वाळवण, साठवण - एक मजेदार आठवण!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मिनोती च्या ह्या लेखामुळे माझ्या लहानपणच्या आठवणीही अगदी उफाळून आल्या .. उन्हाळातल्या सुट्टीत केलेल्या गोष्टींमध्ये ह्या वाळवण, साठवणींशी निगडीत आठवणी पहिल्या पाचांत असतील बहुदा ..

तर मध्यमवर्गीय, मराठमोळ्या, महाराष्ट्रियन, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे सुगृहिणींप्रमाणे माझी आईही बराच मोठा घाट घालायची दरवर्षीच्या उन्हाळ्यात .. साबुदाण्याच्या पापड्या (ह्याला बरेच लोक चिकोड्या की चिकवड्या म्हणतात), साबुदाणे आणि बटाटे ह्यांच्या चकल्या, कुरडया, सांडगे, कूटाच्या मिरच्या, क्वचित कुठल्या वर्षी बटाट्याचा कीस, उडदाचे पापड हे सर्व करायची .. त्याचबरोबर कैरीचा छुंदा आणि ईतर काही साठवण प्रकारांत मोडणारे प्रकार जसं की धने, जीरे, बडिशेप इत्यादी पदार्थांची वाळवणं असायची ..

माझं बालपण गेलं एका बहुतांश मराठमोळ्या मोठ्ठ्या सोसायटीत .. आमच्या सोसायटीत तीन बिल्डींग्ज, इंग्रजी 'सी' शेपमध्ये आणि तीन्हीं बिल्डींग्ज च्या गच्च्या एकमेकांनां जोडलेल्या .. त्यामुळे माझ्या लहानपणच्या (लहानपणच्याच काय ती सोसायटी सोडली तेव्हापर्यंतच्या) सगळ्या सगळ्यांत गच्ची हा अविभाज्य घटक आहे .. तेव्हा आई करायची ती वाळवणं झालीच पण सोसायटीतल्या बाकीच्या गृहिणीही भरपूर वाळवणं करायच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची गच्ची पापड, चकल्या, सांडगे, कूटाच्या मिरच्या, छुंदे, लोणच्यासाठीच्या मसाला लावून ठेवलेल्या कैर्‍या असल्या विविध पदार्थांनीं भरलेली असायची .. तर अशा ह्या दिवसातल्या माझ्यी आठवणी दोन कॅटेगरीतल्या .. पहिली म्हणजे कुठल्याही मी बालपण घालवलं तशा सोसायटीत रहाणार्‍या मुलांची (मुलींची म्हणू फार तर) आणि दुसरी आहे एक थोडीशी क्लेशदायक आठवण (क्लेशदायक नक्की कोणासाठी किंवा जास्त क्लेशदायक नक्की कुणासाठी हे ठरवणं मुश्कील आहे ..)

वार्षिक परिक्षा संपून उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की मी वाट बघत असायचे आईचा वाळवणांचा सीझन कधी चालू होणार त्याची .. बर्‍याच वेळा मी भुणभूण करायला लागले की तिला 'कामं करायला सुरूवात करते पण भुणभूण आवर' असं होत असावं .. तर सगळ्यांत पहिली तयारी म्हणजे ती मला दगड गोळा करून आणायला सांगायची .. वाळवणासाठी वापरायच्या जुन्या चादरी, साड्या आणि प्लास्टीकच्या शीट्स ह्यांच्या कोपरांवर वजन म्हणून ठेवण्यासाठी हे दगड .. त्यात तिला विटा, पोखरून माती सांडणारे दगड नको असायचे .. गुळगुळीत, गोट्यासारखे दगड शोधून गच्चीत एकत्र करून ठेवणे ही पहिली स्टेप .. बाकी तिच्या रेसिप्या वगैरे काही मला ठाऊक नाहीत पण एव्हढंच लक्षात आहे की पापड्यांसाठी ती भिजवून ठेवलेला साबुदाणा शिजवायची तेव्हा एक वेगळाच मजेशीर असा वास यायचा आणि त्या वासाने जाग यायची सकाळी .. मग तिचं मिश्रण शिजवून झालं की आधी गच्चीत जाऊन ती आणि मी खाली साडी किंवा चादर आणि वर एक प्लास्टीकची शीट आंथरून, थोड्या थोड्या अंतरावर त्यावर दगड ठेवून सगळा जामानिमा करून यायचो .. मग घरी येऊन गरम गरम मिश्रण वर घेऊन जायचं आणि पळीने पापड्या घालायच्या .. पापड्या घालण्याचं एकच काम तिच्या दृष्टीने सोपं, मला त्या वयात झेपणारं असावं .. कारण ईतर पदार्थ करण्यात मी तिला काहि मदत केलेली आठवत नाही .. बाकीच्या पदार्थांसाठी माझ्यावाटची कामं म्हणजे ते ते पदार्थ वाळले की सोडवून बरण्यांत भरायचे किंवा गच्चीवरून ने-आण करायला मदत करायची .. एकावेळी एका भांड्यातलं मिश्रण शिजेपर्यंत दुसर्‍या तयार मिश्रणाच्या पापड्या घालून संपवायच्या मग दुसरं भांडं घेऊन यायचं असं तिचं गणित ठरलेलं होतं .. मला पापड्या घालण्यासाठी म्हणून एका छोट्या भांड्यात काढून द्यायची ती मिश्रण आणि मग छोट्या पळीने मी घालायचे .. अशा त्या पापड्या घालून होईपर्यंत सुरूवातीला घातलेल्या पापड्यांच्या कडा वाळून त्या सुकायला सुरूवात व्हायची .. मग सारखं त्या पापड्यांनां हात लावून ती उचलता येण्याइतपत सुकलीये का ते बघायचं .. सारखं हात लावून बघणं आईला आवडत नसावं पण त्या पापड्या वाळण्याच्या प्रक्रियेत एका ठराविक वेळेलाच त्या पापड्या खाण्यात सगळ्यात जास्त मजा येते .. तेव्हा तिच्या बोलण्याचा फार उपयोग होणार नाही हे तिलाही माहित असावं .. आमच्या घरच्या पापड्या असतील तेव्हा हा कार्यक्रम असायचा नाहितर मग सकाळी १०-११ च्या सुमारास गच्चीत फेरी मारून यायचोच आम्ही कोणाच्या वाळत घातलेल्या पापड्या त्या ठरावीक पॉइंटला येऊन खाण्यायोग्य झाल्या आहेत का ह्याची पाहणी करायला .. मग काही सुगरणी विविधरंगी पापड्या करत त्या मला फार आवडायच्या .. आईकडे खुप वेळा हट्ट करूनदेखील कृत्रिम रंगांचा वापर नको ह्या सबबीवर ती टाळायची रंगीत पापड्या करणं .. तसंच माझी मावशी काही वेगळ्याच प्रकारे करायची पापड्या .. म्हणजे असं पळीवाढे मिश्रण शिजवून पळीने घालण्याऐवजी मला लक्षात आहे त्याप्रमाणे ती हिंगाच्या निळ्या रंगाच्या चपट्या डब्या वापरून करायची पापड्या .. अशा मी फक्त बाजारी विकतच्या पापड्या बघितल्या आहेत .. त्या एकसारख्या गोल असतात आणि त्यातले साबुदाणे पण अगदी शिस्तबद्ध दिसतात .. ह्या पापड्या बहुदा जास्ती फुलतात ..

तर ह्या पापड्या घालून झाल्या की मग खाली येऊन बाकीचं आटोपून मग आमची वरात, सतरंजी, पाण्याचा तांब्या, एक काठी, पत्ते असा जामानिमा घेऊन परत गच्चीत जायची .. आमच्या गच्चीत प्रत्येक जिन्याजवळ छान शेड होती .. कावळे, चिमण्या ह्यांना आमच्या पापड्यांमध्ये चोची मारता येऊ नयेत ह्याकरता राखण करण्यासाठी म्हणून बरोबर काठी घेऊन आमचं बस्तान मग उरलेल्या दिवसासाठी वर गच्चीत असायचं .. मग सगळ्यात आधी सगळ्या गच्चीची पहाणी करून आज कुठेकुठे काय आहे ते बघून घ्यायचो .. कुणाच्या पापड्या हव्या त्या स्टेजपर्यंत आलेल्या दिसल्या की ताव मारायचो .. काही निरागस(:दिवा:) गृहिणी कैर्‍यांनां मीठ मसाला लावून गच्चीत ठेऊन द्यायच्या .. त्यांनां बहुदा लवकरच कळलं असावं की अशा पद्धतीने लोणचं केलं तर फारच कमी भरतं .. मला अगदी स्पष्ट आठवतंय की आमच्या शेजारच्या मारवाडी काकूंनींच ठेवल्या होत्या अशा कैर्‍या आणि दिवसभर आम्ही आमचा हात साफ करून जेमतेम काहीच फोडी शिल्लक ठेवल्या होत्या .. सगळ्याच फस्त केल्या तर फार वाईट दिसेल आणि ह्या काकू आमच्या सख्ख्या शेजारी तेव्हा आमच्या बालमनाला पेलेल एव्हढ्या लाजेकाजेस्तव त्या थोड्या फोडी शिल्लक ठेवल्या आम्ही .. आता आठवलं की त्यांचं थोडं का असेना पण आम्ही नुकसान केलं ह्याबद्दल वाईट वाटतं पण दुसर्‍याच क्षणी असं लाटून, चोरून खाऊन मिळालेल्या आनंदापायी सगळं विसरायला होतं .. आणि ह्यातली खरी गोम अशी आहे की हे सगळं कोणी मुद्दाम हातात आणून दिलं असतं तर त्याची मजा नसती .. हे असं ढापून, चोरून केलं ह्यातच ती खरी मजा ..

गच्चीतल्या ईतर पदार्थांवर ताव मारून झाला की मग आम्ही आमच्या सतरंजीवर स्थिरस्थावर व्हायचो आणि मग पत्ते कुटायचा कार्यक्रम चालायचा .. नुसती मुलमुलंच असलो तर तासन् तास चॅलेंज खेळायचो .. कोणी मोठी मंडळी असली की मग बदामसात, झब्बू (ते सुद्धा एकेरी!), लॅडीस (हा खरा शब्द नक्की काय आहे ते जाणून घ्यायचा अजूनही प्रयत्न केलेला नाही) असे 'मोठ्यांचे' खेळ खेळायचो .. मग पत्त्यांनीं पोट भरलं की अजून एक आवडीचा, फक्त उन्हाळ्याच्या सुटीत होत असलेला कार्यक्रम असायचा तो म्हणजे 'रसना' पीणे .. ऑरेंज, कालाखट्टा हे लाडके फ्लेवर त्यातले .. खरंतर ह्या रसना वगैरेंसारख्या छोट्या छोट्या पण परमोच्च आनंदाच्या गोष्टींसाठी एक वेगळा लेख लिहायला हवा ..

पापड करतानाच्या आठवणी बर्‍याच जणींनीं त्या लेखात आधीच लिहील्या आहेत तशाच माझ्याही आठवणी .. पापडांपेक्षा त्या लाट्याच इतक्या चविष्ट लागतात ती मजा आता पैसे देऊन लाट्या विकत घेतल्या तर येईल का हा प्रश्न पडतो .. आमचे शेजारी मारवाडी होते त्यामुळे त्यांच्याकडे तर फार मोठं प्रस्थ असायचं पापडांचं .. रोजच्या चहाबरोबर पापड भाजून खायचे ते लोक .. त्यामुळे त्यांच्याकडे ही गर्दी असायची पापड करायच्या दिवशी! मग थोडे पापड लाटून झाले, बर्‍याचशा लाट्या "लाटून" झाल्या की मग बच्चेकंपनी आपापल्या खेळांत मश्गूल व्हायची ..

आता ना ते बालपण राहिलं, ना त्या मारवाडी काकूंचा शेजार, आणि ना ती मराठमोळी सोसायटी ..आहेत त्या कायम स्मृतीत रहातील अशा वाळवण-साठवणांशी निगडीत बालपणीच्या या हृद्य आठवणी ..

पण मी वर म्हंटलं तसं या हृद्य आठवणींबरोबर एक क्लेशदायक आठवणही आहे माझी .. आमच्या सोसायटीतल्या एक काकू मोठ्या प्रमाणावर पापड करायच्या .. बहुतेक त्या विकायच्या पापड करून .. तर एक दिवस गच्चीत त्यांचे पापड वाळत घातलेले होते .. त्यादिवशी दुपारी मी गच्चीत गेले आणि अजून दोन-तीन टाळकी दिसली त्यांच्याबरोबर खेळायला सुरूवात केली .. ह्या टाळक्यांमध्ये एक माझ्या पेक्षा ४-५ वर्षांनीं मोठी असलेली एक मुलगी होती जी आपसूकच आमचा म्होरक्या होती, तिचा माझ्याच वयाचा धाकटा भाऊ आणि अजून एक मुलगा जो माझ्यापेक्षा दोन वर्षांनीं लहान ..तर कुठल्या कारणाने ते आठवत नाही पण असा बूट निघाला की त्या काकूंच्या वाळत घातलेल्या पापडांवरून दोरीच्या उड्या मारायच्या, स्कूटर चालयायची .. आणि आम्ही ते केलं!!! Sad करून झाल्यावर जाणीव झाली काय केलं त्याची आणि मग साळसूदपणे घरी निघून गेलो .. त्यादिवशी संध्याकाळी गच्चीत खेळायला जाण्याऐवजी मी घरीच एका मैत्रिणीबरोबर खेळणं पसंत केलं .. पण अर्थातच आमचं कर्तुत्व काही लपून राहिलं नाही आणि चांगला मोठा ओरडा खावा लागला .. माझ्या आई-वडिलानां किती वाईट वाटलं असेल ते आता लक्षात येतंय .. त्या काकू आता नाहीत पण त्यांचं केव्हढं नुकसान झालं असेल ते आता जाणवतंय .. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे मला स्वतःला ही कृती करताना काहीच वाटू नये, असं करू नये हे अजिबातच सुचू नये ह्याचं सगळ्यात जास्ती वाईट वाटतंय! असो, जे व्हायचं ते होऊन गेलं पण ही एक क्लेशदायक आठवण मात्र जन्मभर माझ्यासोबत राहील ..

पण ऑल-इन-ऑल उन्हाळ्याची सुटी, वाळवण-साठवण आणि त्याच्याशी निगडीत या मजेदार आठवणी हा एक कायम आनंद देणारा ठेवा आहे माझ्याजवळ! या आठवणी निघाल्या की लहानपण देगा देवा, आम्हां पापड्यांचा ठेवा असंच म्हणावसं वाटतं!

प्रकार: 

रॅबिटल, तू लिहायला लागलीस परत हे उत्तम झाले. आता लिही अजून.

>>>असं आपल्या आईबद्दल लिहू शकणारी आपली शेवटची पिढी असली तर मग असं आपल्या बाबांविषयी कौतुकाने लिहावसं वाटेल आपल्या मुलांनां अशा बाबांची पहिली पिढी होण्याचा मान मिळवू शकेल का आपली पिढी .<<<
वा काय पण काडी!! Wink

Kaay sashal? Surwaatila ekdam kleshdayak vagaire lihilas aani pudhe tya mulicha aani tichya bhavacha description taaklas ter mala waatla ha lekh "waliv aala baya" chya maargani challay ki kaay. Don minute bhiti waatli. Wink

Masta lihilalays, ekdam nostalgic! Happy

मस्त लेख. अजून लिहीत जा ना.
त्या साबुदाण्याच्या पळीच्य पापड्या मधे अचूक वेळ म्हणजे कडेने पूर्न सुकलेल्या, मध्यभागी लुबलुबीत मौ ओला भाग. त्यात मीठ व खसखशेची चव, वरून त्याला अंमळ पापुद्रा धरलेला ही होती खाण्याची.

हिंगाच्या डब्याच्या झाकणाच्या पापड्याही मी केलेल्या आहेत आईबरोबर. स्टीम करत ठेवायच्या. त्या खरेच फार व्यवस्थित दिसतात. आम्ही एकदा चुन्याच्या हिरव्या डबीची झाकणे वापरली होती व ती स्टीमर मध्ये त्यांचे कानवले झालेले. ( आजच्या आपल्या मावे अपघातांसारखे. )

तांदुळाच्या पापड्याही टीअर ड्रॉप सारख्या पत्र्यावर घालून स्टीम करायच्या. त्याही अर्ध्या सुकलेल्या मस्त व्हायच्या.

मस्त लिहीलंय सशल, माझ्याकडे कुरडया/पापड्या पेक्षा शेवयांच्या आठवणी जास्त आहेत. क्लेशदायक आठवण एकदम टचिंग, त्यावर मी पण झब्बु देउ शकेन ! लिहीत रहा.

सशल.. गोड गोड लिहिलयंस..
लहानपणच्या या गमती,खोड्या मनातून कधीच पुसल्या जात नाहीत..

आई ही भावना आहे. >>>>>>रैना अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतं हा अमुक एक पदार्थ कुणीही केला तरी माझ्या आईच्या हातची चव नाही त्याला.
बाकी सशल मस्त लिखाण!

धन्यवाद सगळ्यांनां .. Happy

अनु, दे की झब्बू! मग मलाही थोडं बरं वाटेल की माझ्यासारखं वाईट खोड्या काढणारं अजूनही कोणी होतं ते वाचून! Wink

अमा, हो स्टीम करायच्या त्या पापड्या ..

पौर्णिमा, तू ही धांदरट होतीस वाटतं लहानपणी .. Happy

मस्त मस्त !!
तो ठराविक पॉइंट....आठवूनच तोंडाला पाणी सुटले.
शंका येऊ नाही म्हणून पुन्हा पसरवून ठेवायच्या.....:हाहा: सेम पिंच.

छान लिहीलय Happy

रसना आणि कालाखट्टा.... नुसतं वाचुन तोंपासु... अत्ता प्याव वाटतय Happy
इथे मिळत नाही पण Sad देशवारीत आणायच्या लिस्ट मधे टाकलं Happy

छान लिहिलंयस सशल...माझ्या अशा कोणत्याच आठवणी नाहीत वाळ्वण किंवा साठवणीच्या राखणीच्या कारण स्वैंपाकघरात कधी चुकूनही फिरकायचे नाही मी. पण नवर्‍याच्या मात्र अशा आठवणी भरपूर आहेत. Proud

त्या पापड्या वाळण्याच्या प्रक्रियेत एका ठराविक वेळेलाच त्या पापड्या खाण्यात सगळ्यात जास्त मजा येते >> अगदी अगदी! तो मुहुर्त साधताना तप म्हणजे काय याची किंचीत जाणिव व्हायची - वैशाखातल्या सूर्याचे ते शितळ ऊन आणि तितकीच प्रेमळ आईची बोलणी Happy पण मग ती थोडीचीच वाळलेली पापडी जिभेवर पडली की स्वर्ग !! आणि तो चीक शिजताना पातेल्याला येणारे पापुद्रे खायला मला प्रचंड आवडायचे.

रसना आणि कालाखट्टा.... नुसतं वाचुन तोंपासु... अत्ता प्याव वाटतय >> लाजो तो रसनाचा खोका आणला की मी हवेत तरंगायला लागायचो आणि तो रसना बनवायचा सोहळा - पाऊण किलो साखर, सहा कप पाणी त्या लहनशा बाटलीतले द्रावण आणि ती पाकिटातली पावडर आणि ते सगळे ढवळताना तोंडाला सुटणारे पाणी Happy इतके झाले की मग आईकरता ताटकळावे लागायचे कारण ती पावडर सरबतात येऊ नये म्हणून ते मिश्रण पंचाने गाळावे लागायचे आणि राडा होऊ नये म्हणून आई ते काम मला करू द्यायची नाही. काय दिवस होते - मुलगा काम करतो म्हणून लकडा लावतोय आणि आई त्याला ते करु देत नाहिये Happy

रच्याकने ती आठ्वण 'सुखद' रहावी असे वाटत असेल तर आत्ताचे रसना अजिबात पिउ नकोस Sad

सशल, मस्त अनुभव! आमच्याकडे बटाट्याचा कीस घालण्यात बाबा एकदम पटाईत. त्यांचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे तो त्यामुळे तो करण्यातही त्यांचाच पुढाकार असायचा. आई फक्त चवीची काळजी घ्यायची.

आमच्या साठवणींच्या आठवणीत आईबरोबर बाबाही आहेत. त्यांनीच आम्हाला साळसूदपणे दादरे दूर करून लोणची/ छुंद्याच्या चवी बघायला शिकवलं. पण चवीच फक्त, कारण नंतर वाटीभर नमुना घरी येणारच याची त्यांना खात्री असायची. Happy

झब्बू देताहेत बरेच जण म्हणुन माझा पण

एका वर्षी आईने केलेले पापड लाटताना थोडे चिकट वाटत होते, रंग थोडा जास्तच गडद वाटत होता, लवकर सुकले नाहीत . आई , मावशी , आत्या , शेजारच्या काकू सगळ्या मिरची जास्त भाजलेली असेल, उडदाच्या पीठात काही तरी मिक्स असेल, पापडखार चांगला नसेल वगैरे म्हणत होत्या.
चवीला पण जरासे वेगळे लागत होते . पण नेमकं काय बिघडलंय ते कोणालाही नक्की कळलं नाही. दोन तीन दिवसांनी त्यातले पापड जेवणात भाजले होते. वडिलांनी पहिला घास घेतला अन म्हणाले ' अरे , प्रॉटिन्यूल्सचे पापड ? नवाच प्रयोग दिसतोय पापडाला हेल्थी बनवायचा! ' तेंव्हा भावाने सांगितलं की पीठ, मिरची वगैरे कालवलेलं होतं अन आई एखाद मिनिट इकडे तिकडे गेली असेल तर त्याने त्या मिश्रणात प्रोटिन्यूल्स घातलेलं कपभर दूध ओतून दिलं होतं.

त्याच्या पुढच्या वर्षी त्याची रवानगी दुसर्‍या आत्याकडे करून मगच आईने सगळा घाट घातला होता.

धन्यवाद, धन्यवाद! Happy

आर्च, हो .. फुटके हात आणि गळकं तोंड, विध्वंसक कार्टी, लबाड कोंबडी अशी काही विशेषणं मला बहाल झाली होती .. :p

सशल सही आठवणी. माझी आई उडदाचे पापड करून घ्यायची कोणाकडून तरी पण बाकीचे साबुदाणा, ज्वारी बाजरीच्या पापड्या कुरडया तर कधी शेवया केल्यात त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सशल, रम्य आठवणी!! Happy
अगदी आपण एकाच बिल्डींगमधे राहत होतो की काय असे वाटण्याईतपत साम्य!! >> अगदी अगदी!

मस्त लिहिले आहे सशल. आवडले.
त्या अर्धवट वाळलेल्या पापड्या काय सही लागतात पण. छान आठवणी जाग्या झाल्या. Happy

सशल आज वाचला तुझा लेख, मस्तच झालाय एकदम..
माझ्याही आठवणी थोड्या फार फरकाने सेम टू सेम.
आमच्या घरी सांडगे, पापड वगैरे प्रकार घडत नसत.. पण शेजार्‍यांकडे हमखस जायचो आम्ही.. शिवाय त्या सगळ्यांचे वाळवण आमच्या घराच्या पत्र्यांवर कारण आम्ही ४थ्या मजल्यावर रहायचो. त्यामुळे त्यांचे ओले सांडगे, पापड, शेंगा काहीही आणि कितीही पळवलं तरिही आम्हाला माफ असे.. Happy

रसना आणि कालाखट्टा.... नुसतं वाचुन तोंपासु... अत्ता प्याव वाटतय >> लाजो तो रसनाचा खोका आणला की मी हवेत तरंगायला लागायचो आणि तो रसना बनवायचा सोहळा - पाऊण किलो साखर, सहा कप पाणी त्या लहनशा बाटलीतले द्रावण आणि ती पाकिटातली पावडर आणि ते सगळे ढवळताना तोंडाला सुटणारे पाणी स्मित इतके झाले की मग आईकरता ताटकळावे लागायचे कारण ती पावडर सरबतात येऊ नये म्हणून ते मिश्रण पंचाने गाळावे लागायचे>>>>>> डिट्टो! अगदी अगदी परफेक्ट!

लेख मस्तच. कुरडया, वडे, बिबट्या हे सगळं अर्धवट सुकलेलं खाण्याची मजा जबरीच! आणि लाट्या अरे देवा! आई आधी फक्त लाट्या खाण्यासाठी पीठ भिजवायची. उरलं तर छोट्या पुर्‍या करुन तळायच्या. अगाई ग! मग आमची मनं आणि पोटं डब्बं भरली की पापड करायला घ्यायची. मजा यायची खरच. डोक्याला रुमाल बांधुन, स्लीपर घालुन ९.३०-१० ला वडे, सांडगे, पापड्या, कुरडया घालण्याचे ते दिवस काय होते खरच! मग खाली आलो काम संपवुन की बाबा थंडगार ऊसाचा रस, रसना वगैरे तयार ठेवायचे. धमाल मज्जा! Happy

Pages