१) कडवे वाल २ वाट्या
२) ३/४ हिरव्या मिरच्या, इंचभर आले, चार पाच लसूण पाकळ्या बारिक वाटून.
३) एक टिस्पून जिरा पावडर
४) नारळाचे जाड दूध, दोन वाट्या
५) कोथींबीर, हिंग, हळद, तेल, मीठ, गूळ, व चिंचेचा कोळ-- सगळे चवीप्रमाणे
१) वाल स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घाला. तरंगणारे दाणे काढून टाका.
२) १२ तासांनी सगळे पाणी काढून टाका. एकदोनदा पाण्याने धुवा आणि पाणी निथळा.
३) अंधार्या जागी वाल झाकून ठेवा. दर बारा तासांनी पाणी घालून निथळून टाका. (असे वारंवार पाणी बदलले कि घाणेरडा वास येत नाही.)
४) हवामानाच्या फरकाने मोड यायला २/३ दिवस लागतात.
५) वरच्या फोटोतल्यासारखे चांगले मोड आले कि त्यात भरपूर कोमट पाणी ओता
६) मग वाल सोलायला घ्या. हा प्रकार म्हंटला तर कंटाळवाणा आणि म्हंटला तर टाईमपास आहे. घरातल्या सगळ्यांना कामाला लावा. न भिजलेले वाल काढून टाका. (त्यांना कूचर म्हणतात. पुर्वी असे वाल मुद्दाम घराच्या अंगणाच्या आजूबाजूला फेकत असत. पहिल्या पावसाळ्यात ते रुजले कि त्याच्या रोपांची भाजी करत.)
७) सोललेले वाल असे दिसतील. यानाच बिरड्या किंवा डाळिंब्या म्हणतात.
८) भरपूर पाण्यात हळद आणि हिंग टाकून त्यात या बिरड्या शिजत टेवा.
९) शिजल्या कि त्यात वाटण आणि बाकिचे साहित्य टाका.
१०) चांगले उकळले कि नारळाचे दूध टाका.
११) मग एक कढ आला कि वरुन हिंग जिर्याची फोडणी द्या.
मसाल्याचे बिरडे करतातच पण ओल्या मिरचीच्या बिरड्याला पण छान चव येते. मऊ भाताबरोबर चांगले लागते. नूसतेही खाता येते. वरून हवे तर ओले खोबरे घ्या.
बिरड्या शिजवताना काळजी घ्या. बिरड्या मोडता कामा नयेत.
मी हा प्रकार करताना शॉर्टकट्स वापरले आहे. आले, लसूण, जिरे या सगळ्यांच्याच पावडरी वापरल्या आहेत. तयार कोकोनट क्रीम वापरले आहे. पण वाल भिजत घालून त्याला मोड आणून ते सोलण्याला मात्र पर्याय नाही. (वालाच्या डाळीला ती चव येत नाही.)

