धिरडे

ओट्स चे धिरडे (फोटोसहीत)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप रोल्ड ओट्स, अर्धा कप बारिक रवा किंवा पाऊण कप तांदळाचे पिठ, एक कप आंबट ताक,
एक चमचाभर हिरव्या मिरचीचे लोणचे, (किवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या वा मिरपूड.) एक चहाचा चमचा जिरे, हिंग, मीठ, आवडत असेल तर अर्धा चहाचा चमचा साखर, (थोडी साखर घातली तर सोनेरी रंग येतो ) तेल वा तूप.

क्रमवार पाककृती: 

आंबट ताकात ओट्स पंधरा ते वीस मिनिटे भिजवा. त्यात मिरचीचे लोणचे वा मिरच्या मिसळून, मिक्सरमधून फ़िरवून घ्या. मग त्यात बाकिचे जिन्नस (तेल सोडून) मिसळा आणि नीट ढवळून घ्या. साधारण इडलीच्या पिठाइतपत सैल असूद्या. लागल्यास पाणी वा रवा (वा तांदळाचे पिठ मिसळा)

नॉन स्टिक पॅनवर थोडेसे तेल वा तूप टाकून त्यावर या मिश्रणाचे धिरडे टाका. गॅस अगदी मंद असु द्या.
आधी झाकण ठेवा आणि मग झाकण काढा. उलटायची वा परतायची घाई करु नका. पॅन थोडेसे हलवून बघा,
जर धिरडे खालून सूटले असेल तरच उलटा. दोन्ही बाजूने, सोनेरी रंग आला पाहिजे.
वरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असे धिरडे होते. यात हवा तर बारिक चिरलेला कांदा व आल्याचे तूकडे, कोथिंबीर पण टाकू शकता. सोबत जवसाची चटणी घ्या, म्हणजे आरोग्यपुर्ण अशी न्याहारी होईल.

रव्यापेक्षा, तांदळाच्या पिठामूळे जास्त कुरकुरीतपणा येतो. तसेच मिरच्यांच्या जागी लोणचे वापरले तर जास्त चांगली चव येते.
बाकी मी आढ्याला मिरच्या टांगून, आमटी तिखट झाली, म्हणणाऱ्यांपैकी असल्याने लोणचे संपवायचे, असे वेगवेगळे उपाय शोधावे लागतातच.

वाढणी/प्रमाण: 
चार मध्यम धिरडी होतील.
अधिक टिपा: 

हा प्रकार मंद आचेवरच करायचा आहे. वेळ नसेल तर सगळे मिश्रण एकदम पॅनमधे घाला, व खाताना तूकडे करुन घ्या.
उद्या परवा फोटो टाकतो.

गव्हाच्या पिठाचे गोड आयते -- खास लहान मुलांसाठी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) साखर अर्धा वाटी
२) गव्हाचे पिठ एक वाटी
३) पाणी - ४ वाट्या
४) तूप - २ चमचे
५) वेलची - एक

अन्य - धारदार सराटा, खोलगट पातेले, पळी छोटीवाली

क्रमवार पाककृती: 

१) साखर, पिठ आणि वेलची एकत्र बिगरपाण्यानीच आधी एकजीव करायची.
२) पिठामधे खळ करुन त्यात एक एक वाटी पाणी सोडायचे आणि पिठ फेटायचे.
३) पिठ अर्धा तास तसेच ओले ठेवायचे आणि डोस्याच्या पिठा इतपत पातळ झाले का ते न्याहाळायचे. घट्ट पिठ झाले असेल तर आणखी पाणी ओतायचे.
४) तव्याला समांतर तूप पसरवायचे फक्त आयते चिकटायला नकोत म्हणून.
५) तवा तापला की वाटी अथवा पळीने पातळ पिठ तव्यावर ओतायचे. गोलसर आकार आपोआप येतो. त्याला हात लावायचा नाही. आपोआप जसे पडेल तसेच राहू द्यायचे.
६) आच खूप जास्त नाही ना याची खात्री बाळगून घ्यायची. जेणेकरुन आयते जळणार नाहीत.
७) सराट्याची धारदार बाजू तूपात बुडवायची. आयत्याला छिंद्र पडायला लागले की आयते इकडून तिकडे उलटायचे. लगेच ३० सेकंदानी ताटामधे ठेवायचे.

वाढणी/प्रमाण: 
बहुतेक १० एक होतील.
अधिक टिपा: 

साखर विरळायला हवी.
तूप जळायला नको.
पाणी फार गार नको.
भरड साखर उत्तम.
वेलची नंतर काढली तरी चालते. फक्त स्वाद उतरायला हवा.

माहितीचा स्रोत: 
आईची खास कृती.