Lay’s, क्रांती आणि गांधी..

Submitted by मी मुक्ता.. on 17 August, 2011 - 06:02

काल टिव्हीवर अर्थातच लोकपाल चालू होतं सगळीकडे. मध्ये एक अ‍ॅड पाहिली Lay’s ची. तो तिला विचारतो "कँडल मार्च के बाद कँडल लाईट डिनर के लिये चले?" त्या अ‍ॅड बनवणार्‍याचं कौतुक करावं तेवढं कमी असं वाटलं खरच त्या क्षणी. किती मार्मिक भाष्य केलय. आणि बहुतेकदा अशा मोर्चामध्ये सहभागी होणार्‍या लोकांची धाव तिथवरच असते.
क्रांती - हा प्रचंड आकर्षक शब्द आहे.. थरारक.. आयुष्यात एक काळ तर नक्की असा असतो जेव्हा या शब्दाने भारुन जायला होतं. मलाही व्हायचं. क्रांतीविषयी आणि ती करणार्‍यांविषयी विशेष काहीतरी भरुन आल्यासारखं व्हायचं. स्वाभाविक आहे की अनेकांना असंच वाटत असेल. पण असं नाही वाटत का की क्रांती ही एक झिंग आहे. नशा आहे. मेणबत्त्या पेटवुन क्रांती करु पहाणार्‍यांना काय वाटतं? लोकपाल आलं आणि भ्रष्टाचार संपला असं होणार आहे का? लोकपाल हा रामबाण मार्ग आहे आणि अण्णा हजारे एकमेव तारणहार अशी परिस्थिती का निर्माण झालीये? मुळात जमाव हा असा समूह असतो ज्याला फक्त भावना असतात. जमावात कायमच बुद्धीचा अभाव दिसत आलाय. आणि अशा एक्सायटेड लोकांना भावनिक आवाहन करुन चिथवायला फारशा कौशल्याची गरज खरच असते का? पण त्याच लोकांना शहाणपणा शिकवायचं म्हटलं तर? ते तुलनेने कष्टाचं, वेळखाऊ आणि नॉन ग्लॅमरस काम आहे ना.. आणि आजच्या इंस्टंट जगात एवढा वेळ कोणाला आहे? लोकांना क्रांती हवीय. ही क्रांती एका रात्रीत संपते. इतिहास साक्ष आहे क्रांती अल्पजीवीच असते. एकीकडे लोकपाल मंजूर झाले की दुसरीकडे भ्रष्टाचार संपलाच हे चित्र किती बालिश आहे हा विचार या लोकांच्या मनाला नाही शिवत का? लोकपालासाठी आंदोलन करा हे सांगणं सोपं आहे.. करणं त्याहून सोपं.. पण भ्रष्टाचार घालवण्यासाठी जी मूल्यं रुजणं आवश्यक आहे, ती रुजवा.. त्यासाठी सलग १०-१५-२० किंवा त्याहीपुढे लागतील तितकी वर्षे सातत्याने प्रयत्न करत रहा हे सांगणं आणि लोकांना पटवुन देणं फार अवघड आहे आणि प्रत्यक्षात आणणं त्याहूनही अवघड. आणि कदाचित एवढी ताकद या काळातल्या गांधींमध्ये नसावी. स्वत:ला गांधी म्हणवणार्‍या किंवा त्यांना गांधी म्हणणार्‍या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे. खरचं गांधींची स्ट्रॅटेजी कोणी अभ्यासली आहे का नीट.? गांधींच्या यशाचं खरं श्रेय कशात होतं? त्यांनी उत्क्रांती घडवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (त्यांच्याविषयीची वैयक्तिक मतं आणि मतभेद बाजूला ठेवुन अर्थातच हे मान्य करावं लागेल.) त्यांनी लोकांना सहज आचरणात आणता येतील असं व्रतं दिली. आणि व्रत हे कधीच इंस्टंट निकाल देत नाही. उपवास करा, प्रार्थना करा, खादीच वापरा वगैरे वगैरे.. एका दिवसात निकाल हमखास अशी हमी त्यांनी कधीच दिली नाही. ही व्रतं सामान्य माणूस आचरणात आणू शकत होता. त्यांच्या या हाकेने स्वातंत्रलढ्यातला स्त्रियांचा सहभाग वाढला हे सत्य आहे. लढा सर्वव्यापी झाला. आजच्या या सो कॉल्ड दुसर्‍या (की तिसर्‍या?) स्वातंत्रलढ्यात नक्की काय चालू आहे? हे गांधीवादी गांधींचा मार्ग खरच अनुसरतायेत का?
क्रांतीची झिंग उतरल्यावर लाँग टर्म मध्ये जे काही प्रयत्न करावे लागतात त्याची कल्पना लोकांना नसते आणि दुर्दैवाने ती जाणिव करुन देणारे नेतेही कमीच असतात. आपला स्वातंत्र्यलढाही क्रांतीच होती पण लोकांची ही झिंग लगेच उतरली. फक्त स्वातंत्र्य मिळून प्रश्न सुटतील या भ्रमाचा भोपळा फुटायला फार वेळ नाही लागला. ६० च्या दशकात रोटी, कपडा और मकान साठी पुन्हा क्रांती करावी लागेल अशीच परिस्थिती होती. असो, समाजसुधारकांनी त्या आधी केलेला कार्याचा परिणाम म्हणुन हे स्वातंत्र्य कसंबसं का होईना निभवता आलं. (कसंबसं नाही म्हणता येणार खरंतर. आपली लोकशाही चालतेय हे खूप मोठं यश आहे. ग्रामिण भागातल्या महिला जेव्हा एकत्र येऊन दारुचे गुत्ते बंद करतात तेव्हा कळतं आपल्या लोकशाहीचं जनमानसातलं रुजलेपण..) आणि त्यामुळेच लोकशाही आहे की दडपशाही हा प्रश्न विचारणार्‍यांचा अतिशय राग येतो. अरे, लोकशाही नसती तर हा विरोध करु शकलो असतो का आपण? चीनचा Tiananmen Square प्रसंग तर सगळ्या जगाला माहित आहे.
आणि माझंच म्हणणं खरं हा प्रकार तर हुकूमशहांनादेखिल परवडत नाही तर लोकशाहीत का चालावा? उपोषण करण्याचे नियम पोलिसांनी दिलेले. मान्यतेसाठी वेळही. तरीही माझ्याच मनाप्रमाणे मी करणार असा हट्ट करुन कसं चालेल? की तुरुंगात गेलो की ग्लोरिफीकेशन होतं, हवा तापते हे विचार खरच आले नव्हते नियम नाकारण्यापूर्वी मनात? आपल्याला लोकशाहीने जो मार्ग आखून दिलाय तो पाळला पाहिजे याविषयी कोणाचं दुमत असायचं काहीच कारण नाही. संसद हे आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे. आत्मा आहे. एखादा माणूस किंवा समूह स्वतःला संसदेपेक्षा मोठा समजायला लागणं हे लोकशाहीला घातक नाही का? 'माझाच मसूदा बरोबर' हा कुठला अट्टहास? कोणत्याही शहाण्यासुरत्या माणसाला पटावं असं हे वर्तन नाहीये. स्वतःला संसदेपेक्षा मोठं समजायचा अधिकार न्यायालयालाही नाही. न्यायालयही संसदेच्या किंवा प्रशासनाच्या कामकाजात प्रमाणापेक्षा जास्त ढवळाढवळ नाही करु शकत. ज्युडिशिअल ओव्हररीच च्या मुसक्या आवळल्यात तिथेही मग कोणत्याही माणसाची (भले तो कितीही ग्रेट असो) काय कथा.. उद्या मी पण म्हणते, महिलांना १००% आरक्षण द्या नाहीतर आत्मदहन करते, मग काय संसदेने मान्य करावं.? राज्यघटना लवचिक असणं वेगळं आणि ती कोणी मनाप्रमाणे वाकवायचा प्रयत्न करणं किंवा तशी इच्छा धरणं वेगळं. आपण जेव्हा रीपब्लिक म्हणतो तेव्हा त्याच्या व्याख्येत हे लिहिलय की लिखित घटनेच्या मार्गाने गोष्टी घडायला हव्यात.. फक्त बहुमत म्हणून एखादी गोष्ट नाही मान्य होऊ शकत. एखादा कायदा नाही होऊ शकत.. घटना, तत्वं, सारासार विचार, भविष्यकालीन परिणाम या सगळ्यांचा विचार करावा लागतो. काही काळापूर्वीच न्यायालयानेही हे विधान केलं होतं.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपली तारणहार मानसिकता. अण्णा आले आणि देश बदलला असं काही होतं का कधी? पण हा विचार करतो कोण.? फॅन्सी नावं असलेल्या कॉलेलात जाणारी. त्याहून फॅन्सी कपडे घातलेली आणि त्याहून फॅन्सी गाड्यांवर फिरणारी मुलं-मुली अण्णांच्या नावाने घोषणा देताना पाहिली. तो अगदीच 'नेत्रसुखद' अनुभव होता.. खूप मुद्दे आहेत.. पण परिस्थिती अशी आहे की लोकपालला विरोध केला तर भ्रष्टाचारला पाठींबा देताय असे म्हणतील लोक. पण मुळात लोकपालचा अभ्यास केलाय किती लोकांनी. आज जी मुलं पाहिली त्यात ५% लोकांनापण माहिती असेल असं काही वाटलं नाही.
प्रश्न लोकपालचा आहेच पण साधनशुचितेचाही आहे. असो.. खूप काही डोक्यात होतं. कदाचित लोकांची मतं वेगळी असतीलही. लोकशाही आहे त्यामुळे अशी मतं असण्याचं आणि मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच. पण याही प्रश्नांचा विचार व्हावा असं वाटलं. भ्रष्टाचार एका दिवसात जन्माला नाही आला त्यामुळे एका दिवसात नष्टही नाही होणार. पुढची किंवा कदाचित त्याही पुढची पिढी भ्रष्टाचारमुक्त भारत पाहू शकेल पण त्यासाठी आतापासून सर्वांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि आंदोलन करण्यापेक्षा नक्कीच प्रभावी आहे ते. भलेही त्याचे रीझल्ट उद्या किंवा परवा दिसणार नाहीत पण ते जास्त टिकतील हे नक्की...!
------------------------------------------------------------------------------------
दोन्ही (किंवा असतील तितक्या) बाजू तसेच लोकपाल बाजूला ठेवुन जरा घटनांकडे पहाताना अजून काही गोष्टी लक्षात आल्या.

१) या आंदोलनातून लोकपालाची निर्मिती झाली तरी भ्रष्टाचार १००% जाणार नाही हे सगळ्यांचच मत आहे पण तो बर्‍याच अंशी कमी होईल असाही विश्वास आहे. ही एक बाब झाली पण यानंतरच्या आंदोलनाच्या विषयांची यादी जाहिर झाली आहे ती विचार करण्याजोगी आहे. अश्या किती गोष्टी आपण आंदोलन करुन पदरात पाडून घेणार आहोत. काही काळानंतरही लोकांचा उत्साह असाच राहिल याची शाश्वती नाही. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करायला लागणे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य पण नाही. अशी आंदोलन करायची वेळ येऊ नये म्हणून काही लाँग टर्म उपाययोजना ( म्हणजे अर्थातच समाजसुधारणा आणि सामाजिक जागृती) करण्याची नितांत गरज आहे. आपली क्रयशक्ती अशा आंदोलनात वारंवार खर्च होणे हे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अस्थिरता निर्माण करणारं आहे.

२) जगावर जागतिक महामंदीचं अजून एक सावट येऊ घातलं असताना आपल्या देशातील सगळ्या नियोजनकारांची डोकी देशांतर्गत वाटाघाटीत व्यस्त रहावी याची परिणाम गंभीर होऊ शकतात. परकिय गुंतवणूकदारांनी आधीच प्रश्न विचारयला सुरुवात केलीये. दुर्दैवाने अशी परिस्थिती उद्भवली तर सगळ्यात पहिला बळी मेणबत्तीधारी समाज असणार आहे.

३) आंदोलनात प्रत्यक्ष ऐकलेल्या काही प्रतिक्रिया,
"चल यार.! FC पे आये है तो जाके आते है उस सेल मे.."
"टोपी तर मिळेल.. जाऊन येऊ"
"फोटो काढ! फोटो काढ! FB वर टाकता येईल"

४) आंदोलन चालुच आहे आणि अहिंसात्मक मार्गाने चालु आहे तर काळी फित बांधून आपापली कामं करत राहिलो तर? सरकारवर दबाव येईलच..

गुलमोहर: 

आनंदयात्री,
मधलं वाक्य उचलून विरोध केलेला नाहीये मी. फक्त ते वाक्य पेस्ट केलं तिथे. प्रतिसाद हा सगळ्या वाक्यांना मिळूनच होता. असो.. माहितीसाठी दिली मी लिंक.

चिनूक्स,
भ्रष्टाचाराची प्रकरणं काढत बसलो तर वेगळा धागा काढावा लागेल. माझा भ्रष्टाचाराला पाठींबा नाहीये. आणि लेखाचा सूर समजून घेण्याइतका स्पष्ट लेख लिहिलाय मी असं वाटतय मला.

माझ्या लिखाणातून इतकी बालिश निरिक्षणं काढत असाल तर माझा नाईलाज आहे. फॅन्सी कपडे आणि सोयरसुतक यांचं प्रमाण व्यस्त नाहीये पण तुमच्या आविर्भावातून दृष्टीकोन दिसतो. मी फक्त कपड्यांचाच नाही बाकीच्याही गोष्टींचा उल्लेख केलाय पण कदाचित विरोध करण्याचे मुद्दे शोधताना आपलं लक्ष गेलं नसेल.

चालायचच... आपल्याला हेमाशेपो. प्रतिसादाबद्दल आभार.. Happy

मी मुक्ता,
प्रश्न भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा नाही, तर तो करणार्‍यांना लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा आहे.
मुळात अण्णांचा मसुदा काय, आणि ते उपोषण का करत आहेत, याबद्दलचे तपशीलच चुकीचे असल्याने पुढे चर्चा करण्यात अर्थ नाही. धन्यवाद. Happy

चिनूक्स,
प्रश्न भ्रष्टाचार करणार्‍यांना लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा नसून त्यासाठी जो मार्ग अवलंबला जातोय त्याचा आहे. लेख लोकपालाच्या मसूद्याबद्दल नाही तर आंदोलनकर्त्यांच्या मानसिकता आणि जाणिवेबद्दल आहे. असो.. आपल्याला लेखाचा सूर समजला नाहीये हे स्पष्ट दिसतय. आपले मुद्दे आपल्या जागी बरोबर आहेत पण ते माझ्या लेखाचा विषय नाहीत. सो, पुरे करते. Happy

तो लोकसत्तामधला लेख अतिशय चुकीचा आणि एकांगी विचाराने लिहिलेला आहे.
अण्णा हजारे हे गर्दी जमवून मी किती भारी आहे पहा असे दाखविणार्‍या विचारांचे आहेत असे ज्यांना वाटते त्यांची अगदी कीव करावीशी वाटते, असे वाटणार्‍यांचा यात दोष नाही, कारण १९७७ सालानंतर (विनोबा भावे यांचे निधन) आजतागायत लोकांना कोणी स्वच्छ, शुद्ध, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व वैचारिक लढा देताना दिसलेच नाहीये, त्यामुळे अनेकांना खरेच वाटत नाही की आजच्या काळात असेही होऊ शकते. दलदलच एवढी वाढली आहे आपल्या आजुबाजुला त्यामुळे हे असे अण्णांच्या बद्दल अविश्वास व्यक्त करणारे शंकासुर दिसत आहेत.
केवळ एक प्रसिद्धी सोडली तर त्या माणसाला काय फायदा आहे या सगळ्याचा ? विरोधी सूर लावणार्‍या लोकांनी प्रामाणिकपणे आपल्या स्वतःच्या मनाला विचारून पहा.
मी इकडे महाराष्ट्राच्या बाहेर आहे बेन्गलोरमधे, इकडे अनेक राज्यातले लोक आहेत, सर्वांचा भरघोस पाठिंबा आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ना की ५% लोकांना (विशेषतः तरूणवर्गाला) खरच किती माहिती आहे ? FYI, तमाम तरूणवर्ग हा आंधळेपणाने विश्वास ठेवणारा राहिला नाहीये, इंटरनेट, मोबाईल, इ. माध्यमातुन माहिती जबरदस्त फिरत आहे. लोक विकिपिडियावर जाऊन अण्णा हजारे कोण आहेत हे वाचून एकमेकांना कळवत आहेत, एवढेच नव्हे तर लोकपाल बिल काय आहे त्यामधे सरकारची बाजू कशी चुकीची आहे, अण्णांच्या टीमने काय सुचविले आहे हे पण जवळ जवळ सर्व लोकांना ठाऊक आहे. आमच्याकडे मी या चर्चा प्रत्यक्ष ऐकतो आहे वेगवेगळ्या गटांमधे होताना. मला काहीजणांनी विचारले की तुम्ही अण्णांना प्रत्यक्ष पाहिले आहे काय ?
तुमचा लेख आणि त्यामागची कळकळ योग्य नाही असे मी म्हणत नाही, पण काही मुद्दे अगदीच कल्पनेवर आधारित आहेत. लोक बरोबर असतील किंवा नसतील पण उगीच कोणाच्याही मागे जायला वेडे नक्कीच नाहीत, रामदेवबाबाला का नाही एवढा पाठिंबा मिळाला ?

तुमचा लेख आणि त्यामागची कळकळ योग्य नाही असे मी म्हणत नाही, पण काही मुद्दे अगदीच कल्पनेवर आधारित आहेत. लोक बरोबर असतील किंवा नसतील पण उगीच कोणाच्याही मागे जायला वेडे नक्कीच नाहीत, रामदेवबाबाला का नाही एवढा पाठिंबा मिळाला ?>> अनुमोदन

@मुक्ता : मी जे मुद्दे लिहिले आहेत त्यावर आपले मत लिहिलेत तर बरे होईल. तुमच्या लेखाला विरोध करायचा म्हणून मी लिहिलेले नाही तर प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे ते कळविण्यासाठी लिहिले आहे. धन्यवाद.

लेख मुळीच पटला नाही. अतिशय एकांगी. तिथे सहभागी होणार्‍या लोकांना अण्णांबद्दल शून्य कळतय (अस समजुया) पण एवढा मोठा पाठिंबा मिळवणार्‍या माणसाला का पाठिंबा मिळतोय हे लेखिकेला देखील कळलेले दिसत नाही.

मला जे म्हणायचं होतं ते प्रितीश नंदी ने नेमके या लेखात मांडले आहे. तेव्हा अधिक काही लिहायची गरज वाटत नाही: (मूळातच या विषयावर सध्या लिहीण्यापेक्षा निव्वळ कृती अपेक्षित आहे!)
http://blogs.timesofindia.indiatimes.com/extraordinaryissue/entry/the-ba...

(बाकी, अरब राष्ट्रे हे ऊदाहरणादाखल होते की तिथे क्रांती, ऊठाव हे हिंसक मार्गाने होत आहे.. लोकशाही का हुकूमशाही हा मुद्दा नसून तिथेही मूळ मुद्दा भ्रष्टाचार हाच आहे)
रच्याकने:
>>लेख लोकपालाच्या मसूद्याबद्दल नाही तर आंदोलनकर्त्यांच्या मानसिकता आणि जाणिवेबद्दल आहे.

तसे असेल तर संपूर्ण लेखच गंडला आहे.. कारण गृहितके आणि तर्क चूकीची आहेत आणि एकंदर या वरील निरीक्षण/अभ्यास/सर्वंकश दृष्टीकोन कमी पडतोय- लेखातून तसे वाटते आहे.
ऊ.दा: लेखात असा प्रतिवाद आहे:
>>उद्या मी पण म्हणते, महिलांना १००% आरक्षण द्या नाहीतर आत्मदहन करते, मग काय संसदेने मान्य करावं.?
हे असे कुणी म्हणत नाही, म्हणणार नाही कारण हा कूतर्क आहे. पण १००% भ्रष्टाचार संपवा, त्या दृष्टीने कडक लोकपाल बिल पास करा (किमान तसा मसूदा चर्चेला घ्या! गुळ मीठ लावलेला सरकारचा गुळगुळीत मसूदा नको) ही मागणी एका व्यक्तीची नसून संपूर्ण राष्ट्राची आहे हा फार मोठा फरक आहे.

निव्वळ "ललित"/ "स्फुट" / "विचार" असे याचे स्वरूप असते तर कदाचित काही ऊणीवा दुर्लक्षित करता आल्या असत्या. पण लेखातून जेव्हा एकंदर अनुमान मांडले गेले आहे आणि ठोस चूक का बरोबर अशी भूमिका घेतली गेली आहे तेव्हा या ऊणीवा लेखनाच्या मूळ उद्देश, आधार व विचारांना एकांगी व कमकुवत बनवतात- अनेकांच्या प्रतिक्रीयांतून हे तुमच्या लक्षात आले असेल असे वाटते.

असो. ईथे तुमची मते मूळ लेखातून मांडल्याबद्दल आणि सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून त्यावर ऊत्तर/स्पष्टीकरण देण्याची तसदी घेतलीत हे कौतूकास्पद आहे Happy

महेश, मी_चिऊ,
लोक बरोबर असतील किंवा नसतील पण उगीच कोणाच्याही मागे जायला वेडे नक्कीच नाहीत, रामदेवबाबाला का नाही एवढा पाठिंबा मिळाला ?>> रामदेवबाबांचा पब्लिसिटी स्टंट चालला नाही हे बरेच झाले. अर्थात त्याला त्यांच्याच चूका कारणीभूत होत्या. असो.. लोक वेडे नाहीत पण ते बरोबर आहेत असंही नाही. अण्णा जे करतायेत ते १००% बरोबर नाहीये आणि लोकशाहीला हितावहही नाही. पण हे माझं मत झालं. लोकांचं मत वेगळं असू शकतं पण ते बनवताना दुसरी बाजूही विचारात घेतली जावी एवढाच मुद्दा आहे. कोणालाही विरोध करणे हा नाही. सगळ्या बाजू मांडल्याशिवाय विचार होत नसतो. दुसरी बाजू सांगणारंही कोणीतरी लागतं. असो, आपल्याला हेमाशेपो.

प्रिंसेस,
अण्णांन्ना पाठींबा मिळतोय कारण लोक खरच वैतागलेत भ्रष्टाचाराला. हे समजतय मला पण म्हणूनच जास्त काळजी वाटतेय की निव्वळ वैतागातून आपण काहे चुकीचं तर करणार नाही ना? आगीतून उठून फुफाट्यात असं तर नाही होणार ना. इतकंच.. Happy आय होप इट्स क्लीअर नाऊ.

योग,
माझा लेख म्हणजे काही सर्वांगीण आलेख नाही. मी असं म्हटलेलं नाही. पण ही देखिल एक बाजू आहे जी तितकीच महत्वाची तरी दुर्लक्षित आहे. याकडे लक्ष वेधणं एवढाच उद्देश होता. Happy आपल्याला हेमाशेपो.

हेमाशेपो ??

मी अस म्हणतच नाही आहे की अण्णा १००% बरोबर आहेत, पण त्यांची तळमळ, आणि लोकांसाठी काही करण्याची भावना तरी १००% आहे ना..? या भावनेलाच लोकांचा पाठिंबा आहे..
कोणि आपल्यासाठी काही करत असेल तर आपण निदान शुद्ध पाठिंबा तरी नक्कीच देउ शकतो ना..

माझी पण भ्रष्ट्राचाराविरोधी भावना खूप खरी आहे म्हणून मी सगळ्या भ्रष्ट लोकांना गोळ्या घालते असं म्हटलं तर?? तसं तर नक्षलवादी आणि माओवादी यांच्या पण भावना चांगल्या आहेत. मग? म्हणूनच मी भावनेसोबत साधनशुचितेचा उल्लेख केला.

हेमाशेपो - हे माझे शेवटचे पोस्ट.!

>>अण्णा जे करतायेत ते १००% बरोबर नाहीये आणि लोकशाहीला हितावहही नाही.
ओके तुमचे म्हणणे मलाही काही मर्यादेपर्यंत मान्य आहे की जे चालू आहे ते अगदी १००% बरोबर नाही, पण सद्ध्याच्या परिस्थितीत दुसरा कोणता चांगला मार्ग आहे ?
लोकशाहीला हितावह नाही असे तुम्हाला वाटते कारण उद्या उठून कोणीही अशा मार्गाचा अवलंब करून काहीही मागण्या मान्य करून घेऊ शकेल असे तुम्हाला वाटते. तसा तुम्ही उल्लेख पण केला आहे की १००% महिला आरक्षण द्या नाहीतर आत्मदहन करते, पण मला तेच सांगायचे आहे की जनता मुर्ख नाही आहे, उगीच कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही मागणीला पाठिंबा द्यायला.

>>लोक वेडे नाहीत पण ते बरोबर आहेत असंही नाही.
पण मग या लोकांना काय करणे बरोबर आहे हे तुम्ही सांगू शकता का ?

मला पण जाणवते की या आंदोलनात सहभागी झालेले हजारो लोक सर्वचजण अगदी स्वच्छ आहेत असे नाही, पण निदान ते सक्रिय पाठिंबा देत आहेत हे काय कमी आहे ? मला तर अगदीच अंधार आहे असे वाटत होते, पण निदान एखादा आशेचा किरण दिसत आहे हे भारताचे भाग्यच म्हणायचे.

१. हेच काय कोणत्याही बिल वा कायद्याने भ्रष्टाचार लगेच कमी होणार नाही. मान्य. पण त्याचा भ्र जरी हलला तरी खुप झाले.
२. भ्रष्टाचार करुन पैसा मिळवलेल्या लोकांकडे इतरांनी पाहण्याचा दॄष्टीकोन बदलला पाहीजे. केवळ त्यांच्याकडे भरपुर पैसा म्हणुन त्यांना मान देउ नये. (बहुतेक असलेला वरचा पैसा कसा आला हे सुज्ञास सांगावे लागत नाही). अशांशी इतरांनी संबंध कमी केले की भ्रष्टाचारी लोक जरा तरी भ्रष्टाचार कमी करतील.
३. महत्वाचे म्हणजे स्वतःची व आजुबाजुच्यांची / च्या एकुणच सवयी बदलल्या पाहीजे. तसा प्रयत्न केला पाहीजे. घरटी १ व्यक्ती जरी सुज्ञपणे वागली वा तसा प्रयत्न केला तरी बरिच बरि परिस्थिती येईल.

अण्णा हजारे काय किंवा अन्य कोणी हा विषय निघणे हि भारताची गरज आहे. त्यांची पध्द्त बरोबर की चुक हा मुद्दाही आहेच. पण कोणतितरी मेथडॉलॉजी आता वापरणे गरजेचे आहे / होते.

आपण माणुस आहोत देव नाही. त्यामुळे जेथे देवांच्या आपण / कोणी चुका काढतात तेथे माणसांचे काहीतरी / कुठेतरी चुकु शकते हे मान्य केले पाहीजे. कोणतीही गोष्ट कोणाच्यातरी दृष्टीने चुक असतेच. आप्ल्या नजरेत चोरी करणे चुक आहे पण चुकुन / कधीतरी ती चोराची गरज असते हे विसरता येत नाही.

तर काय - ईप्सीत साध्य होणे महत्वाचे, मार्ग अगदी चुकीचा नसणे हे महत्वाचे. रोडवरील खड्ड्यांमुळे जर जीव जात असतील (हे भ्रष्टाचाराचे १कच उदाहरण) तर अशा शांततापुर्ण मार्गाने कमी हानीत काहीतरी चांगले होत असेल तर त्याचे स्वागत करावे.

सपोर्ट करणे मान्य नसले तरी असहकार नसावा. हो पण जेथे चुकीचे दिसेल तेथे जरुर टोकावे Happy

कृपया हेमाशेपो असे लिहून चर्चेतुन माघार घेऊ नका.
साधनशुचितेचा तुम्ही उल्लेख केलात, आणि अण्णांच्या मार्गाची तुलना अतिरेकी मार्गाशी केलीत. हे कसे काय ? अण्णांनी साधनशुचितेचा काय प्रकारे भंग केला हे जरा सविस्तर सांगू शकाल का ? त्यांनी पुर्णपणे अहिंसात्मक मार्गाने आंदोलन चालवले आहे. राहिला प्रश्न उपोषणाचा. सरकारने त्यांना अनुल्लेखाने मारावे ना, कोण अण्णा, कसले उपोषण आम्हाला काही घेणेदेणे नाही असे करता आले असते.
अण्णांनी काही देशभरातल्या सर्व लोकांना सांगितले नव्हते की मला अटक झाल्यावर सगळीकडे आंदोलने करा. लोक स्वयंस्फुर्तीने आंदोलन करत आहेत आणि ते सुद्धा कोणत्याही प्रकारची दंगल, इ. न करता. आता याहुन वेगळी कसली साधनशुचिता तुम्हाला अपेक्षित आहे ?
इतर आंदोलनांप्रमाणे लोकांनी जाळपोळ, तोडफोड, मारामारी केली असती आणि अण्णांनी त्यांना शांततेचे आवाहन करून ते शांत झाले असते तर तुमचे म्हणणे मान्य होते.

अहो पण हे काहे फक्त एकट्या अण्णानण्णांच मत/भावना नाहीत..

माझी पण भ्रष्ट्राचाराविरोधी भावना खूप खरी आहे म्हणून मी सगळ्या भ्रष्ट लोकांना गोळ्या घालते असं म्हटलं तर??>> माझ्या माहीती प्रमाणे आण्णांनी कोणताही असांसदीय मार्ग अवलम्बलेला नाहिये.. गोळ्या घालणे हा गुन्हा आहे आणि उपोषण हा गुन्हा होत नाही. या दोन्हीची तुलनाच कशी होउ शकते..??

मी लेख वाचला आहे. माझं मत मुद्दामच दिलं नव्हतं. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोण असतात त्या प्रत्येकाचा आदर केला गेला पाहीजे. जे लोक अण्णांना समर्थन करत आहेत त्यांचा आदर करून असं म्हणावंसं वाटतं कि अण्णांशी असहमत असणे हा ही लोकशाहीचाच भाग नाही का ?

सिव्हील सोसायटी हि जनतेचं प्रतिनिधित्व करते कि नाही याबद्दल ठामपणे काहीच वक्तव्य करता येत नाही. हे विधेयक काही देशातल्या प्रत्येकाला विचारून झालेलं नाही. अण्णांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही म्हणून त्यांच्या हटवादीपणाबद्दल बोलूच नये असं नाही. रोगापेक्षा इलाज भयंकर नको असं ब-याच जणांचं म्हणणं आहे. संसदीय लोकशाहीत जनताच आपले प्रतिनिधी निवडत असते. १२० कोटी जनता संसदेत जाऊन बसू शकत नाही. त्यांचा कारभार पाहूनच त्यांना पुन्हा संधी दिली जाते. जर चुकीच्या लोकांना संधी दिली जात असेल तर त्याचा विचार कुणी करायचा ?

याउलट आपल्या मागण्या मान्य करा म्हणून प्रत्येकजण संसदेला वेठीस धरण्यासाठी उपोषणास बसू लागला तर अराजक उद्भवण्याची शक्यता आहे. आमरण उपोषण म्हणजे आत्महत्येची धमकी. हा गुन्हा आहे. आमरण उपोषणास कुठलीही सरकारी यंत्रणा मान्यता देऊ शकत नाही. उद्या अण्णांचं काही बरंवाईट झालं तर सर्वोच्च न्यायालय आमरण उपोषणास परवानगी देणा-या यंत्रणेस जबबदार धरणार आहे. ही गोष्ट आयएस कॅडरच्या कजरीवाल किंवा पोलीस महसम्चालक राहीलेल्या किरण बेदी यांना माहीत नसावी का ?

ज्या मागण्या मान्य होऊ शकत नाही त्या करून सरकारची भंबेरी उडवून द्यायची आणि गंमत बघत बसणे इतकाच हा कार्यक्रम मर्यादीत नाही. नेते तुरूंगात गेल्यावरही आंदोलन चालू राहीलं आहे. त्यासाठी एकसारख्या टोप्या आणि इतर साधनसामुग्री देशभर दिसून येत आहे. अण्णांचं नेटवर्क इतकं कधीच नव्हतं. राळेगण सिद्धीत बंद पाळलं जाणं समजून येतं.

बरं, कुठल्याही वाहीनीवर पाहीले असता कुठल्याही एका ठिकाणी शंभर दीडशेपेक्षा मोठा जमाव नाही. समोरून कॅमेरा घेतला असता ते आंदोलन उग्र वाटते पण हाच कॅमेरा उंचावरून घेतल्यास जमाव मूठभर दिसून येतो. यातले काही चेहरेही ओळखीचे होउ लागलेत. हे आंदोलन मेडियाचं आहे आणि कुठल्यातरी एनजीओचा त्यात सहभाग आहे अस वाटू लागलय.

आत्ताच मा. न्यायमूर्ती संतोष हेगडे जे टीम अण्णांचे सदस्य आहेत त्यांनी पंतप्रधान आणि जुडिशिअरी यांना वगळण्याबाबत वाटाघाटी होऊ शकतात असे जाहीर केले आहे. मग सरकारी बिलात आणखी वेगळं काय म्हटलंय ? महाराष्ट्र टाईम्सने दोन्ही बिलं समोर ठेवून प्रत्येकाला आपलं मत बनवायचा अधिकार दिला त्याबद्दल त्यांचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत.

>>या दोन्हीची तुलनाच कशी होउ शकते..??
अगदी बरोबर,
उपोषण हा देखील दडपण आणण्याचा एक प्रकार आहे आणि त्यामुळे तो चुकीचा आहे असे जर वाटत असेल तर मग चांगला उपाय काय आहे ?

अनिल, विरोध असूच नये असे नाही, पण तो का आहे हे कळून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. विरोधासाठीचे मुद्दे तुम्ही देखील वर वाचले असतीलच, ते सयुक्तिक वाटतात का ?
बाकी तुम्ही जो एक नविन मुद्दा उपस्थित केला आहे त्यावर तर वेगळीच चर्चा केली जाऊ शकते.

बरं, कुठल्याही वाहीनीवर पाहीले असता कुठल्याही एका ठिकाणी शंभर दीडशेपेक्षा मोठा जमाव नाही. समोरून कॅमेरा घेतला असता ते आंदोलन उग्र वाटते पण हाच कॅमेरा उंचावरून घेतल्यास जमाव मूठभर दिसून येतो. >> पण मी तर काल पेपर मधे वाचल कि पुण्यातुन ४७० लोकानी स्वताला अटक करुन घेतली.. मग हे कसे?? पेपर वाले इतक निराधार छापत असावेत?

>>बरं, कुठल्याही वाहीनीवर पाहीले असता कुठल्याही एका ठिकाणी शंभर दीडशेपेक्षा मोठा जमाव नाही. समोरून कॅमेरा घेतला असता ते आंदोलन उग्र वाटते पण हाच कॅमेरा उंचावरून घेतल्यास जमाव मूठभर दिसून येतो. यातले काही चेहरेही ओळखीचे होउ लागलेत. हे आंदोलन मेडियाचं आहे आणि कुठल्यातरी एनजीओचा त्यात सहभाग आहे अस वाटू लागलय.

विरोधी पक्ष किंवा कोणी राजकिय पक्ष सापडला नाही म्हणुन मेडिया आणि एनजीओ ? आपले मुद्दे अतर्क्य आहेत. अनेक शहरांमधुन लोक उत्स्फुर्तपणे मोर्चे काढत आहेत ते सारे अण्णांनी आधीच मॅनेज करून ठेवले होते ???

<कुठल्याही वाहीनीवर पाहीले असता कुठल्याही एका ठिकाणी शंभर दीडशेपेक्षा मोठा जमाव नाही. समोरून कॅमेरा घेतला असता ते आंदोलन उग्र वाटते पण हाच कॅमेरा उंचावरून घेतल्यास जमाव मूठभर दिसून येतो. >

आत्ता या क्षणी आयबीएन लोकमत या वाहिनीवर नाशिकमधला मोर्चा दाखवत आहेत. कॅमेरा उंचावर आहे. मोर्चेकर्‍यांची संख्या नक्की हजारांच्या घरात आहे. काल रात्री माझे काही मित्र (काही पत्रकार आहेत यांपैकी, पण अण्णांचं कॅम्पेन मॅनेज करण्याइतपत अजून मोठे नाहीत) इंडिया गेटाजवळ होते. त्यांनी मला सांगितलेला आकडा नक्की शेदीडशेपेक्षा अधिक होता.

अण्णांचं नेटवर्क इतकं मोठं नसलं, तरी भ्रष्टाचाराला विरोध या एका मुद्द्यावर लोक एकत्र येऊ शकतात. काल दिल्लीतल्या रिक्शा बंद होत्या, उद्या मुंबईतले डबेवाले संपावर आहेत. पुण्यातले अनेक विद्यार्थी काल-आज मोर्चात सहभागी झाले होते. त्यांना 'भ्रष्टाचाराला विरोध' हा मुद्दा महत्त्वाचा वाटू शकतो.

आणि एनजीओंचा सहभाग असण्यात वाईट काय? RTI कायदा देशभर लागू व्हायला याच संघटना कारणीभूत होत्या.

काल एका शाळेबाहेर तेथीलच विद्यार्थी जमा झाले होते आणि घोषणा देत होते. ५०-१०० नक्कीच असतील.

उलट जमाव मोठा नसेल आणि बर्‍याच ठिकाणी असे होत असेल तर उत्स्फुर्त असण्याचीही तेवढीच शक्यता आहे.

अमेरिकन्स दिसले का कोठे? सरकारने ती शंका काढली आहे Happy

Pages