शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यमराजाने ब्रह्मज्ञानाच्या बदल्यात भौतिक सौख्य दबदल्यात, तेव्हा >> दबदल्यात म्हणजे काय? क्ष छान माहिती.

चान्गली माहिती दिलीत. धन्यवाद. माझा कयास बरोबर होता पण मला खात्री करून घ्यायची होती.
बापू करन्दिकर

बदल्यात म्हणण्यापेक्षा "ऐवजी" म्हंटलेले योग्य होईल. नचिकेताने यमराजांना ब्रह्मज्ञानाची मागणी केली तेव्हा त्यांनी त्याऐवजी "तू स्वर्गाचे राज्य घे,उदंड आयुष्य घे" असे प्रेयस सुख देऊ केले पण नचिकेताने पूर्ण संयम दाखवून आपली मागणी कायम ठेवली. (अर्थात त्याने बाकीची सुखेही घेतलीच.. स्मार्ट बॉय :))

Straight from the horses mouth:

जातिवंत घोडा त्याच्या दातांवरुन अचुक ओळखता येतो म्हणुन तसा वाक्प्रचार आहे. (घोड्याचे वय देखिल त्याच्या दातांवरुन सांगता येते.)

http://www.idiomsite.com/straightfromthe.htm देखिल पहा Happy

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

"प्रभंजन" या शब्दाचा अर्थ काय आहे?

एकाच शब्दाबद्दल मला दोन प्रश्न विचारायचे आहेतः
१)मित्रवर्य, कविवर्य -- यामधे 'वर्य' या शब्दाचा अर्थ काय होतो?
२) वरील शब्द पुल्लिंगी आहेत. मग स्त्रियांसाठी: मैत्रीणवर्य, कवयित्रीवर्य -- असे शब्द आपण लिहू/बोलू शकतो का?

वर्य या शब्दाचा अर्थ 'श्रेष्ठ' असा होत असावा बहुतेक.... उदा. मुनिवर्य वाल्मिकी म्हणजे मुनिंमध्ये श्रेष्ठ असे वाल्मिकी....

मैत्रीणवर्य, कवयित्रीवर्य -- असे शब्द आपण लिहू/बोलू शकतो का? >>> बोल की बाबा. तूला कोण आडवनार. Happy

सतीश माढेकर : 'प्रभंजन' शब्दाचा अर्थ वादळ, रोरावणारा वारा असा आहे.
बी : संतिनो म्हणतो तसा 'वर्य' या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ/उत्तम असा होतो. 'मित्रवर्य'/'कविवर्य' ही सामासिक विशेषणे आहेत.
मित्रांमध्ये 'वर्य' म्हणजेच श्रेष्ठ असा (= मित्रोत्तम) = मित्रवर्य
कवींमध्ये श्रेष्ठ असा = कविवर्य.
कविवर्य हा शब्द संस्कृतातून जसाच्या तसा आलेला म्हणजेच 'तत्सम' असल्याने त्यातील पहिला भाग संस्कृताप्रमाणे 'कवि' असा इकारान्त लिहिला जातो व त्याला लगेच 'वर्य' जोडला जातो. हा शुद्धलेखनाचा नियम आहे. त्यामुळे 'कवीवर्य' हे शुद्धलेखन नसून 'कविवर्य' हे लेखन अचूक आहे हे लक्षात ठेवावे.

वरील विशेषणे अकारान्त आहेत. मराठीत विशेषणांसंबंधी असा नियम आहे की:
१. आकारान्त विशेषणे (पुल्लिंगाकरता, स्त्रीलिंगी नामांकरता ईकारान्त, नपुंसकलिंगी नामांकरता एकारान्त विशेषणे) त्यांच्या पुढच्या नामांनुसार 'विकारी' होतात - नामांच्या विभक्त्यांनुसार/लिंगांनुसार ही विशेषणे बदलतात. उदा.: 'मोठा धोंडा - मोठे धोंडे - मोठ्या धोंड्याला - मोठ्या धोंड्याने', 'छोटी पिशवी - छोट्या पिशव्या - छोट्या पिशव्यांचे', 'पडके घर - पडकी घरे - पडक्या घराला - पडक्या घरात' इत्यादी.
२. आकारान्त विशेषणे (आणि स्त्रीलिंगी,नपुंसकलिंगी नामांकरता अनुक्रमे ईकारान्त, एकारान्त विशेषणे) वगळता इतर विशेषणे नामांनुसार चालत नाहीत... जणू काही 'अविकारी' शब्द असल्याप्रमाणे त्यांची रूपे नामांच्या लिंगा/विभक्त्यांनुसार बदलत नाहीत. उदा.: 'कडू कारले - कडू कारली - कडू कारल्यांना - कडू ककारल्याची, 'सुंदर चेहरा - सुंदर चेहरे - सुंदर चेहर्‍याला - सुंदर चेहर्‍यांचे' इत्यादी.

आता 'मित्रवर्य', 'कविवर्य' हे शब्द अकारान्त असल्यामुळे वरच्या नियम क्र. २ मुळे लिंगाप्रमाणे बदलणार नाहीत. म्हणजे 'कविवर्या श्रीमती. अमुक तमुक' असे म्हणणे योग्य होणार नाही. तिथे एकंदर कवी/कवयित्री अशा उभयलिंगी समूहामध्ये श्रेष्ठ असा संदर्भ अपेक्षित असेल तर 'कविवर्य श्रीमती अमुक तमुक' म्हणणे व्याकरणदृष्ट्या योग्य धरले जाईल. पण काही लोकांना असा शब्द रुचणार नसेल/काही लोकांची मनं व्याकरणाच्या काटेकोर पालनानं दुखावणार असतील/'कवयित्री' अशी त्यांची लिंगवाचक ओळख ठळक करायची असेल किंवा 'कवयित्रींमध्ये श्रेष्ठ' अशीच विशिष्ट समूहासंदर्भात ओळख सांगायची असेल तर 'कवयित्रीवर्य' हा शब्द व्याकरणदृष्ट्या ग्राह्य धरता येईल असे माझे वैयक्तिक मत आहे. याच न्यायाने 'मित्रवर्य कु./सौ./श्रीमती' हे व्याकरणदृष्ट्या चूक ठरणार नाही. पण असा उल्लेख गैरसोयीचा वाटत असेल तर 'मैत्रीणवर्य' असा नवा शब्द योजायला (केदाराने म्हटले तशी) कुणाचीही - व्याकरणाचीही - आडकाठी नसावी :फिदी:. कारण संस्कृतेतर शब्दांचे संस्कृत शब्दांशी समास/इतर व्याकरणसंबंध जुळवणे मराठीला नवे नाही (उदा.: गरूडनजर वगैरे).

बरं, एक भा. प्र., एवढा त्रास करून घेण्यापेक्षा 'श्रेष्ठ कवयित्री' आणि 'चांगली मैत्रीण' असं म्हणायला काय हरकत आहे? Happy

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

मित्रवर्य फ, खूपच छान माहिती दिलीस रे.. खरचं तुझ्याकडे मराठी भाषेची शिकवणी लावायला पाहिजे. धन्यवाद!

फ, माझी एक विनंति.
मला बरीच वर्षे बोचत असलेला एक विषय. मराठीत आजकाल इंग्रजी शब्दांचे प्रमाण फार वाढत चालले आहे. सोयीचे, नेहेमीच्या वापरातले, कधी कधी समानार्थी शब्द माहित नसल्याने इंग्रजी शब्द वापरले जातात. पण जर तुम्ही इंग्रजीला पर्यायी अशी मराठी शब्दांची यादी केलीत नि ती मायबोलीसारख्या ठिकाणी लिहीलीत तर हळू हळू मराठी पूर्ववत् मराठी होईल.
अमृतातेहि पैजा जिंकणारी, संस्कृतची लाडकी मुलगी अशी जी मराठी, तिला अशी परकीय भाषांची कुबडी घ्यायची काय गरज?
आता इंग्रजीतून बोलायचे तर इंग्रजीतून बोला. पण माराठीतून बोलायचे तर मराठीतून बोला. पण असली भेळमिसळ नाको. कधी कधी अर्थाचे अनर्थ होतात.

"सावरी" म्हणजे काय??

--
I’m not sure what’s wrong… But it’s probably your fault... Proud

सावरि हे एक झाड आहे, ह्याचा कापुस अतिशय तलम असल्यामुळे पुर्वि थोरामोठ्यांच्या घरच्या गाद्या, उश्या ह्या सावरिच्या कापसाच्या असायच्या. ह्याचेच संस्क्रुत नाव 'शाल्मलि' आहे असे वाटते. चु.भु.दे.घे.

काही दिवसांपूर्वी शोनूने सिंहगड रोड बाफावर खालील पोस्ट टाकली होती :
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सयुक्तिक बरोबर की संयुक्तिक बरोबर की सय्युक्तिक बरोबर ? या शब्दाचं सायटेशन कसं शोधता येईल ? गूगल केलं तर सयुक्तिक अन संयुक्तिक असे शब्द दिसतात पण ते ज्यांनी वापरले आहेत त्यांच्यावर ( माझा तरी )निर्विवाद विश्वास नाही. शब्दरत्नाकरात संयुक्तिक असा दिलाय शब्द. पण मला तो संयुक्त वरून आलेला वाटतो. युक्ती वरुन आलेला वाटत नाही. कोणी तरी (न वाह्त्या बीबी वर ) सविस्तर लिहा पाहू प्लीज.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला आधी 'सयुक्तिक' हा (एकमेव) शब्द बरोबर असावा असं वाटायचं. पण वझ्यांच्या आर्यभूषण शालेय शब्दकोशानुसार 'सयुक्तिक' आणि 'संयुक्तिक' असे दोन्ही शब्द मराठीत आहेत असे दिसते. त्याबद्दल थोडेसे:

१. 'सयुक्तिक' हा शब्द 'युक्तिसह असलेला'/'युक्तिपुरस्सर'(इंग्लिश भाषेतल्या Reasonable) अशा अर्थाने विशेषण म्हणून योजला जातो. समांतर उदाहरण द्यायचे तर 'सहेतुक' हा शब्द बघा. 'हेतूसह असलेला'/'हेतुपुरस्सर' अशा अर्थाचं हे विशेषण आहे. यात 'हेतु(/हेतू) या नामाला सहित' या अर्थाने 'स' हे पूर्वपद जोडले आहे. अशा पद्धतीने बनलेल्या 'सहेतु' शब्दाला 'क' हा कर्तृवाचक प्रत्यय जोडून 'सहेतुक' असं गुणविशेषण बनवलंय. याच पद्धतीने ' स + युक्ति (= युक्तिसह)' => 'सयुक्ति + क' => सयुक्तिक हे गुणविशेषण बनतं.
२. वझ्यांच्या शब्दकोशात 'संयुक्तिक' हा शब्द देताना 'Coherent; rightly contrived' असा अर्थ दिलाय. त्या दिशेने विचार केल्यावर हा शब्द 'सयुक्तिक' शब्दापेक्षा वेगळ्या अर्थच्छटेचा आहे असं दिसतं. या शब्दाचं मूळ ’सं + युज्‌’ या संस्कृत धातूत आहे. 'युज्‌' = योजणे, बेत आखणे, जोडणे अशा अर्थाच्या मूळ धातूला 'सं' हे 'संयोगदर्शक पूर्वपद जोडले की त्याचा अर्थ '(सर्व गोष्टींचा) मेळ घालून योजणे/जोडणे' असा होतो. या धातूपासून बनलेल्या 'संयुक्ति' या भाववाचक नामाचा अर्थ 'Coherence' असा होईल. 'संयुक्ति'पासून 'क' हा कर्तृवाचक प्रत्यय जोडून 'मेळ घालून जोडलेले/योजलेले' अशा अर्थाचे 'संयुक्तिक' हे विशेषण बनेल.

बर्‍याचदा आपण 'या प्रसंगी अमुक तमुक करणे हाच पर्याय योग्य(~ Reasonable) आहे' अशा अर्थानं वाक्य रचतो तेव्हा 'या प्रसंगी अमुक तमुक हाच पर्याय सयुक्तिक ठरेल' असं म्हणणे उचित ठरेल.

झक्की, शक्यतो मराठी शब्द योजण्याचा मार्ग चांगला आहेच. पण इंग्लिश किंवा इतर भाषांमधले शब्द आपण आपल्या भाषेच्या पिंडानुसार वापरायलाही हरकत नाही. सध्या याबाबत आपण जागरूक नाही असं दिसतं. मराठीत नामांना लिंगं असतात. आणि ती नामं त्या-त्या लिंगानुसार आणि अंत्य स्वरानुसार विभक्त्यांमध्ये चालतात हा नियम आपण सध्या सर्रास मोडतो आहोत. उदा.: '(ते) टेबल' हा शब्द आपण अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाप्रमाणे (समांतर उदाहरण - '(ते) घर') 'टेबलाला - टेबलाने - टेबलांचा - टेबलाशी' असा विकारी म्हणून वापरतो. पण '(ते) सॉफ्टवेअर' हा शब्द आपण विकारी नसल्यासारखा 'सॉफ्टवेअरला - सॉफटवेरच्या' वगैरे रूपं बनवत वापरतोय.. जे चूक आहे. तो शब्द 'सॉफ्टवेअराला/ सॉफ्टवेअराने/ सॉफ्टवेअराचे' असा चालवायला हवा. खरं तर मराठीत सर्व नामे विकारी होतात.. म्हणजे त्यांची विभक्तिरूपे बनवताना त्यांच्या मूळ शब्दरूपात बदल होतो. उदा.: 'टेबल' - 'टेबला(चा/ने/ला)', 'राम - रामा(ला/ने/चा)'. त्यामुळे इंग्लिशीतून (दचकू नका! 'इंग्लिश' जर 'नथ', 'मगर' वगैरे अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांसारखा चालवला तर इंग्लिशीतून हे रूप बरोबरच आहे. :फिदी:) आलेल्या शब्दांना लिंग बहाल करून त्यांच्या व्याकरणानुसार विभक्त्या चालवायला हव्यात. मात्र गेल्या दोनेक पिढ्यांतल्या माध्यमांमधल्या लोकांना/पत्रकारांना, खुद्द साहित्यिकांनाही याबद्दल जागरूकता नसल्याने आपल्याला व्याकरण मोडून वाट्टेल तशी चालवलेली रूपे ऐकायची सवय लागलीये. ही घातक सवय आपल्या पिढीत दुरुस्त केली नाही तर मराठी ही क्वचित कधीतरी व्याकरण पाळणारी आणि बर्‍याचदा न पाळणारी धेडगुजरी भाषा बनण्याचा धोका आहे.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

'सॉफ्टवेअराला/ सॉफ्टवेअराने/ सॉफ्टवेअराचे' >> फ सॉफ्टवेअर हे नाम नाही, त्यामूळे हे कसे काय वापरता येईल? (उदा जॉर्जला, जॉर्जचे). स्फॉफ्टवेअर ह्या शब्दाचे मराठीकरन संगनक प्रणाली ला मात्र आपण तू म्हणतोस तसेच चालवतो की. जसे ह्या संगनक प्रणालीला तयार केले, ह्या संगनक प्रणालीचे मुख्य उदिष्ट वैगरे वैगरे.

केदार,
सॉफ्टवेअर हे नाम आहे. Happy
संकल्पचा मुद्दा मला पटला.
केसरी, समाजस्वास्थ्याच्या जुन्या अंकांत प्रत्यय जोडण्याची हीच पद्धत दिसून येते.

आयला. पण तसे वापरले तर फ नेच लिहील्यासारखे धेडगूजरी होणार नाही काय? म्हणून संगनक प्रणाली हाच शब्द योजने बरोबर वाटते. (संगनक प्रणाली आवडत नसला तर तिथे नविन शब्द पाडता येईल Happy


सयुक्तिक अन संयुक्तिक मधला फरक स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.

परभाषेतील शब्द मराठी भाषेच्या नियमांप्रमाणे चालवण्याला काही खास संदर्भ, आधार आहेत का ? (I am not challenging your post, merely curious.)

मी अलिकडच्याच, पत्रकारी मराठीतच नव्हे तर इतरही ठिकाणी फक्त जुन्या अति-प्रचलित शब्दांचं असं रुप पाहिलंय /वाचलंय. उदा टेबल, सोफा, टावेल, कप वगैरे. पण नवीन शब्द जसे की मायक्रोवेव्ह, मिक्सर, कंप्युटर हे शब्द जवळजवळ अव्ययांसारखे वापरलेले पाहिलेत.

>>पण तसे वापरले तर फ नेच लिहील्यासारखे धेडगूजरी होणार नाही काय?
केदारा, माझा मुद्दा असा होता की इंग्लिश किंवा इतर परभाषांमधून आपल्याकडे आलेल्या सामान्यनामांना (सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह वगैरे), विशेषनामांना (इंग्लंड, फिनलंड, डेन्मार्क वगैरे) आपण कुठलेतरी लिंग सर्वमान्यपणे गृहित धरून त्यांची विभक्तिरूपे योजायला हवीत. कारण सामान्यनामे, विशेषनामे हे नामांचे सर्व उपप्रकार विकारी/व्यय शब्द असतात. त्यामुळे 'सॉफ्टवेअराला', ''डेरिव्हेटिव्हांचे', 'फिनलंडात' वगैरे रूपे (विकार पावल्याने) व्याकरणशुद्ध होत. या प्रक्रियेत आपल्याला एखाद्या नामाचे लिंग गृहित धरण्यात/ठरवण्यात मोकळीक आहे; त्या टप्प्यानंतर मात्र ट्रॅफिक सिग्नलांप्रमाणे व्याकरणनियम पाळायला हवे. Proud तसे केले नाही आणि नामं अविकारी/अव्यय असल्यासारखी वापरली तर ते धेडगुजरी होतं; आपण रचलेले आपलेच ट्रॅफिक सिग्नलांचे नियम राजरोस तोडण्यासारखं होतं.
बाकी, संगणकप्रणाली (हा समास असल्याने सलग शब्द आहे) वगैरे पर्यायही योजायला, वापरायला हरकत नाही.

>>परभाषेतील शब्द मराठी भाषेच्या नियमांप्रमाणे चालवण्याला काही खास संदर्भ, आधार आहेत का ?
शोनू, रूढ व्याकरणनियम तर तयार आहेत. प्रश्न केवळ या नवीन उसन्या शब्दांची लिंगे ठरवण्याचा असतो. आणि बर्‍याचदा भाषिक समाज म्हणून झालेल्या संस्कारांतून आपण (बर्‍यापैकी) योग्य वाटतील/स्वाभाविक वाटतील अशी लिंगे या नव्या उसन्या शब्दांना देतही असतो असं निरीक्षण केल्यास जाणवतं. उदा., आपण 'बस गेली/आली' वगैरे वाक्यांमधून बस हे नाम अकारान्त स्त्रीलिंगी आहे असं गृहित धरतो.. जे स्वाभाविक वाटते. कारण 'बस' ही '(ती) गाडी' असल्याप्रमाणे आपण गृहित धरतो. 'गाडी' या सुपरसेटाचं लिंग 'बस' या स्पेसिफिक प्रकारास चिकटवतो. तोच प्रकार 'रेल्वे', 'बाइक', 'कार' या शब्दांबद्दल आपण करतो.. '(ती) रेल्वे/बाइक/कार' असं स्त्रीलिंगी नाम गृहित धरतो. 'फिनलंड', 'डेन्मार्क' यांना आपण काही वेळा '(तो) देश' या सुपरसेटाप्रमाणे पुल्लिंगी, तर काही वेळा '(ते) राष्ट्र' या सुपरसेटाप्रमाणे नपुंसकलिंगी गृहित धरताना दिसतो. 'अमेरिका' हा शब्द मात्र आपण लक्षणीयरित्या अपवाद असल्यासारखा स्त्रीलिंगी गृहित धरलाय... याचं कारण बहुधा कोलंबसानं अमेरिका नावाची नवी भूमी शोधली अशा आपल्या भाषिक मनावर बिंबलेल्या ऐकिवात असावं. ही नवी 'भूमी' म्हणजे अमेरिका असं आपल्या समाजात समीकरण बळावलं गेल्यानं आपण अमेरिका हे विशेषनाम 'भूमी'प्रमाणे स्त्रीलिंगी मानतो. काही वेळा सुपरसेटाप्रमाणे उसन्या शब्दाचा मराठीतला प्रतिशब्द/ढोबळ समानार्थाचा जातभाई ज्या लिंगाचा असेल ते लिंगही नव्या शब्दाला गृहित धरले जाते असं दिसतं. उदा., '(ती) ट्यूब (~ती नळी)', '(तो) बल्ब (~तो दिवा)', '(तो) सॅटेलाइट (~तो उपग्रह)' वगैरे.
लिंग ठरवण्याची/गृहित धरण्याची प्रक्रिया समाजाच्या भाषिक पूर्वसंस्कारांच्या, भौतिक जगातल्या प्रतिमा-परिमाणांच्या आंतरक्रियेतून घडत जाणारी मजेशीर प्रक्रिया आहे. पण एकदा लिंगं गृहित धरली गेली की मग पुढे मात्र सभ्य, सुसंस्कृत नागरिकांप्रमाणे ट्रॅफिकनियम पाळायला हवे. Happy

>>मी अलिकडच्याच, पत्रकारी मराठीतच नव्हे तर इतरही ठिकाणी फक्त जुन्या अति-प्रचलित शब्दांचं असं रुप पाहिलंय /वाचलंय.
शोनू, माझा मुद्दा तोच आहे. आपल्या आधीच्या दोनेक पिढ्यांमधल्या लोकांमध्ये उसनी नामं अव्यय असल्यासारखी वापरण्याचा अजाणपणा घडू लागल्याचं माझंही निरीक्षण आहे. बहुधा व्याकरण, भाषा वगैरे विषय केवळ परिक्षेत मार्क मिळवण्याकरता तात्पुरते रटायचे असतात; नंतर पैशाच्या दुनियेत या विषयांची तत्त्वं उपयोजण्याकरता कशाला डोक्याला शिणवायचे अश्या भाषिक उदासीनतेतून असं वर्तन घडलं असणार. जुन्या काळी लोक ग्रहणात गैरसमजाने/अज्ञानाने असंबद्ध प्रथा पाळायचे, पण आता आपले डोळे उघडलेत ना? मग तसंच भाषेबाबत डोळस, शास्त्रीय व्हायला काही हरकत नसावी.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

महामहिम फ नमस्कार स्विकारावा. Happy

वरील चर्चा उत्तम आहे. भाषेसंबंधी कळकळ त्यातून जाणवते. एक चुकीचा शब्द सतत वापरला जातो तो म्हणजे 'महाराष्ट्रीयन'. मराठीत लिहीताना 'महाराष्ट्री' किंवा 'महाराष्ट्रीय' हे योय आहेत.

इतर परभाषांमधून आपल्याकडे आलेल्या सामान्यनामांना >> फ, ह्या शब्दांचे बहुवचने कशी वापरणार ?

फ जोरात हाय भो
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी
लाड


छान विवेचन. अशा शब्दांचं लिंग निश्चित करण्याकरता एखादी 'रेग्युलेटिंग' संस्था आहे का? मी टेबल हा शब्द तो टेबल, ते टेबल असा दोन्ही प्रकारे ऐकलाय / वाचलाय . जी ए अन सुनीता बाईंच्या पत्रात लॉरी शब्दाच्या लिंगाबाबत ही काही चर्चा वाचल्याचं आठवतंय. शिवाय तो ढेकर का ती ढेकर यावर मायबोलीवर सुद्धा वाद झालेला आहे.

>>फ, ह्या शब्दांचे बहुवचने कशी वापरणार ?
असाम्या, उसन्या शब्दांचं व्याकरण त्यांच्या लिंगांनुसार आणि अंत्य स्वरानुसार चालवायचं.. त्यामध्ये त्यांच्या एकवचनातल्या आणि अनेकवचनातल्या विभक्त्या येतातच. उदा.: (ते) सॉफ्टवेअर हे उसनं सामान्यनाम (ते) घर या अकारान्त नपुंसकलिंगी सामान्यनामाप्रमाणे चालेल. '(ते) घर - (ती) घरे' या एकवचनी-अनेकवचनी जोडीप्रमाणे '(ते) सॉफ्टवेअर - (ती) सॉफ्टवेअरे (/सॉफ्टवेअरं )' असं चालवता येईल. पहिल्यांदा आपल्याला सवय नसल्यामुळे अशी रूपं कानांना अनोळखी वाटू शकतील. पण कुठल्याही सुधारणेची, शिस्तीची सवय पहिल्यांदा लावून घेताना प्रयास अटळ आहे. Happy

अनेकवचनाची इतर काही उदाहरणे खालीलप्रमाणे:
१. अकारान्त पुल्लिंगी नामे ('(तो) दगड' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): '(तो) ट्रक - (ते) ट्रक', '(त्या) ट्रकाला/ने/चे - (त्या) ट्रकांना/नी/चे'.
२ अ. अकारान्त स्त्रीलिंगी नामे ('(ती) ओळ' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): '(ती) कार - (त्या) कारी', '(त्या) कारीला/ने/चे - (त्या) कारींना/नी/चे'. बोट हा शब्द अनेकवचनात आपण 'त्या बोटी, त्या बोटींना, त्या बोटींचे' असाच चालवतो.
२ ब. अकारान्त स्त्रीलिंगी नामे ('(ती) रेघ' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): '(ती) ट्यूब - (त्या) ट्युबा', '(त्या) ट्युबेला/ने/चे - (त्या) ट्युबांना/नी/चे'.
(***अकारान्त स्त्रीलिंगी नामांची रूपे दोन पद्धतींनी चालतात. काही नामे 'ओळ' या नामाप्रमाणे विकार/व्यय पावताना 'इकारयुक्त' होतात.. जसं 'ओळी-ला/ने/चा/ची/चे'; तर काही नामे 'रेघ' या नामाप्रमाणे विकार/व्यय पावताना 'एकारयुक्त' होतात.. जसं 'रेघे-ला/ने/चा/ची/चे'. तरी यातल्या पहिल्या गटातले शब्द मराठीत संख्येने जास्त असावेत. '***)
३. आकारान्त पुल्लिंगी नामे ('(तो) धोंडा' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): '(तो) अजेंडा - (ते) अजेंडे', '(त्या) अजेंड्याला/ने/चे - (त्या) अजेंड्यांना/नी/चे'.
४. आकारान्त स्त्रीलिंगी नामे ('(ती) शाळा' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): उसनी आकारान्त स्त्रीलिंगी सामान्यनामं मला आता आठवत/सुचत नाहीयेत. परंतु त्याला साधर्म्य म्हणून उसन्या आकारान्त स्त्रीलिंगी विशेषनामाचं उदाहरण देतो. विशेषनाम असल्याने यात 'अनेकवचन' हा किस्साच गैरलागू होईल. तरीही: '(ती) अथेना', '(त्या) अथेनेला/ने/चा/ची/चे'. 'अमेरिका' हे विशेषनाम आपण असंच चालवतो.
५. ईकारान्त पुल्लिंगी नामे ('(तो) गावकरी' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): '(तो) रेफरी - (ते) रेफरी', '(त्या) रेफर्‍याला/ने/चे - (त्या) रेफर्‍यांना/नी/चे'.
६. ईकारान्त स्त्रीलिंगी नामे ('(ती) नदी' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): '(ती) आर्टरी - (त्या) आर्टर्‍या', '(त्या) आर्टरीला/ने/चे - (त्या) आर्टर्‍यांना/नी/चे'. 'कंपनी' हा उसना शब्द आपण असाच चालवतो.
७. ऊकारान्त पुल्लिंगी नामे ('(तो) लाडू' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): उसनी ऊकारान्त पुल्लिंगी सामान्यनामं मला आता आठवत/सुचत नाहीयेत.
८. ऊकारान्त स्त्रीलिंगी नामे ('(ती) धेनू' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): '(ती) कनू - (त्या) कनू', '(त्या) कनूला/ने/चे - (त्या) कनूंना/नी/चे'.
९. एकारान्त नपुंसकलिंगी नामे ('(ते) मडके' या नामाप्रमाणे विभक्तिरूपे): उसनी एकारान्त नपुंसकलिंगी सामान्यनामं मला आता आठवत/सुचत नाहीयेत.

शोनू, महाराष्ट्र राज्य सरकाराची 'महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती महामंडळ' ही साहित्य/भाषा/संस्कृतीविषयक काम करणारी संस्था आहे. त्यांनी विविध विषयांवरचे पारिभाषिक शब्दकोश, मराठी विश्वकोश वगैरे उपक्रम राबवलेत, ते सध्याही राबवताहेत. त्यांची तज्ज्ञ मंडळींची टीमही चांगली आहे. पण इंग्लिशीतून आलेल्या उसन्या शब्दांबद्दल त्यांनी अजूनतरी घसघशीत काही केल्याचं मला आढळत नाही. आणि कुणाला करावंसं वाटलं असेल तरी ते एकंदर सरकाराश्रयाने जायचं झाल्यास वेळखाऊ असेल अशी चिंता वाटते. त्यामुळे सध्यातरी कोणतीही नियामक संस्था याबद्दल मोलाचं काही करताना दिसत नाहीये.
बाकी, टेबल/पेन/ढेकर या शब्दांच्या लिंगांबद्दल म्हणशील तर काही नामे आपल्याकडे एकापेक्षा जास्त लिंगांमध्येही प्रचलित आहेतच. आता तूच सांगितलेलं ढेकर हे नाम पाहा. अजून एक उदाहरण म्हणजे 'बाळ' हे नाम साधारणतः '(ते) बाळ' असं नपुंसकलिंगी प्रचलित असलं, तरी काही वेळा (विशेषकरून साहित्यात) '(तो) बाळ'/'(ती) बाळ' अशी लिंगंही योजल्याचं आढळतं. 'मगर' हे नाम साधारणतः '(ती) मगर' असा वापरलं जात असलं, तरीही काही वेळा नराकरता '(तो) मगर' असं पुल्लिंगही वापरल्याचं दिसतं. एखाद्या नामाची अनेक लिंगं असणं निषिद्ध नाही असं दिसतं.. अर्थात मराठीत अशी नामं खूपच कमी सापडतात; पण इंग्लिश किंवा अन्य काही भाषांमध्ये हा प्रकार तुलनेने अधिक वेळा पाहायला मिळतो.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

पण इंग्लिशीतून आलेल्या उसन्या शब्दांबद्दल त्यांनी अजूनतरी घसघशीत काही केल्याचं मला आढळत नाही. आणि कुणाला करावंसं वाटलं असेल तरी ते एकंदर सरकाराश्रयाने जायचं झाल्यास वेळखाऊ असेल अशी चिंता वाटते. >>

हम्म! खरंय!

अजून एक-दोन प्रश्न-
इंग्रजी - हा छान मराठी भाषेतला शब्द असताना 'इंग्लिशीतून' असं का लिहिलंय ?

'सिंगापूराच्या' असा उल्लेख चित्रासोबतच्या लेखात वाचला. आपण नागपूराच्या राजवाड्यात, कोल्हापूराच्या किल्ल्यात असे उल्लेख सुद्धा करत नाहीत. नागपूरचा राजवाडा, कोल्हापूरचा किल्ला , शनि-शिंगणापूरचे मंदिर असं लिहिलं जातं. मग 'सिंगापूराच्या' खटकलं मला. ते जाणीवपूर्वक लिहिलंय का?

>>आपण नागपूराच्या राजवाड्यात, कोल्हापूराच्या किल्ल्यात असे उल्लेख सुद्धा करत नाहीत. नागपूरचा राजवाडा, कोल्हापूरचा किल्ला , शनि-शिंगणापूरचे मंदिर असं लिहिलं जातं.

शोनू, हे विधान पूर्णसत्य नाही. तू मांडलेली 'नागपूरच्या राजवाड्यात', 'कोल्हापूरच्या किल्ल्यात, शनि-शिंगणापूरचे मंदिर' ही उदाहरणे पुरातन काळापासून चालत आलेली बोलीरूपे आहेत. कशी ते सांगतो :- जर नीट निरखून, आठवून बघितलंस तर असं दिसेल की 'नागपूरच्या राजवाड्यात', 'कोल्हापूरच्या किल्ल्यात' वगैरे उल्लेखांमधली नामे ही अकारान्त नपुंसकलिंगी/पुल्लिंगी नामे आहेत. त्या नामांपासून 'नागपूरच्या'/'कोल्हापूरच्या' ही विकारयुक्त विशेषणं (इंग्लिशीत Adjectives built from inflicted nouns असं वर्णितात तशी विशेषणं) बनलीयेत. आता या विकारयुक्त विशेषणांचं असं रूप कसं बनतं हे जाणून घ्यायला त्यामागचं व्याकरण आधी समजावून घेऊ. पूर्वी स्थलदर्शक अकारान्त नामे 'belonging to xyz place' अशा अर्थाने वापरताना प्रथम त्याचे अंतर्भावदर्शक म्हणून सप्तमी विभक्ती रूप योजून त्यालाच संबंधदर्शक असं षष्ठी विभक्तिप्रत्यय जोडत. उदा., 'नागपूर या शहरात वसलेला किल्ला' अशा अर्थाकरता रूप बनवताना 'नागपूर शहरात' => 'नागपूर + (त/ई/आ या सप्तमी विभक्तिप्रत्ययांपैकी 'ई' प्रत्यय)' = नागपुरी' असं सप्तमीतलं रूप बनवून 'belonging to' या अर्थाने संबंधवाचक असा षष्ठी विभक्तिप्रत्यय जोडला जाई... 'नागपुरी + चा/ची/चे (कर्त्याप्रमाणे विभक्तिप्रत्ययाचं लिंग ठरेल)' => 'नागपुरीचा/नागपुरीची/नागपुरीचे'. याच व्याकरणाच्या नियमांनुसार 'कोल्हापुरीचा किल्ला', 'वैकुंठीचा सुकुमार', 'कैलासीचा राजा' वगैरे रूपे तयार व्हायची. तुला एकनाथांचा 'रूपे सुंदरू सावळा गे माये' अभंग आठवत असेल तर त्यात 'वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे' अशी एक ओळ आहे; त्यातलं 'वैकुंठीचा सुकुमार' हे असंच 'वैकुंठात (=> सप्तमी विभक्ती) राहणारा/वसणारा (संबंधदर्शक = षष्ठी विभक्ती) असा तो' या अर्थाचं विकारयुक्त विशेषण आहे.

मराठी उच्चारप्रवृत्तीनुसार उपांत्य ईकार/इकार बर्‍याचदा अकारात लोपले जातात. उदा.: 'करीत असे ~ कत असे', 'बनवीत होतो ~ बनत होतो', 'कळविण्यासाठी - कळण्यासाठी'. अंत्य इकाराचं/ईकाराचं व्यंजन आणि अंत्य व्यंजन उच्चारताना जोडाक्षरासारखं झटकन उच्चारता येत असेल तर असा 'अकारा'त लोप होतो; नाहीतर इकार/ईकार तसाच राहू दिला जातो. 'नागपुरीचा'/'कोल्हापुरीचा' यात उपांत्य व्यंजन 'र' आणि अंत्य अक्षर 'चा' असल्याने ते जोडाक्षरासारखे झटकन उच्चारता येतात.. म्हणून या विशेषणांच्या उपांत्य ईकारांचा अकारात लोप होऊन त्यांचा बोलीतला उच्चार 'नागपूरचा','कोल्हापूरचा' असा होतो. पण 'वैकुंठीचा' या रूपात 'ठ' हे उपांत्य व्यंजन आणि 'चा' हे अंतिम अक्षर जोडशब्दासारखे उच्चारायला अवघड आहेत; म्हणून या बाबीत ईकाराचा अकारात लोप न होता 'वैकुंठीचा' असंच बोलीरूप राहतं. अजून काही समांतर उदाहरणे देतो:

१. 'पाठची भावंडे' : विशेषणाचे बोली रूप 'पाठची'; पण मूळ व्याकरणसंगत रूप 'पाठीची'; त्याचं विश्लेषण असं : '(ती) पाठ + संबंधदर्शक षष्ठी विभक्तिप्रत्यय 'ची' ' = 'पाठीची'; यात फक्त संबंधदर्शक षष्ठी विभक्ती वापरली आहे. इथे स्थलदर्शक संदर्भच नसल्याने सप्तमी विभक्ती लागू होत नाही. (ती) पाठ हे अकारान्त स्त्रीलिंगी नाम '(ती) ओळ' या नामाप्रमाणे चालते.. त्यामुळे षष्ठी विभक्तीत व्यय पावताना ईकार जोडला (पाठ - पाठी-(प्रत्यय)) जाऊन 'पाठीची' असं रूप तयार होतं.
२. 'घरचा सोफा' : विशेषणाचे बोली रूप 'घरचा'; पण मूळ व्याकरणसंगत रूप 'घरीचा'; त्याचं विश्लेषण असं : विशेषणाची अर्थसंगत फोड अशी होईल - 'घरात (=> स्थलदर्शक सप्तमी विभक्ती) असणारा (=> संबंधदर्शक षष्ठी विभक्ती) असा तो'. '(ते) घर + स्थलदर्शक सप्तमी विभक्तिरूप' => 'घरी' + संबंधदर्शक षष्ठी विभकिरूप => 'घरीचा'.
३. 'सकाळचा नाष्टा' : विशेषणाचे बोली रूप 'सकाळचा'; पण मूळ व्याकरणसंगत रूप 'सकाळीचा'; त्याचं विश्लेषण असं : '(ती) सकाळ + संबंधदर्शक षष्ठी विभक्तिप्रत्यय 'चा' ' = 'सकाळीचा'; इथे स्थलदर्शक संदर्भच नसल्याने सप्तमी विभक्ती लागू होत नाही. (ती) सकाळ हे अकारान्त स्त्रीलिंगी नाम '(ती) ओळ' या नामाप्रमाणे चालते.. त्यामुळे षष्ठी विभक्तीत व्यय पावताना ईकार जोडला (सकाळ - सकाळी-(प्रत्यय)) जाऊन 'सकाळीचा' असं रूप तयार होतं.

यावरून असं दिसतं की 'नागपूरच्या राजवाड्यात', 'कोल्हापूरच्या किल्ल्यात', 'शनि-शिंगणापूरचे मंदिर' ही बोलीरूपं असलेले उल्लेख आहेत. पण त्यांचं मूळ रूप व्याकरणसंगतच आहे. अजून एक ध्यानात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे वैशिष्ट्य षष्ठी विभक्तीने विकार पावून बनलेल्या विशेषणरूपांमध्येच दिसतं. मूळ नामांच्या नॉर्मल वापरातल्या सर्व विभक्त्या रूढ व्याकरणानुसारच चालतात. खेरीज, सरळसोट व्याकरणाचे नियम लावून 'नागपुराचा/ची/चे', 'कोल्हापुराचा/ची/चे', 'शनि-शिंगणापुराचा/ची/चे' ही रूपंही योग्य आहेत. फरक एवढाच की यात संबंधदर्शक षष्ठी विभक्तीच तेवढी योजून काम थोडक्यात तमाम केलं जातं.

मी 'सिंगापुराच्या' वगैरे उल्लेख माझ्या लेखात करतो, ते वाचणार्‍याचा (या वरच्या वैशिष्ट्याबद्दल) गोंधळ टाळण्याकरता. लिखाणातून शब्दांचं योग्य व्याकरण वाचणार्‍याच्या मनावर नकळत बिंबावं (अशा प्युरिस्ट/मिशनरी विचारानं :फिदी:) म्हणून मी असा निस्संदिग्ध मार्ग चोखाळतो. 'इंग्रजीतून' लिहिण्याऐवजी काही वेळा मुद्दामून 'इंग्लिशीतून' असं लिहिण्यामागे हाच कावा आहे. Proud Happy

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

_/\_ फ , महान आहेस !
लंपन चा अर्थ काय ?
~~~~~~~~~~~~~~~~
फिटे अंधाराचे जाळे .....
~~~~~~~~~~~~~~~~

'चवरी " म्हणजे काय?
कालच ऐरणीच्या देवा" गाण्यात
'लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली' असा उल्लेख आला.
अन चवरी चा संबंध गवळ्याशी पण आहे का? याचा अर्थ जर चवरी म्हणजे
घडा असेल तर 'चवरी ढवळणे" म्हणजे काय?

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
खबरदार जर एके ४७ घेउनी जाल पुढे चिंधड्या
उडविन राई राई एवढ्या......
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

Pages