता सुरू होतो. खूप गोजिरवाणी मुलं आहेत. शाळेत येऊन दोन वेळचे खाणे मिळते, थोडाफार अभ्यास होतो, इथे जरा वेगळ्या वातावरणात ती रमतात, हसतात, खेळतात, मित्र-मैत्रिणी बनवतात. नाहीतर शाळेबाहेर त्यांचे बालपण पुरते कुस्करले जाते. इथून बाहेर पडल्यावर घरी त्यांचा काहीच अभ्यास होत नाही. रात्रीच्या जेवणाचीही शाश्वती नसते. लहान वयातच अनेक मुलांना दारू, गुटखा व इतर व्यसने लागतात. आजूबाजूचे वातावरणच तसे असते. कोणीही त्यांना व्यसन लावू शकते. समाजातील वाईट मार्गाला लागलेले अनेक लोक आजूबाजूला वावरत असतात. मग जरा मोठी झाली की ही मुले ''दादा'' बनतात, दादागिरी करू लागतात. राजकारणी, नेते, गुंड त्यांचा गैरवापर करून घेतात. त्यांना गुन्हेगारीला लावतात. पुढे गँग वॉर मध्ये ही मुले खेचली जातात.... हकनाक मारली जातात.

येथील मुलींची हालत तर यापेक्षा वाईट. जवळपास ३५ % पेक्षा जास्त मुली या व्यवसायात १८ वर्षे पूर्ण होण्याअगोदर येतात. घरून, समाजातून नाकारल्या गेलेल्या मुली या व्यवसायात शिरतात आणि आपले आयुष्य गमावून बसतात. कोणा मुलीत काही व्यंग असेल, घरी गरीबी असेल, किंवा आणखी काही.... त्यांचे नातेवाईक त्यांना फसवून इथे आणतात व कुंटणखाना मालकिणीला विकून टाकतात. इथली मुले जर मालकिणीच्या पोटी जन्म घेतलेली असतील तर त्यांना जरा तरी बरे आयुष्य मिळू शकते. पण जर त्या मुलांची आई मालकिणीच्या हाताखाली काम करत असेल तर त्या मुलांची स्थिती फार बेकार असते. त्यांना नोकरासारखे वागवतात, खूप वाईट तर्‍हेने वागणूक देतात.

''या मुलांच्या आयांमधले मातृत्वही त्यांच्या व्यवसायाबरोबर मरून जाते बहुतेक. त्यांचा सगळा राग त्या आपल्या मुलांवर काढतात. त्यांना मारतात, शिव्या देतात, त्यांचा राग राग करतात, उपाशी ठेवतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्या बिचार्‍या मुलाला हेही समजत नाही की आई आपला राग का करते आहे ते! मुलांना चैनीच्या गोष्टी त्या चटकन आणून देतात, पण मुलाच्या शिक्षणासाठी यातील फार कमी आया उत्साह दाखवतात. अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी मुलांना घेऊन पिक्चरला जातात, किंवा गावी जत्रेला, उरुसाला निघून जातात. त्यांना शिक्षणाचे, शाळेचे महत्त्व फारसे वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही शाळेतील मुलांच्या पालकांशी गोडीत राहण्याचे धोरणच अवलंबले आहे. कारण तसे वागले तरच ते आपली मुलं शाळेत पाठवतील. त्यांना शिकू देतील! आता या शाळेत प्रवेश घेताना शाळा जरी ७ वी पर्यंतच असली तरी शाळेच्या बाई आमच्या भरवशावर पालकांना सांगतात की तुमच्या मुलांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तुम्ही निश्चित समजा!'' मृणालिनीताई नंतर म्हणाल्या.

''या मुलांच्या मनात जाम असुरक्षितता असते. त्यामुळे लहान वयातच ती व्यसनाच्या नादी लागतात. तेवढा काळ का होईना, ते आपली वेदना विसरू शकतात. त्यांची आई कोणा तरी माणसाबरोबर राहत असते. त्याच्या पैशावर जगत असते. दर दोन-तीन वर्षांनी हा माणूस बदलतो. त्याचाही परिणाम होतो. आया फक्त पैसा, गिर्‍हाईक, आपला धंदा आणखी कसा वाढवता येईल व आपली व्यसने यांतच गुरफटलेल्या असतात. या सर्व वातावरणातून, दुष्टचक्रातून मुलांना बाहेर काढायचे म्हणजे त्यांना शिक्षण देणे व स्वावलंबी करणे... हा एकमेव उपाय आहे.... जो आम्ही करतोय! समाजाचा या मुलांकडे बघायचा दृष्टिकोनही हळूहळू बदलतोय, जे खूप चांगले आहे!!''

''ही मुले सातवी पास झाली की आम्ही त्यांना उचलतो. त्यांचा ग्रुप शक्यतो मोडू न देता त्यांना जवळच्या दुसर्‍या शाळेत प्रवेश घेऊन देतो. शक्यतो जिथे त्यांना दडपायला होणार नाही, बुजायला होणार नाही असे वातावरण असलेली शाळा बघतो. मुलांना गरजेप्रमाणे कोचिंग क्लासेस लावतो. देवधर क्लासेसना मुलं जातात. शाळेतही जर खासगी शिकवणी किंवा शाळेतर्फे शिकवणीची सोय असेल तर तसेही बघतो. शाळाप्रमुख, शिक्षक आम्हाला खूपच सहकार्य करतात. जर मुलांना त्यांच्या राहत्या ठिकाणी ठेवणे त्यांच्यासाठी धोक्याचे असेल तर आम्ही त्यांची सोय खासगी वसतिगृहात करतो. अर्थात त्यासाठी त्यांचे पालक, घरमालकीण यांना पटवावे लागते. ते बरेच नाजूक काम असते. कारण कायद्याने मुलांचा ताबा ती अठरा वर्षांची होईपर्यंत पालकांकडेच असतो. पण मुलांचे हित बघून काही काळाने, आमच्या प्रयत्नांनी पालकांनाही पटते व ते परवानगी देतात.''

इकडे आमचे संवाद चालले असताना खाली तळमजल्यावर एक छोटेसे नाट्य घडत होते. एक आई आपल्या मुलाला सांगायला आली होती की शाळा आज पूर्ण कर. मध्येच घरी येऊ नकोस. तिने त्याला जोरात ओरडून सांगितले, ''मी कामाला बाहेर जाणार आहे, घरी कोणी नसेल. तर तू घरी येऊ नकोस दुपारी.'' (हा सर्व संवाद हिंदीत चालला होता!) मुलगा जिन्याच्या वरच्या टोकाला तर आई खालच्या टोकाला. मुलाने तिला जोरात ओरडून सांगितले, ''नाही येणार शाळेतून मध्येच परत मी. तसंही मला माहितेय तू कोणत्या ''कामा''वर जातेस ते!!'' आणि तो पाठ करून दाण दाण पावले वाजवत निघून गेला. आईही चेहरा गोरामोरा करून निघून गेली.

शाळेची घंटा व प्रार्थना झाल्यावर आम्ही मुलांना भेटायला ऑफिसबाहेर पडलो. प्रत्येक वर्गात थांबून आम्ही मुलांशी ओळख करून घेत होतो. रंग उडालेल्या, पोपडे पडलेल्या भिंती आणि छताला रंगीबेरंगी पताका - भिंतींवर आणि छताच्या तुळयांना, खांबांना टांगलेले तक्ते, चित्रे, गणवेशात आणि साध्या वेषातील चिटकी पिटकी पोरे... त्यांचे उत्साहभरले चेहरे... लाजरे हसू! डोळ्यांत खट्याळपणा. आणि तरीही प्रत्येक वर्गात मागच्या बाजूला उभी असलेली अबोल मुले, त्यांचे गप्प चेहरे, डोळ्यांतील परके भाव, कोणाचे वाहते डोळे, चोरलेले अंग....
कोणी डोक्याचे गोटे केलेले, कोणी केस नीट चापून चोपडून भांग पाडलेले.... रुनीच्या कॅमेर्‍यात आपली छबी कशी दिसतेय याची बालसुलभ औत्सुक्याने न्याहाळणी करणारे....

एकीकडे रुनी व मी मुलांचे फोटो घेत होतो, त्यांच्याशी बोलत होतो, त्यांच्या बाई - मृणालिनीताई आम्हाला त्यांच्याविषयी सांगत होत्या. गॅदरिंगमधील नाचाचे नाव काढताच मुलांचे चेहरे असे काही फुलले....!!! वरच्या मजल्यावरच्या सातवीतील मुलांशी बोलून आम्ही परत खाली आलो तोवर प्राथमिक मधील सगळी मुलंमुली नाचासाठी जय्यत तयार होती. बाईंनी कॉम्प्युटरवर गाणे लावले आणि सुरू झाली एकच धम्माल!!! (मला माहीत नसलेले पण रुनीला माहीत असलेल्या) हनुमान - सुपरमॅन अशा शब्दांच्या ठेकेबाज गाण्यावर मुलं नाच करत होती. प्रत्येक कडव्याला पुढे नाचणार्‍या मुलांपैकी वेगळा मुलगा हनुमान होत होता, इतरांना आशीर्वाद देण्याची मस्त पोझ देत होता! (त्यांचा नेहमीचा हनुमान त्या दिवशी अनुपस्थित होता ना!!!) मुलींनीही मस्त धुव्वादार नाच केला. अ‍ॅक्शन्सचा वेग इतका फास्ट होता की आम्हाला त्यांचे फोटो घेणेही मुष्किल झाले होते! पण काय आनंद विलसत होता त्या मुलांच्या चेहर्‍यांवर! आमच्यासारख्या अनपेक्षित ''पाहुण्या'' आल्यामुळे त्यांना थोडा वेळ अभ्यासापासून सुट्टी व नाचाच्या रूपाने दंगा करायला मिळाला होता. शेवटी त्या गोड मुलांचा निरोप घेऊन आम्ही त्यांच्या त्या संमिश्र निरागस जगातून निघून खालच्या 'बाजारा'त आलो.

''तुम्ही आलात आज, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुमच्या सर्वांच्या रूपात, मदतीने आम्हाला जणू परमेश्वरच भेटला असं वाटतंय! या मुलांना तुम्ही जी काही मदत करताय त्याने त्यांचं सारं आयुष्य बदलणार आहे!'' मृणालिनीताई सांगत होत्या. ''आमच्याकडे शाळेत काही मुलं एक वर्ष शाळेत येतात. मग एक वर्ष गॅप, मग पुन्हा शाळेत प्रवेश... असे चालू असते. पण आम्ही त्यांनाही सामावून घेतो. शिकून आपल्या पायांवर उभ्या राहिलेल्या इथल्या मुलामुलींना पाहून, त्यांना भेटून बाकीच्या मुलामुलींना प्रेरणा मिळते. काहीतरी करण्याची, शिकण्याची जिद्द निर्माण होतेय. त्यांच्या आयांनाही मग वाटतं, अमकीचा मुलगा / मुलगी शिकतेय तर मग माझ्या मुलाला पण शिकायला मिळायला पाहिजे! हळूहळू हा बदल होतोय. अगोदर हेही अवघड होते. आणि आम्ही मुलांना शिक्षण संबंधानेच व एक चांगले नागरिक होण्यासाठी मदत करू हे त्यांच्या आयांना स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या आमच्याशी वागण्या-बोलण्यात फरक पडलाय. येथील मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही खास करून सर्वाधिक जागरूक आहोत. कारण त्या ह्या व्यवसायात ओढल्या जाण्याची सर्वात जास्त शक्यता, नव्हे खात्रीच असते! त्यांना पुरेसे शिक्षण दिल्यावर मग त्या मुलींसमोर पर्याय तरी असतात. नंतर त्यांचा चॉईस आहे. पण तो पर्यायही उपलब्ध नसणे फार भयानक आहे!! आज इथली एक मुलगी कमर्शियल आर्टच्या शेवटच्या वर्गात शिकत आहे. तिच्या क्लासची, शिक्षणाची फी बरीच होती. पण त्या मुलीची हुशारी आणि परिस्थिती पाहून आम्हाला तिच्या फीमध्ये सवलत मिळाली. अशी मदत मिळाली की आमचा व पर्यायाने येथील मुलांचा हुरूपही खूप वाढतो. समाजाला आपण हवे आहोत ह्याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण होते. आणि आमच्या लेखी ते खूप महत्त्वाचे आहे.''

घरी येताना मी बर्‍याच विचारांचे आणि एका वेगळ्याच अनुभवाचे आवर्त सोबत घेऊन आले. डोळ्यांसमोरून त्या मुलांचे गोंडस चेहरे हटत नव्हते. शेवटी हा लेख लिहायला घेतला.... तुमच्यापर्यंत हा सारा अनुभव पोचावा म्हणून! कितपत यशस्वी झाला हा प्रयत्न ते तुम्हीच ठरवा!

हे आमच्या भेटीचे काही फोटो :

शाळेची इमारत :

या दुकानांच्या सापटीत आहेत दोन चिंचोळी प्रवेशद्वारे व अरुंद जिने शाळेकडे जाण्यासाठी :

मुख्याध्यापिका बाई :

कविता म्हणून दाखविणारे बालगोपाल :

एका गाण्यानंतर ताबडतोब दुसरे गाणे सुरू!! Happy

काय तो जोश गाण्याचा!!

इयत्ता सातवीतील काही मुले :

इयत्ता सातवीतील काही मुली :

फोटोसाठी सज्ज!

हसरे चेहरे

आणि आता दे धम्माल नाच!!

काय मस्त करत होत्या मुली डान्स!

Happy

संयुक्ता सुपंथ मदत उपक्रमाच्या बाफाची लिंक : http://www.maayboli.com/node/30227

(* सार्वजनिक धागा)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

धन्यवाद बस्के, ईनमीन तीन... मायबोलीकरांच्या मदतीचा या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी खूप आधार मिळालाय!

छान

हे सगळे स्वत:चीच नजर चुकवून, भीत भीत का होईना पाहिले आहे. भयंकर आयुष्य.
अरुंधती, कुठेही भडक न वाटू देता तरीही त्याची धार जराही कमी न करता हे लिहीण्याच्या तुझ्या लेखनशैलीचे कौतुक. रुनी, अकु तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि सुपंथमधून मदत केलेल्या सर्वांचेही.

अरुंधती आणि रुनी, धन्यवाद.

अरुंधती, कुठेही भडक न वाटू देता तरीही त्याची धार जराही कमी न करता हे लिहीण्याच्या तुझ्या लेखनशैलीचे कौतुक.
+१

अरुंधती , रुनी ग्रेट.
अरुंधती, कुठेही भडक न वाटू देता तरीही त्याची धार जराही कमी न करता हे लिहीण्याच्या तुझ्या लेखनशैलीचे कौतुक. > +१

Sad आपल्या मुलांना आपण किती संस्कार, सुरक्षितता देण्याचा प्रयत्न करतो.. ह्या गोजिरवाण्या देवाघरच्या फुलांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा जागृत झाली. आभारी. हे विश्व मी फार जवळून पाह्यलंय Sad माझ्या आईचं दूकान श्रीनाथ टॉकिज समोर मेन रोड वर होतं. कित्येक जणी माझ्या आईकडे मन हलकं करायला यायच्या तपकिर घेण्याच्या बहाण्यान. बरेच वेळा त्यांची मालकिण बाहेर सुद्धा सोडत नाही त्यांना वर्किंग अवर्स भरेपर्यंत किंवा तेवढं टार्गेट अचिव होईपर्यंत! Sad

कुठे लिहावे हे कळले नाही म्हणून इथे लिहित आहे.माझ्या कडे माझे लहान झालेले खूप पंजाबी ड्रेसेस आहे. सगळे चांगल्या अवस्थेत आहेत. मला ते गरजू मुलींना द्यायचे आहेत. कुठे आणि कोणाला संपर्क करावा ?

मृणालिनी भाटवडेकर.
त्यांचा संपर्क क्रमांक : ९८२३२७०३१०
पत्ता : ई १००४, ट्रेझर पार्क, संतनगर, पर्वती, पुणे ९.