पुणे आणि पुणेकर

Submitted by चौकट राजा on 22 June, 2011 - 17:57

सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्‍याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************

तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.

तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?

तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्‍या आणि तिथेच व्यवसाय करणार्‍या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्‍या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्‍याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.

मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.

चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्‍याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.

हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?

*****************************************************

ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..

कळावे,

लोभ असावा.

गुलमोहर: 

...

प्रत्येक गावाचे कायतरी गुण असणारच त्यावरुन जरा टोले मिळाले तर त्यात एवढं काय बिघडत नाय असे माझे 'सोलापूरी' मत (दुसर्‍या कोणी चेष्टा करायच्या आधी स्वतःच आपल्या गावाची मापे काढणारे आम्ही लोक!!!). आता अशा वागण्याने कायतरी बिघडते असे वाटणे हाच पुणेरी गुण म्हणावा काय? Happy
रच्याकने, इतर भाषिकात असे फरक नाहीत हा निश्कर्ष तुम्ही कशावरुन काढलात? बंगाल्यांच्यात इस्ट का वेस्ट का हिल्सवाले यावरुन खणाखणी होते, तर युपीवाल्यांच्यात कानपूर-आग्रावाले स्वतःला अलाहबाद-लखनौवाल्यापेक्षा पुढारलेले समजतात आणि लखनौवाले यांच्यापेक्षा स्वतःला जास्त कल्चर्ड मानतात.

खुपचं छान लेख. आवडला. पुण्या बद्दल असं बोललं जात असावं कारण त्या लोकांच पुण्यावरचं प्रेम.

जसं टेक्सस मधे म्हणतात ना, " I wasn't born in texas but I got here as soon as I could " अशी
बंपर स्टिकर्स , टेक्सस बाहेरून आलेल्या मंडळींच्या कार्स वर हमखास दिसतात.
बहुतेक पुण्या बाहेरील लोकांना आपण पहिल्या पासून पुण्यात असतो तर किती छान झालं असतं असं काहीसं वाटतं असेल.

बाकी कुठ्ल्याच शहरा बद्दल इतकं कधी बोललं जातं का? नाही, कारणं तसं बोलण्या साऱखं त्या शहरांमधे काही नसेलं.

लेख अगदी ओघवता आहे. वाटत नाही कि पहिलं लिखाण असेलं. सगळे मुद्दे अगदी व्यवस्थीत मांडलेत.

आवडला लेख Happy मला वाटते वेगवेगळ्या ठिकाणांहून एखाद्या शहरात जेव्हा लोक राहायला येतात तेव्हा आपल्या मूळ गावी दिसणार्‍या गोष्टी, लोकांचे वागणे नवीन ठिकाणी न दिसणे आणि बर्‍याच गोष्टींचे स्टीरीओटाईप बनवणे यामुळे असे होत असेल. अमेरिकेत येणारी पहिली पिढीसुद्धा आपल्याला माहीत असलेल्या भागावरून आख्ख्या देशाचे जनरलायझेशन करते.

पुणेकरांच्या काही ट्रेट्स नक्की आहेत. पण प्रत्येक गावाचे काही ना काहीतरी वेगळेपण असणारच. पण बाहेरचे लोक तेथे फार जाऊन राहिले नाहीत तर ते उठून दिसत नाही.

कर्रेक्ट, सगळे मुद्दे बरोबर,
पण...लोकांना सतत पुण्याबद्दल , पुणेकरांबद्दल बोलावस वाटत ह्यातच सगळ आल नाही का ?

लेख फार आवडला पण...

पुणे तिथे काय उणे ?

पुण्यावर, तिथल्या वातावरणावर, दगडधोंड्यावंर, मातीवर, हिरवळीवर, बाकरवड्यांवर, तुळशीबागेवर, एफ सी, जंगली महाराज रोडवर, ह्या सर्वांवर प्रेम आहे हो (माझे) म्हणून असं काही बोललं जातं लिहिलं जातं.

माझ्या असंख्य पुणेकर मित्रमैत्रिणीना पुणेकर / पुणेरी पाट्यांवरचे ज्योक्स ह्याबाबत (फार) काही वाईट वाटत नाही.

हां आता मजेत घेतात म्हणूनच असणार म्हणा.

Happy

लेख छानच आहे.

पण शेवटी बोलणार्‍यांचं तोंड कोण धरणार ? शिवाय आग असल्याखेरीज धूर निघत नाही हे तर खरच. जर हाच बाणा पुणे सोडून इतर शहरातही दिसतो तर त्याला पुणेरी बाणा नाव विनाकारण पडले असेल ? नाही पटत.

प्रत्येक गावाचे कायतरी गुण असणारच >>>>> अगदि अगदि............
आम्हा सातारच्या लोकांना जिकडे तिकडे गरम डोक्यावरून टोमणे मिळतात.... इतकच नाही तर कोणी थोडं खणखणीत आवाजात बोलला तरी त्याला म्हणतात, काय हो, सातारचे दिसताय.... Happy
आता बोला........
पण याच बरोबर सातारची माणसं दिलदार, मोठ्या मनाची असतात हे लक्षात कोण घेतंय??

लेख मनापासून लिहिलायत. आवडला Happy पुलेशु Happy

माझ्या लेखाने तुम्ही लिहिते झालात हे वाचून आनंदं झाला Happy

माझ्याच लेखाने दुखावले गेलात. ते दुखावणं बोलून मोकळे झालात. चांगली गोष्ट केलीत. दुखावले गेलात म्हणून क्षमस्व Happy इतक्या वेळा डोंबिवलीवर, डोंबिवलीच्या गर्दी, पाण्याचा प्रॉब्लेम, डास, डोंबिवलीची ट्रेन मधे चढणारी माणसे ह्यांच्यावरचे विनोद ऐकलेत आणि हो मी तरी एन्जॉय केलेत. पण प्रत्येकजण वेगळा त्याप्रमाणे एखाद्याला टोचू शकतं एख्याद्याला नाही.

आय अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री ह्या उक्तीवर माझातरी विश्वास आहे.

सरदारजीवर जोक करताना, मारवाड्यांना कंजुष हे विशेषण सरसकट वापरताना, साऊथ कडच्या लोकांच्या यम्म यल्ल उच्चारांना मनातलल्या मनात का होईन पण हसताना, रजनीकांथा वरचे खरे खोटे सगळे विनोद इमेलून पाठवताना, तिरकसपणाला कोकणी माणसाशी जोडताना, कोकणी माणसालाच फणसाची/शहाळ्याची उपमा देताना मुळात आपण राईचा पर्वत करतोच करतो. (मुळात सरदारजी जोक मधे भासवले जातात तसे असतात का? तिरकस पणा कोकणाबाहेर नसतो? फणसासारखी, शहाळ्यासारखी आतून मृदु/गोड माणसं काय फक्त कोकणीच असतात?)

जाताजाता आजचे भविष्य : माझ्या प्रतिसादात काडी मटेरिअल भासून इथे पोस्टींचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृपया माझ्या लेखाच्या उल्लेखा बरोबर जर त्याची लिंक देखील द्यायची तसदी घेतलीत तर ह्या लेखा बरोबरच "कोण ती तिसमार्खॉ पुण्यावर लिहितेय" असं म्हणत माझ्या लेखावरही वक्र/सरळ दृष्टी पडेल लोकांची.

ललिता-प्रीति, पूर्ण सहमत.

चौकट राजा, मी जन्मापासून पाचवीपर्यंत डोंबिवलीत आणि नंतर पुण्यात आहे. मला जितकं पुणे आवडतं तितकंच डोंबिवलीही! आपली जन्मभूमी आपल्याला अत्यंत प्रिय असते.. त्यामुळे राग येणं साहजिक आहे. पण जन्मापासूनची पंचवीस वर्षं डोंबिवलीतच काढलेलाही एखादा असेल. त्यालाही आपल्या गावाला दुसर्‍या गावावरून चिडवलेलं आवडणार नाहीच.
तात्पर्य, जास्त मनाला लावून घेऊ नका... यात लेखात डोंबिवलीप्रशस्तीही नाही, आणि पुण्याची निंदाही नाही! Happy
take it easy man!!
धन्यवाद!

ता.क. - डोंबिवलीत येउन रहा एकदा. तशी चांगली जागा आहे... (फक्त डास, गर्दी, शुक्रवारी लाईट-पाणी नसणं या सगळ्यातही जगणारी (त्या जगण्याला सुंदर विशेषण सापडत नाहीए म्हणून नाही लिहित.)पलिकडची माणसंही पहा.. आवडेल कदाचित!

मला तर लेख अत्यंत आवडला. माझ्यामते जगात पुण्यासारखे काहीही नाही व पुणेकरांवर किंवा पुण्यावर होणारी टीका ही केवळ मत्सरातून आलेली असते.

मुंबई हे एक गटाराने युक्त शहर आहे व प्राण गेला तरी बेहत्तर पण मी मुंबईकरांचे किंवा कुणाचेच म्हणणे मान्य करणार नाही की पुणेकर व पुणे हा थट्टेचा विषय आहे. मागे तर यावर एक धागाच काढलेला होता मी!

http://www.manogat.com/node/16241

चितळ्यांचे दुकान बंद असते म्हणजे काय? च्यायला दुपारी दोन वाजता कुणाला चक्का हवाय? इथे बारा वाजता जेवून आरामात वामकुक्षी घेता येते. काय पुण्याची मस्त हवा ! हल्ली जरा परप्रांतीयांनी थट्टा करूनही येथेच स्थलांतर केल्यामुळे झालेल्या वृक्षकटाईनंतर जरा बदलली आहे म्हणा!

१. मुंबई व आय टी (पर्यायाने परप्रांतीय) अशांमुळे पुण्यातील जागेचे भाव अवाच्या सवा वाढले. झाडे कापावी लागली.

२. पाच पाच धरणे असूनही पाणीकपात करावी लागण्यात इतर शहरांमधून आलेल्यांची संख्या हा एक महत्वाचा घटक आहे.

३. पुण्यात आजही पुस्तकी मराठी बर्‍याच प्रमाणात बोलले जाते. नागपूरमध्ये हिंदी शैली, धुळे साईडला गुजराथी शैली, कोल्हापूर साईडला निपाणी शैली व सोलापूर साईडला हैदराबादी शैली आहे. पण पुण्यात बर्‍याच प्रमाणात पुस्तकी मराठी बोलले जाते.

४. पुण्यात (जिल्ह्यात) अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत जे आता पर्यटन स्थळे होत आहेत. येथील शांत जीवनशैली (एकेकाळची) व मस्त हवा यासाठी निवृत्त झाल्यानंतर लोक येथे स्थलांतरीत व्हायचे.

५. गुन्हेगारीमध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे मागे होते. हल्लीच अपराधांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. अर्थात, ती वाढ फक्त नॉन पुणेकरांमुळे झालेली आहे असे मुळीच म्हणत नाही. मुख्यत्वे आय टी, बदललेली शैली वगैरेचा त्यात सहभाग आहे.

६ पुलंनि एकदा काय ते मटार उसळ आणि शिकरण लिहीलं जणू ऐतिहासिक दस्तऐवजच झाला तो! वास्तविक कितीही वाकडेपणा बोलण्यात दिसला तरीही पुण्यात अजूनही 'मराठी' वातावरण आहे. श्रीमंत लोकही भरपूर आहेत आणि दानशूरही! अर्थात, तो काही मातीचा गुण म्हणता येणार नाही, तसे लोक सगळीकडेच असतात.

७. पुण्याचे (आणि मुंबईचेही) प्यायचे पाणी अत्यंत सुमधूर आहे. इतर गावांमध्ये काहीसे जड व किंचित वेगळा गंध असलेले पाणी मुबलक प्रमाणावर आढळते.

८. पुण्यातील दुकाने हा कितीही थट्टेचा विषय झाला तरी तो आता एक तर कालबाह्य आहेच आणि त्यात पुन्हा जेव्हा त्या दुकानांची खरोखर कुणालाच गरज नसायची तेव्हाच ती बंद असायची. मला एक जण म्हणाला मुंबईत पहाटे तीन वाजतासुद्धा भाजी मिळते. बघा किती ग्रेट आहे महानगरी! मी म्हंटले इथे हवीय कुणाला अशा भलत्या वेळेस भाजी? आम्ही मस्तपैकी सात साडेसातपर्यंत घरी येतो आणि दहा वाजता चालत चालत फिरायलाही जातो.

९. अजूनही पुण्यात पहाटे अडीच वाजता एक एकटीच मुलगी लुनावरून रस्त्यावरून जाताना दिसूही शकते व जाऊही शकते! हे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये जसे नगर, औरंगाबाद, नागपूर येथे बरेचसे दुर्मीळ आहे.

मला तरी पुण्याचा जाज्वल्यच अभिमान आहे व तो आता मर्यादा ओलांडून दुराभिमान या पातळीलाही पोचलेला आहे.

सर्व पुणेकरांना माझी ही ११.०४.२००९ रोजी इतरत्र प्रकाशित केलेली गझल सादर भेट!

Lol

वैभवे रेखाटताना मीच पुसलेले पुणे
मागते अस्तित्व आता धूळ बसलेले पुणे

बोळ, वाडे, खेळ, सुट्ट्या, रातदिन उंडारणे
प्राण होता आमचा निष्प्राण असलेले पुणे

भांडणे खोटी, चहाड्या, दिलजमाई सारखी
दूर भावंडे अता, बेसूर रुसलेले पुणे

आज छायाचित्र आजीचे बघावे लागते
आठवावे लागते निर्व्याज हसलेले पुणे

माणसे थोडी तरी सारी कुटुंबासारखी
मारते हाका तयांना पूर्ण फसलेले पुणे

चोरट्या प्रेमास वळसा घालणारी ती मुठा
सभ्य काठाबाजुनी लाजून वसलेले पुणे

शांतता, माणूसकी, शेजारधर्माच्या कथा
'सांगते कानात सारे त्यास दिसलेले', पुणे

स्फोट, अतिवृष्टी, तबाही झेलते मुंबापुरी
थोपटे ताईस तेव्हा जान नसलेले पुणे

माणसे नसतात केवळ 'सोडणारी' मित्रहो
सोडुनी गेले कधी 'मजवर बरसलेले' पुणे

-'बेफिकीर'!

चौकटराजा,
मस्त लिहिलंय.... मला पण हा असा अनुभव खूपदा आला आहे. अमेरिकेतसुद्धा कोणीही भेटलं तरी हल्ली 'पुण्याचे का?' असा प्रश्न येतो आणि पुन:पुन्हा तेच तेच रटाळ बोरिंग जोक्स, स्टीरिओटाईप्स वगैरे वगैरे चालू होतं....
ह्याची आता गंमतही वाटेनाशी झालीये......
कित्येकदा असा विचार येतो.नाही, मी किंवा माझ्या ओळखीतले असंख्य पुणेकरही इतर कुठल्याही गावाच्या नावानं एवढं बोलत नाहीत, तर मग पुण्याच्या बाहेरचे लोक का बरं बोलतात? 'कुठे राहता?' हा प्रश्न जर तुम्ही पुण्याचे असाल तर 'दोन व्यक्तींमधली संभाषणाची सुरुवात' ह्यापुरता मर्यादित न राहून, (पु.लं.च्या शब्दांत) 'अकारण हिणकस शेरा' म्हणून वापरला जातो!

माफ करा, विषयांतर होतंय पण,

>>>मुंबई व आय टी (पर्यायाने परप्रांतीय) अशांमुळे पुण्यातील जागेचे भाव अवाच्या सवा वाढले>>> हे काहिअंशी पटलं...

पण...
गुन्हेगारीमध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुणे मागे होते. हल्लीच अपराधांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. अर्थात, ती वाढ फक्त नॉन पुणेकरांमुळे झालेली आहे असे मुळीच म्हणत नाही. मुख्यत्वे आय टी, बदललेली शैली वगैरेचा त्यात सहभाग आहे>>>>>>> कसं काय बरं????????
----एका आयटी प्रोफेशनलचा भा.प्र.

साक्षी,

गेल्या तीन चार वर्षात अनेक गुन्हे झाले ज्यात बीपीओमधील कर्मचारी, आयटीमधील कर्मचारी गुंतलेले होते. हे झाले आयटीबाबत!

याशिवाय बदललेल्या जीवनशैलीमुळे म्हणजे ताण, स्पर्धा, जागांचे भाव, महागाई, घरच्यापेक्षा बाहेर अधिक वेळ काढल्यामुळे घरातील कमी होत जाणारे घरपण वगैरे प्रकारच्या बाबींनी अनेक गुन्हे घडतात व घडले.

धन्यवाद!

पुलंच्या लेखांमधले पुणेकर किस्से स्वतःचे अनुभव म्हणून खपवणारे तर पदोपदी सापडतात.
पुलंनी विनोदनिर्मितीसाठी अतिशयोक्ती अलंकार वापरून लिखाण केले आहे हे समजायची कुवत नसलेले अनेक जण केवळ ते लिखाण वाचून पुण्यात आल्यावर भिंग घेऊन फिरतात.
ओपन आर्म्सने स्वागत कुणाचेच कुठल्याच शहरात होत नाही. तसे व्हायला तुम्ही काय शहरावर उपकार केलेले नसतात. पण पुण्यात स्वागत झाले नाही की पुणेकर अमुक आणि तमुक. आणि तरी आम्ही पुण्यात रहातोय हे सहन करत. अरे कुणी अक्षता घेऊन आलं होतं का? की पुण्यात रहाताय म्हणजे समाजकार्य करताय?
आम्ही गिरगावातून, मुंबईतून, पनवेलमधून, नागपुरातून, औरंगाबादहून, चेन्नईहून, टिंबक्टूहून पुण्यात आलो रहायला म्हणजे माझा त्रास केवढा मोठा असेल बघा. असं म्हणायचं जणू हे स्वर्गातच रहात होते आणि आता नरकात आलेत. लग्गेच नरक सोडून आपल्या स्वर्गात जा तेवढंच आमचं पुणं चांगलं राहील हे सांगावसं वाटतं.
गंमत गंमत म्हणून थोडं ठिके पण तेच तेच आणि तेवढंच काय? कंटाळवाणं, टेप अडकल्यासारखं!
मग कोणी पुणेकर कंटाळून काही म्हणाला की लगेच चालू हाच तो पुणेरी बाणा आणि अजून काय काय. आग आणि धूर आणि अजून काय काय.
वैशिष्ठ्य काय सगळीकडेच असतात पण पुण्याबद्दल अतिच बोललं जातं.
कविताच्या लेखाबद्दल पण चौ रा शी सहमत. डोंबिवली मधे कोणी तिरकट बाई आहेत तर लगेच तिचं वागणं म्हणजे 'पुणेरी बाणा' हे खटकलंच.

ओपन आर्म्सने स्वागत कुणाचेच कुठल्याच शहरात होत नाही. तसे व्हायला तुम्ही काय शहरावर उपकार केलेले नसतात. पण पुण्यात स्वागत झाले नाही की पुणेकर अमुक आणि तमुक. आणि तरी आम्ही पुण्यात रहातोय हे सहन करत. अरे कुणी अक्षता घेऊन आलं होतं का? की पुण्यात रहाताय म्हणजे समाजकार्य करताय?>>

Lol

आम्ही गिरगावातून, मुंबईतून, पनवेलमधून, नागपुरातून, औरंगाबादहून, चेन्नईहून, टिंबक्टूहून पुण्यात आलो रहायला म्हणजे माझा त्रास केवढा मोठा असेल बघा. असं म्हणायचं जणू हे स्वर्गातच रहात होते आणि आता नरकात आलेत. लग्गेच नरक सोडून आपल्या स्वर्गात जा तेवढंच आमचं पुणं चांगलं राहील हे सांगावसं वाटतं.>>>

Lol

पुलंनी विनोदनिर्मितीसाठी अतिशयोक्ती अलंकार वापरून लिखाण केले आहे हे समजायची कुवत नसलेले अनेक जण केवळ ते लिखाण वाचून पुण्यात आल्यावर भिंग घेऊन फिरतात.>>

Lol

आवडला आणि पटला लेख, तळमळ पोचली Happy
ते अस असतं ना कि लोकं दगड फळांनी लगडलेल्या झाडावर मारतात फळ नसलेल्या झाडांवर नाही Wink
नीधप, मस्त पोस्ट, एकदम पटेश Happy

पुलंनी विनोदनिर्मितीसाठी अतिशयोक्ती अलंकार वापरून लिखाण केले आहे हे समजायची कुवत नसलेले अनेक जण केवळ ते लिखाण वाचून पुण्यात आल्यावर भिंग घेऊन फिरतात.>>> प्रचंड अनुमोदन, हे फक्त पुण्याबद्दलच नव्हे तर पुलंच्या इतर अनेक लिखाणाबद्दलही खरे आहे. त्या लिखाणात खवचटपणा नसून कुतूहलमिश्रीत कौतूक आहे ह्याकडे दुर्लक्ष करुन उगीच 'पुलंनी पण हेच लिहीलयं' म्हणत झोडपणे चालू!!!

पूर्वीचं पुणं राहिलं नाही Wink
एवढं मनावर नाही घ्यायचं. सगळीकडेच हे चालतं. अगदी इथे फ्रान्समधेही पॅरीस/उत्तर फ्रान्स/दक्षिण फ्रान्स मधले असे stereotypes आहेत. अगदी त्यावर विनोदी सिनेमे देखिल निघालेत.
>> वैशिष्ठ्य काय सगळीकडेच असतात पण पुण्याबद्दल अतिच बोललं जातं.
ह्म्म्म. पटलं.

मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?>>>>>>>>>>>> आवडलंच!

Pages