वाळवण, साठवण - एक मजेदार आठवण!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मिनोती च्या ह्या लेखामुळे माझ्या लहानपणच्या आठवणीही अगदी उफाळून आल्या .. उन्हाळातल्या सुट्टीत केलेल्या गोष्टींमध्ये ह्या वाळवण, साठवणींशी निगडीत आठवणी पहिल्या पाचांत असतील बहुदा ..

तर मध्यमवर्गीय, मराठमोळ्या, महाराष्ट्रियन, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे सुगृहिणींप्रमाणे माझी आईही बराच मोठा घाट घालायची दरवर्षीच्या उन्हाळ्यात .. साबुदाण्याच्या पापड्या (ह्याला बरेच लोक चिकोड्या की चिकवड्या म्हणतात), साबुदाणे आणि बटाटे ह्यांच्या चकल्या, कुरडया, सांडगे, कूटाच्या मिरच्या, क्वचित कुठल्या वर्षी बटाट्याचा कीस, उडदाचे पापड हे सर्व करायची .. त्याचबरोबर कैरीचा छुंदा आणि ईतर काही साठवण प्रकारांत मोडणारे प्रकार जसं की धने, जीरे, बडिशेप इत्यादी पदार्थांची वाळवणं असायची ..

माझं बालपण गेलं एका बहुतांश मराठमोळ्या मोठ्ठ्या सोसायटीत .. आमच्या सोसायटीत तीन बिल्डींग्ज, इंग्रजी 'सी' शेपमध्ये आणि तीन्हीं बिल्डींग्ज च्या गच्च्या एकमेकांनां जोडलेल्या .. त्यामुळे माझ्या लहानपणच्या (लहानपणच्याच काय ती सोसायटी सोडली तेव्हापर्यंतच्या) सगळ्या सगळ्यांत गच्ची हा अविभाज्य घटक आहे .. तेव्हा आई करायची ती वाळवणं झालीच पण सोसायटीतल्या बाकीच्या गृहिणीही भरपूर वाळवणं करायच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची गच्ची पापड, चकल्या, सांडगे, कूटाच्या मिरच्या, छुंदे, लोणच्यासाठीच्या मसाला लावून ठेवलेल्या कैर्‍या असल्या विविध पदार्थांनीं भरलेली असायची .. तर अशा ह्या दिवसातल्या माझ्यी आठवणी दोन कॅटेगरीतल्या .. पहिली म्हणजे कुठल्याही मी बालपण घालवलं तशा सोसायटीत रहाणार्‍या मुलांची (मुलींची म्हणू फार तर) आणि दुसरी आहे एक थोडीशी क्लेशदायक आठवण (क्लेशदायक नक्की कोणासाठी किंवा जास्त क्लेशदायक नक्की कुणासाठी हे ठरवणं मुश्कील आहे ..)

वार्षिक परिक्षा संपून उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की मी वाट बघत असायचे आईचा वाळवणांचा सीझन कधी चालू होणार त्याची .. बर्‍याच वेळा मी भुणभूण करायला लागले की तिला 'कामं करायला सुरूवात करते पण भुणभूण आवर' असं होत असावं .. तर सगळ्यांत पहिली तयारी म्हणजे ती मला दगड गोळा करून आणायला सांगायची .. वाळवणासाठी वापरायच्या जुन्या चादरी, साड्या आणि प्लास्टीकच्या शीट्स ह्यांच्या कोपरांवर वजन म्हणून ठेवण्यासाठी हे दगड .. त्यात तिला विटा, पोखरून माती सांडणारे दगड नको असायचे .. गुळगुळीत, गोट्यासारखे दगड शोधून गच्चीत एकत्र करून ठेवणे ही पहिली स्टेप .. बाकी तिच्या रेसिप्या वगैरे काही मला ठाऊक नाहीत पण एव्हढंच लक्षात आहे की पापड्यांसाठी ती भिजवून ठेवलेला साबुदाणा शिजवायची तेव्हा एक वेगळाच मजेशीर असा वास यायचा आणि त्या वासाने जाग यायची सकाळी .. मग तिचं मिश्रण शिजवून झालं की आधी गच्चीत जाऊन ती आणि मी खाली साडी किंवा चादर आणि वर एक प्लास्टीकची शीट आंथरून, थोड्या थोड्या अंतरावर त्यावर दगड ठेवून सगळा जामानिमा करून यायचो .. मग घरी येऊन गरम गरम मिश्रण वर घेऊन जायचं आणि पळीने पापड्या घालायच्या .. पापड्या घालण्याचं एकच काम तिच्या दृष्टीने सोपं, मला त्या वयात झेपणारं असावं .. कारण ईतर पदार्थ करण्यात मी तिला काहि मदत केलेली आठवत नाही .. बाकीच्या पदार्थांसाठी माझ्यावाटची कामं म्हणजे ते ते पदार्थ वाळले की सोडवून बरण्यांत भरायचे किंवा गच्चीवरून ने-आण करायला मदत करायची .. एकावेळी एका भांड्यातलं मिश्रण शिजेपर्यंत दुसर्‍या तयार मिश्रणाच्या पापड्या घालून संपवायच्या मग दुसरं भांडं घेऊन यायचं असं तिचं गणित ठरलेलं होतं .. मला पापड्या घालण्यासाठी म्हणून एका छोट्या भांड्यात काढून द्यायची ती मिश्रण आणि मग छोट्या पळीने मी घालायचे .. अशा त्या पापड्या घालून होईपर्यंत सुरूवातीला घातलेल्या पापड्यांच्या कडा वाळून त्या सुकायला सुरूवात व्हायची .. मग सारखं त्या पापड्यांनां हात लावून ती उचलता येण्याइतपत सुकलीये का ते बघायचं .. सारखं हात लावून बघणं आईला आवडत नसावं पण त्या पापड्या वाळण्याच्या प्रक्रियेत एका ठराविक वेळेलाच त्या पापड्या खाण्यात सगळ्यात जास्त मजा येते .. तेव्हा तिच्या बोलण्याचा फार उपयोग होणार नाही हे तिलाही माहित असावं .. आमच्या घरच्या पापड्या असतील तेव्हा हा कार्यक्रम असायचा नाहितर मग सकाळी १०-११ च्या सुमारास गच्चीत फेरी मारून यायचोच आम्ही कोणाच्या वाळत घातलेल्या पापड्या त्या ठरावीक पॉइंटला येऊन खाण्यायोग्य झाल्या आहेत का ह्याची पाहणी करायला .. मग काही सुगरणी विविधरंगी पापड्या करत त्या मला फार आवडायच्या .. आईकडे खुप वेळा हट्ट करूनदेखील कृत्रिम रंगांचा वापर नको ह्या सबबीवर ती टाळायची रंगीत पापड्या करणं .. तसंच माझी मावशी काही वेगळ्याच प्रकारे करायची पापड्या .. म्हणजे असं पळीवाढे मिश्रण शिजवून पळीने घालण्याऐवजी मला लक्षात आहे त्याप्रमाणे ती हिंगाच्या निळ्या रंगाच्या चपट्या डब्या वापरून करायची पापड्या .. अशा मी फक्त बाजारी विकतच्या पापड्या बघितल्या आहेत .. त्या एकसारख्या गोल असतात आणि त्यातले साबुदाणे पण अगदी शिस्तबद्ध दिसतात .. ह्या पापड्या बहुदा जास्ती फुलतात ..

तर ह्या पापड्या घालून झाल्या की मग खाली येऊन बाकीचं आटोपून मग आमची वरात, सतरंजी, पाण्याचा तांब्या, एक काठी, पत्ते असा जामानिमा घेऊन परत गच्चीत जायची .. आमच्या गच्चीत प्रत्येक जिन्याजवळ छान शेड होती .. कावळे, चिमण्या ह्यांना आमच्या पापड्यांमध्ये चोची मारता येऊ नयेत ह्याकरता राखण करण्यासाठी म्हणून बरोबर काठी घेऊन आमचं बस्तान मग उरलेल्या दिवसासाठी वर गच्चीत असायचं .. मग सगळ्यात आधी सगळ्या गच्चीची पहाणी करून आज कुठेकुठे काय आहे ते बघून घ्यायचो .. कुणाच्या पापड्या हव्या त्या स्टेजपर्यंत आलेल्या दिसल्या की ताव मारायचो .. काही निरागस(:दिवा:) गृहिणी कैर्‍यांनां मीठ मसाला लावून गच्चीत ठेऊन द्यायच्या .. त्यांनां बहुदा लवकरच कळलं असावं की अशा पद्धतीने लोणचं केलं तर फारच कमी भरतं .. मला अगदी स्पष्ट आठवतंय की आमच्या शेजारच्या मारवाडी काकूंनींच ठेवल्या होत्या अशा कैर्‍या आणि दिवसभर आम्ही आमचा हात साफ करून जेमतेम काहीच फोडी शिल्लक ठेवल्या होत्या .. सगळ्याच फस्त केल्या तर फार वाईट दिसेल आणि ह्या काकू आमच्या सख्ख्या शेजारी तेव्हा आमच्या बालमनाला पेलेल एव्हढ्या लाजेकाजेस्तव त्या थोड्या फोडी शिल्लक ठेवल्या आम्ही .. आता आठवलं की त्यांचं थोडं का असेना पण आम्ही नुकसान केलं ह्याबद्दल वाईट वाटतं पण दुसर्‍याच क्षणी असं लाटून, चोरून खाऊन मिळालेल्या आनंदापायी सगळं विसरायला होतं .. आणि ह्यातली खरी गोम अशी आहे की हे सगळं कोणी मुद्दाम हातात आणून दिलं असतं तर त्याची मजा नसती .. हे असं ढापून, चोरून केलं ह्यातच ती खरी मजा ..

गच्चीतल्या ईतर पदार्थांवर ताव मारून झाला की मग आम्ही आमच्या सतरंजीवर स्थिरस्थावर व्हायचो आणि मग पत्ते कुटायचा कार्यक्रम चालायचा .. नुसती मुलमुलंच असलो तर तासन् तास चॅलेंज खेळायचो .. कोणी मोठी मंडळी असली की मग बदामसात, झब्बू (ते सुद्धा एकेरी!), लॅडीस (हा खरा शब्द नक्की काय आहे ते जाणून घ्यायचा अजूनही प्रयत्न केलेला नाही) असे 'मोठ्यांचे' खेळ खेळायचो .. मग पत्त्यांनीं पोट भरलं की अजून एक आवडीचा, फक्त उन्हाळ्याच्या सुटीत होत असलेला कार्यक्रम असायचा तो म्हणजे 'रसना' पीणे .. ऑरेंज, कालाखट्टा हे लाडके फ्लेवर त्यातले .. खरंतर ह्या रसना वगैरेंसारख्या छोट्या छोट्या पण परमोच्च आनंदाच्या गोष्टींसाठी एक वेगळा लेख लिहायला हवा ..

पापड करतानाच्या आठवणी बर्‍याच जणींनीं त्या लेखात आधीच लिहील्या आहेत तशाच माझ्याही आठवणी .. पापडांपेक्षा त्या लाट्याच इतक्या चविष्ट लागतात ती मजा आता पैसे देऊन लाट्या विकत घेतल्या तर येईल का हा प्रश्न पडतो .. आमचे शेजारी मारवाडी होते त्यामुळे त्यांच्याकडे तर फार मोठं प्रस्थ असायचं पापडांचं .. रोजच्या चहाबरोबर पापड भाजून खायचे ते लोक .. त्यामुळे त्यांच्याकडे ही गर्दी असायची पापड करायच्या दिवशी! मग थोडे पापड लाटून झाले, बर्‍याचशा लाट्या "लाटून" झाल्या की मग बच्चेकंपनी आपापल्या खेळांत मश्गूल व्हायची ..

आता ना ते बालपण राहिलं, ना त्या मारवाडी काकूंचा शेजार, आणि ना ती मराठमोळी सोसायटी ..आहेत त्या कायम स्मृतीत रहातील अशा वाळवण-साठवणांशी निगडीत बालपणीच्या या हृद्य आठवणी ..

पण मी वर म्हंटलं तसं या हृद्य आठवणींबरोबर एक क्लेशदायक आठवणही आहे माझी .. आमच्या सोसायटीतल्या एक काकू मोठ्या प्रमाणावर पापड करायच्या .. बहुतेक त्या विकायच्या पापड करून .. तर एक दिवस गच्चीत त्यांचे पापड वाळत घातलेले होते .. त्यादिवशी दुपारी मी गच्चीत गेले आणि अजून दोन-तीन टाळकी दिसली त्यांच्याबरोबर खेळायला सुरूवात केली .. ह्या टाळक्यांमध्ये एक माझ्या पेक्षा ४-५ वर्षांनीं मोठी असलेली एक मुलगी होती जी आपसूकच आमचा म्होरक्या होती, तिचा माझ्याच वयाचा धाकटा भाऊ आणि अजून एक मुलगा जो माझ्यापेक्षा दोन वर्षांनीं लहान ..तर कुठल्या कारणाने ते आठवत नाही पण असा बूट निघाला की त्या काकूंच्या वाळत घातलेल्या पापडांवरून दोरीच्या उड्या मारायच्या, स्कूटर चालयायची .. आणि आम्ही ते केलं!!! Sad करून झाल्यावर जाणीव झाली काय केलं त्याची आणि मग साळसूदपणे घरी निघून गेलो .. त्यादिवशी संध्याकाळी गच्चीत खेळायला जाण्याऐवजी मी घरीच एका मैत्रिणीबरोबर खेळणं पसंत केलं .. पण अर्थातच आमचं कर्तुत्व काही लपून राहिलं नाही आणि चांगला मोठा ओरडा खावा लागला .. माझ्या आई-वडिलानां किती वाईट वाटलं असेल ते आता लक्षात येतंय .. त्या काकू आता नाहीत पण त्यांचं केव्हढं नुकसान झालं असेल ते आता जाणवतंय .. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे मला स्वतःला ही कृती करताना काहीच वाटू नये, असं करू नये हे अजिबातच सुचू नये ह्याचं सगळ्यात जास्ती वाईट वाटतंय! असो, जे व्हायचं ते होऊन गेलं पण ही एक क्लेशदायक आठवण मात्र जन्मभर माझ्यासोबत राहील ..

पण ऑल-इन-ऑल उन्हाळ्याची सुटी, वाळवण-साठवण आणि त्याच्याशी निगडीत या मजेदार आठवणी हा एक कायम आनंद देणारा ठेवा आहे माझ्याजवळ! या आठवणी निघाल्या की लहानपण देगा देवा, आम्हां पापड्यांचा ठेवा असंच म्हणावसं वाटतं!

प्रकार: 

सशल छान लिहिलयस Happy
गच्ची बद्दल खरच खुप खुप आठवणी असतात. माझ्या माहेरच्या घरालाही गच्ची आहे (आज खुप आठवण आली घरची)

मस्त, त्या दिवसातल्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी आपण एकाच बिल्डींगमधे राहत होतो की काय असे वाटण्याईतपत साम्य!! खूप धन्यवाद. Happy

मस्त लिहिलं आहेस.
माझ्या दोन आठवणींचा झब्बू दिल्याशिवाय राहवत नाहीये.
मी वाड्यात रहायचे, घरासमोर मोठं अंगण होतं. आईने कोपर्‍यात नुकत्या साबूदाण्याच्या पापड्या घातल्या होत्या. मी धांदरटाप्रमाणे ते विसरून खेळण्याच्या नादात त्यावरून जोरात घसरून पडले होते. सर्व वाळवणाचा सत्यानाश! आईचा जोरदार फटकाही मिळाला होता Sad

नंतर एकदा (मी कोपर्‍यात ठेवलेल्या वाळवणाचा उद्योग केल्याने) घरासमोरच बटाट्याचा कीस घातला होता, आणि बाजूने जायला वाट ठेवली होती. माझ्या वडिलांचे एक मित्र समोरून झपाझप चालत आले आणि आम्ही त्यांना काही सांगण्याच्या आत थेट कीसावर पाय देऊन जोरदार घसरून पडले होते. आम्हाला एकीकडे हसू दाबणं अशक्य झालं होतं, आणि दुसरीकडे आईसाठी वाईटही वाटलं होतं. त्या काकांची अवस्था तर फारच चमत्करिक! एकाबाजूने सगळे बटाट्याचे लगदे चिकटलेले! Lol आईची शेकडो वेळा माफी मागत घाईने तसेच परत गेले ते! Lol

सशल. अजूनही त्या आठवणीचा सल राहिलाय, ते वाचून समाधान वाटले. लहानपणी आपण कधी कधी अचानक क्रूरपणे वागायचो.

सशल, झब्बू चांगलाय. आई हे हे करायची ह्या आठवणीच राहिल्यात. मी लाट्या वगैरे कधीच खायचे नाही. आया धन्य होत्या आपल्या. काय तो उत्साह नी उरक त्यांचा.

वाळायला ठेवलेल्या कैरीच्या फोडी, तो ठराविक पॉईंट वगैरे <<< डिट्टो Lol
आणि व्हायचे असे की, एकदा खायला सुरुवात केल्यावर अगदीच अपराधी वाटेपर्यंत पुन्हा तोंडात टाकायचा मोह काही केल्या आवरायचा नाही.

अगदी आपण एकाच बिल्डींगमधे राहत होतो की काय असे वाटण्याईतपत साम्य!>> अगदी.. भ्रमाला अनुमोदन Happy

मस्तच लिहीलेस आहे.. आमचा पण भरदुपारी तोच धंदा असायचा.. स्वतःचे राखायचे नि दुसर्‍यांचे चोरायचे.. Wink त्या वाळत घातलेल्या कैर्‍या-चिंच खाण्याची मजा काही औरच.. Proud नि इतके करून मग शंका येउ नये म्हणून पसरून ठेवायचे... Lol

छान लिहिलयस सशल. आवडले.
मोठ्या वयातल्या गच्चीवरच्या आठवणी पण लिही आता Proud

मस्तच लिहिलय...सगळ्या अशाच आठवणी जाग्या झाल्या... मीसुद्धा ही काम आनंदाने करायचो.
धन्यवाद सशल.
हह चा पण एक छान लेख होता बालपणींच्या आठवणींवर.. सगळ असच अक्ष॑रशः तंतोतंत जुळणार... लिंक आहे का कुणाकडे ?

जाता जाता..
>>> गृहकृत्यदक्ष, सुगरण वगैरे वगैरे सुगृहिणींप्रमाणे माझी आई..
असं आपल्या आईबद्दल लिहू शकणारी आपली शेवटचीच पिढी... नाही ?

असं आपल्या आईबद्दल लिहू शकणारी आपली शेवटचीच पिढी... नाही ?
>> असं का बरं वाटतं जीएस? नविन पिढीतली पोरे पण लिहीतील की मोठे झाल्यावर अशा आठवणी. फक्त विशेषणं आणि पदार्थांची नावे- प्रकार यात फरक असेल Happy

मी लिहीलेला लेख माझ्याजवळही नाही. पण पुर्वी लिहून पोस्ट केला तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून इतक्या सार्‍या लोकांचं (/मायबोलीकरांचं) बालपण डिट्टो आपण जे उद्योग केले तस्सच गेलं हे पाहून फार आश्चर्य वाटलेलं. Happy

फक्त विशेषणं आणि पदार्थांची नावे- प्रकार यात फरक असेल>> हहला टोटल अनुमोदन. Happy
आई ही भावना आहे. पदार्थ कुठले आणि सुगरणपणाच्या कसोटीवरील मार्क हे कालबाह्य झाले. आईचे म्हणून कुठलेही मनःपूर्वक केलेले पदार्थ असोत, त्यात आईपण असते.
तसेच निगुतीने स्वतः केलेल्या पदार्थांद्वारे प्रेम/ कौशल्य व्यक्त होणे ही त्या पिढीची खासियत होती, जीवनक्रमही होता. आपल्या मुलांना आई वेगळ्या गोष्टींद्वारे आठवेल कदाचित. काय फरक पडतो. ? Happy

परत एकदा धन्यवाद! Happy

आणि व्हायचे असे की, एकदा खायला सुरुवात केल्यावर अगदीच अपराधी वाटेपर्यंत पुन्हा तोंडात टाकायचा मोह काही केल्या आवरायचा नाही.

गजानन, हो खरंय अगदी!

नि इतके करून मग शंका येउ नये म्हणून पसरून ठेवायचे...

यो रॉक्स, अगदी अगदी! पीते दूध डोळे मिटूनी! :p

मोठ्या वयातल्या गच्चीवरच्या आठवणी पण लिही आता फिदीफिदी

HH, लिहायला हव्यात खरंच .. तुम्हाला वाचून मजा नाही आली तरी मला आठवून गुदगुल्या नक्कीच होतील .. तेव्हा तेच पुढचं लेखन प्रॉजेक्ट! :p

गृहकृत्यदक्ष, सुगरण वगैरे वगैरे सुगृहिणींप्रमाणे माझी आई..

जी एस्, HH आणि रैना .. तुम्हाला अनुमोदन .. सुगरण म्हणूनच असं नाही पण "माझ्या आईसारखं सँड्विच बाकी कोणीच रचू शकत नाही!" असं नक्कीच म्हणेल माझा मुलगा! Happy

मी लिहीलेला लेख माझ्याजवळही नाही. पण पुर्वी लिहून पोस्ट केला तेव्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून इतक्या सार्‍या लोकांचं (/मायबोलीकरांचं) बालपण डिट्टो आपण जे उद्योग केले तस्सच गेलं हे पाहून फार आश्चर्य वाटलेलं

HH, मग लिही ना परत .. मी नव्हता वाचला तुझा लेख! अगदी मनावर घे परत लिहायचं .. मलाही अजून एक विषय सूचतोय (तुझ्या आणि अनिलभाईंच्या आवडीचा विषय ;)) तो म्हणजे लहानपणीचे खेळ .. (एक लेख लिहीला तर भलताच (अर्ध्या हळकुंडाने पिवळा होण्याचा) कॉन्फीडंस आला म्हणायचा मला! :p

परत एकदा धन्यवाद! Happy

बरं बरं, छोटीशीच काडी होती, एकदम पेट घेउ नका. Happy
आपल्या मुलांना असे काही अनुभवायला मिळणार नाही असे वाटले वाचता वाचता, पण त्याबद्दल अगदीच दवणे मोडात न जाता लाईटली लिहिले...

>> इतक्या सार्‍या लोकांचं (/मायबोलीकरांचं) बालपण डिट्टो आपण जे उद्योग केले तस्सच गेलं हे पाहून फार आश्चर्य वाटलेलं

अगदी अगदी... तो बर्फाचा गोळा वगैरे तर अजून आठवतं. बरचसं बालपण तो गोळा न खाताच गेल त्यात अळ्या असतात आणि मीठ टाकल्यावर त्या बाहेर येतात, या भीतीपोटी...

जीएस्, ती "काडी" होती हे तूच कबूल केलंस म्हणून ही विशेष टिपणी.. :p

असं आपल्या आईबद्दल लिहू शकणारी आपली शेवटचीच पिढी

असं आपल्या आईबद्दल लिहू शकणारी आपली शेवटची पिढी असली तर मग असं आपल्या बाबांविषयी कौतुकाने लिहावसं वाटेल आपल्या मुलांनां अशा बाबांची पहिली पिढी होण्याचा मान मिळवू शकेल का आपली पिढी .. Wink :p

मस्त लिहिलेय सशल. आमच्याकडे बाल्कनीतच आई सगळी वाळवणं घालायची त्यामुळे गच्चीतल्या आठवणी नाहीत काही Proud
पण ते पापड्या पळीने घालणं, दगड गोळा करणं सेम अगदी. ३-४ वाजता पापड्या उलट्या करायला जाणं हे सर्वात आवडतं काम. एक पापडी उलटी करायची पुढची गट्टम करायची Happy

Pages