अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली या प्राकारची आणखी काही प्रसंगे इथे नोंदवावी (अर्थात घडली असल्यास)

अहो हे मराठी आवरा आधी. प्रसंग या शब्दाचे अनेकवचन प्रसंग असेच आहे.

साधनातै आभारी, बदल केला आहे...

घाईत टायपलं होतं....

आणि मला तुम्ही अहो जाओ करु नका हो....प्लिज.

साधना...
अहो जाऊ द्या...त्याला गण आहे आणि त्यातून रात्र झाली आहे म्हणल्यावर असे प्रकार होतातच...
Biggrin

Happy

मला भुते दिसावीत अशी माझी खुप इच्छा आहे, रात्री उठले की घरातही एक फेरी मारते. पण कधीच काही दिसले नाही Sad आणि दिसणारही नाही याची खात्री आहे.. इतक्या वर्षात दिसले नाही ते आता काय..

आशु तुझे आणि इथे बाकीच्या सगळ्यांचे अनुभव एकदम जबरी आहेत.

साधनातै, तुम्हाला घरातच भुते दिसावीत अशी अपेक्षा का आहे ते कळले नाही...:)
मी अहो, रात्री-बेरात्री ब्रिजवर, गडांवर, गावाकडे मळ्यात सगळीकडे जिथे जिथे वदंता आहे हमखास भूत दिसण्याची तिथे तिथे फिरलोय.. मी लहान असताना पुण्यात एका हाकामारी ने एक वैताग आणला होता. ती पाहण्यासाठी मी कितीतरी रात्री खिडकीबाहेर बघत घालवल्या आहेत. (तेव्हा लहान असल्याने घराबाहेर पडायची परवानगी नव्हती)....

माझं मत कसलं असणार यावर? मला अजुन एकही भूत दिसले नाहीय ना.. पण भूते असावीत असे वाटते कारण माझे वडिल, काका, आजी, मावशी इ.इ. सगळ्या लोकांनी त्यांना भूते कुठेकूठे भेटली ते अगदी तिखटमीठ लावुन मला सांगितलंय लहानपणापासुन. Sad

आशु, मी पण हिंडलेय रात्रीची. पण जे काही दिसायचे त्याच्याकडे मुद्दाम टक लावून पाहिले की ते भुत नसुन रात्री बाहेर राहिलेले कोणाचे कपडे, झाडाला अडकलेले पतंग व्.व. हे लक्षात यायचे.

नाही म्हणायला एक अनुभव आहे, पण भुताचा नाही. असाच साधा जनरल.

माझ्या गावी हिरण्यकेशी नदीच्या उगमाकडे जाणा-या डोंगरावर अस्वले दिसतात ब-याच वेळा. शिवाय तिथे देवस्थानही आहे आणि अशा स्थानाकडे जाण्यास योग्य नसलेल्या लोकांनी (म्हणजे दारु प्यालेले व.) तिथे गेल्यास त्यांना वाईट अनुभव येतो असा गावक-यांचा समज आहे. मी खुप किस्से ऐकलेत या जागेबद्दल. पण तिथे कधीच कसला वाईट अनुभव आला नाही, कधीही कसली भिती वाटली नाही. गावी गेल्यावर रोज सकाळी तिथपर्यंत रपेट करते तीही एकट्यानेच. कधीही काही वाटले नाही.

गेल्या मे मध्ये गावी गेलेले तेव्हा रात्री साधारण ८.३०ला वाजता मला जंगली प्राणी पाहावेत असे वाटायला लागले आणि त्यासाठी हिरण्यकेशीचा डोंगर योग्य वाटला. Happy माझ्या काकाने मोठ्या मुश्किलीने मला जायला परवानगी दिली पण गाडीतुन बाहेर न पडता जेवढे दिसेल तेवढे बघ आणि मागे फिर असे सांगितले. मी, माझी मुलगी आणि माझा भाऊ तिघे निघालो. हिरण्यकेशीला एका ठराविक जागेपर्यंतच गाडी जाते. पुढे उतरुन चालत देवस्थानापर्यंत जावे लागते. (अर्थात पुढचा रस्ता का होऊ शकला नाही याबद्दलही गावात खुप गोष्टी प्रचलित आहेत) तर रस्त्याच्या त्या शेवटच्या टोकापर्यंत जायचे, तिथे थोडावेळ थांबायचे आणि मागे फिरायचे असे ठरले. १० मिनिटे गाडीतुन प्रवास केल्यावर आमच्या गप्पा बंद पडल्या आणि मी गुपचुप काचाही वर केल्या. एक अनामिक भिती मनात दाटून यायला लागली. खरे तर तसे काही वाटण्यासारखे नव्हतेच. बाहेर स्वच्छ चंद्रप्रकाश पसरला होता. पण भिती का वाटत होती कळेना. जसजसे वर डोंगरावर जाऊ लागलो तसतसे मला खुप अस्वस्थ वाटायला लागते. शेवटी जिथे गाड्या थांबतात तिथे पोचलो एकदाचे. तिथे थोडावेळ थांबायचे ठरलेले. पण भावाने गाडी अजिबात न थांबवता लगेच वळवली. मी लहानपणापासुन दिवसा अनेकदा गेलेय तिथे पण त्या रात्री तिथे मला बाहेर बघायलाही भिती वाटायला लागली.

गाडी वळवुन आम्ही भरधाव खाली आलो. घराकडे पोचताना मी म्हटले इथे काही बघायला मिळाले नाही, आता महादेवगड पॉईंटकडे जाऊया. मग तिथे गेलो. तिथेही जंगल आहे, पण मी गाडीतुन खाली उतरुन चंद्रप्रकाशात इकडेतिकडे फिरले. प्राणी काही दिसले नाहीत. मग चौकुळच्या रस्त्यावर बरेच आत जाऊन तिथेही बाहेर पडुन फिरलो. या दोन्ही ठिकाणी अजिबात भिती वाटली नाही. मी भावाला विचारले, हिरण्यकेशीला थांबणार होतो आपण, तु लगेच रिटर्न का मारली? तो म्हणाला, माझी जाम टरकली होती. मला खुप भिती वाटत होती. तिथवर गेलो तेच नशीब. मला तर प्रत्येक क्षणाला आता लगेच रिटर्न मारावी असे वाटत होते.

म्हटले कसली भिती?? तो म्हणाला माहित नाही, पण कसलीतरी भिती वाटत होती. पुढे जायला नकोच असे मन सांगत होते. मुलीचेही तेच मत पडले. तीही घाबरुन माझा हात घट्ट धरुन बसलेली. (ती एरवी कशालाही घाबरत नाही. शाळेत लाईट गेल्यावरही अंधारात बिंदास फिरणारी ती एकमेव मुलगी आहे) आश्चर्य म्हणजे तिथे जाऊन आल्यानंतर पुढची दोन्ही ठिकाणे करायला आम्हाला रात्रीचे ११ वाजले पण उरलेल्या दोन्ही ठिकाणी अजिबात काही वाटले नाही. हिरण्यकेशीवरच का एवढी भिती वाटली कळेना. मी लोकांच्या गोष्टी ऐकल्या असल्याने कदाचित मनावर त्यांचा पगडा असावा, पण भावाला काहीही इतिहास माहित नव्हता. मुलीलाही काही माहित नव्हते. मग त्यांना का भिती वाटली? आणि तिथे असताना मी स्वतः घाबरल्याचे वगैरे बोललेच नव्हते, उलट घरातुन बाहेर पडताना आमच्या जंगलात कायकाय प्राणी दिसतील याच्याच गप्पा चाललेल्या. त्या गप्पा कधी बंद पडल्या आणि एका अनामिक भितीने मनाचा ताबा कधी घेतला ते कळलेच नाही Happy

सॉलीड अनुभव आहे हा....
जगात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांचे आपण काहीही स्पष्टीकरण देऊ शकत नाही हेच खरे

मला रात्र या गोष्टीची भिती वाटते. रात्रीमध्ये काहितरी वेगळे आहे जे प्रत्येक गोष्टीतले क्रौर्य, वाईटपण, नीच वृत्ती बाहेर उफाळून आणते. दिवसा ज्या गोष्टी अगदी साध्या सोज्वळ दिसतात त्याच रात्रीच्या काळोखात जीवघेण्या वाटतात आणि परत प्रकाश पसरला की आपले दिवसाचे साधे सोज्वळ रुप धारण करतात. यात माणसे येतात, जनावरे येतात, झाडे, झुडपे, आपला आजुबाजुचा निसर्ग सगळे येते. रात्रीचे बाहेर दिसणारे जग खुप वेगळे आहे. मला कधीकधी खुप घाबरवते हे जग. पण मला त्या जगाची भिती वाटत नाही एवढी त्या जगाची काळी बाजु बाहेर आणणा-या काळोखाची वाटते. मला रात्र अजिबात आवडत नाही. रात्रीच्या काळोखात दिसणा-या आकृत्यांकडे मी मुद्दाम पाहात राहते आणि ओळखीचे शोधत राहते. सगळे ओळखीचे असते पण त्यांना अनोळखी करणारा काळोख मात्र कधीच ओळखीचा वाटत नाही, त्याची कायम भिती वाटते.

भूंगा,
इतकी माणसं एकत्र असूनही एकालाही सापडू नये हे आश्चर्य.>>>> अगदी तेच.... त्या जागेवर तुम्ही होता,ज्यावर त्या वेळी फक्त त्याचीच सत्ता होती....अंधाराची म्हणु शकतो, कारण कुणी व्यक्तिविषेश नाही. Happy अगदी त्याच "जगा बद्द्ल" मला म्हणायचं आहे.

साधनातै,
रात्रीचे बाहेर दिसणारे जग खुप वेगळे आहे. >>> दिवसाही काही ठिकाण भकास आणि भयंकर दिसत असतात. त्यातच दोन ते चार ही दुपारची वेळ विषेश. कधीकधी दुपारही रात्रि पेक्षा जास्त प्रभावी होते.

साधना, ट्रॅलीवर आता लवकरच "India's Most Haunted" सुरू होतंय. त्या ठिकाणी एकदा जाऊन बघ. कदाचित तिथं भुतं दिसतील. अर्थात हा प्रोग्राम रॉकी आणि मयूर सादर करणार असल्याने तिथे भुतं कितपत रहातील हा वेगळा मुद्दा Happy

कालपासून हा धागा वाचतेय.... निखळ मनोरंजन होतेय. आशुच्या मित्राचा अनुभव एकदम थ्रिलिंग!!!

मला भुताच्या मालिका, सिनेमे पहायला आवडतात, पण त्यात फारसे भीतीदायक असे काही नसतेच... Sad फूंक तर एकदम बेकार सिनेमा होता... पण ह्या धाग्यावरचे एकेकाचे अनुभव वाचून खुप भीती वाटली. साधना, तुझे रात्रीविषयीचे वर्णन वाचून तर एकदम धुंद धुंद असे फीलिंग आले... चातक म्हणाले तसं कधी कधी दिवसही फार भकास असतो. रात्र बरेचदा मला सुखद वाटते... आकाशातल्या चंद्र-तार्‍यांकडे बघायला तेंव्हाच मिळतं ना? Happy

असो, मला भुताचे काहीही अनुभव नसल्याने इथे काहीच लिहू शकत नाही, पण धागा वाचायला भरपूर मज्जा येते आहे... Happy

लै भारी. मागे एका विंग्रजी पेपरात मुंबईतल्या 'झपाटलेल्या जागा' यावरचा लेख वाचला होता.

.

एखाद्या जागेबद्दल भिती वाटणे हे मी फक्त लहानपणी अनूभवलेय. जाणतेपणी अनेक वेळा घरात एकटे असताना, फिरत असताना कुठे भिती म्हणून वाटली नाही. >>> पण दिनेशदा तुम्ही वरील घटनांबाबत आपले कहीच मत मांडले नाही...!
आपले (मोलाचे) मत जाणुन घेणे आवडेल.
(अपेक्षित)

अमानवीय म्हणजे प्राण्यांचे / पक्ष्यांचे अनुभव पण ना ?
मला चष्मा आता लागला असला तरी तो केवळ वाचण्यासाठी. पण मला अंधूक प्रकाशात बर्‍यापैकी दिसते.
नायजेरियात, लाईट जाणे म्हणजे काही नवीन नाही. तरी मी तिथे रात्री दहानंतर एकटाच तासभर चालत असे. अंधारात इतरांना काळी माणसे नीट दिसत नाहीत (शिवाय त्यांना काळे कपडे घालायची हौस असते) पण समोरून एखादी आकृति येताना दिसली, तर माणूसच असेल ना, अशी शंका मला कधीच आली नाही.
एकदा माझ्या तोंडासमोरून केवळ तीन चार फूटावरुन एक मोठे घुबड उडत गेले. मी स्थंभित होऊन बघत उभा राहिलो. घुबडाचे उड्डाण हे अगदी स्मूथ असते. कसलाही आवाज होत नाही. त्याचा सुंदर अनुभव मी घेतला.
रात्री आडवे जाणारे साप, मला बरोबर दिसत. मी रहात होतो त्या भागाला एक नैसर्गिक हद्द होती. त्या पाणथळ जागेवर एवढे दाट जंगल होते कि, आठ दहा फूटावरचे दिसत नसे. त्या जंगलाच्या कडेपर्यंत मी जात असे.
तिथेच असताना, आमच्या कंपनीतले अधिकारी ऑफिसमधेच बसल्या जागी वारले होते. त्यांच्या घरात इतरांना विचित्र अनुभव येत (कुलुपच न उघडणे, दरवाजा जॅम होणे, सगळी बटने बंद केली तरी ट्यूबलाईट चालूच राहणे, मोठ्या घरातून बाहेर पडायचा रस्ताच न सापडणे, ऐनवेळी बॅटरी न पेटणे)
पण या सगळ्यामागची कारणे शोधून मी त्याचे निराकरण केले. त्या घरात तर भिंतीलाही शॉक बसत असे. ते पण सगळे मी निस्तारून घेतले. मला काहीच वाटायचे नाही त्या घरात वावरताना. ते बंगाली होते आणि कालिमातेचा एक मोठा फोटो त्यांच्या पूजेत होता. त्या फोटोला बघून काळी माणसेही घरात जायला तयार नसत. मग मीच तो फोटो काढून त्याचे विसर्जन केले.

एक मजेशीर अनुभव गोव्याचा. गोव्याला रात्री भटकायला मला कधीच भिती वाटली नाही. एकदा असेच रस्त्यावरुन येताना अचानक लाईट गेले. चांदणेही नव्हते. आणि मी कशालातरी धडकलो. ज्याला धडकलो ते धूड पण धावत दूर गेले, एक नव्हे दोन धूडं होती. मी जरा वेळ उलट्या दिशेने पळालो खरा, पण त्या रस्त्यात रवंथ करत बसलेल्या गायी होत्या (त्या पण काळ्या) ते काहि सेकंदातच लक्षात आले माझ्या.

चातक, माझा स्वतःचा या गोष्टीवर विश्वास नाही.
कुणाला येत असेल / आला असेल तर मी त्याचा अनुभव म्हणून विश्वास ठेवेन.
पण तो अनुभव मला यावा, अशी अपेक्षा ठेवत त्या जागी, मुद्दाम जाणे असले प्रकारही करणार नाही.

दिनेशदा, आपला अनुभव वाचला,

त्यांच्या घरात इतरांना विचित्र अनुभव येत>>> सावरुन...ही.. जर त्या घटना कालांतराने सतत घटत असतिल तर "अमानवीय".

गायी होत्या (त्या पण काळ्या) ते काहि सेकंदातच लक्षात आले माझ्या.>> Happy

पण तो अनुभव मला यावा, अशी अपेक्षा ठेवत त्या जागी, मुद्दाम जाणे असले प्रकारही करणार नाही.

दिनेशदा...अहो ते सर्व कुतुहुलापोटी केलेले प्रकार होते...
पण मला या गोष्टीचे अजुन नवल वाटते की लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टींचे भास व्हावेत तर इथे काही जणांनी लहान मुलांनाही त्याचा त्रास झाल्याचे मांडले आहे...
मग निगेटीव्ह एनर्जी ही खरी मानायची का...

दिनेशदा...अहो ते सर्व कुतुहुलापोटी केलेले प्रकार होते...
>>> चॅंप तु विसरलास हे कुतुहल कधिच पुर्ण होणार नाही आणि तो शोध निरंतर चालुच राहील..... म्हणुन"ते सर्व कुतुहुलापोटी करतो..." असं म्हण. Happy

की, आता थांबवणार आहेस,... की, थांबवले आहेस....?
की ,तुझं "कुतुहल" संपलेलं आहे,... की, त्याचे उत्तर सापड्ले आहे...?

(सापड्ले असल्यास क्रुपया मला विपु करावे ही विनंती)

मस्त आहे हा धागा मी सगळ वाचलय.
फार थरारक आहेत सगळे अनुभव

पण अस काहीतरी अनाकलनीय अद्भुत अस्तित्व असत.

कल्याणला माझ्या मामाचा जो complex होता. तो अभद्र आहे. आता नुकतीच त्याने जाग सोडली.
मामी उद्वेगाने म्हणाली अरे अगदी एकदाच आपण सत्यविनायक केला तो, बाकी मी लग्न झाल्या पासून फक्त आजारपण आणि श्राद्ध पक्ष करतेय. एक वर्ष तर त्यांचा पुर्ण मजलाच सुतकात होता. शिवाय तिथे दोन आत्महत्या झाल्यात. विचित्र अपघात नाते संबधात विलक्षण तणाव तर जवळ जवळ प्रत्येक घरात आहे.
शरद उपाध्ये वास्तुबद्दल बोलताना म्हणाले की वास्तु स्मशानाच्या मागे diagonally opposite नसावी. आणि तेव्हा लक्षात आल या जागेच लोकेशन perfectly तेच आहे.

लिहीन उद्या माझाही अनुभव

सापडले नाय रे...पण एकंदरीत लक्षात असे आले आहे की, आपण भूत-प्रेत पिशाच्च हे म्हणतो हे सगळे मनाचे खेळ असतात...पण कुठेतरी निगेटीव्ह एनर्जी असू शकते. त्यामुळेच आपल्याकडे अमावस्येला अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामागचे तेच कारण आहे..अमावस्येला निगेटीव्ह एनर्जीचे प्रमाण वाढत असणार आणि त्यामुळेच बहुतांश भयकथा आणि गोष्टी या अमावस्येशीच निगडीत असतात.
सूर्यग्रहणाच्या वेळी देखील बघ ना काहीसे अस्वस्थ वाटते..पक्षी-प्राण्यांनाही ते जाणवते...

त्यामुळेच आपल्याकडे अमावस्येला अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामागचे तेच कारण आहे..>>> हो, पण मला वाटतं आजकालच्या तथाकथित झाडलोट करणारे "बुवा" लोकांनी त्याला वेगळंच (अशक्य असं) वळण दिलं आहे. म्हणुन आजची पिढी या गोष्टींना थारा देत नाही. तर कुणी घबरुन काही वाच्यता करत नाही. कुणी, लोकं आपल्याला काय "गबाळ्या" आहेस असं समजतील म्हणुन काही बोलत नाही.
तिथे अक्षरशः त्या अमेरीकेत, युकेत, जर्मनीत या असल्या प्रकारच्या "अननोन" घटना सतत घडत असतात.

अमावस्येला निगेटीव्ह एनर्जीचे प्रमाण वाढत असणार >> त्या रात्रि त्यांची थर्टिफस्ट असावी, पण त्यात "अमोश्या" चा काहीच दोष नाही रे Happy

सूर्यग्रहणाच्या वेळी देखील बघ ना काहीसे अस्वस्थ वाटते..पक्षी-प्राण्यांनाही ते जाणवते... >> हो त्याचाही संबध आहेच पण तो मला नैसर्गिक म्हणजे "मानविय" वाटतो. अर्थातच त्या अननोन अमानविय शक्ति विषयी नाही.

त्यांना कदाचित सुखःद च वाटत असावं.... म्ह्हं Lol

माझी मैत्रीण कोकणात त्यांच्या कुलदेवतेला जाताना २-३ वेळा असा अनुभव आला कि विशिष्ट घाटातून जाताना एका ठिकाणी तिची मुलगी भयंकर रडत असे कोणी काही केलं तरी गप्प बसायची नाही. अर्धा एक तास रडल्यावर आपोआप रडणं बंद व्हायचं.

दुसरा अनुभव माझ्या सख्ख्या काकाचा, तो शनिवार पेठेत राहत होता तेव्हाचा. त्याला कामावरून यायला खूप उशीर व्हायचा. एकदा असंच रात्री आल्यावर त्याला वर जिन्याकडे जाणार्‍या पायांचा आवाज ऐकू येत होता पण दिसत कोणी नव्हते. काका राहायचा तळमजल्यावर पण त्या आवाजाच्या मागे मागे तो गेला गच्चीपर्यंत आणि तिथे आवाज बंद झाला पण बराच वेळ तो उभा होता तसाच. काकूने त्याला खिडकीतून बघितले होते आलेले पण स्कूटर पार्क करून वगैरे येईल असे वाटले पण खूप वेळ झाला तरी आला नाही म्हणून बघायला गेली तर हा गच्चीत उभा! काय झाले ते नंतर सांगितले त्याने. ते घर भितीदायकच वाटायचे पण आम्हाला सुद्धा. तिथे किचनमध्ये एकदा नागोबा वेटोळे घालून बसलेले दिसले होते. घरातली माणसे सतत आजारी असायची.

ते घर भितीदायकच वाटायचे पण आम्हाला सुद्धा. तिथे किचनमध्ये एकदा नागोबा वेटोळे घालून बसलेले दिसले होते. घरातली माणसे सतत आजारी असायची.
मला तेच वाटते निगेटीव्ह एनर्जी...
वास्तुशांत करण्यामागचा बहुदा तोच हेतू असावा...
तिथली निगेटीव्ह एनर्जी कमी होऊन पॉझीटीव्ह व्हावी...

वास्तुशांत करण्यामागचा बहुदा तोच हेतू असावा...
>>>नाही चँप, माझा मुळीच अंदाज नाही तसा...वास्तुशांत करुन आपलं मन शांत होतं, तेही काही वेळासाठी पुन्हा जैसे थे....!

तिथली निगेटीव्ह एनर्जी कमी होऊन पॉझीटीव्ह व्हावी...>>>>> इथे मनाचे खेळ सुरु होतात. तेच आपण मनाला समजाउन देतो की बघ,.. आता शांती केली आहे यानंतर काही नाही होणार. (पण काही ठीकाणी वास्तुशांतीचा प्रभाव दिसतो...तो त्या मुळेच असतो म्हण्ता नाही येत) वास्तुशांती वैगरे उपाय असुही शकतात पण

"नक्की कोणासाठी" कोण आहे तिथे?

हम्म निगेटिव्ह एनर्जी बरोबर शब्द. वास्तु तथास्तु म्हणत असते असे काही जुने लोकं म्हणतात. वास्तुपुरूष म्हणजे कोण असतो?

Pages