अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाचा असो वा नसो माझा मात्र विश्वास आहे की मृत्युनंतर जीवन असते. सर्वच मृतात्मे दिसतात अस नाही ते सर्वांनाच दिसतात अस नाही पण त्यांचे अस्तित्व असते हे मान्य करावे लागते.

मंदार, लेका...
तुला एक वर्षाने सवड झाली होय रे वाचायची...
मी पण म्हणून तब्बल तीन महिने उशीराने उत्तर देतोय...
नितिनचंद्र धन्यवाद

विशिष्ट राशि असणार्‍यांना भुत्-पिशाच्च, हड्ळ, चेटकीण, समंत, ईत्यादींचे दर्शन घडतच असतात.

जसं या जगात चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटही आहेच. चांगल्या शिवाय वाईट नाही, आणि वाईटा शिवाय चांगल्यालाही अस्तित्व नाही. काळ्या फलकावरच सफेद खडुने रेखाटलेली अक्षरे दिसतात जरुरी नाही की "जे दिसत नाही ते नसणारच".

8_1_229[1].gif

मी हे आत्ताच वाचलं... बापरे...
ह्या ट्रेक नंतर तुमचा तो मित्र फडतरे दुसर्‍या कुठल्या ट्रेक ला आला नसेल ना ?

पटलं नाही पण आवडलं मला जाम...>>> चँप, अरे "रावणामुळे रामाचे अस्तित्व होते"म्हणजे मला हे सुध्दा सांगायचं आहे की रामाचे अस्तित्व असणार होते म्हणुन रावणालाही जन्म द्यावा लागला काळाला. समजा दुनियेत जर सगळं चांगलच चांगलं असेल कुणीकुणाची फसवणुक नाही, चोरीमारी नाही, शिविगाळ नाही,की हमरी-तुमरी नाही, एकुण सगळे संता सारखे वागतील चांगुलपणाने वागतील तर अश्या वागण्याला संत पणाला काहीच अर्थ नाही ना रे.. कारण, चागुलपणा सभ्यापणा कुणीतरी किंवा कोण्तीतरी दुष्ट असुरी शक्ति असल्यामुळेच असतो. जर सर्व मंगलच मंगल असेल तर त्याला मंगल म्हणुन चालाणार नाही कारण काहीतरी "अमंगल" आहेच म्हणुन तर "मंगल" च अस्तित्व आहे ना, कुणीतरी कुठेतरी अशुभ आहे म्हणुन शुभ च अस्तित्व आहे ना.


माझं एवढं म्हणंण पटतय का..?

अज्ञात वस्तुंचा वावर आपल्या सभोवती अखंड चालु असतो, म्हणुन काहीच हालचाली आपल्याला जाणवु शकतात सर्वच नाही कारण त्यांचाही संबंध आपल्याशी या प्रूथ्विशी प्रत्येक्ष-अप्रत्येक्षरीत्या आहे. या अज्ञात दुनियेचा वावरच आपल्यात आपला राम आपला रावण राखायला कारणीभुत असतो. जेव्हा एखादी घटना शास्त्रिय किंवा नैसर्गिक कारणा शिवाय घटते तिला आपण अनहोनी म्हणतो, करण ती आपल्या आकलन शक्तिच्या बाहेरची गोष्ट असते. पण ती असते.

मेल्यानंतर माणसाचं काय होतं....? मला नाही माहीत्....ति दुनिया त्यांचेच आत्मे वैगरे असतिल तर तेही नाही माहीत...गावातले हड्ळ आणि चेटकीणीचे,नार्‍याचे चे खुप कीस्से एकुन आहे. ते एखाद्या गावाच्या बाहेरील झाडावर वास करतात किंवा जंगलात असतात. हड्ळ मी पाहीली नाही पण वर्णन एकुन आहे तिचे पाय उलटे असतात केस लांब जाटायुक्त भुरकट, चेहरा सहसा दिसत नाही, आणि पाठीकड्च्या बाजुने रिकामी पोकळी असते. ति सहसा काही नुकसान करत नाही, आपण आपलं काम करत रहावं ति जंगलात, तिच्या निवासी जागेत आपल्याला मागुन हाकदेउ शकते आपल्या ओळखीच्यांच्या आवाजाने. तिच्या कडे रोखुन पाहील्यास ती झपाटुनही घेउ शकते. प्रथम दर्शनी ती कोणत्याही रुपात येउ शकते.
उदा.जसं आपण मोबाईलवर बोलत असतो (वायरलेस्स जादु) तसा त्यांच्याकडेही त्यांच्या दुनियेत काही असा फंडा असावा. Happy

असु शकते

अशा प्रकारचा अनुभव माझ्या आईला आला आहे, ती एका लग्नाकरता भोपाळला गेली होती. लग्नाच्या आदल्या रात्री सगळ्या वरातीचा मुक्काम हॉलमध्येच होता. आमची मुलाकडची बाजू असल्याने सगळेच जण निवांत होते. रात्री उशीरा पर्यंत गप्पा गोष्टी, पत्ते खेळण सुरु होत. त्यानंतर १ ल्या मजल्यावर सगळे जण झोपायला गेले. पहील्या शांत झोपेनंतर आईला कसल्याशा आवाजाने जाग आली. कोणीतरी पळत पळत जिन्यातुन वरखाली जात येत असल्याच जाणवल. कदाचित आचारी माणस असतील म्हणून तिने लक्ष न देता झोपायचा प्रयत्न केला. पण थोड्यावेळाने आवाज खुप वाढले. पायाच्या आवाजा बरोबर रडल्याचे आवजही यायला लागले तेव्हा मात्र ती घाबरली. देवाचं नाव घेत तशीच पडून राहीली.

सकाळी बाकीच्याना हा अनुभव सांगावा की नाही या द्विधा परीस्थितीत होती (कोणी टर खेचू नये म्हणून). जरा वेळाने एक दोन काका, आज्या झोप नीट नाही झाली म्हणायला लागले तेव्हा कारण विचारल्यावर त्यानी सुध्दा तोच प्रकार सांगितला. मग मात्र सगळेच गंभीर झाले आणि थोडी चौकशी केल्यावर कळल की त्याजागेत वरच्या मजल्यावरुन उडी मारुन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली होती.

१९८५-९० दरम्यान चा किस्सा, आमच्या शेजारी राहणार्‍या काकां सोबत घड्लेला.
ते रिक्षा चालक होते, त्या रात्रि त्यांना घरी येताना उशिर झालेला १-२ ची वेळ होती अंधेरी भागातल्या डि.एन नगर इथे असलेल्या विहीरी जवळुन त्यांनी एका साडी आणि डोक्यावर पदर असलेल्या महीलेचं भाडं घेतलं पण चढण्यापुर्वि त्या महीलेने सांगितले नाही कुठे जायचे आहे ते, आणि एवढ्यारात्रि एकटी म्हणुन त्यांनीही रिक्षा थांबवुन बसण्यास सांगितले. खुप वेळ झाला तरी त्या महीलेने उतरण्याचे ठिकाण सांगीतले नाही.. दोन तिनदा काकांनी विचारुन ही पाहिले.

कहीच उत्तर नाही.....न राहुन त्यांनी मागे वळुन पाहीले..तर्..काय, मागच्या सिटवर कुणीच नाही...!

जागच्या जागी रीक्षा थांबउन ते रस्त्याने धावत सुटले आणि कुठेतरी रस्त्यात बेशुध्द झाले. सकाळि काही लोकांनी त्यांना कुपर रुग्णालयात दाखल केले. जेव्हा ते शुध्दी वर आले.. खुप घाबरलेले होते डोळे मोठे आणि भयानक वाट्त होते, घामाच्या धारा लागलेल्या, छातीचे भाते जलद गतीने वरखाली होत होते ...दोन दिवस कुणाशी काहीच बोलले नाही.

तिसर्‍या दिवशी डॉक्टरांनी खुप प्रयत्न करुन त्यांना बोलते केले, त्यांनी झालेला किस्सा घाबरत घबरतच सांगीतला कुणी विश्वास ठेवला कुणी नाही. (त्याने काहीच फरक पडत नव्हता.)

आठवड्या भरात काकांना भयंकर तापाने ग्रासले...हॉस्पिटल मध्येच त्यांच्यावर सातव्या आठ्व्या दिवशी काळाने झड्प घातली.....रिपोर्ट मध्ये कारण होते जबरदस्त भितीमुळे ताप येउन र्‍हदयाचे ठोके चुकल्यामुळे म्रुत्यु. Sad

अशा सर्व अनाकलनीय घटनांची आपल्या मनाशी कुठेतरी जबरदस्त लिंक आहे असे मला वाटते. भुतं आणि आत्मे यांना नाकारावे तर काहींना संत्-देव इं. चे दृष्टांत्/साक्षात्कार वै. होतात या गोष्टींनाही स्वीकारता येणार नाही.

वर वाचलेल्या चर्चेप्रमाणे चांगले ही संकल्पना अ‍ॅक्सेप्ट केली की वाईटाचेही अस्तित्व मान्य करावेच लागते आणि vice versa.

प्रगो च्या स्वप्नांच्या धाग्यावर मीही माझ्या स्वप्नं आणि अनुभवलेल्या काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांचे आकलन होण्याइतपत स्पष्टिकरण माझ्याजवळ नाही. पण जगात अश्या बर्‍याच गोष्टी घडतात. आणि त्या सर्व कंट्रोल करणारी कुठलीतरी unknown शक्ती बर्‍या आणि वाईट अशा दोन्ही स्वरुपांत अस्तित्वात आहे व तिला समजून घेणे मानवी क्षमतेच्या पलीकडले आहे, असे माझे मत आहे.

निंबुडा, माझ्या मतांशीही आपली मतं जुळतात हे जाणुन बरं वाट्लं. नाही तर मी स्वतःला रावणी विचारांचाच समजत होतो. प्रामाणिक असुनही Happy

आशु,
धाडशी, भयानक अनुभव !
(अरे मलापण हे आताच वाचायला मिळालं)

जाईजुई,चातक,निंबुडा,
अनुमोदन !
असे भुताचे अनुभव स्वतःला नाहीत पण काही ऐकले आहेत.
मला आतापर्यंत पडलेल्या विचित्र (भयानक) स्वप्नांवरुन,नंतरच्या घटनेवरुन "सिक्स्थ सेन्स" नावाचा प्रकार आहे,पुढे घडणार्‍या (शक्यतो वाईट) घटनेची चाहुल अशा स्वप्नाद्वारे किंवा दुसर्‍या स्वरुपात लागते यावर मात्र १०१ % विश्वास आहे
मला आजही काही वर्षापुर्वी पडलेली स्वप्ने,त्यातली दृश्ये,लोक इत्यादी संदर्भ अगदी आताही स्पष्ट दिसतात,
त्यांनतर घडलेल्या घटनासहित.

मागे काही महिन्यापुर्वीची गोष्ट, माझे चुलत आजोबा ५-६ महिन्यापासुन काहीशे आजारी होते, मला शेवटच्या महिन्यात त्यांच्या घरच्यांशी काही संपर्क,किंवा काही माहिती मिळाली/समजलेली नव्हती, इकडे अचानक मी (पहाटे) एक भयानक/विचित्र स्वप्न पाहिलं, त्यात शेजारचे लोक अंत्यसंस्कारासाठी आजोबांच्या शेताजवळच गोळा झालेले,आणि स्वप्नात मि पाहिलं कि मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा,लोकांची माझ्याशी जास्त चालु होती .
दुसर्‍या दिवशी मी थोडा बेचैन होतो, माझ्या जुन्या अनुभवावरुन मला शंका तर आली होतीच, शेवटी मी संध्याकाळी ६.३० ला घरी कॉल केला ,तर पहिली बातमी होती, कि 'माझे चुलत आजोबा काल दुपारी ४ वाजता वारल्याची,'

१००% विश्वास आहे. काही अनुभवही घेतले आहेत. खरेतर त्यामुळेच भयकथांचे वेड लागले असे म्हणायला हरकत नाही. Happy

डिप्लोमाच्या तिसर्‍या वर्षाला असताना (सोलापूरात) एक मस्त अनुभव घेतला होता. (त्यावेळी तापाने फणफणलो होतो आठवडाभर)

तेव्हा सोलापूरात लष्कर विभागात राहात होतो. माझी आत्या जुळे सोलापूर भागात राहात असे. एके दिवशी मामा काही कामानिमीत्त पुण्याला जाणार होते, ते जाताना सांगुन गेले घरी आत्याला सोबतीला जा म्हणून. मी रात्री ८-८.३० च्या दरम्यान घरून निघालो. मध्येच एक मित्र भेटला म्हणून त्याच्याबरोबर गपाट्या हाकत बसलो कंबर तळ्यावर. (आता या तळ्याला संभाजी तलावही म्हणतात) अकरा कधी वाजून गेले कळालेच नाही. शेवटी जातो म्हणुन निघालो. पावणे बाराच्या दरम्यान जुळे सोलापूर भागात पोचलो. तिथे भारती विद्यापीठाची एक शाखा आहे. तिथुन थोडं आत गेलं की एक मोठं मैदान लागतं क्रांती मैदान म्हणुन. ते मैदान ओलांडलं की आत्या राहायची ते वीरशैव नगर येतं. मैदानाच्या आधी एक मोठा खड्डा आहे. बांधकामासाठी म्हणुन माती नेवुन नेवुन तो आता खुपच मोठा झालेला आहे. मी नेहमीप्रमाणे तो खड्डा ओलांडला तोवर बारा वाजुन गेले होते. समोर वीरशैव नगरच्या लाईटस दिसत होत्या. म्हणलं आलं आत्याचं घर. आता पाच मिनीटात घरी जावुन पडी मारायची. उशीर केल्याबद्दल आत्याच्या शिव्या पडणार होत्याच.
प्रत्यक्षात आत्याच्या घरी पोहोचलो तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. मला फक्त एवढेच आठवतेय की सलग चालत होतो. एवढा वेळ का लागला देव जाणे. आत्या काळजीत ! अजुन कसा नाही आला......
दुसर्‍या दिवशी त्यांच्या घरमालकीनबाईंनी सांगितलं तुला चकवा लागला होता. तिथे याआधीही खुप जणांनी हा अनुभव घेतला होता म्हणे. मी मात्र त्यानंतर आठवडाभर तापाने फणफणलो होतो. Happy

माझे बाबा त्यांच्या लग्नापूर्वी एका चाळ कम वाड्यात भाडेकरू म्हणून रहायचे. एकदा रात्री उशीरा पिक्चर बघून आल्यावर खोलीत आले तेव्हा पाहीले तर खोलीत सगळीकडे मुंग्याच मुंग्या...
काहीतरी खायचे सांडले होते. मग बाबांनी डीडीटी मारली पण त्या वासाने खोलीत थांबवेना. म्हणून समोरच एक पार होता तिकडे जाऊन झोपले.
रात्री कधीतरी थंडी वाजायला लागली तेव्हा उठून परत आत आले. तोपर्यंत वासाची तीव्रता पण कमी झाली होती.
दुसरे दिवशी सकाळी त्या वाड्यात ही गर्दी..
बाबा विचारायला गेले काय झाले तर म्हणे रात्री वाड्यात भूत आले होते.
ते ऐकून बाबा एकदम घाबरले. बरोबर आहे रात्री ते बाहेर झोपले असतानाच भूत फिरत होते म्हणजे काय.
मग त्यांनी विचारले कुणी पाहिले.
अहो आमच्या मंडळींनी..
रात्री बाथरूमला जायला उठल्या तर समोरच्या पारावर झोपलं होतं म्हणे, असं लांबच्या लांब, पाय उलटे..
मग
मग काय, मला उठवलं, मी आपला काठी घेऊन आले, काका आणि अण्णापण आले हो. सगळ्यांना उठवलं, तर गायब...
असं हवेत विरून गेलं हो
Happy

अनिल७६, अनुमोदनासाठी आभारी..!

पण मला वाटतं "सिक्स्थ सेंन्स" आणि "भुत-पिशाच्च" या दोन वेगळ्या घटना आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत.

आपल्याला "सिक्स्थ सेंन्स" आहे म्हणजे आपल्याला भुताने ग्रासलेले नाही तर नियतीने दिलेली एक देणगी आहे असं मला वटतं. त्यातच जर हा सेंन्स फक्त वाईट स्वप्नांचाच असेल तर मी दिलगिर आहे.

चातक,
माहितीबद्दल धन्यवाद !
या विषयावर माझा काही तसा अभ्यास्,वाचनही झालेल नाही पण असे ४-५ अजब/धक्कादायक अनुभव मात्र आले आहेत,खात्री पटली आहे.गेल्या ६ एक वर्षापासुन मी काही मोजके अनुभव त्या-त्या दिवशी नोंदही करत आलेलो आहे.

(अगदी कुठल्याही शहरात कुठल्यातरी दिवशी ) अस सहज मनात आलं,वाटल /एकदम क्लिक झालं कि फिरताना,बाहेर कुठेही समोर तुमच्या (एखादा जवळचा मित्र,ओळखीची,प्रिय व्यक्ती) एखादी सारखी व्यक्ती दिसली,मग साहजिकच तुम्हीच असल्याचा भास झाला/वाटलं, पण ते तुम्ही नाहीत हेही मला दिसलचं,तुमची आठवण येणं तर स्वाभाविकच...
गंमत म्हणजे त्याच दिवशी (काही तासानी,वेळानी) तुमची माझी अचानक प्रत्यक्ष भेट झाली ,अस ५-६ वेळा घडलेलं आहे.
Happy

आशु,
असही खुप वेळा घडतच ...

येस!, मलाही हा अनुभव आलेलाच आहे. हल्ली तर माझी खात्रीच असते की भास झालेली व्यक्ती पुढे निश्चित भेटणार, आणि भेटतेही.

गंमत म्हणजे त्याच दिवशी (काही तासानी,वेळानी) तुमची माझी अचानक प्रत्यक्ष भेट झाली ,अस ५-६ वेळा घडलेलं आहे.>>> पुढेही घडु शकते...... थोड्क्यात सगळ्यांनाच "सिक्स्थ सेंस" असतो त्याचि तिव्रता व्यक्तीनुरुप कमी जास्त असु शकते. कधीकधी आपोआप आपल्याच हाताने कार ची "स्टीरींग" वळवली जाते आणि अपघात होता होता वाचतो.
हा "सेंन्स" काही क्षणांकरता असतो. आपण अचानक आपल्या तोंडुन उद्गगार......बाप रे कसं वाचलो मलाच माहीत...(किंवा देवालाच माहीत). Happy

चातक,
धन्यवाद !
तुम्ही "सिक्स्थ सेंस" बद्दल एखादा लेख का लिहित नाही ? आम्हाला नविन माहिती मिळेल
Happy

छान किस्से आहेत एकेकाचे.

मुळात अश्या घटना घडतात तेंव्हा आधी तर्क (लॉजिक) लावून कारण शोधायचा प्रयत्न झाला पाहिजे, काही ज्या गोष्टी तर्कापलिकडच्या आहेत, तिथे मग अनाकलनीय गोष्टी सुरू होतात.

वरच्या काही किश्यांमधे आवाज ऐकू येणे, भास होणे असे काही लिहिलेले आहे. शेवटी आवाज किंवा केली जाणारी कोणतीही क्रिया की एक उर्जारूपच असते (एनर्जी). आपण जे बोलतो ते शब्दही एक उर्जाच. "एनर्जी नायदर कॅन बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉईड".
त्या उर्जेचे रुपांतर वेगवेगळ्या फॉर्म्समधे होत असते. कालांतराने कदाचित ती मूळ रूपात येत असेल, त्याक्षणी जी व्यक्ती तिथे उपस्थित आहे, तिच्यासाठी तो आवाज हा भासच असतो कारण त्याच्याशी ती व्यक्ती स्वतःला रिलेट करू शकत नाही. कित्येकदा मोबाईल रिंग न वाजताही घरात आपल्याला रिंग ऐकू येण्याचा भास होतो , आपण त्याला सवयीमुळे असे होते असे म्हणतो, पण त्यामागेही हेच कारण असावे. अर्थात कोणी यातला जाणकार असेल तर मते मांडा. मी फक्त माझी शक्यता वर्तवतोय.

"सिक्थ सेंस " हा पुन्हा वेगळा विषय आहे. एखाद्या पुढे घडणार्‍या घटनेची चाहूल आधीच लागणे, याला सिक्स्थ सेंस म्हणता येईल आणि त्याची तीव्रता व्यक्तीसापेक्ष असते.

कर्तिक महिन्यात गावात उत्सव असतो. त्या दिवशी देवळात पहाटे काकडारतीने सुरूवात करून मग पूर्ण वेळ दुसर्‍या दिवशीच्या काकडारतीपर्यंत भजन असते. त्याला एक्का किंवा सप्ता म्हणतात. आदल्या दिवशी हाच सोहळा बाजुच्या गावातही असतो. पूर्वी या कार्यक्रमाला आम्ही हटकून मुंबईहून जायचो. बाजुच्या गावातला उत्सव संपला की रात्रीचे २.३० ते ३ वाजलेले असायचे मग सगळ्यांनी मिळून (अगदी १५ ते २० जणांचा ग्रूप असायचा) सड्यावरून (माळरान) चालत आपल्या गावात यायचं...... मजा यायची.
या प्रकारात कितीतरी वेळा चकवा / भूल लागायची. एकदा तर आम्हाला सगळ्यांना चालतोय किती त्याचा अंदाजच येत नव्हता. खुणेची झाडं (वड, पिंपळ ई.) पुन्हा पुन्हा दिसत होती. शेवटी आम्हा सगल्या छोट्यांना एका जागी बसवून मोठे रस्ता शोधू लागले. पहाट होईपर्यंत काही रस्ता सापडला नव्हता शेवटी जेंव्हा उजाडलं तेंव्हा लक्षात आलं की आपण गावाच्या अगदी जवळच आहोत पण रस्ता मात्र काही केल्या मिळत नव्हता. इतकी माणसं एकत्र असूनही एकालाही सापडू नये हे आश्चर्य.

श्रि भुंगा,

आपल्या मतांचा आदर आहेच, पण मला काही सुचवणं गरजेचं वाटलं Happy
आपलं म्हणंण आहे....
"एनर्जी नायदर कॅन बी क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉईड".>>> आपल्या या विचारांशी पुर्णपणे सहमत आहे.

कालांतराने कदाचित ती मूळ रूपात येत असेल>> पुर्णपणे असहमत आहे,

कारण, आवाजने उत्पन्न केलेली उर्जा ही नगण्य असते, अगदी "शेकडो जेट" जरी जवळुन गेले तरी आवाजाने थरकाप फक्त काही सेकंदच होतो. मग निरव शांतता, जरी आवाज वातावरणात घुमत राहिला.

राम रक्षा, हनुमान चालिसा असला तरीही सतत (२-३महिने) जर तोच तोच आवाज होत राहीला तर व्यक्ति एकतर थोडक्यात बहीरी नाहीतर १००% मानसिक रुग्ण बनु शकते.

थोडक्यात उदा. संक्रांतीच्या दिवशी दिवसभर आभाळात मन लाउन हजारो पतंगं उड्ताना पाहुन दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीही वर पाहिल्यावर "डोळे" पतंगी आणि दोरंच दाखवतात. (मग ते जिवंत कावळे जरी उडत असले तरी.). म्हणजेच हा एक "भास"आहे, ही शक्ति बाहेरुन आलेली नाही (आपल्या म्हणंण्या प्रमाणे आवाज रुपात किंवा दुसरे काही) तर आपल्या मेंदुचा भास आहे. हि गोष्ट "मानवी मेंदुची" कोणतीही गोष्ट आठवण राखण्याची क्षमता उच्च कोटी ची आहे हेच दर्शवते. भास एकतर घाबरल्यामुळे होतो नाहितर एखाद्या वस्तुविषेशचा खुपवेळ आठवण-स्मरण केल्यामुळे होतो.

पण ही घटना हे किस्सेच वेगळे आहे(अर्थात भास झालेलेही असतीलच) ईथे कित्येकांना अस्तित्वात नसलेल्या व्यक्ति भेटुन जातात कुणी स्वप्नात कुणी प्रत्येक्ष, कुणाला त्याचाही आवाज एकु येतो ज्याला कधी पहीलेलं नाही कुणी अचानक भेट्तं आणि अचानक कापराच्या वडी सरखं डोळ्यां देखत गयब होतं, नंतर एकदम कळतं की त्या व्यक्तिंचं कधितरी की कालपरवाच अस्तित्तव होतं.

तर... मोबाईल रिंग न वाजताही एकु येणे ही एक साईंटींफिक शास्त्रिय घटना आहे, त्याला कारण मोबाईल रींग आपल्या मेंदुने स्मरण ठेवलेली असते, पण वरील गोष्टिंना घटनांना फक्त नियतीच जाणु शकते. त्यां विषयी आपण पुढे बोलुच... जर आपणास आवड असेल. Happy

"सिक्थ सेंस " हा पुन्हा वेगळा विषय आहे.> हो अगदी वेगळा आहे...ही पहीली ना दुसरी...ही तिसरीच घटना आहे Happy या विषयी ही बोलु Happy

.

चँप,... आपली या प्राकारची आणखी काही प्रसंग इथे नोंदवावी (अर्थात घडली असल्यास) Happy

Pages