चित्रपटांची सौंदर्य-कला समिक्षा (फायनर पॉइन्ट्स)

Submitted by शर्मिला फडके on 10 February, 2010 - 22:23

इश्कियांचं शूटिंग वाई पाचगणी भागात झालय हे वाचलेलं असल्याने मला खेड्याचा महाराष्ट्रीय लूक आहे हे लक्षात आलं होतं. पण फिल्म इन टोटॅलिटी आवडल्याने, किंवा तशा कोनातून विचारच न केल्याने ते खटकलं नाही. पण त्या क्षेत्रांशी संबंधीत असल्यांना खरोखरच खटकलं आणि तो महत्वाचा मुद्दा आहे हे माझ्याही लक्षात आलं. खूपदा काही फायनर पॉइन्ट्स त्या क्षेत्राशी संबंधित नसल्याने सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत खरंच येत नाहीत.
'चित्रपट का आवडला' हे लिहिताना जरी ते तितकसं महत्वाचं नसलं तरी चित्रपट रसग्रहण हे एक शास्त्र आहे आणि त्यात या सर्व गोष्टींचा खरोखरच बारकाईने विचार व्हायला हवा. हे रसग्रहण कसं केलं जावं हेही शिकावं लागतं.
बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या प्रसंगांमधे विसंगती असते पण चित्रपट आवडल्याने ती नजरेआड केली जाते नाहीतर फिल्ममधे हे चालणारच असं गृहित धरलं जातं. काहीवेळा उलट होतं. चित्रपट आवडलेलाच नसला किंवा पडला की त्यात खरोखरच काही अप्रतिम दिग्दर्शकाची, कलादिग्दर्शकाची, कॉश्च्युम डिझायनरची मेहनत असते ती लक्षात न घेतली गेल्याने वाया जाते. कला-सौंदर्य आणि इतर बाबतीत बारकाईने विचार केलेल्या दिग्दर्शकांना त्यांचे ड्यूज मिळायलाच हवेत. सामान्य प्रेक्षकांना ते पटकन उमगत नसतील तर चित्रपटाच्या शास्त्रोत्क रसग्रहणातून ते त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत. पण समिक्षा लिहिताना कोणीच ह्याची काळजी घेत नाही. नव्हे समिक्षकांनाही ते उमगलेले असतेच असे नाही.

मंथनमधे स्मिता पाटीलच्या पायांच्या टाचा भेगाळलेल्या दाखविण्यासाठी बेनेगल आणि स्वतः स्मितानेही खूप मेहनत घेतली होती. लोकेशनवर अक्षरशः तापलेल्या मातीच्या जमिनीवर स्मिता कित्येक दिवस अनवाणी चालत होती तसा लूक येण्यासाठी.

उत्सव मधला पिवळ्या रंगाचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर, किंवा त्याकाळातले गणिकांचे दागिने आणि गृहिणींचे दागिने यातला बारकाईचा फरक (जो भन्सालींच्या देवदासमधे अजिबात केलेला नव्हता) वगैरे टिपलं गेलं की चित्रपटाच्या रसग्रहणात मोलाची भर पडते.
लगानच्या वेशभुषेबद्दल बोलताना भानू अथैयाजींनी किती बारकाईने विचार केला होता! लगान चित्रपटाचा जो काळ सुरुवातीला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकरांनी निवडला होता त्या काळाला अनुसरुन भानू अथैयाजींनी वेशभुषेचा टोन मळकट आणि गडद निवडला होता. आमिर खानला तो खटकला आणि त्याने रंग जास्त ब्राईट वापरायला सुचवले. भानूजींनी नकार दिला. त्या म्हणाल्या तुम्ही चित्रपटाचा काळ दहा वर्षांनी पुढे केलात तर तुम्हाला हवी ती शेड मला देता येईल. आमिर-आशुतोषला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले. थोड्या वर्षांच्या फरकानेही फॅब्रिकच्या पोतामधे, रंगामधे कधी कधी फरक पडू शकतो. अर्थातच हे सामान्य प्रेक्षकांना कळण्यातले नसेलही पण तरी अत्यंत महत्वाचे आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
"सायको" रंगीत पण आला होता, पण साफ आपटला.
नंतर "अमेरिकन सायको" आलेला. Christian Bale आहे त्यात. त्याचं आणि जुन्या सायको च कथानक वेगळं आहे. पण हा ही चित्रपट पाहण्यासारखा आहे.. Happy

रंगीत पाहिला नाही. पण कृष्णधवल मधली वातावरणनिर्मिती अफाटच... अजून काही नावं आहेत. अवर ऑफ वूल्फ- बर्ग्मन. शटर आर्यलंड- मार्टीन सॉर्सेसे..

@ निवडुंग ~ थॅन्क्स. मी पाहिला आहे 'शायनिंग'. एका धडपड्या लेखकाच्या भूमिकेतील जॅक निकोल्सन आणि आर्थिक ओढाताणीमुळे त्याने स्वीकारलेली ती रीसॉर्ट हॉटेलमधील केअरटेकरची नोकरी आणि तुम्ही प्रतिसादात उल्लेख केलेला तो प्रसंग, सारेच काही अंगावर येते ते स्टॅन्ले क्युब्रिकची वातावरण निर्मितीची हातोटी आणि जबरदस्त ताकदीच्या निकोल्सनचा अभिनय. "वन व्हू फ्ल्यू ओव्हर कक्कूज नेस्ट" मधील त्याचा अभिनय पाहणे तर नवख्या लोकांसाठी अभिनय प्रशिक्षणाची एक कार्यशाळाच होय.

भारतीय प्रेक्षकांना स्टॅन्ले क्युब्रिक म्हटले की आठवतो तो '२००१ :अ स्पेस ओडेसी' पण 'शायनिंग' समवेत त्याचा व्हीएतनाम युद्धावरील 'फुल मेटल जॅकेट' पाहताना त्याचे दिग्दर्शन कौशल्य केवळ फॅन्टॅसीमध्येच सीमित नाही हे प्रकर्षाने जाणवते.

@ मुक्ता आणि दिनेशदा ~ आज ५० पेक्षा जास्त वर्षांचा काळ ओलांडून गेला 'सायको' ला, तरीही आपण तितक्याच विस्मयतेने त्याच्या प्रभावावर लिहितो/बोलतो/वाचतो, यातच या चित्रपटाचे इतिहासातील ढळढळीत स्थान दर्शविते. खुद्द हिचकॉकसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात पडला होता. प्रसिद्ध फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक त्रुफाँला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्वच्छ कबुली दिली आहे की, "चित्रपटाची कथा वा अभिनय या गोष्टी मला दखल घेण्यासारख्या वाटत नाहीत. 'सायको' साठी मी महत्व दिले ते छायाचित्रण, ध्वनिलेखन आणि तुकड्यातुकड्याच्या फ्रेम्सचा वापर. माझ्या अन्य कोणत्याही चित्रपटांपेक्षा सायको हा तुमच्या-माझ्यासारख्या चित्रपटकारांचा चित्रपट आहे."

सहज शक्य असूनही हिचकॉकने त्या 'मशहूर' बाथटब मर्डर सीनमध्ये एक नाही तर तब्बल ७८ तुकड्यांचे असे काही जिवंत संकलन केले की त्यांचा एकापाठोपाठ एकचा मारा प्रेक्षकाला चक्करच आणतो. त्यातही खास हिचकॉक-टच असा की, मर्डर सीन असल्याने हिंसाचारास चांगलाच वाव असूनही तो सुरा प्रत्यक्ष त्या तरूणीच्या देहात खुपसला गेल्याचे एका सेकंदाचेसुद्धा दृष्य नाही. टबमधील स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात पाचसहा सेकंदानंतर काळ्या रंगाची धार मिसळने आणि त्या निचरा होण्यार्‍या जागेभोवती निर्माण झालेल्या एका कृष्णविवराकडे प्रेक्षकांचे डोळे खेचणे आणि ते मिश्रण तिथून निर्गत होत असल्याचे असहाय्यरीतीने पाहात राहणे.

लाल रंग नाही, तरीही प्रेक्षकाचे प्रथम शहारून व नंतर बधीर होऊन जाणे. हा कळसाध्याय केवळ हिचकॉकच्या वातावरणनिर्मितीचा. आज ५० वर्षानंतरही ते दृष्य चित्रीकरण, ध्वनीलेखन आणि संकलन यांच्या अभ्यासासाठी 'माईल स्टोन' मानले जाते.

प्रतीक देसाई,

"वन व्हू फ्ल्यू ओव्हर कक्कूज नेस्ट" मधील त्याचा अभिनय पाहणे तर नवख्या लोकांसाठी अभिनय प्रशिक्षणाची एक कार्यशाळाच होय. >>>>
अगदी अगदी. जॅक निकोलसन हा एक अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे. माझ्या आवडत्या कलाकारांमध्ये.. Happy

"भारतीय प्रेक्षकांना स्टॅन्ले क्युब्रिक म्हटले की आठवतो तो '२००१ :अ स्पेस ओडेसी' पण 'शायनिंग' समवेत त्याचा व्हीएतनाम युद्धावरील 'फुल मेटल जॅकेट' पाहताना त्याचे दिग्दर्शन कौशल्य केवळ फॅन्टॅसीमध्येच सीमित नाही हे प्रकर्षाने जाणवते." >>>>
१००% अनुमोदन. "फुल मेटल जॅकेट" हा स्टॅन्ले क्युब्रिक च्या प्रतिभेचा अजून एक अफाट आविष्कार.

हिचकॉक तर असामान्य दिग्दर्शक - कोणता ही चित्रपट घ्या. तरीही मला जास्त आवडलेले म्हणजे "रिअर विंडो", "स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन", "रोप"
"द बर्डस" हा जरा वेगळा. का कोण जाणे हा चित्रपट उपेक्षीला गेलाय असं मला कायम वाटत आलंय. पण हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी आहे. खासकरून त्याचा क्लायमॅक्स. एक कोडं ज्याचं उत्तर नाही, ते ज्याने त्यानेच शोधावं असा..

(काही मंडळींना माझे पोस्ट्स Spoiler वाटत असतील, तर कॄपया सांगा.. Happy )

'द मेन हू मेड मुव्हिज' ही हिचकॉकवरील डॉक्यूमेंट्री अवश्य पहा. सायको बरोबरच त्याच्या बर्डस. रिअर विंडो या आणि अशा अनेक चित्रपटांबद्दल हिचकॉक स्वतः बोलला आहे.
त्याबरोबर मराठीत 'द मॅन हू न्यू टू मच' हे पुस्तकही खास आहे.

सर्वजण छान छान माहिती लिहितायेत.. Happy

फुल मेटल जॅकेट, वन व्हू फ्ल्यू ओव्हर कक्कूज नेस्ट आणि रिअर विंडो हे पाहिलेत.. भारीच आहेत. रीअर विंडो मध्ये त्या रूम्बाहेरचं चित्रिकरण कमी असूनही निर्माण केलेला प्रभाव जबरदस्त.. असाच काही प्रकार त्याचा व्हर्टीगो बघताना पण होतो. मस्त सस्पेंस आहे तो.

अजून एका चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केल्याशिवाय हा धागा अपूर्ण आहे (असं माझं मत), तो म्हणजे तार्सेम सिंग चा "द फॉल".

या चित्रपटातील एक एक फ्रेम डोळयांचं पारणं फेडते. अतिशय सुंदर ठिकाणं निवडली आहेत प्रत्येक सीन साठी. त्या बरोबरच साजेशी रंगसंगती, दुरून कॅमेर्‍याचा केलेला वापर, त्यामुळे प्रत्येक सीन ची भव्यता मनात ठसल्याशिवाय राहतच नाही.

कथानक पण अप्रतिम आहे, "कॅटिंका उंटारू" या रोमानियन ९ वर्षाच्या मुलीचा अभिनय केवळ अप्रतिम. तो अभिनय म्हणजे अभिनय वाटत च नाही, इतकं नैसर्गिकरित्या सगळं तिने साकार केलंय.

चित्रपट कसा बनवावा आणि त्यास साजेशी वातावरण निर्मिती कशी करावी आणि मुख्यतः चित्रीकरण कसं करावं याचा हा चित्रपट अत्यंत उत्कॄष्ट नमुना आहे.

माझ्या आवडत्या १० मधला हा चित्रपट. पाहिला नसेल तर जरूर जरूर जरूर पाहा. Happy

मी पाहिलाय मूव्ही. Happy कलरटोन भारीच. अगदी योग्य. परफेक्ट.. Happy संमिश्र प्रतिक्रिया आहेत या चित्रपटाविषयी. मला आवडला.

@ दिनेशदा ~ तुम्ही रंगीत 'सायको' संदर्भात लिहिले, पण (वैयक्तिक पातळीवर) मला तो कृष्णधवल जितका भावतो तो रंगीत कदापिही भावणार नाही. त्यामुळे जरी तशी बातमी माझ्या पाहण्यात आली होती तरी तिचा मी जाणीवपूर्वक पाठपुरावा केला नाही. काही आठवणी या कायमस्वरूपी आपल्या मनःपटावर उमटलेल्या असतात, त्याना ढाळ लागावी असे कदापिही वाटत नाही. "रोमन हॉलिडे" मधील ऑड्रे हेपबर्नची प्रिन्सेस अ‍ॅना ही सप्तरंगात छान दिसलीच असती हे नि:संशय, पण ती कृष्णधवलमध्ये इतकी अप्रतिम वाटली की, तिला 'रंगात' पाहण्याचा विचारही मनी उमटत नाही. तिच गोष्ट 'कॅसाब्लांका' मधील इंग्रीड बर्गमनची. तुम्ही, निवडुंग आणि मी मुक्ता यानी हा सर्वांगसुंदर चित्रपट नक्कीच पाहिला असणार, पण तो रंगवल्यानंतर पहावासा वाटणार नाही तुम्हाला, इतकी जादू त्या अंधारप्रकाश चित्रीकरणाची आहे.

आपल्या इथेही 'मुघले-आझम' मुळे काही काळ रंगाचे 'फॅड' आले. पण मुळात मुघले आझम हा पूर्णपणे पोशाखी चित्रपट असल्याने त्या भव्य सेट्सची जरतारी दृष्ये आणि कलाकारांचे भरजारी रुपे रंगात पाहणे नयनमनोहारी स्वरूपाचे झाले. तो प्रयोग निदान काही प्रमाणात 'जस्टिफाय' असल्याने थोडाफार यशस्वीही ठरला. पण म्हणून 'हमदोनो' आणि 'नया दौर' रंगात पाहणे तितके स्वागतार्ह वाटले नाहीच. काय अशी किमया झाली 'हमदोनो' च्या रंगीत रूपाने? कुठेही तीनचार दिवसाखेरीज तो चालू न शकल्याने आता अन्य निर्मात्यांचा रंगकिमयेकडे ओढा जाणे कठीण आहे. एका दृष्टीने झाले ते बरेच, कारण मी कुठेतरी वाचले की गुरुदत्तचा 'साहिब बिवी और गुलाम' रंगीत करण्याचे घाटत होते. बाप रे ! मला तर अंगावर सर्रकन काटाच आल्यासारखे भासले. एक क्षणभरही कल्पना करू शकत नाही आपण ती अविस्मरणीय कलाकृती कृष्णधवल सादरीकरणाशिवाय !

हॉलीवूडचे राहोत पण युरोपमधील निर्मितीत मैलाचे दगड ठरलेले 'बायसिकल थीफ', 'हिडन फोर्ट्रेस', '४०० ब्लोज', 'वेजेस ऑफ फीअर' या सारखे चित्रपट त्यातील कथानकाच्या वैविध्यतेमुळे जितके स्मरणात राहिले त्याहीपेक्षा कृष्णधवल चित्रीकरणाच्या लक्षणीय प्रभावामुळे हेही तितकेच नोंदविणे गरजेचे आहे.

रंगाचे महत्व मी बिलकुल कमी मानत नाही. 'गॉन वुईथ द विंड', 'वॉर अ‍ॅण्ड पीस', 'क्लिओपात्रा', 'टेन कमांड्मेन्ट्स', एमजीएमच्या सर्व संगितीका, डिस्ने चित्रपट रंगीत नसते तर त्याची भव्यता जाणवलीच नसती. पण म्हणून उठसूट प्रत्येक क्लासिक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपट शांताराम धर्तीच्या 'नवरंग' फॅक्टरीत प्रोसेसिंगला जाऊ नये इतकेच.

प्रतीक,

अगदी अगदी.. Happy रोमन हॉलीडे, कॅसाब्लांका रंगीत पहायची कल्पना करताच येत नाही. तसच गॉन विथ द विंड कृष्णधवल कसा वाटला असता याची शंका येते. Happy मस्त लिहिलय आपण. कॅसाब्लांकाच्या प्रकाशयोजनेविषयी काही अजून लिहा. मला शब्दात मांडायला खूप विचार करावा लागेल. पण तो भारी होता. आणि रोमन हॉलिडे तर आहेच ऑल टाइम रोमॅटीक कलाकृती.. Happy

मलाही हम दोनो, रंगीत का करताहेत ते कळत नाही ?
पण आपल्याकडे रंगाचे तंत्र हळू हळू सुधारत गेले. त्या काळात शम्मी कपूरचे चित्रपट आवडले होते पण पुढे प्रियदर्शनचे चित्रीकरण बघितल्यावर आपण किती तडजोडी करत होतो ते जाणवले. आणि मग त्यानंतर जे असे रंगांचा विचार न करणारे चित्रपट आले, ते अजिबात आवडले नाहीत. (उदा. माधुरीचे ड्रेस, अनेक चित्रपटात मला भडक रंगाचे वाटले.)

डर सिनेमात, जूहीचे सौंदर्य कमालीचे खुललेय. याउलट, क्रिश मधली प्रियांका अगदीच कळकट दिसलीय.

तूमच्यापैकी अनेक जणांना काळे पांढरे दूरदर्शन आठवत नसेल. रंगीत चित्रपटातील गाणी, छायागीतमधे काळ्यापांढर्‍या रंगात बघताना खूप विचित्र वाटायचे.
तंत्रात आपण फार तडजोडी करत होतो असे वाटते. संगीत, कथा, अभिनय दर्जेदार असायचे. पण चित्रीकरण दर्जाहीन.
एखादाच गोल्डी याबाबत विचार करत असे, असे वाटते.

नवरंग आणि झनक झनक पायल बाजे, मधे रंग मिळालेत ना, ते कसे नि कुठे वापरू असे झालेले दिसतेय.
पण तरिही त्या काळात ते लोकांना आवडले होते.
मला आताशा, हॉलीवूडच्या सिनेमातले काळ्या निळ्या रंगाचे प्राबल्य फारसे आवडत नाही. व्हॉट ड्रीम्स मे कम, साऊंड ऑफ म्यूझिक आणि डिस्नेचे चित्रपट केवळ प्रसन्न रंगसंगतीमूळे उत्तम परिणाम साधतात.

वर जे काही स्टॅनले क्युब्रीक बद्दल लिहलंय, त्याला पुर्ण अनूमोदन.
स्टॅनलीचे जवळपास सगळेच चित्रपट पाहीलेत. त्याचा Barry Lyndon तर कॉश्च्युम डिझायनरांसाठी पर्वणीच!
प्रतिक देसाई, आपल्या प्रत्येक शब्दाला मोदक!

बादवे, कुणी Christpher Nolan चा Following 1998 पाहीलाय का? तो ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट का असावा हे पाहूनच कळतं!

ट्यागो,
बादवे, कुणी Christpher Nolan चा Following 1998 पाहीलाय का? तो ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट का असावा हे पाहूनच कळतं! >>>>

मी मी ! Happy Following जबरदस्त मूवी आहे. नोलान च्या सुपीक डोक्यातून काय काय भन्नाट कल्पना निघतात !
(अवांतर - Following UK English मध्ये आहे. मला US English पेक्षा UK English फार आवडतं. मस्त Accent असतो. ऐकायला भारदस्त वाटतं एकदम.. हे एक अजून कारण हा चित्रपट आवडण्याचं.. Happy )

नोलान चे एकून एक मूवीज पाहिलेत, including Doodlebug १९९७ मधला. सगळ्यात पहिला मूवी - ३ मिनिटांचा आहे फक्त.. Happy

प्रतीक, अंधाराची जादू मला वेट अनटील डार्क मधे आवडली होती. हिंदीमधे तो आला होता त्याची कल्पना नाही. पण मराठी रंगमंचावर तो, अंधार माझा सोबती, या नावाने आला होता. (फैयाझ आणि डॉ, घाणेकर होते त्यात. ) त्यावेळीही, प्रकाशयोजनेनी मह्त्वाची भुमिका निभावली होती.

@आगाऊ ~ होय. हिचकॉकवरील ती डॉक्युमेंटरी संग्रही असावी असे वाटणारी तर आहेच पण तीमध्ये जागतिक पातळीवर त्याने नेमक्या कोणत्या गुणांमुळे अत्युच्च स्थान मिळविले याचाही छान उहापोह केला आहे. तद्वतच श्री.यशवंत रांजणकर लिखित 'द मॅन व्हू न्यू टू मच' हे हिचकॉकवरील पुस्तकही खास असेच आहे. मला मागील दिवाळीला ते भेट म्हणून अशाच एका रसिक मित्राने भेट म्हणून दिले. पुस्तक छपाईचा दर्जाही अप्रतिम असाच आहे.

@ मी मुक्ता ~ तुम्ही 'कॅसाब्लांका' च्या प्रकाशयोजनेविषयी मी काहीतरी लिहावे असे सुचविल्याचे पाहून मला खरंच थोडासा हुरूप आला आहे असे म्हणतो. केवळ प्रकाशयोजनाच नव्हे तर पूर्ण कॅसाब्लांकावर इथे स्वतंत्र लेखात लिहिणे गरजेचे आहे. पाहू या. मी जरूर प्रयत्न करीन.

@ दिनेशदा ~ दूरदर्शनच्या रंगीत युगापूर्वी मूळ रंगीत गाणी कृष्णधवल स्वरूपातच पाहणे अटळ असल्याने त्यावेळचा 'मायबाप' प्रेक्षकही निमूटपणे 'जे दिसे ते भले' अशा सोशीकतेनेच पाहत असणार. शिवाय दूरदर्शनची नवलाई, किंवा अन्य चॅनेल्सची वानवा यामुळेही छोट्या पडद्यावर जे दिसते त्यावर टीकाटिपणी होणे अपेक्षितच नव्हते.

चित्रीकरणाच्याबाबतीत गोल्डीचे तुम्ही नाव घेतल्याचे पाहून संतोष झाला. 'तिसरी मंझील' आणि 'तेरे मेरे सपने' ही दोन उदाहरणे गोल्डी आणि चित्रीकरणाचा/संकलनाचा सर्वोत्तम दर्जा दाखविण्यासाठी पुरेशी आहेत. थोरल्या चोप्रांची 'वक्त' आणि 'हमराज' या पंक्तीत येऊ शकतात पण त्यात त्याना आपण जे दाखवितो त्याचा अट्टाहास खूप असे. सेट्समधील बटबटीतपणा आणि पात्रांची अकारण भाऊगर्दी हेही चोप्रा फॅक्टरीचे दुर्गुण.

त्यातल्या त्यात हृषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यानी चित्रीकरणामध्ये मध्यमवर्गीयांची जी सहजता दाखविली त्याचे स्वागत जाणत्यानीही केले होतेच.

'वेट अन्टील डार्क' मधील ती दृष्टीहीन तरूणी आणि 'शॅरेड' मधील ती अवखळ तरूणी ही एकाच अभिनेत्रीची दोन रूपे असू शकतात ही अशक्य कोटीतील बाब पण थॅन्क्स टु ऑड्री हेपबर्न. सलामच केला पाहिजे तिला आणि कॅरी ग्रॅण्टला 'शॅरेड' साठी. फैय्याज यांची प्रमुख भूमिका असलेला 'अंधार माझा सोबती' मी पाहिलेला नाही, पण ऐकले/वाचले आहे जरूर. अ‍ॅलन आर्किनने जबरदस्त ताकदीने सादर केलेली खलनायकाची भूमिका मराठीत डॉ.काशिनाथ घाणेकरानी साकारली होती हे माहीत आहे, पण ती त्यानी अक्राळविक्राळ (टिपिकल मराठी राजशेखर तालमीतील खलनायक) पध्दतीने दर्शविली होती असे समजते. त्यामुळेच असेल कदाचित की ते नाटक म्हणावे तसे 'हिट' झाले नाही. अविनाश मसुरेकर हा दुसरा आणि बनावट इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील बिपिन तळपदे यानीच ते नाटक पेलले होते असे मानतात.

केवळ चित्रीकरणाच्या बलस्थानावर नावाजले गेलेले हॉलिवूडचे चित्रपट म्हणजे अ‍ॅन्थोनी हॉपकिन्स आणि ज्योडी फॉस्टर या दुकलीचा जगभर गाजलेला "सायलेन्स ऑफ द लॅम्ब'''. या चित्रपटातील भूमिकेबद्दल दोघांनाही ऑस्कर मिळाले होतेच, पण पूर्णपणे 'अ‍ॅडल्ट थीम' असूनही चित्रीकरणाच्या सामर्थ्यावर 'सायलेन्स' ने नावलौकिक मिळविला होता. तीच गोष्ट ऑलिव्हर स्टोनच्या "प्लटून" ची. रक्तरंजीत रिळे करण्यास पोषक असे कथानक समोर असूनही चित्रीकरण आणि 'वॉर विदईन वॉर' ही खदखद चित्रीकरणाचा सुयोग्य वापर करून ऑलिव्हरने ज्या पध्दतीने समोर आणली त्यामुळे अमेरिकन वॉर डिपार्टमेंटही अवाक झाले असेल. तसेच मेरिल स्ट्रीपची बेहतरीन अदाकारी असलेला "फ्रेन्च लेफ्टनंट्स वुमन" हा व्हिक्टोरियन आणि मॉडर्न काळाची विलक्षण गुंफण असलेला चित्रपट, जो त्यातील नेमक्या चित्रीकरण शैलीनेही स्मरणात राहिला आहे.

खूप उदाहरणे आहेत.

@ ट्यागो ~ लिखाणातील मतांना सहमती दर्शविल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. विषयच असे आहेत की जितके लिहावे तितके थोडेच !

निवडुंग, ब्लॅक अँड व्हाईट वरुन आठवलं शिंडलर्स लिस्ट हा पण असाच ब्लॅक अँड व्हाईट बनवलेला मूव्ही. आणि वॉर मूव्ही वरुन आठवलेले "द पियानिस्ट" आणि "बॉय इन स्ट्रिप्ड पायजामाज" दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या कारणासाठी मनात घर करुन जातात.

प्रतीक, "सायलेन्स ऑफ द लॅम्ब'' वरुन आठवलं, "रीक्वीम ऑफ ड्रीम" बघताना चित्रिकरण कौशल्य म्हणजे काय याची जाणीव होते. शेवटाला भयंकर अंगावर येतं सगळं. "सायलेन्स ऑफ द लॅम्ब'' मधल्या ८ मिनिटाच्या भुमिकेला ऑस्कर मिळालं यावरुनच त्या अभिनयाची खोली कळते..

प्रतीकजी,
आपल्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन.. Happy

मुक्ता,
काय नावं घेतलीत! "शिंडलर्स लिस्ट", "द पियानिस्ट", "बॉय इन स्ट्रिप्ड पायजामाज", "सायलेन्स ऑफ द लॅम्ब", "रीक्वीम ऑफ ड्रीम" !!

"सायलेन्स ऑफ द लॅम्ब" मधला अ‍ॅन्थोनी हॉपकिन्स चा अभिनय म्हणजे परमोच्च बिंदू वाटतो मला ! त्याची ती भेदक नजर आणि कमालीच्या ताकदीने व थंडपणे फेकलेले dialogues. अंगावर सर्रकन काटा आणतात. त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा हा अभिनय मला कायमच जास्त भावत आलाय !

"रीक्वीम ऑफ ड्रीम" बद्दल तर बोलायलाच नको. हा चित्रपट पाहून चार दिवस डिप्रेशन मध्ये गेलो होतो.. Proud आवर्जून पाहावा, पण तरीही Handle with care इतका अफाट सिनेमा आहे हा !

"बॉय इन स्ट्रिप्ड पायजामाज" मधली वेरा फार्मिगा अशक्य सुंदर दिसलीये ! तेवढीच matured पण ! तिच्या मुलाचं भावविश्व दिग्दर्शकाने अफाट उतरवलंय..

"द पियानिस्ट" मधला अ‍ॅड्रीएन ब्रोडी कहर आहे. रोमन पोलान्स्की हा एक असाच वेडा दिग्दर्शक आहे. मूवीचा शेवट तर पीळ पाडतो अक्शरश: त्याचा "चायनाटाऊन" पण पाहा, जॅक निकोलसन आहे त्यात.. Happy

"शिंडलर्स लिस्ट" पण मस्तच. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातला अजून एक उत्कॄष्ट नमुना.
किती लिहिणार या चित्रपटांबद्दल? एक एक लेख होईल प्रत्येक चित्रपटावर.. (आपलं लेखनसामर्थ्य एवढं तोकडं का आहे, ह्याचं अपार दु:ख होतं मला कधीकधी, जेवढं वाटतं ते नीट उतरवता पण येत नाही.. Sad )

प्रतीकजी सहमत आपणांस, खरंच कितीतरी उदाहरणं आहेत, नावं घ्यावीत तेवढी कमीच..

आपले पोस्ट्स पाहता, आपण आपणांस आवडलेल्या चित्रपटांवर आधारीत लेख लिहावेत ही विनंती. आमच्या सारख्यांसाठी ती एक मेजवानीच असेल ! Happy

इथल्या पोस्ट्स वाचून "चित्रपट"कसा पहावा ? " हे हळूहळू समजायला लागलय. सगळ्यांना धन्यवाद !

लेबनॉन नावाचा चित्रपट बघितला आहे का कुणी ? बहुतांशी चित्रपट रणगाड्याच्या आत चित्रीत झालाय.
(म्हणजे रणगाड्याच्या आतून दिसणारी दृष्ये आणि रण्गाड्याच्या आतले चित्रीकरण )
पण चित्रपट अंगावर येणे म्हणजे काय, त्याचा अनुभव नक्कीच येतो, हा बघितल्यावर.

>नितू घरात आल्यावर फ्रिजमधून पाण्याची बाटली काढते आणि ग्लासात पाणी ओतून पिते. थेट बाटली तोंडाला लावत >नाही.. असे बारकावे आहेत>>>

असे दिल चाहाता है मध्ले काही प्रस.न्ग आवडतात .

आमिर आणि प्रीती सिडनीला जाणार्या प्लेनमध्ये भेटतात
एअर होस्टेस प्रीतिला काहितरी ऑफर करते आणत प्रिति आमिरची बडबड ऐकता ऐकता तिला हातानेच नाही म्हणते.

आमिर आणि प्रीती सिडनीला फिरायला जातात
एका राईडवर बसताना तो तिला घाबरवतो
ति त्याला फटका माराते
पण तिचा हात आपटतो आणि ती कळवळते

आणखी अनेक आहेत

>नितू घरात आल्यावर फ्रिजमधून पाण्याची बाटली काढते आणि ग्लासात पाणी ओतून पिते. थेट बाटली तोंडाला लावत >नाही.. असे बारकावे आहेत>>>

असे दिल चाहाता है मध्ले काही प्रस.न्ग आवडतात .

आमिर आणि प्रीती सिडनीला जाणार्या प्लेनमध्ये भेटतात
एअर होस्टेस प्रीतिला काहितरी ऑफर करते आणत प्रिति आमिरची बडबड ऐकता ऐकता तिला हातानेच नाही म्हणते.

आमिर आणि प्रीती सिडनीला फिरायला जातात
एका राईडवर बसताना तो तिला घाबरवतो
ति त्याला फटका माराते
पण तिचा हात आपटतो आणि ती कळवळते

आणखी अनेक आहेत

शर्मिला, मस्त धागा. तुझ्या मूळ पोस्टीतला पहिला आवडला.

जुन्या गोलमालमध्ये असाच प्रसंग आहे. सुरूवातीला अमोल पालेकर घरी येतो, बाथरूममध्ये हात-पाय धुतो आणि टेबलाशी येऊन बसतो. बहिणीला मॅचबद्दल सांगत असतो. बाथरूमचे दार तसेच उघडे ठेवतो. दोन सेकंदांनी गप्पा चालू ठेवत बहीण दार ओढून घेते. <<< राजकाशाना. Happy

अशा खूप बारीक सारीक गोष्टींचा केलेला विचार कार्टूनपटांमधून खास लक्षात राहतो. त्याबद्दल त्या दिग्दर्शकांचं कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही.

उदा.
Masha and the Bear
Alvin and the Chipmunks

आपल्याकडल्या कार्टूनपटांमध्ये अशी मॅच्युरीटी कधी यायची? Sad

काल गिरिश कासारवल्ली यांची अप्रतिम मुलाखत ऐकण्याचा योग आला. सुनील सुकथनकर आणि उमेश कुलकर्णी यांनी ती घेतली. त्यात कासारवली यांनी एक मस्त विधान केलं - 'चित्रपटात दिग्दर्शक "दिसायला' नको. समोर काहीतरी एक घटना घडते आहे, आणि ती फक्त आपल्याला दिसते आहे, असं जेव्हा वाटतं, तेव्हा तो खरा चित्रपटाचा अनुभव'.

होय खरं आहे. चित्रपटाचे कॉस्च्यूम्स ग्रेट आहेत किंवा काय फोटोग्राफी आहे, प्रत्येक फ्रेम देखणी. कलादिग्दर्शकाचे सेट्स विसरता न येण्यासारखे अशी तुकड्या तुकड्यातून कामगिरी लक्षात राहिली तर त्याचा अर्थ एकसंध परिणामात सिनेमा खूप कमी पडला, हे सगळं वेगळं उठून दिसायला नको असं मीही एका ठिकाणी वाचलं होतं.

मुलाखत ऐकायला आवडली असती कासारवल्लींची.

Pages