अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आणखी एक... याला योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा पण हे २००% खरं आहे...
मी इंजिनिअरिंग कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतल्या पासून आमच्या कॉलेजच्या प्रत्येक सेमिस्टर एक्झामच्या वेळी कोणाचे न कोणाचे वडील एक्स्पायर व्हायचे... कधी आजाराने, हार्ट अ‍ॅटॅकने, अ‍ॅक्सीडेंटने, तर कधी चक्क आत्महत्या करून!! माझ्या ३ वर्षांच्या ६ च्या ६ सेमिस्टर्स मध्ये हे अनुभव आहेत... आणि नेमके परीक्षांच्या दरम्यान! कधी गर्ल्स हॉस्टेलमधल्या मुलीचे वडील, कधी वर्गातल्या मुलाचे तर कधी सिनिअर्सपैकी! लास्ट इयरला एका सेम मध्ये रूमीचे वडील तर लास्ट इयर लास्ट सेम ला गावातीलच मुलीचे वडील!!! हा सिलसिला आम्ही यायच्या आधीपासून चालू होता असे वॉडर्न, पियून, आणि सिनिअर्सकडून समजले. Sad

प्रत्येक सेमिस्टर तणावाखाली काढलेय... रोज बाबांना फोन करून... ते फोनवर येऊन त्यांचा आवाज ऐकेपर्यंत जीवात जीव नसे... Sad

एका वयस्कर सिक्यूरिटीने बोलता बोलता सांगितले... "कमी पैशात मिळाली म्हणून स्मशानाची जागा घेतलेय कॉलेज आणि हॉस्टेल बांधायला... कसली पूजा नाय काय नाय तर शांती कशी होणार! खातंय ते जे काही अतृप्त आहे ते...! "
शहारलेलो ऐकून! खरं खोटं त्या अतृप्त आत्म्याला माहीत नी परमेश्वराला माहीत!!!

दिनेशदांनी म्हटल्याप्रमाने मला स्वतःलासुद्धा असे भुताबीताचे प्रत्यक्ष अनुभव नाही आलेत...
बर्‍याच जाणकारांचम मत असं आहे की मनुष्यगणाच्या माणसांना असे अमानवीय अनुभव लगेच येतात/ त्यांना त्रास जास्त होतो. हे खरंय का? कारण एखादं काही ऐकलं तर काळोखाची भीती वाटणे, रात्री भास होणे असे सामान्य प्रकार घडतात... ते त्या ऐकीव गोष्टीचा मनावरील परीणाम असू शकतो... पण इतरांनी सांगितलेले अनुभव म्हणजे माहीत नसताना "काहीतरी वेगळं" जाणवणं असं घडलेलं नाहीय... त्यामुळे सध्या तरी सगळ्यांचे अनुभव फक्त वाचतेय!!

ऐकीव अनुभव टाकेन अधून मधून!

मी इंजिनियरिगला असताना आमच्या सोसायटीतल्या एका बाईंनी आत्महत्या केली. जवळजवळ २-३ आठवडे घड्याळात रात्रीचे १२ चे ठोके पडले की कुत्री रडायला सुरुवात करायची. Sad अजून आठवलं की अंगावर काटा येतो.

अरे वाह... छान चालू आहे. कही सुनी कुछ नही ही घ्या आखो देखी:

ऊसगावात शिकायला असताना युनिव्ह. हॉस्टेल वर मी व रुमी रहात होतो. दोघांची स्वतंत्र खोली होती. अर्थातच हॉस्टेल मध्ये कधिही कुणिही कुणाकडेही येण जाणं चालू असतं.. विशेषतः परिक्षेच्या काळात तर दिवसा रात्री कधिही..
रात्री मी झोपलो होतो माझ्या खोलीत.. रुमी त्याच्या खोलीत झोपला होता. अचानक अपरात्री जाग आली (कीती रात्र आहे हे जाग आली तेव्हा जाणवलं नव्हतं) आणि असं वाटलं कुणितरी माझ्या खोलीत खुर्चित बसलय.. म्हटलं असेल रुमी चा कुणितरी मित्र, परिक्षा, गृहपाठ च्या संदर्भात आला असेल. हे विचार चालू असतानाच पुन्हा मी नीट डोळे उघडून बघितल. तर एक कृष्णवर्णीय ऊंच तगडा गडी बाजूला खुर्चित निर्वीकार बसला होता. मला ऊठल्यावर पाहून किंचीत हसला.. मी जरा हबकलो.. अशा अवेळी कोण येईल, आणि माझ्या खोलीत का बसलाय.. काहितरी गडबड वाटत होती (कुणि चोर वगैरे असेल का... रुमी कडे कुणि खरच मित्र आलाय का वगैरे शंका मनात चालू होत्या..) भास निश्चीत नव्हता कारण गडी समोर जिवंत बसलेला दिसत होता.. डोक्यात विचार सुरू असताना मी अक्षरशः विजेच्या वेगाने बेड वरून ऊठलो, खोलीचे दार ऊघडले आणि रुमी ला हाक मारत हॉल मध्ये गेलो.. माझ्या ओरडण्याने रुमी बाहेर आला.. "अरे हा कोण आलाय तुझ्याकडे"...? असे मी त्याला विचारले तेव्हा तोही बुचकळ्यात पडला.. "अरे रात्रीचे ३ वाजलेत.. मी झोपलो होतो.. वेडा आहेस का अत्ता कोण येईल..?" रुमी चे हे शब्द ऐकून आता माझी ट्यूब पेटली.. माझ्या खोलीच्या दाराला मीच आतून कडी लावली होती, ती उघडून मी बाहेर गेलो होतो हे लक्षात आल्यावर मी अक्षरशः गारठलो. पुन्हा माझ्या खोलीत जायचे धाडस होईना.
मी आणि रुमी ने पुन्हा माझ्या खोलीत पाहिले.. कुणीच कुठे नाही.
त्यानंतर ती रात्र अन ऊर्वरीत आठवडा मी अन रूमी बाहेर हॉल मध्ये झोपत असू, लाईट चालू ठेवून..

आठवड्याने ठरवलं हे काही खरं नाही.. आपण घर बदलून घेवू... कॅंपस ऑफीस ला गेलो आणि सांगितलं रूम बदलून हवी आहे. "का" या प्रश्णावर "बाजूला रेलवे ट्रॅक असल्याने झोप येत नाही, अभ्यास होत नाही" असे थातुर मातुर ऊत्तर देवून आम्ही नवीन घर मिळवले. एका महिन्याने बातमी कळली--- आम्ही तिथे रहायच्या आधी आमच्या अपार्ट्मेंट मध्ये राहणार्‍या एका कृष्णवर्णीय विद्यार्थ्याचा रेलवे ट्रॅक वर अपघाती मृत्त्यू झाला होता, किंबहुना तो खून होता अशी पोलिसांना शंका होती, आणि तपास चालू होता !

माझा अनुभव !
नववीत असताना आमच्या शाळेची ट्रीप दक्षिण भारतात गेली होती.
आम्ही पॉन्डीचेरीला गेलो होतो. आख्खा वर्ग अरोबिंदू स्वामींच्या (अरविंद घोष) आश्रमात दर्शनासाठी गेला.
जिथे स्वामींची समाधी आहे तिथेच पलीकडे त्यांच्या पत्नीची (The Mother) समाधी आहे. मध्ये फक्त एक छोटीशी खोली आहे.
आम्ही सगळे स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या खोलीत रांगेत उभे होतो. तिथे एक छानसा टेबल होता. आस पास खुर्च्या ... मागे पुस्तकांची कपाटे.
तिथेच एक आजोबा शांतपणे बसलेले होते एका खुर्चीवर. अंगावर धोतर आणि एक उपरणे होते. वाढलेले पांढरे शुभ्र केस आणि छातीपर्यंत दाढी.
माझ्याकडेच पाहत होते ..
मी ही पाहिले... मला वाटले आश्रमच आहे ... असेल कोणी तरी !

नंतर बसमध्ये बसून जेंव्हा निघालो तेंव्हा मित्राने आश्रमातून घेतलेले एक पुस्तक चाळताना एक फोटो पाहीला ...
त्या आजोबांचाच फोटो !

खाली नाव होते .... स्वामी अरोबिंदू !

बाकीच्या मित्रांना विचारले तर तिथे त्यांना कोणीही दिसले न्हवते.

मी मागे लिहिलं होतं त्या जकार्ताच्या एका इन्टरनॅशनल शाळेत इतरांना आलेल्या अनुभवांबद्दल.. इंडोनेशियाला ही काला जादू,भुतं इ. गोष्टींचा जबरदस्त पगडा आहे तेथील लोकांवर.
एकदा तिसरी च्या वर्गावरून जाताना वर्गातली लहान पोरं अचानक घाबरून ,धावत धावत वर्गातून बाहेर उधळली आणी मी समोर दिसल्यावर जोरजोराने ओरडत सांगू लागली कि वर्गात टीचर च्या रिकाम्या खुर्चीवर एक लहान मुलगी बसलीये,तिला लांब सुळे आहेत आणी ती आमच्यावर धावून येतीये..
मी आत डोकावून पाहिले..मला अर्थातच कुणी दिसलं नाही. पण या शाळेत असताना वरचेवर अश्या गोष्टी घडायच्या.
एकदा तर माझ्या ९वीच्या वर्गात दोन जणं बसू शकतील एव्हढ्या बाकावरची एक मुलगी अचानक दुसर्‍या मुळीकडे सरकली आणी थरथर कापू लागली..थोड्या वेळाने सावरल्यावर म्हणाली कि अचानक कुणीतरी तिला खेटून बसले आणी पूर्ण जोरानिशी तिला बाजूला ढकलू लागले..
अशी बरीच प्रकरणे घडल्यावर त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रिंसीपल ने म्हणे एका मांत्रिकाला बोलावले.त्याने तिकडल्या दोन भुतांना बरोबर आणलेल्या बाटलीत बंद करून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला. या दोन भुतांपैकी एक स्त्री ,या शाळेच्या आधी इथे एक कपड्याची मिल होती,या मिल मधे झालेल्या अपघातात मरण पावली होती आणी दुसरं भूत एका लहान मुलीचं होतं.. आणी ही मुलगी त्या स्त्रीला बरीच त्रास द्यायची. , भुतांना पण त्रास देणारी दुसरी भुतं असतात हे तेंव्हाच कळलं.
या गोष्टींचा मला कधीच अनुभव आला नाही कि त्रास ही झाला नाही.. म्हणून माझा गण राक्षस गण च असावा अशी खात्री ही पटली Proud

>>भुतांना पण त्रास देणारी दुसरी भुतं असतात हे तेंव्हाच कळलं.

माझ्या एका माजी बॉसचं निधनानंतर भूत झालं तर तो बाकीच्या भुतांना पण त्रास देईल. ती भुतं त्याला घाबरून मुक्तीचा मार्ग शोधायला लागतील. Proud

माझ्या आजोबांच्या अनुभवावर काही तर्कसंगत स्पष्टीकरण असेल तर नक्की पोस्टा प्लीज.

योग,dreamgirl आणि निळूभाऊ - सॉल्लीड अनुभव!

.

आता माझा अनुभव.

लग्नानंतर फिरायला म्हणून बंगलोर मैसूर उटी कोडाइला गेलो होतो. शाळेची सहलच म्हणा ना. पहिलेच लग्न होतं त्यामुळे एका दमात एवढं फक्त शाळेच्या ट्रीपमधेच फिरतात, मधुचंद्राला नाही याची कल्पना नव्हती. Proud

आता थोडं सिरियस.

तर बंगलोर - मैसूर प्रवासात आम्ही हायर केलेल्या इंडिकाला एका मागोमाग एक दोन अपघात झाले ज्यात आम्ही मरता मरता वाचलो. गाडीची वाट लागली. नवीकोरी गाडी ड्रायव्हर घाबरलेला. त्याला थांबवून शांत केला आणि फक्त मैसूर हॉटेलला सोड एवढं सांगितलं. नंतरचे दोन दिवस अख्या "संदेस हॉटेलमधे हेच ते अ‍ॅक्सिडेंट झालेलं कपल असे फेमस झालो होतो आम्ही. बायको प्रचंड घाबरली होती. त्यातून सावरून पुढे ऊटीला निघालो तर मध्ये बॉर्डर क्रॉस करताना जंगलात एका जागी गाडी थांबवून प्रवाश्यांची अदलाबदल केली मिनीबसमधे. नेमका तो हत्तींचा प्रदेश होता आणि खरोखर तिथे आम्हाला जंगली हत्तींचा कळप दिसला. जाम टरकली होती सगळ्यांची.

एवढे करत आम्ही उटीला "द विलोव हिल" या हॉटेलात पोचलो. अत्यंत उंचावर एकवशी असं हॉटेल. त्याच्या वर फक्त मिथूनचं मोनार्च हॉटेल आणि एक केटरिंग कॉलेज आहे बाकी काही नाही. आत शिरलो तर काऊंटरवरच्या मॅनेजरचे डोळे फूल रामसे स्टाईल. बायको आणिच टेंशनमध्ये. सगळे हॉटेल लाकडी बांधकामाचं. युरोपियन लोकांचे खास आकर्षण. पण सगळं लाकडी फर्निचर अंगावर येत होतं. एक विचित्र असं फिलिंग यायला सुरू झालं. आम्ही प्रायव्हेट गार्डन असलेली रूम बूक केली होती. संपूर्ण हॉटेल डोंगर उतारावर असल्याने रूमची बांधणी पण उतरती होती. आमच्या रूमला जायला रिसेप्शनपासून खाली उतरत जायचे होते. थोडे वळल्यावर खाली स्पायरल जिना होता. एकदम हॉलिवूड स्टाइइल बांधणी. आणि तो जिना आम्ही उतरलो आणि क्षणात मला फिलिंग आलं की जिन्याच्या वरच्या बाजुला कोणीतरी उभं आहे. पटकन पाहिलं तर काहिच नव्हते. पण आता मला विचित्र फिलिंग्स यायला सुरुवात झाली होती. पण बायकोला मी बोलू शकत नव्हतो कारण ती आधीच भेदरलेली.
आत शिरून मी बाथरूमला गेलो तर पलंगावर बसलेल्या बायकोला अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याचा भास झाला. तिने टीव्ही लावून फूल व्होल्यूम केला. मला काही कळेना, बाहेर येऊन विचारलं तर काहीच बोलली नाही. मग सहज म्हणून अटॅच्ड प्रायव्हेट गार्डनचा दरवाजा ओपन केला. मस्त ट्युलीपची फुलं लावली होती. आणि एक लाकडी बाक होता. अत्यंत जीर्ण अवस्थेतलं लाकूड होतं त्याचं.

त्या बाकाकडे बघता क्षणी मला असं वाटून गेलं की इथे काहीतरी झालय (होऊन गेलय). मी पुरता संभ्रमात पडलो होतो बायकोला हे बोलू की नको. आणि त्याच क्षणी बायकोला त्या बाकावर दोन्ही हात पसरून बसलेली एक आकृती दिसली ज्याचा अर्धा चेहरा जळका होता. ती प्रचंड घाबरली. तिने सगळी तिला आलेली फिलिंग्स मला सांगितली आणि मग मीही मला झालेल्या जाणीवा तिला सांगितल्या. दुपारचे ३.३० झाले होते. जसजशी रात्र होइइल तसे इथे रहाणे अशक्य होईल असे वाटलं आम्हाला. मग सरळ काहीतरी बहाणा करून आम्ही बाहेर पडलो सरळ सामानासकट. सगळे बुकिंगचे पैसे फुकट गेले, पण तिथे राहण्यापेक्षा ते ठीक होतं. आजही अंगावर काटा येतो ते आठवून जे आम्ही दोघांनी एकाचवेळी अनुभवले. घरी कळवलच नाही. झालेल्या अपघातांचे पण जास्त सांगितले नव्हते घरी. मित्राला कळवलं फक्त. तो मित्र नंतर मुद्दाम उटीला गेला तेंव्हा ते हॉटेल बघून आला.

लाकडी फर्निचरचं एकवेळ ठीक आहे की सवय नसेल तर सगळ्म अंगावर आल्यासारखं वाटत. पण तो जिन्यावरचा आभास आणि गार्डनमधलं मला वाटणं आणि बायकोला ती अर्ध्या जळलेल्या चेहर्‍याची आक्रुती दिसणं सगळच केवळ अशक्य होतं.

नंतरचे उटीतले दिवस छान गेले. तिथून कोडाईला हॉटेलवर आम्ही रात्री पोचलो. पोचून खिडकी उघडणार तर पडदा सरकवताना विचित्र आवाज कानावर येऊन एकदम अक्राळविक्राळ काहीतरी माझ्या अंगावर आल्याचा मला भास झाला. मी सटकन मागे सरलो. ते बायकोने बघितले. पण नंतर मात्र तिथेही बाकी काही त्रास नाही झाला.

परत आल्यावर सगळे किस्से घरी सांगितले. आणि आजी आजोबांना भेटायला कोकणात गेलो. कोकणात या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व. काकांनी जाऊन कोणालातरी प्रश्न काय विचारला तर त्यांना कळलं की आम्हाला मारायला गावातल्या एकाने म्हणे देवसकी केली होती, आणि तेच अनुभव सगळे आम्हाला येत होते. Proud

आता हे शेवटचे देवसकी वगैरे कितपत खरं माहित नाही, पण झालेला अपघात, नंतर आलेले अनुभव विशेषतः उटीच्या हॉटेलचा हे मात्र अनुभवच आहेत. खरेखुरे.

माझ्या चुलत बहिणीची मुलगी खुप डॅशिंग आहे अगदी टॉम बॉय म्हणायचे तिला! २००५-०६ मधे सुरतला तिच्या प्लेझरवरुन कॉलेज सुटल्यावर दुपारी २.३० च्या सुमारास घरी येत होती. वाटेत एका वयस्क गुजराथी बाईने लिफ्ट मागितली, भर उन्हात एक प्रौढा लिफ्ट मागतेय म्हणुन हिने तिला बसवुन घेतले. मधे मधे हिने विचारु पाहिले कुठे उतरणार वगैरे....पण ती बाई लवकर सांगेचना कुठे उतरायचय ते ! एका ठिकाणी सिग्ननलला गाडी थांबल्यावर हिने तिला विचारावे म्हणुन मागे वळुन पाहिले तर अर्थातच मागे कुणी नव्हते. बरं अशा गोष्टींवर विश्वास ही विश्वास ठेवणारी नव्हती म्हणुन हिने घरी आल्यावर आई-बाबांनाही सांगितले नाही...विसरुन गेली. काही दिवसातच हिला पोटदुखी सुरु झाली..इतकी की अक्षरशः गडबडा लोळेपर्यंत! सूरतमधल्या निष्णात डॉक्टरांना दाखवुन झाले....अपेंडीक्स, एक्स-रे, सोनोग्राफी सर्व चाचण्या नॉर्मल! मग तिची चिडचिड, विचित्र वागणं, .... आदिवासी भाषेसारखी भाषा!
घरचे घाबरले... धुळ्याजवळ 'खर्दे' नावाचे गाव आहे तिथे अशा बाधित व्यक्तिंना आणलं जातं आणि उतरवलं जातं! तिथे कुणी मांत्रिक, बाबा-बुवा नाही...पण काळ्या पाषाणातील दत्तमंदिर आहे. दुपारी १२ची आरती सुरु झाली की त्या आवाजाने हे असे लोक विव्हळु लागतात. त्यांना त्यावेळेस तिथले पुजारी चामड्याची चप्पल तोंडात धरुन मंदिराभोवती प्रदक्षिणा मारायला सांगतात. भर उन्हात अनवाणी पायांनी हे सर्व लोक/बाया असं करतांनाचं दृष्य विचित्र असते. तिथे हिने सांगितले की ती गुजराती बाई आणि तिने आणखी दोन बायकांना (एक नंदुरबारजवळच्या आदिवासी खेड्यातली आणि एक कर्नाटकातली) बोलवले होते...ह्या 'झाडा'वर रहायला.
अजुनही ह्या मुलीला असा मधुन मधुन त्रास होतो. मधली कॉलेजची वर्ष मग अशीच ड्रॉप घेउन गेली, नोकरीतुनही तिने १-२दा गॅप घेतलाय आणि आई-बाप हवालदिल!
रच्याकने, मला एक समजलं नाही... भुतं ही अशी एक दुस-याला बोलवतात की "ये हे 'झाड' चांगलं आहे" म्हणुन!!! Uhoh

दिनेशदा,

(झपाटायचे, पिडायचे, बाधा करायची, डोक्यावर बसायचे, अंगात यायचे... काहीही करायचे .. पण करायचेच )>> हे करायला भूत व्हायची काय गरज आहे??? ड्यू आय घेतला की काम होतंय बघा!!! Wink Lol Light 1

बर्‍याच झपाटलेल्या जागा हॉस्पीटल्सचे कॉरीडोर्स, हॉस्टेल्स, फ्लॅट्स, शाळांचे लू... अशाच असतात....
काय कारण असावं बरं???

बाप रे! तरी बरंय, हे आत्ता पोस्टलंस ते. मी उटीला जायच्या आधी हे वाचलं असतं तर माझं काही खरं नव्हतं Sad उटीच्या हॉटेलचं नाव लक्षात ठेवेन मी. कोडाईच्या हॉटेलचं नाव नाही दिलंस.

>>नाहीच जमले तर एकातरी मायबोलीकराला येऊन भेटायचेच !! (झपाटायचे, पिडायचे, बाधा करायची, डोक्यावर बसायचे, अंगात यायचे... काहीही करायचे .. पण करायचेच )

भुंग्या, वाचतोयस ना? माझ्या लेखांना अनुकूल अभिप्राय नाही दिलेस आणि मेल्यावर माझं भूत झालंच तर तुझ्या डोक्यावर विना रेन्ट रहाणार मी Proud दिवा घे रे!

>>रच्याकने, मला एक समजलं नाही... भुतं ही अशी एक दुस-याला बोलवतात की "ये हे 'झाड' चांगलं आहे" म्हणुन!!!

अगदी, अगदी. आणि एका डोक्यावर एव्हढ्या ३ बायका मावल्या? बरं मावल्या ते मावल्या पण गुण्यागोविंदाने नांदल्या पण! आश्चर्य आहे. नाहीतर माझी आजी म्हणायची तसं एका खोलीत १० पुरुष रहातील पण २ बायका एकत्र रहाणं महाकठिण! पण हॉरिबल अनुभव!

भुंग्या बापरे... बायको खूप धीट दिसतेय... मी गाशा गुंडाळायला लावला असता त्याच वेळी!! मला दिसत नाहीत हे आता त्यांचं (भूतांचं) नशीब समजायचं, माझं की नवर्‍याचं देव जाणे Proud

रच्याकने, मला एक समजलं नाही... भुतं ही अशी एक दुस-याला बोलवतात की "ये हे 'झाड' चांगलं आहे" म्हणुन!!!>> अ‍ॅ... एकाला राहायला एकच "झाड" लागतं ना...इथेपण शेअरिंग??? कम्माल झाली... Uhoh

>>बर्‍याच झपाटलेल्या जागा हॉस्पीटल्सचे कॉरीडोर्स, हॉस्टेल्स, फ्लॅट्स, शाळांचे लू... अशाच असतात....
काय कारण असावं बरं???

"Hauntings" म्हणून एक प्रोग्राम लागतो टीव्हीवर. त्यात अश्या कथा असतात. किती खर्‍या किती खोट्या देव जाणे. तर त्यात एकदा असं सांगितलं होतं की एखाद्या जागी असे अनुभव आले म्हण्जे तिथे भूतच आहे असं नाही. कधीकधी खूप intense emotions असलेल्या घटना तिथे घडलेल्या असल्या तर ती residual energy तिथे रहाते आणि त्यातून घडून घडलेल्या घटनांचे echo भविष्यात लोकांना दिसू शकतात. मला हे स्पष्टीकरण डोक्यावरून गेलं. एको दिसायला ती काय फिल्म आहे?

१९८३ ची गोष्ट :

सातारा नजीक जोशी विहिर नावाच्या खेड्यात काही दिवस रहायला होतो. सुट्टीत बोअरवेलच्या गाडीवर काम करायचो. तेव्हा असंच एकदा चौधरवाडीजवळ रात्रीचे बोअरचे काम चालु होते. बराच वेळ झाल्याने धूळीने कंटाळा अन डोळे चुरचुरायला लागले होते. तेव्हा सहज म्हणून जवळच्या एका बंधार्‍याजवळ तोंड धुवायला म्हणून गेलो तेव्हा हातात बॅटरी होती फक्त. तोंड धुतलं आणि बराच वेळ तिथे बसुन आराम करण्याच्या तयारीत असताना एक पस्तीशीच्या वयातला एक इसम माझ्याजवळ येऊन बसला. काम करून खूप दमलेलो असल्यामुळे भुता-खेतांचा संशय डोक्यात आलाच नाही. हळूहळू तो माझ्याशी बोलायला लागला. माझ्याविषयी ऐकण्याऐवजी त्याला स्वतःबद्दल ऐकवण्यातच जास्त इंटेरेस्ट वाटत होता. किमान तासभर बडबड करूनही तो अजिबात थकलाच नव्हता. सततच्या बडबडीमुळे आता माझ्या मेंदुचाही शॉट व्हायला लागला. मी त्याला थांबवून "बस झालं. गप्प रहा आता. मला थोडा वेळ आराम करूद्यात" तरीही त्याचं आपलं चालुच होतं. आता कहर झाला. एवढं सांगुनही त्याला थांबवणं कठीण जात होतं. मग काय वैतागलेल्या मनस्थितीत मी त्याला धरून हाकलायला लागलो. तरीही त्याचं आपलं चालुच होतं. मग रहावलं नाही आणि मी त्याला जोरांचं ढकलंलं तर तो पाय घसरून त्या बंधार्‍यात पडला. पण मी एवढ्याही जोरात धक्का दिला नव्हता कि तो पाण्यात बुडेल. माझी झोपच उडाली. तो पाण्यात जिव वाचवण्याच्या आंकताने ओरडतो आहे हे पाहून माझी थोडीशी फाटलीच होती. आता काय मी सुद्धा मोठ्याने ओरडायला लागलो, मदतीचा धावा करायला लागलो. थोड्यावेळात आमच्या बोअरवेलच्या गाडीवरचे काही लोक धावुन आले. काय झालं? हे मी ओरडून सांगत होतो आणि ते मात्र मी वेडा आहे अश्या अभिर्भावाने माझ्याकडे बघत होते. मी मात्रा त्या इसमाला सप्शेल पाण्यात बुडताना पाहीलं होतं.

थोड्या वेळाने परत बोअरवेल व्हॅन जवळ आल्यावर तिथल्या एकाने मला भुतानं झपाटलं होतं. बरं झालं आम्ही आलो नायतर तुलाबी पाण्यात डुबवलं असतं. ऐकून थोडंसं हसू आलं. कदाचित ते खरं भुत असेलही किंवा नसेलही. पण बराच विचार करायला लावणारा प्रसंग होता तो. तिथून परत घरी जाताना मात्र माझं लक्ष अन मन त्या बंधार्‍यात बुडालेल्या इसमाला शोधण्यातच गुंतलेले होते. घरी गेल्यावर आईला सांगितल्यावर मात्र कोहळा, उडीदाचा उतारा आणि कमरेला बांधलेला , उजव्या पायात बांधलेला काळा धागा कॉलेजात गेल्यावरच काढला मी.

आजही तो प्रसंग डोळ्यासमोर आठवतो आणि एक वेगळीच शांतता पसरते अवती भोवती.

* हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. इतरांच्या अनसुन्या अनुभवांबद्दल लिहितोच सविस्तर.

लोकसंख्या वाढली आणि "झाडं" कमी झाली.

तूम्हाला असं नाही वाटत, कि जूनाट घरांचा मनावर असा काही परिणाम होतो, कि तिथे कुणीतरी वावरत असल्याचा भास होतो.

नाशिकला, तांबाघाटाच्या पुढे प्राध्यापिका कुंदा भोसले रहात होत्या. एकट्याच होत्या (त्या माझ्या आत्याच्या नणंद) त्यांचे घर जूनाट होते, (सगळे त्याला भूतबंगलाच म्हणत) पण त्या अनेक वर्षे तिथे एकट्याच राहिल्या. मी पण त्या घरी गेलो आहे, घर जूने, अंधारे होते, पण बाकी काही नाही वाटले, मला कधी तिथे.

दिनेशदा Happy (हे आताच गगोवर टाकलं होतं)

माझा एक अनुभव नाही पण हे फिलिंग आहे.
पुण्यातल्या केळकर म्युझियममधे कधी गेलात तर वाद्यांचं दालन आहे ...ते ओलांडुन मागे गेलं की आपण मस्तानी महालात जातो. त्या वाटेवरुन बघितलं तर खालचा केळकरांचा वाडा दिसतो. या वाड्यात रहाणारी लोकं कशी रहात असतील?
रात्री ह्याच वाद्यांवरुन उदा. तंबोरा, सतार (उंदीर नाहीत) पण समजा कुठुन तरी त्याच्या तारांवर फिरला तर होणारा झंकार, किंवा मस्तानी महालातुन एखादी लकेर/ छुन छुन ऐकु आली तर?????
मला कल्पनेनेच शहारे येतात अंगावर .....

माझं बालपण कोकणात गेल्यामुळे काही किस्से अनुभवले, तर काही लोकांकडून ऐकले आहेत.
आम्ही कोकणात खेडेगावात रहात होतो. जिथे एस टी., दुकान, दवाखाना, यासाठी ४-५ किलोमीटर चालून जावे लागायचे. आम्ही जिथे रहात होतो तिथे वीजेचे दिवे वगैरे प्रकार नव्हता. कारण तेव्हा फक्त तालुक्यापर्यंतच वीज आलेली होती. रात्रीच्या वेळी सगळीकडे अंधार असायचा. घरात फक्त कंदील, चिमणी (लहान दिवा)यांचा मोजकाच प्रकाश आणि बॅटरी असायची. आमचे घर खूपच मोठे होते. आणि घराला लाकडी खिडक्या आणि त्याना लाकडी गज्.खिड्क्या ऊघड्याच. आमच्या घराभोवती भरपूर आंब्या-फणसाची, काजूची झाडे, इतर अनेक फुलझाडे, रान झाडे होती. थोडक्यात आजूबाजूला जंगलच होते.
एकदा माझा पुण्यात शिकायला असलेला भाऊ गावी येणार होता. पुण्यातून रत्नागिरीपर्यंत एकच गाडी होती. तिथून पुढे जशी मिळेल तशी. कारण त्याकाळी सगळ्याचा आनंदच होता. माझे वडील त्याला आणायला सकाळीच रत्नागिरीला गेले होते. रात्र झाली तरी ह्यांचा पत्ता नाही. एकमेकांशी संपर्क साधण्याचे काही साधन नव्हते. घरी फक्त माझी आई, मी व माझी बहीण (आम्ही दोघीही खूपच लहान). जशी जशी रात्र वाढत होती, आम्हाला जबरदस्त भिती आणि भावाची व वडीलांची काळजी वाटत होती. आई आम्हाला समजावत होती.(मनातून तीही घाबरली होती.) आम्ही असेच खिडकीतून बाहेर पहात होतो, आणि आम्हाला तिघीनाही एक मशाल झपकन गेलेली दिसली. आम्हाला वाटले वडील आले. पण ते तर नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कंदील आणि बॅटरी होती.काही तरी अमानवीय आहे हे आम्हाला समजल होतं. आमची त्यावेळची अवस्था अशी होती कि कुणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता. हृदयाची धडधड फक्त ऐकू येत होती. घसा कोरडा पडला होता. पण हलायची पण भीती वाटत होती. आई आम्हाला दोघीनाही जवळ घेऊन ऊभी होती. कारण ती दुसरं काहीच करू शकत नव्हती. आमच्या शेजारी एकच घर होते, पण हाक मारून सुद्धा त्याना आवाज ऐकू जाण शक्य नव्हत. आजूबाजूला जराही वस्ती नव्हती. शेवटी आईने आमची समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न केला. तिला ते करणं भागच होत. अशीच वाट पहात बसलो, आणि रात्री उशीरा वडील व भाऊ घरी पोहोचले आणि आमच्या जीवात जीव आला.
अजूनही आठवणीने अंगावर सरकन काटा येतो.

कधीही बाहेर फिरायला जाताना मी माझ्या बॅग मध्ये एक भली मोठी चाकु ठेवतोच, रात्री ला झोपताना उशी खाली ठेवतो.

Pages