चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)

Submitted by शर्मिला फडके on 10 February, 2010 - 22:23

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.
'चित्रपट का आवडला' हे लिहिताना जरी ते तितकसं महत्वाचं नसलं तरी चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार व्हायला हवा. हे रसग्रहण कसं केलं जावं हेही शिकावं लागतं.
बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, कॉश्च्युम डिझायनरची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या दिग्दर्शकांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोत्क रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. पण समिक्षा लिहिताना कोणीच ह्याची काळजी घेत नाही. नव्हे समिक्षकांनाही ते उमगलेले असतेच असे नाही.

मंथनमधे स्मिता पाटीलच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या दाखविण्यासाठी बेनेगल आणि स्वतः स्मितानेही खूप मेहनत घेतली होती. लोकेशनवर अक्षरशः तापलेल्या मातीच्या जमिनीवर स्मिता कित्येक दिवस अनवाणी चालत होती तसा लूक येण्यासाठी.

उत्सव मधला पिवळ्या रंगाचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर, किंवा त्याकाळातले गणिकांचे दागिने आणि गृहिणींचे दागिने यातला बारकाईचा फरक (जो भन्सालींच्या देवदासमधे अजिबात केलेला नव्हता) वगैरे टिपलं गेलं की चित्रपटाच्या रसग्रहणात मोलाची भर पडते.
लगानच्या वेशभुषेबद्दल बोलताना भानू अथैयाजींनी किती बारकाईने विचार केला होता! लगान चित्रपटाचा जो काळ सुरुवातीला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकरांनी निवडला होता त्या काळाला अनुसरुन भानू अथैयाजींनी वेशभुषेचा टोन मळकट आणि गडद निवडला होता. आमिर खानला तो खटकला आणि त्याने रंग जास्त ब्राईट वापरायला सुचवले. भानूजींनी नकार दिला. त्या म्हणाल्या तुम्ही चित्रपटाचा काळ दहा वर्षांनी पुढे केलात तर तुम्हाला हवी ती शेड मला देता येईल. आमिर-आशुतोषला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले. थोड्या वर्षांच्या फरकानेही फॅब्रिकच्या पोतामधे, रंगामधे कधी कधी फरक पडू शकतो. अर्थातच हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यातले नसेलही पण तरी अत्यंत महत्वाचे आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजय लिला भन्सालीच्या सावरिया चित्रपटात इतका निळ्या टोनचा वापर का केला आहे अशा अर्थाचे एक पोस्ट या धाग्याच्या सुरुवातीला arc ने टाकले होते. त्यासंदर्भात ' कलर सिम्बॉलिजम इन सावरिया' हे वाचा. इन्टरेस्टींग आहे नक्कीच.

नीधप आणि शर्मिला फडके माहीतीपुर्ण पोस्ट्स!
वरची लिंक वाचली. असा विचार कधी केलाच नव्हता. आता 'हम दिल दे चुके सनम' मधला नयनरम्य रंगांचा वापर आठवतोय. अतिशय 'देखणा' आहे सिनेमा. डोळ्यांना मेजवानीच!

शनिवारच्या लोकसत्तामध्ये शुभांगी गोखलेंचा 'प्रॉपर्टी' विषयावर लेख आहे. लेख प्रामुख्याने मालिका आणि नाटकांविषयीचा आहे. पण 'प्रॉपर्टी' किती महत्वाची असते, त्याचा अभिनयावरदेखील कसा परीणाम होउ शकतो, कॅमेरामन/ दिग्दर्श्काचे प्रॉपर्टी वेड कसे दृष्याला मारक होऊ शकते हे त्यांनी मस्त अधोरेखीत केले आहे.

चित्रपटाची कथा, त्याची भौगोलिक , सामाजिक पार्श्वभूमी व कालखंड समजावून घेउन योग्य कलाकार व योग्य संवादांच्या आधारे पुढे नेली तरच प्रेक्षकांना त्या सिनेमाचा परिपूर्ण अनुभव येऊ शकतो. नाहीतर काही काही गोष्टी, दातात अडकलेल्या सुपारीसारख्या छळत राह्तात व रसभंग करतात. उदाहरणादाखल
१. ’गुरू’ मधे ’बरसो रे’ गाण्यात गुजराथी ऐश्वर्या नाचते आहे केरळ मधल्या चिम्ब निसर्गामधे. नाचाच्या हालचाली चमत्कारिक, गुजराथी खेड्यामधली तरुणी काही ती वाटत नाही.
२. ’ओंकारा’ मधे बिपाशा बसु चे कपडे किती आधुनिक, केस सळसळते, देह्बोली किती शहरी.. जणु मुम्बईच्या नाईट क्लब मधुन बाहेर पडली आहे.
३. ’३ मूर्ख’ मधे बोमन, करीना व मोना कुठल्या बाजूने ’सहस्त्रबुध्दे’ वाटतात? बोमनचे केस असे पिंजारलेले का? करीनाचा चष्मा सध्याच्या फ़्याशनीचा का?

नाही नीधप, तुमची माहीती चुकीची नाहीये. ती बरोबरच आहे. या सगळ्या प्रकारात मोडणार्‍या चित्रपटांसाठी खूप खर्च येतो. इथे आपल्या भारतात वेगवेगळ्या अनुशंघाने विचार करणार प्रेक्षकवर्ग आहे त्यामुळे सर्वांनाच अ‍ॅनिमेशनपट, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट असणारे चित्रपट आवडत नाही. मिर्चमसाला असणारे, रोना-धोना असणारे चित्रपट आवडतात आपल्या इथे जास्त असे माझे मत. त्यात दिग्दर्शकाला यासारखे चित्रपट चालतील कि नाही याचं भुत मानगुटीवर अगदी मुहूर्तापासुनच बसलेलं असतं. त्यामुळे स्पेशल इफेक्टची गरज असेल तेवढा भाग इथे किंवा थेट परदेशात जाऊन शुट करवून घेण्यालाच त्यांची जास्त पसंती असते. पण हे चित्र बदलायला हवं ना?

फक्त तुलना करा आपल्याकडचा जोधा अकबर हा सिनेमा लॉर्ड ऑफ रींग्स सारखा बनला असता तर?

सर्वात आधी शर्मिला फडकेंचं अभिनंदन इतका सुंदर धागा सुरु केल्याबद्दल. Happy

खूप छान चर्चा चालू आहे. नीधप, दिनेशदा, आपल्या पोस्ट्स खास आवडल्या..

ह्म्म.. मला वाटतं की आपण सिनेमा पहायला जातो तेव्हा आपले काय निकष असतात याचा आधी विचार झाला पाहिजे. आतापर्यंत चर्चा फक्त क्लासिक मूव्हीज वर झाली असं वाटलं मला. कधी कधी हलके फुलके मूव्हीज पण पहायला खूप छान वाटतात. उदा. ह्रुषिकेश मुखर्जींचे. फक्त जड, अवघड सिनेमेच भारी असं काही नसावं. कारण सिनेमा हे कथा मांडायचं माध्यम आहे. पण मुख्य मुद्दा हा आहे की कोणतीही कथा मांडताना ती जास्तीत जास्त परफेक्ट करायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. वर आतापर्यत झालेल्या चर्चेचं हेच तात्पर्य वाटतय मला. मग भलेही तो मसाला मूव्ही असो. टर्मिनेटर सारखा सिनेमा बनवताना पण.. आणि हा अभ्यास करणे सिनेमा बनवणार्‍यांची जबाबदारी आहे. शेवटी ते ही आपल्यासारखेच लोकं असतात त्यामुळे आपली चलता है ची वृत्ती त्यांच्यातही असतेच. अर्थात ही दुर्दैवाची बाब आहे. एखादा चुकीचा संदर्भ किंवा विधान अख्ख्या सिनेमातला इंटरेस्ट घालवु शकतं त्यामुळे या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे.
असो, इतिहास सांगतो, जे महान झाले ते खरं तर परफेक्शनिस्ट होते. आणि हेच पुढेही होत राहिल. Happy फील इट चा मुद्दा खूप महत्वाचा. हे फील करुन देणं हीच खरी कला आहे बाकी नुसतीच गर्दी. आणि आपल्याला जाणवलेलं प्रत्येकाला त्याच इंटेंसिटीने मांडता येईल असं नाही त्यामुळे प्रत्येकच वेळी आपल्याला मिळालेली अनुभूती नाही दुसर्‍याला देऊ शकत. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.:-)

जे महान झाले ते खरं तर परफेक्शनिस्ट होते.>> पण सिनेमाच्या कोणत्या बाबीत परफेक्शन हा मुद्दा उरतोच. तांत्रिक गोष्टी, डिटेलींग यातले परफेक्शन आपल्याकडे परंपरेनेच जरा कमी आहे.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' मधे कॅमेरामन फाळक्यांना म्हणतो; 'शंकराच्या मागे फणसाचं झाड येतयं, त्यावेळी असतील फणसाची झाडं?' फाळके क्षणभरच विचार करुन म्हणतात, 'ते जाउदे, गोष्ट महत्वाची!'
ह्या एका वाक्यात भारतीय चित्रपटाचा सगळा इसेन्स उतरला आहे, कपडे,मेकअप,लोकेशन,रिसर्च,सेट या सर्वापेक्षाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कथा, ती जर उत्तम,पकडून ठेवणारी असेल तर आपले प्रेक्षकही इतर डीटेल्सकडे लक्ष देत नाहीत.
अमर अकबर अँथनी निरुपा रॉयला रक्तदान करताहेत, तिघांचेही रक्त गुरुत्वाकर्षणाच्याविरुद्ध दिशेने वर टांगलेल्या बाटलीत जाते आणि तिथे 'मिक्स' होऊन या महामातेच्या अंगात, असा सीन आहे.या अशक्य प्रसंगाबद्द्ल मनमोहन देसाईंनी म्हटलयं, 'मला माहिती आहे की हे चूक आहे,पण लोक जेंव्हा हा प्रसंग पाहतात तेंव्हा ते तिकडे लक्षच देत नाहीत,कारण त्यांच्यासाठी आईपासून दुरावलेली तीन मुले, तिलाच नकळत रक्त देऊन वाचवतात यातले प्रचंड नाट्य, मेलोड्रामा इतका भारावून टाकणारा असतो' मला वाटतं इथे देसाईदेखील फाळक्यांचाच मुद्दा मांडत आहेत-'गोष्ट महत्वाची'

आगाऊ, पण कथा तरी तितकी पकड घेणारी हवी ना ?
मी कालच ब्लो नावाचा सिनेमा बघितला. अमेरिकेत १९७०-७२ च्या दरम्यान ड्रग चा बिझिनेस सुरु करणार्‍या एका व्यक्तीवर (सत्यकथा) हा चित्रपट बेतलेला आहे. सत्यघटना असल्यामूळे जे जे घडले तेच दाखवलेय. मुख्य भुमिकेत जॉनी डेप आहे. नायिका पेनेलोप क्रुझ असूनही, तिचा प्रवेश अर्धा सिनेमा संपल्यावरच होतो.
हा काळ माझ्या स्मरणातला आहे. या चित्रपटातला कपडेपट, केशरचना इतक्या योग्य आहेत कि त्या काळातलाच सिनेमा वाटतो. इतकेच नव्हे तर फ्रेममधे दिसणारी प्रत्येक गोष्ट, मग ते विमान असो, विमानतळ असो कि गाडी असो. सगळे त्या काळातलेच आहे.

मग मला आपल्याकडचे चित्रपट आठवले. अनेक चित्रपटात दोन पिढ्या दाखवलेल्या असतात (आराधना, घईचा सौदागर, अमर प्रेम, मौसम.. कधी कधी मोठा काळ दाखवलेला असतो.. उदा. शोले..)
यात कलाकारांची वेशभूषा सोडली तर कुठेही काळाचा प्रभाव जाणवत नाही. नेमका कुठला काळ आहे तेही कळत नाही.

अनुमोदन दिनेशदा,
झालच तर लोकांना नुसतं भावनिक करुन पैसा वसूल करुन घेणं यात त्या माध्यमाविषयी काय प्रेम, आदर आला? याही पेक्षा भावनिक दृश्यं मायनर डीटेल योग्य स्वरुपात दाखवुन चित्रित केलेली नाहियेत का?

दिनेशदा, मुद्दा मान्य.
माझं म्हणणे एवढेच आहे की, प्रत्येक देश-संस्कृतीप्रमाणे चित्रपटाची परिभाषा आणि त्यात कशाला जास्त महत्व द्यायचे हे बदलणार. अर्थात मुक्ता म्हणते त्याप्रमाणे किमान डीटेल्सतरी दाखवायला काहीच हरकत नसावी.

गेले काही दिवस गचाळ इंग्लीश चित्रपट बघावे लागताहेत. बघावे लागताहेत कारण चांगले कलाकार म्हणून सिडीज आणल्या होत्या.
एक होता नेक्स्ट थ्री ईयर्स. रसेल क्रो चा सिनेमा. बायको खूनाचा आरोपावरुन जेलमधे आणि हा तिला सोडवायचा धाडसी प्लान करतो. प्रचंड बोअर सिनेमा. कंटीन्यूटी च्या असंख्य चूका. मूळात त्या सगळ्या प्लानमधे फारसे थ्रिलिंग काही नाही. रसेल आता अजिबात फिट वाटत नाही.

दुसरा मॅट चा होता. नाव पण विसरलो. भविष्याचा प्लान वगैरे. यात रोमन एंपायरपासून अध्यक्षीय निवडणुकांपर्यंत अनेक विषय आहेत. पण पडद्यावरील सादरीकरण. एकदम बकवास. संवादातला चमकदारपणा कुठे दृष्यरुपात दिसतच नाही. आणि मॅट पण आता अनफिट वाटतो. चेहर्‍यावर भावच उमटत नाहीत त्याच्या.

त्याचाच आणखी एक बघितला, हिअरआफ्टर. मृत लोकांशी संवाद साधू शकणारा एक तरुण, मृत्यूचा अनुभव घेतलेली एक पत्रकार आणि जूळा भाऊ अपघातात वारलेला एक छोटा मुलगा. तिघांच्या समांतर कथा. पण कथा पूर्णपणे गंडलीय. शेवटी ते दोघे का एकत्र येतात, याचे उत्तरच मिळत नाही.

हे तिन्ही अजिबात बघण्यासारखे नाहीत.

पण वातावरण निर्मितीचे एक उत्तम उदाहरण म्हणून मी, ऋषी कपूर, नितू सिंगचा दो दुनी चार, हा चित्रपट सांगेन. दिल्लीतले मध्यमवर्गीय जोडपे त्या दोघांनी, अगदी चपखल उभे केलेय. दोघांचे हातवारे, संवाद अगदी परफेक्ट. (नितू घरात आल्यावर फ्रिजमधून पाण्याची बाटली काढते आणि ग्लासात पाणी ओतून पिते. थेट बाटली तोंडाला लावत नाही.. असे बारकावे आहेत.) यातही मेलोड्रामा आहे. किंचीत उपदेशही आहे. पण कुठे व्यावसायिक तडजोड केल्यासारखी वाटत नाही.

मनमोहन देसाई याच रक्तदानाच्या दृष्यावर यावर अन्य एका मुलाखतीत काय म्हणाले होते माहित्ये?
याच दृष्याचा संदर्भ देऊन एकाने मनमोहन देसाईंना "तुम्ही असले आचरट सिनेमे का बनवता?" असं विचारलं असता त्यांनी "हिंदी चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकाचं सरासरी मानसिक वय तेरा आहे असं आम्ही मानतो" असं उत्तर दिलं होतं. आता बोला.

हे त्या काळात ठिक होतं. पण नंतर ज्यावेळी चांगले आशयपूर्ण चित्रपट आले, ते प्रेक्षकांनी उचलून धरलेच कि. आता तर फॉर्म्यूला असे काही उरलेलेच नाही.

ह्या एका वाक्यात भारतीय चित्रपटाचा सगळा इसेन्स उतरला आहे, कपडे,मेकअप,लोकेशन,रिसर्च,सेट या सर्वापेक्षाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कथा, ती जर उत्तम,पकडून ठेवणारी असेल तर आपले प्रेक्षकही इतर डीटेल्सकडे लक्ष देत नाहीत.<<<<
कॅच २२ की व्हिशस सर्कल की तसंच काहीश्याचं करेक्ट उदाहरण रे....
सिनेमा/ नाटक ही गोष्ट सांगायचीच माध्यमं आहेत. गोष्ट महत्वाची आहेच पण ती परिणामकारकरित्या दाखवण्यासाठीच बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या जेथल्या तेथ येण्याला गोष्टीच्या दृष्टीने महत्व आहे.

ह फॅ मधल्या प्रसंगात 'गोष्ट महत्वाची' या वाक्याचा/ संकल्पनेचा एस्केपिस्ट(चपखल मराठी शब्द?) पद्धतीने लावलेला अर्थ मला जाणवतो. आणि तो एस्केपिस्ट संदर्भ घ्यायचा तर हो बर्‍याचश्या भारतीय चित्रपटाचा सगळा इसेन्स उतरलाय. पण बिचारे फाळके.. त्यांचं काम असं एस्केपिस्ट नव्हतं.

"दिवसभर चाळीतल्या त्या पत्र्याखाली बसून त्याच्या अंगाची काहिली झाली होती. गाड्यांचे आवाज मेंदू पोखरतायेत असं वाटत होतं. विषण्ण मनाने त्याने खिडकबाहेर पाहिलं. समोर मोर नाचत होता.." एखाद्या कथेत हे वाचलं तर कसं वाटेल. कथा कितीही चांगली असली तरी वातावरणनिर्मिती करणार्‍या गोष्टी चुकून चालत नाही. तसच आहे सिनेमाचं. कथा कितीही चांगली असली तरी मायनर डीटेलिंगला महत्व आहेच.

सुरेख धागा आणि चर्चा. काही चित्रपट व्हिज्युअल ट्रीट असतात. पाथेर पांचालीचे उदाहरण बरेचदा आले आहे आणि सर्वपरिचित आहे. (ट्रेन येते तो प्रसंग तर अफलातून आहे.)

परदेशी चित्रपटंमध्ये श्रेयनामावलीत सिनेमॅटोग्राफर म्हणून गॉर्डन विलीस हे नाव दिसले तर चित्रपट चुकवू नये. गॉदफादर, ऑल द प्रेसिडेंट्स मेन. नटाच्या चेहेर्‍यावर भरपूर प्रकाश टाकून त्याच्या चेहेर्‍याची प्रत्येक रेषा दाखवायलाच हवी हा प्रघात त्यांनी मोडला. गॉडफादरचे त्यांचे बरेचसे अंधारात केलेले चित्रण याचे एक उदाहरण.

कदाचित यामुळेच वूडी अ‍ॅलनला मॅनहॅटनसाठी विलीसच आठवले. अ‍ॅलनच्या आठवणीतील न्यू यॉर्क कृष्णधवल होते म्हनून हा चित्रपटही त्याने तसाच काढला. सगळा चित्रपट म्हणजे डोळ्यांना मेजवानी आहे. एक प्रसंग माझा फेवरिट आहे. अ‍ॅलन आणि डायाना किटन रात्रभर न्यू यॉर्कमध्ये फिरत असतात. गप्पा मारता मारता पहाट होते. ते दोघे एका बाकावर बसलेले, पार्श्वभूमीमध्ये क्वीन्सबोरो ब्रिज आणि नुकतीच पहाट होते तसा प्रकाश. त्या दोघांच्या फक्त प्रोफाइल दिसतात, खाली तिचा कुत्रा.

6a00d8341c191353ef01157027207d970b-800wi.jpg

>फ्रेम न फ्रेम, सीन न सीन...... अमर्याद, मनमुराद शिक्षण आहे!!
खरे आहे. गॉडफादरची 'डायरेक्टर्स कट' डीव्हीडी पाहिली आहे का? नसल्यास जरूर बघा. त्यात कपोलाची कॉमेंट्री आहे. शूटींग करताना काय अडचणी आल्या, कोण चुकले, सगळे तो सांगतो. सुरूवातीच्या शॉटमध्ये ब्रँडोच्या मांडीवर जे मांजर आहे, ते असेच सेटवर फिरत असे. कपोलाने शॉटच्या आधी ते उचलून ब्रँडोला दिले. काही न सांगता ब्रँडोच्या लक्षात आले आणि तो शॉट त्याने मांजराला मांडीवर खेळवत दिला. Happy

>नितू घरात आल्यावर फ्रिजमधून पाण्याची बाटली काढते आणि ग्लासात पाणी ओतून पिते. थेट बाटली तोंडाला लावत >नाही.. असे बारकावे आहेत.

जुन्या गोलमालमध्ये असाच प्रसंग आहे. सुरूवातीला अमोल पालेकर घरी येतो, बाथरूममध्ये हात-पाय धुतो आणि टेबलाशी येऊन बसतो. बहिणीला मॅचबद्दल सांगत असतो. बाथरूमचे दार तसेच उघडे ठेवतो. दोन सेकंदांनी गप्पा चालू ठेवत बहीण दार ओढून घेते. Happy

@ मी मुक्ता ~ "कथा कितीही चांगली असली तरी वातावरणनिर्मिती करणार्‍या गोष्टी चुकून चालत नाही."

~ १००% सहमत. जगभरच्या चित्रपटनिर्मिती क्षेत्रात 'राशोमोन' चे स्थान केवळ वादातीत असून चित्रपट कलेचा अभ्यास करणार्‍यांनी, समीक्षकांनी हा चित्रपट सातत्याने डोक्यावर उचलून धरला आहे. त्याला कारण चित्रपटात कुरोसोवाने केलेली जादूभरी वातावरण निर्मिती. किती लहानखुरे कथानक आहे राशोमोनचे ! एक सामुराई प्रवासी आपल्या पत्नीसोबत जंगलातून जात असताना एक डाकू त्याना पाहतो. कपटाने नवर्‍याला बंदी करून स्त्रीला भोगतो. नवरा मरतो. पत्नी पळून जाते. पोलिस डाकूला पकडतात. इतकेच. काय नाट्य आहे या कथेत ? पण केवळ धो-धो पाऊस आला आहे आणि त्या ऐतिहासिक वा प्राचीन राशोमोन मंदिरात तीन प्रवासी पाऊस थांबण्याची वाट पाहात आहे आणि त्यातील एकाने नुकतेच 'काहीतरी भयानक' पाहिले आहे. तो बाकीच्या दोघांसमोर आपला अनुभव शब्दबध्द करीत आहे. इथून सुरू होते एक जीवघेणी तगमग !

अकिरा कुरोसावा केवळ एका भयाण रात्रीतील घटना सांगत नाही तर निव्वळ वातावरणनिर्मितीचे अनेकविध कंगोरे प्रेक्षकांसमोर उलगडून दाखविताना तात्कालिन सामाजिक परिस्थितीही ठळकपणे समोर आणतो. 'क्योटो, बारावे शतक, दुष्काळ आणि लढाया यानी उद्ध्वस्त झालेली राजधानी' हे टायटल संपताक्षणीच पडद्यावर येणारे वाक्य फारच बोलके आहे. त्या काळातील कोणताही थेट प्रसंग न दाखविता रौद्र स्वरूपाचा संततधार पाऊस आणि हे वाक्य याचा जबरदस्त पगडा प्रेक्षकावर पडतो आणि तो त्या तीन प्रवाशांपैकीच एक होऊन 'त्या रात्री' घडलेली घटना सुन्नपणे ऐकत राहतो.

अशा पठडीतील चित्रपट निर्मितीमुळेच वातावरण किती प्रभावीपणे परिणामकारक ठरू शकते हे आपण जाणू शकतो. संवादाला कमीतकमी महत्व देऊन प्रेक्षकालाच चित्रपट समजून घेण्याचे आवाहन करण्यात दिग्दर्शकाचे कौशल्य असले पाहिजे.

तसे पाहिला तर हा विषय म्हणजे एकप्रकारे "पॅण्डोरा बॉक्स"च आहे. प्रतिसादातून चित्रपटांची लखलखीत रुपे बाहेर येत आहेत असेच वाचताना मत बनत चालले आहे.

Happy सुंदरच लिखाण प्रतीक..

वातावरणनिर्मितीचं निर्विवाद महत्व कळतं ते भयपट पहाताना. काय असतं त्यात? वातावरणनिर्मितीवर ७०% इफेक्ट अवलंबून असतो. त्यामुळे हीच बाब इतर चित्रपटांनाही लागू होते.

थॅन्क्स मुक्ता. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भयपट निर्मितीमध्ये वातावरणाला अनन्यसाधारण महत्व असतेच. 'सायको' हा रुढार्थाने भयपट नव्हे तरीही नॉर्मन बेट्सच्या टेकडीवरील गूढ घराची अशी काही भीती मनी ठसते की प्रेक्षक भोवर्‍याच्या केन्द्रबिंदूकडे नकळत खेचलाच जातो. हा कृष्णधवल वातावरण निर्मितीचा सारा प्रताप.

बर्ट लॅन्केस्टर अभिनित व जॉन फ्रॅन्कनहायमर दिग्दर्शित "ट्रेन". विमान हल्ल्यापासून रेल्वे इंजिनाचा बचाव करण्याचे तीन मोटरमनचे जिवापाड आकांताचे प्रयत्न, विमानातून रेल्वे ट्रॅकवर होणारा अविरत गोळ्यांचा मारा आणि भन्नाट वेगाने धावणारे, किंचाळणारे ते फक्त रेल्वे इंजिन आणि बर्टची इंजिन कसेबसे बोगद्यापर्यंत आणण्याची कसरत आणि मग तिथे करकचून ब्रेक दाबणे व बोगदा संपण्यापूर्वी इंजिनाला कसेही थांबवणे हे पाहताना प्रेक्षकही त्या तीन मोटरमनपैकी एक बनून जातो. आजही ते दृष्य पाहताना आपलेही पाय नकळत जणू काही इंजिनला ब्रेक लावण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत असाच भास होतो. शेवटी अगदी बोगद्याच्या तोंडाशी आल्यावर गाव जत्रेतील शर्यतीच्या आत्यंतिक श्रमाने एखादा बैल धापलावा त्याप्रमाणे त्या काळ्याकभिन्न इंजिनचे उसासून थांबल्या जागेवर धूर ओकणे, त्या तिघांचे घामाने निथळणे, एकमेकाकडे पाहणे आणि सारे काही नि:शब्द !

शब्दांना अजिबात स्थान नसताना दहा मिनिटाचे ते दृष्य अमर ठरते ते केवळ वातावरणनिर्मितीचे महत्व दिग्दर्शकाने जाणल्यामुळेच.

प्रतीक देसाई,
"सायको" बद्दल पूर्ण सहमत, विशेषतः शेवट तर लाजवाब केलाय. Happy
"ट्रेन" पाहिला नाही, पण आता नक्की पाहीन.

भयपटावरून आणि वातावरणनिर्मितीचे महत्व यावरून अजून एक चित्रपटाचा दाखला द्यावासा वाटतोय, तो म्हणजे स्टॅनले क्युब्रिकचा "द शायनिंग". या चित्रपटात तसं पाहिलं तर टिपिकल भयपटांसारखं काहीच नाहीये. जेव्हा प्रथम मी पाहायला सुरूवात केली, तेव्हा सुरूवातीला काही वेळ काहीतरीच प्रकार आहे असं वाटायला लागतं. पण नंतर ज्याप्रमाणे वातावरण निर्मिती केली गेलीय, प्रचंड मोठं होटेल, त्यात राहणारं हे कुटुंब आणि इतर मोजक्या व्यक्ती. तो मुलगा तर नुसता होटेल मध्ये जेव्हा त्याची सायकल की काय फिरवत असतो, पण ते इतकं परिणामकारक रित्या घेतलंय की उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. जॅक निकोलसन ने नेहेमीप्रमाणेच कहर अभिनय केलाय. पिक्चर नुसता चढत जातो, आणि क्लायमॅक्स ला जेव्हा जॅक वेडा झालेला दाखवलाय, ते तर निव्वळ अप्रतिम.

मस्त धागा आहे. आधीचे सर्व पोस्ट्स अजून वाचले नाहीयेत. जर "द शायनिंग" चा उल्लेख केला गेला असेल, तर क्षमस्व.. Happy

प्रतीक, सायको बद्दल सहमत. त्या चित्रपटाचा प्रभाव इतका झालेला की त्या वर्षी बाथटब ची विक्री प्रचंड प्रमाणात घटली होती.

निवडुंग, स्टॅनले क्युब्रिक.. काय भारी नाव घेतलत. Happy

सायको नंतर रंगीत पण आला होता ना ? मूळात सर्व फ्रेमचा विचार करत, त्यात दिसणार्‍या प्रत्येक घटकाचा वातावरणनिर्मितीसाठी उपयोग करुन घ्यायला पाहिजे.

कागज के फूल मधला तो क्लासिक शॉट. सेटवरची बैलगाडी, तिच्यावरचा तो प्रकाशझोत, वहिदाचा थोडासा हेवी मेकप आणि तिच्या हातात दिसेल न दिसेल असे विणकाम.. चित्रपटाची कथा माहीत नसेल तरी या एका शॉटमधून सर्व कल्पना येते.

Pages