बदाम

बदामपोळी

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

बदाम - १ वाटी
खवा - १ वाटी
हरबरा डाळ - १ वाटी
साखर - ३ वाट्या
जायफळ
वेलचीपूड - आवडीनुसार
केशर- चिमूटभर

क्रमवार पाककृती: 

बदाम रात्रभर पाण्यात भिजत घाला.
सकाळी सालं काढून मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्या.
नेहमीच्या पुरणासाठी शिजवतो तशी हरभरा डाळ शिजवून मऊ वाटून घ्या.
आता एका पातेल्यात डाळ आणि साखर एकत्र गरम करा. चटचट आवाज यायला लागला की बदामाची पेस्ट त्यात मिसळा. हे दोन्ही चांगले मिळून आले की त्यात खवा ( न भाजता ) मिसळा. मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवित रहा. त्यात जायफळ-वेलची-केशर घाला. पुरणासारखे हे मिश्रण आवडीनुसार थोडे ओलसर किंवा कोरडे केले तरी चालते.
पुरणपोळीसाठी मळतो तशी कणिक मळून त्यात सारण भरून पोळी लाटा. तव्यावर तेल तूप न घालता भाजून घ्या.
एका परातीत भरपूर तूप घ्या. ( हो ! परातीत !! स्मित ) तव्यावर भाजलेली पोळी थेट त्या तुपात बुडवा. उलटीपालटी करून चांगली भिजवा. बदाम पोळी तयार आहे. दिसायला ही नेहमीच्या पुरणपोळीसारखीच दिसते म्हणून फोटो नाही टाकत. चव मात्र.. अहाहा...! एकदा खाऊन बघाच !

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात मध्यम आकाराच्या १२ ते १५ पोळ्या होतील.
अधिक टिपा: 

आज एका काकुंकडे जेवायला गेले होते. तिथे हा बेत होता. काकूंचं घराणं वेदशास्त्रसंपन्न प्रवचनकारांचं. आजच्या म्हणजे दिवाळीपाडव्याच्या दिवशी हा नैवेद्य परंपरेने चालत आलेला आहे असे काकू म्हणाल्या.
तुपात भिजलेली ती एक पोळी खाऊन दुपारी घरी येऊन जी झोपले ती तीन तासांनी आईने हलवून उठवल्यावरच उठले !!! खूप जड पण खूप चवदार असा हा राजस पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणिंना दिवाळीच्या शुभेच्छांसह स्मित :)

माहितीचा स्रोत: 
दुर्गाकाकू

बदाम-मलाई कुल्फी विथ मँगो सॉस (फोटोसहित)

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुल्फी साठी:
१ टिन स्विटंड कंडेन्स्ड मिल्क - ३९५ग्रॅम टिन
१ टिन इव्हापोरेटेड मिल्क - ३७५ml टिन
३०० ml थिकन्ड (हेवी) क्रिम
१ कप बदाम चुरा
१ चमचा पीठीसाखर
केशर आणि वेलची पावडर आवडीनुसार

मँगो सॉसः
१ कप मँगो पल्प,
१ कप क्रिम
पिठी साखर चवीनुसार
थोडे केशर आणि वेलची पुड

सजावटीसाठी:
टोस्टेड बदाम
पिस्त्याचे तुकडे

क्रमवार पाककृती: 

IMG_1458.JPG

ही कुल्फी सोप्पी आणि झटपट होणारी आहे. पण तरीही तितकीच चविष्ट! स्मित

- सर्वप्रथम फ्रिझर चे टेम्परेचर 'कोल्डेस्ट' वर सेट करावे.

कुल्फी बनवण्याची कृती:

- एका काचेच्या बोल मधे इव्हापोरेटेड मिल्क आणि कंडेंस्ड मिल्क एकत्र करावे.
- हँड ब्लेंडर स्टिक/हँड मिक्सर ने चांगले नीट घुसळुन घ्यावे. थोडे घट्टसर मिश्रण होईल.
- यात थोड्याश्या कोमट दुधात भिजवलले केशर आणि वेलचीची बारिक पुड घालावी.
- १ कप बदामाचा चुरा घालावा आणि नीट मिक्स करुन घ्यावे.
- दुसर्‍या मोठ्या काचेच्या बोल मधे क्रिम आणि १ चमचा साखर फेटुन घ्यावी. क्रिम चांगले डबल फुगले पाहिजे (फेटताना क्रिम फाटणार नाही याची काळजी घ्यावी)
- आता या ब्लेंड केलेल्या क्रिम मधे वरचे मिश्रण हळु हळु ओतावे. एकीकडे स्पॅट्युलाने हलके हलके मिक्स करावे.
- सगळे आता हलकेच नीट मिसळुन घ्यावे.
- ह्या बोल ला क्लिंग फिल्म लावुन फ्रिझर मधे ठेववा.
- साधारण दीड ते २ तासांनी मिश्रण बाहेर काढुन लाकडी चमच्याने फेटुन घ्यावे.
- मग हे मिश्रण कुल्फी मोल्ड किंवा लोफ टीन मधे ओतावे आणि फ्रीझ करावे.

मँगो सॉसः

- १ कप क्रीम पातेल्यात ओतुन मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
- यातच केशर आणि वेलची पुड टाकावी.
- क्रिमवर थोडे बुडबुडे दिसायला लागले की गॅस बंद करावा. क्रिम गार होऊ द्यावे.
- गार झालेल्या क्रिम मधे मँगो पल्प आणि साखर घालुन हँड ब्लेंडर ने ब्लेंड करावे. सॉस तय्यार.
- सॉस डिस्पेन्सर बॉटल मधे भरुन हा सॉस गार करायला फ्रिज मधे ठेवावा.

सर्व्ह करताना:
पद्धत १: प्लेटमधे खाली मँगो सॉस पसरावा. त्यावर कुल्फी ठेवावी आणि वरतुन टोस्टेड बदाम्/पिस्ते पेरावे.

पद्धत २: कुल्फी मोल्ड मधुन काढुन प्लेट मधे ठेवावी. वरतुन टोस्टेड बदाम काप आणि पिस्ते पेरावे. शेजारी सॉस ची बाटली ठेवावी आणि हवा तेव्हढा सॉस घालुन कुल्फी मटकवावी.

IMG_1461.JPG

वाढणी/प्रमाण: 
एव्हढ्या मिश्रणात ६-८ लोकांना पुरेल इतकी कुल्फी होते. पण खरतर २-३ लोकच फस्त करतात :)
अधिक टिपा: 

१. कुल्फी मधे बदाम पुड घातली नाही तरी चालेल.
२. बदाम पुड च्या ऐवजी मँगो पल्प घातला तरी चालेल - मँगो कुल्फी करायची असेल तर.
३. मँगो सॉस नसला तरी काहिही हरकत नाही. नुसती कुल्फी पण झक्कास लागते.
४. वेळ असेल तर कुल्फी बनवायच्या आधी इव्हेपोरेटेड मिल्क एकदा उकळुन घ्यावे. मस्त खमंग टेस्ट येते कुल्फीला.
५. ही बेसिक रेसिपी आहे. तुम्हाला हवे तसे त्यात वेगवेगळे स्वाद घालता येतिल जसे रोज, स्ट्रॉबेरी इ. इ.
६. स्वादानुसार सॉस पण बदलता येतिल.
७. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेतेड मिल्क आणि क्रिम लो फॅट वापरुन बघु शकता. पण अस्सल मलई तेस्ट येइल की नाही माहित नाही.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग.