चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)

Submitted by शर्मिला फडके on 10 February, 2010 - 22:23

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.
'चित्रपट का आवडला' हे लिहिताना जरी ते तितकसं महत्वाचं नसलं तरी चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार व्हायला हवा. हे रसग्रहण कसं केलं जावं हेही शिकावं लागतं.
बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, कॉश्च्युम डिझायनरची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या दिग्दर्शकांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोत्क रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. पण समिक्षा लिहिताना कोणीच ह्याची काळजी घेत नाही. नव्हे समिक्षकांनाही ते उमगलेले असतेच असे नाही.

मंथनमधे स्मिता पाटीलच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या दाखविण्यासाठी बेनेगल आणि स्वतः स्मितानेही खूप मेहनत घेतली होती. लोकेशनवर अक्षरशः तापलेल्या मातीच्या जमिनीवर स्मिता कित्येक दिवस अनवाणी चालत होती तसा लूक येण्यासाठी.

उत्सव मधला पिवळ्या रंगाचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर, किंवा त्याकाळातले गणिकांचे दागिने आणि गृहिणींचे दागिने यातला बारकाईचा फरक (जो भन्सालींच्या देवदासमधे अजिबात केलेला नव्हता) वगैरे टिपलं गेलं की चित्रपटाच्या रसग्रहणात मोलाची भर पडते.
लगानच्या वेशभुषेबद्दल बोलताना भानू अथैयाजींनी किती बारकाईने विचार केला होता! लगान चित्रपटाचा जो काळ सुरुवातीला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकरांनी निवडला होता त्या काळाला अनुसरुन भानू अथैयाजींनी वेशभुषेचा टोन मळकट आणि गडद निवडला होता. आमिर खानला तो खटकला आणि त्याने रंग जास्त ब्राईट वापरायला सुचवले. भानूजींनी नकार दिला. त्या म्हणाल्या तुम्ही चित्रपटाचा काळ दहा वर्षांनी पुढे केलात तर तुम्हाला हवी ती शेड मला देता येईल. आमिर-आशुतोषला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले. थोड्या वर्षांच्या फरकानेही फॅब्रिकच्या पोतामधे, रंगामधे कधी कधी फरक पडू शकतो. अर्थातच हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यातले नसेलही पण तरी अत्यंत महत्वाचे आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेकड्यातल्या ९९% वेळा समिक्षकांना आवाडलेली कलाक्रुती विशेषत: चित्रपट हे लोकांना आवडत नाही, इथे मधे कुठेतरी प्रचंड disconnect आहे असे मला नेहमी वाटते, असे का ह्यावर कधी कोणी अभ्यास केला आहे का ? नीरजा अधिक माहिती देऊ शकेल असे वाटते.<<
अरे हे राहून गेलं होतं.
उत्तर योग्य असेलच असं नाही. सगळ्यांना पटेलच असं नाही. आवडेलच असं तर मुळीच नाही. भारतात लहानाची मोठी होऊन मग परदेशात नाटक या माध्यमातल्या दृक भागाचा अभ्यास करताना भारतीय म्हणून केलेलं आत्मपरीक्षण, परत आल्यानंतर याच क्षेत्रात घेतलेला अनुभव आणि ७-८ वर्ष पदव्युत्तर पातळीवर कॉश्च्युम डिझाइनिंग शिकवातान जाणवलेले, समजलेले हे मुद्दे आहेत, बनलेलं मत आहे. (ही जंत्री कुठलीही व्यासंगिक तलवार म्हणून टाकलेली नाही. संदर्भांचे मूळ म्हणून दिलेली माहीती आहे.)

Film Literacy हा प्रकार भारतात केरळ आणि प. बंगाल सोडला तर बाकीच्या राज्यांमधे नाहीच म्हणायला हरकत नाही. चांगलं बघण्याची भूक लागणं हे पण पहिल्यापासून develope केलं जावं लागतं जसं की वाचनाची सवय. आपल्या संपूर्ण शिक्षणपद्धतीत आणि मराठी(इतर प्रांतीयांचं माहीत नाही म्हणून केवळ मराठी) मध्यमवर्गीय घरात सिनेमा या विषयाबद्दल एक उथळ करमणूक इतपतच जाणीव असते. आता हे बदलतंय निश्चित. पण ते बहुतांशी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर इतपतच. बाकी सगळीकडे निश्चितरित्या बदलतंय असं म्हणता येणार नाही. सिनेमा केवळ मराठीच नव्हे तर कुठल्याही भाषेतला सिनेमा हे आता खरंतर आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. पण आपण अजूनही संस्कृती म्हणल्यावर संगीत नाटक, दिवाणखान्यातलं गद्य नाटक, शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य यापलिकडे बघत नाही. त्यामुळे या संदर्भातल्या जाणिवा समृद्ध व्हायचा एक मार्ग खुंटतो.
शालेय शिक्षणातही चित्रपटांबद्दल असाच उथळ आणि सवंग करमणूक असाच समज असतो. अभ्यास करा ते सिनेमे नाही येणारेत परीक्षेत असा आहेर तर आपण सगळ्यांना मिळाला असेलच. Happy
चित्रपटाचे माध्यम समजून घेणे, मेकिंग समजून घेणे, छोट्या स्तरावर प्रात्यक्षिकाला वाव देणे, चित्रपट बघायला शिकवणे असं बरंच काही शालेय स्तरावर घडू शकतं. पण ते क्वचितच घडताना दिसतं. किंवा नाहीच असं म्हणूया.
तसंच शिक्षणपद्धतीमधे 'बघणं' यालाही महत्व नाही. चित्र आणि शिल्पांपासून नाटक-सिनेमांपर्यंत काहीही 'बघणं' याकडे दुर्लक्ष असतं. इथे बघणं म्हणजे दृश्य संवेदना असं मला म्हणायचंय. खूप सारं बघायला मिळणं हेही महत्वाचं आहे. तेच डोळ्यांवर संस्कार करत असतं पण तिथे दुर्लक्ष झाल्याने आपल्या(शहरातल्या तर जास्तच) दृश्य संवेदना या अगदी ढोबळ प्रकारातलं बघणं इतपतच juvenile रहातात. थोडक्यात दृक हा भागच विसरला गेलेला असतो आपल्या घडण्यामधे.
बनणारे चित्रपटही असे की आपल्या घडण्यामधला दृक भाग राहून गेला असला तरी त्याने फरक पडत नाही. किंवा तेच बनवणार्‍यांच्या पथ्यावर पडत असतं. मग mediocre लाच अत्युच्च दर्जा समजून आपण सेट होतो. आणि त्याबद्दल आपण इतके भावनाप्रधान असतो की आपल्याला जे अत्युच्च दर्जाचं वाटत असतं त्याला mediocre म्हणलं जाणंही आपल्याला खपत नाही.

समीक्षकांच्या संदर्भात म्हणाल तर इतकं काही अस्सल, कमअस्सल, नक्कल असं त्यांनी पाह्यलेलं असतं की दर्जाचा मीटर वेगळीकडे सेट झालेला असतो. त्यात त्या त्या व्यक्तीचं स्वत:चं मत/ आवड हे ही येतंच. एखादी फिल्म अनेक पातळीवर उत्कृष्ट वाटूनही आवडली नाही असं होऊ शकतंच की. माझं झालेलं आहे तर समिक्षकांचं तर होणारच.
बाकी समीक्षक की परीक्षक आणि त्या त्या व्यक्तीचं घडणं याबद्दल आत्ता बोलत नाही.

वरच्या पोस्टमधे "दर्जाचा मिटर" एका वरच्या/वेगळ्या पातळीवर सेट होणे ह्या बद्दल सहमत.
आणि हा दृष्टीकोन तयार होण्यासाठी लहान वयापासून तसे संस्कार झाले पाहिजेत ह्या बद्दल सुद्धा सहमत.

पण तसे घडण्यासाठी लहान मुलांसाठीचे साहित्य, बालनाट्य आणि दृकश्राव्य (films / music videos) इथ पासून सुरूवात झाली पाहिजे. दुर्दैवाने मराठीमधे (थोड्याफार फरकाने इतर भारतीय भाषांमधे सुद्धा) ह्या साठी फारच कमी काम होत आहे.

sesame street, baby einstain आणि इतर अनेक उदाहरणे एकीकडे तर fountain music company सारख्या लहानांच्या गाण्याच्या CDs/ मराठीमधली बालनाट्ये ही उदाहरणे दुसरीकडे.
"चलता है" विचारधारणेचे असे ठळक उदाहरण दुसरं क्वचीतच सापडेल.
निर्मीतीचा खर्च आणि त्यासाठी उपलब्ध पैसा ह्या मधे खूप मोठी तफावत असली तरी सादरीकरणामधला कद्रुपणा नक्कीच जाणवतो आणि खुपतो.

तसे संस्कार (दृश्य संवेदना) लहानपणीच घडले तर, कदाचीत मोठेपणी ह्याची जाणीव होईल.

हो बरोबर. लहानपणापासूनच सगळं विचार आणि कष्टाचं दारीद्र्य मिरवत केलेलच बरचसं बघायला मिळाल्यावर तिथेच मीटर सेट होणार. पण हे प्रयत्नपूर्वक बदलताही येऊ शकतं. मोठं झाल्यावर डोळे उघडले की किंवा मग आईवडिलांचे डोळे पाल्याच्या लहानपणी उघडले की.

नीधप,
चांगले पोस्ट. नवीन विचार मिळाला.
<<मध्यमवर्गीय घरात सिनेमा या विषयाबद्दल एक उथळ करमणूक इतपतच जाणीव असते. आता हे बदलतंय निश्चित. पण ते बहुतांशी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर इतपतच. बाकी सगळीकडे निश्चितरित्या बदलतंय असं म्हणता येणार नाही.>>
माझ्या समजुतीच्या मर्यादेनुसार मला वाटते की जडणघडण कोणत्याही प्रांतात, देशात, खेड्यात, शहरात झालेली असली तरी प्रगल्भ आणि कलात्मक नजरेने पाहण्याचा संस्कार कोठेही राहून घरी करता व जोपासता येतो. आपल्याला बहुधा अभिजात कलाक्रुतींच्या उपलब्धतेबाबत म्हणायचे असेल तरी आजकाल इंटरनेट, DVDs मुळे तोही प्रश्न राहिलेला नाही. असो.

तम्बी दुराई हे सदर श्री. श्रीकांत बोजेवार लिहितात.

>>>पण तसे घडण्यासाठी लहान मुलांसाठीचे साहित्य, बालनाट्य आणि दृकश्राव्य (films / music videos) इथ पासून सुरूवात झाली पाहिजे. दुर्दैवाने मराठीमधे (थोड्याफार फरकाने इतर भारतीय भाषांमधे सुद्धा) ह्या साठी फारच कमी काम होत आहे.

sesame street, baby einstain आणि इतर अनेक उदाहरणे एकीकडे तर fountain music company सारख्या लहानांच्या गाण्याच्या CDs/ मराठीमधली बालनाट्ये ही उदाहरणे दुसरीकडे.

प्रचंड सहमत!!

सध्या वर्तमानपत्रातून जे समीक्षा करताहेत, ते खरोखरच त्या क्षेत्रातले अभ्यासू आहेत का ? त्या लेखनासाठी काहि निकष आहेत का ? आणि जे खरोखरच आभासू लेखन करतात, त्यांचे लेखन सामान्य लोकांपर्यंत पोहोचते का ?

>>प्रगल्भ आणि कलात्मक नजरेने पाहण्याचा संस्कार कोठेही राहून घरी करता व जोपासता येतो. <<
बरोबर तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात(च) हे शक्य आहे हे मान्य. पण संस्कार करणार कोण? संस्कार करणार्‍यांचीच ही सेन्सिबिलिटी जोपासलेली नसेल तर? आणि संस्कार करणारे आईबाप अगदी परीपूर्ण आहेत असं समजलं तरी केवळ आईवडीलच नाही महत्चाची भूमिका निभावणारे या सेन्सिबिलिटीज जोपासण्यात. आजूबाजूचा परीसर, वातावरण, लोक, आजूबाजूची मानसिकता अश्या अनेक गोष्टी आहेत. तसंच तंत्रज्ञानामुळे सगळंच a click away झालेलं नाही. अजून अश्या अनेक गोष्टी, अशी अनेक माहीती, अशी अनेक माणसं नेटवर उपलब्ध नाहीत. तसंच इंटरनेट पेनिट्रेशन हे पण सगळीकडे नाही.

>>सध्या वर्तमानपत्रातून जे समीक्षा करताहेत, ते खरोखरच त्या क्षेत्रातले अभ्यासू आहेत का ? त्या लेखनासाठी काहि निकष आहेत का ? आणि जे खरोखरच आभासू लेखन करतात, त्यांचे लेखन सामान्य लोकांपर्यंत पोहोचते का ?<<
काही जण खरंच अभ्यासू आहेत. वर्तमानपत्रात क्वचित समीक्षा असते. असते ते केवळ परीक्षण. त्याहून जास्त कॉलम्स एका सिनेमाला देता येण्यासारखे नसते. निकष आहेत का किंवा वर्तमानपत्रे काय निकषांवर हे लिखाण घासून बघतात हे असं गोळीबंद सांगता यायचं नाही मला तरी. खरोखरंच अभ्यासू लेखन सामान्य माणसापर्यंत पोचत नाही. प्रभात फिल्म सोसायटीचं रूपवाणी नावाचं एक पब्लिकेशन आहे. बहुतेक मासिक आहे(सध्या प्रभातची मेंबरशिप संपल्याने ते येत नाहीये). ज्यात केवळ चित्रपटविषयक चर्चा असते. प्रभात फिल्म सोसायटीच्या सर्व सभासदांना ते मिळतं. त्याबद्दल तपशीलात उद्यापर्यंत टाकते.

पण हे वगळता मराठीमधे केवळ चित्रपटांना वाह्यलेले (गॉसिप्स, नटनट्यांच्या कित्ती गं बाई गोड प्रकारच्या मुलाखती यापलिकडे जाऊन इथल्या आणि जागतिक चित्रपटांसंदर्भात विवेचन करणारे) दुसरे काही नाही.

कुणीतरी 'टर्मिनेटर'च्या संदर्भातली पोस्ट टाकली आहे त्यावरून आठवलं -
चित्रपट - 'राजू बन गया जंटलमन'. सीन - शाहरुखखानचा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू घेणार्‍यांना तो पटवून द्यायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही अमुक तमुक ऐवजी ढमुक केलंत तर तुमच्या कंपनीचा इतका इतका फायदा होईल. ऐकणार्‍याला त्यात तथ्य वाटतं आणि तो त्याच्या सेक्रेटरीला पुढ्यातल्या कंप्युटरच्या मदतीनं त्याची खात्री करून घ्यायला सांगतो. सेक्रेटरीचा क्लोज-अप. आम्ही तेव्हा कंप्युटर सायन्सचेच विद्यार्थी असल्यामुळे आमचं लक्ष त्या कलाकाराऐवजी कंप्युटर स्क्रीनकडे... तो सेक्रेटरी की-बोर्डावरची काही बटणं दाबतो आणि स्क्रीनवर जुन्या DOS च्या DIR कमांडचं आऊट्पुट !! आता बोला! ती कमांड म्हणजे कंप्युटर सायन्सचं ए,बी,सी,डी (त्या काळातलं.) आमच्या चेहेर्‍यांवर 'हॅत्त तेरे की!' चे भाव...
पण तेव्हा मुळातच कंप्युटर ही गोष्ट तशी अनफॅमिलियर होती थोडी त्यामुळे ते खपून गेलं... 'चलता है' चं अजून एक उदाहरण!

वा सुंदर पोस्ट्स आहेत सगळ्या.

दिनेशदा चित्रपट काय किंवा कोणतीही दृष्यकला काय, तांत्रिक गोष्टींचे ज्ञान किंवा शिक्षण असूनही त्या कलेचे रसग्रहण किंवा समिक्षा परिणामकारकरित्या करता येऊ शकेलच असे नाही. शेवटी ती कला तुम्हाला कशी भिडतेय हे तुमच्या जाणीवा किती विकसित झालेल्या आहेत यावरच अवलंबून असते.
राहूल म्हणतो तसे खरोखरच हे प्रयत्न शालेय पातळीवरच होणे आवश्यक असते.
आणि तुम्ही म्हणताय तसे सामान्य माणसांपर्यंत पोचता येणे हीच त्यातली एकमेव अवघड बाब आहे.

चित्रपट, शिल्प, चित्रे जितकी जास्त पाहू, जास्त निरखू तितकी ती जास्त समजत जातात असं आपण म्हणतो त्यात कुठेतरी शेवटी आपल्या सबकॉन्शसमधल्या कोणत्यातरी अनुभवांना, वैयक्तिक पातळीवर त्या कलाकृती रिलेट होत जातात हेच असावं असं मला वाटतं. कितीवेळा दृष्य पातळीवर कलाकृती बघताक्षणी आवडते, पण ती समजलेली असतेच असं नाही. ठाकुरसिंगांची ओलेती पटकन कळू शकते किंवा म्हात्रेंची शिल्पही पण हेन्री मूरचे चाईल्ड अ‍ॅन्ड मदर नुसत्या घनाकारांतून समजून घेताना त्यावरच्या अव्यक्त भावांना नुसत्या शिल्पांच्या वळणांवरुन समजून घेता येणे खरंच अवघड जाते. दलाल, परांजपे समजायला कधीच अवघड जात नाही पण गायतोंडेंच्या चित्रांमधला लाल रंग किंवा बरवेंच्या चित्रांमधले ते अगम्य आकार आणि वस्तू त्या अवकाशात नक्की का आणि कशा रचल्या आहेत हे कळून घेण्यासाठी थोडा अधिक वेळ द्यावाच लागतो. अचानक कधीतरी एकदा कलाकृती जेव्हा 'समजते' तो क्षण मौल्यवान असतो. थोडा पेशन्स ठेवणे अतिशय गरजेचे असते. कलाकाराने परिश्रमांनी (थोडं नाट्यमय पण खरच बोलायचं तर रक्त आणि घाम गाळून बनवलेली कलाकृती) आपल्यासमोर येते तेव्हा आपण निदान ती समजून घेण्याच्या प्रयत्नांपर्यंततरी पोचायलाच हवं असतं. मुद्दाम उठून म्युझियम्सपर्यंत जाऊन किंवा वेळ काढून परत परत हे सिनेमे पहायला वेळ काढावा लागतो. जाणकारांची त्यावर काय मते होती हे समजून घावे लागते. लोकप्रिय सिनेमे किंवा इतर कलाकृती या सामान्य माणसांना कोणत्याही अतिरिक्त श्रमांशिवाय समजतील, त्याची करमणूक किंवा मनोरंजन होईल या अपेक्षेने बनवलेल्या असतात आणि त्यात चूक काहीच नाही. पण त्यामुळे या सोपेपणाचीच आपल्याला सवय होते. तार्कोव्स्कीचा स्टॉकर पहिल्यांदा पाहणार्‍यांना ती कंटाळवाणी किंवा डोक्यावरुन जाणारी वाटू शकते. नव्हे तशी ती वाटतेच. पण स्टॉकरचा झोनपर्यंतचा प्रवास नक्की का आणि कसा चाललाय हे अचानक लक्षात येण्याचा एक क्षण असतो आणि तो जेव्हा येतो तेव्हा आपलाही प्रवास नकळत स्टॉकरसोबतच चालू होतो.

* मला वाटतं थोडा वेळ काढून जर आपल्यापैकी कोणी किंवा प्रत्येकानेच प्रयत्न करुन एखादी विशिष्ट कलाकृती आपल्याला कशी भिडली, समजली हे लिहायचा इथे प्रयत्न केला तर चर्चा थोडी पुढच्या पातळीपर्यंत जाऊ शकेल. समिक्षा करण्यासाठी कोणत्याही तांत्रिक प्रशिक्षणाऐवजी कलाकृती 'जाणीव'पूर्वक बघणेच कसे आवश्यक असते हेही यानिमित्ताने आपल्या सर्वांना समजून घेता येईल. काय वाटत?

हो शर्मिला, आपं तशी चर्चा करु याच. खुपदा चांगले चित्रपट, उत्तम पब्लिसिटी न झाल्याने, लोकांच्या पाहण्यात येत नाहित. (आणि वाइट्ट चित्रपट, उत्तम पब्लिसिटी मूळे, पहिल्याच दिवशी उत्तम धंदा करतात. )
शिवाय खरेच चांगले चित्रपट, नीट प्रदर्शित होत नाहीत. त्यामुळे लोक बघत नाहित, त्यामुळे पैसा नाही आणि त्यामूळे चांगले चित्रपट येत नाहीत.

नीधप, परिक्षण आणि समीक्षा नेमके वेगळे कसे ओळखायचे ? (आजवर असा विचार केलाच नव्हता !! )
समीक्षा ही क्लिष्टच असावी का ? सामान्याना कळेल, इतक्या सोप्या भाषेत, का नाही असे लेखन होत ?
आपण जे इथे लिहितोय, ते खरेच किती सोपे आहे. असे लेखन मिडीयात कुठेच नसते आणि पुस्तकात देखील नसते.

नीधप, परिक्षण आणि समीक्षा नेमके वेगळे कसे ओळखायचे ? (आजवर असा विचार केलाच नव्हता !! )<<
मला परत १४ वर्षांनी एम ए पार्ट १ च्या परीक्षेला बसल्यासारखं वाटलं.. Happy
मी थोडक्यातच उत्तर द्यायचा प्रयत्न करते.
परीक्षणामधे चित्रपट कितपत चांगला वा वाईट आहे, विषय काय आहे? कशावर आधारीत आहे, कोणाचं योगदान कसं आणि काय पातळीचं आहे इत्यादी गोष्टींचा धावता आढावा असतो.
तर समीक्षेमधे आशय, विषय, कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, तांत्रिक अंगे यांचा सविस्तर विवेचनात्मक अभ्यास असतो. त्यात जुन्या काही कलाकृतींच्याशी तुलनात्मक अभ्यासही आढळतो. योग्य गोष्टी व उणीवा का आणि कश्या याचं विस्तृत विवेचन असतं. पण तरीही समीक्षा चित्रपट उत्तम आहे, बरा आहे, वाईट आहे, अमुक इतके स्टार्स असं काही सांगत नाही.

>>समीक्षा ही क्लिष्टच असावी का ? सामान्याना कळेल, इतक्या सोप्या भाषेत, का नाही असे लेखन होत ?<<
क्लिष्ट या गोष्टीची प्रत्येकाची त्रिज्या वेगळी असते. जेव्हा विस्ताराने विवेचन येते तेव्हा अर्थातच सैद्धांतिक चर्चा पण येतेच. आणि ती भाषा काहींच्या अंगवळणी पडलेली असते तर काहींना क्लिष्ट वाटू शकते. उत्तम समीक्षक हा खूप बघितलेला, वाचलेला, अभ्यासलेला असतो. त्यातून त्याची योग्य ते बघण्याची, टिपण्याची दृष्टी तयार झालेली असते. तो ते मांडतो. पण म्हणून असं नाही की तो उत्तम लेखक वा शिक्षक असेलच. आणि सगळंच सोपं आणि सहज कसं मिळेल? कुठेतरी किंचित कष्ट करायला काय हरकत आहे?

खूप पुर्वी, बाते फिल्मोंकि असा एक कार्यक्रम दूरदर्शन वर सादर होत असे. बेंजामिन गिलानी, तो सादर करत असे. त्यात अगदी बेसिक गोष्टींपासून सुरवात केली होती. अगदी शॉट क्लोजप आहे, लाँग शॉट आहे, पॅन आहे, हे उदाहरणासकट दाखवले होते. असा एखादा कार्यक्रम असायला पाहिजे. (संगीताबद्दल पण हवा, अगदी सूर कसे ओळखावे इथपासून हवा. )

वर्तमानपत्रातील परिक्षणाबाबत दोन आठवणी लिहितो. लगान चे लोकसत्ता मधले जे परिक्षण होते त्याचे शीर्षक "वा !! " असे होते आणि त्या लेखाचा समारोप, वृत्तपतत्रीय समीक्षेच्या चौकटीत राहून यापेक्षा जास्त विस्ताराने लिहिता येत नाही, असा केला होता.
आणखी एक पत्रकार. (नाव घेत नाही) संगीत आणि चित्रपटाबद्दल छातीठोकपणे काहीही लिहायचा. (उदा. लताची १० सर्वोत्तम गाणी !! ) या महाशयांबद्दल, स्मिता तळवलकरने, अगदी नाव घेऊन लिहिले होते, कि प्रिमियर ला बोलावले की यांची पार्सले, घरी पोहोचवावी लागतात म्हणून. हेच महाशय, सर्वच अभिनेत्रींशी अगदी घरगुति संबंध असल्याच्या वल्गना करायचे (त्याचाही समाचार स्मिता तळवलकरने घेतला होता ) असे लोक जर वर्तमानपत्रात लेखन करत असले, तर !!!
सामान्य माणूस, जे छापून आलेय (खास करुन वर्तमान पत्रात ) ते खरे असे मानून चालणारा असतो.

बाते फिल्मोंकी हा माझा अतिशय आवडता कार्यक्रम होता. पण मला वाटते त्यात चित्रपटाच्या तंत्राबद्दल माहिती दिली जात होती. त्यात 'अचानक' या चित्रपटाची दोन भागात चर्चा झालेली मला वाटते. मला ती चर्चा पाहिल्यावर चित्रपट अजुन आवडला. या चित्रपटात पहिल्यांदाच आठवणीमध्ये आठवण असे दाखवलेले असा उल्लेख होता.

आता समीक्षक कसे वाईट आणि त्यातल्या चुकीच्या गोष्टी याकडे गाडी वळवायचीये का?
हा कोळसा उगाळण्यात अर्थ नाही, तो शेवटपर्यंत काळाच असणार Happy

मला वाटतं थोडा वेळ काढून जर आपल्यापैकी कोणी किंवा प्रत्येकानेच प्रयत्न करुन एखादी विशिष्ट कलाकृती आपल्याला कशी भिडली, समजली हे लिहायचा इथे प्रयत्न केला तर चर्चा थोडी पुढच्या पातळीपर्यंत जाऊ शकेल.

कृपया कोणीतरी हे सुरू करा. मला फक्त पाहता येते, त्यावर बोलता येत नाही, नाहीतर मीच लिहिले असते.... Happy

बाते फिल्मोंकी मला पण थोडा आठवतोय पण खूप नाही.

>>आता समीक्षक कसे वाईट आणि त्यातल्या चुकीच्या गोष्टी याकडे गाडी वळवायचीये का?
हा कोळसा उगाळण्यात अर्थ नाही, तो शेवटपर्यंत काळाच असणार<<
exactly गं. Malpractices सगळीकडेच असतात. पण इथे विषय तो नाहीये. आणि समीक्षक-निर्माते-अभिनेते संबंधावरची गॉसिप्स पण रंगवायची नाहीयेत.

>>मला वाटतं थोडा वेळ काढून जर आपल्यापैकी कोणी किंवा प्रत्येकानेच प्रयत्न करुन एखादी विशिष्ट कलाकृती आपल्याला कशी भिडली, समजली हे लिहायचा इथे प्रयत्न केला तर चर्चा थोडी पुढच्या पातळीपर्यंत जाऊ शकेल. <<
प्लीज प्लीज हे कुणीतरी सुरू करा मला माझंच रटाळ प्रवचन वाचायचा कंटाळा आलाय.

साधना जे जसं जमेल तसं लिही. इथे काय परीक्षा नाहीये. चूक बरोबरचा कोणी निवाडा करणार नाहीये. Happy

मला वाटतं थोडा वेळ काढून जर आपल्यापैकी कोणी किंवा प्रत्येकानेच प्रयत्न करुन एखादी विशिष्ट कलाकृती आपल्याला कशी भिडली, समजली हे लिहायचा इथे प्रयत्न केला तर चर्चा थोडी पुढच्या पातळीपर्यंत जाऊ शकेल>> मलाही प्रवचन वाचायचा अत्यंत कंटाळा आला आहे.

===============================================

मला एक सांगा, आम्रपाली अपयशी का ठरला त्यावेळी? वैजयंती मालेचे नृत्य खास होते. लताची गाणी खास होती. चित्रपटाचा सेट खास होता. पात्र छान होते. कथा छान होती. वेषभुषा तर सर्वात सुंदर होती. तरी हा चित्रपट चालला नाही.. मागाहून मग लोकांना कळले की हा चित्रपट किती छान आहे. लोकांना असे तेंव्हाच्या तेंव्हा न कळता काही काळ उलटल्यानंतर जुनी कला का चांगली वाटते याचे गमक मला अजून कळले नाही. येणार्‍या काळाचा जुन्या कलेवर काही खास परिणाम होतो का? की नवीन कला जी येत राहते तीची प्रत चांगली नसली की लोकं परत जुन्या कलेकडे वळतात?

काही काही चित्रपटांतुन काय सांगितले जातेय ते लोकांना कळत नाही, तर काही वेळा लोकांना आवडत नाही.

प्यासा चित्रपट रिलिज झाला तेव्हा आपटला असे अनेक ठिकाणी वाचलेय, पण नंतर लोकांनी त्याला चक्क अभिजात म्हणुन गौरवले.

भगवानदादांचा अलबेला रिलिज झाला तेव्हा आपटला आणि सोबत भगवानदादाही आपटले. त्यांनी चित्रपटाची रिळेही अशीच कोणालातरी विकुन टाकली. कालांतराने त्या कोणालातरी चित्रपट परत रिलिज करायची बुद्धी झाली आणि चित्रपट धोधो चालला. भगवानदादांना काहीही फायदा झाला नाही. Happy

'काळाच्या पुढे असणे' हे काही कलाकृतींच्या बाबत खरे असावे बहुतेक. लोकांच्या जाणीवा तितक्या विकसीत झाल्यावर परत ती कलाकृती पाहण्यात आली तर त्यावेळची प्रतिक्रिया वेगळी असु शकते.

प्यासा चित्रपट रिलिज झाला तेव्हा आपटला असे अनेक ठिकाणी वाचलेय, पण नंतर लोकांनी त्याला चक्क अभिजात म्हणुन गौरवले.
>>
प्यासा सुपरहिट च झाला...
कागज के फूल आपटला आणि नंतर लँडमार्क म्हणून गणला जाऊ लागला...

पण इतका मोठा भारत देश.. सर्वांच्याच जाणिवा एकसारख्या कशा काय असतील? शिवाय त्या एकाच वेळी विकसित कशा काय होऊ शकतील? आजच्या काळात जर एखादा चांगला चित्रपट आला तर नजरेआड होऊ शकेल का एकाचवेळी अनेकांच्या?

आजच्या काळात जर एखादा चांगला चित्रपट आला तर नजरेआड होऊ शकेल का एकाचवेळी अनेकांच्या?

आजही होत असेल..

आज चित्रपट यायच्या आधी मिडियातुन भरपुर हॅमरींग होते. एखादा चित्रपट चांगला असेल, पण असे हॅमरींग करायला जर निर्मात्याला जमले नाही, तर आज एखादा चित्रपट येऊन जाईल आणि लोकांना कळणारही नाही. चित्रपट जास्त लोकांनी पाहण्यात माऊथ पब्लिसिटीचाही मोठा हातभार असतो. असे खुप चित्रपट आहेत (मला नावे आठवत नाहीत आता, पण वाचलेले आठवतेय) जे पहिले एकदोन आठवडे झोपले आणि मग भरधाव पळायला लागले.

मी इथे जर वाचले चित्रपट चांगला नाही तर कदाचित जाणार नाही पाहायला, पण असा चित्रपट चांगला असेल तर मी मुकले ना त्याला.... अगदी ताजे उदाहरण म्हणजे 'चित्रपट कसा वाटला' मध्ये ह्.फॅ. बद्दल लोकांनी 'ठिक ठिक' असा सुर लावला. मी आधी चित्रपट पाहायचा विचार केलेला पण ते वाचुन म्हटले, जाउदे, सिडीवर पाहु नंतर कधीतरी. उगाच थेटरात जाऊन अपेक्षाभंग कशाला करवुन घ्या? तेच स्वतंत्र बीबीवर ह. फॅ. बद्दल वाचुन वाटायला लागले, नको, थेटरात जाऊनच पाहायला पाहिजे. असे ब-याच लोकांचे ब-याच बाबतीत होत असेल... आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे चित्रपट चांगला आहे पण थेटरात गर्दी नाही. Sad

नुकताच 'नटरंग'च्या बाबतीतला एक अभिप्राय ऐकायला मिळाला. (मी तो चित्रपट पाहीलेला नाही... त्यामुळे ही पोस्ट केवळ तो ऐकीव अभिप्राय सांगण्यासाठी आहे.)

शेतातल्या मोटेवर काम करणारे त्या गावातले ते काही शेतकी-मजूर. मोटेला विजेची मोटार बसवली जाते आणि त्यामुळे त्यांच्यावर बेकारीची पाळी येते हे पटतच नाही. खेडेगावात, शेतीत फक्त तेवढं एकच काम असतं का?

दुसरं - ते सर्वजण मिळून ठरवतात की तमाशाचा फड उभा करायचा. पण त्यांच्याकडे नाचणारी बाई नसते. तमाशाच्या फडात नाचणारी बाई हीच तर आधी मुख्य असते. ती असेल तर इतर गोष्टींची जमवाजमव करून एखादा फड उभा राहू शकतो.

(अभिप्राय देणारी व्यक्ती साठीच्या घरातली आहे, लहानपणापासून खेड्यात वाढलेली आहे आणि स्वत: व्यवसायानं शेतकरीच आहे. त्यांच्या मते 'नटरंग'मधे दाखवलेलं जीवन, वातावरण त्यांनी लहानपणापासून अनुभवलेलं आहे, जवळून पाहीलेलं आहे. त्यामुळे तो चित्रपट त्यांच्या नजरेतून पूर्णपणे उतरला!.)

मला वाटतं थोडा वेळ काढून जर आपल्यापैकी कोणी किंवा प्रत्येकानेच प्रयत्न करुन एखादी विशिष्ट कलाकृती आपल्याला कशी भिडली, समजली हे लिहायचा इथे प्रयत्न केला तर चर्चा थोडी पुढच्या पातळीपर्यंत जाऊ शकेल.
>>>>>>>>>>>>>>>>>
मला मिनिषा लांबाच्या यहां या चित्रपटाबद्दल सांगावेसे वाटेल. पुर्ण चित्रपटालाचा एक निळसर टोन आहे. त्यामुळे तो चित्रपट कुठेही हलकाफुलका न वाटता वातारणातले गांभिर्य जाणवते. (काही हलके फुलके प्रसंग असूनही). काश्मिरमधली परिस्थिती अंगावर येते. बऱ्याच प्रसंगामध्ये रोजा ची आठवण येते.
एक प्रसंग मला आठवतो. ती त्याला विचारते तुम्हारे यहांभी रोज गोलींया चलती है, रोज बम की आवाज आती है.
तो नाही म्हणतो. तेव्हा तीचे वाक्य आहे
कितना अजीब लगता होगा ना, बिलकुल आवाज नही.
काश्मिर काही दशके काय सहन करत आलाय त्याची जाणीव त्या वाक्याने येते आणि अंगावर शहारा येतो.

अलबेला सुरुवातीस पडला ही बाब खरी नाही. तो तुफान चालला होता भगवान दादाच्या नृत्याला लोक पडद्यावर पैसे फेकत. दादांचे पुढचे चित्रपत पडले.
नन्तर त्यानी त्याचे हक्क रणजीत बुधकरांना विकले . बुधकरानी तो १९७५ च्या सुमारास पुन्हा रिलीज केला अन आश्चर्य म्हणजे पुन्हा धो धो चालला रन्गितचा जमान्यात कृष्णधवल असूनही. आणि याही पिढीची पोरे थेटरात नाचली . मला वाटते आजही मल्तीप्लेक्समध्ये तो लावला तर मल्टीप्लेक्स्मध्ये सुद्धा पोरे नाच्तील. अहमदनगर शहराचे 'भोली सुरत दिलके खोटे' हे आवडते गाणे आहे. नगरमधले क्वचित एखाद्या लगनाची मिरवणूक या गाण्याशिवाय पूर्ण होत असेल..... आजही.
शाहरुख खान आणि अमिताभला देखील ह्या स्टाईलचा मोह पदला. अमिताभने तर जाहीर रीत्या भगवान दादाचे ऋण मान्य केले आहे.....
बघा तर.....
http://www.youtube.com/watch?v=TVI83j8GmO8

Pages