अन्नं वै प्राणा: (८) - (१)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ওগো, তুমি কোথা যাও কোন্‌ বিদেশে?
বারেক ভিড়াও তরী কূলেতে এসে।
যেয়ো যেথা যেতে চাও,
যারে খুশি তারে দাও—
শুধু তুমি নিয়ে যাও
ক্ষণিক হেসে
আমার সোনার ধান কূলেতে এসে॥ - সোনার তরী (রবীন্দ্রনাথ ঠাকুর)

Oh to what foreign land do you sail?
Come to the bank and moor your boat for a while.
Go where you want to, give where you care to,
But come to the bank a moment, show your smile -
Take away my golden paddy when you sail. - The Golden Boat (Rabindranath Tagore)

tagorepaintings.jpg

दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर गेलं की मला नेहमीच भरून येतं. रवींद्रनाथ ठाकूरांची काही चित्रं इथे मांडली आहेत. अतिशय सुरेख अशी ही चित्रं आहेत. या संग्रहातली काही चित्रं दृक्-प्रत्ययवादी आहेत, तर काही चित्रांवर जर्मन एक्स्प्रेशनिझ्माचा प्रभाव आहे. बहुतेक चित्रांमध्ये राखाडी, पिवळा, निळा हे रंग वापरले आहेत. रवींद्रनाथांना लाल रंग ओळखता येत नसे, त्यामुळे हा रंग या चित्रांत दिसत नाही. पिवळा रंग रवींद्रनाथांचा आवडता. त्यांच्या आवडत्या पद्मा नदीच्या काठी बसून ते सभोवताली पसरलेली पिवळी फुलं बघत बसत. पण या चित्रांमधला पिवळा रंग कुठल्याशा दु:खाची जाणीव करून देतो. चित्रांमधल्या स्त्रीचे डोळेही आनंदी नाहीत. कादंबरीदेवींचे ते डोळे असतील का? बहुधा असावेत.

स्मृतीच्या पटलावरची चित्रं अमीट असतात, त्यांतले रंग चित्रकाराचे स्वत:चे असतात, असं रवींद्रनाथ म्हणायचे. एका फार मोठ्या, विस्तारलेल्या अशा कुटुंबात रवींद्रनाथ वाढले. त्यांच्या लहानपणीच आईचं निधन झालं. वडील आणि मोठे भाऊ त्यांच्या कामांत अतिशय व्यग्र. अंतरमहालात जायची परवानगी नव्हती. त्यांचा सांभाळ मग नोकरांनीच केला. इतर कुटुंबाशी फारसा संबंध येतच नसे. ठाकूरबाडीतले ते चाकर मात्र सहृदय नव्हते. लहान मुलाला सांभाळायची कटकट नको, म्हणून ते खडूनं एक वर्तुळ आखत आणि त्यात रवींद्रनाथांना उभं करत. ते वर्तुळ ओलांडून बाहेर जाण्याची त्यांना परवानगी नव्हती. रात्री आपल्या भल्यामोठ्या खोलीत अंधुक प्रकाशात ते भिंतीवरच्या भेगांमधून आकृत्या शोधत राहायचे. कल्पनेतल्या कुंचल्यानं भिंतीवर चित्रं काढायचे. तारुण्यात रवींद्रनाथांनी त्यांना बंदिस्त करणारं ते वर्तुळ ओलांडलं. विचारांवर बंधनं कधीच नव्हती, पण आता ते पूर्णार्थानं मुक्त झाले होते. ते जगभरात फिरले. देशोदेशीच्या विचारवंतांना, कलावंतांना भेटले. जे आवडलं, योग्य वाटलं ते घेतलं. हे सारं त्यांच्या लिखाणात उतरलं. भाषणांत उतरलं. चित्रं काढायला मात्र त्यांनी वयाच्या साठीनंतर सुरुवात केली. पुरबी लिहीत असताना हस्तलिखितांचं मुद्रितशोधन करताना केलेल्या खुणा त्यांनी रेषांनी जोडल्या, आणि त्यातून एक चित्र तयार झालं. शब्दांमधून जे व्यक्त करता येत नाही, ते व्यक्त करायला मग त्यांना एक नवीनच माध्यम सापडलं. जवळजवळ साडेतीन हजार चित्रं त्यांनी रेखाटली. त्यांचे विचार जसे वेगळे होते, तशी चित्रकलेची शैलीही वेगळी होती. त्यांच्या काही चित्रांच्या शैलींवर पाश्चात्य प्रभाव असला, तरी रंग वापरण्याची पद्धत पूर्णपणे देशी होती. त्या फटकार्‍यांमध्ये एक लय होती. रवींद्रनाथांच्या चित्रांजवळ मांडलेल्या कालिघाट शैलीतल्या, किंवा अवनींद्रनाथ ठाकूर, गगनेंद्रनाथ ठाकूर यांच्या चित्रांमध्येही अशीच एक लय आहे. पहिल्या मजल्यावरची ही सगळी चित्रं आधुनिक चित्रकलेशी नातं सांगतात, भारतीय परंपरेशी नाळ न तोडता.

rabi-avani.jpgरवींद्रनाथांनी अनेक युरोपीय विचारांचा स्वीकार केला, पण भारतीय संस्कृतीला कधी त्याज्य मानलं नाही. भारतीय परंपराही त्यांनी अंगिकारल्या. 'ईस्ट इज ईस्ट, वेस्ट इज वेस्ट' हे किपलिंगचं म्हणणं त्यांना अमान्य होतं. पूर्व आणि पश्चिम यांचा मिलाफ करण्याच्या प्रयत्नांत ते सतत असत. किंबहुना उत्तम, निर्मळ आणि विवेकशील अशी तत्त्वं त्यांनी कायम स्वीकारली. इंग्रजांच्या आगमनानंतर युरोपीय चित्रशैलीचा फार मोठा प्रभाव भारतीय चित्रकलेवर पडला होता. तीच शैली सर्वोत्तम असा भारतीयांचा समज होता. त्यामुळे प्रत्येक चित्रकार राजा रविवर्म्याचं अनुकरण करण्याच्या प्रयत्नात असे. अवनींद्रनाथांच्या नेतृत्वाखाली अनेक चित्रकारांनी हे अंधानुकरण नाकारलं. भारतीय मुशीतली आधुनिक चित्रशैली त्यांनी जन्माला घातली. रवींद्रनाथांचाही या चळवळीत सहभाग होता. जे चित्रकलेत घडलं तेच बंगालात इतर अनेक क्षेत्रांमध्ये घडून आलं, आणि त्यात रवींद्रनाथांच्या विवेकी विचारांचा फार मोठा वाटा होता. अवनींद्रनाथांनी रवींद्रनाथांना बाउलाच्या रूपात चितारलं आहे. मुक्त विचाराच्या, प्रेमाचा संदेश देणार्‍या बाउलांना समाजात हीन लेखलं जाई. रवींद्रनाथांनी बाऊलगीतांच्या अस्सल भारतीय परंपरेचं ऋण मान्य केलं. आपल्या कवितांवर, गीतांवर असलेला बाऊलगीतांचा प्रभाव स्पष्ट करत त्यांना भद्रलोकात मानाचं स्थान मिळवून दिलं. बंगालातल्या पुनरुत्थानाच्या चळवळीतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता.

एकोणिसाव्या शतकात बंगालात नवतेचं वारं वाहू लागलं. एका फार मोठ्या बदलाची ती सुरुवात होती. स्वतंत्र प्रज्ञेच्या एका विचारवंतानं प्राचीन रूढींचं पालन करणार्‍या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न केला. विचारांची निर्भयता बाळगणार्‍या त्या समाजपुरुषाचं नाव होतं राजा राममोहन रॉय. आपल्या क्रांतिकारी विचारांमुळं त्यांनी सनातनी बंगालात चांगलीच खळबळ उडवली. जातिवादाचा निषेध, सतीप्रथाबंदीची, स्त्रियांना मालमत्तेच्या हक्काची मागणी, हुंड्याला विरोध यांमुळे राजा राममोहन रॉय टीकेचे मानकरी ठरले. त्यांनी निवडलेला मार्ग खडतर होता खरा, पण त्यांना जीवाभावाची साथ दिली प्रिन्स द्वारकानाथ ठाकूर यांनी. कोलकात्याच्या जोडाशांको भागातल्या ठाकूरबाडीत राहणारे प्रिन्स द्वारकानाथ जमीनदार होते. उद्योगपतीही होते. पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांच्या घरातल्या स्त्रियाही विलक्षण होत्या. अतिशय बुद्धिमान आणि स्वतंत्र बाण्याच्या. या स्त्रिया इंग्रजांच्या मेजवान्यांमध्ये सामील होत. स्वयंपाकघराच्या बाहेर पडण्याचीही ज्या काळात परवानगी नव्हती, समुद्र ओलांडणं तर निषिद्ध होतंच, त्या काळात ठाकूर कुटुंबातल्या स्त्रिया इंग्लंडला जाऊन आल्या होत्या. बंगालातल्या पुनरुत्थानाची ही सुरुवात. राजा राममोहन रॉय आणि द्वारकानाथ ठाकूरांचा आदर्श समोर ठेवत माणसाचं स्वतंत्र अस्तित्व नाकारणार्‍या अन्याय्य रुढींविरुद्ध बांगला विचारवंत उभे ठाकले, आणि समाजपरिवर्तनाचं पर्व सुरू झालं. या चळवळीत आपलं योगदान दिलं इश्वरचंद्र विद्यासागर, मायकल मधुसुदन दत्त, जगदीशचंद्र बसू, मेघनाद सहा, सत्येन्द्रनाथ बसू आणि अर्थातच ठाकूर कुटुंबियांनी. या समाजधुरिणांमुळे बंगालात भारतीय उद्योगधंदे उभे राहिले, कलामहाविद्यालयं स्थापन केली गेली, वैज्ञानिक संस्था सुरू झाल्या. मुली शिकू लागल्या, बालविवाह कमी झाले.

पुनरुत्थानाच्या याच काळात कोलकात्याच्या नवीनचंद्र दासांनी आणि त्यांच्या मुलांनी एक फार मोठं काम करून दाखवलं. प्रयोगशील आणि उद्यमशील वृत्तीचा वस्तुपाठ या कुटुंबानं घालून दिला. नवीनचंद्र दास मोइरा होते. कोलकात्यात त्यांचं मिठाईचं दुकान होतं. बाउलांप्रमाणेच बंगालात हलवायांना, म्हणजे मोइरांना, हलकं लेखलं जाई. त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करण्यास कोणी उत्सुक नसे. ही परिस्थिती बदलायला, बंगालात आणि भारतभरात बंगाली हलवायांना आणि त्यांच्या मिठायांना मानाचं स्थान निर्माण करून द्यायला कारणीभूत ठरले ते नवीनचंद्र दास, आणि त्यांचं कुटुंब. रसगुल्ला, रसमलाई, वेगवेगळ्या प्रकारचे संदेश आणि इतर अनेक मिठाया सर्वप्रथम तयार करण्याचं श्रेय या कुटुंबाकडे जातं. केवळ नव्या मिठाया तयार करूनच या कुटुंबानं समाधान मानलं नाही. मिठाया तयार करण्यासाठी त्यांनी यांत्रिक पद्धत वापरली. निर्वातीकरण केलेल्या डब्यांत मिठाया भरण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलं. पॅकेजिंगच्या नव्या पद्धती अमलात आणल्या. त्यासाठी अत्याधुनिक तंत्र वापरलं. तेही पूर्णपणे भारतीय. पारतंत्र्याच्या काळात एका छोट्याशा दुकानाचं रूपांतर या कुटुंबानं एका मोठ्या उद्योगात केलं. शिवाय हे सगळं आपल्यापुरतं मर्यादित राहू दिलं नाही. अनेक हलवायांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. बंगाली मिठाया देशभर, किंबहुना जगात सर्वत्र पोहोचवल्या. बंगाली पुनरुत्थानाच्या कथेतला काहीसा दुर्लक्षित राहिलेला हा एक महत्त्वाचा अध्याय आहे.

नवीनचंद्र दासांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात १८४५ साली झाला. त्यांचे पूर्वज साखरेचे मोठे व्यापारी. समाजात या कुटुंबाला मोठी प्रतिष्ठा होती. भद्रलोकांत गणना होत असे. हे कुटुंब मूळचं बरद्वानचं. सतराव्या शतकात ही मंडळी कधीतरी कोलकात्याला स्थायिक झाली होती. बागबाजारात गंगा नदीच्या काठी दास कुटुंबाचा मोठा वाडा होता.

navinchandradas.jpg

नवीनचंद्र दासांच्या नशिबात मात्र हे वैभव नव्हतं. त्यांच्या जन्माच्या तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. काकांनी त्यांच्या आईला वाड्याबाहेर हाकललं नाही इतकंच. नवीनचंद्र त्या वाड्यात आश्रितासारखे वाढले. विसाव्या वर्षी त्यांना त्यांच्या काकांनी बागबाजारात जमिनीचा एक छोटा तुकडा नावे करून दिला, आणि नवीनचंद्र आपल्या आईबरोबर त्या घरातून बाहेर पडले. कॉलेजात जाऊन शिक्षण पूर्ण करणं शक्य नव्हतं, कारण पैसा नव्हता. मिळालेली जमीन कसली तरी त्यातून उत्पन्न मिळण्यासारखं नव्हतं. नवीनचंद्रांचे एक लांबचे मामा मोइरा होते. या मामांबरोबर त्यांनी कोलकात्याच्या जोडाशांको भागात मिठाईचं दुकान सुरू करावं, असं त्यांच्या आईनं सुचवलं. मामाला व्यवहाराचा गंध नव्हता, आणि हे दुकानही मोडीत निघालं. ही १८६४ सालची गोष्ट. पुढे दोन वर्षांनी अनेक ठिकाणांहून कर्ज घेऊन बागबाजारात त्यांनी नवं दुकान उघडलं. त्या काळी दुकानांत मिळणार्‍या मिठाया म्हणजे दोनतीन प्रकारचे संदेश किंवा जिलबी, लवंगलतिका यांसारख्या बेसनाच्या आणि खव्याच्या मिठाया. सणासुदीला घरी केले जाणारे गोड पदार्थ दुकानांमधून विकण्याची आणि विकत घेण्याची फ्याशन नव्हती. त्यात परत रोखीचा व्यवहार चालत नसे. ग्राहकानं मिठाई विकत घेतल्यावर त्यानं लगेच पैसे दिलेच पाहिजेत, असं काही बंधन नव्हतं. पुढे कधीतरी पैसे चुकते केले जात. नवीनचंद्र मुखदुर्बळ. ग्राहकाला पैसे मागायचे कसे? त्यामुळे या दुकानाचीही बुडण्याच्या दिशेनं अगदी दमदार वाटचाल सुरू होती. मालक मिठाईचे पैसे मागत नाही हे कळल्यावर रिकामटेकडे तरुण आणि ज्येष्ठ नागरीक नवीनचंद्रांच्या दुकानात अड्डा जमवायला लागले. त्याकाळी मिठाईसाठी शीतकपाटं नव्हती. शिवाय पारंपरिक मिठाया लगेच खराब होत. सकाळी केलेली मिठाई रात्री खाण्यायोग्य राहत नसे. दुकान बंद करण्याआधी उरलेली मिठाई नवीनचंद्र या भुतावळीला देऊन टाकत. त्यामुळे संध्याकाळी दुकानाबाहेर भरपूर गर्दी असे.

एकदा या गर्दीतले एक आजोबा तोंडात संदेशाचा तुकडा टाकत नवीनचंद्रांना म्हणाले, "मुला, सकाळची मिठाई रात्री खाण्यात काही मजा नाही. हा संदेश बघ. सकाळी इतका मऊसूत, आणि आता निव्वळ भुगा. हे काही खरं नाही. मिठाई कशी कधीही तोंडात टाकताक्षणी विरघळायला हवी. बघ काही करता आलं तर". दुकान चालत नव्हतंच. नवीनचंद्रांनी त्या आजोबांच्या मुखी संदेशाचा भुगा लागू नये, म्हणून प्रयोग सुरू केले. संदेश तयार करण्यासाठी साखर आणि छाना कढईत एकत्र परतत. त्याऐवजी छाना साखरेच्या गरम पाकात टाकला तर? पाकात टाकल्यावर छाना पाकात विरघळला. आता काय करावं? छाना वेगळ्या पद्धतीनं तयार केला तर? हुगळी नदीच्या काठी राहणारे पोर्तुगीज दुकानदार छाना तयार करण्यासाठी व्हिनेगर वापरत, आणि छाना तयार झाल्यावर त्यातलं सगळं पाणी काढून टाकत. नवीनचंद्रांनी युरोपीय पद्धतीनं छाना तयार करून बघितला. पण तरीही छान्याची तीच गत. या छान्याला घट्ट बांधून ठेवणारं काहीतरी हवं होतं. त्यांनी तांदळाचं पीठ वापरून बघितलं. पण तरीही छान्यानं बंड पुकारलं. मग नवीनचंद्रांना आठवलं, कोलकात्यातले युरोपीय लहान मुलांना, वृद्धांना एका झाडाच्या मुळाच्या पावडरीची लापशी देत. दुसर्‍या दिवशी त्यांनी दुकानातून आरारोटाची पावडर आणली, आणि छान्यात मिसळली. साखरेचा पाक केला, आणि त्यात छान्याचे गोळे उकळले. यावेळी आरारोटाच्या कृपेनं छाना पाकात विरघळला नाही. नवीनचंद्र आनंदले. पण या मिठाईला काय नाव द्यावं बरं? हा काही संदेश नव्हता. ही नवीनच मिठाई होती. रसातल्या या शुभ्र गोळ्यांना त्यांनी नाव दिलं रसगोला. रसातले गोळे.

rasagulla1.jpg

ही नवीन मिठाई तयार करूनही नवीनचंद्रांच्या व्यवसायात फार काही फरक पडला नाही. आजूबाजूला सगळेच फुकटे. शिवाय मिठाई विकत घेऊ शकणारे श्रीमंत काही या दुकानाकडे फिरकत नसत. नवीनचंद्र मात्र रोज थोडे रसगुल्ले दुकानात विकायला ठेवत. हे रसगुल्ले फार लवकर खराब होत नाहीत, हेही त्यांच्या लक्षात आलं होतं. एक दिवस सकाळी एक मोठ्ठी घोडागाडी दुकानासमोर उभी राहिली. गाडीतून रायबहादूर भगवानदास बागला आपल्या लहान मुलासह उतरले. बागलाशेठ रंगूनचे अतिश्रीमंत व्यापारी. कामानिमित्त वरचे वर कोलकात्याला येत. एका नातलगाला भेटायला जाताना त्यांच्या लहान मुलाला तहान लागली म्हणून ते नवीनचंद्रांच्या दुकानात आले. नवीनचंद्रांनी मुलाला पाणी दिलं, आणि नुसतं पाणी द्यायची पद्धत नाही, म्हणून हाती एक रसगुल्लाही दिला. बागलाशेठांच्या चिरंजीवांना ही मिठाई भारी आवडली म्हणून बागलाशेठांनीही मिठाई चाखून पाहिली. त्यांनाही रसगुल्ले आवडलेच. त्यांनी तिथल्या तिथे दुकानातले सारे रसगुल्ले विकत घेतले. महिनाभरातच बागलाशेठांच्या कृपेनं कोलकात्यातल्या श्रीमंत बंगाली आणि युरोपीय घरांत नवीनचंद्रांचे रसगुल्ले रोज विकत घेतले जाऊ लागले. दुकानाबाहेरचा अड्डा मग लवकरच बंद झाला, आणि कोलकात्यात नवीनचंद्रांचं दुकान रसगुल्ल्यांच्या कृपेनं धडाक्यात चालू लागलं. पुढे मागणी वाढली तसं नवीनचंद्र मातीच्या मडक्यांमध्ये रसगुल्ले विकू लागले. त्यांनी इतर हलवायांनाही रसगुल्ले तयार करायला शिकवलं. कोलकात्याचं नाव रसगुल्ल्यांबरोबर कायमचं जोडलं गेलं. नवीनचंद्रांच्या प्रयोगशीलतेचीही कोलकात्यातल्या भद्रलोकानं दखल घेतली. त्यांना रसगुल्ल्याचा कोलंबस अशी पदवी मिळाली. बागबाजारेर नोबिनदास, रोसोगोल्लेर कोलंबस असा त्यांचा गौरव केला गेला.

पण या कोलंबस म्हणण्यामागेही एक गंमत होती. कोलंबसानं अमेरिका शोधली. तो निघाला होता भारताच्या शोधात, पण पोहोचला अमेरिकेला. आणि तिथल्या मूळ रहिवाशांना तर अमेरिका अगोदरच ठाऊक होती. तिथे ते अनेक शतकांपासून राहत होते. नवीनचंद्रांच्या रसगुल्ल्यांच्या बाबतीतही तेच झालं. त्यांना करायचा होता संदेश, केला रसगुल्ला. शिवाय रसगुल्ला हा काही नवीन पदार्थ नाही, असं काहींचं म्हणणं होतं. त्यात थोडं तथ्यही होतं, कारण रसगुल्ल्यांशी खूप साम्य असणारा खीरमोहन हा पदार्थ अनेक शतकांपासून उडिशात आणि दक्षिण भारतात सणासुदीला आणि नैवेद्यासाठी केला जात होता. बंगाली भारी हुशार. त्यांनी नवीनचंद्रांचं कर्तृत्व मान्य केलं, पण ’तुम्ही काही हा पदार्थ करणारे पहिले नाही’, याचीही जाणीव करून दिली. नवीनचंद्रांनी मात्र आपली कोलंबस ही पदवी अभिमानानं मिरवली.

rosogolla2.jpg

उत्तरेतल्या आर्यांनी गायीला देव मानलं होतं. गाय पवित्र म्हणून गायीचं दूधही पवित्र. या दुधाला अपवित्र करणं अयोग्य. त्यामुळे दूध नासवणं ही प्रक्रिया अपवित्रच समजली जाई. दक्षिणेत मात्र असे काही समज नव्हते. दूध नासवून तयार केलेले गोड पदार्थ दक्षिण भारतात भलतेच लोकप्रिय होते. या मिठायांसाठी लागणारा छाना तयार करण्यासाठी दह्याची निवळी (व्हे) वापरली जाई. व्यापारानिमित्त येणार्‍या पर्शियनांकडून दाक्षिणात्यांनी ही पद्धत उचलली होती. पर्शियात पनीर भाज्यांबरोबर वापरलं जाई. दक्षिण भारतात मात्र छान्याचा वापर मिठायांसाठीच होत होता. बाराव्या शतकात सोमेश्वरानं रचलेल्या मानसोल्लास या ग्रंथात दूध नासवून केलेल्या मिठाईचं वर्णन आहे. उकळत्या दुधात दह्याची निवळी घालून दूध नासवायचं, या छान्यात तांदळाचं पीठ घालून वेगवेगळे आकार द्यायचे आणि गरम साखरेच्या पाकात सोडायचे. क्षीरप्रकार असं या मिठाईचं नाव. रसगुल्ल्याची प्राथमिक आवृत्ती. मानसोल्लासातल्या उल्लेखानुसार ही मिठाई राजवाड्यात अत्यंत आवडीनं खाल्ली जाई, आणि म्हणून नेहमीच केली जात असे. चालुक्यांचा कलिंगदेशाशी, म्हणजे उडिशाशी घनिष्ठ संबंध होता. उडिशातही ही मिठाई साहजिकच लोकप्रिय झाली. तिथे तिला नाव मिळालं खीरमोहन. फरक इतकाच की उडिशात तांदळाच्या पिठाऐवजी रवा वापरत. पुरीच्या जगन्नाथाला खीरमोहनाचा नैवेद्य दाखवला जाई. संपूर्ण उडिशात ही मिठाई तयार करणारी अनेक कुटुंबं होती. छान्यापासून छेनापोडा, छेनापुळी अशा अनेक मिठाया नंतर उडिया हलवायांनी तयार केल्या.

सतराव्या शतकात अनेक पोर्तुगीज बंगालात स्थायिक झाले. यांपैकी बहुतेक कुटुंबं हुगळी नदीच्या काठी, कालिकात्याजवळ राहायला आली. सत्ता हाती नसल्यानं व्यापारही या मंडळींच्या हाती नव्हता. त्यामुळे पोट भरण्यासाठी बंगालातल्या इंग्रज आणि डच वखारींसाठी ब्रेड तयार करण्याचं काम या पोर्तुगीज कुटुंबांनी सुरू केलं. शिवाय लिंबू, कैरी, आवळा, आलं यांची लोणचीही विकायला त्यांनी सुरुवात केली. ही लोणची तयार करताना व्हिनेगर वापरलं जाई. हेच व्हिनेगर वापरून पनीरही तयार केलं जात असे. पोर्तुगिजांना चीझ अतिशय प्रिय. पण पोर्तुगालमध्ये तयार होतं तसं चीझ भारतात कुठे मिळणार आणि कसं तयार करणार? पनीर हा त्यासाठी सर्वांत जवळचा पर्याय. गायीच्या दुधाला पवित्र मानणार्‍या बंगाल्यांनीही मग दूध नासवून छाना तयार करायला सुरुवात केली. संदेश करण्यासाठी या छान्याचा वापर होऊ लागला. त्यापूर्वी संदेश खव्यापासून केला जात असे. खवा आणि साखर एकत्र करून मंद आचेवर भाजत आणि त्याला वेगवेगळे आकार देत. कोणी एखादी चांगली बातमी घेऊन घरी आलं की हातावर ही मिठाई ठेवली जाई. म्हणून तिचं नाव संदेश. दक्षिणेत या मिठाईचं नाव शर्करपाक. मानसोल्लास आणि शिवतत्त्वरत्नाकर या दोन्ही ग्रंथांत तिचे उल्लेख आहेतच. खीरमोहनाप्रमाणेच ही मिठाईसुद्धा उडिशामार्गे बंगालात पोहोचली असावी. पुढे बंगालातली वस्ती वाढली, कोलकात्यातला श्रीमंत वर्ग वाढला आणि उडिशातले स्वयंपाकी बंगाली घरांत रांधू लागले. या उडिया स्वयंपाक्यांनी छान्याच्या मिठाया बंगालात आणल्या. लोकांना त्या आवडल्या तरी नैवेद्यासाठी त्या निषिद्ध होत्या. कारण तेच. पवित्र गायीचं पवित्र दूध नासवलेलं देवाला आवडणार नाही. नैवेद्य न दाखवता काही खाणं हे पाप असल्यामुळे छान्याच्या मिठायाही सहसा घरी केल्या जात नसत. kheermohan.jpg बंगाली मोइरांनी मात्र छान्याचा संदेश तयार करण्यासाठी वापर सुरू केला. उडिया स्वयंपाक्यांच्या हातचे खीरमोहन खाल्लेल्या बंगाल्यांनी नवीनचंद्रांना कोलंबस ही पदवी दिली. पण रसगुल्ल्यांमध्ये आणि खीरमोहनात बरेच फरकही आहेत. रसगुल्ल्यांसाठी छाना तयार करण्याची नवीनचंद्रांची पद्धत वेगळी होती. त्यांनी व्हिनेगर वापरलं होतं, आणि त्यामुळे छान्याला जरा कडकपणा येतो. तो टिकतोही अधिक. तांदळाचं पीठ किंवा रवा न वापरता त्यांनी आरारोट वापरलं होतं. शिवाय छान्याचे गोळे त्यांनी जरा जास्त तापमानावर पाकात शिजवले होते. त्यामुळे रसगुल्ले काहीसे स्पंजाप्रमाणे असत. टिकतही जास्त. खीरमोहन मात्र लवकर खराब होत. अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे रसगुल्ल्यांमध्ये पाक भरपूर असतो. खीरमोहन मात्र पाकात डुंबत नसतात. नवीनचंद्रांनी तयार केलेले रसगुल्ले हे म्हणूनच उडिया खीरमोहनापेक्षा वेगळे होते. पुढे नवीनचंद्रांनी आपल्या दुकानात उडिया पद्धतीचे खीरमोहनही विक्रीस ठेवले, आणि उडिया हलवाई रसगुल्ले बनवू लागले. बिकलानंद कारांसारखे प्रसिद्ध उडिया हलवाईही खीरमोहनांऐवजी रसगोले बनवू लागले.

रसगुल्ले कोलकात्यात लोकप्रिय झाले तरी अजून नवीनचंद्रांना हवा तसा संदेश तयार करता आला नव्हता. त्या काळी बंगालात दोन प्रकारचे संदेश प्रचलित होते. कडापाक (कडक) आणि कांचापाक (मऊ आणि रवाळ). sondesh.jpg विशिष्ट तापमानावर छाना परतल्यास तो रवाळ आणि कडक, कोरडा होत नाही, हे नवीनचंद्रांच्या लक्षात आलं आणि बर्‍याच प्रयोगांती त्यांनी या दोहोंपेक्षा निराळा असा संदेश तयार केला. नाव दिलं कस्तुरा. हा संदेश मऊ होता, पण रवाळ नव्हता. शिवाय तो लवकर कोरडाही पडत नसे. पुढे त्यांनी संदेश करताना त्यात फळांचा गर वापरून पाहिला. सीताफळाचा गर घालून केलेला आता संदेश, आमरस घालून केलेला आमभरा संदेश आणि फणसाचे गरे घालून केलेला कठहल संदेश तुफान लोकप्रिय झाले. या मिठायांना आकारही त्याच फळांचे दिले होते. रसगुल्ले करताना काही गोळे तुटत. असे तुकडे दाट आटवलेल्या दुधात घालून, सुका मेवा पेरून नंतर नवीनचंद्रांनी वैकुंठभोग हा संदेशाचा नवा प्रकार तयार केला. देवांच्या दरबारातच खायला मिळतील अशा या निरनिराळ्या मिठाया खाऊन कोलकातावासी खरोखर वेडावले होते. या मिठाया रोज आपल्या सेवकांमार्फत विकत नेणारे असंख्य होते. अगदी जोडाशांकोतल्या ठाकूरबाडीतही रोज रसगुल्ले पोहोचते केले जात. रसगुल्ले नवीनचंद्रांच्या दुकानातले आहेत किंवा नाहीत, हे रवींद्रनाथ नुसत्या चवीवरून ओळखत. त्या वेळी नव्यानंच स्थापन झालेल्या रामकृष्ण मिशनातले स्वामीही या मिठायांचे चाहते होते. "नवीनचंद्रांच्या मिठायांनी आम्हां सर्वांच्या जिभांना गुलाम केलं आहे", असं स्वामी विवेकानंदांचे गुरूबंधू आणि रामकृष्ण मिशनाचे पहिले प्रमुख स्वामी ब्रह्मानंद एकदा म्हणाले होते. शारदामाँनाही संदेश अतिशय आवडत. म्हणून आजही कोलकात्यातल्या दुकानातून त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी बेलूरमठात संदेश पाठवला जातो.

kcdas.jpgकृष्णचंद्र दास हे नवीनचंद्रांचे चिरंजीव. १८६९ साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासूनच त्यांनी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली होती. नवीन मिठाया तयार करण्यासाठीचे असंख्य प्रयोग हे बापलेक आपल्या दुकानात करत असत. वडिलांच्या तालमीत तयार झालेल्या कृष्णचंद्रांनी बंगाली मिठाया भारतभरात पोहोचवल्या. मोठ्या प्रमाणात या मिठाया तयार करण्यासाठी त्यांनी नवनवीन यंत्रं शोधली. मिठाया कमी वेळात तयार व्हाव्यात, गुणवत्ता राखली जावी या हेतूनं त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. १९२५ साली नवीनचंद्रांचं निधन झालं, आणि व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी कृष्णचंद्रांच्या खांद्यावर आली. वडिलांनी उभा केलेला व्यवसाय वाढवणं आवश्यक होतं, शिवाय ज्या प्रयोगशीलतेसाठी दास कुटुंब प्रसिद्ध होतं, तिचाच वापर करून बंगाली मिठाया देशभरात लोकप्रिय करण्याचीही त्यांची इच्छा होती. मात्र हे करणं सोपं नाही, याची त्यांना जाणीव होती. परिस्थिती फार झपाट्यानं बदलली होती. rasmalai.jpg१९११ साली भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलली होती. त्यानंतर तीन वर्षांनी पहिलं महायुद्ध सुरू झालं. या दोन घटनांमुळे कोलकात्याची अर्थव्यवस्था बरीच कमकुवत झाली. लोकांची क्रयशक्ती घटली. शिवाय अनेक धनाढ्यांनी दिल्लीला मुक्काम हलवला होता. अनेक युरोपीयही कोलकात्याहून दिल्लीस गेले होते. नवीनचंद्रांच्या मृत्यूनंतर व्यवसाय हाती आल्यावर कृष्णचंद्रांनी आपल्या व्यवसायाचा पुन्हा एकदा आढावा घेतला. रसगुल्ला, संदेश या मिठायांची विक्री पूर्वीप्रमाणेच जोरात सुरू होती, पण धंदा वाढायलाही हवा होता. कोलकात्यात महायुद्धानंतर अनेक पश्विम व उत्तर भारतीय व्यापारी स्थायिक झाले होते. कोलकाता बंदरावरून होणार्‍या व्यापाराशी बहुतेकांचा संबंध होता. या मंडळींना रसगुल्ला, संदेश या मिठाया फारशा आवडत नसत. गुलाबजाम, लवंगलतिका, जिलबी, रबडी या त्यांच्या आवडत्या मिठाया. त्यातही रबडी, खीर यांना अधिक पसंती. यांपैकी पहिल्या तीन मिठाया कृष्णचंद्र आपल्या दुकानात ठेवत असत. रबडीचा वापर करून एखादी मिठाई करता येईल का, याचा त्यांनी विचार करायला सुरुवात केली. मिठाईत दूध असावं, पण तिचं स्वरूप मात्र खास बंगाली असावं. रसगुल्ल्याचे जनक ही ओळखही या नव्या मिठाईत जपली जावी. त्यातूनच तयार झाली रसमलाई. रसगुल्ले आणि फार दाट नसलेली रबडी वापरून कृष्णचंद्रांनी ही मिठाई तयार केली. रिव्हर्स ऑस्मॉसिसचा सिद्धांत कृष्णचंद्रांनी ही मिठाई करताना वापरला होता. नंतर रबडीऐवजी दाटसर दूध वापरलं जाऊ लागलं. या नव्या मिठाईचं ग्राहकांनी जोरदार स्वागत केलं. विशेषत: उत्तर भारतीयांना ही मिठाई अतिशय आवडली. कृष्णचंद्र मग एक महत्त्वाची समस्या सोडवण्याच्या मागे लागले.

पहिल्या महायुद्धाच्या काळात अन्नपदार्थांची टंचाई होती. या काळात इंग्रजांचा बचाव केला होता तो डबाबंद खाद्यपदार्थांनी. rosogollatins.jpg दुग्धजन्य पदार्थही डब्यात विकत मिळत असलेले कृष्णचंद्रांनी पाहिले होते. असे डबाबंद पदार्थ भारतीयांना न मिळाल्यानं त्यांचे झालेले हालही त्यांना चांगलेच लक्षात होते. यापुढे जर असं एखादं युद्ध परत झालं तर डबाबंद पदार्थांमुळेच तग धरता येईल, याची त्यांना खात्री होती. महायुद्ध संपून दहा वर्षं झाल्यानंतर असे खाद्यपदार्थ आता बाजारात मिळू लागले होते. युरोपातून ते भारतात आयात केले जात. पण त्यांच्या किमती युरोपीयांना किंवा अतिश्रीमंत भारतीयांनाच परवडतील अशा होत्या. शिवाय हे सगळे पदार्थ युरोपीय होते. निर्वातीकरण करून पदार्थ डबाबंद करण्याचं तंत्रज्ञान भारतात उपलब्ध नव्हतं. त्यामुळे भारतीय पदार्थही डब्यांत मिळत नसत. हे तंत्र भारतात वापरल्यास डबाबंद पदार्थांची किंमत खूप कमी झाली असती, शिवाय सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे रसगुल्ल्यांसारखे भारतीय पदार्थ डब्यांतून विकता आले असते. आपल्या वडिलांनी शोधलेली खास मिठाई कोलकात्याबाहेरही विकता यावी, ही कृष्णचंद्रांची इच्छा होती. मातीच्या मडक्यात रसगुल्ले जास्तीत जास्त दोन दिवस टिकत. त्यामुळे कोलकात्याबाहेर कृष्णचंद्रांच्या रसगुल्ल्यांना बाजारपेठ नव्हती. कोलकात्याबाहेर रसगुल्ले पोहोचवण्यासाठी ते डब्यांत विकण्याखेरीज मार्ग नव्हता. या कामी कृष्णचंद्रांनी मदत घेतली शारदाचरण दास या त्यांच्या मुलाची. शारदाचरण दास हे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात संशोधन करत होते. घरच्या व्यवसायाकडेही त्यांचं लक्ष होतंच. संशोधनाची आवड आणि व्यवसायाची निकड या दोहोंतून कृष्णचंद्र आणि शारदाचरण या दोघांनी प्रचंड परिश्रम करून रसगुल्ले डबाबंद करण्याची पद्धत शोधून काढली. माय्यार्ड रिअ‍ॅक्शन टाळण्यासाठी या डब्यांना आतून लाखेचा थर दिला होता. पूर्णपणे स्वदेशी असं हे तंत्रज्ञान होतं. या प्रयोगाचं बरंच कौतुक झालं, आणि खुद्द सुभाषचंद्र बसूंनी कृष्णचंद्रांचं पत्र लिहून अभिनंदन केलं.

डबाबंद रसगुल्ले आणि रसमलाई यांची विक्री वाढावी म्हणून जोडाशांकोमध्ये कृष्णचंद्रांनी १९३० साली एक नवं दुकान सुरू केलं. या दुकानाचं नाव ठेवलं कृष्णचंद्र दास कन्फेक्शनर. जुन्या दुकानात रसगुल्ले आणि संदेश यांचीच विक्री इतकी तडाखेबंद होती की रसमलाई आणि डब्यातल्या रसगुल्ल्यांकडे कोणी लक्ष देत नसे. म्हणून हे नवं दुकान सुरू केलं गेलं. या दुकानातलं एक आकर्षण म्हणजे कृष्णचंद्रांनी स्वत: तयार केलेलं सोडावॉटर मशिन. जोडाशांकोतल्या या दुकानात रसमलाई एका छोट्या वाटीत आधी चाखायला मिळत असे. आवडली तर विकत घ्यायची. दुकानातून रसगुल्ल्याचे डबे मद्रास, बॉम्बे इलाख्यांत पाठवले जात. अनेक युरोपीय सुट्टीसाठी इंग्लंडला, फ्रान्सला जाताना रसगुल्ल्याचे डबे बरोबर नेत. नवीनचंद्रांचा वारसा कृष्णचंद्र आणि शारदाचरण उत्तमप्रकारे चालवत होते.

skdas.jpgशारदाचरण दास हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा खरा ओढा विज्ञानाकडे असला तरी अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना रुची आणि गती होती. १९५६ साली मेलबर्नला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारोत्तोलनाच्या खेळात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. भारतीय सायन्स काँग्रेसचे ते सदस्य होते. जामिनी राय, गोपाळ घोष यांसारख्या चित्रकारांकडून त्यांनी चित्रकलेचे धडे घेतले होते, त्यांची अनेक चित्रंही विकत घेतली होती. सितारा देवी, उदय शंकर, रवीशंकर, काननदेवी यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. दुर्दैवानं भौतिकशास्त्रात संशोधन करण्याचं त्यांचं स्वप्न मात्र अपुरं राहिलं. १९३४ साली कृष्णचंद्रांचं हृदयविकारानं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरेट मिळवण्यासाठीचं संशोधन शारदाचरणांनी अर्धवट सोडलं आणि व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. व्यवसाय तसा तेजीत होता, पण आहे तिथेच थांबण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. १९३५ साली त्यांनी कोलकात्याच्या एस्प्लेनेड भागात दुकानाची नवी शाखा उघडली. युरोपीय दुकानांची नावं छोटी, सुटसुटीत असत, म्हणून या नव्या दुकानाला त्यांनी के. सी. दास असं नाव दिलं. हे दुकान प्रशस्त होतं. ग्राहकांना बसण्यासाठी उत्तम लाकडाच्या टेबलखुर्च्या होत्या. युरोपीय पद्धतीचे गणवेष घातलेले वेटर टेबलावर ऑर्डर घ्यायला येत. शारदाचरणांनी स्वत: जपानहून आणलेल्या नाजूक प्लेटींतून मिठाया दिल्या जात. मिठायांची नावंही सुरेख. रसमंजिरी, रसकदम्ब, शुभदीप, आनंदभोग, अमृतवर्षा, रसमाधुरी ही नावं ऐकताक्षणीच ग्राहकाला प्रसन्न वाटत असे. पुढे युरोपीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी संदेशकेक आणि आइसक्रीम-संदेशही तयार केले. या सगळ्या मिठाया शारदाचरणांनी स्वत: अनेक प्रयोग करून तयार केल्या होत्या, याचंही ग्राहकांना भारी कौतुक होतं. एस्प्लेनेडमधल्या या दुकानानंतर के. सी. दासची कोलकात्याच्या इतर भागांतही दुकानं सुरू झाली. शिवाय कालोजाम, रसमलाई या मिठायाही त्यांनी डब्यांत विकायला सुरुवात केली.

amritkumbha.jpgशारदाचरण केवळ नव्या मिठाया तयार करून थांबले नाहीत. या मिठाया ग्राहकांपर्यंत उत्तमप्रकारे कशा पोहोचवता येतील, याचाही त्यांनी विचार केला. मिठाई त्याकाळी द्रोणांत बांधून दिली जात असे. रसगुल्ले आणि रसमलाईसाठी मडकी वापरली जात. रसकदम्ब, किंवा संदेशसारख्या मिठाया द्रोणांत बांधून देणं शारदाचरणांना योग्य वाटत नव्हतं. या पद्धतीत स्वच्छता राखणं कठीण असे. त्यांनी मग कार्डबोर्डाच्या डब्यांमध्ये मिठाई द्यायला सुरुवात केली. या डब्यांना आतून बटरपेपर लावण्याची कल्पनाही त्यांचीच. नंतर अमृतकुंभसारख्या मिठाया नेहमीच्या डब्यांत कशा बसवायच्या, असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या मिठायांसाठी त्या आकाराचे डबे तयार करून घेतले होते. अमृतकुंभ ही मधुमेह्यांसाठी भारतात तयार केली गेलेली पहिली मिठाई. या मिठाईचा आकारही कलशासारखा होता. नव्या दुकानांचा जम बसल्यानंतर शारदाचरणांनी मिठाई बनवण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिलं. मिठाया करताना स्वच्छता पाळली जावी, ही अर्थातच त्यांची अपेक्षा होती. पण मोठाल्या कढायांमध्ये दूध उकळताना बरेचदा स्वच्छतेची काळजी घेणं कठीण व्हायचं. शिवाय विस्तारणार्‍या धंद्यामुळे प्रचंड प्रमाणात मिठाया तयार कराव्या लागत. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतींना फाटा दिला, आणि स्वयंपाकघराचं यांत्रिकीकरण केलं. चुलींऐवजी बॉयलर वापरले जाऊ लागले. मोठ्या कढयांभोवती नळ्यांमधून वाफ फिरवून दूध उकळलं जाऊ लागलं. शारदाचरणांनी विकसित केलेली ही पद्धत पुढे हल्दीरामसारख्या मोठ्या उद्योगांनी वापरली.

दास कुटुंबातल्या तीन पिढ्यांनी भारतातला मिठाई उद्योग आमूलाग्र बदलला. बंगाली मिठाई हे नामाभिधान त्यांनीच रुजू केलं. जगभरात प्रसिद्ध केलं. डबाबंद पदार्थांचं तंत्रज्ञान विकसित करणं असो, किंवा स्वयंपाकघरांचं यांत्रिकीकरण, दास कुटुंबानं कायम पुढचा विचार करून पावलं उचलली, आणि या प्रयत्नांत गुणवत्तेशी तडजोड केली नाही. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या बंगालात अनेक चळवळी घडल्या, अनेकांनी आपल्या लोकोत्तर कार्यामुळे आपलं नाव अजरामर केलं. दास कुटुंबानं भारतातल्या मिठाई उद्योगात घडवून आणलेली क्रांती मात्र फारशी चर्चिली जात नाही. शारदाचरणांचे नातू श्री. धीमन दास आता हा उद्योग सांभाळतात. त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या कामाचा त्यांना अर्थातच अभिमान आहे. "पण माझ्या खापरपणजोबांनी, पणजोबांनी केलेलं काम, ते कोलकात्यात होते म्हणून करणं शक्य झालं. त्यांच्या काळात मोइरांना वाईट वागणूक देत, पण त्यांची मेहनत बघून तेव्हाचे विद्वान, कवी, राजकारणी त्यांना उत्तेजन देत. रवींद्रनाथ ठाकूर तर अनेकदा आमच्या दुकानात आले आहेत. इंग्रजांनीही आम्हांला उत्तजेन दिलं. तेव्हाचं कोलकाता फार वेगळं होतं. गुणांची, उद्योगशीलतेची कदर करणारे लोक होते. मुख्य म्हणजे कोलकात्यातले धनिक खर्च करायला मागेपुढे पाहत नसत. अशा अनेकांनी माझ्या आजोबांना, पणजोबांना आर्थिक मदत केली होती. लक्ष्मी आणि सरस्वती कोलकात्यात एकत्र नांदत होत्या म्हणून आमच्या उद्योगाची भरभराट झाली. नवीनचंद्र दास कोलकात्यात नसते, तर कदाचित आज के. सी. दासही नसतं. तो काळच वेगळा होता", असं धीमन दास सांगतात.

writersbuilding.jpgसतराव्या शतकात औरंगजेबाच्या सहीचं फर्मान घेऊन जॉब चर्नॉक हुगळीच्या किनारी आला होता. पोर्तुगिजांची तिथे आधीपासूनच वस्ती होती. प्लासीच्या लढाईनंतर बंगाल प्रांत इंग्रजांच्या ताब्यात आला, आणि इंग्रजांनी त्या भागात आपले पाय पसरायला सुरुवात केली. गोविंदपूर, सुतानता आणि कालिकाता अशा तीन गावांमध्ये त्यांची वस्ती एकवटली होती. ही गावं हळूहळू एकत्र होत गेली, आणि ब्रिटिशांनी या नव्या महानगरास, कोलकात्यास, आपली राजधानी केलं. कुठल्याही युरोपीय शहराच्या तोडीस तोड असं हे शहर होतं. त्यामुळे अनेक इंग्रजांना कोलकात्यात परकं वाटत नसे. लंडनप्रमाणेच इथे मोकळी मैदानं होती. थेम्ससारखीच हुगळी नदीही शहराच्या मधोमध वाहत होती. सर्वत्र मसाल्यांचा आणि चहाचा दरवळ होता. इथल्या इमारती भव्य होत्या. निओक्लासिकल शैलीत बांधलेल्या प्रासादांसमोर प्रशस्त बागा असत. लहान इमारतींनाही सफेद रंग दिलेला असे. सरकारी इमारती तर अत्यंत देखण्या. बघताक्षणी राज्यकर्त्यांच्या सामर्थ्याची कल्पना यावी, अशा.

thakubari.jpgयुरोपियांप्रमाणेच अनेक जुनी बांगला कुटुंबंही कोलकात्यात होती. मोठ्याल्या हवेल्यांमध्ये ही कुटुंबं राहत. ठाकूर, देव, दत्त, सेठ ही मुळची गोविंदपूरची कुटुंबं. बागबाजारात त्यांच्या अनेक हवेल्या होत्या. या बांगला कुटुंबांकडे अफाट पैसा होता. युरोपियांशी किंवा युरोपियांबरोबर व्यापार करून हा पैसा त्यांनी कमावला होता. नेमईचरण मलिक यांची त्या काळी एकूण संपत्ती चार कोटी रुपये इतकी होती. त्यांच्या मृत्यू झाला तेव्हा कोलकात्यात त्यांच्या मालकीची नव्वद घरं, आणि तिजोरीत पंचवीस लाख रुपये होते. दागदागिने वेगळेच. त्यांची एक शाल तर इतकी किमती होती की, त्यांच्या आठ मुलांनी त्या शालीचे आठ तुकडे करून वाटून घेतले, असं म्हणतात. ठाकूर कुटुंबही याबाबतीत मागे नव्हतं. एक कोटीची मालमत्ता असलेलं ठाकूर कुटुंब युरोपियांबरोबरच्या व्यापारामुळं चांगलंच वजन राखून होतं. युरोपियांशी व्यापारी संबंध ठेवायचे, पण त्यामुळे भारतीयांवर अन्याय होऊ द्यायचा नाही, असं एकंदरीत ठाकूरांचं धोरण होतं. ठाकूरबाडीत अनेक युरोपीय चीजवस्तू होत्या. एक मोठा पियानो होता. उंची गालिचे होते. व्हिएन्नाहून आणलेली झुंबरं होती. मेजवान्यांच्या प्रसंगी उंची क्रोकरी वापरली जाई. युरोपियांना आवडेल असाच बेत असे. मेयोनेज द सॉमाँ, पुले पिके रोती ए लाँग, पाते द फुआ ग्रा आँ बेलव्ह्यू, बिन्योलिया आ ला क्रेम, गातो फांतासि असे पदार्थ मेजवानीत असत. हे सगळं वैभव बघून युरोपीयही चकित होत.

कारखान्यांमध्ये, बंदरात काम करणार्‍या मजूरांच्या हिताचं रक्षण व्हावं, म्हणून १८५१ साली ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापन केली गेली होती. देवेंद्रनाथ ठाकूर या संस्थेचे पहिले सचिव होते. अस्खलित इंग्रजी बोलणारे, युरोपीय रीती जाणणारे असे अनेक बांगला व्यापारी या संस्थेचे सभासद होते. बैठकींच्या निमित्तानं, किंवा व्यापार वाढावा म्हणून या व्यापार्‍यांच्या घरीही युरोपियांसाठी अशा मेजवान्या आयोजिल्या जात. सरकारतर्फे आयोजिलेल्या मेजवान्यांसाठीही या धनिक बांगला कुटुंबांना आमंत्रण असे. असं असलं तरी हे बांगला व्यापारी स्वदेशाभिमानी होते. युरोपियांनी आपल्यावर राज्य करावं, हे त्यांना मान्य नव्हतं. युरोपीय चालीरीती व्यापारापुरत्या, एरवी आपलं बांगलापण सोडायचं नाही, असा त्यांचा खाक्या होता. punchcartoon.jpgइंगबंग मात्र असं मानत नसतं. जन्मानं बांगला पण वागणूक इंग्रजांसारखी असे हे इंगबंग. जे जे युरोपीय ते ते सर्वश्रेष्ठ असा या इंगबंगांचा समज होता. रवींद्रनाथांनीच या प्रजातीचं इंगबंग असं नामकरण केलं होतं. हा त्यांच्या टवाळीचा विषय होता. रवींद्रनाथांनी ज्योतींद्रनाथांना एका पत्रात लिहिलं होतं - ’हे इंगबंग मोठे मजेशीर असतात. इंग्रजांशी बोलताना त्यांचे खांदे झुकलेले असतात. त्या इंग्रजाच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द झेलायला ते आतुर असतात. इंगबंगाला दुसरा इंगबंग भेटला की त्याला फार आनंद होतो. मग हे दोघं भारतीय समाज किती तुच्छ यावर चर्चा करतात. इंगबंगाला एखादा अस्सल भारतीय भेटला की मग बघायलाच नको. आपण किती श्रेष्ठ, हे दाखवण्याची एकही संधी तो सोडत नाही. या इंगबंगांना जेवताना बघावं. मला तरी फार आदर वाटतो बुवा त्यांच्याबद्दल. कोलकात्याच्या उकाड्यातही रोज सुटाबुटात जेवतात ते. सुरी कुठल्या हातात, आणि काटाचमचा कुठल्या हातात, हे त्यांना सांगावंच लागत नाही. भातही ते काट्याचमच्याने खातात म्हणजे बघा. आता मी जर एखाद्या इंग्रजाबरोबर जेवत असेन, आणि मासा खाण्यासाठी चुकीची सुरी वापरली, तर तो त्याकडे दुर्लक्ष करेल. जेवताना शस्त्र वापरणं ही माझी संस्कृती नाही, हे त्यास ठाऊक असेल. पण हे पातक एखाद्या इंगबंगासमोर केलं तर त्याला आधी स्मेलिंग सॉल्ट देण्याची पाळी येईल. मी शेरीच्या ग्लासातून शॅम्पेन प्यायलो, तर माझ्या या कृत्यामुळे तासाभरातच जगबुडी होणार असल्यासारखा तो माझ्याकडे बघेल.’ हे इंगबंग कोलकात्यातल्या बांगला समाजात फारसे मिसळत नसत. युरोपीय समाजात सामावण्याची त्यांची धडपड असे. युरोपीय मात्र या काळ्या साहेबांशी अंतर राखूनच वागत.

britcal.jpgखुद्द युरोपीय समाजातच अनेक गट होते. प्रशासकीय अधिकारी कोलकात्याच्या एका भागात राहत. त्यांचे स्वतंत्र क्लब होते, त्यांच्या मेजवान्यांमध्ये इतर कोणाला प्रवेश नसे. सैन्यातले युरोपीय अर्थातच कॅण्टॉनमेण्ट परिसरात राहत. व्यापारी, वकील आणि डॉक्टर यांचा वेगळा कळप होता. हे तिन्ही समूह एकमेकांत फारसे मिसळत नसले तरी त्यांची दिनचर्या मात्र वेगळी नव्हती. सकाळी सहा वाजता उठून मैदानात फेरी मारणं, मग छोटा हाजरी सकाळी सात वाजता. नवरे सकाळी नवास कामाला गेले की बायका शॉपिंगसाठी किंवा मैत्रिणींना भेटायला बाहेर पडत. ओल्ड कोर्ट हाऊस रस्त्यावर हॅमिल्टन हे दागिन्यांचं दुकान होतं. तिथे बायकांची भरपूर गर्दी असे. दुपारी जेवायला घरी. मग वामकुक्षी. संध्याकाळी पाच वाजता सगळी कुटुंबं मैदानात फिरायला बाहेर पडत. रात्री डिनर पार्ट्या असत. पोलो, बिलियर्डस्, घोड्यांच्या शर्यती, क्रिकेट यांच्या निमित्तानंही पार्ट्या आयोजित केल्या जात. टाऊन हॉलात ऑर्केस्ट्रा यूनियनीचे कार्यक्रम असत. लिंडसे रस्त्यावरच्या ऑपेरा हाउसातही धनिकांची गर्दी असे. चौरंघीतल्या थिएटर रोयालमध्ये नाटकं सादर केली जात.

मात्र या नव्या संस्कृतीमुळे आणि नव्या प्रदेशात आल्यामुळे बावचळलेल्या युरोपियांची संख्याही लक्षणीय होती. भारतातलं हवामान, रंग, गंध, स्पर्श सगळंच अनोळखी. भारतीयांशी कसं वागायचं, हे ठाऊक नाही. त्यामुळे कोलकात्यात युरोपीय संस्कृती आणण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी तिथल्या वातावरणाशी समरस व्हायला कित्येकांना बराच वेळ लागे. मजा म्हणजे, सुरुवातीस कोलकात्याला आलेल्या अनेक तरुणांना राज्य करण्याचा अनुभवच नव्हता. प्रशासकीय कामांचीही फारशी माहिती नसायची. त्यामुळे गोंधळात अजूनच भर पडत असे. मुळात युरोपीय भारतात आले ते व्यापारासाठी. इंग्रज, किंवा पोर्तुगीज, फ्रेंच, डच यांना भारतावर राज्य करण्यात रस नव्हता. त्यांना इथला भूभागही बळकवायचा नव्हता. त्यांना रस होता तो इथल्या संपत्तीत. मसाले आणि कापूस यांच्या लोभानं युरोपीय भारतात आले, आणि मग एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या कृपेमुळं इथले राज्यकर्ते बनले.

येशू ख्रिस्त या जगात अवतरला त्याच्या अनेक शतकांआधी इजिप्शियन व्यापारी भारतात आले. नीळ, कापूस, रेशीम, मसाले, मोती नेण्यासाठी. भारतातलं लाकूड ते आपल्या देशी घेऊन गेले, मोठाली शहरं बांधण्यासाठी. नंतर पर्शियन आणि अरबी व्यापारीही भारतात आले, आणि भारतातल्या चीजवस्तू जगभर घेऊन गेले. याच व्यापारामुळे पुढे व्हेनिस या शहराची भरभराट झाली. व्हेनिसचं संपूर्ण साम्राज्यच भारतीय व्यापारावर उभं राहिलं होतं. आणि या व्यापाराच्या केंद्रस्थानी होते मसाले. जगात सर्वदूर भारतीय मसाल्यांना प्रचंड किंमत होती. या मसाल्यांचा वापर फक्त स्वयंपाकातच नव्हे, तर अत्तरांमध्ये, औषधांमध्ये आणि मृतदेह जतन करण्यासाठीही होत असे. अनेक ठिकाणी हे मसाले नाण्यांऐवजी किंवा ट्रॅव्हलर्स चेक म्हणून वापरले जात. त्यामुळे मसाल्यांचा व्यापार ज्यांच्या हाती, सत्ता त्यांच्या हाती असं साधं समीकरण होतं. या भारतीय मसाल्यांभोवती गूढतेचं वलय होतं. हे मसाले ज्या भूमीत पिकतात, त्या भूमीच्या रक्षणासाठी सात फणे असलेले नाग तैनात असतात, या मसाल्यांमुळे पौरुष कायम टिकतं अशा समजूतीही होत्या. अगदी हेरोडोटससारखा शहाणा माणूसही ’आपल्या देशात पूर्वेच्या देशातून जे मसाले येतात, ते खरं म्हणजे मोठ्ठ्या पंखाच्या एका ससाण्यानं आणले असतात’, असं म्हणाला होता.

या मसाल्यांना फक्त पश्चिम आशियातल्या देशांमध्ये किंवा इजिप्तमध्येच मागणी होती, असं नव्हे. मसाल्यांची सर्वांत मोठी गिर्‍हाइकं होती ती युरोपीय देशांत. अरबांमुळे स्पेन, इंग्लंड या देशांत मसाले पोहोचले. त्यांचा स्वयंपाकात भरपूर वापर होऊ लागला. किंमत भरपूर असल्यानं फक्त श्रीमंतांच्या घरीच त्यांचा वापर होत असला, तरी हिवाळा सुरू व्हायच्या आधी मसाल्यांची, विशेषत: काळ्या मिरीची मागणी प्रचंड वाढत असे. युरोपातला कडक हिवाळा सुरू होण्याआधी गाय, बैल, मेंढरं यांची कत्तल करण्याची पद्धत होती. या प्राण्यांसाठी हिवाळ्यात चारा आणणं कठीण व्हायचं. त्यामुळे त्यांची कत्तल केली की चार्‍याची समस्या सुटे, शिवाय त्यांचं मांसही वापरता येई. हे मांस टिकवण्यासाठी, आणि मांस कुजू लागलं तर तो वास घालवण्यासाठी काळी मिरी वापरली जाई. त्यामुळे मसाल्यांशिवाय युरोपीय देशांचं पान हलत नसे.

पर्शियनांनी, आणि नंतर पर्शियावर ताबा मिळवल्यावर अरबांनी, अनेक शतकं मसाल्याचा व्यापार आपल्या ताब्यात ठेवला होता. पर्शियाच्या उत्तरेला मसाल्यांची लागवड करणारा प्रदेश होता, आणि पश्चिमेला मसाल्याची मोठी गिर्‍हाइकं. त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे होणार्‍या संपूर्ण व्यापारावर नियंत्रण ठेवणं त्यांना अजिबात कठीण नव्हतं. किमती कमी झाल्या की व्यापारी साठेबाजी करत. मसाल्याच्या किमती सतत चढ्या ठेवण्यासाठी वाट्टेल त्या युक्त्या ही मंडळी वापरत असत. या व्यापारी वर्चस्वामुळे साहजिकच धार्मिक वर्चस्वही निर्माण व्हायला लागलं होतं. इस्लामचा प्रसार युरोपीय देशांना आवडण्यासारखा नव्हता. अर्थातच यामुळे युरोपियांना हे पर्शियन / अरबी व्यापारी आवडत नसत. पण त्यांच्याही नाइलाज होता. पूर्वकडे जाण्याचे सगळे मार्ग अरबांनी आपल्या ताब्यात घेऊन ठेवले होते.

ships1.JPG

या सगळ्या महागड्या वस्तू पूर्वेकडच्या देशांतून येतात, याची पाश्चिमात्यांना कल्पना होती, पण या देशांत जाण्याचा मार्ग त्यांना माहीत नव्हता. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीस रोमनांनी दणकट जहाजं बांधण्याचं तंत्र शोधून काढलं, समुद्रमार्गाचे जरा बरे नकाशे उपलब्ध झाले आणि व्यापारावर, व इस्लामवर हुकुमत मिळवण्याच्या जबरदस्त आकांक्षेतूनच कोलंबस भारताचा मार्ग शोधण्यास निघाला. पण भारताऐवजी तो पोहोचला अमेरिकेत. आपण भारतात पोहोचलो नव्हतो, हे कोलंबसाला कधीच कळलं नाही. आपण भारताचा शोध लावल्याच्या गैरसमजूतीतच त्यानं डोळे मिटले. मसाल्याच्या व्यापारावरची, आणि पर्यायानं जागतिक अर्थव्यवस्थेवरची पर्शियनांची मजबूत पकड संपुष्टात यायला १४९८ साल उजाडावं लागलं.

इम्यानुअल राजा पोर्तुगालच्या गादीवर बसला आणि त्यानं वाश्कु दा गामा या आपल्या सेवकावर एक जबाबदारी सोपवली. उंचच उंच लाटांच्या तडाख्यांनी खलाश्यांना नामोहरम करणार्‍या दक्षिण महासागराच्या पलीकडे असलेल्या जमिनीचा मार्ग शोधण्याची ही कामगिरी होती. ८ जुलै, १४९७ला वाश्कु दा गामानं तागुच्या बंदरावरून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्याच्या ताफ्यात तीन जहाजं होती. सां गाब्रिएल, सां राफाएल आणि सां मिग्वेल या नावांची. या जहाजांवर १७० खलाशी होते. प्रवास सुरू केल्यानंतर काही दिवस सगळं आलबेल होतं. केप ऑफ गूड होपला वळसा घालेपर्यंत मात्र समुद्रानं खलाश्यांना चांगलंच दमवलं. ती जहाजं फारशी मजबूत नव्हती आणि हवामान अतिशय वाईट. खलाश्यांनी बंड पुकारलं. वाश्कु दा गामा मागे फिरला नाही तर समुद्रात उद्या टाकण्याची धमकी त्यांनी दिली. वाश्कु दा गामानं शांतपणे त्या खलाश्यांच्या पुढार्‍याला बेड्या ठोकल्या, सगळी होकायंत्रं, नकाशे पाण्यात फेकले, ’आता देवच आपल्याला मार्ग दाखवेल, नवीन भूमी शोधल्याशिवाय मायभूमीवर पाऊल ठेवायचं नाही’ अशी घोषणा केली. आता काही पर्यायच न उरल्यानं प्रवास सुरू राहिला. त्यातच स्कर्व्ही या नव्या आजाराची भर पडली. कधीही न ऐकलेल्या या आजारानं अनेक खलाश्यांचा बळी घेतला. शेवटी अकरा महिन्यांनी त्यांना भारताची जमीन दिसली आणि १४मे, १४९८ला पोर्तुगीज जहाजं बंदराला लागली.

जागतिक इतिहासाच्या दृष्टीनं या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वेला असलेल्या देशांची संस्कृती, त्यांचा इतिहास यांच्याशी फारसा संबंध नसलेले युरोपीय देश आशियाशी वाश्कु दा गामाच्या साहसामुळे जोडले गेले. अरबांकडे चांगली जहाजं नसल्यानं, मुळात जहाजं बांधायला उत्तम लाकूड नसल्यानं त्यांचं व्यापारी वर्चस्व संपुष्टात आलं आणि मजबूत जहाजं, अद्ययावत शस्त्रं आणि धाडसी वृती यांमुळे युरोपीय देशांनी मग आशियाच्या बर्‍याच मोठ्या भूभागावर नंतर अनेक शतकं राज्य केलं. या घटनेमुळं नवीन व्यापारी कंपन्या निर्माण झाल्या, अर्थकारण बदललं. विनिमयाची नवी साधनं जन्माला आली. लंडनच्या लॉइड्स नावाच्या कॉफी शॉपात विमापद्धतीचा जन्म झाला. युरोपातून आशियात गेलेल्या जहाजांपैकी किती जहाजं सुखरूप परत येतील यावर सट्टेबाजी सुरू झाली. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या घटनेमुळं आशियातले मसाले युरोपियांना पुन्हा खुणावू लागले. परिणामी त्यानंतरची काही वर्षं जगाचे नकाशे झपाट्यानं सतत बदलत राहिले. धर्मप्रसार आणि मसाले या दोहोंनी युरोपाला भुरळ पाडली, आणि आशियाई देश पुरते नागवले गेले.

vasco.jpgवाश्कु दा गामा आणि त्याचे खलाशी कोळीक्कोडच्या किनार्‍यावर पोहोचले ते मसाल्यांसाठी आणि धर्मप्रसारासाठीही. मजा म्हणजे, कोळीक्कोडच्या रहिवाशांना वाश्कु दा गामाचा देवही ठाऊक होता. काळ्या मिरीच्या शोधात आलेल्या सिरियन क्रिश्चन मिशनर्‍यांनी अगोदरच अनेक वाट चुकलेल्या कोकरांना आपला कळपात घेतलं होतं. मसाल्यांच्या हव्यासानं ही सगळी टोळकी कोळीक्कोडलाच येऊन पोहोचत या मागेही एक कारण होतं. इड्डिक्की नावाचं एक लहानसं गाव तिथून फार लांब नव्हतं. तेराव्या शतकात अरबी व्यापार्‍यांना हे गाव सापडलं, आणि तिथे काळं सोनं पिकतं हा शोध त्यांना लागला. या गावातलं हवामान, तिथला पाऊस, तिथली जमीन असं सगळं मिरीच्या लागवडीसाठी अतिशय अनुकूल. आणि त्यामुळे इथली मिरी टपोरी, भरदार. इड्डिक्कीतला सगळा व्यापार अरब व्यापार्‍यांच्या ताब्यात होता. आपलं वर्चस्व शाबूत राहावं म्हणून की काय, पण तिथल्या मिरीच्या वेली पार आभाळापर्यंत पोहोचल्या असून त्यांचं रक्षण करायला खुद्द देवदूत उभे असतात, अशा कहाण्या पसरवल्या. युरोपियांनी त्यांवर विश्वास ही ठेवला. वाश्कु दा गामाला या काळ्या मिरीच्या जादुई प्रदेशात जाण्याची घाई झाली होती.

पोर्तुगीज जहाजं किनार्‍याला लागल्याची बातमी पसरली आणि एकच गर्दी जमा झाली. तीत कोळीक्कोडचे रहिवासी होते, राजाचे सैनिक होते आणि अरबी व्यापारीही होते. हे पोर्तुगीज इतका जिकिरीचा प्रवास करून इतक्या लांब का आले, याची त्यांना चांगलीच कल्पना होती. त्यांच्या सुदैवानं सामुथिरी राजा राजधानीत नव्हता. या व्यापार्‍यांनी मग वाश्कु दा गामाला गोड बोलून ताब्यातच घेतलं. त्याला भरपूर फिरवलं. त्याच्या चीजवस्तू ताब्यात घेतल्या. ’हा प्रदेश किती वाईट, इथले लोक तर त्याहून वाईट, आणि इथली मिरी? छे! तिला अजिबात चव नाही.. तू परत जा.. मिरी इथल्यापेक्षा तिकडे सिंहद्वीपाची चांगली", असं म्हणत त्याला आल्या पावली परत घालवण्याचे प्रयत्न सुरू झाले. वाश्कु दा गामा काही या बेरकी व्यापार्‍यांना बधला नाही. त्याने शांतपणे राजा परत येण्याची वाट पाहिली.

पोर्तुगालहून आलेल्या या राजाच्या दूताशी वाटाघाटी करायला खरं म्हणजे सामुथिरी राजा उत्सुक होता. अरबी व्यापारी विरोध करतील याची त्याला कल्पना होती. पण जर व्यापारामुळे खजिन्यात भर पडणार असेल, तर त्याला या विरोधाची, किंवा संबंध बिघडण्याची तशी तमा नव्हती. पण वाश्कु दा गामानं पेश केलेल्या भेटवस्तू काही त्याला आवडल्या नाहीत. सहा वार जांभळ्या रंगाचं कापड, दोन डबे साखर, तेल, मोत्यांच्या माळा या काही एका राजानं दुसर्‍या राजाला द्यायच्या भेटवस्तू नव्हत्या. सामुथिरी राजानं वाश्कु दा गामाशी वाटाघाटी करायला नकार दिला. वाश्कु दा गामानं मग नाइलाजानं बाजारात मिळतील तेवढे मसाले विकत घेतले. परत जाताना त्यानं राजाकडे मिरीचा एक वेल आपल्या देशात न्यायची परवानगी मागितली. ही मागणी ऐकताच दरबारी आणि अरबी व्यापारी खवळले. तोपर्यंत मिरीचे वेल कधी समुद्र ओलांडून गेले नव्हते. वाश्कु दा गामाला पोर्तुगालमध्ये मिरीची लागवड करायची होती. इतका पैसा खर्च करून भारतात यायचं, प्रवासात निम्मेअधिक खलाशी गमवायचे, त्यापेक्षा आपल्याच देशात मसाले पिकवणं सोपं, आणि आपल्या देशात एकदा हे पीक घेता आलं, म्हणजे हे अरब देशोधडीला लागतील, असा त्याचा साधा हिशोब होता. आणि अर्थातच अरबी व्यापार्‍यांना आणि भारतीयांनाही नेमकं हेच नको होतं. पण सामुथिरी राजा शांतपणे म्हणाला, "खुशाल घेऊन जा त्या वेली तुमच्या देशात. तू वेली नेल्यास तरी आमचा पाऊस कसा नेशील?"

कोळीक्कोडहून वाश्कु दा गामा निघाला आणि त्यानं कण्णूर गाठलं. कण्णूर ही मलबार किनारपट्टीवरची मसाल्यांची मोठी बाजारपेठ. इथेही अरबी व्यापारी आपल्याला त्रास देतील, असा त्याचा अंदाज होता. पण झालं भलतंच. तिथे तर कण्णूरचा राजा त्याच्या स्वागताला बंदरावर हजर होता. या राजेसाहेबांना राजज्योतिष्यानं सांगितलं होतं की, जहाजांचा ताफा घेऊन पश्चिमेहून काही गोरे लढवय्ये येतील, आणि देदीप्यमान पराक्रम गाजवून अनेक शतकं या भूमीवर राज्य करतील. वाश्कु दा गामाचा ताफा बघून एका कोळ्यानं एका सैनिकाला या जहाजांबद्दल सांगितलं, आणि आपल्या भूमीवर भविष्यात राज्य करणार्‍या त्या लढवय्याचं स्वागत करायला राजा स्वत: हजर झाला. वाश्कु दा गामा त्या आदरातिथ्यानं भारावूनच गेला. कोळीक्कोडला मसाले न मिळाल्यानं झालेलं नैराश्य पार गायब झालं. कण्णूरच्या राजानं त्याला हवे तितके मसाले नेण्याची परवानगी दिली. काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ आणि सुंठ यांनी लादलेली जहाजं पोर्तुगालच्या वाटेला लागली आणि युरोप व आशियातल्या नव्या व्यापाराला सुरुवात झाली.

पोर्तुगालला पोहोचताक्षणी राजानं वाश्कु दा गामावर बक्षिसांची आणि किताबांची खैरात केली. मोहिमेवर झालेल्या खर्चाच्या साठपट नफा मिळाल्यानं राजा खूश होता. त्यानं लगेच पुढच्या मोहिमेची घोषणा करून टाकली. वाश्कु दा गामा १५०२ साली कोळीक्कोडला परतला. अरबी व्यापार्‍यांनी दिलेला त्रास तो मुळीच विसरला नव्हता. त्यानं ताबडतोब दोन मोठी जहाजं आणि सोळा लहान होड्या ताब्यात घेतल्या. आठशे अरबी व्यापार्‍यांचे हात, नाक आणि कान तोडले, दात पाडले आणि नंतर त्यांना जिवंत जाळलं. सामुथिरी राजावर जरब बसवणं, हाही या नरसंहारामागचा हेतू होता. सामुथिरीनं मात्र पाच महिने या मूठभर पोर्तुगिजांशी सामना केला. त्याचे दहा हजार सैनिक मारले गेले, आणि फक्त चार जहाजं शाबूत राहिली. मात्र या विजयानंतरही पोर्तुगिजांना आपली ठाणी उभारता आली नाहीत. मसाल्यांचा व्यापार आता केप ऑफ गूड होपमार्गे होणार, आणि त्यावर युरोपियांचं वर्चस्व असेल, हे इजिप्तच्या राजाला कळलं आणि तो संतापला. कोळिक्कोड, कण्णूर आणि कोल्लमला असलेली पोर्तुगिजांची जहाजं नष्ट करण्यासाठी इजिप्शियन सैन्य भारतात आलं. चौलला दोन्ही सैन्य एकमेकांना सामोरी गेली. दोन दिवस चाललेल्या या युद्धात इजिप्शियन आणि भारतीय सैन्यानं पोर्तुगिजांचा पराभव केला. पोर्तुगिज व्हाइसरॉयाचा मुलगा या युद्धात मारला गेला. चिडून जाऊन व्हाइसरॉयानं दाभोळ शहर जाळून टाकलं, तिथल्या तीन हजार इजिप्शियन सैनिकांची कत्तल केली, आणि भारताच्या पूर्व किनार्‍यावर आपलं व्यापारी राज्य स्थापन केलं. १५१० साली पोर्तुगालनं गोवा ताब्यात घेतलं, तिथल्या किनारपट्टीवर पन्नासेक किल्ले बांधले आणि युरोपात होणार्‍या निर्यातीवर वर्चस्व प्रस्थापित केलं. पहिल्या वर्षीच भारतातून पोर्तुगिजांनी दहा लाख किलो काळी मिरी, अठ्ठावीस टन आलं, आठ टन दालचिनी आणि दोनशे सहा किलो वेलदोडे युरोपात नेले. त्यांच्या ताफ्यात शंभर जहाजं होती, आणि अँटवर्प, अ‍ॅम्सटरडॅम, न्यूरेमबर्गपर्यंत हा माल जात असे.

elizanew.jpg

मसाल्यांच्या या लढाईत मग इतर युरोपीय राष्ट्रंही उतरली. अगदी स्वीडन व ऑस्ट्रियासारखे लहान देशही या शर्यतीत सामील झाले. आघाडीवर होते डच आणि इंग्रज. सोळाव्या शतकाच्या मध्यावर स्पेननं पोर्तुगाल ताब्यात घेतलं आणि डचांना अधिकच स्फुरण आलं. स्पेनशी त्यांचं परंपरिक शत्रुत्व होतं, आणि या लढाईत त्यांना पराजय पत्करायचा नव्हता. वाश्कु दा गामानं दाखवलेल्या मार्गानं त्यांनी भारतात प्रवेश केला, पण तिथेच न थांबता ते आग्नेय आशियात जाऊन पोहोचले. तिथल्या हिंदू राजांना भरपूर भेटवस्तू देऊन, प्रसंगी शस्त्रांचा धाक दाखवून त्यांनी व्यापाराचे हक्क मिळवले. १५८३ साली डचांनी स्पॅनिश आरमाराचा पराभव केला आणि पोर्तुगिजांची मक्तेदारी मोडून काढली. युरोपातल्या अनेक देशांमध्ये मसाले डच जहाजांतून पोहोचू लागले. इंग्रज स्पॅनिशांइतके, डचांइतके खुनशी नसले, आणि आकाशातल्या प्रेमळ बापाचा संदेश जगभार पोहोचवण्यासाठी फारसे उतावीळ नसले, तरी त्यांनाही पैसा हवा होता. भारताचं वैभव त्यांनाही खुणावत होतंच. ख्रिस्ताचा संदेश घेऊन भारतात आलेल्या फादर स्टिफन्सनं गोव्याहून आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रांत भारताची भारंभार स्तुती केली होती. त्यामुळे भारतात आपलं आरमार पाठवावं, असा विचार इंग्रज करू लागले होते. तशा काही मोहिमा आखल्याही गेल्या, पण त्यांपैकी एकही जहाज भारतात पोहोचू शकलं नाही. त्यातच डचांनी एकाएकी काळ्या मिरीचे भाव वाढवले. एक पाउंड काळी मिरी तीन शिलिंगांना मिळत असे, ती आता आठ शिलिंगांना विकत घ्यावी लागू लागली. या अन्यायकारक भाववाढीमुळे एलिझाबेथ राणी वैतागली. तिनं लंडनच्या मेयरांना या भाववाढीविरुद्ध आवाज उठवण्याचे, आणि तिला आळा घालण्याचे आदेश दिले. मेयरांनी २२ सप्टेंबर, १५९९रोजी फाऊंडर्स हॉलात शहरातल्या व्यापार्‍यांची बैठक बोलावली. लंडनमधले तमाम वाणी, खाटीक, चामड्याचे व्यावसायिक, अत्तराचे कारखानदार या बैठकीस उपस्थित होते. डचांच्या नादी लागण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा आपणच आता भारतात आणि आग्नेय आशियात जाऊन मसाले आणावेत, आणि नफा कमवावा, असं या व्यापार्‍यांनी ठरवलं. राणीच्या परवानगीनं ३१ डिसेंबर, १६०० रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. लगेचच कंपनीची चार जहाजं पूर्वेकडे रवाना झाली. दोन वर्षांनी मसाले घेऊन ही जहाजं इंग्लंडला परतली, तेव्हा या विक्रीतून कंपनीला दोनशे टक्के फायदा झाला. पुढच्या बारा वर्षांत कंपनीनं अशाच चार मोहिमा पार पाडल्या, आणि त्यांतून तिला सरासरी १७१% नफा मिळाला. या मोहिमांमधले मसाले इंग्रजांनी आग्नेय आशियातून आणले होते. भारताचा वाटा त्यात फार कमी होता. voc.jpg त्यातच १६०२ साली डचांनी व्हरेनिग्द ऊस्तान्दिश कोम्पानी, म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी (व्हीओसी) स्थापन केली. त्या काळातली ही सर्वांत मोठी कंपनी होती. स्थापनेनंतर दहा वर्षांतच या कंपनीनं आपल्या भागधारकांना ४०% लाभांश द्यायला सुरुवात केली होती. कंपनीच्या पदरी पन्नास हजार चाकर, तीस हजार सैनिक होते. दोनशे जहाजं होती. आग्नेय आशियात डचांशी कायम लढत राहणं शक्य नव्हतं, आणि त्यांचं तिथलं प्राबल्य बघता तिथून व्यापार करणंही शहाणपणाचं नव्हतं. त्यामुळे हजारो वर्षांपासून मसाल्यांचं आगर असणार्‍या भारतातून व्यापार करणंच श्रेयस्कर होतं. भारतात अकबराचं राज्य असेपर्यंत अशी परवानगी मिळवणं शक्य नव्हतं. इंग्रजांनी तसे प्रयत्नही करून पाहिले होते. १६०५ साली जहांगीर गादीवर आला, आणि पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं विल्यम हॉकिन्सला वाटाघाटी करण्यासाठी, खरं म्हणजे वखार स्थापण्याची परवानगी मिळवण्यासाठी भारतात पाठवलं.

eastindiahouse.jpgविल्यम हॉकिन्स सुरतेस पोहोचला आणि त्यानं थेट आग्रा गाठलं. जहांगीरानं त्याचं उत्तम स्वागत केलं. कालांतरानं दोघांची मैत्रीही झाली. हॉकिन्स उत्तम तुर्की आणि फारसी बोलत असे, त्यामुळे जहांगीर अनेकदा जेवणानंतर त्याला दारू प्यायला बोलावे. जहांगीरानं त्याच्यासाठी एक आर्मेनियन ख्रिस्ती मुलगीही शोधली. पण व्यापाराच्या दृष्टीनं त्याच्या हाती काही फारसं लागलं नाही. पोर्तुगिजांना दुखावून त्यांच्यापेक्षा कमकुवत असणार्‍या इंग्रजांना व्यापाराचे अधिकार देणं अर्थातच त्याला अयोग्य वाटलं. मात्र १६१२ साली इंग्रजी आरमारानं सुरतेस पोर्तुगिजांचा पराभव केला, आणि १६१५ साली व्यापाराची परवानगी मिळवण्यासाठी थॉमस रो भारतात आला.

त्यालाही जहांगीरानं लगेच परवानगी दिली नाही. आता त्याला पोर्तुगिजांची भीती नव्हती, पण लगेच परवानगी देण्याची इच्छाही नव्हती. जहांगीर जिथे जाईल, तिथे थॉमस रो त्याच्या मागोमाग गेला. एक गोरा माणूस इतक्या लाचारीनं आपल्याशी वागतो, याचा जहांगीराला आनंदच होता. जहांगीरानं त्याचं आदरातिथ्यही केलं. नीलगायीचा दो प्याझा, तितर, रोहू माशाचं कालवण असे पदार्थ तो रोच्या घरी पाठवत असे. आंब्याबरोबर शिजवलेली शेळी (कालिया आंबा), मलिदा असे पदार्थ जहांगीराच्या दरबारी त्यानं खाल्ले होते. शेवटी एकदाची इंग्रजांना मर्यादित व्यापाराची परवानगी मिळाली. त्यांनी हळूहळू भारतात आपलं बस्तान बसवलं. मुघल बादशाहांकडून सवलती मिळवल्या. मछलीपट्टण, फोर्ट सेंट जॉर्ज (कालिकाता), फोर्ट सेंट विल्यम्स (मद्रास) इथे ठाणी उभारली, आणि नंतर भारतात आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं.

कोलकाता ही इंग्रजांची भारतातली पहिली राजधानी. अठराव्या शतकात इथे ब्रिटिश स्त्रिया राहायला आल्या, आणि खर्‍या अर्थानं ब्रिटिश संस्कृती तिथे रुजली. या अननुभवी स्त्रियांच्या मदतीसाठी अनेक पुस्तकं लिहिली गेली. मागास, अंधश्रद्धाळू, कामचुकार भारतीय नोकरांकडून काम कसं करून घ्यावं, पार्ट्यांसाठी मेन्यू काय असावा, स्वच्छता कशी राखावी, अशा विषयांवर या पुस्तकांत मार्गदर्शन केलेलं असे. पाककृतींची अनेक पुस्तकंही मग बाजारात आली. युरोपीय आणि भारतीय खाद्यसंस्कृतीच्या संयोगातून नवे पदार्थ तयार झाले, काही पदार्थांना नवी नावं मिळाली. भारतीय पदार्थ थेट युरोपात आणि अमेरिकेत पोहोचले, आणि युरोपीय पाककृती भारतीय घरांमध्ये केल्या जाऊ लागल्या. कोलकाता, पुण्यासारख्या शहरांमध्ये कॉफी शॉपं उघडली गेली, आणि ब्रायटनमध्ये बिर्याणी मिळू लागली. युरोपातली फळं भारतात मिळू लागली, आणि आंबा लंडनला पोहोचला. ब्रिटिशकालीन भारतातल्या या खाद्यसंस्कृतीबद्दल उत्तरार्धात..

collagefinalforannamvai.jpg

*****

विशेष आभार - डॉ. अरुणा ढेरे, श्री. धीमन दास (के. सी. दास अ‍ॅण्ड सन्स प्रा. लि., कोलकाता), श्री. बिनोद कार (बिकलानन्द कार अ‍ॅण्ड सन्स स्वीट, भुवनेश्वर), सॅण्ड्रा पॉलेट (ब्रिटिश लायब्ररी, लंडन), श्री. सुधांशू गर्ग (राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, नवी दिल्ली), द पंच कार्टून लायब्ररी, लंडन, रवींद्रभारती कलादालन, कोलकाता, श्री. ह्यू रेनर (पॅगोडा ट्री प्रेस, लंडन).

*****

चित्रांचा तपशील -

१. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयातली रवींद्रनाथ ठाकूरांची चित्रं - © राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, नवी दिल्ली.
२. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर बाऊल गायकाच्या रूपात - श्री. अवनींद्रनाथ ठाकूर यांनी काढलेलं चित्र, तैलरंग, रवींद्रभारती कलादालनाच्या संग्रहातून, © रवींद्रभारती कलादालन.
३. श्री. नवीनचंद्र दास, श्री. कृष्णचंद्र दास, श्री. शारदाचरण दास यांची छायाचित्रं, तसंच मिठायांची छायाचित्रं © के. सी. दास अ‍ॅण्ड सन्स प्रा. लि., कोलकाता.
४. रायटर्स बिल्डिंग, कोलकाता - फ्रेडरिक फेबिश, १८५१, © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.
५. ठाकूरबाडी, जोडाशांको - प्रताधिकारमुक्त छायाचित्र.
६. कोलकात्यातील इंगबंग - बाबू जाबरजी यांनी काढलेलं 'पंच' मासिकात प्रसिद्ध झालेलं अर्कचित्र, १८९५, © द पंच कार्टून लायब्ररी.
७. ब्रिटिशशासित कोलकाता - सेंट जॉन्स चर्चचा परिसर, थॉमस पॉलक यांनी काढलेलं छायाचित्र, १९१०च्या सुमारास, © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.
८. कोळीक्कोडच्या किनार्‍यावर वाश्कु दा गामा - लुई द कामोए यांनी जलरंगांत १८८० साली काढलेलं चित्र, लायब्ररी ऑफ काँग्रेस यांच्या संग्रहातून, प्रताधिकारमुक्त.
९. व्हरेनिग्द ऊस्तान्दिश कोम्पानी, म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संबंध दाखवणारा नकाशा - प्रताधिकारमुक्त.
१०. लंडनचे ईस्ट इंडिया हाऊस - अ‍ॅक्वाटिंट, रंगीत, थॉमस होस्मर शेफर्ड, १८१७, © ब्रिटिश लायब्ररी, लंडन.
११. शेवटच्या चित्रातील 'द कम्प्लिट इंडियन हाउसकीपर अ‍ॅण्ड कूक' या पुस्तकाचं मुखपृष्ठ पॅगोडा ट्री प्रेस यांच्या सौजन्याने, © पॅगोडा ट्री प्रेस,

संदर्भ -

१. द लायन अ‍ॅण्ड द टायगर - द राइझ अ‍ॅण्ड फॉल ऑफ ब्रिटिश राज - डेनिस ज्यूड, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली, २००४.
२. द स्टोरी ऑफ द नेशन्स - ब्रिटिश इंडिया - आर. डब्ल्यू. फ्रेझर, टी. फिशर अनविन पब्लिकेशन्स, लंडन, १८९६.
३. द ब्रिटिश एम्पायर - जॉर्ज डब्ल्यू. साउअथगेट, जे. एम. डेण्ट अ‍ॅण्ड सन्स प्रा. लि., लंडन, १९३६
४. सिलेक्टेड लेटर्स ऑफ रबीन्द्रनाथ टागोर - संपा. कृष्णा दत्ता, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, १९९७.
५. के. सी. दास - रोसोगोल्ला अ‍ॅण्ड अदर स्वीट्स - के. सी. दास. प्रा. लि. कोलकाता, १९६८.

*****

स्रोत -

भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदिर, पुणे आणि ब्रिटिश लायब्ररी, पुणे.

*****

या लेखातील कोणतेही चित्र अथवा (संक्षिप्त वा संपूर्ण) मजकूर इतरत्र वापरण्यास परवानगी नाही.

*****

क्रमशः

*****
प्रकार: 

मी पैला.. !!!

मस्तच झालाय हा भाग पण ! बंगाली मिठाया तसच मागच्या भागातल्या तंदूरी चिकनच्या गोष्टी वाचून हे पदार्थ फार प्राचीन नाहीयेत ह्याचं आश्चर्य वाटलं. मसाल्यांच्या व्यापाराचा इतिहास मनोरंजक आहे.

आणि लेख दोन भागांत विभागल्याबद्दल पेशल धन्यवाद. Happy

पुस्तक छापा !!!

चिनूक्सा.. भरपूर चित्रं टाकल्यामुळे अजूनच इंटरेस्टिंग दिसतोय लेख.. Happy
आणि मी सगळा लेख वाचूच शकलो नाही. आधीच भूक लागलीय, आणि ते रसगुल्ले आणि संदेश-बिंदेश वाचून अक्षरशः पाणी सुटलं तोंडाला.:)
तर, पोट तृप्त असताना पुढे वाचण्यात येईल.
Happy

वा:,रसगुल्ला माझ्या सगळ्यांत आवडती मिठाई.त्याचे एव्हढे रसिले वर्णन्.धन्यवाद चिनूक्स्.तुला बंगाली भाषा पण येते?

केवळ अप्रतीम. मी वाचायला सुरुवात केलि तेंव्हा एकहि प्रतीक्रिया नव्हती. आणि आत मी १० वी Happy

एक्दम चवीचवीने वाचला.

सध्याचे कालिकाता आत मी लिहावे म्हणते आहे.

मस्त लेख. उत्तम माहिती व शैली. आज घरी जाताना हलवायाकडे जाणे प्राप्त आहे.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

अहाहाहा!
क्या बात है.

पुस्तकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
(हे जर प्रकाशकांने उड्या मारुन छापले नाही तर त्यांच्यासारखे कमनशिबी तेच.)

ভালো ভালো! Happy

esplêndido artigo ...

अप्रतिम लेख. के सी दासची मिठाई माझी लै आवडती आहे, त्यामुळे त्यांचा इतिहास विशेष 'रस' घेऊन वाचला.
बंगलोरात जे पी नगरातील के सी दासच्या दुकानात बंगलोर मुक्कामी माझी नियमित वारी असायची. तेथील मिठाईची सँपल्स चाखता चाखताच पोट भरून जायचे!! Happy

आवडलं वाचायला. रसगुल्ल्याबद्दल वाचलेलं आणि टिव्हीवर बघितलय यापुर्वी. संदेश बद्दल वाचायला आवडेल. (रच्याकने के सी दास चे एस्प्लनेड मधले दुकान अजुनही १९३५ मधले वाटावे असेच आहे. सरकारी कार्यालयात जाऊन मिठाई विकत घेतल्या सारखे वाटते Happy पण चव अप्रतिम!!)

भूक लागली............................ उत्तरार्ध कुठे आहे?

वा वा .... एक एका पदार्थाची जन्मकहाणी सांगण्याची शैली खासच.
हे सर्व लेख वाचताना मायबोलीचा सभासद असण्याचे समाधान मिळतेय.

सुरेखच!
दासांचे योगदान जबरदस्तच आहे. तत्कालिन आंतरराष्ट्रीय राजकारणात मसाल्यांचे स्थान एवढे असेल याची कल्पना नव्हती.

वाह चिन्मय
इथे मस्त पाऊस पडतोय. चहाच्या गरम गरम घोटाबरोबर तुझा हा लेख.
बरेच दिवसानी नवा लेख पडला आणि पुढचा भाग येतोय म्हटल्यावर उत्सुकताही वाढली.

इतकी सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

वा! मस्त लेख. पुस्तक आले की नक्कीच घेईन. Happy

बंगलोरात म. गांधी रस्त्यावरच्या ऑफिसच्या शेजारी केसीदास होते. दरेक दोन चार दिवसांनी दुपारच्या जेवणानंतर तिकडे पावले वळत असत. त्या केसीदासांना एव्हढी परंपरा असेल असे माहित नव्हते.

अठरा-एकोणीसाव्या शतकात मसाले, विसाव्यात खनिजतेल तसे एकविसाव्या शतकात कोणत्या उत्पादनापाई जागतिक राजकारण खेळले जाईल?

Pages