सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************
तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.
तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?
तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्या आणि तिथेच व्यवसाय करणार्या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.
मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.
चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.
हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?
*****************************************************
ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..
कळावे,
लोभ असावा.
१९६३ साली चिंचवडला एकही
१९६३ साली चिंचवडला एकही प्रसुतीगृह नव्हत म्हनुन मी पुण्याचा ( जन्माने ) बाकी चिंचवडचा. आताशा नोकरीकरता रोज पुण्याला येतो पण मला पुणेकरांचे जाज्वल्य वेगळेपण मला तरी जाणवले नाही. हे वेगळेपण याना त्या कारणाने इतरही शहरात दिसते म्हणुन असेल.
वैशिष्ठ्य काय सगळीकडेच असतात पण पुण्याबद्दल अतिच बोललं जातं.
ह्म्म्म. पटलं.
सही आहे लेख. मजे मजेत बोलली
सही आहे लेख.
मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?>>>
हा विचार आवडला.
प्रत्येक गावाचे कायतरी गुण
प्रत्येक गावाचे कायतरी गुण असणारच त्यावरुन जरा टोले मिळाले तर त्यात एवढं काय बिघडत नाय असे माझे 'सोलापूरी' मत (दुसर्या कोणी चेष्टा करायच्या आधी स्वतःच आपल्या गावाची मापे काढणारे आम्ही लोक!!!). आता अशा वागण्याने कायतरी बिघडते असे वाटणे हाच पुणेरी गुण म्हणावा काय?
>>>>>>>>>
आगाऊला अनुमोदन
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार. पहिल्याच लिखाणाला एवढे प्रतिसाद येतील असं वाटलं नव्हत
आगाऊ, saakshi, कविता नवरे - नवीन माहिती, द्रुष्टिकोन कळाले, काही पटले काही तेवढेसे नाहीत. पण प्रोत्साहना बद्दल धन्यवाद.
कविता नवरे - मी तुमच्या लेखामुळे दुखावलो नाही पण बरेच दिवस असे अनुभव येत असल्यामुळे हे लिहिणारच होतो, आज लिहिलं. तुमचा लेख छान लिहिला आहेत.
आनंदयात्री - खूप वेळा असं दिसलं कि लोक मजेमजेत न बोलाता, मत्सरातुन, आकस मनात ठेवून पुण्याला नावं ठेवतात.. मला त्याचं जास्त दु:ख वाटत.
फारएन्ड, स्मितागद्रे, डुआय, बागुलबुवा, आनंदयात्री, अश्विनीमामी, दैत्य, निरली, मवा, मीपुणेकर, सॅम, मंजिरी सोमण, रावी, जागू, नितिनचंद्र, बेफिकिर - प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. माझ्यासारखच विचार करणारे आणि कळकळ वाटणारे अजुनही खुप लोक आहेत हे बघून बरं वाटलं.
नीधप - मस्त पोस्ट.
बेफिकिर - गझल अप्रतिम आहे. Homesick केलत.
>> वैशिष्ठ्य काय सगळीकडेच असतात पण पुण्याबद्दल अतिच बोललं जातं.
>>पुलंनी विनोदनिर्मितीसाठी अतिशयोक्ती अलंकार वापरून लिखाण केले आहे हे समजायची कुवत नसलेले अनेक जण केवळ ते लिखाण वाचून पुण्यात आल्यावर भिंग घेऊन फिरतात.
>> पुन:पुन्हा तेच तेच रटाळ बोरिंग जोक्स, स्टीरिओटाईप्स वगैरे वगैरे चालू होतं....
ह्याची आता गंमतही वाटेनाशी झालीये....कित्येकदा असा विचार येतो.नाही, मी किंवा माझ्या ओळखीतले असंख्य पुणेकरही इतर कुठल्याही गावाच्या नावानं एवढं बोलत नाहीत, तर मग पुण्याच्या बाहेरचे लोक का बरं बोलतात? 'कुठे राहता?' हा प्रश्न जर तुम्ही पुण्याचे असाल तर 'दोन व्यक्तींमधली संभाषणाची सुरुवात' ह्यापुरता मर्यादित न राहून, (पु.लं.च्या शब्दांत) 'अकारण हिणकस शेरा' म्हणून वापरला जातो!
-- २००% सहमत..
झकास लेख... <<तो 'मुंबई पुणे
झकास लेख...

<<तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये.>>
१००% अनुमोदन........ कोणीही पुणेकर असली बावळट वाक्ये बोलत फिरत नाही...... 'जाज्वल्य अभिमान' पुणेकर बडबडीसाठी ठेवत नाहीत, वर्तणुकीतून दाखवतात.
नीधप, पूर्ण अनुमोदन.
<<मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच>>
उत्तम सल्ला.......
चितळ्यांच्या दुकान बंद ठेवायचा त्रास होत असेल तर कशाला जाता बोंबलायला तिथे दुपारी.......... इतर मिठाईची दुकाने काही कमी नाहीत......तिथून घ्या आणि खा.......पैसे सुद्धा कमी पडतील......
तुमचा वैताग समजला.......पण अस्सल पुणेकराप्रमाणे फाट्यावर मारणे शिकावे असा आमचा सल्ला आहे.............
गेली चार वर्ष पुण्यात रहातोय
गेली चार वर्ष पुण्यात रहातोय आणि जुळवुन घेण्याचा प्रयत्न करतोय. वैताग आलाय. पण पर्याय नाही.
आता समजलं इथे लोक का रहातात ते बाहेरून येऊन. मजबूरी का नाम गांधीजी
शहराचा अभिमान असावा पण लेखात दिसतो तितका दुराभिमान नव्हे.
निशदे - धन्यवाद. मंदार - >>
निशदे - धन्यवाद.
मंदार - >> गेली चार वर्ष पुण्यात रहातोय आणि जुळवुन घेण्याचा प्रयत्न करतोय. वैताग आलाय. पण पर्याय नाही. आता समजलं इथे लोक का रहातात ते बाहेरून येऊन.
तुम्हाला काय म्हणायचय ते नीट कळालं नाही. मला पुण्याचा सार्थ अभिमान आहे.. पण म्हणून मी दुसर्या शहरांना नावं ठेवत नाही किंवा कमी लेखत नाही. प्रत्येक शहराला चांगल्या / वाईट बाजू असतातच. पण त्यावरून तिथल्या लोकांना stereotype करू नये असं मला सांगायचं आहे. तसा विचार केलात तर कदाचित वैताग कमी होईल.
Patla aani talmal pan
Patla aani talmal pan pohochali. Kharay waitag yena sahajik aahe. Tyacha asa aahe, samorchyala waitag anaycha asala aani kahi mudda nahi sapadla ki mag "punekar" ha hukmi patta sarras nighat asava.
लेख अत्यंत भारी आहे !!
लेख अत्यंत भारी आहे !! पुण्याला नावं ठेवण्याचा लोकांना कंटाळा कसा येत नाही देव जाणे!!
मुंबई हे एक गटाराने युक्त शहर
मुंबई हे एक गटाराने युक्त शहर आहे>>> कै च्या कैच. अतर्क्य आणि अचाट विधान.
तुमचा लेख तुमच्या दृष्टीकोनातून वाचला तर चांगलाच आहे. पुण्याशी तसं काही देणं घेणं नाही म्हणून बाकी काहीच बोलणार नाही.
तुमचं पुणं छान असेल पण आमची मुंबई 'भारी' आहे. मुंबईचा जिवंतपणा, गर्दी, स्पीड ह्याची सर कुठल्याही शहराला येणार नाही.
मुंबईचा जिवंतपणा, गर्दी,
मुंबईचा जिवंतपणा, गर्दी, स्पीड >>>
जिवंतपणा -
हसा हसा, तुम्हांला कळायचं
हसा हसा, तुम्हांला कळायचं नाही
बायदवे, त्या जिवंतपणाला liveliness असंही म्हणतात.
मग तुम्हाला काय वाटलं? मला
मग तुम्हाला काय वाटलं? मला जिवंतपणाला लाईव्हलीनेस म्हणतात हे माहीत नाही म्हणून मी हासलो? नका बुवा सक्काळच्या हासवत जाऊ इतक्या!
अहो तुम्हांला काय माहित आणि
अहो तुम्हांला काय माहित आणि माहित नाही ह्याबद्दल नव्हे तर कळायचं नाही म्हटलं. मी आपला समानार्थी शब्द सांगितला. पण तुम्ही हसा. चांगलं असतं तब्येतीला.
तेव्हा कॅरी ऑन.
(No subject)
पु.लं.चे अतिशयोक्ती अलंकार
पु.लं.चे अतिशयोक्ती अलंकार वापरून केलेले विनोद न कळण्याबद्दलच्या नीधप आणि आगावाच्या पोस्टींना जोरदार अनुमोदन.
पुण्याकडे अजूनही घरगुती
पुण्याकडे अजूनही घरगुती अगत्याची पद्धत आहे. मी अनेक ठिकाणी कामासाठी फिरत असते व प्रत्येक ठिकाणी गूगल सर्च करून हॉटेल शोधायचे व तिथे राहायचे असेच असते. इतक्यातच पुण्यात दोन ट्रिपा झाल्या दोन्ही वेळी अगदी अगत्याने घरीच राहायला या असे आमंत्रण आले. हॉटेलमध्ये बुकींग केले आहे असे सांगितल्यावर त्या फॅमिलीज थोड्या नाराज झाल्या. मलाच कुणाच्या गृहव्यवस्थेवर ताण येऊ नये म्हणून हॉटेलात राहून आपली नित्यकर्मे आराम वगैरे आटोपून लोकांना नुसते भेटायला जावे असे वाट्ते. त्यात २४ गुणिले ७ नेट ची गरज वेळी अवेळी येणारे कामाचे फोन व त्यात नेट वापरून उत्तरे देणे, फोन वर जोरात बोलणे, ह्यामुळे कोणाच्याही घराचे रिदम अपसेट होउ नयेत असे मला वाट्ते. एवढ्या घरगुती अगत्याचीच सवय राहत नाही बिझ ट्रॅवलर झाले कि, त्यामुळे मला ह्या अगत्याचे फार अपरूप वाटले.
पुणे करांनी एकदा तुम्हाला आपले म्हट्ले की ते फार मोकळे व हसरे असतात हा माझा अनुभव आहे. मी बॉर्न
अॅण्ड ब्रॉट अप इन पुणे असले तरीही स्वभावात तुसडेपणा नाही. फारच त्रास दिल्याशिवाय कोणालाही तोडून बोलत नाही. कामाच्या लायनीत ऐकून घेण्याचे प्रसंग खूप येतात व एखादा खास पुणेरी प्रतिसाद सुचतो ही पण त्यावेळी तो बोलून दाखवत नाही. नंतर स्वतःशीच हसते. व इथे पुपू वर काय चालले आहे बघते.
परवाच पुण्यात एका ऑफिसात काम होते तिथे त्यांच्या एका कलीगने घरगुती पन्हे आणले होते व सर्वांना दिले. ती चव व देण्यातील साधेपणा मनाला अगदी भावला. खरे सांगू शिवाजीनगर बस स्टँड कडून बालगंधर्व कडे येताना एक रोड साईन आहे रस्त्याच्या डाव्या बाजूला, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन कॉलेज,
आय लव्ह पुणे
पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवे अशी. मी रिक्षातून जाताना पाहिली व मला वाटले खरेच अजून काय महत्त्वाचे आहे लाइफ मध्ये? परत तिथे गेले व ती पाटी असली तर तिथे उभे राहून फोटो घेणार आहे.
तळमळ पोचली, पण सगळंच नाही
तळमळ पोचली, पण सगळंच नाही पटलं.
'पुणेरी बाणा' या बिरुदाखाली येणारी वैशिष्ट्ये सगळ्या पुणेकरांत असतात आणि फक्त पुणेकर्यांतच असावीत असे काही नाही.
चितळ्यांवर काही टीका केली(ती उचित आहे असं नाही म्हणत) तर ती पुण्यावरची टीका होते का?
<<<आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात>>> हे इतकं काही गंभीर प्रकरण आहे असं वाटत नाही. सगळं मजेत तर चालतं. आता पुण्याबद्दल जरा जास्त बोललं जातं आणि आपण पुण्याचे म्हणून जास्त लागलं का? दुसर्या एखाद्या गावाबद्दल असं बोललं जात असतं तर इतकंच लागलं असतं का?
कोकणी माणसाच्या वैशिष्ट्यांबद्दल पण इतकंच लिहिलं बोललं जातं.
आता मुंबईतसुद्धा टाउनवाले आणि बर्बवाले एकमेकांच्या गावां(?)बद्दल बोलतात; दिल्लीत सीपीवाले चावडीबजारवाल्यांबद्दल बोलतात.
मामी
मामी
आवडेश आणि १००% पटेश....
आवडेश आणि १००% पटेश....
हल्ली महाराष्ट्राच्या
हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?
>>>>>>>>>>>
लेखामागील भावना पोचल्या पण वरचा पॅराग्राफ हा निव्वळ त्रागाच आहे.
पुण्यात घर घ्यायची मुख्य कारणं ही काय पुण्याला सोनं लागलय ही नसून ते ज्या पध्दतीने फोफावत जातय, त्याचं शहरीकरण होतेय (जे आधीच मुंबईचं होऊन युगं लोटलीयेत) त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या असलेल्या संधी हे मुख्यत्वे आहे. तुमच्या सारखेच अमेरिकास्थित इंजिनिअर्स जवळपास प्रत्येकाचं पुण्यात घर आहे ते निव्वळ इंव्हेस्ट्मेंट म्हणूनच. मुंबईतले जागांचे चढे भाव आणि पुण्यात त्यामानाने असलेला अल्प रेट, शिवाय शहरीकरणामुळे पुढे मिळणारे अॅप्रिसिएशन याचा विचार पुण्यात जागेत इन्व्हेस्ट करताना होतोय. त्याला धरुन मग इतर मुद्दे आहेत जसे हवा-पाणी, शांतता, चाळीशी नंतर पैसे कमवून झाल्यावरचे हवेहवेसे वाटणारं शांत लाईफ (जे आता हळूहळू पुण्यातही मिळणे दुरापास्तच होईल, आणि मग लोकाम्चा ओढा नाशिक कोल्हापूरकडे जाईल).
आता जसं हा शहरीकरणाचा मुद्दा सोयिस्कर बाजुला सारून तुम्ही "सगळ्यांनाच हो पुण्याचे आकर्षण" हा उगाच एक्स्-फॅक्टर म्हणून दाखवताय..... तो ठळक करू पाहताय, तसाच प्रयत्न नॉन्-पुणेकर अश्या कमेंट करताना करतात इतकच......
त्यात किती मनाला लावून घ्यायचं हा ज्याच्यात्याच्या संवेदनाशीलतेचा भाग आहेच... आणि आपल्या संवेदनांचा आदरच आहे.....
पण, वर काही लोकांनी म्हटल्याप्रमाणे कमी अधिक प्रमाणात हे सगळ्याच प्रांतात आणि देशात असतं..... छुपं प्रादेशिक द्वंद्व म्हणा हवं तर....... ते तेवढ्यापुरतंच घ्यावं....... इतकं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे त्यात.....
आता वर मुंबईला बेफिकीर काय वाट्टेल ते बोललेत वर....... पण काय फरक पडतो, कोणा एकाने का हे म्हटलं तर कशाला मनाला लावून घ्या.
पुण्याला समुद्र नाही...
पुण्याला समुद्र नाही...:(
सांजसंध्या.... झालं आता
सांजसंध्या.... झालं आता "मुंबई - पुणे - मुंबई" सुरू होणार.......
समुद्र नाही ते नाही देवानं एक
समुद्र नाही ते नाही देवानं एक नदी दिलेली.....
>>पुण्याकडे अजूनही घरगुती
>>पुण्याकडे अजूनही घरगुती अगत्याची पद्धत आहे.
मी पुण्यात आलो तेव्हा प्रभात रस्त्यावर एका घरात तात्पुरता राहत होतो. शेजारी एक टिपिकल पुणेरी कुटुंब. नाव-आडनाव मुद्दामून सांगत नाही. अनेकदा त्यांच्याकडे चावी ठेवण्याचा प्रसंग येई (अजूनही क्वचित येतो). मी त्या घरात तीन महिने होतो त्या कालावधीत त्यांनी माझी कधीही चौकशी केली नाही की बाबा रे कसं चाल्लंय, पुण्यात नवीन आहात काही लागलं तर सांगा, कुठे नोकरी करता, वगैरे. चावी घ्यायला गेलं तर त्या काकू जिथे चावी ठेवली आहे त्या ठिकाणाकडे फक्त आणि फक्त अंगुलीनिर्देश करायच्या---तोंडातून एकही शब्द नाही. कधी चावी घेतली आणि घरात कुणी नसेल तर चहा तर सोडाच, पाणीही कधी विचारलं नाही.
एकदा टिळक रस्य्तावर एका कुटुंबाकडे मी मुंबईहून एका नातेवाईकांच्या विनंतीवरून काही सामान पोहोचवायला गेलो होतो (तिथुन पुढे कोथरुडला जाणार होतो). मे महिन्यातले दिवस होते, घामाने निथळत होतो तरी मला चक्क पाणी मागावं लागलं तेव्हा मिळालं.
मुंबईत पोस्टमन किंवा किराणामालाचं सामान पोहोचवणार्या पोर्याला सुद्धा पाणी-चहा-सरबत विचारलं जातं - इथे पुण्यात माणसं पाण्यालाही महाग आहेत.
हेच काय, रस्त्यात एखादी वस्तू पडली आपल्या हातून आणि कुणा परक्याने उचलून दिली तर आपण लगेच त्याचे आभार मानतो. पण हे शहर त्या बाबतीतही दानत दाखवत नाही.
एकदा पावसाळ्यात कोथरुड डेपो जवळ पौड रस्त्यावर मी माझ्या ऑफिस कॅबची वाट बघत होतो. एका बाजूने येणारा आणि यु टर्न घेऊ पाहणार्या एका दुचाकीस्वाराची समोरून सरळ येणार्या सायकलस्वाराशी टक्कर झाली. दोघेही खाली पडले पण किरकोळ खरचटण्यापलिकडे फारशी इजा झाली नव्हती. दोघांच्याही जखमांमधे चिखल गेला होता. तेव्हा मी माझी पाण्याची बाटली उघडून दिली आणि जखमांवर ओतून चिखल धुवायला मदत केली - जेणेकरुन पुढील औषधोपचारांआधी इन्फेक्शनचा धोका तात्पुरता टळावा. दोघांनी एकमेकांना शिव्या घातल्या आणि आपापल्या दुचाक्या उचलून तिथून काढता पाय घेतला. - साधे माझे आणि दुचाकी उचलायला ज्यांनी मदत केली त्यांचे साधे आभार न मानता. साध्या एका 'धन्यवाद' किंवा 'थँक्यु' ला किती वेळ लागला असता?
तेव्हा पुण्यात (की पुणेरी कुटुंबात??) घरगुती अगत्याची पद्धत आहे असा विनोद मला तरी सांगू नका.
ब्रिटीश आणि अमेरिकन असा वाद
ब्रिटीश आणि अमेरिकन असा वाद पूर्वी रंगला होता तसा आपल्याकडे हवा म्हणून पुणेकर मुंबईकर असा वाद (लुटूपुटीचा) साहीत्यिकांनी रंगवला होता... विशेष दखल घेण्यासारखं काही नाही. त्या निमित्ताने अनेकांनी एकमेकांना कोपरखळ्या मारून घेतल्या त्या ...त्या त्या शहरांसाठी आहे असा समज होण्याची शक्यता आहे
वरच्या पोस्टमधली वाक्ये ऐकीव
वरच्या पोस्टमधली वाक्ये ऐकीव माहितीवर आधारीत आहेत ... सिद्ध करण्यास असमर्थ
( मी पण मूळ पुणेकरच...
)
मी बॉर्न अॅण्ड ब्रॉट अप इन
मी बॉर्न
अॅण्ड ब्रॉट अप इन पुणे असले तरीही स्वभावात तुसडेपणा नाही. फारच त्रास दिल्याशिवाय कोणालाही तोडून बोलत नाही. कामाच्या लायनीत ऐकून घेण्याचे प्रसंग खूप येतात व एखादा खास पुणेरी प्रतिसाद सुचतो ही पण त्यावेळी तो बोलून दाखवत नाही.>>> मामी अहो ह्यातल्या तरिही शब्दाने तुम्हाला काय सुचवायचय? चुकून आलाय का तो शब्द तिथे?
आणि खास पुणेरी प्रतिसाद म्हणजे काय? असा काही स्टिरिओटाईप/ स्पेशल प्रतिसाद असतो का हो पुण्याचा? जर असेल म्हणजे तुमच्या पोस्टप्रमाणे तसं वाटतय तर मग तेच जर पुण्याबाहेरच्या एखाद्याने म्हंटलं तर लगेच का टोचावं?
बाकी नी तुझी वाक्य बरोबर असली म्हणजे येताच का पुण्यात वाली तरिही ती इतर शहरांच्या बाबतीतही लागू आहेतच की. जसे मुंबई स्थित पुणेकर (तू नव्हेस कारण अजूनतरी तू असं काही बोलल्याचा मला अनुभव नाही) मुंबईत राहून मुंबईला यथेच्छ नावं ठेवत असतातच.
सायो, भापो पण चुकीच्या व्यक्तीकरता पोस्ट खर्च करत्येस असं माझं प्रामाणिक मत. तात्विक वाद असु शकतात. नी शी माझी मैत्री आहे म्हणून आम्हा दोघींना एकमेकींचे सगळेच विचार पटतील असं नाही. ह्याची जाणिव दोघींनाही आहे त्यामुळे अशा ठिकाणी वाद नव्हे पण मतं प्रामाणिकपणे मांडता येतात. चौरांनी मांडलेले मुद्दे त्यांची तळमळ दाखवतात त्यामुळे त्यावर विचार मांडावेसे वाटतात मग भले काही मुद्दे विरुद्ध का असेनात. पण बेफिंची पोस्टस मुळात आकसापोटी/विरोधासाठी विरोध/ मुद्दाम काड्या लावू पोस्ट टाईप आहे म्हणूनच तुझ्या पोस्ट वर त्यांचं लोळण स्मायली टाकणं पण त्यातूनच आलेलं वाटतं तेव्हा त्यावर कमेंट करणं म्हणजे वेळ वाया घालवणं.
मी मुळचा पुण्याचा नाही पण आता
मी मुळचा पुण्याचा नाही पण आता गेली दोन दशके पुण्यात रहातो आहे त्यामुळे पुणेकर... आणी मी पुणेकर झाल्याचा मला अभिमान आहे...
प्रत्येकालाच आपल्या गावाचा अभिमान असतो, मी सुद्धा सुरुवातीला काही वर्षे पुण्याला नावे ठेवत होतो आणी आमचे सांगली कोल्हापुर लई भारी असा वागत होतो.. पण आता पुण्याची खरी ओळख पटली आणी जाणवले की इथे खुप सभ्य, सुसंस्कृत आणी शांततामय जिवनाची अपेक्षा असलेले लोक रहातात. इथे लोकाना स्वताच्या आणी दुसर्याच्या प्रायव्हसीची जाणीव असते आणी त्यांचे वागणे सुद्धा त्याला अनुसरुनच असते... काही फार थोडे लोक खवट सुद्धा भेटले पण याचा अर्थ खवटपणा किंवा तुसडेपणा ही पुण्याची ओळख किंवा संस्कृती नाही.. हे तर सगळीकडेच असते.. मला वाटते की पुर्वी साहीत्यीक लोक हे पुण्यामुंबईमध्येच ज्यास्त होते आणी त्यानी त्यांच्या पुस्तकात केलेल्या कॉमेंट्स या त्या त्या शहराला लेबल्स म्हणुन चिकटल्या... पण जसे खेड्यातील माणुस म्हणजे आतिथ्यशील भोळा किंवा मुंबईचा माणुस म्हणजे खुप धावपळ करणारा वगैरे चुकीचे आहे तसेच पुण्याला असे लेबल लावणे चुकीचे आहे.. चेष्टा मस्करी ही एका लिमीट पर्यंत ठीक आहे पण नंतर त्याला वादाचे किंवा भांडणाचे स्वरुप येते.. 
प्रत्येक गावाचे कायतरी गुण
प्रत्येक गावाचे कायतरी गुण असणारच त्यावरुन जरा टोले मिळाले तर त्यात एवढं काय बिघडत नाय >>>> अनु.
प्रत्येक गावचेच काय शहराचे काही न काही गुण-अवगुण असतातच. त्याचा उल्लेख झाला नाही तर ते नहीत असे तर होणार नाहीय. त्यामुळे इतके मनाला लावुन घेणे अतिशयोक्ति ठरेल. फक्त प्रामाणीक आनंद घ्या..., पु.लं.चा हा च उद्देश्य असावा.
अर्थात पुणे करांच्या जश्या खास बाबी आहेत्...मुंबईकरांच्याही (संदर्भासाठी 'मुंबईच' घेतो) आहेत.
आहेत तर आहेत, असणारच, असल्याच पाहीजे, असतातच.
अता आमच्या मुंबई विषय 'गुण्-अवगुणा' बद्द्ल अख्या 'जगात' काही न काही दर सेकंदला बोलले जाते. जर तो प्रचंड उहापोह डोक्यात घेउन बसलो तर...पुण्यात नाही.. मुंबईतच नाही तर जगातील कोणत्याही भागात 'जगणे' कठीण होउन बसेल.
आदल्या दिवशी ७ विस्फोट होतात...शेकडो प्राण दगावतात, दुसर्या दिवशी सकाळी नेहमीच्याच गतीने शहर पुन्हा कामास लागतो. शोकसभेत व्यस्थ न राहता. (आता याला कुणी मुंबईकर मनाची 'मृतवस्था' म्हणु शकतो....सहाजिक ज्याने 'मुंबई अनुभवलीच' नाही 'तोच')... कारण अता सवय झालीय...मुंबई या असल्या फटाक्यांनी हादरणारी, बावरणारी नाहीय. थांबणारी नाही.
खरे आहे मुंबईकर मन हे 'जड' झालंय आता...माझ्या मते हा 'मनाचा' (काहींच्या मते शहराचा नसावा) विकास आहे, कोणत्याही अमिषाला लगेचच शरण न जाणे. पुणेही त्याच दिशेने वाटचाल करत आहे...जेव्हा पुणे मुंबई होईल तेव्हा मुंबई त्याच्या एकदोन पाउल पुढे असेल्....पण, पुणे आज जशी'मुंबई' आहे तसे उद्या होणार हे 'नक्की', आणि हे असं, अशी मागोमाग वाटचाल जगाच्या अंता पर्यंत चालत राहील.
मला हे थोडंसं यासाठी लिहावंसं वाटले, की मित्र लेखखाकाने या विषयी खुपच मनस्ताप करुन घेतलेला दिसत आहे. ज्याला काहीच अर्थ नाहीय. पण मला आपल्या बद्द्ल सहानुभुती आहे. मी पुणे पाहिलेले नाही.
मुंबईकरां विषयी भारतात.. भारता बाहेरही काय चांगले-वाईट म्हटले जाते....या अनुभवावरुन/बरं वाईट वाटुन जर सहानुभुतीपुर्ण अथवा असा 'निषेद्ध व्यक्त करणारा' लेख लिहायला घेतला तर एक जन्म कमी पडवा.
आमची मुंबई. ('जिने आम्हाला त्यागले तरी'...)
Pages