रवा आणि खोबर्‍याचे लाडू

Submitted by दिनेश. on 12 October, 2009 - 02:01
rava khobare ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

चार कप बारिक रवा, दोन कप बारिक वाटलेले ओले खोबरे ( एका मध्यम नारळाचे एवढे होते)
एक कप तूप, तीन कप साखर, मोठी चिमूट केशर (किंवा हवा तो स्वाद ), बेदाणे व काजू
(आवडीप्रमाणे )

क्रमवार पाककृती: 

जाड बुडाच्या भांड्यात थोडे तूप घालून रवा भाजायला घ्या. फ़ार गुलाबी करायचा नाही.
शक्य असेल तर खोबरे वाटताना फ़क्त शुभ्र भाग घ्या (मी आळस केला ) रवा भाजत आला
कि त्यात खोबरे घाला. परतत रहा, रवा परत हाताला हलका लागला पाहिजे ( खोबर्‍याचा
ओलेपणा रहायला नको. ) लागेल तसे तूप घालत रहावे.
दुसर्‍या भांड्यात साखर आणि दिड कप पाणी घालून पाक करत ठेवा. सतत ढवळत रहा.
पाकातच केशर किंवा वापरत असाल तो स्वाद घाला. उकळी येउन फ़ेस आला कि गॅस मंद
करा. पाकातला चमचा वर काढून, थोडासा पाक अंगठा आणि पहिले बोट यांच्यामधे धरुन
बोटे हळूहळू लांब करा. एखादी तार दिसायला लागली कि गॅस बंद करा व अर्ध्या कपापेक्षा
थोडा जास्त पाक काढून ठेवा. मग पाकात रव्याचे मिश्रण घालून ढवळा.
दोन तीन तास झाकण न ठेवता मुरु द्या. मग लाडू वळायला घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर
काढून ठेवलेला पाक कोमट करुन लागेल तसा मिसळा. (रवा किती जाड आहे, यावर किती
पाक लागेल, ते ठरते ) मिश्रण हाताला शिऱ्यापेक्षा थोडे घट्ट लागेल, इतका पाक घाला. लाडु
वळताना, हवे तसे बेदाणे व काजू वगैरे वापरा. (मी भाजलेला काजू लाडूच्या आत ठेवलाय, त्याने
लाडवाचा ओलावा कमी होतो. )

मला रव्याचे लाडू मऊसर आवडतात. (तसे नसले तर रांगोळीचा लाडू खाल्यासारखा वाटतो मला.)
हा लाडु मऊसर होतो. फ़ारसा टिकणार नाही, पण चवीला मस्त लागतो. (फ़्रीजमधे आठवडाभर
राहील. ) या प्रमाणात ५० ते ६० लाडू होतात. (कपाच्या आणि लाडवाच्या आकारावर अवलंबून )

वाढणी/प्रमाण: 
५० ते ६० लाडू होतील.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. काय सुंदर आहेत लाडू. असे (रवा+ ओले खोबरे ) लाडू खावून्(करून सुद्धा) बरेच महिने लोटलेत.

तुमचे बरोबर आहे, मलाही ते ओलसर नाहीतर गबगबीत रव्याचे लाडू आवडतात नाहीतर ते रेतीसारखे कोरडे फुटणारे लाडूला चवही नाही लागत. मधून मधून खोबरेही मस्त लागते.

मूग, बेसन नंतर रवा माझे आवडते लाडू.(त्याच क्रमाने).
बाकी लाडू एकदम साच्यातले केल्यासारखे सारखे दिसतात.
तुमची दिवाळीची तयारी सुरु झाली वाटते. मला अजून मुहुर्त लागायचा आहे.

काय दिसताहेत लाडु..... शुक्रवारी करेन म्हणजे दिवाळीला टिकतील. (मला फ्रिजमध्ये ठेवलेले नाही आवडत....)

मूग, बेसन नंतर रवा माझे आवडते लाडू.(त्याच क्रमाने).

माझेही Happy

तुमची दिवाळीची तयारी सुरु झाली वाटते. मला अजून मुहुर्त लागायचा आहे.

लवकर पंचांग पहा. दिवाळी चार दिवसांवर आली.
(उद्या नशिबाने सुट्टी मिळालीय.. दोन पदार्थ तरी झालेच पाहिजेत माझे.)

या लाडवांना खोबरे आणि रवा समप्रमाणात घेतले तर तुप घलायची गरज नसते. मी दरवर्षी करते मस्त मऊ होतात. पण खोबर्‍यामुळे टिकत नाहीत खुप जास्त.

खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी Wink

ह्या लाडवांना नारळी पाकाचे लाडु म्हणतात ना ? बायांनो घाबरु नका, बिंधास लाडु करायला घ्या. मी केले होते मागच्या वर्षी दिवाळीला. न चुकता Proud

मी पण तुप न घालता करते. १ वाटी रवा + १ वाटी खोबरं + १वाटी साखर + काळ्या मनुका + वेलदोडा पुड, लागेल तेवढे दुध. मस्त मऊ होतात. फ्रिजमधे ७-८ दिवस रहातात.

मी केलेल्या लाडवात ओले खोबरे व रवा(आधी रवा जरासाच परतून झाल्यावर) दोन्ही एकत्र थोड्यावेळ परतून घेतले मग पुन्हा किचिंत तूपात परतले तर नाही खराब होत. ५-६ दिवस आरामात टिकतात बाहेर फ्रीजच्या. मी असे करून पाठवलेत फेडेक्सने ३ दिवस लागले पोचायला. आधी लाडू थंड करून ठेवले बाहेर:)
जर भितीच वाटत असेल तर सरळ मावे मध्ये आणखी ओले खोबरे जरा कोरडे करावे ८-१० सेकंद. काही नाही झाले आतापर्यन्त. ते खोबर्‍यातील पाणी रव्याने शोषले तर रवा फुलतोही व मस्त वास येतो लाडवांना. म्हणून मंद आचेवर परतत रहायचे. तळाला लागू द्यायचे नाही मग तूप टाकायचे. रंग पण बर्‍यापैकी पांढरा रहातो लाडूचा कारण तूप आधीच टाकून भाजले तर आणखी आतून भाजले जातो रवा व चॉकलेटी होतो. हे पांढरे ज्यास्त छान दिसतात. म्हणूनच तूप कमी टाकावे व नंतर टाकावे. Happy

वाह मस्त दिसताहेत लाडू, एकदम साच्यातुन काढल्यासारखे!!
मागे शोनुने ही रेसिपी टाकली होती, मी नेहमीच करते या पद्धतीने. छान होतात आणि खराब होईपर्यन्त शिल्लकच राहत नाहीत.
प्रीती: दुध घालुन ? म्हणजे पाक करायचा नाही का?

हो, पाक न करता. एकदम मस्त होतात. रवा रंग न बदलेल इतकाच भाजुन घ्यायचा (पाहिजे असल्यास एक चमचा तुप घालायचं ) आणि डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं.

लाडू पांढरे रहायला नको म्हणून रवा त्या फोटोतल्या रंगावर येईपर्यंत म्हणजे साधारण किती वेळ भाजायचा? तसंच पाक अगदी उकळता गरम असताना रवा-खोबरं मिश्रण घालायचं का?

मृ, रवा शिर्याला भाजशील तितपत किंवा त्याहुनही थोडा आधिक वेळ भाजावा मगच त्यात खोबरे घालुन भाज. आणि हो उकळत्या पाकातच घाल रवा छान फुलुन येतो. आणि कॉइल किंवा ग्लासटॉप चा स्टोव असेल तर भांडे बाजुला काढुन ठेव Happy

थँक्स मिनोती. लाडू करायला घेतले आणि रवा बराच जाड आहे असं वाटलं. बारिक रवा आणेपर्यंत हे लाडू पोस्ट्पोन. Sad

रवा जाड असेल तर पाक कच्चा ठेवायचा. हे मिश्रण मऊसर असल्याने छान वळता येतात. ( नाहीतर रव्याचा लाडू ठसकन फूटतो, वळतानाच )

छान लाडू..दिनेशदा, इकडे ओले खोबरे मिळत नाही.डेसिकेटेड मिळते पण मला ते आवडत नाही.थोडासा वास येतो त्या खोबर्‍याला.खोबरे न घालता हे लाडू करता येतील का?प्रमाण किती बदलावे लागेल?

mbjapan, खोबरं नसेल, तर बेसन घाल.. रवा-बेसन लाडवांवरही बरीच चर्चा चालू आहे सध्या Happy
नुसत्या रव्याचे लाडू भरभरीत लागतात, वळता येत नाहीत आणि चवीलाही खास लागत नाहीत, म्हणून चवीला नारळ अथवा बेसन घालावे- असं माझं मत.
दिनेश आणि मृण- फोटो मस्त Happy

हे सुके खोबरे मिळते ते कोमट दूधात भिजत घालायचे. मग नारळासारखे वापरता येते. तो टिपीकल वास जाण्यासाठी कुठलाही इसेन्स वापरायचा. खोबर्‍याशिवाय या लाडूची मजा नाही.

तोशावी, तरीच फोटोतले एक दोन कमी झाल्यासारखे वाटले मला !!!

गॅस बंद केला आहे. ते गरम पाकात टाकलेले मिश्रण फारच /कोरडं वाटतं आहे. आता काय करु ?
दोन तासानंतर ओलं होईल का ? की अजून पाक टाकावा लागेल ? की तुप कमी पडलं ?(रवा तर व्यवस्थित भाजल्या गेला होता)

सर्वच बिघडल्यास तेच दुधात खीर म्हणून खपवता येईल का ?
हेल्प, हेल्प. आज तिन पदार्थ व्यवस्थित झाले. नेमका बिघडायला हाच एक पदार्थ राहिला होता Sad उगाच डोक्याला ताप नको म्हणुन कागदावर गणित करुन रेशो लिहीला, एक वाटी रव्याचा. (धाय मोकलून रडणारी बाहूली)

मायक्रोवेव्ह मध्ये ते माझं वरील सॅड मिश्रण दुधासकट टाकुन लाडू तयार झालेत. हुश्श.

माझच करताना काहीतरी चुकलं असणार, प्लीज सांगा कोणीतरी. पाक बिघडला असेल का ? एवढं कोरडं व्हायचं कारण काय ?
पुन्हा एकदा करुन पाहीन उद्या परवा.

दिनेशदा प्लीज एक सचित्र पाक फॉर् डमीज टाका. आजन्म ऋणी राहीन. Proud मी जुन्या माबोवरचे लाडूचे सर्व बीबी वाचलेत. हे पाक प्रकरण झेपण्यातले नाही.

माझे पाकातले लाडु प्रत्येक वेळी कसे कसे बिघडले हे लिहित बसले तर ग्रंथ तयार होईल. याउलट माझ्या आईला पाकातल्या लाडवांसारखा सोप्यातला सोपा पदार्थ कसा बिघडु शकतो हेच कळत नाही Happy

एकदा पाकात घातल्यावर पाण्यात घातल्यासारखे झाले. वळेचनात, कारण चिकटपणा अजिबात नाही. एकदा इतके कोरडे झाले की वळेचनात. परत परत पाक करुन घालत राहिले तरी कोरडेच आणि शेवटी अती साखरेमुळेतर इतके गोड झाले की खाणे अशक्य होऊन बसले.... :). एकदा केले ते सासुबाईंनी पुढचे तिनचार दिवस शि-यासारखे खाल्ले. Happy असे अजुन कितीतरी किस्से.

पण तरी नाद सोडलेला नाही. वरील कृ. प्रमाणे करुन पाहिनच.

Pages