पुणे आणि पुणेकर

Submitted by चौकट राजा on 22 June, 2011 - 17:57

सर्वात आधी मी हे सांगु ईच्छितो कि हा लेख लिहिण्यामागे कोणत्याही एका लेखकाची वा त्याच्या लेखाची मापे काढणे हा हेतू नाही. बर्‍याच दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायचं मनात होतं पण काही ना काही कारणानी राहुनच जात होतं. काल "डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा" हा लेख वाचला आणि माझ्यातला पुणेरी बाणा जागा झाला!.. आणि मग ठरवलं कि आज लिहुनच टाकुयात मनातल. तेव्हा कविताबाई, तुमचा लेख हे फक्त निमित्त झालय.. तुमची लिहिण्याची शैली, लेखाची मांडणी उत्तम आहे. मी फक्त विषयावर थोड भाष्य करु ईच्छितो...
*****************************************************

तर मी पक्का पुणेकर. वयाची पहिली २५ वर्ष पुण्यातच काढली आणि मग थेट अमेरिकेत येऊन पोचलो. इथे आल्यावर मला पहिल्यांदाच कळालं कि पुणेकर प्रचंड special असतात. कारण आजुबाजुचे मराठी मित्रसुद्धा बोलताना वाक्याची सुरुवात "तुम्ही पुणेकर.." अशी करत होते. आणि मग "तुमच्या पुण्यात / पुण्या-मुंबई कडे" असे टोमणे येता जाता ऐकू यायला लागले. अगदी महाराष्ट्र मंडळात पण असेच उल्लेख ऐकायला मिळाले. वर जाता जाता पु.लं.च्या 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मधली वाक्य पण लोक ऐकवत होते.

तसे कॉलेजमधे असताना माझे अनेक मित्र नांदेड, नागपुर, नाशिक (माफ करा 'नासिक'), जळगाव, धुळे (माफ करा 'धुलिया') चे होते. तसेच इथेही आहेत. पण आम्ही कधी त्यांना कोणाला त्यांच्या गावावरुन एवढं 'गौरवल्याच' आठवत नाही. मग प्रश्न असा पडला कि केवळ पुणेकरांना का एवढा 'मान' मिळतो? बरीच मंडळी आधी सांगताना जोरात सांगतात कि "आम्ही अमुक अमुक गावचे, पण आता रिटायर झाल्यावर आई बाबा पुण्याला असतात." किंवा "परवाच पुण्यात फ्लॅट बूक केला बर का"... आणि मग येतं, 'काय हो तुमच्या पुण्याचा ट्रॅफिक!, काय पण पुण्याचे रिक्शावाले!, काय ते पुण्याचे दुकानदार!, काय चितळ्यांसमोरच्या रांगा!, काय हो पुण्याचे रस्ते!, वगैरे..वगैरे'. हल्ली महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून आलेल्या प्रत्येकाला पुण्यातच का घर घ्यायच असतं? आणि एवढाच पुण्यात त्रास आहे तर का एवढा पुण्यात रहाण्याचा अट्टाहास? मुंबईची मंडळी तक्रार करतात कि पुण्याला मुंबई सारखा 'स्पीड' नाही. मग रहा ना तिथेच, पुण्यात रहायला यायचच कशाला?

तो 'मुंबई पुणे मुंबई' चित्रपट लोकांना प्रचंड आवडला पण मला त्या नायकाची (पेक्षा लेखकाची) कीव आली. आजपर्यंत कोणीही पुणेकर असा जाता येता 'मग जाज्वल्य अभिमान आहे' असं म्हणताना मी बघितला नाहिये. "तो चित्रपट आहे, त्यात जरा मेलोड्रामा असणारच," असं म्हणुन स्वतःची समजुत काढली तर लोक नंतर तो संवाद ऐकवून आमचीच टिंगल करत होते. तसच आता हा 'डोंबिवली स्पेशल....' लेख. गेली अनेक वर्ष डोंबिवलीमधे रहाणार्‍या आणि तिथेच व्यवसाय करणार्‍या त्या मूनमून मिसळवाल्या बाईंना 'पुणेरी' बाणा का चिकटवायचा? डोंबिवलीतच तशाच तिखट जिभेच्या कोणी बटाटेवडा विकणार्‍या बाई आहेत हि माहिती प्रतिसादांमधुन कळाली. म्हणजे प्रत्येक शहरात अशी मंडळी असतातच. मग त्यांना 'पुणेरी' बाणाच का नेहेमी चिकटवायचा? पु.लं. नी 'पुणेकर, मुंबईकर..' लिहुन आता ४० वर्ष झाली. पण तेव्हाचा पुणेकर आणि आत्ताचा पुणेकर बराच वेगळा आहे. किती वर्ष हे stereotyping करत रहाणार आपण? गावोगावी असे लोक सापडतातच.
आता उदाहरण म्हणून "टायगर ऑईल कंपनी, ह्युस्टन" असं गूगल करा. त्या कंपनीच्या मालकानी त्याच्या कर्मचार्‍याना लिहिलेले मेमो तुम्हाला दिसतील. (आणि ते वाचून कृपया "मालक पुण्याचे दिसतात" असा निष्कर्श काढु नका!!) त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे 'आता पुणं कात टाकतय' हे पण 'डोंबिवली स्पेशल....' लेखात वाचयला मिळालं. म्हणजे पुणं आता बदललय हे आता लोक जरातरी मान्य करायला लागलेत.

मी असं अजिबात म्हणत नाही कि पुणेकर चिकित्सक नसतात. ते जरा जास्त चिकित्सक असतातच आणि ते तसे असतात कारण अगदी काही वर्ष आधीपर्यंत पुणं महाराष्ट्रातलं एकमेव सांस्कृतिक केंद्र होतं. तिथल्या लोकांनी नेहेमी जर का जागतिक किर्तीच्या कलाकारांना (ह्यात लेखक, गायक, नट, नाटककार, कवी सगळे आले) बघितलं असेल तर आपोआप अपेक्षा ऊंचावणारच. आणि मग ते साध्या कलाकारांच्या चुका काढताना दिसतात. कदाचित म्हणूनच अनेक कलाकार म्हणतात कि पुण्यात टाळी मिळणं सगळ्यात अवघड आहे. पण आता इतर सगळीकडे मोठे मोठे कार्यक्रम होतात. दूरचित्रवाणीमुळे सगळीकडच्या प्रेक्षकांना आता उत्तमोत्तम कलाकारांच्या कलाकृती बघायला मिळतात. पण अजुनही कोणी एखाद्या कार्यक्रमावर जरा टिका केली कि बाकिचे विचारतात,"तुम्ही पुण्याचे का हो?". माझं त्यातल्या गंमतीशी काही वाकड नाही, मला टोचतो तो त्यातला कुत्सित्पणा.

चितळ्यांच्या दुपारी दुकान बंद ठेवण्याला नावं ठेवणारे लोक त्याच चितळ्यांच्या बाकरवड्यांवर तुटुन पडतात. कोणी पुण्याहुन येत असेल तर बाकरवड्या, आंबा बर्फी अगदी मागवुन घेतात. आणि परवाच एक जण अत्यंत चिडुन सांगत होता कि चितळे हल्ली प्लॅस्टिकच्या पिशव्या देत नाहीत. आता तक्रार करायची म्हणून काहीही करायची का? ते चांगले प्लॅस्टिक कमी करायला मदत करत आहेत असं का बघायचं नाही? पुणेरी पाट्या ह्या नावाखाली कोणत्याही गावतल्या पाटया टाकतात हल्ली लोक. त्यातल्या बर्‍याच पुण्यात नसतातही पण लिखाण जरा खोचक असलं कि त्या पाटीला पुणेरी म्हणायचा शिरस्ताच पडला आहे.

हे सगळं इथे लिहिण्याचा उद्देश एवढाच कि ह्याचा मनाला त्रास होतो. आधीच मराठी रक्ताला कधीही एक न होण्याचा शाप आहे असं म्हणतात. जाती पाती वरुन आधीच दुभंगलेल्या मराठी समाजानी अजून गावावरून एकमेकांना वेगळं पहावं ह्यासारखं दुर्दैव नाही. बाकी समभाषिक लोक केवळ भाषा एक आहे म्हणून एकमेकांना अगदी धरून रहातात पण आपण अजूनही मनात एकमेकांबद्दल असा दुजाभाव करतो. मला वाटतं आता आपण 'पुणेकर, मुंबईकर, नागपुरकर' मागे ठेवून पुढे जायला पहिजे. कारण मजे मजेत बोलली जाणारी ही विशेषणं कुठे कुठे आपल्यातच फूट पाडून जातात. मायबोली साऱख्या जगभर पोहोचलेल्या व्यासपिठावर आपण हा बदल नक्कि घडवू शकतो,नाही का?

*****************************************************

ता.क. - मायबोलीवर लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. चुक भूल द्यावी घ्यावी..

कळावे,

लोभ असावा.

गुलमोहर: 

पुण्याची मुंबई होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. >> मास्तुरे १००% अनुमोदन. Happy
बदल ही गोष्ट कायम चांगल्यासाठीच घडते असं नाही, पण आयुष्यात बदल नसेल तर 'वाढ' खुंटते, मग ती गोष्ट कोणतीही असो. पुर्वीसारखं काही राहिलं नाही म्हणून दु:ख करायचं, की नव्या बदलांना अंगिकारत सामोरं जाऊन आपलंसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, नाही का? Happy

>>पुण्याची मुंबई होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

डोंबल. आधी सार्वजनिक वाहतूक........बस सेवा सुधारा.
पीएमटीच्या नव्या बसेस तर खेळण्यातल्यासारख्या आहेत.
जुन्या बसेस बद्दल बोलायलाच नको.........चालकाने गिअर बदलला की मागच्या चार-पाच सीट्स खाडखाड्खाडखाड वाजतात.

तुम्हीच कलमाडीला चढवलंत..........आता भोआकफ.

१) आता वर मुंबईला बेफिकीर काय वाट्टेल ते बोललेत वर....... पण काय फरक पडतो, कोणा एकाने का हे म्हटलं तर कशाला मनाला लावून घ्या.

२) बेफिकीरांचे मुंबई आणि कोकणातल्या लोकांबद्दलचे विचार म्हणजे अगदी त्यांच्या विनोदी लेखनासारखे आहेत............ पण त्यांना कोण थांबवणार????? हाडामांसाचे पुणेकर ते.... चालू द्या.

३) मला कोथरुडात कोणतेही नमुने भेटत नाहीत.
>>>>>

कदाचित ते तुम्हाला बघून रस्ता बदलत असतील बेफी..

==========================================

हे घ्या भुंगा तुमचे तीन प्रतिसाद!

पुण्याची जरी मुंबईच्या दिशेने वाट्चाल असली तरी ती अडखळतच आहे......

मुंबई धावण्याच्या शर्यतीत तर पुणे लंगडीच्या शर्यतीत आहे Proud कारण इंफ्रास्ट्रक्चर्च्या बाबतीत पुणे अजून खूप मागे आहे मुंबईच्या.

>>> >>पुण्याची मुंबई होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
> डोंबल.

अहो, इन्फ्रास्ट्रक्चर या दृष्टिकोनातून नाही वाटचाल चाललेली. पुण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कायमच वाईट राहणार. मला म्हणायचे आहे की सांस्कृतिकदृष्ट्या पुण्याची संस्कृती मुंबईसारखी सरमिसळ व्हायला सुरवात झाली आहे.

अहो, इन्फ्रास्ट्रक्चर या दृष्टिकोनातून नाही वाटचाल चाललेली. पुण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कायमच वाईट राहणार. मला म्हणायचे आहे की सांस्कृतिकदृष्ट्या पुण्याची संस्कृती मुंबईसारखी सरमिसळ व्हायला सुरवात झाली आहे.>>

अगदी खरे आहे. १०० % सहमत!

रच्याकने

पुलंच्या विनोदांना अतिशयोक्ती अलंकार म्हणणे म्हणजे ते विनोद समजलेच नसल्याचं लक्षण आहे.
त्या विनोदात प्रचंड अर्थ भरलेला आहे.

एक उदाहरण:
"गिर्‍हाइकांचा किमन शब्दात कमाल अपमान" ही गोष्ट अक्षरशः खरी आहे.
असली दुकाने मी स्वतः बघितली आहेत.
त्याच संदर्भातली एक सत्यकथा: नात्यात एका आजोबांचं एक टेलरिंगचे दुकान होते कुठल्यातरी पेठेत.
ते रोज दुकानातून घरी आल्यावर आपण आज एखाला कसा पायरीवरूनच हाकलला, एकाची कशी "मापं" काढली, एकाला कसा वाटेला लावला, एकाला कशा दहा वेळा फेर्‍या मारायला लावल्या याचे रसभरीत वर्णने करीत.
कालांतराने या दुकानाचं पुल म्हणतात तसंच झालं. फक्त सिंध्याला विकण्याऐवजी मारवाड्याला विकावं लागलं, इतकाच काय तो तपशीलात फरक.

मंदारराव,

तुम्ही जसे अनुभव घेतले आहेत तसे मीही मुंबईचे घेतले आहेत. तेथे काही गिर्‍हाईकाला रेड कारपेट वेलकम नसते. इन फॅक्ट वेळही नसतो त्याच्याकडे बघायला.

दादरच्या ईश्वर गेस्ट हाऊसमध्ये दहा वेळा राहिल्यानंतरही त्याने एक दिवस पंधरा मिनिते चेक आऊटची वाढवली नाहीत.

या गोष्टीला अनेक वर्षे झाली.

पुण्यातील दुकानदार मुळीच तसे नसतात याचा अनुभव आपण आपल्याच जवळच्या हर्षद खाद्यपदार्थ या 'सावरकर' नामक गृहस्थाने चालवलेल्या दुकानात जाऊन घेऊ शकता. आता जर 'एका उदाहरणाने काय झाले ' असा प्रश्न असेल तर तोच प्रश्न मीही विचारू शकतो आणि इश्वर गेस्ट हाऊसवरचा माणूस मुळचा मुंबईकर नसेलच असे म्हणायचे असेल तर मुंबईच्या वतिने तुम्ही बोलण्याइतके मुंबईत मराठी माणसाचे वर्चस्वच कुठे आहे हा मुद्दा येऊ शकतो.

आता गंभीर विषयांवर चर्चा सुरु झाली आहे. थेट 'पुणे-मुंबई' विकास कार्यकारीणी आणि संस्कृतिवर विषय थबकला आहे. 'ग्रेट' अश्या चर्चा झाल्याच पाहीजे....विचार मिमांसा केलीच पाहीजे इथे.

अर्थात 'राजा' यांची माफी मागुन.

>>. आता जर 'एका उदाहरणाने काय झाले ' असा प्रश्न असेल तर तोच प्रश्न मीही विचारू शकतो

मी अनेक उदाहरणे देउ शकतो. फक्त वर मी जे उदाहरण दिले आहे ते लगेच आठवले म्हणून.

भुंगा, मोठ्या मनाचा आहे हे बहुधा आपण अनुभवलेही असावेत. Happy तसेच, पुणेकर मोठ्याच मनाचे असतात वगैरे मुद्दाच मांडलेला नाही आहे मी! तसेच, आपणही मोठ्या मनाचे आहात हे मीही अनुभवलेले आहेच! हे प्रामाणिकपणेच लिहीत आहे. फक्त आता गंमत म्हणजे पुणेकर 'हिशोबी' असतात असे म्हणायला हरकत नाही. हा हा हा!

दिवे!

फक्त वर मी जे उदाहरण दिले आहे ते लगेच आठवले म्हणून>>

मीही देऊ शकतो.

मिडटाऊन प्रीतम - मला व माझ्या बॉसला वीस एक मिनिटे काही कस्टमर्सची वाट पाहावी लागली. लंच याच हॉटेलमध्ये घ्यायचा होता म्हणून येथे थांबलेलो होतो. त्याने चक्क आम्हाला उठवले. आता वीस मिनिटांनंतर काही हजारांचे बिल होणार आहे हे माहीत असूनही उठवण्याइतके काही गिर्‍हाईक नव्हते त्याच्याकडे ! मग भांडणे झाल्यावर माफीबिफी मागीतली.

चौकट राजा, तुमच्या लेखाचे टायमिंग भारी आहे, नाहीतर तुमच्या लेखाचे इन्स्पिरेशन असलेल्या कविता च्या लेखाला एवढे प्रतिसाद आले नसते का? Proud

ही पळवाट झाली मंदारराव! क्षमस्व!

बाकी पुण्यातील इन्फ्रास्ट्रक्चर मागासलेले आहे हे कुणीही मान्य करेलच! प्रश्न (म्हणजे मूळ चर्चा प्रस्ताव) पुणेकरांवर जी तमाम जग टीका करते ती योग्य की अयोग्य इतकाच!

इन्फ्रास्ट्रक्चर मागासलेले आहे कारण मानसिकता मागासलेली आहे.
सुरेश कलमाडीने निवडणूक जाहीरनाम्यात "पुण्यातली सार्वजनिक वाहतूक सुधारू" असं लिहीलं होतं, एकातरी पुणेकराने ते पुर्ण न केल्याबद्दल जाब विचारला का? की चालतंय ते चालूदे हीच वृत्ती राहणार?

इन्फ्रास्ट्रक्चर मागासलेले आहे कारण मानसिकता मागासलेली आहे.>>>

हा मात्र विनोद आवडला.

सुरेश कलमाडीने निवडणूक जाहीरनाम्यात "पुण्यातली सार्वजनिक वाहतूक सुधारू" असं लिहीलं होतं, एकातरी पुणेकराने ते पुर्ण न केल्याबद्दल जाब विचारला का? की चालतंय ते चालूदे हीच वृत्ती राहणार>>

अशा वेळेस मुंबईकर काय करतात? ताजवर हल्ला झाला त्याच्या दुसर्‍या दिवशी मुकाट ऑफीसलाच गेले की?

बर चला ताजच्या हल्याचा नाही (की जेथे मला वाटते शासनाला मुंबईकरांनीही जाब विचारण्यासाठी रस्त्यावर यायला हरकत नाही, नुसतेच 'वेनस्डे' सारखे चित्रपट काढण्याऐवजी) पण आदर्श घोटाळा करणारे मुख्यमंत्री तर तिथेच असायचे ना? मग काय केलं मुंबईकरांनी?

अशा वेळेस मुंबईकर काय करतात? ताजवर हल्ला झाला त्याच्या दुसर्‍या दिवशी मुकाट ऑफीसलाच गेले की?
>>> 'सुरेश कलमाडी' आणि 'अजमल कसाब' आपल्यासाठी समान आहेत हे जाणुन मनातुन दुख झाले.

'सुरेश कलमाडी' आणि 'अजमल कसाब' आपल्यासाठी समान आहेत हे जाणुन मनातुन दुख झाले.>>

तसे काहीच नाहीये चातकराव, प्रश्न फक्त नागरिकांच्या मानसिकतेचा व जागरूकतेचा चाललेला होता म्हणून विचारले.

अर्थातच कलमाडी व कसाब यांच्यातील फरक खूपच आहे.

Pages